कातरवेळ १

Submitted by अमृतवल्ली on 4 September, 2013 - 07:29

दुपार जरा कलंडली आणि इतक्यावेळ उन्हाने गपगार पडलेली वळचणीची पाखरे किलबिलाट करू लागली. पलंगावर बसून भिंतीला टेकून बसल्याने पाठीला चांगलीच रग लागली होती. पाखरांच्या आवाजाने तिची तंद्री मोडली. दोन्ही पायाला घातलेले हाताचे विळखे तिने हळुवार सोडले आणि मान भीतीला टेकवून खिडकीकडे पहिले. हळूच खिडकीच्या उंबरा ओलांडून एक धिटुकल पाखरू आता आलं, मान वेळावून त्याने सगळीकडे पाहून घेतलं, चोचीने तिथलच काहीतरी उचललं, थोडावेळ खिडकीच्या गजाच्या आत-बाहेर केलं, तेवढ्यात वारयाने पडदा हलला. तेवढूश्या हालचालीने पाखरू केवढ्याने दचकले आणि भुर्क्कन खिडकीबाहेर उडून गेलं. त्याची ती लगबग बघून तिला हसू आल...वाटल.. “वेडं पाखरू....” ती थबकली. किती दिवसांनी हा शब्द आला तिच्या ओठांवर.

तिला तीच घर आठवलं आणि तिची सकाळची गडबड, बस यायची वेळ, त्यात काहीतरी सापडत नसायचं, डबा, पर्स किंवा किल्ल्या. रोज हरवायाच्या, आदल्या दिवशी तयारी करूनही असं कस होतं म्हणून चिडचिड... तो मात्र तिच्या या धांदलीकडे फक्त बघत बसायचा, तो उठून मदत करत नाही म्हणून तिची अजून चिडचिड.. कधी तिच्या या गडबडीकडे बिनदिक्कत दुर्लक्ष करून तिला तो अक्षरशः खेचून इथे आणायचा आणि कुशीत घेऊन गोंजारत म्हणायचा..”वेडं पाखरू...”

खरच एकमेकांबरोबर राहील तर किती होऊन जातो आपण. तिथच चुकलंय गड्या.....

उसासे सोडत ती पलंगावरून खाली उतरली. मगाशीचीच गार वाऱ्याची लहर पुन्हा एकदा झुळूकली.पडदे हलकेसे थरारले.बाहेरच्या उन्हाची तकतकीत नजर खिडकीजवळच्या फुलदाणीवरून, पुस्तकांवरून हळूहळू समोरच्या भिंतीमध्ये विरून गेली. ही भिंत त्यानेच नव्हे का काही वर्षापूर्वी रंगवली होती. जांभूळनिळ्या आकाशाखालच सोनेरी पिवळ गवत.. आणि त्यावर उडणारे काळे जर्द पक्षी.. उरलेल्या घराच्या खोल्या नुसत्या कावेने रंगवल्या असल्या तरी या खोलीची रंगसंगती मात्र त्याची. मग हे चित्र असो किंवा टेबललॅम्पची मोरपंखी कागदी शेड. आमच्या बायजाबाईसाठी ही खोली म्हणजे ‘रंगमहाल’. “दादा कुठे आहेत?” असा विचारलं कि तीच उत्तर ठरलेलं..”बसल्यात की रंगम्हाली”
या खोलीच्या उंबरठ्यावर उभ राहील कि कुठल्यातरी चित्रातून नुकतंच उठून बाहेर आलोय अस वाटत जणू ओल्या चित्रातली ओले रंग अजून आपल्या अंगावर आहेत आणि त्या ओल्या रंगाचा वास सुद्धा. कित्येकवेळा संध्याकाळच्या गप्पा मारताना मी उंबऱ्याच्या पायरीवर बसून राही आणि तो आत खोलीत ..या चित्रापाशी...

स्पंज-टेक्श्चर वापरून रंगवलेल हे चित्र मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा अगदी थक्क झाले होते. हा गडी आमचा काही चित्रकार नाही फक्त कधी काय करेल याचा नेम नाही. वॅऩ गॉगच wheat field with crows वरून काहीतरी काढायचं याने नक्की केल होत. “याच घर आहे , वाटेल ते चित्र काढेल तो त्याच्या भिंतीवर उद्या हिडींबेच चित्र काढल तरी मी कोण बोलणार” असा माझा विचार. याची इकडे चित्र काढायची तयारी जोरात चाललेली. ऑफिस मध्ये गुगलून झाल्यावर मात्र हिडींबेच चित्र बर असा वाटायला लागल. खर तर हा माझा स्वभावधर्म नव्हे. ज्याला जे पाहिजे ते त्याने करावे. पण या चित्राविषयी वाचताना एक अनामिक लहर चमकून गेली. वॅऩ गॉगने अखेरच्या दिवसात wheat field सिरीज केली होती. त्यातलं हे कातरवेळचं गव्हाच शेत. अपरिमित दु:खाने व्यापलेलं हे जग, नसानसात भिनलेला एकटेपणा आणि या सगळ्याचा उगम आणि अंत असलेला, पक्ष्याच्या रुपात घोंघावणारा मृत्यू. या विकांताला भेटल्यावर याला आपल्याला काय वाटत नक्की सांगू अस ठरवून टाकलं. घरी पोहचले तो हा नखशिखांत निळा. ब्रश बाजूला ठेवून माझ्या हातात बायजाबाईच्या हातचा ‘च्या’ देऊन त्याने विचारले,
“कधीपासून इतकी कलाश्रद्धाळू झालीस गो बये..”
“कसला कलाश्रद्धाळूपणा? “
“बर ..प्रत्येक चित्राचा एकच अर्थ लागावा का? “
“अख्ख जग म्हणतंय असं. तुला एकट्याला बरा वेगळा अर्थ लागतो?”
तू वेगळ पाहशील तर तुलाही तुझा अर्थ लागेल. एकदा कलाकृती घडली की व्यक्तीगणिक अर्थ बदलतो गं
उद्या तू केलेल्या पोळ्यांना कोण तुताआमेनखांच्या कबारीवारची चित्र म्हटलं तर तू काय करणारेस”
झाल माझ्या पोळ्या आणि तुताआमेनखां एका वाक्यात आलं म्हणजे गडी रंगात आला. आता काहीही बोलून फायदा नव्हता.
माझ्या जवळ येत त्याची निळी बोटं केसातून फिरवत म्हणाला,
“गॉगने स्वतःला याच शेतात गोळी घातली. माहित आहे ग मला. त्याच शेवटच वाक्य काय होत माहित आहे.. “the sadness will last forever”.. दुःखाची इतकी भीती का? ..माहित आहे मला तुला हे चित्र का नकोय ते..पण घाबरू नकोस . मी आहे..”

तू आहेस?...कुठे ???

घड्याळाने ४ चा टोल दिला. या खोलीतली तिची एकमेव वस्तू..

क्रमश:

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह.. सुंदर सुरुवात. अमृतवल्ली... उत्सुकता नक्कीच चाळवलीत अन पुन्हा इथे फेरी मारायची सक्तीही केलीयेत. लवकर येऊद्यात पुढले भाग.