मम आत्मा गमला..१

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मधे एकदा घरी पुण्याला गेले होते. गेल्यावर पुस्तकांच्या दुकानी जाणं ओघानी आलंच. सेनापती बापट रस्त्यावरचं क्रॉसवर्ड मला खूप आवडतं. एकतर तिथे गर्दी नसते. मोठं दुकान आहे, खालचा मजला पुस्तकांसाठी आणि वरचा सीडीज्, डीव्हीडीज् वगैरेंसाठी. पुस्तक खरेदी करण्याआधी मस्तपैकी एखाद्या कोपर्‍यात बसून वाचता येतं. कोणीही उठा, खरेदी करायची नसेल तर दुकानातून चालू पडा! वगैरे म्हणत नाही. एकूणच निवांत असा माहौल आहे. सुख आणखी वेगळं काही असतं का? तर, त्यादिवशी पुस्तकांची खरेदी झाली, आणि वरच्या मजल्यावरच्या सीडीज् वगैरे पाहूयात म्हणून वर गेले. सीडीज् पाहता पाहता बालगंधर्वांनी म्हटलेल्या नाट्य संगीतांच्या दोन सीडींचा संच दृष्टीला पडला. संच हातात घेऊन सीडीज् वर कोणती गाणी आहेत हे वाचताना, लहानपणी यातली काही गाणी ऐकल्याचे आठवले. अण्णांनी - माझ्या आजोबांनी, आवडीने घेतलेला ग्रामोफोन आठवला, नाट्य संगीताच्या तबकड्या आठवल्या. तसं, त्या नाट्य संगीताच्या आणि बालगंधर्वांच्या आवाजाच्या मोहापेक्षाही माझ्या लहानपणीच्या आठवणींच्या मोहाने तो संचही मी खरेदी केला! पुण्यातल्या इन मिन चार दिवसांच्या वास्तव्यात मला काही त्या सीडीज् ऐकायला वेळ झाला नाही. बंगलोरला येऊन, घरी पोचल्या पोचल्या मात्र सीडी लॅपटॉपमधे सरकवली, पहिलंच गाणं सुरु झालं ते, नाथ हा माझा... अण्णा आणि वैनीचं आवडतं गाणं. आपल्या आठवणी कुठे आणि कशांत गुंतलेल्या असतील, आणि कोणत्या क्षणी त्या आपल्या भोवती फेर धरतील, काही सांगता येत नाही ना?

.....तसं, माझ्या घरी सगळ्यांनाच गाण्याचं वेड. अण्णा आणि वैनी - म्हणजे माझी आज्जी - यांना, जास्त करुन वैनीला. आज्जीला वैनी का म्हणत असू, ह्याचही कारण आहे, पण ते नंतर कधीतरी. घरी दोन सतारी, पेटी, तबला हेही होतं कधीकाळी. आत्त्या छान गायची, बाबा तबला वाजवत. घरात गाणं ऐकण्याच्या हौशीपायी नंतर ग्रामोफोन आणलेला. ग्रामोफोन आणि त्या तबकड्या. प्रत्येक वेळी बदली झाली, की मग तो अगदी जपून पुढच्या गावी न्यायचा. वैनी मग कधीतरी जुन्या आठवणींत रमताना सांगायची, "एवढं कधी मुलांना पण जपलं नसेल!" अर्थात, ह्यात कौतुकाचा, आयुष्यभर त्या दोघांनी मिळून जो संसार सगळे टक्के टोणपे खात, सुख-दु:खांत एकमेकांना साथ देत मार्गी लावला, त्यातून निर्माण झालेल्या एकमेकांविषयीच्या आत्मियतेचाच भाग जास्ती असायचा, ही बाब अलाहिदा! आम्हां सार्‍यांनाच ते ठाउकही होतं, पण तरीही तिच्या तोंडून ऐकताना ते खूप छान वाटायचं. उगाचच त्या वाक्यामागची माया आपल्यालाही उब देते आहे अशी काहीशी भावना मनात पैदा व्हायची. आजही मला तिच्याबरोबरच्या गप्पा आठवल्या ना, की तशीच काहीशी भावना मनभर पसरते.

अण्णा घरी असले की ग्रामोफोन लावायचेच. आम्ही लहान असताना ते रिटायर्ड आजोबा. त्यामुळे कुठे काही कामानिमित्त वगैरे बाहेर गेले नसले तर घरीच. त्यात पुन्हा नातवंडांचा आग्रह, मोडणार कसा?? घरात सतत सूर नादावत असायचे. राबताही भरपूर. मस्त जेवणं करुन जिव्हाळ्याच्या गप्पा मारत, आमच्या घरी जमलेल्या सुखाने सैलावलेल्या मैफिली, बैठका अजूनही आठवतात. बघायला गेलं तर, आकारमानाने एवढही मोठं घर नाहीये खरं तर, पण अण्णा-वैनीची मनं मात्र आभाळाएवढी. अतिथीचं नेहमीच स्वागत. आयत्या वेळी कोणी न सांगता आलं तरी कोणाच्याच कपाळी आठी पाहिल्याचं आठवत नाही! उलट गप्पा जमवायला कोणी पंगतीला आहे, याचंच अप्रूप. कधी कधी गर्दी व्हायची, पण त्यातही धमाल मजा होती! रात्री रात्रीपर्यंत जागलेल्या गप्पा आणि आम्ही बच्चे मंडळी मधे मधे लुडबूड करायला! आम्हांला कोणी काही दबकावायला पाहिले, की अण्णा आम्हांला पाठीशी घालत, वैनीही. त्यांच्यामुळे आम्ही निर्धास्तपणे मनसोक्त दंगा करत असू! नाहीतर बाकीच्या मोठ्या मंडळींनी आम्हांला जरा अतिच शिस्तीचा बडगा दाखवायला कमी केलं नसतं! नाहीतरी, अण्णा, वैनींनी लाडोबा केले आहे हे आम्हाला ऐकावं लागतच असे! जळत असत आमच्यावर मोठी माणसं - म्हणजे आई - बाबा, काका - काकी, आत्त्या वगैरे, अजून काय?? Happy

-क्रमशः

*********
मम आत्मा गमला..२

प्रकार: 

छान वाटतंय..पुढचंपण येऊद्यात.
पु.लं च्या "गणगोत" मधल्या "बाय" आणि "ॠग्वेदी" या त्यांच्या आजी-आजोबांच्या व्यक्तीचित्रांची आठवण झाली..
..प्रज्ञा

मस्त लिहीलय. आवडल.

Happy क्रॉसवर्ड देशात असेपर्यंत माझही आवडतं ठिकाण होतं. मस्त वाटायचं तिथे फेरफटका मारून वाचत बसायला.
पुढे येऊ द्या!

सुरूवात चांगली आहे, पुढचे कधी? Happy

क्रॉसवर्ड म्हणजे त्या मॉल मधे झालंय ते का? पूर्वी चतु:श्रुंगी पायथ्याशी एक 'अक्षर' होते, ते ही मुख्य पाठ्यपुस्तकांचे.

क्रॉसवर्ड हे माझंही अत्यंत आवडतं ठिकाण आहे. निवांतपणे सीडीज, पुस्तके हाताळता येतात. बाकी सांगीतिक डीटेल्स खूप टचिन्ग आहेत. मजा आली. पुढचा भाग लवकर टाक.

आयटे, पुढे?...
उग्गीच पडजिभेन खाल्ला जिभेन बोंब मारली... Happy

झकास! तुझ्या लेखानं जुन्या ग्रामोफोनांपासून, कॅसेटा, आकाशवाणी, "जुनं" दूरदर्शन सार्‍यांमधून लहानपणी घडलेल्या सांगीतिक संस्कारांची आठवण होत्ये. Happy
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

आयटे, क्या बात है!!!..
खुप सुंदर आणि ओघवतं झालंय..
फ म्हणतोय ते १००% खरंय.. Happy
बर्‍याच दिवसांनी मलाही माझ्या आठवणींमध्ये रमता आलं तुझं लिखाण वाचून. Thanks.. Happy

~~~~~~~~~~~~~~~~~
आलो कुठून कोठे तुडवून पायवाट
काटे सरून गेले उरली फुले मनांत

प्रज्ञा, दिव्या, माधुरी धन्यवाद.
चिन्नु अगदी.. Happy हो अमोल, मॉलच्या इमारतीतच आहे. प्रशस्त दुकान आहे. डेक्कनवरही एक होतं, पण भाडेकरार संपला अन् तिथून ते उठवलं Sad आता तिथे कपड्यांचं दुकान आलय.. Sad
दाद Lol
फ, अगदी.. जुनं दूरदर्शन आणि गजरा, प्रतिभा आणि प्रतिमा, सुहासिनी मुळगावकरांचे कार्यक्रम.. पु. ल. आणि श्रीकांत मोघेंच "दिल देके देखो, दिल देके देखो, मुझे पिलाहो एक कप कोहोssको.. " Lol
किरुभाव, थांक्यू.. Happy

अगदी अगदी..
जुना गजरा.. विनायक चासकरांचा.. (मला तो एके काळचा दिवाळीच्या वेळेस झालेला गजरा अजून आठवतोय.. विहंग नायकांनी सूत्रसंचालन केलं होतं.)
वार्‍यावरची वरात.. रविवार ची एक सकाळ (पापलेटांत काटे असतांत काय हो? :हाहा:)
अमृत मंथन (वसंत बापट), 'शब्दांच्या पलीकडले' आठवतय का?
रविवारी आम्ही सकाळपासून TV समोर ठाण मांडून बसत असू. साप्ताहिकी ही खूप आवडीने पहात असू.
~~~~~~~~~~~~~~~~
आलो कुठून कोठे तुडवून पायवाट
काटे सरून गेले उरली फुले मनांत