मम आत्मा गमला..२

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मम आत्मा गमला..१
***********

एकामागोमाग गाणी सुरु होत होती, सरत होती आणि इथे मला किती तरी, काय काय आठवत होतं.. एका आठवणीतून दुसरी निघावी, दुसरीतून तिसरी.. रेशमाची लड अलगद उलगडत जावी तसं. मनापासून तल्लीन होऊन, आरामखुर्चीवर रेलून गाणी ऐकण्यात मग्न होउन गेलेले अण्णा आठवले.. "अगं, भांडी घासून विसळताना आणि ठेवताना आवाज करु नको गं! हे बालगंधर्वांची गाणी ऐकतायत ना, हळू आवाज कर.. " म्हणत आमच्या घरच्या कौसल्यामावशींना हलकेच दटावणारी वैनी आठवली.

कधी, कधी आम्हांलाही गाण्यातल्या जागा, बालगंधर्वांच्या आवाजातली फिरत वगैरे समजावून द्यायचा ते प्रयत्न करत असत. तेह्वा सगळं पालथ्या घड्यावर पाणीच असे! वैनी कधी कधी वैतागायची आमच्यावर! "बरी पदांबी ऐकच्याक नाकात ह्यां चोरडांक!" ("चांगली गाणीही ऐकायला नकोत ह्या मुलांना!") असं म्हणत जरा दटावतच आम्हाला बसायचा आणि ल़क्ष देऊन पदां ऐकायचा आग्रह करायची. "ऐक गं, ऐक गं, किती सुंदर गातात ते!" म्हणत स्वतःच तल्लीन व्हायची. ती गाणी ऐकण्यात रंगून गेलेली माझी गोरीगोमटी आज्जी मला अजूनही डोळ्यांसमोर जशीच्या तशी दिसते.

अण्णांना तशी खात्री होती की कधी ना कधी अश्या गायकीबद्दल आणि शास्त्रीय संगीतबद्दल आम्हांला प्रेम उत्पन्न होईलच होईल! ते तसं म्हणतही. स्वतःच्या नातवंडांबद्दल त्यांना भलतीच खात्री होती! वैनीला मात्र अशी काहीच खात्री नव्हती! आणि अशी आवड उत्पन्न झाली नाही तर.. हीच तिची भीती आणि काळजी होती - म्हणजे असावी. पण, पुढे मग जेव्हा शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीतात उत्पन्न झालेली गोडी बघून तिलाही धन्य झालं! आपली नातवंड तानसेन आणि तानसेनी नसल्या तरी कानसेन आणि सेनी तरी असाव्यात एवढीच तिची माफक अपेक्षा होती. आता अगदीच तयारीचे कानसेन नसलो तरी संगीताविषयी आवड निश्चितच उत्पन्न झाली, आणि त्याचं सारं श्रेय माझ्या आजी आजोबांना!

या दोघांनी आमच्या लहानपणात खूप खूप रंग भरले. नातवंडांबरोबरचं आजी आजोबांच नातं खूप खूप समरसून त्यांनी निभावलं. तेह्वा लहानपणी असलं काही जाणवत नाही, कळतही नाही, पण आता त्यामागची अपूर्वाई जाणवते. महत्त्व समजतं. आम्ही भावंड किती भाग्यवान होतो हे पुन्हा पुन्हा लक्षात येतं.

कारवार, बेळगाव, धारवाडसारख्या त्यावेळच्या गावांतून राहिलेली ही माणसं. सरळ, साधं जगणारी. मनात कोणाविषयी वैर नाही, कधी कोणाविषयी वाईट साईट बोललेलं ऐकलं नाही. आमची वैनी तर तिथल्या समाज जीवनावर, माणसांच्या दिलदार, मनमोकळ्या वृत्ती अन् स्वभावावर शेवटपर्यंत फिदा होती! जीवाला जीव देणारे किती तरी लोक राहतील तिथे ह्या दोघांनी जोडले. व्यवहारापेक्षा ह्या गावांतून माणसामधल्या परस्परांच्या नात्याला, विश्वासाला अधिक किंम्मत होती हे दोघांचे लाडके आणि ठाम मत. तसेच वागणे, जगणे त्यांच्याही हाडांमासी रुळले होते. त्यामानाने आयुष्याच्या उतरणीवर पुण्यात राहणे तिला जरा कमीच मानवले होते, पण त्याच्याशीही जुळवून घेत ती शेजारपाजारचीही वैनी बनून गेली खरी. कधी काही मनाविरुद्ध घडलं आणि मानसिक त्रास झालाच तर शांतादुर्गेला चिंता.. असं म्हणत विषय संपवणारी वैनी अजूनही लक्षात आहे.

अगदी मंडईमध्ये सुद्धा अण्णा, वैनी मला घेऊन जात. अभ्यास, खेळ वगैरे तर झालंच, पण धान्य कसं पहायच, चांगली फळं , भाज्या कश्या ओळखायच्या ह्या सारख्या बारीक बारीक गोष्टीही त्यांनीच मला शिकवल्या. जे जे म्हणून त्यांना माहित होतं, भावत होतं, नातवंडांसाठी आवश्यक वाटत होतं ते शिकवण्यामधे, देण्यामधे ते कधीच कमी पडले नाहीत... जुन्या पिढीतल्या ह्या माणसांचं अंतरंगच न्यारं होत!

किती आठवणी लिहाव्यात? किती सांगाव्यात? लहानपणच्या आठवणी पुन्हा पुन्हा काढून त्यात आनंदानं, सुखानं रमून जाता यावं, असं लोभस लहानपण आमच्या पदरात अण्णा वैनीमुळे आलं, आणि त्याने आम्हां आते मामे चुलत भावंडांना कायमसाठी आजही एकत्र बांधून ठेवलय!

प्रकार: 

फार नशिबवान आहेस आयटे. अशी गोड नातीगोती मिळणं लै भाग्याचं.
मी मराठीमध्ये लिहिलेली बडबडगीतं घेवून, ती अनुवाद करून सर्वांना मोठ्या कौतुकाने ऐकवायचे आजोबा. माझी कितीतरी पत्रं जपून ठेवली होती त्यांनी..
मीपण बालपणी फेरफटका मारून आल्ये Happy

छानच लिहलय.

आयटे, फार छान लिहीलयस.
खुप श्रीमंत आहेस... आठवणींच्या बाबतीत.. Happy
---------------------------------------------------------
सगळे कागद सारखेच.. त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.

धान्य कसं पहायच >>> त्यातल्या त्यात गहू किंवा तांदळाची जात आणि पोत वैगरे हे अवघड आहे. माझे काकाही मला शिकवायच प्रयत्न करायचे. Happy

मस्त. आईची आठवण तिव्रतेनं जागृत केलीस....... थॅंक्स

चिन्नु, Happy
एमभोसले, किरु, केदार, पल्ली सगळ्यांचे धन्यवाद.

कारवारकरांगेर गाण्याचे संस्कार सगळ्या पिढ्यांचेर जात रावतात अशे माका दिसता तुवे बरैल्या वयल्यान! मगेल्या घरातय अशेच गाणे आयकतच आमी होड जाल्यात.
बरैत राव गो... Happy

खरे गो ललिताताई Happy
आमगेल्यां लोकांक गाण्याचो मोगच भारी नी Happy

मस्तच दोन्ही भाग. असं बालपण आणि आठवणी मिळणं ह्यापेक्षा मोठं भाग्य ते काय?

Hello ITgirl,
खुप छान आठवणी आहेत. प्रत्येकालाच हा सस्नेह वाटा वा अनुभव मिळत नाही तुम्हाला भरभरुन मिळाला आणी तुम्ही तो इथे वाटला (Share केला).. शब्दातुन का होईना आजी आजोबांचा अनुभव मला अनुभवता आला Happy

मस्त लिहिलंय. खुप आवडलं आणी भावलं ही.

खरं आहे सायो Happy
sas, Happy
नात्या, लिखाण आवडल्याचं सांगितल्याबद्दल खूप आभार.