घरात शिरलेल्या उंदराला बाहेर कसे काढावे?

Submitted by मेधावि on 1 August, 2013 - 21:22

कालच घराच्या स्वैपाकघराच्या खिडकीतून धबाक्-कन एक ढोल्या उंदराने एन्ट्री मारलीये. त्याला येताना पाहून आम्ही घरातल्या बाकी खोल्यांची दारे बंद करून घेतली जेणेकरून तो इतर खोल्या़ंमधे जाउ नये. आता तो स्वैपाकघरातच असावा असा अंदाज आहे. पण दिसत नाहीये. रॅट कील काल रात्री उघडे करून ठेवले होते परंतु ते आहे तसेच आहे. उंदीर-मामाचाही पत्ता लागत नाहिये. शक्यतो उंदराला न मारता हुसकावून लावण्याचा काही उपाय आहे का? उंदीर प़कडायचा पिंजरा नाहीये आम्च्याकडे त्यामुळे तो उपाय बाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठून पेक्षा कशाला येतात ते शोधले पाहिजे. पगार मिळतो तरी लोक ऑफिसात जायला कुरकुरतात. हे बिनपगारी उंदिर का येतात ऑफिसात?

पगार मिळतो तरी लोक ऑफिसात जायला कुरकुरतात. हे बिनपगारी उंदिर का येतात ऑफिसात? << कारण ते माणूस नसून उंदीर आहेत.

मी लहान असतानाचा किस्सा आठवतोय एक...आमचा फ्रीज अचानक बंद पडला... रीपेअर वाला माणूस बोलवला... त्याने फ्रीझरची मागची बाजू उघड्ली तर त्यात एक सुपारी दिसली, जशी विड्यावर सुपारी ठेवतात तशीच.. मी आजीला विचारलं.. अशी पद्धत असते का सुपारी वगैरे ठेवायची... ( म्हणजे आमच्या कंपनीचा फ्रीज कधी बंद न पडो महाराजा... म्हणून असं काहीतरी....:P :-P) जाम हसली ती आणि म्हणाली की अगं उंदराने वायर खाल्ली म्ह्णून फ्रीज बंद पडला आणि सुपारी पण त्यानेच ठेवली असेल...:D :-D.

सई Lol

आजपर्यंतचा हा माझा सर्वात आवडीचा धागा आहे. ह्या धाग्याचे मी पहिल्या प्रतिसादापासून शेवटच्या प्रतिसादापर्यंत अनेकदा पारायणं केली आहेत. आणि प्रत्येकवेळी वाचनाचा तितकाच आनंद मिळवला आहे. सर्व प्रतिसादकांचे आभार. हा धागा असाच पळत रहावा हीच मनीषा.

आज सकाळपासून माबोवर यायला मिळाले नाही. आता माबो उघडल्यावर लिस्टमध्ये हा धागा दिसला. आणि बाकीचे सगळे सोडून मी लगेच हा धागा उघडला. माझा सगळ्यात फेवरीट धागा आहे ना हा, म्हणून!!! Happy

गेला आठवडा भर उंदराच्या पाठी मागे होतो. खरंच गेल्या आठवड्यातच रात्रीच अचानक उंदीर दिसला . किचन मधेच . लगेच दुसऱ्या दिवशी पिंजरा विकत आणला त्यात कांदा ठेवला . मारायचे केक आणले . तरी तो पिंजऱ्यात जाईना आणि केक काही खाईना . शेवटी रेटॉल नावाचे औषध पोळीच्या तुकड्याला लावून ठेवले ते मात्र खाल्ले आणि श्वास अडकून का काय तो मेला बा सुटलो. गेला आठवडा तोच उद्योग चालू होता आज मात्र नक्की सुटलो Happy

माझाही एक उंदरानुभव ----

उंदरांचा आणि माझा संबंध पंचवीस वर्षांपूर्वी डोंबिवलीत आला होता. मी नुकताच स्वतंत्र संसार थाटला होता. घर घेताना काय बघून घ्यावे ह्याचीही मला तेव्हा अक्कल नव्हती. बस! नगाला नग मिळालं म्हणून एका बैठ्या कौलारू चाळीत भाड्याने घर घेतलं. त्या चाळीत दहा बाय वीसच्या दहा खोल्या होत्या. चाळीच्या चारही बाजूला मातीची भुसभुशीत जमीन. खोल्यांची अवस्था अत्यंत बेकार होती. पावसात भिंतींना बुरशी यायची. झोपताना भितींना गुढघा लागला तर सरसर प्लास्टर पडायचे.  ट्युबलाईट फिटिंग सहा इंची लांब खिळ्यांनी बोटांनी दाबून भिंतीमध्ये अडकवली होती. पावसाची जोराची झड आली तर कौलांतून तुषार घरात यायचे. पलंगाच्या गादीचा कापूस तुषार पिऊन चपटा झाला होता. शेजारच्या खोलीतला माणूस सेकंड शिफ्ट करून रात्री घरी आल्यावर, जेऊन झोपेपर्यंत नवराबायकोचे सर्व संभाषण कानी पडायचे. Wink

त्यामुळे साहजिकच अशा चाळीत उंदरांचा भयंकर सुळसुळाट होता. रात्रभर उंदरांची फौज कौलारू छपराच्या आढ्यावर ह्या खोलीतून त्या खोलीत पकडपकडी खेळायची. भिंतींला लागून असलेल्या मांडणीला पकडून खाली उतरायची. खुडबुड करून डबे उघडायची. खायची कमी पण नुकसान जास्त करायची. रात्री त्यांच्या खुडबुडीने आमची झोपमोड व्हायची. आम्ही त्यांना शुकशुक करायचो. मग ते शहाण्या उंदरासारखे हळूच निघून जायचे. थोड्यावेळाने उंदरांची दुसरी फौज आढ्यावर मोर्चा सांभाळायची. मग पुन्हा रणकंदन सुरू. अंधारात त्यांना जास्त चेव चढायचा म्हणून रात्रभर ट्युबलाईट चालू ठेवायला लागे. हो! एक मात्र होतं. कदाचित ते डोंबिवलीतले उंदीर असल्याने सुसंस्कारित होते. आम्हाला ते कधीच चावले नाहीत, की त्यांनी कधी घरभर लेंड्या टाकल्या नाहीत. आणि ते अंगांनीही सुबक आणि सडपातळ होते. ढोले नव्हते. त्यामुळे आम्हां उभयतांना त्यांची कधी भीती वाटली नाही. कालांतराने आम्ही त्यांना ओळखुही लागलो होतो. फक्त त्यांचं नामकरण करणंच तेव्हढं बाकी होतं.

कर्मधर्मसंयोगाने आमच्या एका नातेवाईकाचा कल्याण येथे फ्लॅट रिकामा होता. त्यांना खात्रीशीर भाडेकरू हवा होता. मग अवघ्या नऊ महिन्यातच आमची रवानगी चाळीतून त्या फ्लॅटमध्ये झाली. आणि आमची चाळीतल्या उंदरांशी ताटातूट झाली. आजही त्या उंदरांबरोबर एकत्र काढलेल्या दिवसांच्या आठवणीने माझा जीव कासावीस होतो आणि डोळे डबडबतात. कुठे असतील आणि काय करत असतील ते आता, कोण जाणे!!!? Sad

शेवटी रेटॉल नावाचे औषध पोळीच्या तुकड्याला लावून ठेवले ते मात्र खाल्ले आणि श्वास अडकून का काय तो मेला बा सुटलो. >> कुठे मेला? म्हणजे मला पिंजर्‍यासारख्या गोष्टी न करता औषध घालुन त्याचा मर्डर करायचा आहे पण ते खाऊन एखाद्या कोपच्यात जाऊन मेला आणि कळलच नाही तर अशी भिती वाटते म्हणुन विचारतेय.. प्लीज उत्तर द्या आय अ‍ॅम इन निड Sad
माझी खोके दोन खोके पुस्तकं धोक्यात आहे हो..

त्यात उंदरांना रक्ताभिसरणाचा त्रास की काय होतो आणि ते मोकळ्या हवेसाठी धडपडत बाहेर येत मरतात.
मागे कुठेतरी असेही वाचलेले की खूप हालहाल होत रक्ताच्या उलट्या होत मरतात. पण कदाचित हे खोटेही असावे. त्यांच्या रक्ताच्या उलट्या पुसणार कोण?

Pages