फोल 'राज' कारण

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

मुंबईतील राजकारण्यांनी मुंबईकरांच्या आणि विशेषत: मराठी मुंबईकरांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा नवीन मार्ग शोधून काढला आहे. लोकांच्या भावनांना हात घालून सत्ता सिंहासन मिळवता येईल अशी या राजकारण्यांची पक्की धारणा दिसते. देशातील परीस्थिती ज्याप्रमाणे बदलते आहे त्याप्रमाणे मतदारही झपाट्याने बदलतो आहे. दहशतीच्या मार्गाने मुंबईचे प्रश्नतर सुटणार नाहीतच परंतु हे राजकारणी सत्ता सिंहासनापासून अधिक दूर फेकले जातील.

भारताने जेव्हापासून जागतीकीकरणाचा मार्ग स्वाकारला आहे तेव्हापासून भारत प्रगतीच्या मार्गावर आहे. जागतीकीकरणामुळे महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात बेरोजगारीचं प्रमाण गेल्या १०/१२ वर्षात कमी झालं आहे. ९८ च्या सुमारास जेव्हा मी पदवीधर झालो तेव्हा वाणिज्य पदवीधरांना नोकऱ्या मिळत नसत. आज वाणिज्य पदवीधरांना मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. रस्त्यारस्त्यावर उघडलेल्या मॅालमध्ये अनेक मराठी तरुण/तरुणी काम करताना आढळतात. मग गेल्या वर्षभरात असे काय घडले कि अचानक मराठी तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न वर उफाळून आला? मुंबईमध्ये किती बेरोजगार मराठी तरुण आहेत? मुंबईतील बिहारी व उत्तरप्रदेशीय कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या करतात? ते ज्या प्रकारची कामे करतात ती कामे करायला मराठी तरुण पुरेश्या संख्येने उपलब्ध आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधायच्या भानगडीत न पडता राजकारणी लोकं उठसुठ स्वत:च्या फायद्यासाठी लोकांना भडकवतात. हे प्रकरण इतकं पराकोटीला जातं की भर दिवसा एका उत्तर प्रदेशीय तरुणाला लोकलमध्ये ठार मारलं जातं! कुठल्या स्तराला गेलय आपलं राजकारण? अशा रीतीने मानवतेचा बळी देऊन मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न सुटणार आहे का? त्यापेक्षा हे परप्रांतीय मुंबईत का येतात? याची मूळ कारणे कोणती आणि त्यावर समाजशास्त्रीय आणि अर्थशास्त्रीय तोडगे कोणते? याचा विचार झाला पाहिजे. उठसुठ लोकांना मारहाण करुन आणि स्वत:च्या लोकांच्या करातून उभारलेल्या मालमत्तेचं नुकसान करुन हा प्रश्न सुटणार नाही. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये जिथपर्यंत रोजगाराच्या संधी मिळत नाहीत तोपर्यंत हे स्थलांतर थांबणार नाही.

महाराष्ट्राला उदारमतवादी समाजसुधारकांची थोर परंपरा आहे. गोखले, आगरकर, फुले, कर्वे पिता पुत्र, रानडे, लोकहितवादी अशी कितीतरी नावं घेता येतील. संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र पश्चिम बंगालच्या जोडीने समाजसुधारणेमध्ये पुढे होता. अशा या सुधारकांमुळे महाराष्ट्राला आज संपूर्ण देशामध्ये पुरोगामी म्हणून अोळखले जाते. आज आपण महाराष्ट्राची ही परंपरा विसरलो आहोत. ज्यांनी शिवाजी महाराजांचा वसा घेतलाय असे हे लोक शिवाजी महाराजांनी असे प्रश्न कसे हाताळले असते याचा यत्किंचीतही विचार करताना दिसत नाहीत. यांच्या विरुध्द जरा कोणी काही बोललं कि त्यांच्या तोंडाला काळं फासलं जातं नाहीतर सार्वजानिक मालमत्तेची नासधूस केली जाते. ही लक्षणं एका प्रगतीशील पुरोगामी राज्याची नसून अधोगतीची आहेत. मराठी लोकांनी कुठल्या रस्त्यानी जायचं याचा गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे.

मुंबईतील परप्रांतीयाच्या प्रश्नाप्रमाणेच अमेरीकेत मेक्सिकन लोकांच्या प्रश्नावर चर्चा सुरु आहे. उपविजीकेनिमित्त हजारो मेक्सिकन लोकं दरवर्ष डोंगर दऱ्या तुडवून अवैध मार्गाने अमेरीका-मेक्सिको सीमा पार करतात आणि अमेरीकेत येऊन वसतात. परंतु आपल्याप्रमाणे तिथे मेक्सिकन लोकांना पकडून मारलं जात नाही! अमेरीकन अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी ज्याप्रमाणे भारतीय अभियंत्यांची गरज आहे, त्याप्रमाणे मेक्सिकन मजूरांचीही आहे याचं अमेरीकेला पक्कं भान आहे. म्हणूनच वेगवेगळे नविन कायदे करुन, जास्त काळ राहिलेल्या मेक्सिकन लोकांना नागरीकत्व देऊन आणि मेक्सिकोला आर्थिक मदत देऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. अमेरीकेतही अनेक विचारप्रवाह आहेत आणि त्यात मेक्सिकन लोकांना परत मायदेशी परत पाठवावे असा प्रचार करणारे लोकंही आहेत. परंतु हे लोक सर्व मर्यादा सोडून मारहाण व जाळपोळ करताना दिसत नाहीत. प्रगल्भ समाजाची ही लक्षणं आहेत.

ज्याप्रमाणे मुंबईत मराठी माणसाचे प्रमाण कमी होत अाहे, त्याप्रमाणे अमेरीकेतही गोऱ्या लोकांचं प्रमाण कमी होत अाहे. दरवर्षी जगभरातून हजारो भारतीय, चीनी, मेक्सिकन, आफ्रिकन लोकं अमेरीकेत जातात आणि कायमचं तिथले होतात. अमेरीकेतील सर्वात प्रगत अशा कॅलिफोर्निया राज्यात गोऱ्या लोकांचं प्रमाण ५० टक्क्यांपेक्षाही कमी झालं अाहे. अमेरीकेत २०४२ सालापर्यंत गोऱ्यांचं प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा खाली जाईल असे अंदाज समाजशास्त्रज्ञ मांडत आहेत. अशा या बदलत्या काळात जाळपोळ आणि भांडणं तर सोडाच पण अमेरीका एका कृष्णवर्णीय माणसाला निर्विवाद बहुमत देऊन आपला राष्ट्रध्यक्ष बनवते! प्रगतीपथावर असलेल्या अाणि प्रगल्भ समाजाची ही लक्षणं आहेत.

भारतातील आणि जगातीतील परीस्थिती झपाट्याने बदलते आहे. ज्या समाजाची आर्थिक परीस्थिती चांगली त्याच्या भाषेचं, त्यांच्या संस्कृतीचं प्राबल्य वाढणार आहे. मराठी माणसाने कष्ट करुन स्वत:ची आर्थिक प्रगती केली तर त्याच्या भाषेला आणि त्याच्या संस्कृतीला जगात नक्कीच पत प्राप्त होईल. मराठी चित्रपटांनी केलेल्या अलिकडच्या प्रगतीने आणि मराठी वाहिन्यांच्या वाढलेल्या संख्येने हे सिद्ध केलंय. मराठी माणसाने इतरांची मारहाण करण्यापेक्षा मराठी बाजारपेठ तयार करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र देवताच्या उपासनेला आम्हाला परप्रांतियांच्या रक्ताची आहुती देण्याची गरज नाही. महाराष्ट्रची अस्मिता एवढी कोती नाही आणि काही लाख परप्रांतियामुळे धोक्यात येण्याएवढी लेचीपेची तर मुळीच नाही. महाराष्ट्राने बदलत्या परीस्थितीचा स्वीकार करुन संपूर्ण भारतापुढे आदर्श बनले पाहिजे. त्यातच मराठी भाषेच्या आणि मराठी माणसाच्या प्रगतीचं गुपित दडलं आहे.

विषय: 
प्रकार: 

साजिर्‍याला बहुतेक असं म्हणायचं आहे की मूळ प्रश्न हा मराठी माणसाला नोकरी न मिळण्याचा आहे, नोकरी कशी मिळवावी हा नाहीये... पण स्वाती म्हणाली ते बरोबर आहे.... मुद्दे पटत नसतील तर ते खोडून काढावेत... हेटाळणीवजा लिहू नये...

<<त्या 'डॉलर्स' बद्दल अजूनही तुम्हाला अभिमान आहे? तुमचा मान सांगताहात की अपमान..???>>

साजिर्‍या, अरे अभिमानाचा प्रश्न नाहिये, पण अजूनही १ डॉलर = ४६ रूपये आहेच... तेव्हा एखाद्याला मदत करावी वाटली तर काय चुकलं... पण असं काही करायला गेलं की भारतात 'डॉलर तेवढे द्या, सल्ले नका देऊ' असं उत्तर येतं असं झक्कींना म्हणायचं आहे.... असो.. हा विषय वेगळा आहे...

केदार, मस्त पोस्ट आहे... इथे या लेखाला प्रतिक्रिया लिहिणार्‍या प्रत्येकाला जे वाटतं ते अगदी योग्य शब्दात लिहिलंयस... Happy

लालू, केदारजोशी, स्वाति, adm या सर्वांना धन्यवाद.
असो. मला वाटले मराठी लोकांना नोकर्‍या मिळणे कठिण जाते म्हणून मी सुचवले. इतर प्रांतातील लोक काय करतात माहित नाही. पण बहुधा त्यांना या नोकर्‍या सहज मिळत असाव्यात.

केदार, चान्गली पोस्ट! Happy

काही अजुन मुद्दे मनात आहेत
फाळणी नन्तर सिन्धी लोक पुण्यामुम्बई व महाराष्ट्रात अनेक शहरात स्थाईक झाले, त्यान्च्या बद्दल कधी असला ओरडा ऐकायला मिळाला नाही, वा ते ही स्वतःची सन्स्कृती जपुनही इतरान्ना काट्यासारखे खुपले नाहीत!
पन्जाबी/सरदारजी, गुजराथी, मारवाडी लोक तर महाराष्ट्रात व्यापारउदिमाच्या निमित्ताने कित्यक दशके (की खरे तर शतके?) स्थाईक हेत, त्यान्च्या परम्परा उत्सव सणसूद साजरे करत, पण तेही कधी बोचले नाहीत
मात्र पन्चवीस तीस वर्षान्पुर्वी, असेच बाहेरून (सरकारी व खाजगी नोकरभरतीच्या व्यवस्थेतून) लादलेले साऊथ इन्डीयनाबद्दल त्यावेळेस शिवसेनेला रान उठवावे लागले होते! तसेच काहीसे आत्ता युपीबिहारीन्बद्दल होत आहे, यान्च्याबद्दलच असे का होते याचा विचारही न करता, केवळ राज ला बळीचा बकरा करणे कितपत योग्य हे? राजचा मूळ मुद्दा, रेल्वेच्या भरतीच्या जाहिराती महाराष्ट्रात प्रसारीतच होत नाहीत, जागान्ची सन्ख्या कमी, या मुद्द्याना कोणतेही प्रशासकीय वा मिडियाकडून उत्तर का नाही दिले जात?
अन उपदेशाचे डोस, केवळ मराठी माणसालाच का पाजले जातात? त्या युपीबिहारीन्ना अन त्यान्च्या नेत्यान्ना का पाजले जात नाहीत?
...;
आपला, लिम्बुटिम्बु

केदार, नेहमीप्रमाणेच मुद्देसूद पोस्ट.
लालू, स्वाती अनुमोदन.

झक्की हे सर्वच दृष्टीने माझ्यापेक्षा वरच्या योग्यतेचे आहेत, त्यांची किंवा त्यांच्या पोस्टच्या 'हेटाळणी'चा प्रश्नच उद्भवत नाही.. Happy

खरे तर संपूर्ण प्रतिक्रियेला पुराणिकांच्या लेखनाची पार्श्वभूमी होती, पण त्यामुळे माझी पोस्ट भडक झाली असेल, तर झक्की आणि इतर लोकांनी माफ करावे.

केदार, धन्यवाद.. Happy

माझ्या लेखात प्रामुख्याने मी २ मुद्दे मांडले आहेत.
१) जागतिकीकरण - त्यातून निर्माण झालेले स्थलांतर - त्यातून उत्पन्न झालेला भूमिपूत्र वि. परप्रांतिय वाद - मुंबईतील त्याच्या गांभिर्यची सत्यापसत्यता
२) परप्रांतियांचा विरोध करण्यासाठी वापरलेल्या हिंसक मार्गचा विरोध
अनेक लोकांना असे वाटते की माझा पहिल्या मुद्दयाबाबतचा माझा अभ्यास कमी आहे. आणि असेलही. परंतु बहुतेक लोकं मला दुसऱ्या मुद्दयाबाबतीत तरी साथ देतील अशी आशा आहे.

लोकांचे स्थलांतर नुसते उत्तर प्रदेश - मुंबई, मेक्सिको - अमेरीका पुरते मर्यादित नसून जगात अनेक ठिकाणी चालू अाहे. खुद्द भारतातही बांगलादेश - आसाम, बांगलादेश - मुंबई अशी अनेक उदाहरणे अाढळून येतील. जगातील इतर लोकं याचा सामना कसा करतात हे आपण पाहिलं पाहिजे, जगापासून शिकलं पाहिजे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकं गुंडगिरी करतात की नाही हे मला ठाऊक नाही कारण गेली ८ वर्षे मी अमेरीकेत राहत आहे आणि माझ्या मुंबईतील अाईवडीलांना प्रत्यक्ष अनुभव असा नाही. पण जर ते गुंडगिरी करत असतीलच तर त्यांना हिंसा सोडून इतर कुठल्या मार्गाने उत्तर देता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. कायद्याच्या कक्षेत राहून त्याचा विरोध करणे अशक्य आहे असे मला वाटत नाही.

हिंसेने कुठलेच प्रश्न पूर्णपणे, कायमचे सुटत नाहीत. मागे जेम्स लेन नावाच्या इतिहास संशोधकाने शिवाजीविषयी काही लिहीलं म्हणून आपण आपल्याच भांडारकर प्राच्यविद्दया संस्थेची वाट लावली. त्यातून काय साध्य झालं? आपलंच नुकसान झालं. "राज" कारणातून झालेल्या हिंसेमुळे महाराष्ट्राची भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात (खरी वा खोटी) बदनामी झाली हे तर खरं आहे ना? लॅास एंजलिसमध्ये मला कितीतरी भारतीयांनी या प्रकरणाबद्दल जाब विचारला.

जर मुंबईत परीस्थिती गंभीर असेलच तर हिंसेऐवजी पुढील पैकी काही मार्ग चोखाळता येतील:
१) मंत्रालयावर मोठ्या संख्येने मोर्चा नेऊन सरकारला निवेदन देणे.
२) आपल्या आमदार/खासदारांना मोठ्या संख्येने पत्रं पाठवणे, फोन करणे.
३) ज्या दुकानांवर मराठीत पाट्या नाहीत त्या समोर त्यांच्या मालमत्तेचं नुकसान न करता निदर्शने करणे अथवा बहिष्कार टाकणे
४) रेल्वे भरतीत स्थानिक लोकांना प्राधान्य दिले गेले नाही तर रेल रोको आंदोलन करणे.
५) अगदी गरज वाटलीच तर परप्रांतियाशी शांततामय असहकार पुकारणे (उदा.- आमची गिरगावातली जागा आम्ही कमी पैसे घेऊन, पण मराठी माणसालाच विकली).
अशा प्रकारे तळागाळातल्या लोकांनी मिळून चळवळ उभी केली तर राज्यकर्तेही नमतील आणि प्रसारमाध्यमांनाही लोकांची सकारात्मक दखल घ्यावा लागेल. मूळ प्रश्नाकडे देशाचं लक्षं वेधलं जाईल.

आणि शेवटी एक उत्सुकता म्हणून - आपल्यापैकी ज्यांना कोणाला एखाद्या उत्तर प्रदेशिय किंवा बिहारी माणसाच्या गुंडगिरीचा प्रत्यक्ष अनुभव आला असेल तर त्याने/तिने ता इथे लिहावा अगर मला पाठवावा. मी ते संकलित करीन - त्याचा वापर मी जे लोकं आम्हाला लॅास एंजलिस मध्ये जाब विचारतात त्यांची तोंडं बंद करण्यासाठी वापर करीन.

केदार फारच मुद्देसूद पोस्ट....
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....

१. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकं गुंडगिरी करतात की नाही हे मला ठाऊक नाही कारण गेली ८ वर्षे मी अमेरीकेत राहत आहे आणि माझ्या मुंबईतील अाईवडीलांना प्रत्यक्ष अनुभव असा नाही. .........

आणि मुम्बईत पावलापावलावर मॉल आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील बेरोजगारी हटलेली आहे, हे कसे समजले... ?

२. जर मुंबईत परीस्थिती गंभीर असेलच तर हिंसेऐवजी पुढील पैकी काही मार्ग चोखाळता येतील:.........

हे सगळे मार्ग सगळे चोखाळत असतातच की, त्यात विशेष काय... आणि तुम्ही असे आणि दहा मार्ग चोखाळायला सांगाल .. उंटावरून शेळ्या हाकायला... तेही प्रत्यक्ष नव्हे तर कसे हाकायचे एवढे मायबोलीवर लिहायला तुमचे काय जातंय म्हणा....

३. "राज" कारणातून झालेल्या हिंसेमुळे महाराष्ट्राची भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात (खरी वा खोटी) बदनामी झाली हे तर खरं आहे ना? लॅास एंजलिसमध्ये मला कितीतरी भारतीयांनी या प्रकरणाबद्दल जाब विचारला.

बदनामी झालेली नाही, जाणीव पूर्वक केली गेलेली आहे... महाराश्ट्रात हिंसाचार असतो असा.... जणु बिहार, यू पी म्हणजे नंदनवनच आहे....

.....आणि मुळात या सगळ्याशी तुमचा संबंध फक्त जाब विचारण्यार्‍याना उत्तर देऊन स्वतःची कातडी वाचवण्यापुरताच आहे, हेही सिद्ध झाले....

व्हीपुराणिक, आपल्या मतान्चा आदर ठेवुन......
जागतिकीकरणाचे परीणाम गेल्या दशकभरातले, पण त्या आधीही या देशाने, फाळणी निमित्ताने, त्याही आधी प्लेगसदृश साथिंमुळे, पुर्/भुकम्प इत्यादी नैसर्गिक सन्कटादरम्यान, युद्धे/दन्गली मुळे मोठ्याप्रमाणावर स्थलान्तर अनुभवले आहेच शिवाय पोटापाण्याकरता प्रगतशील महाराष्ट्राकडे धाव घेणारे देखिल सामावुन घेतले अन पचवले देखिल आहेत, अन हे सान्गण्यात फुशारकी नाही की बहुतान्श महत्वाची स्थलान्तरे महाराष्ट्रातच झालेली आहेत!
माझ्या आधीच्या पोस्ट मधील मुद्दा पुन्हा मान्डावा लागतोय की त्या त्या वेळेस तो तो जनसमुह महाराष्ट्राने जर पचवला, तर पन्चवीस वर्षान्पूर्वी साऊथ इन्डियन आणि आता युपीबिहारीन्बद्दलच नेमके असे काय घडते आहे की जेणेकरुन ते "पचले" (अर्थात सामावले) जात नाहीत?
शिवाय, आपण म्हणता त्याप्रमाणे हा केवळ "स्थानिक भुमिपुत्र व बाहेरचे" यातिल पोटापाण्याच्याच अस्तित्वाच्या लढाईचा केवळ वाद नसुन "जे मराठी ते महाराष्ट्रिय व बाहेरचे" यान्च्यातील सर्व स्तरावरील अस्मितेच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे!

दुसरे गृहितक आपण मान्डता की "परप्रान्तियान्चा विरोध हिन्सक मार्गाने का?" व याबद्दलचे "मिडिया" मार्फतचे ऐकिव्/वाचिक दाखले देता! तुम्हाला "हिन्सक मार्ग" म्हणजे खरोखर माहित आहे का? त्याची तुमची व्याख्या काय? त्या व्याख्येत महाराष्ट्रातील सद्यस्थिती बसते का? की मिडीया बोम्बलते म्हणून त्यान्च्या शन्खात आपणही आपला सूर मिसळायचा?
तुम्ही दिलेल्या लोकल ट्रेनमधिल उदाहरणात तर स्पष्ट पणे रेल्वे पोलिसान्नी निवेदन केलेले आहे की ती "हत्या" (खरे तर सदोष मनुष्य वध) बसण्याच्या जागेवरील भाण्डणातून झालेली आहे! त्यात भाषिक वादाचा सम्बन्ध नाही, अन हे निवेदन लालुप्रसादाच्या रेल्वेपोलिसान्नि दिलेले आहे!
मला विचाराल, अन आकडेवारी गोळाकराल तर कळेल की विदर्भात नागपुर मनमाड मार्गावर असा कित्येक घटना पुर्वी घडल्याहेत, अजुनही घडतील कदाचित, पण लगेच त्याचा सम्बन्ध "राज" च्या राजकारणाशी लावणे, गृहितक मान्डून मराठी माणसान्ना साप साप म्हणून धोपटल्याप्रमाणे करणे हे कितपत योग्य हे?
कुर्ल्याला गावठी कट्टा घेवुन गोळीबारी करणार्‍या "राज" बाबत तेवढे आपण बोलला नाहीत अजुन, जरी मिडीया, तो ठरवुन केलेला एन्काऊण्टर्/खून वगैरे प्रचार करत्ये! (आता चक्क चक्क मिडीयाच्या स्क्रीनवरच, भर सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी हातात बन्दुक घेवुन, एकास ओलीस ठेवुन, एकास गोळीबाराने जखमी करुन, धमकाविणारा माथेफिरू युवक ज्यान्नी ज्यान्नी बघितला हे, त्यान्ना आश्चर्य वाटणार नाही की पोलिसान्नी उपलब्ध हत्यारानिशी (बहुदा थ्रीनॉट्थ्री) त्याचा प्रतिकार केला, ज्यात तो ठार झाला! त्यान्ना याचेही आश्चर्य वाटणार नाही की पोलिस त्याला "अहिन्सावादी मार्गाने" हारतुरे घेवुन परावृत्त करायला गेले नाहीत!
पण मिडीयाला काय त्याचे? बसच्या खिडकीत बसलेल्या त्या माथेफिरूच्या डोक्यातच गोळी का बसली, अन थ्रीनॉटथ्रीचीच का बसली, अन अमक्याच अन्तरावरुन का झाडली याची चिकित्सा करून टीआरपी वाढवण्याच्या धन्द्याला जर कित्येक "सुशिक्षीत अडाणी" लोक बळी पडत अस्तिल तर ब्रह्मदेवच येऊदे बोवा महाराष्ट्र पोलिसान्ना वाचवायला!

आणि काय हो? आपण सुचविलेले पाच उपाय करण्यास माणसे कुठून गोळा करायची? इथे काय (तिकडच्यासारखे) "पेड व्हॉलेन्टियर्स" ठेवायची पद्धत नाही, परवडणारही नाही! Proud
अन रेल रोको सारखे उपक्रम करायचे तर त्यास "जीवावर उदार" माणसे किती सन्ख्येने लागतील? ती कुठून कशी आणायची/गोळा करायची याचेही बहुमुल्य मार्गदर्शन केलेत तर बरे होईल.
शिवाय, असा गोळा केलेला मॉब, जर हाताबाहेर गेला, हिन्सक बनला तर तो तसा बनु नये म्हणून वा बनल्यास कुणी कसे कन्ट्रोल करायचे अस्ते याचेही प्रशिक्षण/मार्गदर्शन आपल्याकडून झाले तर बरेच होईल
रेल रोको केला अस्ता, किती प्रवाशान्ना कसा त्रास झाला, किती "राष्ट्रिय सम्पत्तीचे नुकसान" झाले याची आकडेवारी घेवुन लान्डग्याकोल्ह्याप्रमाणे तुटून पडणार्‍या, लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तम्भ(?) मिडीयाला कसे थोपवायचे हे ही आपल्याकडून कळले तर बरे!
गुन्डगिरीचा प्रश्ण आपण विचारलाहेत, पण त्यास उत्तर देण्याआधी, वरील प्रश्णान्बाबतची आपली भुमिका समजली, तर "व्हाईटकॉलर्ड वा छूपी अशा सन्ख्यात्मक गुन्डगिरीची" बक्कळ उदाहरणे आपणास सान्गता येतिल.
रहाता राहिला प्रश्न, तिथे तिकडे तुम्हाला जाब विचारणार्‍यान्चा! मराठीपण विसरलेले नसाल, तर त्यान्ना ठणकावून सान्गा ना, की मला का जाब विचारता? हव तर महाराष्ट्रात जावुन खरी परिस्थिती समजुन घेवुन "राज"लाच जाब विचारा, कसे?
...;
आपला, लिम्बुटिम्बु

सर्व स्तरावरील अस्मितेच्या अस्तित्वाचा
तसले काही महाराष्ट्रातल्या लोकांमधे नाहीये. महाराष्ट्राची अस्मिता? त्यांना स्वतःची भाषा, स्वतःचे आचारविचार हे इतर भाषा, इतरांचे आचार विचार या पेक्षा लाजीरवाणे वाटतात. गणेशोत्सव महाराष्ट्रीय. त्यात दारू पिऊन, अचकट विचकट नाचत हिंदी सिनेमातली गाणी नि नाच करायचे, ही का महाराष्ट्रीय आस्मिता?
महाराष्ट्रात आज सर्वात जास्त पैसा आहे, पैसा मिळवायला जास्तीत जास्त वाव आहे. कदाचित् शिक्षणहि जास्त चांगले मिळत असावे. रहाणीमानहि बरे असावे. सुरक्षितताहि असावी. त्यापेक्षाहि लोक अत्यंत सहनशील. हिंदी शिकतील, तुमच्यासारखे आचार विचार करतील, स्वतः चे सगळे सोडून तुमची नोकरी करायला येतील. पुनः भाषेची अडचण कुठेच नाही. मग का नाही सगळे लोक महाराष्ट्रात येणार?

खरे तर अमेरिकेतहि याच कारणासाठी जगातले सर्व लोक येतात, भारतीय सोडून इतर अनेक देशातले लोक शिकलेले नसतात, विशेषतः मेक्सिको, क्यूबा, प्योर्टो रिको येथून आलेले लोक हलक्या दर्जाची कामे करतात. पण आजकाल लॉस एन्जल्स, मायामी इथे गेलात तर या देशाची भाषा इंग्रजी आहे यावर तुमचा विश्वास बसणार नाही. सर्वत्र सरकारी कामकाजात इंग्रजी बरोबर स्पॅनिशमधेहि कागदपत्रे असतात. पण याचा अर्थ असा नव्हे की इंग्रजी बोलणारे सर्व लोक इंग्रजी सोडून इतर भाषा बोलतात. त्या लोकांना जर काम पाहिजे असेल, तर मोडके तोडके का होईना, इंग्रजीच बोलावे लागते, इथल्या लोकांप्रमाणेच इथले सण, इथल्या चालीरीतींप्रमाणे वागावे लागते.
महाराष्ट्रात तसे नाही. तुम्ही आमची भाषा शिकायची गरज नाही, कारण आम्हालाच मराठी भाषा बोलायला लाज वाटते, आमचे खेळ, आमच्या चालीरिती पाळायची लाज आहे.

अमेरिकेत येऊन मराठी शाळांची संख्या वाढते आहे, पण महाराष्ट्रात म्हणे मराठी माध्यमाच्या शाळा तर बंदच होताहेत, पण मराठी शिकायलाहि फारसे विद्यार्थी जात नाहीत म्हणे.

<<अमेरिकेत येऊन मराठी शाळांची संख्या वाढते आहे, पण महाराष्ट्रात म्हणे मराठी माध्यमाच्या शाळा तर बंदच होताहेत >>

इथे अमेरिकेत मराठी शाळा आहेत? ऐकावं ते नवलच...

<<पण मराठी शिकायलाहि फारसे विद्यार्थी जात नाहीत म्हणे.>>

हो, हे खरे आहे.... माझ्या ओळखीच्या काही लोकांनी हट्टाने आपल्या मुलांना मराठी शाळेत घातले आहे... पण त्यांचं म्हणणं असं आहे की रिझर्वेशन च्या नावाखाली कोणालाही नोकर्‍या देऊ केल्या आहेत, त्यामुळे या शाळांमधील शिक्षकांचा दर्जा अतिशय खालावला आहे.... कोण घेणार मग प्रवेश तिथे...इंग्रजी माध्यमाच्या शाळा या प्रायव्हेट असल्यामुळे तिथे बरे शिक्षक असतात (म्हणे).... अर्थात याला 'इंग्रजी' म्हणजे 'चांगलं' ही भावना सुद्धा कारणीभूत आहे...

असो... झक्की, तुम्ही नेहेमी विषय बदलता बरं का... Proud

अर्रेच्या, चुकलो की काय? पहिल्याच लेखात अमेरिकेच्या परीस्थितीबद्दल लिहीले आहे. म्हणून मी पण लिहीले. नि श्री. माननीय लिंबूटिंबू यांनी महाराष्ट्राची अस्मिता अश्या अस्तित्वात नसलेल्या गोष्टीबद्दल लिहीले म्हणून मी हि लिहीले.

खरे तर माझ्या मते, हे बाहेरून लोक का येतात याचेहि कारण मी लिहीले आहे. ते खरे असावे, त्याशिवाय का लोक महाराष्ट्रात येतात? आता ते आले तरी आपली महाराष्ट्रीय 'अस्मिता' (जी इतरांना असते, महाराष्ट्रीयांना नसते) का नाही हेहि लिहीले. तेच खरे कारण आहे, इतरांचा राग करण्याचे.

आजच वाचले की महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्याने सांगितले की इंग्रजी बोलता येत नाही याचा त्यांना खेद होतो, मराठी शिकलो, पण इंग्रजी नाही. महाराष्ट्रातील वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांपैकी कुणि अथवा मुंबईच्या कुणि प्रसिद्ध व्यक्तीने असे म्हंटले आहे का कधी की अरेरे, मी मराठी शिकायला हवे होते? नाही, कारण गरजच नाही! मराठी लोक समजून घेतील.
इंग्रजी बोलता येत नसेल तर अमेरिकेत नोकर्‍या मिळत नाहीत. (संडास साफ करणे, कचरा वाहून नेणे इ. नोकर्‍या मात्र मिळतात, त्या नोकर्‍यांबद्दल मी बोलत नाहीये.) महाराष्ट्रात मराठी येत नसेल तर त्याला इतर मराठी लोकांपेक्षा थोर मानून, त्याच्याशी आपल्या मोडक्या तोडक्या का होईना, इंग्रजी, हिंदी बोलण्यात धन्य मानतात. मग का बरे तुम्हाला राग यावा बाहेरचे लोक घुसले तर? घुसणारच ते.

रिझर्वेशन च्या नावाखाली कोणालाही नोकर्‍या देऊ केल्या आहेत, त्यामुळे या शाळांमधील शिक्षकांचा दर्जा अतिशय खालावला आहे.... >>>> आमच्या प्रेसमधे नगर जिल्ह्यातील बर्‍याच मराठी शाळांच्या सर्व इयत्तांच्या प्रश्नपत्रिका छापायला येतात. मागच्या वर्षी भारतात होते तेव्हा proof checking साठी मी आणि बाबा बसलो होतो तेव्हा २-३रीच्या प्रश्नपत्रिकेत एक प्रश्न- जोड्या लावा जसे डुक्कर-डुकरीण तसे.... दूसरे प्राणी नाहीत उदाहरण द्यायला ?

अजून एक उदाहरण म्हणजे संस्कृतची प्रश्नपत्रिका म्हणून सँपल उत्तरपत्रिकाच पाठवली होती छापायला. शिक्षकाला संस्कृत कळाले तर पाहिजे ना.

ह्यात रिझर्वेशनचा हात किती ते मी सांगु शकत नाही परंतु (नगर जिल्ह्यातल्या तरी) अनेक चांगल्या मराठी शाळांचा दर्जा खालावला आहे ही गोष्ट खरी Sad

अरेरे! ते इंग्रजी येत नसलेले महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री काय म्हणतात या बाबतीत?
ते म्हणतील, जाऊ दे मराठी, सगळ्यांनी इंग्रजीच शिका!

मराठीची गत संस्कृतसारखी होणार. काळाचा महिमा. किंवा एक नवीन भाषा तयार होईल त्यात काही मराठी शब्द असतील. जसे मल्याळम मधे बरेच संस्कृत शब्द आहेत. इंडोनेशियाच्या भाषेतहि अनेक संस्कृत शब्द आहेत (थोडे बदलून, पण ओळखू येतात).

पण हे विषयांतर झाले.

प्रश्न काय आहे? बाहेरील लोकांमुळे जास्त घाण, गुन्हे होतात असा आहे का? पण त्याला काय करणार? किती पोलीस ठेवणार? पोलीसांचा पगार कोण देणार?
मुंबईतल्या सगळ्या लोकांनी खूप दानधर्म करून खाजगी प्रमाणावर या गोष्टी बंद करण्याची तजवीज केली तरच जमेल. किंवा गुन्ह्यांना, घाण करणार्‍यांना कडक शिक्षा! शेवटी मारामारी करून काही होणार नाही. सरकारकडून तरी किती अपेक्षा ठेवणार? ते कर वाढवतील ते द्यायला आवडेल का?

केदार ला पुर्ण अनुमोदन.
पण आपण मराठी माणुस प्रत्येक ठिकाणी का डावलला जातोय याचा विचार पण केला पाहिजे.
स्वतःमधले असलेले अवगुण ही पाहिले पाहिजेत.
आज महाराष्ट्रात सर्वात जास्त आय्.ए.एस. व आय्.पी.एस. अधिकारी परभाषिक आहेत. ८० % मंत्रालय परभाषिक लोकांनी भरले आहे.
माझ्या माहिती प्रमाणे बिहार व यु.पी. मध्ये प्रशासकीय (यु.पी.एस्.सी. व तत्सम..) परिक्षांची तयारी शालेय जिवनातच करुन घेतली जाते.
आपल्याकडे मा. शिक्षणमंत्री काय करतात हे त्यांनाच समझत नाही. एम्.पी.एस्.सी. परिक्षांचा निकाल ३-३ वर्षे लागत नाही. मग मराठी मुले प्रशास़कीय अधिकारी होणार कसे?
एक भय्या नोकरीला लागला कि लगेच ईतर भय्याला तिथेच चिकटवतो, आणि तो पण ईमाने ईतबारे काम करत राहातो, कारण त्याला 'एस्टाब्लिश, सेटल' व्हायचे असते. आक्रमकपणा, कडवे पणा ई .त्यांच्यात ठासुन भरलेला असतो.
माफ करा, पण एक अनुभव सांगतो.
मला नोकरी निमित्ताने अनेक कंपन्यांना भेट द्यावी लागते, पुण्यात, व भोसरी मध्ये खुप कंपनींमध्ये परभाषिक आहेत. मी सहज काही कंपनींमधील साहेब लोकांना विचारले, "असे का? मराठि माणुस का ईथे नाही?" सर्वांचे ऊत्तर एकच, "मराठी माणसाचे कामचुकारपणा आणि कर्तव्यापेक्षा हक्कांवर जास्त लक्ष."
कदाचित हे माझे वयक्तीक मत असु शकते.
पण मी स्वतः माझ्या ऑफिसमध्ये माझ्या भागातील (प. महाराष्ट्र) मुलांना जास्त संधी देतो, पण मलाही हाच अनुभव येतोय.
मी मराठी वर्तमान पत्रात नोकरीची जाहिरात दिली कि प्रतिसाद एकदम हाताच्या बोटावर मोजण्याईतका!!
आणि ईंग्रजी वर्तमान पत्रात नोकरीची जाहिरात दिली कि प्रतिसाद एकदम जोरात, पण ९०% मुले परभाषिक. याचा अर्थ काय?
आपले व्यवसाय आपण स्वतःच ईतरांच्या हातात देतो. मी रहातो त्य ईमारती मध्ये एक किराणा दुकान आहे. मालक मुळचा मराठी, चालवायला भाड्याने दिले आहे राजस्थानी माणसाला. तो (राजस्थानी) सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत दुकान चालु ठेवतो. आता त्याच भागात त्याने अजुन एक दुकान घेतले आहे. ते त्याचा मेव्हाणा सांभाळतो. खास त्याला राजस्थान मधुन बोलावुन घेतले आहे.
किती जण मराठी चित्रपट, मराठी वाहिन्या, नाटके आवर्जुन पहातात?
आवर्जुन ईतरांशी मराठी बोलतात?
केंद्र सरकार मध्ये मराठी आवाज ऊठवणारा प्रतिनिधी निवडला पाहिजे.
आज आपल्यातील किती जण मतदान करतात? विचार करुन आपले प्रतिनिधी निवडतात?
घरात, मित्रांच्यात "सिस्टीम" बद्दल बोंबा मारायच्या, आणि स्वतः मात्र साधा सिग्नलचा नियम सुद्धा पाळायचा नाही.
मला तर कधी कधी वाटते, मरे पर्यंत प्रत्येकाला प्रत्येक वर्षी नगरीक शास्त्र शिकवले पाहिजे.
खुप काही आहे, खुप बदलले पाहिजे.
राज ने सुरुवात तर केली आहे, कदाचित मार्ग चुकीचा असु शकतो.
पण प्रत्येक मराठी माणुस बदलला पाहिजे.

जे करतात, ते त्यांना जसे जमेल, जे पटेल, जसे योग्य वाटेल तसे करतात. ज्यांना बदल हवे आहेत आणि ते ही त्यांना योग्य वाटणार्‍या मार्गाने त्यांनी प्रत्यक्ष क्रुती करणेहा एकच मार्ग आहे असे मला तरी वाटते.

केदार .. उत्तम पोस्ट.

आशिश .. काही दिवसांपुर्वी आकडेवारीची एक इमेल येत असे. मला सापडली तर तुला पाठवते. google वर मिळेल ही तुला कदाचीत.

केदारशेठ,
नेहेमी प्रमाणेच लय भारी... एकदम थेट मुद्द्याला धरून. तू म्हणतोस ते खरे आहे, मुर्दाड मनांना जागे करायचे काम राज ने केले आहे, पण आता "पुढे काय" याचा विधायाक विचार त्याने करायला हवा.
Aschig,
"आकडा" लावून उत्तर लिहीणार आहात का..? माफ करा पण हे म्हणजे, "चंद्रावर लोचा झालाय, चालता येत नाहीये" अशी परिस्थीती असताना, "पण आधी चंद्रावर खड्डे तरी किती आहेत याचा आकडा द्या" असे म्हणण्या सारखे आहे.. just absurd!
puranik,
दूरदेशी राहून स्वदेशाची चिंता करण्याच्या अनुशंगाने आपण समदुख्खी आहोत, मान्य आहे.. पण तरिही तुमच्या एकंदरीत लेखामधे तुम्हाला चिंता कसली पडली आहे हेच कळेना.. LA मधे जाब विचारतात याची का मारहाणीची? तुम्हाला रेडीमेड एका वाक्यात उत्तर हवे आहे काय..? स्वता: परिस्थिती अन वस्तूस्थिती समजावून घेवून जाब विचारणार्‍यांना थेट उत्तर का देत नाही तुम्ही? यात "राज" चा दोष कसा काय बुवा?

आजकाल उदारमतवादीपणाची फॅशन आहे काय..? भोवती वणवा पेटला असताना "अहो जरा फुंकर घालून हळू हळू विझवा" म्हणणार्‍यांनी कधी या वणव्याचे चटके अनुभवले आहेत काय..? कुठलिही ठाम कृती न करता निव्वळ तात्विक वाद घालत बसायचे ही आम्हा मराठी लोकांची जुनी खोड आहे, अन दुसरा करत असेल तर त्याला खाली ओढायचे. अगदी छत्रपतींपासून आपला इतीहास हेच सांगतो.. म्हणूनच मुम्बईत "इतरांचे" वर्चस्व अधिक आहे, कारण ते ठाम क्रुती करतात. for a change राज ने ठाम कृती केली आहे (चूक की बरोबर हे येणारा काळ ठरवेल!) म्हणूनच त्याला पाठींबा आहे...

तो (राजस्थानी) सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत दुकान चालु ठेवतो. आता त्याच भागात त्याने अजुन एक दुकान घेतले आहे. ते त्याचा मेव्हाणा सांभाळतो

अहो त्या राजस्थान्याला पुण्यातले प्रसिद्ध 'चितळे बंधू (आमची इतरत्र कुठेहि शाखा नाही!)' यांचे कडे 'महाराष्ट्रात धंद्याच्या वेळा काय असतात, शाखा उघडावी की नाही, दुकानात माल किती ठेवावा, गिर्‍हाईकांशी कसे वागावे या' विषयांचे प्रशिक्षण देण्यास पाठवा.

एकदा का तो ते शिकला की तोहि मुंबईत महाराष्ट्रीयांच्यात सामावून जाईल. मग त्याचा राग करण्याची गरज नाही!
Light 1 Happy

ते चितळ्यांबद्दल मधे एका पुस्तकात वाचले की ते ८:३० ला दुकान बंद करतात कारण नोकरीवर असलेल्या कामगारांना लेबर ऍक्ट नुसार एका ठराविक वेळेपेक्षा जास्त दुकानात ठेवता येत नाही. "मारवाड्यांची" म्हणून आपण जी दुकाने म्हणतो तेथे लहान लहान वयातील पोरे १२ वाजेपर्यंत राबत असतात. त्यांना आपले हक्क बिक्क माहिती असण्याची शक्यताच नाही. आता चितळ्यांना कामगारांना ओव्हरटाईम देउन सुद्धा उशीरा ठेवता येत नाही का वगैरे माहीत नाही. पण हे खरे असेल तर इतके दिवस आम्ही त्यांच्या ८:३० च्या सुमारास अर्ध शटर ओढून ठेवण्यावर टीका करायचो ती चुकीची म्हणावी लागेल.

सर्वात शहाण्यासारखी पोस्ट "इट्स मी"ने लिहली आहे! कोणाचा मार्ग कसा आहे, बरोबर आहे का चुकीचा आहे याचा उहापोह करण्यापेक्षा आपण आपल्या परीने मराठी माणसाना आवर्जून मदत करावी. कसलीही अपेक्षा न ठेवता!! सांगून ठेवते की वेळोवेळी चपराक बसेल कारण ९५% ट्क्के मराठी लोकांना तुमच्या मदतीची काही पडलेली नसते. उरलेले ५% टक्के मात्र आयुष्यभराचे मैतर होतात. Be the Change you want be!! (Mahatma Gandhi). प्रत्यक्ष कृतीच महत्वाची बाकी नपुंसक चर्चा!

मी गेली २२ वर्षे अमेरिकेत असल्यामुळे माझे अनुभव, विचार जरा पैलतीरावरील वाटतिल पण त्याला इलाज नाही. भारतातल्या मराठी लोकांना शहाणपणा शिकवूच नये कारण ज्याच जळत त्याला कळत. मात्र चांगल्या गोष्टींकरता एकत्र यायल्या मराठी (अमेरिकेतली तरी) लोक फारसा उत्साह दाखवत नाहीत. हातातोंडाशी आलं तरच आपण एकत्र होणार का? नोकर्या जायला लागल्या कीच आपण एकत्र येणार का?

कुठ्ल्याही मराठी मंडळाशी बोला, सभासदांच्या संख्येच्या तिपट्ट किंवा चौपट संख्येने मंडळाकडे न फिरकणारी मराठी कुटुंब आहेत. त्यांच्या कारणांशी मला देण-घेण नाही मी तुम्हाला वस्तुस्थीती सांगतेय! बर मंडळातले सभासद सुद्धा जुन्या जुन्या मित्रांशीच घोळक्याने बोलताना आढळतील. कुतुहल म्हणून का होइना तुम्हाला नवीन लोकांशी बोलावस वाटत नाहि का? मंडळाच्या कमिटीवर आपण किती वेळा काम करतो? "काही मदत हवी आहे का" हे तरी कमिटीच्या लोकांना विचारतो का? मराठी कुटुंबाना एकत्र आणण्याकरता काय करतो? (पुराणिक, तुमचा रेकॉर्ड मस्त आहे त्यामुळे तुम्हाला सलाम!!) आपण किती वेळा ग्रोसरी स्टोर मध्ये भेटलेल्या अनोळखी मराठी कुटुंबाशी आवर्जून बोलतो? ५ मैलावरच राहतात कळल्यावर त्यांना चहाला का होइना घरी बोलवतो का? या अनुभवांना अपवाद सुद्धा भेटतात तेव्हा तो एक सुखद धक्का होतो. किती मराठी मुलांना आपण नोकरीकरता मद्त (मेंटरींग) करतो? किती मराठी होतकरु आणि पात्र मुलांचे रेझ्युमे आपण बॉसच्या हातात देतो? मद्रासी लोकांवर उगाच का जळतो. तुम्ही सर्वांनी इतक्या पोटतिडीकेने लिहलय की मला खात्री आहे कि तुम्ही कृतीशील आहात. मी गेली कित्येक वर्षे ह्या गोष्टी आवर्जून (अगदि वसा घेतल्याप्रमाणे) करत आहे...त्यातून भेट्लेले ५% टक्के मित्र-मैत्रिणी ही पदरात पडलेलि घसघशीत पुण्याई!!

कल्पू

कल्पू यांनी लिहीलेले सर्व अक्षरशः खरे आहे. मी पण असेच गेली २५ वर्षे अनुभवतो आहे. तत्पूर्वी मात्र म्हणजे साधारण १९८२ च्या पूर्वी मात्र मराठी लोकांनी आवर्जून एकमेकांशी ओळख करून घेतली. जास्तीत जास्त लोक उत्साहाने मराठी विश्व मधे सामिल झाले. न झालेले विरळाच.
पण जेंव्हा फार मोठ्या प्रमाणावर भारतीय इथे येऊ लागले म्हणजे सुमारे २५ वर्षांपूर्वीपासून, तेंव्हा पासून कल्पू म्हणतात तसे व्हायला लागले.

ईट्समी, सापडल्यास जरुर पाठव ती ईमेल

योग, चंद्रावर तिथल्या गुरुत्वाकर्शणामुळे चालता येत नाही.
महाराष्ट्रानी ८० टक्के जागा भुमीपुत्रांसाठी राखीव ठेवल्याचे ऐकतो न ऐकतो तोच एका सर्वे चा रिझल्ट कानावर आला: ९० टक्के ठिकाणी महाराष्ट्रीयन्सच आहेत म्हणे. जोपर्यंत ईतर आकडे मिळत नाहीत तो पर्यंत हेच खरे.
--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

हातातोंडाशी आलं तरच आपण एकत्र होणार का? ?? >> निदान अशावेळी तरी यायला हवे ना ....

जोपर्यंत ईतर आकडे मिळत नाहीत तो पर्यंत हेच खरे. >>> हे खरे नसावे. मी ईमेल शोधतेच Happy

मराठी समाजाची एकत्र येण्याबद्दल जी उदसिनता आहे त्यामुळेच हा उत्तर भारतियांचा सुळसुळाट मुंबईत झाला आहे. १०५ हुतात्म्यांच रक्त सांडून जी मुंबई आपण मिळवली ती आपण "आपली" ठेऊ शकलो नाही ही वस्तुस्तिथी आहे. त्यामुळे मराठी लोकांना कोणी सिरीयसली घेत नाहि. चार वर्षांपूर्वी, उत्तर अमेरिकेत राहणार्या मराठी लोकांना dish network वर zee marathi पाहता याव म्हणून बीएमएम ने जंग जंग पछाडल होत. dish network ने सांगितल की हा zee कॉर्पोरेशन चा निर्णय असणार आहे. आम्हाला काय, पैसे भरा, द्याल ते चॅनेल आम्ही प्रक्षेपित करू! झी मराठीला भेटल्यावर लक्षात आल की अमेरिकेत प्रक्षेपण करण्यामागे त्यांना फारशी उत्सुकता नाही. कदाचित त्यांच्या हातात काहि नसाव पण झी कॉर्पोरेशन कडे हा प्रश्न मांडायची तसदि सुद्धा त्यांनी घेतली नाही. बीएमएम ने पुढाकार घेउन सर्व्हे घेतला आणि झी कॉर्पोरेशनला डेटा दिला की ९८% लोकांना (सर्व्हे घेतलेल्या) झी मराठी बघायला आवडेल आणि त्याकरता ते १५-२० डॉलर दरमहा खर्च करायला तयार आहेत! गोयल साहेबांनी कष्टाने १० मिनीटाचा वेळ दिला, गुळमुळीत उत्तर देउन वाटाण्याच्या अक्षता लावल्या!
मराठी माणूस १५-२० डॉलर दरमहा खर्च करायला तयार आहे यावर त्यांचा विश्वास नसावा. सगळ्या प्रमुख स्थानिक भारतिय भाषांची चॅनेल्स dish network वर आहेत फक्त मराठी सोडून.

बर्याच वेळा वाटत की ह्या मुद्दयाची मशालपण मनसे कडे द्यावी का?

कल्पू

बाहेर गेल्यावर 'आकडेवारीत' बोलण्याचा काय रोग लागतो,

असा काही रोग वगैरे नसतो. प्रश्नाच्या व्यापकतेचा तो फक्त एक निर्देशांक आहे. म्हणजे उगाच भावनेच्या आहारी जाऊन काहीतरी करण्यापेक्षा काही इतरहि कारण असले तर बरे ना.
फक्त एकाच मराठी माणसाला नोकरी दिली नाही, तर एकदम सर्व मराठी लोकांवर अन्याय होतो, हे खरे कसे वाटेल?****

९८% लोकांना (सर्व्हे घेतलेल्या) झी मराठी बघायला आवडेल.
पुनः आकडेवारीची गरज आहे. एकूण लोकसंख्या किती? प्रत्येकी २० डॉ. याप्रमाणे पैसे मिळाले तर त्यातून प्रसारणाचा खर्च निघेल का?

मराठी माणूस १५-२० डॉलर दरमहा खर्च करायला तयार आहे यावर त्यांचा विश्वास नसावा. सगळ्या प्रमुख स्थानिक भारतिय भाषांची चॅनेल्स dish network वर आहेत फक्त मराठी सोडून.

कुणि आकडेवारी पाहिली आहे का, की महाराष्ट्रातल्या मराठी लोकसंख्येच्या प्रमाणात मराठी झी टीव्ही किती बघतात? किती जाहीरातदार त्या कार्यक्रमांना जाहीराती देतात? अमेरिकेत कुणाला म्हंटले, मराठी झी टीव्ही ला जाहीरात द्या, तर किती मिळतील? हे सगळे गणित करायला कुणाजवळ माहीति आहे का? तेव्हढे कष्ट घ्यायला भारतात कुणि तयार होईल का?

हे मी आपले विचारतो आहे. आकडेवारीचा उपयोग काय होऊ शकतो हे सांगायला. आकडे वारी मागणे म्हणजे रोग नाही, या माझ्या विधानाला अनुसरून.

**** की इथल्या रश लिम्बॉ सारखे? त्याला कुणि विचारले की अरे, तू पुस्तकात जी विधाने केली आहेस, त्याला समर्थक, काही आधार असलेली, खात्रीलायक माहीति आहे का? त्याचे उत्तरः (How dare you ask me for proof? If I wrote it, then it must be true!)

कुठ्ल्याही मराठी मंडळाशी बोला, सभासदांच्या संख्येच्या तिपट्ट किंवा चौपट संख्येने मंडळाकडे न फिरकणारी मराठी कुटुंब आहेत. त्यांच्या कारणांशी मला देण-घेण नाही मी तुम्हाला वस्तुस्थीती सांगतेय!
----मंडळाने पण आत्मपरिक्षण करायला हवे. जर कारणे माहित करुन घेतली नाहीत तर कसे कळणार काय अडचणी आहेत त्या. का बहुसंख्य लोकांना सभासद व्हावे असेही वाटत नाही?

माझा अनुभव सांगतो. ४-५ वर्षांपूर्वी आम्ही येथील मंडळाचे सभासद झालो त्या वर्षाची वर्गणी भरून. त्यानंतर ते कधी संपले लक्षात नाही. त्यांचे फ्लायर काही दिवस आले. बहुधा ते ही विसरले आणि आम्हीही. मंडळाच्या कार्यक्रमाला अधूनमधून जातो, पण तेथे मेंबर असल्याने किंवा नसल्याने काही फरक दिसत नाही.

प्रश्न महाराष्ट्रातले मराठी लोक का एकत्र होऊ शकत नाहीत असा आहे. अमेरिकेतल्या लोकांचा नाही.
माझ्या मते, सगळेच शहाणे. काहीहि करण्या ऐवजी बाजूला राहून त्यावर तावातावाने चर्चा करणेच बहुतेकांना बरे वाटते.

एक गंमतः पूर्वी, (१९५० च्या दशकात, जेंव्हा पुण्यात, पर्वति गावाबाहेर समजली जात असे, कारण जवळ जवळ तसेच होते. टिळक रोडवरील ना. सी. फडके यांचा बंगला गावाबाहेरचा बंगला होता!) पर्वतीच्या पायथ्याशी म्हातारे लोक बसून नेहेरु, अमेरिका, इंग्लंड, रशिया यांचे काय चुकते ते सांगत असत, सुपारी कातरता कातरता.
आता आम्ही म्हातारे, इथे दारूचे ग्लासेस भरून, चीज नि स्टफ्ड मश्रुम खाता खाता, ओबामाने अर्थव्यवस्था कशी सुधारावी, इस्राईल चा प्रश्न कसा सुटेल, आणि क्वचित्, काय हो काय चाललय् त्या राज ठाकरेच? काही लोक म्हणतात कोण हा राज ठाकरे? बाळ ठाकरेंचा कुणी?
थोडक्यात, एकत्र आलेच, तर मराठी लोक फक्त दुसर्‍याने काय करावे (किंवा त्याचे कुठे चुकते) ह्याबद्दल खाता पिता चर्चा करणार!

वास्तविक, अमेरिकेतील मराठी मंडळांचा विषय, जरा या बातमी फलकाच्या विषयापेक्षा बराच दूर आहे. पण एक भाष्य: मराठी विश्व (न्यू जर्सी ) यांचे गणपति व दिवाळी हे कार्यक्रम फक्त सभासदांना फुकट असतात. सभासदांची नावे, RSVP दिलेल्यांची नावे यादीत असतात. सभासद नसलेल्यांना प्रवेश शुल्क आहे.
सध्या तरी कुठल्याच कार्यक्रमाला प्रेक्षकांची कमतरता भासत नाही. उलट वरील दोन्ही कार्यक्रमाला इतके लोक येतात की फारच गोंधळ होतो, अन्न पुरत नाही, चहाच्या लायनी लांबलचक. चहा संपतो. हॉलमधे जागा पुरत नाही. 'कदाचित्' सारख्या सिनेमाचे दोन दोन प्रयोग ठेवूनहि अजून बर्‍याच लोकांना तिकीटा अभावी तो पहाता आला नाही.
पूर्वीसारखा सभासदभरतीचा प्रयत्न आजकाल होत असल्याचे ऐकीवात नाही.

झक्कि,
मराठी माणसाला एकत्र यायला आणि एकजूटीने राहायला आवडत नाही हे एक विदारक सत्य आहे. मग ते अमेरिकेतले असो किंवा मुंबईचे! आणि तुमच्या वरील मताशी मी अगदि सहमत आहे! फुटकळ चर्चा आणि निरर्थक वाद घालण्यात आपण अग्रेसर.
बाय द वे, नुकतच कळल कि न्यू जर्सी मधे एक नवीन मंडळ स्थापन झालय!! आता विश्वच्या चहाच्या रांगा कमी होतिल!!

कल्पू

अरे हा विषय पुन्हा भरकटत चालला...
>योग, चंद्रावर तिथल्या गुरुत्वाकर्शणामुळे चालता येत नाही.
Aschig,
गुरुत्वाकर्शण नसल्याने असे म्हणायचे असेल तुला...
असो. मला ते महितच नव्हत! मला वाटल की खड्ड्यांचा प्रॉब्लेम असावा.. you got the point? Happy (when you know the reasons why ask for irrelevant numbers....?).
तरिही तुला जी काही आकडेवारी हवी आहे ती गूगलवर सापडेलच की..

Pages