फोल 'राज' कारण

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

मुंबईतील राजकारण्यांनी मुंबईकरांच्या आणि विशेषत: मराठी मुंबईकरांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा नवीन मार्ग शोधून काढला आहे. लोकांच्या भावनांना हात घालून सत्ता सिंहासन मिळवता येईल अशी या राजकारण्यांची पक्की धारणा दिसते. देशातील परीस्थिती ज्याप्रमाणे बदलते आहे त्याप्रमाणे मतदारही झपाट्याने बदलतो आहे. दहशतीच्या मार्गाने मुंबईचे प्रश्नतर सुटणार नाहीतच परंतु हे राजकारणी सत्ता सिंहासनापासून अधिक दूर फेकले जातील.

भारताने जेव्हापासून जागतीकीकरणाचा मार्ग स्वाकारला आहे तेव्हापासून भारत प्रगतीच्या मार्गावर आहे. जागतीकीकरणामुळे महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात बेरोजगारीचं प्रमाण गेल्या १०/१२ वर्षात कमी झालं आहे. ९८ च्या सुमारास जेव्हा मी पदवीधर झालो तेव्हा वाणिज्य पदवीधरांना नोकऱ्या मिळत नसत. आज वाणिज्य पदवीधरांना मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. रस्त्यारस्त्यावर उघडलेल्या मॅालमध्ये अनेक मराठी तरुण/तरुणी काम करताना आढळतात. मग गेल्या वर्षभरात असे काय घडले कि अचानक मराठी तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न वर उफाळून आला? मुंबईमध्ये किती बेरोजगार मराठी तरुण आहेत? मुंबईतील बिहारी व उत्तरप्रदेशीय कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या करतात? ते ज्या प्रकारची कामे करतात ती कामे करायला मराठी तरुण पुरेश्या संख्येने उपलब्ध आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधायच्या भानगडीत न पडता राजकारणी लोकं उठसुठ स्वत:च्या फायद्यासाठी लोकांना भडकवतात. हे प्रकरण इतकं पराकोटीला जातं की भर दिवसा एका उत्तर प्रदेशीय तरुणाला लोकलमध्ये ठार मारलं जातं! कुठल्या स्तराला गेलय आपलं राजकारण? अशा रीतीने मानवतेचा बळी देऊन मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न सुटणार आहे का? त्यापेक्षा हे परप्रांतीय मुंबईत का येतात? याची मूळ कारणे कोणती आणि त्यावर समाजशास्त्रीय आणि अर्थशास्त्रीय तोडगे कोणते? याचा विचार झाला पाहिजे. उठसुठ लोकांना मारहाण करुन आणि स्वत:च्या लोकांच्या करातून उभारलेल्या मालमत्तेचं नुकसान करुन हा प्रश्न सुटणार नाही. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये जिथपर्यंत रोजगाराच्या संधी मिळत नाहीत तोपर्यंत हे स्थलांतर थांबणार नाही.

महाराष्ट्राला उदारमतवादी समाजसुधारकांची थोर परंपरा आहे. गोखले, आगरकर, फुले, कर्वे पिता पुत्र, रानडे, लोकहितवादी अशी कितीतरी नावं घेता येतील. संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र पश्चिम बंगालच्या जोडीने समाजसुधारणेमध्ये पुढे होता. अशा या सुधारकांमुळे महाराष्ट्राला आज संपूर्ण देशामध्ये पुरोगामी म्हणून अोळखले जाते. आज आपण महाराष्ट्राची ही परंपरा विसरलो आहोत. ज्यांनी शिवाजी महाराजांचा वसा घेतलाय असे हे लोक शिवाजी महाराजांनी असे प्रश्न कसे हाताळले असते याचा यत्किंचीतही विचार करताना दिसत नाहीत. यांच्या विरुध्द जरा कोणी काही बोललं कि त्यांच्या तोंडाला काळं फासलं जातं नाहीतर सार्वजानिक मालमत्तेची नासधूस केली जाते. ही लक्षणं एका प्रगतीशील पुरोगामी राज्याची नसून अधोगतीची आहेत. मराठी लोकांनी कुठल्या रस्त्यानी जायचं याचा गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे.

मुंबईतील परप्रांतीयाच्या प्रश्नाप्रमाणेच अमेरीकेत मेक्सिकन लोकांच्या प्रश्नावर चर्चा सुरु आहे. उपविजीकेनिमित्त हजारो मेक्सिकन लोकं दरवर्ष डोंगर दऱ्या तुडवून अवैध मार्गाने अमेरीका-मेक्सिको सीमा पार करतात आणि अमेरीकेत येऊन वसतात. परंतु आपल्याप्रमाणे तिथे मेक्सिकन लोकांना पकडून मारलं जात नाही! अमेरीकन अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी ज्याप्रमाणे भारतीय अभियंत्यांची गरज आहे, त्याप्रमाणे मेक्सिकन मजूरांचीही आहे याचं अमेरीकेला पक्कं भान आहे. म्हणूनच वेगवेगळे नविन कायदे करुन, जास्त काळ राहिलेल्या मेक्सिकन लोकांना नागरीकत्व देऊन आणि मेक्सिकोला आर्थिक मदत देऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. अमेरीकेतही अनेक विचारप्रवाह आहेत आणि त्यात मेक्सिकन लोकांना परत मायदेशी परत पाठवावे असा प्रचार करणारे लोकंही आहेत. परंतु हे लोक सर्व मर्यादा सोडून मारहाण व जाळपोळ करताना दिसत नाहीत. प्रगल्भ समाजाची ही लक्षणं आहेत.

ज्याप्रमाणे मुंबईत मराठी माणसाचे प्रमाण कमी होत अाहे, त्याप्रमाणे अमेरीकेतही गोऱ्या लोकांचं प्रमाण कमी होत अाहे. दरवर्षी जगभरातून हजारो भारतीय, चीनी, मेक्सिकन, आफ्रिकन लोकं अमेरीकेत जातात आणि कायमचं तिथले होतात. अमेरीकेतील सर्वात प्रगत अशा कॅलिफोर्निया राज्यात गोऱ्या लोकांचं प्रमाण ५० टक्क्यांपेक्षाही कमी झालं अाहे. अमेरीकेत २०४२ सालापर्यंत गोऱ्यांचं प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा खाली जाईल असे अंदाज समाजशास्त्रज्ञ मांडत आहेत. अशा या बदलत्या काळात जाळपोळ आणि भांडणं तर सोडाच पण अमेरीका एका कृष्णवर्णीय माणसाला निर्विवाद बहुमत देऊन आपला राष्ट्रध्यक्ष बनवते! प्रगतीपथावर असलेल्या अाणि प्रगल्भ समाजाची ही लक्षणं आहेत.

भारतातील आणि जगातीतील परीस्थिती झपाट्याने बदलते आहे. ज्या समाजाची आर्थिक परीस्थिती चांगली त्याच्या भाषेचं, त्यांच्या संस्कृतीचं प्राबल्य वाढणार आहे. मराठी माणसाने कष्ट करुन स्वत:ची आर्थिक प्रगती केली तर त्याच्या भाषेला आणि त्याच्या संस्कृतीला जगात नक्कीच पत प्राप्त होईल. मराठी चित्रपटांनी केलेल्या अलिकडच्या प्रगतीने आणि मराठी वाहिन्यांच्या वाढलेल्या संख्येने हे सिद्ध केलंय. मराठी माणसाने इतरांची मारहाण करण्यापेक्षा मराठी बाजारपेठ तयार करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र देवताच्या उपासनेला आम्हाला परप्रांतियांच्या रक्ताची आहुती देण्याची गरज नाही. महाराष्ट्रची अस्मिता एवढी कोती नाही आणि काही लाख परप्रांतियामुळे धोक्यात येण्याएवढी लेचीपेची तर मुळीच नाही. महाराष्ट्राने बदलत्या परीस्थितीचा स्वीकार करुन संपूर्ण भारतापुढे आदर्श बनले पाहिजे. त्यातच मराठी भाषेच्या आणि मराठी माणसाच्या प्रगतीचं गुपित दडलं आहे.

विषय: 
प्रकार: 

१. मराठी माणसाने कष्ट करुन स्वत:ची आर्थिक प्रगती केली तर त्याच्या भाषेला आणि त्याच्या संस्कृतीला जगात नक्कीच पत प्राप्त होईल. मराठी चित्रपटांनी केलेल्या अलिकडच्या प्रगतीने आणि मराठी वाहिन्यांच्या वाढलेल्या संख्येने हे सिद्ध केलंय.........

चित्रपट्/वाहिन्या याना भाषेची पत मोजण्याची फूटपट्टी असा दर्जा देणं कितपत योग्य आहे.. ?

२. अशा या बदलत्या काळात जाळपोळ आणि भांडणं तर सोडाच पण अमेरीका एका कृष्णवर्णीय माणसाला निर्विवाद बहुमत देऊन आपला राष्ट्रध्यक्ष बनवते! प्रगतीपथावर असलेल्या अाणि प्रगल्भ समाजाची ही लक्षणं आहेत.

.. मग आता मुम्बईच्या लोकानी महापौरपदी एखाद्या भैय्याला बसविल्याशिवाय मुंबईवर प्रगल्भतेचे शिक्कामोर्तब होणार नाही का ?

रस्त्यारस्त्यावर उघडलेल्या मॅालमध्ये अनेक मराठी तरुण/तरुणी काम करताना आढळतात.......................

Happy

स्वतः लॉस एंजिलिस मध्ये रहायचे आणि मुंबईत किती मॉल आहेत ( रस्त्यारस्त्यावर !!!! ) , त्यात किती मराठी लोक काम करतात ( किती पगार मिळतो हो ?? ) आणि यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील बेरोजगारी कशी हटली आहे यावर एवढा मोठा मुक्तछंद लिहिणं .... लई झ्याक साहेब.. सत्कार करायला हवा एकदा तुमचा .. खरंच ,.. अगदी सच्चे मनसे |

मराठी चित्रपट आणि वाहिन्या यातून येळ मिळालाच कवा तर लॉस यंजेलातच बसून हे बी वाचा...

http://www.maayboli.com/node/2025

हे प्रकरण इतकं पराकोटीला जातं की भर दिवसा एका उत्तर प्रदेशीय तरुणाला लोकलमध्ये ठार मारलं जातं! >>>>
सत्य परिस्थिती काय आहे ते माहिती आहे का आपल्याला????
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....

शिवाजी महाराजांनी असे प्रश्न कसे हाताळले असते याचा यत्किंचीतही विचार करताना दिसत नाहीत>>>>
हा विनोद आहे का? अहो, दर दिवसाला परिस्थिती बदलते आहे इथे. आज योजलेले उपाय उद्या कुचकामी ठरताहेत. आज काढलेली बजेट्स उद्या दुप्पट होताहेत. शिवाजी महाराजांनी त्या काळी केलेले राज्य, राजकारण, समाजकारण मार्गदर्शक ठरेल, यात शंकाच नाही; पण आंधळेपणाने तेच उपाय आजही लागू करावेत म्हणताय?

स्थलांतरितांचा प्रश्न अमेरिकेतही आहे, हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद. पण फक्त अमेरिका आणि महाराष्ट्रातच नाही, तर तो जगातल्या सर्व प्रांतांत आहे. उपर्‍यांचा भुमीपुत्रांना जिथे जिथे त्रास होतो आहे- तिथे तिथे आहे.

हे 'राज' कारण तुम्हाला फोल वाटत असले, तरी विशिष्ठ परिस्थिती आल्यामुळे ते होते आहे. या वादाचा आम्ही इथे असल्यामुळे प्रत्यक्ष फटका बसतो आहे. तुम्ही इथे येऊन, ही परिस्थिती भोगून पोस्ट लिहिली तर ती वास्तववादी ठरेल, वरच्यासारखी पुस्तकातली 'हितोपदेशाची गोष्ट' ठरणार नाही.

कृपया तिथली वर्तमानपत्रे वा भंकस संकेतस्थळे वाचून इथल्या घटनांबद्दल मत बनवू नका.

आपण सद्यस्थितीबद्दलचे आपले आकलन आणि मत फारच ठामपणे मांडले आहे....
---------------------------------------
"The trouble with the world is that the stupid are cocksure and the intelligent are full of doubt." - Bertrand Russell

विपुराणिक सोडून सगळ्यांना अनुमोदन. काही दिवसांपुर्वी अशाच प्रकारे लिहिलं गेलं होतं मायबोलीवर. मी प्रतिक्रिया दिली होती. पण काय झालं कुणास ठाउक २-३ तासातच ते मायबोलीवरुन गायबच झालं, नामोनिशान नाही.

जे लोक आज भारतात नाहीत, ते सगळे बहुधा राज/मनसे /मराठीवाद याना विरोधच करतात. आपल्या नोकर्‍या जातात की काय याचे टेन्शन.. बाकी काय ! उत्तर प्रदेश च्या बी बी वरही असेच होत होते... त्यामुळे मनसे/राज/ उ प्र/ या असल्याना विरोधाचे पोस्ट आले की मी आधी लिहिणार्‍याचा आय डी वाचतो... हे सगळे न्यु जर्सी/ एल ए/ सॅन फ्रान्सिस्को.... असलेच कुठले तरी असतात.... अर्थात याला सन्माननीय अपवाद असतील ही ! पण मूळ पोटदुखी स्वतःच्या नोकरीची चिन्ता हीच असते... याना अमेरिकेच्या काय मुम्बईच्या काय कुठल्याच समाजाशी देणे घेणे नसते.... आज 'लॉस एंजेल' मध्ये बसून समानतेच्या गप्पा मारताहेत , उद्या रिसेशन वाढून ' लॉस' मध्ये आले की हेच लोक मुम्बईत येतील आणि तेंव्हा राजला हेच लोक 'एंजेल' म्हणतील... ...

बर्‍याच महाराष्ट्रीय लोकांनी कष्ट करून आर्थिक सुबत्ता मिळवली आहे. पण भाषा नि संस्कृति यांचा काही प्रसार होत नाही. कारण खुद्द महाराष्ट्रीय लोक आपणहून मराठी बोलण्याचे टाळून, इतर भाषांमधून बोलतात, स्वतःची संस्कृति सोडून 'करवा चौथ, पैसे दो जूते लो, नि लग्नांमधे पंजाबी इश्टाईल 'डांसेस' 'करण्यात धन्यता मानतात. छठ पूजेचे कौतुक करतात. स्वतःच्या संस्कृतीचे जे प्रतिक, गणेशोत्सव, त्यात दारु पिऊन धिंगाणा घालतात, अचकट विचकट नाच, असे सगळे चालू असते.
ते सगळे सुधारले तर एकदा लोकांना कळेल की महाराष्ट्रीय संस्कृति काय आहे.

खर म्हनजे परप्रातिय लोकामुळे कोनत्या मरटि माणसाचा रोजगार जातो
हे आपन बघायला हावे .
पानिपुरि , मजुरि, मिस्त्रि ,बानघ्काम , पेन्टिग, साफसफाइ,घरकाम्,हमालि, ड्राविन्ग, इत्यादि कामे मराटि मानसतिल कोनति लोक करतात ?
खालच्या जातीतील . मुळात ति पन कामासाटि आपला गाव सोडुन आलेलि आसतात याचापन आपन विचार करायला हावा?

वैभवनी काही प्रश्न विचारले आहेत ते दूर असल्यामुळे मलाही पडले आहेतः
(१) मुंबईमध्ये महाराष्ट्रियनांचे प्रमाण (टक्केवारी) किति आहे?
(२) त्यातील मुंबईबाहेरचे किति आहेत?
(3) महाराष्ट्रियन लोक कोणत्या नोकर्या/उद्योग करतात?

अर्थात सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे हाणामारी व्यतिरिक्त इतर उपाय आहेत काय? उदा. उपलब्ध नोकर्यांसंबंधी ईच्छुकांपर्यंत माहिति पोचवणे?

अनेक ठिकाणी हे प्रश्न सोडुन जास्त भावनीक पातळिवरच चर्चा चालते. या प्रश्नांची उत्तरे कोणी पुरवु शकेल तर आभारी राहीन. धन्यवाद.

--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

<< अशा या बदलत्या काळात जाळपोळ आणि भांडणं तर सोडाच पण अमेरीका एका कृष्णवर्णीय माणसाला निर्विवाद बहुमत देऊन आपला राष्ट्रध्यक्ष बनवते! प्रगतीपथावर असलेल्या अाणि प्रगल्भ समाजाची ही लक्षणं आहेत. >>

ही तुलना जरा चुकिची आहे असं वाटतं...... अमेरिकन लोकांनी आपल्या देशातला वर्णद्वेष कमी व्हावा, किंवा झालाय हे दाखवण्यासाठी त्याला निवडून नाही दिले... अमेरिकन अर्थव्यवस्था खालावली आणि लोकांच्या (भूमिपुत्रांच्या) पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला... आणि ओबामाने वेळोवेळी हेच ओरडून सांगितले की आउट्सोर्सिंग कमी करण्यासाठी तो प्रयत्न करेल आणि अमेरिकेत नोकर्‍या उपलब्ध करेल...म्हणून लोकांनी दिले त्याला निवडून... मुद्दा हा की पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला कि हे होणारच...

<<उत्तर प्रदेश व बिहारमध्ये जिथपर्यंत रोजगाराच्या संधी मिळत नाहीत तोपर्यंत हे स्थलांतर थांबणार नाही. >>

हो ना... पण मुंबईच्या निमित्ताने लालुंच्या बिहारमध्ये लोकांना नोकर्‍या मिळत नाहीत हे एका अर्थाने उघडच झालं ना.... आता उपाययोजना त्यांनी केली पाहिजे...महाराष्ट्राने नाही...

आपण महाराष्ट्रीय पुरोगामी, सुधारक, फुले-आंबेडकर-कर्वेंचा वारसा (???) सांगणारे ना....
मग आपणच बिहारची काळजी करायची.
बिहारी-यु.पी. वाल्यांना ईकडे बोलावुन त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करायची स्वतः ऊपाशी राहुन....
आमच्या मुख्यंमंत्र्यानी रोज ऊठसुठ म्याडमचे पाय धरायचे, खुर्ची वाचवण्यातच धन्यता मानायची. (हे मराठे म्हणे...)
.... अगदी चव्हाणांपासुन देशमुखांपर्यंत सर्वांनी हेच केलेय.

यांचा रोम जळत असताना बासरी वाजवणारा निरो झालाय.
यांना काय रे सामान्य माणसाला काय भोगावे लागते ते?
आज कॉलेजेस, रस्त्यावरेचे धंदे, आय टी, इंडस्ट्रिज सगळी कडे मराठी माणुस नाकारला जातोय.....
कानडि, यु.पी., बिहारी, बांगलादेशी हेच सगळीकडे दिसतायत.

राज हे फक्त हे निमित्त आहे. कदाचित त्याचा मार्ग हा चुकीचा असु शकतो, पण मग ईतर काय मार्ग आहेत का?

>>>>>.. मग आता मुम्बईच्या लोकानी महापौरपदी एखाद्या भैय्याला बसविल्याशिवाय मुंबईवर प्रगल्भतेचे शिक्कामोर्तब होणार नाही का ?
<<<<
नाहीरे जगमोहन प्यारे.... आता देशमुखांना घरी पाठवुन लालु ला बसवा, म्हणजे महाराष्ट्र अधिक प्रगल्भ होईल, मग त्याची बायको मुखमंत्री होईल,
मग तर एका स्त्री ला सी.एम. केले म्हणुन जगात ऊदो उदो होईल.....

मुळात भूमिपुत्र आणि परप्रांतिय हा वाद रोजगार आणि जीवनावश्यक सोयी-सुविधांवर ताण आला की उफळून येतो.
प्रतिक्रिया द्यायला थोडा उशिर झाला असेल मला, पण हे इथे सांगणं गरजेचं वाटतं.
आपण (मराठी माणूस असं म्हणूयात का?) इतर राज्यात किंवा परदेशात गेलो की तिथले नियम पाळून रहातो.अमेरिकेत गेल्यावर, रस्त्याने जाताना उजवीकडून चालणे इथपासून ते lift ल elevator म्हणणे इथपर्यन्त आपण स्वतःला बदलतो, तिथल्या समाजाशी जुळवून घेतो.तिथल्या वास्तव्यात कर भरण्याचंही कर्तव्य पार पाडतो.
यातली कोणती गोष्ट बिहारी/उ.प्र. चे लोक करताना दिस्तात?
अमेरिकेची अर्थव्यवस्था परप्रांतीयांवर बव्हंशी अवलंबून आहे, पण ती सकारात्मक अर्थाने.म्हणजे हे लोक ती व्यवस्था मजबूत करतात्.तिथे काम करून मिळलेला पैसा बराचसा तिथे रहूनच वापरतात.भारतात्(महराष्ट्रात) पैसा पाठव्ण्याचं प्रमाण कमी.
थोड्क्यात, एकूण नागरी जीवनावर ताण येईल असं काहीही तिथे रहाणारी मराठी माणसं करत नाहीत.
आपल्याकडची परिस्थिती नेमकी उलट आहे.महाराष्ट्रात येऊन बेकायदेशीर झोपड्या उभारायच्या, मग वीज्-पाण्याचं कनेक्शन घ्ययचं, शहराची शिस्त बिघडवायची,संस्कृती तर दूरच राहूदेत, समाजजीवनाशीही जुळवून घ्यायचं नाही...आणि मुख्य म्हणजे, नागरी सुविधांवर ताण आला तरी बेफिकीर रहायचं...

मग याविरुद्ध कोणी आवाज उठवला तर काय चुकलं?

..प्रज्ञा

हे काय... फक्त इतर लोक प्रतिक्रिया देत आहेत.... मूळ ज्या पुराणिक बुवानी हे एकोणिसावे पुराण लिहायला घेतले ते कुठे गायबच झालेत......

एक करता येईल. सरकारमधील, मोठ्या उद्योगधंद्यांमधील मराठी लोकांनी खास महाराष्ट्रीय तरुणांसाठी वेळोवेळी मराठीतून भाषणे देऊन, कुठे संधी उपलब्ध आहेत, त्यांचा फायदा कसा घ्यावा हे सांगितले तर तरुणांना मार्गदर्शन होईल. उदा. नोकर्‍या कुठे उपलब्ध आहेत, त्या मिळवण्यासाठी लायकी काय, ती कशी प्राप्त करावी, बायो डेटा कसा लिहावा, मुलाखती कश्या द्याव्या, networking कसे करावे, इ. माहिती पुरवता येईल.

(इथे नोकरी मिळवताना networking मुळे ३७ टक्के नोकर्‍या मिळतात, तर जाहीराती, फोन, इंटरनेट इ. सर्व मार्गांनी मिळून त्यापेक्षा कमी टक्के नोकर्‍या मिळतात.)

सध्या मी हे कार्य आमच्या न्यू जर्सीतल्या नोकरी शोधू इच्छिणार्‍यांसाठी करतो .
आम्हा २०० लोकांचा एक समूह हे काम संपूर्णपणे विनाशुल्क करतो. त्या साठी आम्हाला जागा , फुकट, सरकारने दिली आहे. (फुकट कसली, कोट्यवधी डॉलर
उकळतात नोकरी देणार्‍यांकडून नि करणार्‍यांकडून, मग फुकट जागाच काय, इतरहि काही व्यवस्था या राज्याने फुकट करायला पाहिजे, पण ते असो. आधी आम्ही आम्हाला काय करायचे ते करतो. कदाचित् तुमच्या राज्यांत कर कमी असल्यामुळे सरकारला परवडत नसेल)
हे काम करायची मला आवड आहे नि महाराष्ट्रात येऊन ते विनाशुल्क करायला मी तयार आहे, पण "तुम्हाला काय इथली माहिती नाही, ते सगळे तुमच्या अमेरिकेत ठेवा. इथे वशिला नि पैसे लागतात!" "तुम्हाला काय वाटते, तुम्ही अमेरिकेतून आला म्हणून जास्त शहाणे झालात का? आम्हाला नका शिकवू तुमचा शहाणपणा. (डॉलर्स किती देता ते द्या, नि परत जा)"

असो. त्यांचे म्हणणे खरे आहे. मी गप्प बसतो.

सध्या मी हे कार्य आमच्या न्यू जर्सीतल्या नोकरी शोधू इच्छिणार्‍यांसाठी करतो .
--- तुम्हाला पाटणा, रांची मधे उपशाखा काढता येणार नाही कां Happy ? तेव्हढीच महाराष्ट्राची सेवा करण्याचे पुण्य पदरी (खात्यात) जमा होईल.

उत्तर प्रदेश व बिहारमध्ये जिथपर्यंत रोजगाराच्या संधी मिळत नाहीत तोपर्यंत हे स्थलांतर थांबणार नाही.
--- हे मान्य आहे, मग या साठी कोणि प्रयत्न करायला हवेत? काय प्रयत्न करायला हवेत? उ प्र ने तर अनेक वर्षे प्रधानमंत्री पद उपभोगले... मग विकास का नाही झाला करवला गेला?

तुम्हाला पाटणा, रांची मधे उपशाखा काढता येणार नाही कां ? तेव्हढीच महाराष्ट्राची सेवा करण्याचे पुण्य पदरी (खात्यात) जमा होईल.

पाटणा, रांची? कळले नाही. मी असे महाराष्ट्रात करण्याबद्दल बोलत होतो.

तुमच्या लिखाणाचा अर्थ कळला नाही. ही काय थट्टा, उपहास, गंमत असे काही आहे का? एव्हढे का माझे लिहीणे हास्यास्पद होते? असेल तर जाऊ द्या.

मग या साठी कोणि प्रयत्न करायला हवेत?
खरेच आहे. दुसर्‍या कुणि प्रयत्न केले तरच. आमचे आम्हाला काही जमत नाही बॉ.
आम्ही फक्त कुणि काही म्हंटले की त्याची कुचेष्टा करतो.
शिवाय अमेरिकेहून काही सूचना नकोत, फक्त डॉलर किती देता ते द्या, नि तोंड बंद ठेवा!

झक्कींचे मुद्दे अजिबात न पटून त्या मुद्द्यांना विरोध करणारे पोस्ट मी इथे लिहिले होते.

पार्श्वभूमी काहीही असली, तरी मुद्दे पटणे, ना पटणे हा सर्वस्वी वेगळा विषय आहे. पण मुद्द्यांना मुद्देसूद विरोध करणे आणि त्यावरील प्रतिक्रियेची परिणती सरसकट त्या विशिष्ट व्यक्तीवरच व्यक्तिगत टीका करण्यत होणे- यामधली अगदी अस्पष्ट असणारी सीमारेषा माझ्याकडून अनावधानाने पार केली गेली, जे पुर्णपणे चुकीचे आहे. ही चुक कबूल करून सांगतो, की यात वैयकिक टीकेचा किंवा हेटाळणीचा अजिबात हेतू नव्हता.

याबद्दल झक्की आणि संबंधितांची मी माफी मागतो आहे.

प्रज्ञा, तुमचा नियम पाळण्या न पाळण्याबद्दलचा मुद्दा अगदी योग्य आहे. त्या बाबत सर्व-सामान्यांना काही करता येवु शकेल का? (स्वतः देखिल नियम न तोडता - ईतरांना मारहाण करुन?)

दूर असल्यामुळे इतर आकडे देखिल मला माहित नहित, पण जाणुन घ्यायची इच्छा आहे. उदा. पोलिसांमध्ये महाराष्ट्रियन किति आहेत? नगरसेवकांमध्ये महाराष्ट्रियन किति आहेत? (टक्केवारीनी) वर्तमान्पत्रांमध्ये (ईग्रजी आणि मराठी) लिहिणारे किति मराठी आहेत?

कुठे सापडतील हे आकडे?
--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

बाहेर गेल्यावर 'आकडेवारीत' बोलण्याचा काय रोग लागतो, काय कळत नाय!!!

नगरसेवकांमध्ये महाराष्ट्रियन किति आहेत?>>>>
यामुळेच 'इथे' येऊन पोस्ट लिहा असे आम्ही म्हणतो आहोत. नगरसेवक कोण निवडून देतात, हे आपल्याला माहिती आहे काय? कमीत कमी 'बहूसंख्य' लोक निवडून देतात, हे तरी?

पोलिसांमध्ये महाराष्ट्रियन किति आहेत?>>>>
तुम्हाला इथल्या 'राज्य करण्याच्या' पध्दतीबद्दल काही माहिती आहे काय? इथले पोलिस मुळचे राहणारे बँकॉकचे असले, तरी त्यांच्यावर आबा, अन त्यांच्यावर त्यांचे 'बाबा' राज्य करतात, हे आपणास माहिती आहे काय? पोलिस कुठलेही असले तरी ते इथले गुलाम असतात, हे आपणास माहिती आहे काय?

इथल्या मराठी वर्तमानपत्रांमध्ये लिहिणारे बहूसंख्य मराठीच आहेत. इंग्रजी वर्तमानपत्रांची भुमिका जगजाहीर आहे.

उगीच फक्त एखाद्या पोस्ट्साठी फक्त 'आकडेवारी'त बोलून 'मुद्देसूद' बोलण्याचा आव आणू नये. तिथल्या परिस्थितीत राहून इथल्या अवस्थे(वा दुरवस्थे) बद्दल कॉमेंटस कृपया करू नयेत. वरती लिहिल्याप्रमाणे बाहेरची वर्तमानपत्रे आणि बकवास संकेतस्थळे वाचून इथले मराठीच फक्त आग्यावेताळ आहेत, अन उरलेल्या जगभरातले सर्व मराठी 'ग्लोबल', 'समजदार' आणि शहाणे आहेत, असे 'एक्स्पर्ट ओपिनियन' देऊ नये.

बुश अन ओबामा पासून ते लालू अन एखाद्या भंकस अबू आझमीने फालतू सल्ले देण्याचा आम्हाला कंटाळा आलेला आहे, त्यात तुमची भर नको.

कृपया व्यक्तिगत घेऊ नका.. Happy

--
मी काव्यविभोर अन कडकलक्ष्मी कचराघंटागाडी तु!
माझ्या छिन्नमनस्क स्वप्नांची खळाखळा भरलेली चुळ तु!!

या लेखाकडे 'अमेरिकेत राहून केलेला उपदेश' अश्याच पद्धतीने का पहातायत? लेख उत्तम आहे अशातला भाग नाही. 'पूर्ण' नाही वाटला. आशिष विचारत आहे ती माहिती घेऊन पुढे अजून काही लिहिणार आहेत का? लिहावं. परंपरा, शिवाजी महाराज, अस्मिता या शब्दांमुळे त्या राजकारण्यांसारखा हा लेखही भावनेला हात घालणाराच वाटतो. या परिस्थितीवरच्या उपायांवर अजून काही सविस्तर लिहिला आलं तर पहा. अमेरिकेचंही मेक्सिकन लोकांचं उदाहरण बरोबर आहे, बाकी कृष्णवर्णीय प्रेसिडेण्ट वगैरे अनावश्यक वाटले.
ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या आहे तितकाही वाईट मला हा लेख किंवा त्यामागचा उद्देश वाटला नाही. आणि झक्कींनी काय चूक लिहिलंय? बरोबर आहे की!

लेखातल्या मुद्द्यांशी मी सहमत नाही.. पण..
लालू ला अनुमोदन.. लेखामधला अभ्यास कमी आहे हे खरय.. काही काही मुद्दे बरे आहेत..
आणि झक्कींनी लिहिलेलं मला तरी काही चुकीचं वाटलं नाही...

हो, लालू आणि ऍडमला अनुमोदन.
आणि झक्कींची ज्या प्रकारे हेटाळणी केली आहे, ते ही मला पटलं नाही. मुद्दे खोडा पटत नसतील तर. असं बोलायचं काय कारण?

साजिर्‍या लेका असे तावातावात नको लिहूस. Happy हे काय मराठी विरोधी लोक नाहीत. अरे झक्कींचे पोस्ट वेगळे होते, त्यांना असे म्हणायचे होते की काही करायाला गेले की भारतात लोक शहाने समजतात आणि स्वतचीच टिमकी वाजवतात, लोक ऐकायला तयार नसतात. हे बर्‍याच अंशी खरे आहे की.

झक्की उदय ने हे उपरोधात्मक लिहीले नाही तर तो म्हणाला की अशी शाखा जर रांची वा पाटण्यात निघाली तर तिकडच्या लोकांना तिकडेच रोजगार मिळेल, त्यामूळे तुम्हाला महाराष्ट्रावरचा बोजा हटविन्याचे पुण्य मिळेल. त्याची लिहीन्याची इश्टाईल जरा वेगळी आहे. Happy

पुरानिक येथील रिसेशन डिप्रेशन मध्ये बदलले तर इथल्या भारतीयांवर हल्ले होनार यात वाद नाही. शेवटी कल्चर पेक्षा भाकरी श्रेष्ट असते.

खरतर काल मी ऐक पोस्ट लिहून इथे टाकले नाही कारण मग मायबोलीवर 'नेहमीचे यशस्वी कलाकार म्हणून आरती व्हायची. Happy आज लिहीतोच आहे तर ...

आजकाल मी मराठी म्हणले की लोकांचा माझ्याकडे पाहन्याचा दृष्टीकोनच बदलतोय.त्यांचा भुवया वर जाताना लगेच दिसतात. त्यांना वाटतय की मी माझ्या डाव्या खिशात पिस्तुल लपवून आजुबाजुला कोण हिंदी फिरतोय त्याचावर ते चालवनार व माझे मराठीपण सिध्द करनार. हे म्हणजे मी काल पर्यंत हिंदू आहे असे सांगीतल्यावर काही मंडळी तसे करयाची. पण बघा ना राव मी मराठी म्हणल, मी हिंदू म्हणल की तुम्ही लोक माझ्याक्डे हा आततायी आहे, मारपिट करनारा आहे असे म्हणून बघनार नाहीका? माझा संबध लगेच राज ठाकरेंशी लावून तुम्ही मोकळे होनार. काय आजकाल फॅशनच आहे तशी नाहीतर फुकटात हिंदी वा इंग्रजी मिडीयात प्रसिध्दी कशी मिळनार?
( पण तेच लोक रोज बॉम्ब स्फोट करनार्‍या लोकांना आततायी म्हणत नाहीत तर त्यांच्यावर झालेल्या अन्यायामूळे ते लोक असे वागतात अश्या टाईप चे कॉलम चालवून दुहेरी प्रसिध्दी मिळवतात, असो ).

ह्या मिडीयाने ने तर उत आणलाय. सध्या रोजच्या बॉम्बस्फोटांना कोणी विचारत नाही त्यामूळे आपल्या टिव्हीचा टिआरपी वाढन्यासाठी त्यांनी 'राज' ला हाती धरलेय. तिकडे घरात कूणी पादले तरी लोक राजच्या नावावर बोंबा मारत आहेत पण हे कळत नाही की काल रात्री आपण जरा जास्तच छोले खाल्ले होते. त्याच काय रुट कॉज ऍनॅलिसीस की काय तो म्हणतात ते करायला कोणी तयारच नाही, कारण तो करुन प्रसिध्द करायला वेळ लागतो महाराजा, मग काय घे तलवार अन चालव 'राज' वर. जो होईंगा वो देखा जाईंगा.

हां हां तूमच्या मनातल मी ओळखल बरका, आत्ता तूम्ही हाच विचार करत आहात की केदार जोशी त्या 'राज'च्या पिद्दू आहे. नाही साहेब. आपण चुकलात, मी वर लिहील्याप्रमाने आपण चुकीच्या प्रसिध्दीचे बळी आहात.

हिंसक आंदोलनाचं मी कधीही समर्थन करनार नाही. कारण हा काही स्वातंत्र्य संग्राम नाही. पण हिंदी आणि ईंग्लीश चॅनल्स ने जे चालवल आहे ते मनसेच्या हिंसक कारवायांपेक्षा जास्त आहे. तो पवनकुमार पाय घसरुन पडतो आणि रेल्वेखाली मरतो आणी हे हिदी ईंग्लीश चॅनल वाले राजला खुनी ठरवतात ही कुठली पत्रकारिता? आणि तेव्हा मग हे मराठी विरोधक का नाही विरोध करत अशा कृत्यांचा? की हा संधीसाधूपणा? ही अपप्रसिध्दी मुद्दामहुन केली जात आहे. " राज ठाकरे मला तुमची लाज वाटते" असे लेख लिहीनार्‍यांनी लगेच मग "राज चे ह्या घटनेत काहीच चुकले नाही" असे लेख का लिहीले नाही? अहो ह्या मिडीयाने तर युनेस्को ने जन गण मन ला सर्वात चांगले राष्ट्रगित ठरविले ह्या धांदात खोट्यालाही प्रसिद्धी दिली.

मी कॉमन मराठी आहे.(हो आता कॉमन, यो, रॉक्स, यु नो) हे शब्द मराठीच झालेत. मला राडा करायला आवडत नाही, खरच सांगतोय. राडा करुन काही साध्य होत नाही असे बापू म्हणून गेले पण बापू तुम्ही चुकलात. 'राज' ने राडा करुन बरच काही साध्य केलयं त्याने १९४७ पासुन चालू असलेल्या प्रश्नावरचा अंगार पुन्हा भडकवला आहे. त्यामूळे विलासराव साहेब , राणेसाहेब, पवारसाहेब व असे अनेक साहेब ऐकत्र येउन मराठी ह्या प्रश्नावर चर्चा करनार आहेत. मला तुम्हीच सांगा राव मग 'राज' चा मुद्दा फालतू असेल तर ह्या मोठ्या साहेंबांनी ऐकत्र यायची गरज काय? आता आली का मेख लक्षात?

बर ऐवढेच नाही तर काल दिवशी आपले म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल उदगारते झाले की बाहेरच्या प्रांतियांनी महाराष्ट्रात दखल द्यायची गरज नाही. म्हणजे लक्ष हो. मग असे का घडले बर. 'राज'च्या लढाईनंतर आता क्रेडीट घ्यायला तर सर्व ऐकत्र येत नाहीत नं. हो निवडनुका जवळच आल्यात. पुढच्या वर्षी.

कौतीकराव ठाले पाटलांनी मसापच्या भाषनात यशवंतरांवावर तलवार चालविली, त्यांनी जे म्हणले ते आपल्यातरी आवडले बॉ. की "यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश आणला हा भ्रम आहे. तो मंगलकलश नव्हता, कुंकू लावलेला तांब्या होता. त्यातला नारळ कर्नाटकास, पाने गुजरातला तर गंध मध्यप्रदेशास गेला."

आता मला सांगा राजचे आंदोलन कितीतरी नंतर चालू झाले पण मराठी साहित्यीक लोकांना देखील हा प्रॉब्लेम आधीच कळला मग राज्यकर्त्यांना का नाही? ओ हो, त्यांनी मतासाठी दुर्लक्ष केले. ही बाब माझ्या ध्यान्यातच येत नाही. काय की पिंड कार्यकर्त्याचा आहे ना.
पार थोरल्या साहेबांपासुन पक्षी (यशवंतराव) धाकट्या पर्यंत ( पक्षी विलासराव, शरदराव, अनेक रा) हा मुद्दा चालूच आहे. मग इथे न्याय नको का मिळायला. आम्ही कष्टाने मिळवू ते तुम्ही पायदळी तूडवानार हा कुठला न्याय?

त्याही आधी संयुक्त महाराष्ट करन्यासाठी स्वतंत्र्य भारतात रक्तदान करावे लागले, आता त्याच रक्ताला ... ऐनीवे आपल्याला सवयच आहे.

आय ऍम ऑल फॉर भारतीयता आणी विवीधतेत ऐकता. पण मग अहो आमच्या घरी तुम्ही रहायला आल्यावर निदान झोपलेले अथंरुन तर गोळा करुन ठेवा की. ही अपेक्षा काही चुकीची नाही.

राडा करुन या सर्व लोकांचे लक्ष राज ने मराठी लोकांच्या प्रश्नाकडे वळवलय पण आता खरच राडा थांबवायला हवा हे देखील माझे मत आहे.

काहीतरी वेगळे विधायक ह्या प्रश्नातून त्याने उभे केले पाहीजे. शेवटी आपण सर्व भारतीय आहोत हे विसरता कामा नये. वेगळा महाराष्ट्र अश्या पुंग्या वाजविनारे लोक दुर्दैवी आहेत. आपण सर्व भारतीय आहोत व राहनार. मला हिंदी वा कुठल्याही भाषिकांविषयी द्वेश नाही असले तर ते प्रेम वा आपुलकीच.
पण अहो आम्ही सरकारला नियमीत टॅक्स देतो, तुम्ही पण द्या.
आम्ही दुसरीकडे गेल्यावर अरेरावी करत नाही, तुम्ही पण नका करु.
आम्ही चुपचाप सरकारी नौकर्‍यांच्या नियमावली बदलत नाही, तुम्ही पण नका करु.
आम्ही महाराष्ट्रात इतर व्यवसाय, नौकर्‍या उपलब्ध केल्यात, तुम्ही पण तुमच्या राज्यात करा.

ऐकाच शहराने पहिले आम भारतीयांचा लोंढा स्विकारला आता ऐकच राज्य करतेय. ह्यातून फक्त ते राज्य कोलमडेल आणि असमतोल निर्मान होइल. बाकी काही नाही, त्यामूळे तुम्ही पण तुमच्या राज्याला सुधारण्याचे प्रयत्न करा, आम्हीही मदत करु. शेवटी आपण सर्व भारतीय आहोत व सर्व भारतीय माझे बंधू आहेत हे शाळेतच शिकवीलेले आमच्या ध्यानी आहे. इतके दिवस तुमचे ऐकले आता काही दिवस तुम्ही आमचे ऐका.

राजदिप सारखे पत्रकार लिहीतात की फक्त अशिक्षीत मराठी लोक राजच्या मागे आहेत. राजदिपा, कुठल्यारे विश्वात राहतोस तू. अरे इकडे बघ मायबोलीवर येऊन, शिकलेले, पैशेवाले मराठीपण, मराठी विषयावर लिहीतात, मराठी ह्या विषयावर कितीतरी ब्लॉग रोज लिहीले जातात. 'राज'ला कमी लेखायचे म्हणून काहीही ठोकून द्यायचे, अरे हो, त्यांना बहुतेक मराठी वाचता येत नसेल त्यामूळे ते ठोकुन दिले वाटतं.

सहज जाता जाता, उत्तर प्रदेश व बिहारात मराठी लोकांना सध्या उपद्रव पोचविला जातो अश्या बातम्या आम्ही पेपरात वाचल्या, पण काय हो मग त्यांना त्रास देताना कुठे गेले तुमचे देशप्रेम, तेव्हा नाही का तुम्ही चुक करत, आम्हाला सांगता उदार व्हा, मग उदार मनाने तेथल्या मराठी माणसांना का नाही माफ करत. आणि हो मिडीयावाले ह्या बातम्या व्यवस्तिथ का दाखवत नाहीत, फक्त मराठी पेपरातच का वाचायला भेटतात?

पण आता मात्र हिंसक आंदोलन नकोय. राज आता जर तूम्ही जाळपोळ केली तर परत एकदा मूळ मुद्दा दुर्लक्षीला जाणार व मराठी लोकांची बदनामी होणार. तूम्ही जे केलय त्यामूळेच सर्वपक्षीय बैठका वैगरे होत आहेत. आता काही तरी विधायक होउदेत.

मी हे सर्व परिस्तिथीची दुसरी बाजु म्हणून लिहीले आहे. दरवेळी मराठी लोकांवर केद्रांने अन्याय केला आहे. इच्छूकांना संदेह असेल तर त्यांनी रोजचे पेपर चाळावेत त्यात बरच काही लिहून येत असत. मी वर दोन तिन उदा आधीच दिली आहेत.
अरे जावा जावा देखील भांडन करतात, हे तर फक्त राज्यांमधील भांडन आहे. शमेल आज ना उद्या. पण आता महा सरकारने त्या बिलांमधल्या दुरुस्ता तवा गरम आहे तो पर्यंत करुन घ्याव्यात. नाहीतर ... ... उगीच भांडने होतील हो. आणि आम्हाला ते नकोयत. तूम्ही राज च्या नावावर काय ती कुप्रसिध्दी करायची ती करा आम्ही काय डोळे मिटून दुध पित नाही आहोत. ( हे फक्त आपल्या सर्व ताटाखालच्या मांजराना होत, म्हणजे साहेबांना)

आता बघुया येत्या काही दिवसांत सर्व साहेब आणि राव ऐकत्र जमनार आहेत ते मराठी लोकांसाठी साठी काय करत आहेत, ते दिसेलच. ह्या ऐकाच उदा वरुन हे 'राज'कारण 'फोल' न्हवते हे दिसुन येईल.

तुमच्या लिखाणाचा अर्थ कळला नाही. ही काय थट्टा, उपहास, गंमत असे काही आहे का? एव्हढे का माझे लिहीणे हास्यास्पद होते?
--- थट्टा वा उपहास नाही (माझे धाडशी नाही तसे, काय बिशाद आहे?).... केदारने पुर्णतः उकल केली आहे.

Pages