नाळ

Submitted by मी मी on 16 July, 2013 - 02:25

आयुष्यावर कसलस मळभ दाटून आलेलं
काळोख, शांतता आणि आर्द्रतेच सावट
नकोसं नकोसं करून सोडणारं
प्रकाशाचा तिटकारा यावा… वारा हि नको व्हावा …

नाती गोती मित्र वृंद सगळेच झूट वाटू लागले
शब्द सूर ताल वृत्त सगळेच सुके थिटे ...वीटलेले

एके दिवशी सगळं सोडून, बंध तोडून
झटकून टाकले जिने-बीने
एकट्यात जाऊन बंद खोलीत डांबून घेतले
बंद केले येणे - जाणे

आता निव्वळ मी होते अन अंधार दाटलेला
माझ्याच काळजाचे ठोके होते स्पष्ट अस्पष्टसे
मुठी वळलेल्या, डोळे गच्च बंद, अंग आखडून,
दोन्ही पाय पोटाशी घेऊन पडून राहिले मग शांत-क्लांत

कुठल्याश्या एका क्षणी तंद्री लागली अन
लाले-लाल चमकता पाणीदार ओलसर पडदा
डोळ्यासमोर झिरमिरता...सळसळता

रिंगण रिंगण अन त्यातून आत खूप आत खेचत नेणारी ती लाट
मी हतबल, लाचार जात राहिले त्या पडद्या आड,
पाहत राहिले दूर दूर जाणारी वाट

पोचले आत …… आईच्या उदरात …. पुन्यांदा

इथे कोणीच नव्हतं … काहीच नव्हतं
लोभाची, आशेची सगळी दारं बंद पडलेली बाहेरून
न भौतिक सुखाची वखवख न प्रेम शोधायची वणवण
गरजेच्या पूर्ततेची काळजीच संपलेली आतून

तेवढाच एक लोभ अन तेवढीच एक भूक
फक्त एक नाळ दोन जीवाला जोडणारी
फक्त एक नाळ जीवाला जीव लावणारी …बस्स

एक नाळ , माया, ममता, प्रेम देणारी
तीच एक नाळ, भूक तहान सर्व शमणारी

शेवटी माणसांची सर्व धडपड असते कशासाठी
मुळापासून येउन परत मुळापर्यंत जाण्यासाठी …कदाचित

किंवा मग मुळातंच उगवून मुळातच विरून जाण्यासाठी ….

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thnx Happy

सुंदर!