भाग मिल्खा भाग

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

चित्रपट पाहिला नसेल तर हे वाचू नका, कारण हा चित्रपट आवर्जून बघा अशी विनंती आहे.

शाळेत असताना जनरल नॉलेजच्या स्पर्धांची वगैरे तयारी करताना एक हमखास विचारला जाणारा प्रश्न होता, "फ्लाईंग सीख असे कोणाला म्हणतात?" उत्तर पाठ करून ठेवलं होतं "मिल्खा सिंग, भारताचा धावपटू" पण हा मिल्खा सिंग कोण आणि काय आहे ते काल राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा भाग मिल्खा भाग हा चित्रपट बघून समजलं.

आपल्याकडे "भावना दुखावणे" हा एक प्रकार असतो, कुणीही कुठल्याची ऐतिहासिक व्यक्तीविषयी अथवा घटनांविषयी चित्रपट अथवा अन्य एखादी कलाकृती काढायची ठरवली की कुणाच्या ना कुणाच्या तरी भावना दुखावतात. मग त्या समाजाला खुश ठेवण्यासाठी कलाकृतीमधे तडजोड करावी लागते. दुसराप्रकार म्हणजे पूर्ण रीसर्च न करता आपल्या कविकल्पनेने ठोकून दिलेली ऐतिह्हासिक सत्ये. जिथे "दिग्दर्शकाचे स्वातंत्र्य" अशी सूट घेऊन वाट्टेल त्या पद्धतीने घटना दाखवल्या जातात. या दोन टोकाच्या मतभेदांमुळे आपल्याकडे इतिहासाशी प्रामाणिक राहणारे चित्रपट बनतच नाहीत. आणि बनले तरी ते पूर्ण प्रामाणिक असत नाहीत. त्यातही अवघड विषय म्हणजे बायोपिक. एखादी व्यक्ती अशी का घडली, कशामुळे घडली या कारणांचा मागोवा घेणारे चित्रपट फार थोडे. राकेश ओमप्रकाश मेहरांचा भाग मिल्खा भाग हा या अशा थोड्या चित्रपटांपैकी एक.

भाग मिल्खा भाग ही भारताचा अव्वल धावपटू मिल्खा सिंग याची कहाणी. पण मेहरा नुसती इथे घटनांची जंत्री मांडत नाहीत, तर हलकेच मिल्खा सिंग ही व्यक्तीरेखा उलगडत जातात. चित्रपटात "काय घडतं अथवा कसं घडतं" त्याला महत्त्व नाही, महत्त्व आहे ते घडल्यानंतर मिल्खा सिंग या व्यक्तीवर होणारे परिणाम, आणि त्या परिणामाच्या ठोक्यातून साकारणारी अजूनच ठाशीव होत जाणारा मिल्खा सिंग. आयुष्यात सतत चढ उतार पाहणार्‍या, स्वतःच्या चुकांमधून स्वतःच शिकत जाणारा, स्वतःवर प्रचंड विश्वास असणारा, दुर्दम्य आशावाद असलेला मिल्खा प्रत्यक्ष मनामधून मात्र फार दुबळा आहे. त्याचं शरीर जितकं कणखर आहे तितकंच त्याचं मन नाजूक आहे. आणि त्यचं कारण म्हणजे लहानपणी डोळ्यासमोर घडलेल्या घटना.

मिल्खाची ही कहाणी फक्त रेस आणि त्याच्या जिंकण्याहरण्याची कहाणी नाही. तर ती आहे, स्वत:शीच चाललेल्या स्वतःच्या झुंजीची. स्वतःच्याच शरीराला मिळालेल्या निसर्गदत्त देणगीतून स्वत:लाच अधिकाधिक पुश करण्याची(मराठी शब्द सुचवा). मेहनत, अधिक मेहनत आणि त्याहून अधिक मेहनत करून मिल्खा सिंग वेगात धावतो. साधने तुटपुंजी आहेत, जगातील सर्वोत्तम गोष्टी उपलब्ध नाहीत याचा तो विचारदेखील करत नाही. आहे त्यामधेच "आय अ‍ॅम द बेस्ट" हे लक्ष्य तो ठेवतो आणि तो धावतो.

रोम ऑलिम्पिक्सधे धावताना रेस ट्रॅकवर त्याला फाळणीच्या वेळी दिसणारी पळापळ दिसते. मिल्खा हरतो. चौथ्या नंबरवर येतो, भारताला कुठलेही पदक मिळत नाही. मिल्खा नुसता हरत नाही तर मनाने देखील खचतो. संपूर्ण देशामधे मिल्खाच्या हरण्याची चर्चा होते. देशाचे पंतप्रधान आपल्या शेजारच्या देशासोबत संबंध चांगले व्हावेत म्हणून एका स्पोर्ट्समीटचे आयोजन करतात. आणि भारताचा लीडर म्हणून मिल्खासिंगचे नाव घेतात, पण मिल्खा तिथे जायला उत्सुक नाही, जिथे आपल्या आईवडलांची प्रेतं सडली तिथेच परत जायचं?

इथून सुरू होते मिल्खाची कहाणी. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्याच्या वडलांनी मारलेली "भाग मिल्खा भाग, भाग यहांसे भाग मिल्खा भाग" ही आरोळी सत्यात उतरते. निर्वासितांच्या छावणीमधे हात मागून मागून मिळवलेले रोटीचे तुकडे मोडणारा मिल्खा, मोठ्या बहिणीच्या सावलीमधे थोडातरी सावरतो. पण आयुष्यापासून सतत धावत असलेला मिल्खा गुन्ड बनतो, मोठ्या बहिणीव्यतिरीक्त अजून कसलीही माया न मिळालेला अनाथ मिल्खा चक्कूछुरी चलानेवाला बनत जातो. पण या अंधारामधे कायमचा गुडुप होण्याआधी तो बिरोच्या प्रेमात पडतो. तिच्याशी लग्न करायला काहीतरी उत्पन्नाचं साधन हवं म्हणून आर्मीत येतो. इथे आर्मीमधला मिल्खा सिंग धावपटू बनतो. कशासाठी तर दूध आणि अंड्याच्या खुराकासाठी, धावत राहतो. आधी इंडियाचा कोट मिळवण्यासाठी, नंतर पदक मिळवण्यासाठी. भारतासाठी सीलेक्ट व्हावं म्हणून तो जखमी अवस्थेतदेखील जीवाची बाजी मारून पळतो आणि नॅशनल रेकॉर्ड तोडतो. जिच्यासाठी तो आर्मीत आला ती त्याला मिळत नाहीच, पण धावणं मात्र त्याच्या आयुष्यामधे कायमचं येऊन राहतं. तरूण मिल्खा मेलबर्न ऑलिम्पिक्समधे भाग घेण्यासाठी निवडला जातो. प्रत्यक्षामधे तिथे जाऊन एका मुलीकडे आकर्षित होतो, रेस हारतो आणि स्वतःच्याच नजरेतून उतरतो.

या क्षणापर्यंत मिल्खासिंगचा त्याच्या आयुष्यावर काहीही कंट्रोल नाही, इथून पुढे तो कंट्रोल स्वतःच्या हातात घेतो. आणि त्याचं आयुष्य त्याला हव्या त्या वेगामधे घालवतो. ४०० मीटर रेसचे वर्ल्ड रेकॉर्ड तोडतो, त्यासाठी मेहनत घेतो. कॉमनवेल्थ गेम्समधे पदकं जिंकतो. पण एवढं जिंकूनसुद्धा, इतकी मेहनत करूनसुद्धा मिल्खा आतून खळबळ घेऊनच जगतोय. त्याला पाकिस्तानात जावं लागतं. तिथे गेल्यावर मुद्दाम मिल्खा स्वतःच्या जन्मगावी जातो, तिथे जाऊन ज्या आठवणींपासून आयुष्यभर लांब पळतोय त्या आठवणींपासून मुक्त होतो, तिथे जाऊन आईच्या आठवणींनी तो मनसोक्त रडतो, त्याला हवं असणारं क्लोजर तिथे मिळतं. मिल्खा सिंग आता मनामधून देखील तितकाच शांत आहे. कारण, जिथे त्याच्या आईची नातेवाईकांची प्रेतं टाकली होती, ज्या प्रेतांच्या गराड्यामधे तो स्वतः अडकला होता, तिथे अजूनही चालू असलेल्या जीवनप्रवाहाची आताजाणीव आहे. मित्राचा फुललेला संसार बघून त्याला समाधान मिळतं. आणि मग त्या स्पोर्ट्समीटच्या रेसमधे मिल्खा बेभान धावतो. कुणाला हरवण्यासाठी नाही, तर स्वतःला जिंकण्यासाठी. पण यावेळेला नुसता धावपटू मिल्खा धावत नाही, तर तो छोटा मिल्खादेखील धावतो. इतके दिवस जीव वाचवण्यासाठी धावणारा छोटा मिल्खा आज पहिल्यांदा आनंदी होऊन धावतो. धावपटू मिल्खा त्याच्याकडे पाहून हसतो. छोटा मिल्खा मुक्तपणे हसतो. धावपटू मिल्खा ती रेस जिंकतो. नुसती ती रेसच नव्हे तर भारत पाकिस्तानमधल्या प्रत्येक माणसाचं हृदय तो जिंकतो. शिवाय स्वतःपासूनच इतके दिवस धावणारा मिल्खादेखील स्वतःशीच जिंकतो. जिथे त्याच्या आयुष्याचीच नासाडी झाली त्याच देशामधे धावपटू मिल्खा "फ्लाईंग सीख" ही उपाधी मिळवतो. आता छोटा मिल्खा धावत नाही, त्याच्या आयुष्यातलं जगण्यासाठीचं वणवण धावणं संपलंय. आता धावपटू मिल्खा भारताची शान होतो, त्याच्या विजयाच्या खुशीमधे पूर्ण भारताला सुट्टी दिली जाते. मिल्खाचं धावणं मात्र संपत नाही.

विषयाचा एवढा अतिप्रचंड कॅनव्हास असताना राकेश मेहरा नेमक्या घटना मांडत जातो. त्याचं डिटेलिंग अणि वातावरण निर्मिती अचूक आहे. छोट्या छोट्या प्रसंगातून राकेश मेहराने मिल्खासिंग उभ केला आहे. प्रसून जोशीने कथा पटकथा लिहिताना चित्रपट मिल्खाच्या वास्तव आयुष्याची सनावळ न मांडता घटनांचे मर्म जाणून घेत लिहिली आहे. सिनेमाची कथावस्तू पाहता सिनेमाचा पेस थोडा रेंगाळल्यासारखा घेतलाय तो पूर्णपणे योग्य वाटतो. काही गाणी मात्र असून नसून सारखीच आहेत, ती श्रवणीय आहेत, पण त्यांची कथेमधे खरंच गरज नव्हती. झिंदा, भाग मिल्खा भाग सारखी गाणी जिथे पटकथा पुढे सरकते, अशी गाणी जास्तीत जास्त असायला हवी होती.

सिनेमाचे छायाचित्रण अफलातून आहे, ट्रेन स्टेशनवर टीसीने टिकीट मागितल्यानंतरचे दृश्य तसेच रेसची सर्व दृश्ये उत्तमरीत्या चित्रीत झाली आहे. फाळणीच्या निर्वासित छावणीमधील दृश्ये, मिल्खाच्या लहान्पणाची दृश्ये परिणाम कारक रीत्या घेतली आहेत. संवादलेखन मात्र "इंग्रजीतून लिहून मग हिंदी ट्रान्स्लेट" केल्यासारखे वाटत होते मला. पंजाबी संवाद मात्र ठिकठाक आहेत. खटकेबाज संवाद नाहीत हे एका अर्थाने बरंच आहे. या चित्रपटात आवश्यकता पण नव्हती. सोनम कपूर आणि त्या ऑस्ट्रेलियन मुलीची वेशभूषा मात्र मला नव्वदच्या दशकांतली असल्यासारखी वाटली. चुभूदेघे.

राकेश मेहराने या सिनेमासाठी सर्वात उत्तम काय केले असेल तर फरहान अख्तरला मिल्खा सिंग म्हणून कास्ट करणे. फरहान अख्तर मिल्खा सिंगचा अभिनय करत नाही, तो मिल्खा सिंग बनून जगतो. चेहर्‍याने, डोळ्यांनी, शब्दांतून अभिनय करनारे बरेच आहेत, फरहान अख्तर हे सर्व तर करतोच, पण तो देहबोलीतून अभिनय करतो. बिरोच्या मागे लागलेला रोमँटिक मिल्खा आणि मेलबर्न ऑलिम्पिक्समधल्या वन नाईट स्टँडमधला मिल्खा ते पेरीझादला "ये मेरी खुदसे लडाई है" सांगणारा मिल्खा त्याने जिवंत केलाय. मेल्बोर्न ऑलिम्पिकमधे हरल्यावर स्वतःच्याच फटाफट कानाखाली मरून घेणारा फरहान अख्तर बीलीव्हेबल वाटतो. धावपटूची देहबोली, धावण्याआधी त्यने घेतलेला पवित्रा आणि रेस्ट्रॅकवर फिरणारी त्याची नजर. धावतानाचे ब्रीदिंङ टेक्निक त्याने सहजगत्या अवगत केलंय. हॅट्स ऑफ टू फरहान. मुळात मिल्खा सिंग ही व्यक्तीरेखा त्याने नुसती सिक्स पॅक अ‍ॅब्ज बनवून आणि बायसेप, ट्रायसेप्स फुलवून उभारलीच नाहीये. त्या व्यक्तीरेखेचा त्याने केलेला अभ्यास, त्यावर केलेले चिंतन आणि अशा व्यक्तीरेखा समजून घ्यायची त्याची वैचारिक कुवत या सर्वांच्या मिलाफातून मिल्खा सिंग आपल्यासमोर येतो.

फरहानइतकाच हा सिनेमा जबतेजसिंगच्या छोट्या खांद्यांनी पेलून धरलाय. छोट्या मिल्खाचा एकाकीपणा, त्याची निरागसता आणि नंतर आलेला वांडपणा त्याने उत्तमरीत्या साकारला आहे. छोटा मिल्खा घरी आल्यावर घसरून पडतो ते दृश्य तर अक्षरशः अंगावर काटा आणणारं आहे. फालणीच्या त्या दिवसांमधे अशा कित्येक मिल्खांची बालपणं अवेळीच करपली ते परमेश्वरालाच माहिती.

पवन मल्होत्रा आणि दिव्या दत्तासारखे कलाकार फार कमी सिनेमांमधून दिसतात. पवन मल्होत्रा तर एकाएका दृश्यामधे सुद्धा अख्खा सिनेमा खाऊन टाकू शकेल असा माणूस आहे. भाग मिल्खा भाग मधे त्याचे काम सुंदर झालेच आहे, शिवाय मिल्खा सिगचा कोच असलेला योगराज सिंगचे काम देखील ग्रेट. अभिनेता म्हणून याआधी कुठे बघितल्याचे आठवत नाही मला. पण सिनेमामध्ये कोच म्हणून त्याचे काम अस्सल वाटलंय. खास करून वर्ल्ड रेकोर्डसाठी मिल्खाला ट्रेन करताना. प्रकाश राज पण छोट्या भूमिकेत छान काम करतो. कास्टिंगम्धे सर्वात जास्त चुकलेले पात्र पंडित नेहरूंचे आहे. दलिप ताहिल नेहरूंसारखा दिसत नाही, त्याच्याकडे नेहरूंचा रूबाब, ग्रेस आणि स्टाईलदेखील नाही. संवादपण तो बातम्या दिल्यासारख्या एकाच सुरात म्हणतो, टोटल मिस्फिट.

सोनम कपूर थोडाच वेळ दिसते जितका वेळ दिसते तितकावेळ सुसह्य आहे. तिने या सिनेमासाठी अवघे अकरा रूपये चार्ज केले आहेत म्हणे. पैशापेक्षा उत्तम सिनेमा निवडण्याची बुद्धी तिला आहे असं समजायला हरकत नसावी. इतर नायिका कथा पुढे नेण्यास हातभार लावण्याइतक्याच आहेत. दिव्या दत्तासाठी हा रोल अगदी टेलरमेड असाच आहे, आणि तिने तो अगदी व्यवस्थितरीत्या निभावला आहे. मिल्खाच्या नायिकांपेक्षा जास्त काम तिच्या वाटयाला आले आहे. दिव्या दत्ता ही फार गुणी अभिनेत्री आहे तिला अशा स्पोर्टिंग रोल्समध्ये बघून कंटाळा आलाय. तिच्या पोटेन्शियलला वाव देणार्‍या अजून भूमिका तिला मिळायला हव्यात.

हा चित्रपट नुसती मिल्खाची जीवनकहानी नाही. त्यापलीकडे जाउन ही प्रत्येक जिद्दी खेळाडूची कहाणी आहे, प्रत्येक निर्वासिताची कहाणी आहे, स्वत:च्या क्षमतेवर विश्वास असणार्या प्रत्येक व्यक्तीची ही कहाणी आहे. चित्रपट पाहिल्यांम्तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवून गेली, आजवर आपल्याला अ‍ॅथलेटिक्समधे ऑलिम्पिक पदक मिळालेले नाही, ज्या दिवशी ते पदक भारताला मिळेल त्या दिवशी मिल्खा सिंग यांना खरी मानवंदना दिली जाईल.

विषय: 
प्रकार: 

नंदिनी, छान केलय रसग्रहण. चांगलं लिहिलयत. सिनेमा अजून पाहिला नाही, त्यामुळे त्याच्याविषयी काही लिहिता येणार नाही. पण तुमचं परि़क्षण / रसग्रहण / रिव्ह्यू छान आहे.

सर्व प्रतिसादकांचे आभार. Happy

इब्लिस, रसप यांचा रीव्ह्यू वाचलेला आहे. चित्रपट पाहण्याआधी तिथे प्रतिक्रियादेखील दिलेली आहे. चित्रपट पाहिल्यानंतरदेखील तिथेच प्रतिक्रिया दिलेली आहे. तरी धन्यवाद.

भारतीताई, तुमच्या प्रतिसादातलं शेवटचं वाक्य अगदी योग्य आहे. का कुणास ठाऊक. मला तो मुद्दा शब्दबद्ध करता आलाच नाही. खूप वेळ मनात घोळवत राहिले पण लिहिता आले नाही.

विजय देशमुख: राकेश मेहरा काय म्हणतील माहित नाही. मी मला चित्रपट कसा दिसला आणी कसा समजला ते लिहीण्याचे काम केले.

फारेन्डा, आपल्याकडे एका वेळच्या तिकीटात एकदाच चित्रपट बघायला सोडतात रे Proud

अजून एक प्रश्न: मिल्खा सिंगच्या धावण्याचे जे मोन्टाज घेतले आहे, त्यामधे एक ब्लॅक अँड व्हाईट नऊ चौकोनांमधला मोन्टाज आहे ते मिल्खा सिंगच्या धावण्याचे ओरिजिनल फूटेज आहे का? मला बघताना फरहान अख्तरचं धावणं आणि त्या फूटेजमधल्या व्यक्तीचं धावणं वेगळं वाटलंय म्हणून प्रश्न पडलाय.

ho

प्राची, धन्यवाद. ते फूटेज पाहिल्यावर मिखा सिंगला फ्लाईंग सिख का नाव मिळाले असेल ते लक्षात येतं. फूटेज माझ्या डोळ्यासमोरून हलत नाहिये अजून. Happy

नंदीनी ताई मस्त लिहिलत.....मी हा मुव्ही बघितला आणि २ रीव्ह्यु ची तुलना केली.....माझे झुकते माप तुमच्या रीव्ह्यु च्या पदरात....नथिंग पर्सनल..पण चांगल्याला चांगले म्हणावे..वाईटातले चांगले शोधावे....
आपल्याला एखादी गोष्ट आवडली नाही तर तिच्यावर इतका उहापोह का??
आणि जर १०० लोक एखाद्या गोष्टीला छान म्हणत आहेत तर एखाद्याने ते छान नाहीच्च असे म्हणणे म्हणजे त्या १०० लोकांचे लक्ष आपल्या कडे वेधुन घेण्याचा प्रकार......
असो ....नंदीनी ताई असचं मस्त मस्त लिहित जा.....:)

अप्रतिम सिनेमा..फरहान अख्तर शिवाय बाकी कोणी हे भूमिका इतकी चांगली करू शकल नसत अस वाटत. मिल्खा चे कोच योगराज सिंग हे आपल्या क्रिकेटर युवराज सिंग चे वडील आहेत. त्यांनी अनेक पंजाबी सिनेमे केलेत

जबराट मुव्ही......मलातर खुप खुप आवडला....जेव्हा आर्मी त सांगितलं जातं की रेस जो जिंकेल त्याला रोज दुध मिळेल तेव्हा परेड मधे उभं असताना मिल्खा च्या डोळ्यात जे भाव उमटतात ते फरहान ने जबर्दस्त पकडले आहेत....मुव्ही पाहिल्यापासुन फर्हान माझा फेव्रेट झाला आहे....तो लहान मिल्खा पण मस्त आहे.....आणि या दोन मुलींमुळेच तर त्याच्या आयुष्याला वळण मिळतं....त्यांची गरज तर होती च कथेत....बिरो मुळे तो बुरे काम सोडतो....आणि त्या फिरंग मुली मुळे त्याचा फोकस कमी होउन तो हरतो....त्या मुळे त्याला एक चपराक बसते की या गोष्टींमधे अडकल्याने मी हरलो....म्हणुन अधिक जोमाने मेहनत करुन तो अव्वल येतो....
थियेटर मधे लोकांनी स्टँडींग ओवेशन दिली.....:)

चित्रपट खूप आवडला. दिव्या दत्ता, पवन मल्होत्रा टू गुड. योगराज सिंगचा कोच पण छान.
लहानपणचा मिल्खा जास्त आवडला, फरहान पेक्षा.

फरहानचा मिल्खा, देहबोली खूप छान. हवन करेंगे च्या वेळी किंवा अजूनही १-२ वेळा म्युझिक सुरु झाल्यावर अस्सल पंजाब्यांसारखी खांद्याची, शरीराची होणारी बारीक थरथर आणि मग ते ठेका धरणं.... तो बोलत नसताना पंजाबी /सरदार वाटतो. चित्रपटात त्याला सलग मोठे संवाद नाहीयेत हे चांगलंय. कारण ज्या २-३ वेळा त्याला सलग २-३ वाक्यंचे संवाद आहेत, त्यावेली तो मिल्खा /एक सरदार न वाटता फरहान वाटतो. पवन मल्होत्रा, दिव्या दत्ता ज्या सहजतेने पंजाबी वाक्य /शब्द बोलतात...त्यांच्या हिंदीवर पण पंजाबीपणाची झाक दिसते ती फरहानवर दिसत नाही. १-२ वेळा तो दिव्या दत्ताला बहेणा /भेहेणा म्हणून संबोधतो, त्यावेळी तर एकदम खडा लागल्यासारखं वाटतं... पंजाबीत भेहेणा नाही म्हणत..प आणि भ च्या मधला उच्चार आहे भ चा त्या शब्दामध्ये.
शेवटी पण तो त्याच्या गावात गेलेला असताना मित्राच्या बायकोला भाभीजी म्हणतो, तिथे ही तसं...आणि मित्राच्या मुलाला, हां तेरा चाचु वही मिल्खा सिंग है जो भागता है हा डायलॉग म्हणतो, त्यावेळी तर तो मिल्खा न वाटता फरहानच वाटला मला.
हे २-४ प्रसंग सोडले तर फरहानचा मिल्खा सुपर्ब.....

चित्रपट संपल्यावर सगळेजण कितीतरी वेळ उभं राहून टाळ्या वाजवत होते....

आणि हो, आत्तापर्यंत बर्‍यच चित्रपटांमध्ये फाळणीची दृश्य बघितली आहेत. य चित्रपटामधल्या दृश्यांअध्ये तुलनेनी खूप कमी हिंसाचार दिसला तरी त्याचा इम्पॅक्ट जबरदस्त होता. फ्लॅशबॅकमध्ये दिसणारी आणि मिल्खा त्याच्या गावी पोचल्यावर त्याला आठवणारी फाळणीची दृश्य बघताना, पोराला चित्रपट बघायला अणायला नको होतं असं वाटलं.

ब्राहो! नंदीनी, मी कालच हा सिनेमा पाहिला. मधेमधे खूप रडू आले होते. तुझा लेख वाचून जे क्षण मला कळले नाही ते आता लक्षात आले. खूप तरल लिहिल आहे. डोळ्यात पाणी दाटून आल अगदी वाचता वाचता. कीप इट अप!

अप्रतिम सिनेमा...कालच पाहिला. नंदिनी तुझं परीक्षण खूप आवडलं. अगदी पहिल्याच सीनमध्ये फरहान अख्तर स्टेडियममध्ये मान उंचावून प्रेक्षकांकडे पाहतो तिथेच जिंकून जातो. फरहान अख्तर जस्ट आउटस्टॅडिंग!! त्याने जेव्हा जेव्हा रेस जिंकलेल्या दाखवल्यायत तेव्हा थिएअटरमध्ये फुल्ल ऑन टाळ्या, शिट्ट्या...आणि शेवटी तर स्टँडिंग ओवेशन!!

काल घराजवळच्या थेटरमधे पाहिला हा चित्रपट.
फारेंड,अन इतरांची परिक्षणे वाचून आजकाल सिनेमे पाहताना बर्‍याच गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिलं जातंय.
तर माझ्या लक्षात आलेल्या काही गोष्टी

सेक्रेटरी कॅरॅक्टर खरोखर सेक्रेटरी असावा असं वाटतं, कपडे, केस रचना, मॅनरिझम, हाउ ही कॅरीज हिमसेल्फ इत्यादी.
इंडियाटीमचा ब्लेझरवाला खेळाडू, त्याचा अ‍ॅटिट्युड, काँफिडंस मस्त दिसतोय त्याच्या बॉडी लॅंग्वेज मधून
जपान मधल्या गेम्स च्या वेळेस सारे जहांसे अच्छा ची ट्यून का वाजवली आहे ?
खालिक च्या क्लोझ अप्स मधे त्याचे कान टोचलेले दिसतात . ते मेकप ने लपवता आले नसते का ?
काही काही पात्रांनी आजकाल मिळणारे गॅप, जे क्रू , ओल्ड नेव्ही टाइप टीशर्ट्स घातले आहेत. १९६० साली तसले टीशर्ट होते का ?

मिल्खा आपल्या बहिणीला कानातले आणून देतो तेंव्हा ती ( बहुतेक मागल्या दारी) भांडी धूत असते. तिथे घराच्या बाहेर आरसा लावायची पद्धत होती का? आरश्याच्या बाजूला एक गंगावन -टाइप गोंडेदार एक्स्टेंशन असं लटकलेलं आहे. तेही असं बाहेर लटकवलेलं असायचं का ?

ऑस्ट्रेलियन मुलीची वेशभूषा मात्र मला नव्वदच्या दशकांतली असल्यासारखी वाटली >> मला तरी तिची, त्या बारमधील इतरांची वेषभूषा इथल्या साठीच्या दशकातली वाटली. त्या बारचं ईंटेरियर, म्युझिक वगैरे पण तसलंच आहे .

पण शोनू, सिनेमा कसा वाटला? जे 'पोचवायचं' आहे दिग्दर्शकाला ते पोचतंय का?

नंदिनी, रीव्ह्यू आवडला. सिनेमा as soon as possible बघणार. फरहान अख्तर आवडतोच. Happy

खालिक च्या क्लोझ अप्स मधे त्याचे कान टोचलेले दिसतात . ते मेकप ने लपवता आले नसते का ?>>> हो हो. आम्हांलाही खटकले ते.

सिनेमा फारफार आवडला आम्हाला. गाण्यांचे शब्द भारी आहेत. पंजाबी उच्चार, लहजा मस्त जमले आहेत.
( दिल्लीत लहानाचे मोठे झालेले पण मूळचे गुजराती / यू पी चे मित्र मैत्रिणी बोलतात तसलं हायब्रिड पंजाबी नाही वाटत ) .
पण फार लांबवला आहे . बर्‍याच सीनमधलं स्लो मो कापता आलं असतं. बिरो प्रकरण पण थोडक्यात आवरता आलं असतं .

नेहरुंचा आवाज, अन बोलण्याची स्टाइल दोन्ही जमलेलं दिसत नाही. कपडे मात्र बरे जमलेत.

अवांतर - रोशन सेठ यांनी गांधी मधल्या रोलसाठी इंदिरा गांधीच्या भेटी गाठी घेउन कपड्यांचं स्टाइलिंग अन चालण्याची/ वागण्याची ढब विचारुन / शिकून घेतली होती म्हणे .

फरहान मस्त रिप्प्ड दिसतो. तेव्हढ्याकरता सुद्धा पैसे वसूल.
लहान्या मिल्खाचं काम मस्त म्हणजे फारच मस्त झालंय. सर्व सिनेमाभर इतर लहान मुलांच सुद्धा काम फार छान आहे. वावर, वेषभूषा अगदी सहज आहे.
जुगल हंसराज, किंवा अलंकार जोशी सारखी गोडमिट्ट नाहीत.

धन्यवाद. Happy

>> रोशन सेठ यांनी गांधी मधल्या रोलसाठी इंदिरा गांधीच्या भेटी गाठी घेउन
आता दलीप ताहिल काय सोनियाजींना भेटणार?! Proud

नंदिनीच्या रिव्ह्युशी अगदी १०१% सहमत , अगदी सेम गोष्टी आवडल्या आणि सेम गोष्टी खटकल्या !
मिल्खाच्या आयुष्यातली फाळणीची घटना, नंतर पाकिस्तानात गेल्यावर त्याच्या भावनांचा ज्वालामुखी फुटणे आणि एक क्लोजर मिळणे हा कथेचा मुख्य दुवा फार छान घेतलाय राकेश मेहरांनी!
फरहान अख्तरचा बेस्ट रोल सो फार , प्रचंड मेहनत घेतलीये फक्त बॉडी बिल्डिंग नाही तर स्पोर्ट्स ट्रेनिंग वर मेहनत घेतल्याचे जाणवते , उत्तम साकारलाय मिल्खा ( पण अल्पनाने लिहिलय त्यालाही अनुमोदन , काही पंजाबी उच्चार ' ऑथेंटीक सरदार अ‍ॅक्सेंट' मधे नाही आले.)
दिव्या दत्ता, पवन मल्होत्रा आणि बाल कलाकार मिल्खा उच्च..
एक गोष्टं खटकली , फाळणीच्या वेळी मिल्खा १३-१४ वर्षाचा दाखवलाय , मग नंतर १९५६ च्या आसपास जो मिल्खा आहे तो डायरेक्ट फरहान अख्तर , जो अर्ली ट्वेंटीज मधला अजिबात नाही दिसत , फरहान फिट दिसतो - मिल्खा म्हणून शोभतो पण वयाने अर्ली थर्टीज मधला दिसतो .. इथे जरा गडबड झाली असं वाटलं मला !
सोनम कपुर फिफ्टिज काळातली नाही वाटत.. ब्राउन हेअर कलर , फाइनली ग्रुम्ड आयब्रोज वगैरे टाळल्या असत्या तर बरं झालं असतं !
पण सोनम नी चांगला केलाय छोटासा रोल, मला आवडते ..
दिव्या दत्ताने त्या मानाने अपिअरन्स बर्या पैकी ऑथेंटीक ठेवलाय .. कॉन्झर्वेटीव सरदार कुटुंबातल्या बायका गुरुद्वारा मधे कधी कधी अजुनही बघायला मिळतात ( आयब्रोज न करणार्या,पूर्ण चेहर्यावरची लव तशीच ठेवणार्या), दिव्या दत्ताचा चेहरा बर्यापैकी तसाच वाटला.
गाणी मस्तं आहेत पण गरज नवह्ती अजिबात , सिनेमाची लांबी फार वाढलीये त्यामुळे आणि कथेची कंटीन्युइटी तुटते!
एडीटींग ला थोडा स्कोप होता नक्की पण एकदा जरुर पहा ( लहान पोरां सोबत पहाणे आय डोन्ट नो .. मी नाही रेकमेन्ड करणार).

तो पाकी अ‍ॅथलेट जावेद , त्याचा चेहरा दबंगच्या मिशीवाल्या सलमान खान सारखाय एकदम , गरीनांचा दबंग :).
दिलिप ताहिल नेहरुंच्या रोल मधे सर्वात हस्यास्पद निवड आहे Proud

दिलिप ताहिल नेहरुंच्या रोल मधे सर्वात हस्यास्पद निवड आहे>>> माझा पोरगा पण म्हणाला, नेहरुजी, नेहरूजींजैसे क्यों नही दिख रहे? Proud

लहान मुलांना नाहीच नेण्यासारखा. मी जायच्या आधी चौकशी केली तर मला इथल्या (दिल्लीतल्या, माबोवरच्या नाही) काहीजणांनी हरकत नाही म्हणून सांगितलं. उलट अगदी आवर्जून घेवून जा म्हणून पण सांगितलं. पण लहान मुलांना दाखवू नये.

आजवर आपल्याला अ‍ॅथलेटिक्समधे ऑलिम्पिक पदक मिळालेले नाही, ज्या दिवशी ते पदक भारताला मिळेल त्या दिवशी मिल्खा सिंग यांना खरी मानवंदना दिली जाईल. >>> +१०००० अगदी ! सिनेमा संपल्यावर मिल्खाला का नाही मिळाले ऑलिम्पिक पदक ही रुखरुख वाटतेच.. परिक्षण एकदम मस्त ! या सिनेमात मिल्खा मिल्खा आणि मिल्खाच ! बाकी त्रुटी असतील पण संपुर्ण लक्ष या मिल्खाकडेच जाते इतका अप्रतिम साकारलाय त्या छोटूने नि फरहानने !
मस्त परिक्षण मस्त चित्रपट !
बाकी मला मिल्खाची ट्रेनिंग बघताना उगीच हॉलिवुडचा 'रॉकी' आठवला ! आणि त्या सिल्वर इतकाच इथला फरहान पण भावला ! अगदी उद्या उठून व्यायाम सुरु करावेसे वाटते..

नंदिनी... जीवंत परीक्षण!!! अक्षरशः!!

चित्रपट पाहीला आणि जे तू लिहीले आहेस शब्द नी शब्द तंतोतंत अनुभवलाय.... "पर्फेक्ट!!" एवढंच बोलू शकते तुझ्या परीक्षणाबद्दल आणि शतशः धन्स रसप च्या परीक्षणातील तुझ्या प्रतिसादाला त्यावर मी हा चित्रपट ठरवून बघायला गेले...

कालच पाहिला एका चॅनलवर.सर्व मुद्द्यांशी एकदम सहमत. फरहान अख्तर आवडत्या अभिनेत्यांच्या (हिरोंच्या नव्हे) यादीत टाकलाय. बॉलीवुडला खूप चांगला अभिनेता मिळालाय, असे वाटते. यापुढेही अशा भूमिका त्याच्या वाट्याला येवोत.

Pages