अन्... तुझा जन्म झाला!

Submitted by मुग्धमानसी on 11 July, 2013 - 04:01

एकदा रातीला
चांदणे पेरताना
गार झुळूकीनी चंद्रास धक्का दिला
पात्र हेलावूनी
सांडले चांदण्याचे
झेलले मी इथे अन्... तुझा जन्म झाला!

तिथे दूर मेघांत
काही पर्‍या
हरवल्या वेचताना दंवाच्या लडी
मला भेटल्या अन्
दिले भेट मोती
मी स्वीकारले अन्... तुझा जन्म झाला!

एकदा पावसाने
बरसता बरसता
आणिले वाहूनी स्वर्गीचे अमृत
थेंब तो एक छोटा
मला गवसला
ओंजळी लपवला अन्... तुझा जन्म झाला!

एकटी एकदा मी
मला शोधताना
उमगले असे काही आनंददायी
वेड लागून गेले
ते अंकूर ओले
जन्मले मी पुन्हा अन्... तुझा जन्म झाला!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आह...!!! खुपच सुंदर.. परीराणीस शुभेच्छा Happy

हरवल्या वेचताना दंवाच्या लडी >>>> टायपो आहे का ?

Happy Happy

आबासाहेब>>> 'दंव' असंच लिहितात ना? पहाटे पानांवर पडणारं 'दंव'. 'द'चा उच्चार किंचित नाकातून होतो म्हणून त्यावर अनुस्वार देतात (माझ्या मते).

सखी>>> हे तुझ्याही परिराणीसाठी! Happy