मासे (४३) - खेंगट

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 28 June, 2013 - 03:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

खेंगट १ ते २ वाटे
लसुण एक गड्डा ठेचुन
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
२ चमचे मसाला किंवा पाउण चमचा मिरची पुड
पाव वाटी तेल
पाउण वाटी चिंचेचा कोळ
मिठ गरजे नुसार
२ हिरव्या मिरच्या मोडून
थोडी कोथिंबीर चिरुन

क्रमवार पाककृती: 

खेंगट म्हणजे मांदेली, बोंबील आणि कोलंबी ह्याचे मिक्स. मासे पकडणार्‍यांच्या जाळ्यात हे मासे एकत्र येतात ते न निवडता म्हणजे वेगवेगळे न करता पुर्वी वाटे करायचे त्याला खेंगट म्हणतात. ह्यात इतर मासे जसे कालेट, ढोमा, बांगडा, खेकडे असे छोटे मासे पण येतात पण ते काढून टाकायचे. पुर्वी स्वस्त व मस्त अगदी गरिबांनाही परवडेबल अस हे खेंगट असायच. पावसाळ्यात हे खेंगट भरपुर येत. पण हल्ली खुप कमी असे खेंगटाचे वाटे येतात. कारण हल्ली मासे निवडून वेगवेगळे मासे विकायला येतात. त्यामुळे कधी कधी खेंगट करायचे म्हटले तर तिघांचे वेगवेगळे वाटे घ्यावे लागतात. क्वचीतच खेंगट मिळतो. मला ह्या पावसाळ्यात हा प्युअर खेंगट मिळाला. Lol

खेंगटातील बोंबील, मांदेली आणी कोलंबी साफ करुन घ्या. इतर मासे असतील तर काढून टाका.

खेंगट करण्याचे दोन प्रकार आहेत एकात माश्यावर वरील साहित्यातील सगळे जिन्नस अगदी तेलासकट मिक्स करायचे. उकळी आल्यावर ५ मिनीटे मिडीयम गॅसवर शिजवायचे. झाले खेंगटचे कालवण तैयार.

दुसरी पद्धत.
भांड्यात तेल चांगले गरम करायचे. त्यावर लसूण पाकळ्यांची फोडणी द्यायची. त्यावर हिंग, हळद, मसाला घालून लगेच खेंगट घालून त्यावर चिंचेचा कोळ घालायचा. मिठ घालायचे. मग उकळी आली की त्यावर मोडलेल्या मिरच्या आणि कोथिंबीर घालून ३-४ मिनीटांत गॅस बंद करायचा.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा: 

अप्रतिम चव असते खेंगटाची. अगदी रोज खाल्ला तरी कंटाळा येत नाही.

ह्यात जास्त पाणी घालायचे नाही कारण बोंबील आणि कोलंबीला पाणी सुटते. शिवाय चिंचेच्या दाट कोळातच ह्याची मजा असते.

खेंगट शेजवताना गॅस नेहमी मिडीयम ठेवायचा. नाहीतर बोंबील गळून पडतात. मांदेलीचे तुकडे होतात.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages