मासे (४३) - खेंगट

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 28 June, 2013 - 03:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

खेंगट १ ते २ वाटे
लसुण एक गड्डा ठेचुन
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
२ चमचे मसाला किंवा पाउण चमचा मिरची पुड
पाव वाटी तेल
पाउण वाटी चिंचेचा कोळ
मिठ गरजे नुसार
२ हिरव्या मिरच्या मोडून
थोडी कोथिंबीर चिरुन

क्रमवार पाककृती: 

खेंगट म्हणजे मांदेली, बोंबील आणि कोलंबी ह्याचे मिक्स. मासे पकडणार्‍यांच्या जाळ्यात हे मासे एकत्र येतात ते न निवडता म्हणजे वेगवेगळे न करता पुर्वी वाटे करायचे त्याला खेंगट म्हणतात. ह्यात इतर मासे जसे कालेट, ढोमा, बांगडा, खेकडे असे छोटे मासे पण येतात पण ते काढून टाकायचे. पुर्वी स्वस्त व मस्त अगदी गरिबांनाही परवडेबल अस हे खेंगट असायच. पावसाळ्यात हे खेंगट भरपुर येत. पण हल्ली खुप कमी असे खेंगटाचे वाटे येतात. कारण हल्ली मासे निवडून वेगवेगळे मासे विकायला येतात. त्यामुळे कधी कधी खेंगट करायचे म्हटले तर तिघांचे वेगवेगळे वाटे घ्यावे लागतात. क्वचीतच खेंगट मिळतो. मला ह्या पावसाळ्यात हा प्युअर खेंगट मिळाला. Lol

खेंगटातील बोंबील, मांदेली आणी कोलंबी साफ करुन घ्या. इतर मासे असतील तर काढून टाका.

खेंगट करण्याचे दोन प्रकार आहेत एकात माश्यावर वरील साहित्यातील सगळे जिन्नस अगदी तेलासकट मिक्स करायचे. उकळी आल्यावर ५ मिनीटे मिडीयम गॅसवर शिजवायचे. झाले खेंगटचे कालवण तैयार.

दुसरी पद्धत.
भांड्यात तेल चांगले गरम करायचे. त्यावर लसूण पाकळ्यांची फोडणी द्यायची. त्यावर हिंग, हळद, मसाला घालून लगेच खेंगट घालून त्यावर चिंचेचा कोळ घालायचा. मिठ घालायचे. मग उकळी आली की त्यावर मोडलेल्या मिरच्या आणि कोथिंबीर घालून ३-४ मिनीटांत गॅस बंद करायचा.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा: 

अप्रतिम चव असते खेंगटाची. अगदी रोज खाल्ला तरी कंटाळा येत नाही.

ह्यात जास्त पाणी घालायचे नाही कारण बोंबील आणि कोलंबीला पाणी सुटते. शिवाय चिंचेच्या दाट कोळातच ह्याची मजा असते.

खेंगट शेजवताना गॅस नेहमी मिडीयम ठेवायचा. नाहीतर बोंबील गळून पडतात. मांदेलीचे तुकडे होतात.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! स्लर्प !!!!!!!!!!!!

संक्रांतीला ज्या मिक्स भाज्या करतात त्याला माझ्या माहेरी खेंगट (किंवा शेंगसोलाणा) म्हणतात.
जागुचं खेंगट मिक्स माश्यांचं आहे. Happy

जबरदस्त!
हे मला माहितीही नव्हते.

मी तर एका प्रकारच्या माशासोबत दुसर्‍या प्रकारचे मासे तळतही नाही.

छान दिसतंय.

गोव्यात पण असे मिश्र मासे असतात, त्याला एक खास शब्द आहे तिकडे.
पण असा वाटा घेणे का कुणास ठाऊक, तिथे कमीपणाचे मानतात. चवीला चांगले लागत असले तरी तो वाटा, आजूबाजूला कुणी ओळखीचे नाही, असे बघूनच घेतात.

जागू... आठवणी जागवल्यास गं...
अलिबाग, पेण, श्रीवर्धन साईडला पावसाळ्यात असे मासे सर्रास मिळतात... मग बाहेर पाऊस झिमझिमतोय...नी अशा माश्यांचं घट्ट्सर लालभडक कालवण नी हातसडीच्या तांदळाचा तुपाची घार धरलेला वाफाळता भात यांचे गरमागरम गोळे गप्पागप गिळणं... पोटाला तडस लागेपर्यंत... आणि आहा... तृप्त होऊन ढेकर देणं... निव्वळ स्वर्गसुख!!!

खेंगट मध्ये कधी कधी छोटे छोटे बांगडे, छोट्याशा चिंबोर्‍या, छोट्या कोलंब्या नी झिंगे ही असतात... प्रत्येकाची चव एकमेकांच्यात अशी बेमालूम मिक्स होते की पहील्याच घासाला जीभेच्या सगळ्या रसनाकलिका खवळून जाग्या झाल्याच पाहीजेत...

जागू
तुमचे लिखाण खूप सहज सुंदर असते.खोबर्‍याशिवाय ग्रेव्ही कशी होते ते एक कोडे आहे.BTW खूप छान दिसतय.

साती
मी तर एका प्रकारच्या माशासोबत दुसर्‍या प्रकारचे मासे तळतही नाही.>>>> बरोब्बर! एकत्र तळले की वेगळा वास येतो हे खरे. पण बहुदा आमटीत तसे होत नसावे.

दिनेशदा
बहुदा पंचखाद (पंचखाध) म्हणतात.

संक्रांतीला ज्या मिक्स भाज्या करतात त्याला माझ्या माहेरी खेंगट म्हणतात.
जागुचं खेंगट मिक्स माश्यांचं आहे. >>>अगदी अगदी. माझ्या माहेरी सुद्धा खेंगट म्हणतात.

मला हे वाचुन द मा मिरासदारांचा नाना चेंगट आठवला.:फिदी:

पहिल्यांदा घाईत वाचले चेंगट म्हणून, नंतर लक्षात आले की ते खेंगट आहे.:स्मित:

जागु त्या ओल्या बोंबलांचा वास येत नाही का ग? माझ्या २ मैत्रिणी घरी कायम सुके बोंबील आणायच्या. त्या वासाने मी लांबुनच त्यांना हाका मारुन बाहेर बोलावुन घ्यायची.:फिदी:

मी शाकाहारी असल्याने त्या मला जेवणाचा कायम आग्रह करायच्या आणी बाकी मत्स्याहारींना मग राग यायचा की त्यांना बोलवत नाही म्हणून्.:डोमा:

जागु ताई ..................मस्त मस्त मस्त मस्त..........वॉव मला हे प्रचंड आवडतं............प्रचंड् म्हणजे प्रचंड.................
पण असा वाटा घेणे का कुणास ठाऊक, तिथे कमीपणाचे मानतात. >>>> दिनेशदा हे मी पण ऐकलेय......माझ्या जनरेशन ला असच वाटते......पण मी तर खेंगट महिन्यातुन एकदा खाल्ल्या शिवाय जगु शकत नाही.......

दक्षिणा>>> अगं हे दिसायला छान नसलं तरी चविला अ प्र ति म लागते,......

जागु ताई तु ह्या रेसिप्या लिहिताना एक फडका अटॅच करुन पाठवत जा.....आम्हाला बरं पडेल....( गळणारी लाळ पुसायला) Wink

आमच्याकडे बोंबिल व मांदेली यांचं स्वतंत्रपणे असं 'आंबट-तिखट' करतों [ मालवणी असूनही खोबरं न वापरतां !]. याच्याबरोबर भाकरी हें आवडतं काँबिनेशन. आतां असं करूनही पहाणं आलंच !

<< कारण हल्ली मासे निवडून वेगवेगळे मासे विकायला येतात. >> खरंय. पूर्वीं असे ताजे 'मिक्स वाटे' मिळायचे व दर्दी मच्छीखाऊ त्यावर तुटून पडत. शिवाय, माशांचं काँबिनेशनही खूप महत्वाचं असावं. हल्लीं छान, ताजीं व स्वच्छ 'मोदकं' मिळतात पण वरच्या त्रिकुटात त्यांचं बसणं व पटणं कठीणच; मोदकांचं स्वतंत्र कालवण [आमटी] किंवा तळणंच उत्तम !

अरेच्चा, सुरवातीलाच 'जागूजी, सलाम' म्हणायचं राहिलंच !

कालवण नको असेल तर फक्त तेलात मिर्ची लसुण ची फोडणी करायची आणि खेंगट टाकुन वर अगदी छोटं चिंचेचं बुटुक ( ३-४ बुटु़कं...कोळ नाही) टाकुन वाफवायचं......ते पण मस्त होतं...मला तर कालवण , तेलावरचं सुकं किंवा तळलेलं खेंगट कसही प्रिय आहे.......

नुतन, सारीका, मामी, डिडी, पराग, साती, सामी, प्रिती, डॉ., सृष्टी, दिनेशदा, अविगा, ड्रिमगल, येळेकर, जाई, अनिलभाई, सोनाली, मानुषी
दक्षिणा हे खेंगट त्या तळलेल्या तुकड्यांच्या चविलाही मागे टाकत. त्यामुळे एकदा नक्की टेस्ट कर. Happy
टुनटुन Lol
अनिष्का हम एकही बिरादरीवाले है Happy

भाऊ सलाम कसला तुमच्यासारख्यांचे आशिर्वाद नेहमीच पाठिशी असो. Happy

मी वरती लिहीले आहे ना की गरीबांसाथी हे खेंगट परवडेबल आहे म्हणूनच मध्यमवर्गियांना खेंगट घेणे कमीपणाचे वाटत असणार.

खरे तर चवीचे खाणार्‍याला केप्र देणार, तसे चवीचेच खाणार्‍यांना जागू खिलवणार किंवा पाककृती देणार असे मानायला हरकत नाही.:फिदी:

ज्यांचे माशाशिवाय पान हलत नाही, त्यांना या खेंगट खाण्यात कसलाच कमीपणा वाटत नसेल असे मला वाटते.:स्मित: परदेशात पण सुपर मार्केट्मध्ये कोळंबी, स्क्वीड यांचे छोटे तुकडे एकत्र छोट्या pack मध्ये मिळतात की. अर्थात काही महाभाग असतीलच म्हणा, नाके मुरडणारे.( म्हणजे खाईन तर तुपाशी जमात)

असो, जागु तुझ्या कडे मालवणी पद्धतीच्या रेसेपी किंवा टिप्स असतील तर त्या पण लिही की वेळ झाल्यावर. तुझे छोटे पिल्लु कसे आहे आता? मासा मागते की नाही खायला ? Happy

टुनटुन छोट्या पिल्लाला अजुन मासे द्यायला सुरुवात नाही केली. पण ताटात पाहिले की ताटावर उडी मारते. Lol

कोकणी पदार्थांना काही दिवसांनी सुरुवात करेन.

आमच्याकडे बोंबिल व मांदेली यांचं स्वतंत्रपणे असं 'आंबट-तिखट' करतोंआमच्याकडे बोंबिल व मांदेली यांचं स्वतंत्रपणे असं 'आंबट-तिखट' करतों [ मालवणी असूनही खोबरं न वापरतां !].>>>>>>>>>>> लवकर सांगा!

जागू ......विरहवेदना जागवल्यास ग बाई.
भाऊंची (तळलेली) मोदकंही अप्रतिम असतात,शुभ्र,कुरकुरीत्,स्वादिष्ट. शाकाहारी मोदकवाले क्षमस्व, या मोदकांपुढे सगळं विसरायला होतं.

Pages