माणुसकी विसरलेली देवभूमी

Submitted by धडाकेबाज on 25 June, 2013 - 04:32

उत्तराखंड भारताची देवभूमी. पण ह्या देवभूमीतील लोकांचे खरे स्वरूप उत्तराखंड पुराच्यावेळी उघड झाले देवभुमीत राहूनही माणूस मनाने कसा क्रूर असू शकतो याचे उदाहरण म्हणजे उत्तराखंड. अर्थात यात सर्व स्थानिकांचा समावेश नाही अनेक लोक पूरग्रस्त भाविकांना मदत करत आहेत तर दुसरीकडे स्थानिकाकडून त्यांची लुट हि चाललेली आहे.

एका पराठ्याची किंमत २५० रुपये पाण्याची बाटली २०० रुपये, चिप्स १०० रुपये, टैक्सीचे भाडे जेथे पूर्वी जायला १००० रुपये घेत तेथे आता ४००० रुपये. लोकहो हा महागाईचा दर नाही आहे हा आहे देवभूमीतील लोकांनी भाविकांवर लावलेला आपत्ती कर..

केदारनाथ मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारला असून काही चोरट्यांनी तर चक्क मृतदेहावरील दागिने आणि पैसे ओरबाडून नेल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे .प्रत्यक्ष देवभूमीतली हि उदाहरणे पाहून मन सुन्न होते.आपत्तीत अडकलेल्यांना मदतीचा हात देणे सोडाच सध्या भाजी पोळीच्या जेवणासाठी हजार रुपये द्यावे लागले ज्यांच्याकडे पैसे होते त्यांचे ठीक पण ज्यांच्याजवळ पैसे नव्हते त्यातील अनेक जन भुकेने मरण पावले.

उत्तराखंडची यात्रा यापुढे आयुष्यात करणार नाही असे अनेकजणांनी टीवीवर सांगितले. कारण आता तिथली माणुसकी हरवली आहे नि पैसा मुख्य झाला आहे.

लोकसत्ता वृत्तपत्रात आलेल्या एका बातमीने तर मन सुन्नच झाले ती बातमी
1)सर्वात भयानक अनुभव रिसोडच्या तोष्णीवाल कुटुंबाला आला. रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पुरुषोत्तम तोष्णीवाल, त्यांची पत्नी सुरेखा आणि मुलगा प्रद्युम्न तसेच काही नातेवाईकांसह एकूण १७ जण चारधामच्या यात्रेवर रवाना झाले होते. त्यांच्या १५ वर्षीय निरागस मुलाचा दरडीत अडकल्याने भुकेने तडफडून मृत्यू झाला. मुलाच्या आठवणीत तोष्णीवाल कुटुंबाचे अश्रू अजूनही थांबलेले नाहीत. रामबाडा जवळील दरडीत १६ जूनपासून अडकल्याने भुकेने व्याकुळ झालेल्या प्रद्युम्नला वाचविण्यासाठी तब्बल १ लाख रुपये त्यांनी एका व्यक्तीला दिले. मुलाला वाचविणे तर सोडाच ती व्यक्ती पैसे घेऊन फरार झाली. मुलाच्या डोळ्यादेखत झालेल्या मृत्यूने आईवडिलांच्या संवेदना बधीर कोसळले.
2) गौरीकुंड ते ऋषिकेश असे परत जाण्यासाठी ड्रायव्हरने चक्क ५० हजार रुपयांची मागणी केली.

उत्तराखंडमध्ये हि जी आपत्ती आली आहे ती जणू इथल्या स्थानिकासाठी सुवर्णसंधीच ठरली आहे. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे हे लोक पहिले कि मानवतेवरचा विश्वास उडून जातो.

काय दोष होता ह्या लोकांचा देवाच्या दर्शनासाठी गेले नि जीव गमावून बसले. जे वाचले त्यांनी भोगल्या फक्त यातना नि घेतले माणुसकी विरहीत देवभूमीचे दर्शन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवभूमीच कशाला, ही गोष्ट भारतातल्या कुठल्याही शहरात घडली असती तरी लोकं (अर्थात काही) असेच वागले असते.

माणूसकी वगैरे मध्ये आपण भारतीय फार पाठीमागे आहोत. त्यामुळेच आपल्याकडे नैसर्गिक आपत्तींचे DR वगैरे पेपरवर असते. शिवाय प्रत्यक्षात घटना घडून गेल्यानंतर जो पैसा सरकारी संस्थांना मिळतो त्यापैकी ७० टक्के (किंवा अधिकच) पैसा भ्रष्टाचारात संपतो.कारण इथे माणसाला ( त्याच्या जिवीत हाणीला) असणारे मुल्य खूपच कमी आहे.

>>>> उत्तराखंडमध्ये हि जी आपत्ती आली आहे ती जणू इथल्या स्थानिकासाठी सुवर्णसंधीच ठरली आहे. <<<<< त्याशिवाय हजारोपटीन्नी जास्त प्रमाणात ती राजकीय नेत्यान्ना सुवर्णसंधी ठरली आहे.... संकटकालिन खर्चाचे काही शे कोटीन्चे प्याकेज्/जागतिक मदत मिळवून ती "जिरवण्याचे"!

देवभूमीच कशाला, ही गोष्ट भारतातल्या कुठल्याही शहरात घडली असती तरी लोकं (अर्थात काही) असेच वागले असते.

>> +१०००० .

प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे हे लोक पहिले कि मानवतेवरचा विश्वास उडून जातो.
<<
<<
चालायचेच.........

हे सगळ ठीक है,
पण सोनिया व राहुल गांधीनी झेंडा दाखवुन रवाना केलेली "रसद" या संकटग्रस्तांपर्यंत पोहचली का? काही माहीती.

त्याशिवाय हजारोपटीन्नी जास्त प्रमाणात ती राजकीय नेत्यान्ना सुवर्णसंधी ठरली आहे.>>> अगदी अगदी, त्यामुळेच हजारो लोकांना वाचवल्याचे 'रँबो' टाईप दावे कोणीतरी करते आहे.

सर्वत्र 'स्थानिक' हा जो शब्द वापरला जात आहे, तो चूक आहे.
गढवालची लोकसंख्या इतकी कधीच नव्हती. रस्ते, पूल झाल्यामुळे, गुलशनकुमारनं दणादण व्हिडिओ काढून यात्रा प्रायोजित केल्यानं गर्दी वाढू लागली. बद्रीनाथच्या परिसरात दुकानांच्या रांगा गुलशनकुमारनं बांधल्या. हळूहळू बाहेरचे लोक इथे स्थिरावू लागले. गढवालमध्ये यात्रांच्या वेळी व्यवसाय करणार्‍यांपैकी निदान ९०% तरी बाहेरचे असतील.

देवभूमीच कशाला, ही गोष्ट भारतातल्या कुठल्याही शहरात घडली असती तरी लोकं (अर्थात काही) असेच वागले असते.

>> +१. सर्वत्र सगळ्याच पद्धतीचे नमुने भेटतातच. कधी हातातली भाकरीचा तुकडा मोडून समोरच्याला भरवणारा तर कधी टाळूवरचं लोणी खाणारा. पण म्हणून पूर्ण प्रदेशच तसा आहे, अथवा सर्वच स्थानिक तसे आहेत असे जनरलायझेशन करणे योग्य नाही.

बाजार तर ऑलरेडी मांडलेलाच होता, नैसर्गिक आपत्तीमुळे तो बाजार सगळ्यांना आता दिसतोय. मात्र, यातून पुढे काय शिकायचं हे प्रत्येक भारतीयाच्या हातात आहे सध्या.

केदार अगदी बरोबर! १९९३ साली लातूर मध्ये झालेल्या भूकंपानंतर त्याच दिवशी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील चोर भूकंपग्रस्त भागात जमा झाले होते त्यांनी मृत देहावरील दागिन्यांची चोरी करताना स्त्रियांच्या कानाच्या पाळ्या दागीन्यांसकट कापून नेल्याचे वाचले होते.

देवभूमीच कशाला, ही गोष्ट भारतातल्या कुठल्याही शहरात घडली असती तरी लोकं (अर्थात काही) असेच वागले असते.<<<<+१
शिर्डीला सुट्टी/गर्दीच्या काळात तर ५० रु चा हार १५०० रु ला विकतात. अशा आपत्तीच्या प्रसंगी काही लोकं हात धुऊन घेणारच. तसंही ६ महिने देवस्थान बंद असतं. तेव्हा त्यांची मानसिकता अशीच की उरलेल्या ६ महिन्यात जेवढी लूट जमवता येइल तितकी जमवावी.

अगदीच ह्याच्या विरुद्ध अनुभव जपानचा आहे. काही वर्षांपुर्वी आलेल्या त्सुनामी मुळे हजारोंने लोक बेघर झाले होते पण कोणी कोणाच्या वस्तुला हात देखील लावत नव्हता. बेवारस पडलेले कित्येक पैशाचे पाकीट, मोबाइल, कपडे सरकारच्या तिजोरीत जसेच्या तसे जमा झाले.
माझ्या जॅपनीज मित्राने मला सांगीतलेला अनुभव पण असाच होता. त्सुनामीच्या वेळेस एक ६०-६२ जणांचा ग्रुप एकाच ठीकाणी अडकला. खायला त्यांच्या कडे फक्त काही केळी आणि बिस्कीटे शिल्लक होती. एक दोघांनी पुढाकार घेउन ती त्यांनी एका ठीकाणी जमा केली व त्यांच समान वाटप करण्यात आल.
कुठेही गोंधळ नाही की गडबड नाही

<सोनिया व राहुल गांधीनी झेंडा दाखवुन रवाना केलेली "रसद" या संकटग्रस्तांपर्यंत पोहचली का? काही माहीती.>

ती रसद परत १० जनपथ ला पोहोचली.....

देवभूमीच कशाला, ही गोष्ट भारतातल्या कुठल्याही शहरात घडली असती तरी लोकं (अर्थात काही) असेच वागले असते.<<<<+१
मी ह्या भागात तीनदा जाऊन आले. मला प्रत्येकवेळी चांगलेच अनुभव आले. ह्या लुटारुंमध्ये स्थनिक किती व बाकी लोकं किती हे आपण इथे बसून सांगू शकत नाही. इथल्या लोकांच उपजिविकेच मुख्य साधन पर्यटन आहे ते पूर्ववत कधी होणार? जनावर (खेचरं) वाहून गेली ? थोडीफार शेती होते ती होईल की नाही देव जाणे? त्यांचं किती अश्वाशत जीवन झालंय त्याविषयी कोणी बोलत नाही. मला त्यांच्याबद्दल सहानभूती वाटतेय .. शेवटी तीही माणसंच...

सचिनशी सहमत. कायद्याचा धाक आणि प्रखर राष्ट्रीय बाणा दोन्हींचा अभाव असल्यावर माणुसकीची तुरळक बेटेच शिल्लक रहातात.

नन्दे, तू नियमित वाचक दिस्तेस सनातन प्रभातची! Wink नै, म्हणलं की नेहेमी तूच देतेस तिकडच्या लिन्का, चान्गल्या अस्तात, धन्यवाद. Happy

त्या शिंदेबुवांना हे सांगारे कोणीतरी.

महाविघ्नात्प्रमुच्यते महांदोषात्प्रमुच्यते महापापात प्रमुच्यते । स सर्वविभ्दवति स सर्वविभ्दवति

पुजारी / भाविक नित्यनेमाने म्हणतात किंवा आख्या आयुष्यात एकदातरी म्हणले गेलेच असते. असो त्या मूर्खाशी कोण वादा? मग अर्थवशिर्ष तेवढे प्रभावी नाही असाही एक निष्कर्ष निघतो हे ही त्यांना कळवा.

नंदिनीने दिलेल्या लिंकेतला मजकूर मला पटला. खरोखर तिथली पापं वाढली होती. जंगलतोड प्रचंड, आणि बेसुमार बांधकाम. शिवाय भाविकांनी त्या भागाचा पिकनिक स्पॉट करून टाकला होता. आजवर दोनदा बद्रीनाथ-केदारनाथ-यमुनोत्रीला, आणि पाचदा गंगोत्री-गोमुख-तपोवन-केदारतालला जाऊन आलोय. शेवटचं गेलो ते २००४ साली. वेगानं मागे जाणारं गोमुख, नव्यानं तयार होणारे रस्ते, वाढणारा कचरा, कमीकमी होत जाणारा बर्फ सतत जाणवायचा.

>>> खरोखर तिथली पापं वाढली होती. <<<<
मला तिकडचं माहित नाही, पण आमच्या इथले जेव्हा तिरुपतीला जातात तेव्हा जाता येता हल्लीच्या "यात्रेतील नव्हे" तर "पर्यटनातील अपरिहार्य अन्ग असलेले अभक्ष्यभक्षण / व दारू पिणे" हे नित्याचे. येऊनजाऊन दर्शनाच्या दिवशी दर्शन होऊन त्या गावातील हद्दीतून बाहेर पडेस्तोवर तेवढे काही केले जात नाही/करताच येत नाही. असल्या "पर्यटनाला" देवदर्शन का म्हणावं?
माझ्या माहितीनुसार, पूर्वीच्या काली चारी धाम/काशी यात्रा करण्यास निघालेला घरादारावर तुळशीपत्र ठेवुन निघायचा व "सुखरुप परतला" तर त्याचे जन्गी स्वागत व्हायचे. जसजशा भौतिक सोईसुविधा वाढल्या तशा या यात्रा अधिकाधिक सोप्या होऊ लागल्या हे चान्गलेच झाले, पण सोप्या झालेल्या भक्तान्च्या यात्रेबरोबरच आख्ख्या भारतभरचे बाकीचे करमणूकीकरता/पर्यटनाकरता(?) पिकनिकस्पॉट म्हणुन जाणारे "ग्राहक" अन पोटार्थी लुटमार/धन्दा/लबाडी वालेही तिथे जाऊन पोचले. हे ग्राहक देखिल असे भारि की येवढ्या संकटात जे काय खायला मिळाले तर घ्यावे ना, तर मिडीयासमोर तक्रारी की फक्त बिस्कीटेच मिळाली म्हणे, तर पर्यटन कम्पन्यान्ना अमुक इतका पैसा भरला तर त्यान्नी येवढ्या ढगफुटीनन्तर निर्माण झालेल्या अनावस्था अफरातफरीच्या प्रसंगातही अमुक तमुक करायला नको होते का म्हणून कोर्टात दावे ठोकू पहाणारेच जास्त. असो.

योग्य धागा आणि प्रतिसाद .यातून लोकांनी /भाविकांनी बोध घ्यायला पाहिजे .मोदी ,सोनिया ,राहूल यांचेही खरे चेहरे दिसले .

गढवाल आणि गंगा, यमुना, भागिरथी, अलकनंदा, मंदाकिनी या नद्यांच्या प्रवाहाने तयार झालेला हिमालयाचा हा भाग अत्यंत तीव्र उताराचा आहे. पाण्याचा वेग अत्यंत भयप्रद आहे. मी बद्रीनाथ जवळ एका ठिकाणी दरड कोसळलेली तेव्हां अडकून पडलो होतो. सुदैवाने हा भाग नेहमीच दरड कोसळण्याचा असल्याने लगतच्या डोंगरावर पायवाट तयार झाली होती. त्यामुळे डोंगरावरून पलिकडे जाउन सुटका झाली. हा महिना ऑगस्टचा होता. पाऊस थांबला असला तरी पावसाने सुटी झालेली माती खालच्या दिशेने येताना त्याबरोबर दगडही घसरून पडतात. जर रस्ता नसता तर हे सगळं थेटच नदीत कोसळलं असतं. डोंगरावरून जाताना वर आग लावल्याने नष्ट झालेली वनसंपदा दिसली. तसंच मोठमोठ्या करवती लावून ठेवलेल्या दिसल्या. लाकडाचे मोठमोठे ओंडके वाहून नेऊन त्यापासून हॉटेल्स आणि इतर बांधकामं करण्यात मुख्यत्वे पंजाबी लोक आघाडीवर दिसले. स्थानिक ड्रायव्हर किंवा इतर नोक-यांपुरते असतात. नदीच्या उताराकडे स्लॅब घालून त्या आधारावर चढवलेल्या चार चार मजली इमारतींना बहुतेक कुठल्याही स्थानिक सरकारी संस्थेच्या परवानगीची गरज भासलेली नसावी किंवा ज्यांनी कुणी परवाने दिले त्यांना अभियांत्रिकी शास्त्राचे नियम वगैरेची गंधवार्ताही नसावी. या स्लॅबला दिलेले टेकू नदीपात्राकडच्या उतारात असल्याने जर टेकूखालचा आधार सुटला तर संपूर्ण इमारत कोसळणार यात नवल नाही. पण रिव्हर व्ह्यू मुळे पर्यटक जास्त मिळतात, हा मोह सुटत नाही.

लोकांकडे पूर्वी कधी नव्हता इतका पैसा आल्याने पर्यटन वाढले आहे. पर्यटनासाठी जाताना ज्या ठिकाणी जायचे आहे तिथले धोकेदेखील लोकांना माहीत नसतात. एका अर्थी ते स्वतःदेखील झाल्या प्रकाराला जबाबदार आहेत. बद्रीनाथ सारख ठिकाण हाय अल्टीट्यूड मधे येतं. इथं उत्साहाने येणारे धनिक यात्रेकरू पावलं टाकताना धाप लागून खाली बसलेले असं दृश्य सर्रास दिसतं. जर हार्टअ‍ॅटॅक किंवा इतर इमर्जनसी उद्भवली तर इथे काहीच सोय नाही. पुन्हा उलटे श्रीनगरला जावे लागते. पर्यायी रस्ता नाही. रस्त्यासाठी कुठलंही आधुनिक तंत्रज्ञान नाही. किमान खंडाळा घाटात जे तंत्रज्ञान वापरलं किंवा चीनने तिबेटमधे रेल्वेसाठी जे तंत्रज्ञान वापरलं त्याच पद्धतीचं तंत्रज्ञान इथं वापरण्याची गरज आहे. चूक, बरोबर तज्ञ सांगतीलच. अर्थात ही पश्चातबुद्धी आहे. पण गढवालचं पुननिर्माण करण्यासाची संधी साधताना या गोष्टींचा विचार व्हायलाच पाहीजे.

आपले यात्रेकरू सुखरूप परत आले म्हणजे संपलं का ? इतर वेळी स्थानिकांना मुख्य भूमीकडे यायचं असल्यास त्यांचं काय याचा विचार आहे का काही ? पुढची दोन वर्षे पर्यटन बंद राहणार आहे. मग त्यावर उदरनिर्वाह असणा-यांचं काय ? निसर्ग किती प्रतिकूल आहे याचं दर्शन घडलंच आहे. पुननिर्माणाच्या कामात थोडाफार रोजगार उपलब्ध होऊ शकेल. पण पर्यटन बंद झाल्याने होणा-या नुकसानीची हानी त्याने भरून निघणार नाही हे उघड आहे.

या रस्त्यांबाबत, अनधिकृत बांधकामांबाबत आणि दरडींच्या धोक्याबाबत अनेकदा चर्चा होऊनही चलता है म्हणून दुर्लक्ष झालेले आहे. त्सुनामी, लातूरचा भुकंप अशा नैसर्गिक आपत्ती आल्या कि आपत्ती व्यवस्थापनाच्या उच्चस्तरीय बैठकांना वेग येतो. काही अधिका-यांच्या नेमणुका केल्या जातात, एखाद्या मंत्र्याला नको असलेलं हे काम दिलं जातं. प्रसार माध्यंमं प्रशासनाच्या नावाने खडे फोडण्यात २४X७ मश्गूल असतात. त्या रेट्याखाली काही पॅकेजेस जाहीर होतात. सावकाश अर्थमंत्रालयात ते अडवण्यात येतात. त्यातले काही तातडीची बाब म्हणून प्रत्यक्षात पोहोचतात, ज्यात काहीही करणं शक्य नसल्याने थातूरमातूर खर्चासाठी ते वापरले जातात. पुढे माध्यमांकडून यातली न्यूज व्हॅल्यू कमी झाल्याचे लक्षात आल्यावर बातम्यांचा जोर ओसरतो. वातावरण शांत होतं. मग सरआर नि:श्वास सोडतं. उच्चसतरीय समितीचे अधिकारी, मंत्री आपल्या मूळ कामात गुंग होतात आणि आपत्ती व्यवस्थापनाची तितकीशी निकड राहत नाही. एव्हाना लोकही सगळे विसरून गेलेले असतात, पुढे एखादा कार्यक्षम अधिकारी त्यावेळच्या काही फायली निकालात काढतो ज्यामुळे काही कामं होतात.
आपत्ती व्यवस्थापन हे असं असतं भारतात.

एक प्रातिनिधीक उदाहरण म्हणून मुंबईकडे पाहूयात. मुंबईत आज एकाच वेळी मोनो रेल, मेट्रो रेल, सी लिंक अशा विकासावर कामं चालू आहेत. ही गरजेचीच आहेत. या सर्वांवरचा खर्च अंदाजे एक लाख कोटीपेक्षा जास्त आहे. त्याच वेळी उत्तरप्रदेश सारखं राज्य निर्माणासाठी पाचहजार कोटी किंवा उत्तराखंडासारखं राज्यं एक हजार कोटींची मागणी केंद्राकडे करत असतं. पण ते निधी विचाराधीन राहतात. कदाचित त्या वेळी वेळीच हालचाल झाली असती तर आपत्तीनंतर पुऩनिर्माणाचं काम करण्याची वेळ आली नसती. हे पण जर तरच आहे.. कारण निधीचा विनियोग योग्य रितीने होण्यावर सगळं अवलंबून असतं.

अशा मागास राज्यांतल्या नागरिकांना बोल लावण्यापूर्वी किमान ही माहिती घ्यावी म्हणून हा प्रपंच. चुभूदेघे.

पूर्वी सोयी, सुविधा अन मुख्य म्हणजे पैसा नव्हता म्हणून लोकं जात नसत. आजकाल मुबलक पैसे आल्यामुळे सगळेच जण चारीधाम यात्रा करतात.

माझ्यामते कुठेही जावे वाटत असेल आणि जाता येत असेल तर जावे.

तुळजापूर सारख्या ठिकाणी जसे आहे तसेच (आणि तसेच भाविक) भारतात कुठेही असणारच. मुलभूत विचारात बदल झाल्याशिवाय हे सर्व सुधारणे अवघड आहे. तिरूपतीला बाराही महिने प्रचंड रश असूनही त्यामानाने खूप स्वच्छता आणि शिस्त आहे. ती शिस्त सर्वच देवस्थानी यायला पाहिजे. तशी शिस्त लावने हा ही व्यवस्थापणाचा एक पैलू / भाग आहे. जो कुठल्याही चारीधामात किंवा भारतातील ८० टक्के पर्यटन स्थळी नाही.

पापं वाढली म्हणून फायदा होणार आहे का? जंगलतोड झाली तर पर्यायी जंगल कुठे लावली गेली आहेत का? पर्यटक येतात, तर त्यांची सोय कशी होणार? कुठे होणार? D R चे काय? फसल्यावर किती लवकर आणि कशा तर्‍हेने बाहेर पडता येईल? वर्षातून चार महिने तिथे जास्तीचा मणूष्यबळ पुरवठा आहे काय? कचर्‍याचे निर्मूलन / विल्हेवाट कशी लावता येईल? ह्यावर विचार होऊन त्याचे पालन झाले पाहिजे. रस्ते झाले किंवा बिल्डिंग झाल्या म्हणून पापं कशी वाढतील? मुलहूत सोयी निर्मान झाल्याच पाहिजेत. आणि ते ही कायद्याचे पालन करून, पण मुळात गव्हर्नंस नीट नाही त्याचे काय?

गोमुख पाठीमागे सरकणे ही निसर्ग क्रियाच नव्हे काय? सरस्वती देखील लुप्त झाली. उद्या गंगा ही होऊ शकते. काही वर्षांपूर्वी शिकागोत खूप मोठ्या (पेपर मध्ये) चर्चा व्हायच्या की इथे बर्फ कमी का पडतोय. तर ते जेट स्ट्रिम चेंज होण्यामूळे. आताशा तिथेही विंटर मध्ये वॉर्म मंथस असतात. आख्या जगाचेच वेदर बदलत चालले आहे. ते आपण अचानक थांबवू शकत नाही. तर आहे त्या परिस्थितीतून योग्य तो मार्ग कसा निघेल हे बघावे लागेल. हे सर्व भाविकांची / कचर्‍याची / व्यवस्थापणाची नीट सोय होऊन झाले तर काही वाटणार नाही. आज तशी काही सोय नाही. ह्या सोयी करायला हव्यात व त्यासाठी योग्य तो पाठपुरावा व्हायला हवा. पण त्यासाठी जागरूकता हवी. पण आपण जागरूक नाही आहोत. मग हे सर्व व्हिशस सर्कल मध्ये गेलेले आहे.

२००६ च्या पावसात मुंबईची वाट लागली. आज जर तसाच पाऊस पडला तर आजही वाट लागेन ह्याची मला खात्री आहे. आय बेट की २ वर्षानंतर जेंव्हा परत यात्रा सुरू होईल तेंव्हा ह्या घटने आधी सारखेच सर्व असेल. तोच कचरा, तसेच भाविक, त्याच सोयी.(?)

तस्मात जागृतः

केदारनाथ भाविकांची लूटमार करणार्‍यात नेपाळी चोर आघाडीवर होते. केदारनाथ मंदिर दानपेटीतील काही लाख रुपये आणि तिथल्या स्टेट बँकेच्या शाखेतील 5 कोटींची रक्कम नेपाळी चोरांनी लुबाडली ,साधूचे सोंग घेवून लूटमार करणार्‍या नेपाळी माओवाद्यांकडून त्यापैकि 87 लाख रुपये आर्मीने वसूल केले ....

मागच्याच वर्षी, एप्रिलमधे, देवभूमीला म्हणजेच उत्तरांचलाला भेट देण्याचा योग आला होता. अक्षय्य तृतियेच्या थोडेसेच आधी गेलो असल्याकारणाने बर्फ पूर्ण वितळायचा होता, यात्रा चालू व्ह्यायच्या होत्या, त्यावेळेस संपर्कात आलेल्या, बहूतांश स्थानिक माणसांचे वागणे अगदी देवमाणूस या संज्ञेस पात्र असेच अनुभवास आले.

त्यामुळे चिनूक्स यांचे सर्वत्र 'स्थानिक' हा जो शब्द वापरला जात आहे, तो चूक आहे.
गढवालची लोकसंख्या इतकी कधीच नव्हती. हळूहळू बाहेरचे लोक इथे स्थिरावू लागले. गढवालमध्ये यात्रांच्या वेळी व्यवसाय करणार्‍यांपैकी निदान ९०% तरी बाहेरचे असतील.
हे म्ह्णणे रास्त वाटते आहे.

तसेच सध्याच्या सर्व प्रकारच्या माध्यमातील वार्तांकनांमधल्या एकारलेपणाचे, अतिशयोक्तीचे व बहूतकरून वाईट्(च) बातम्या देण्याचे प्रमाण पाहता, ......अधिक काय सांगावे असे नाही Happy

<गोमुख पाठीमागे सरकणे ही निसर्ग क्रियाच नव्हे काय? >

नाही. ज्या वेगाने हे ग्लेशियर मागे सरकतं आहे, ते नैसर्गिक नाही. पर्यटकांच्या वर्दळीमुळे गोमुखावर विपरित परिणाम झाला. आयआयटी खडगपूर आणि दिल्लीनं भोजबासाला लालबाबाच्या आश्रमाच्या मागे प्रयोगशाळा थाटली आहे, कारण गोमुख मागे सरकलं तर अनेक राज्यांमध्ये दुष्काळ पडू शकतो. आता सरकारच्याच आदेशानुसार तिथे जाता येत नाही, हे एक बरं आहे.

Pages