रांझणा

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago
Time to
read
1’


चित्रपट पहायचा असेल तर वाचू नका.

या रविवारी धनुष - सोनम कपूरचा रांझणा बघायचा योग आला.

मी आणि माझ्या शेजारणीने या पिक्चरला जायचं असं प्रोमो पाहिल्यावरच ठरवलं होतं. तिचा धनुष अतिशय आवडता हिरो आहे. तिचे तसे इतरदेखील आवडते हीरो आहेत आणि तिच्या फॅनपणाचे किस्से अचाट आहेत. अगदी टिपिकल मद्रासी. असो. मलापण मंगळूरामध्ये त्याचे एक दोन चित्रपट पाहून तो आवडला होताच. नंतर आलेल्या कोलावेरी डी ने तो प्रचंड फेमस झाला म्हणा.

तर आम्ही नेहमीप्रमाणे मिंजूरला न जाता टॅक्सी घेउन अण्णानगरला सिनेमा बघायला गेलो. एवढ्या लांब जायचे कारण की मिंजूरला तमिळ डब व्हर्जन लागलेलं होतं आणि अण्णानगरला हिंदी. वनिताला धनुष हिंदी कसा बोलतो याची जाम उत्सुकता होती, मला तमिळ मध्ये बर्‍याचदा काय चाललंय ते समजत नाही म्हणून मला पण हिंदीच बघायचा होता. एबीसीडी बघताना अख्खं थीएटर खिदळत असताना मी अधून मधून अंज म्हणजे पाच का? मग तो असं काय म्हणाला वगैरे लॉजिक लावत बसले होते. रांझणाचं तमिळमध्ये नाव अम्बिकापती असे ठेवले आहे, कुठल्या लॉजीकने कुणास ठाउक!! कारण सिनेमामधे तर अंबिका नावाचं एक पण कॅरेक्टर नाही. त्याच लॉजिकने हिंदीमधे रांझणा नाव का ठेवलंय कुणास ठाऊक? पंजाबी लोकसंगीतातल्या रांझा वरून असावं बहुतेक. सिनेम्याच्या नावाचा आणि कथेचा काहीही संबंध नसले तरी तेच नाव का ठेवतात कुणास ठाऊक?

बनारसमधल्या एका तमिळ पंडीताचा मुलगा एका मुसलमान मुलीच्या प्रेमात पडतो. मुलगी दिसायला अतिशय सुंदर आणि अभ्यासात हुशार. मुलगा वाया गेलेला, शिक्षणात यथातथा, दिसायला अत्यंत सामान्य आणि काटकुळा. आठवी नववीच्या वयातलं हे प्रेम. पुढे मुलीच्या घरच्यांना ही भानगड समजते. मग ते मुलीला शिकायला बाहेर पाठवतात. मुलगी आठ वर्षानी जेव्हा परत येते तेव्हा मुलगा अजून तिच्या प्रेमात वेडा राहिलेला असतो. मुलगी मात्र दुसर्याच्या प्रेमात पडलेली असते. आणि त्या दुसर्याशी लग्न करायला ती पहिल्याची मदत घेते. नंतर बरंच काही पहिल्याच्या मनाविरुद्ध जाणते-अजाणतेपणी घडत राहतं आणि बनारसमधला एक साधा तरूण एक राजकीय प्यादं बनून जातो.

अनेक घटनाच्या घडण्यामुळे पूर्ण सिनेमा अत्यंत गोंधळलेला आहे. वास्तविक दिग्दर्शकाकडे तीन अफाट व्यक्तीरेखा होत्या, दोन जबरदस्त प्लॉट होते, दोन उंच ताकदीचे अभिनेते होते. एक सुंदर दिसणारी अभिनेत्री (आणि अभिनयाला शून्य असलेली) होती. पण तरीदेखील या सर्वाची भेळ केल्याने (कदाचित म्हणूनच) रांझणा गोंधळतो. पहिल्या भागातील कथेमधे काहीही नावीन्य नाही. उत्तरार्धात मात्र खूप घटना घडतात त्याही खूप वेगाने आणि त्यामुळे कुठलाच प्रसंग सलग वाटत नाही, त्यामध्ये एकसंधता येत नाही, पूर्ण पटकथा ढिली धाली वाटते.

सुरुवातीचा हिंदी सिनेमामधे वारंवार येऊन गेलेला ते "सोलह बरसकी बाली उमर को सलाम" टाईप टीनेज रोमान्स. पाठी लागलेला मुलगा आणि छुईमुई मुलगी. मात्र, एकमेव फरक टीनेज रोमान्स अगदी वास्तविक पातळीवर घडतो. पहिल्यांदाच भेटल्यावर आधी आय लव्ह यू म्हणायचं आणि नंतर मुलीचं नाव विचारायचं. ग्रीटींग कार्ड देऊन शायरी ऐकवायची वगैरे प्रसंग खूप अफलातून जमलेले आहेत. धनुष दहावीतला मुलगा म्हणून शोभतो. सोनम या भागात उंचीमुळे थोराड वाटते. पण तिला युनीफॉर्ममधला लूक फार शोभलाय. मुरारी आणि बिंदिया (झीशान अयुब आणि स्वरा भास्कर) या दोघांचे काम अतिशय सुंदर आहे. पण त्यांच्या व्यक्तीरेखा फार साचेबद्ध आहेत. सिनेमामधला हा भाग छोट्या छोट्या प्रसंगातून जाम खुलत जातो. "झोया"ला प्रपोज करायला जाताना कुंदन देवळातून आशीर्वाद घेउन निघतो आणि तिला भेटायच्या आधी कपाळावरचा टिळक पुसतो किंवा झोया यायच्या आधी कुंदन फेसपॅक लावून बसलेला आहे वगैरे शॉट एकदम सही घेतले आहेत.

अभय देओलचे पात्र आल्यापासून सिनेमा फार वेगात घडायला लागतो. इथे राजकारण, त्यामागचे विचार, सिस्टीम आणि त्या सिस्टीमला बदलायचे प्रयत्न करणारे तरूण तरुणी हे फार परीणामकारक घेतले आहे. खास करून दिल्लीची राजकीय आणि सामाजिक विचारांनी भारलेली तरुणाई यामध्ये दिसत राहते आणि सिनेमा रोम्यान्टिक ट्रॅक सोडून राजकीय सिनेमा बनत जातो. पण या सर्वांमधे सिनेमाचा जो मूळ गाभा आहे तोच हरवून जातो. सत्य, न्याय वगैरे गोष्टीसाठी लढणारी झोया स्वतःच लग्नासाठी जलजीतला खोटं बोलायला सांगते आणि तोही कबूल होतो, हे मला काही पचनी पडले नाही. भले घरच्यांचा विरोश असेल तर रजिस्टर मॅरेज करा ना. पण खोटं बोलून तेही कुंदनच्या जीवावर कशाला तो लग्नाचा अट्टहास?अजून मला प्रचंड आवडलेला प्रसंग म्हणजे कुंदन झोयाला घेउन पंजाबात जातो, आणि तिथे गेल्यावर त्याला जे दृश्य दिसतं, त्यावरची त्याची प्रतिक्रिया.... मला नाही वाटत असा सीन आजवर कधी हिंदी सिनेमामध्ये दाखवला गेला आहे.

कुंदनला पकडल्यावर रात्रभर त्याच्या आजूबाजूला बसून तो चोर का बनला असावा यावर चर्चा करणारी मुलंमुली बघून मला आमच्या मायबोलीची फार फार आठवण आली होती. कुंदन या राजकीय पक्षामधे झोयासाठी परत येतो, आणि नुसता परत येत नाही तर एक प्रमुख लीडर देखील बनतो. हा अशिक्षित पंडित ते लीडर प्रवास फार झपाट्याने घडतो. नुसत्या एक दोन चमकदार प्रसंगांनंतर पूर्ण पक्षाचे कुंदनवर भार टाकणे पटत नाही, झेपत नाही. शिवाय नंतर झोयाने त्याच्या वापर करून घेणे, आणि स्फोटांनंतर स्वत: जबाबदारी स्वीकारणे फार अनाकलनीय वाटले. ती कुंदनचा सूड घ्यायला असं करते का? की ती सी एम बाईना अडकवण्यासाठी असं करते का? हे करून तिला नक्की काय फायदा होतो? अथवा तिच्या पक्षाला यातून काय फायदा होतो? शिवाय, या राजकीय पक्षाचं काम नक्की कशाच्या जोरावर चालतं? त्यांना पैसा कुठून मिळतो, इकडे तिकडे फिरणं भटकणं स्ट्रीट प्लेज करणं, सामाजिक कामं करणं याव्यतिरिक्त हा राजकीय पक्ष असं काय महत्त्वाचा असतो की ज्याची भिती मुख्यमंत्र्यांना वाटायला लागते. या प्रश्नांची उत्तरं पटकथेतून मिळत नाहीत आणि सिनेमा अविश्वसनीय बनत जातो.

चित्रपटामध्ये काही प्रसंग विनाकारण आल्यासारखे वाटले. उदा: बिंदिया आणि मुरारी कुंदन जाऊन त्या डॉक्टरचे फोटो काढून आणतात त्याची काही विशेष आवश्यकता नव्हती, त्यातून झोयाचं मॅनिप्युलेटिव्ह कॅरेक्टर दाखवायचं असेल तर सोनमला ते काही नीट जमलेलं नाही. मुळात तिला अभिनय जमत नाही ही काही आता नवीन बातमी राहिली नाही. या चित्रपटामध्ये ती किमान अभिनय करायचा प्रयत्न तरी करते. पूर्ण सिनेमाभर तिने लुक्स आणि मेकपवर प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याहून निम्मी मेहनत तरी तिने संवादफेक आणि मुद्राभिनायावर घेतली असती तर बरे झाले असते. खरंतर झोयाची ही भूमिका कुठल्याही अभिनेत्रीसाठी ड्रीम रोल ठरवा अशी आहे. पण इतका मिटी रोल मिळून सोनमला काही झेपलेला नाही.

संपूर्णपणे भरकटलेली पटकथा असूनदेखील सिनेमा पहात रहावासा वाटतो याचे कारण, धनुष आणि ए आर रहमान. पैकी धनुष पूर्ण सिनेमाभर कुंदन म्हणूनच वावरलेला आहे. २६ सिनेमांचा अनुभव असलेला, राष्ट्रीय पारितोषिक मिळवलेला, प्रचंड लोकप्रियता असलेला हा अभिनेता या सिनेमामधे केवळ कुंदन म्हणूनच दिसत राहतो. सुरूवातीचे त्याचे स्कूल युनिफॉर्ममधले लूक्स इतके परफेक्टरीत्या जमले आहेत की बास. अर्थात हे निम्मे कौशल्य छायादिग्दर्शक उर्फ सिनेमॅटोग्राफरचेदेखील आहेच. कुंदनची व्यक्तीरेखा मुळातच हिंदी हीरोच्या व्याख्येला साजेशी नाही, तरीदेखील तो पूर्ण सिनेमाभर हीरो बनून जातो. भाषा कुठलीही असो, संवादफेक ही किती टेक्निकल गोष्ट आहे ते त्याच्या संवादफेकीकडे बघून समजतं. त्याचे हिंदी उच्चार बरेचसे शुद्ध नाहीत. बनारसी पंडिताच्या मानाने तर ते अजिबातच नाहीत, पण तरीही तो संवादफेकीवर जो कंट्रोल ठेवतो त्याला तोड नाही. खास करून "हम बनारस के पंडित ऐसेही सालोंसे लोगोंको डराते आये है.."सारखा हलकाफुलका संवाद असो वा झोयाच्या लग्नाआधी तो तिला मिठीत घेऊन बोलतो तो संवाद असो. धनुष रॉक्स. संवादाइतकाच त्याचा अभिनयदेखील उच्च आहे. धनुषला कास्टिंग करून मग ती व्यक्तीरेखा विकसित केली की व्यक्तीरेखा विकसित करून मग त्यानुसार धनुषला कास्ट केले माहित नाही. पण जे काय जमलंय ते अफलातून आहे. कुंदनचं वागणं बरोबर की चूक हा इथे प्रश्नच नाही, कारण दिग्दर्शक कुठेही त्याचं वागणं जस्टीफाय करतच नाही. पूर्ण सिनेमाभर झोया त्याचा वापर करून घेते, आणि तो वापर होऊ देतो हे फार व्यवस्थितरीत्या जमले आहे. (सोनमचा अभिनय चांगला असतात तर हे अजूनच उत्तम रीत्या पोचले असते)

चित्रपटाचे संवादलेखन एकदम खुसखुशीत आणि क्रिस्प आहे. शेवटचा संवाद तर केवळ महान आहे.

ए आर रहमान हा पुन्हा एकदा जीनीयस आहे हे सिद्ध करतो. त्याची सर्वच गाणी अफलातून आहेत. आणि टिपिकल रहमान स्टाईलने चढत जातात, पण हल्ली त्याच्या गाण्यांना अर्थांच्या दृष्टीने पण फार वेगळेपण लाभत जात आहे. हल्ली म्हणजे दिलसे पासूनच, मात्र नव्या सिनेमांमधे त्याची गाणी नुसती संगीतासाठीच नव्हे तर शब्दांसाठी पण ऐकावीशी वाटत राहतात.

पहिल्यांदा बना रसिया आणि रांझणा ऐकलं तेव्हा तुफान आवडलं होतं. पण "तुम तक" ऐकलं आणि प्रेमातच पडले. इरशाद कामिलने काय जीवघेणं लिहिलं आहे हे गाणं. मुळात तालातले शब्द घेऊन त्यातून परफेक्ट अर्थनिर्मिती करत गाणं बनवणं हा खेळ नव्हे.

चला हू तुमतक चलूंगा तुम तक
मिला हू तुमतम मिलूगा तुम तक... काय ओळी आहेत. याच गाण्याच्या शेवटी असलेलं

नैनो की घाट लेजा नैनोकी नैय्या
पतवार तू है मेरी तू खेवय्या
जाना है पार तेरे तूही भंवर है
पहुंचेगी पार कैसे नाजूकसी नैय्या

या ओळी अक्षरशः कलेजा काटके आहेत. याच ओळींचा म्युझिक पीस जेव्हा शेवटच्या सीनला बॅकग्राऊंडला वाजतो तेव्हा शब्दांचा अर्थ जिवंत होतो. माझ्यामते तरी इर्शाद कामिल सध्या असलेल्या गीतकारांपैकी सर्वोत्कृष्ट गीतकारांपैकी एक आहे. वेगळे तरीही सोपे शब्द वापरून त्याची गाणी क्लास अपार्ट ठरत आहेत.

रांझणामधे जर पटकथा अजून थोडी सशक्त असती आणि नायिकेचा अभिनय बराच उत्तम असता तर सिनेमा कुठल्या कुठे पोचला असता, पण दुर्दैवाने तसं होत नाही. म्हणून रांझणा अ‍ॅव्हरेज सिनेमा ठरतो आणि प्रेक्षकांच्या दृष्टीने धनुष सिनेमाच्या कॅन्व्हासपेक्षा मोठा होत जातो, आपल्या हिंदी सिनेमांचं हेच तर सर्वात मोठं दुर्दैव आहे.

अजून एक: एका प्रसंगामधे धनुष जेव्हा पटकन पुढे येऊन तमिळ बोलतो, तेव्हा अख्खं थिएटर जे काही सणकून उसळलं होतं त्याला तोड नाही. आजवर असा दंगा मी फक्त दिल चाहता है च्या वेळेला पाहिला होता. पण त्याहीपेक्षा कालचा दंगा सॉल्लीड होता. मज्जा आली. हीरोच्या एंट्रीला आणि रांझणा गाण्यावेळेला पण पब्लिक म्याड झालं होतं. शिट्ट्या बिट्टया एकदम जोशात.

विषय: 
प्रकार: 

दाद, सिनेमा बघशीलच पण "तुम तक" ऐकलं आहेस का? रहमानचा ताल आणि इरशादचे शब्द हे कॉकटेल अफलातून नशादायी आहे. Happy

मस्त परिक्षण. कधी बघायला मिळेल बघू. तोपर्यंत गाणी ऐकतेय.
तुम तक ऐकते आहे, अजून चढायचं आहे :). सध्या मी " रांझणा" च्या प्रेमात आहे. अप्रतिम संगीत आणि त्याला तेव्हढीच उत्तम साथ देणारा जसविंदर सिंगचा आवाज!!! पराकोटीचं गोड गाणं Happy

धनुषच्या तमिळ सिनेमांबद्दल मात्र मला कुतूहल निर्माण झालंय, कोणते अगदी पाहायलाच हवे हे सुद्धा सांग ना Happy

सोनमबद्दल +१
धनुष रॉक्स नक्कीच... त्याच्याबद्दलही +१
सिनेमातला एक प्रसंग आहे मस्त. फक्त त्याचा संपूर्ण सिनेमाशी काहीही संबंध नाहीये.
टिपिकल इंटुक चर्चा पब्लिक चोर, चोरी आणि त्याची मानसिकता वगैरे बद्दल बडबडत बसते... ते वेगळे स्किट वाटते.. Happy

एकाच कलाकाराने दोन वयातील पात्र, खास करुन आहेत त्या पेक्षा कमी वयातील पात्र रंगवणे फारच क्वचित यशस्वी होते. या चित्रपटात हे जमलेय असे वाटतेय.

मला अतिशय आवडलं तुम तक... रहमान च्या गाण्यांना चांगली लिरिक्स अन शुद्ध हिंदी गाणारे गायक मिळाले की गाण्याचं सोनं होतं अगदी , त्याचं हे उदाहरण. . रांझणा..., बनारसिया पण मस्त जमलीयत.. प्रोमो मधे धनुष चा डायलॉग " पंधरा थप्पड खाये अब तो नाम बता दो .." .बघूनच ठरवलं होतं बघायचा म्हणून. Happy

नंदिनी,
आधी ' रहमॅनिया' बीबी वर हजेरी लाव Happy , तुम तक च्या ' नैनोंकी घाट लेजा कडव्यानी मला पण व्यसन लावालय I'm totally high with ' tum tak' cocktail !
रिव्ह्युशी बरीचशी सहमत , फक्त मला सोनम चं काम आवडलं :).
मामी,
मलाही शोभा डे चं मत बर्यापैकी पटतो , रसप च्या बीबी वर मी तेच लिहिलअय कि मुळात ' मजनुगिरी' स्टोरीज मला अपिल नाही होत :).

कुंदनला पकडल्यावर रात्रभर त्याच्या आजूबाजूला बसून तो चोर का बनला असावा यावर चर्चा करणारी मुलंमुली बघून मला मायबोलीची फार फार आठवण आली होती. >>>> Happy

कुंदनला पकडल्यावर रात्रभर त्याच्या आजूबाजूला बसून तो चोर का बनला असावा यावर चर्चा करणारी मुलंमुली बघून मला मायबोलीची फार फार आठवण आली होती. >>>>
+१ Proud

कुंदनला पकडल्यावर रात्रभर त्याच्या आजूबाजूला बसून तो चोर का बनला असावा यावर चर्चा करणारी मुलंमुली बघून मला मायबोलीची फार फार आठवण आली होती. >>>> अगदी अगदी टिपिकल जेएनयू Happy

मामी. शोभा डेचं आर्टिकल वाचलं. ती बाई भंपक आहे, तरी ते बाजूला ठेवलं तरी तिने सिनेमा पाहिला का हा प्रश्न मला पडला. मुलार रांझणाची नायिका ही व्यक्तीरेखा अफलातून आहे, कॉम्प्लेक्स आहे आणी ती टिपिकल हिंदी हिरवीणींसारखी "लाजणे, मुरकणे"च्यापुढे गेलेली आहे. (ते सर्व काही सोनमच्या अभिनयांतून दिसत नाहच)

(स्पॉयलर अ‍ॅलर्ट)

पण मुळात त्याची मजनूगिरी हा या चित्रपटाचा फोकस नाहीच्चे. जसं मी आधी लिहिलंय तसं आठवी नववीमधे जो काही पप्पी रोमान्स असतो तोच रोमान्स यामधे आहे.झोया त्यामधे सामील असतेच, ती सतत नकार देत नाही, उलट त्याच्यबरोबर फिरायाला त्याला चोरून भेटायला वगैरे जातेच. ती दूर गेल्यावर जरी दूर गेली असली तरी तिचं प्रेम माझ्यावर असेलच असा त्याचा भाबडेपणा आहे. ती परत आल्यावर त्याला न ओळखण्याइतकी विसरली आहे हे त्याच्या पचनी पडत नाही, पण तो तिला त्रास देत नाही, स्वत:चाच हात कापून घेतो. ती लग्न करणार म्हणून चिडून का होइना तो देखील लग्नाचा निर्णय घेतोच. इथला संवाद खूप मस्त लिहिलाय "तुमसे प्यार करना मेरा टँलंट है. तुम्हारे सिव कोइ और लडकी होती तो भी मै इतनाही टूटके प्यार करता" वाला. इतकं झालं तरी ती परत त्यालाच बोलावते आणी तिच्या घरच्यांना त्याच्यामार्फत खोटं बोलायला लावते. म्हणजे फायदा हिचा, पण बंदूक त्याच्या खांद्यावर. कुंदनला जेव्हा खरं समजतं तेव्हा तो तिच्या वडलांना जाऊन सांगतो- यामधे त्याचं काय चुकतं? शी इज मॅनिप्युलेटिव्ह. चूक तिची, ती खोटं बोलते, आणी नंतर जसजीत गेल्यावर बिनधास्तपणे "तुझ्यामुळेच तो गेला" हे बोलून मोकळी होते. म्हणजे गुन्ह्याचं ओझं त्याच्या खांद्यावर. त्याने पश्च्चाताप करायचा, ती परत बिच्चारी म्हणून रडायला मोकळी....

जबरदस्त प्लॉट खरंतर इथेच बनू शकला असता, ते राजकारण आणी इतर पात्रे घुसवली नसती तर. असो.

आवडले परीक्षण नंदिनी! धनुष चा मी एकही चित्रपट अजून पाहिलेला नाही. ते कोलावेरी सुद्धा एकदोनदाच पाहिले आहे. त्याच्यात एवढे हिन्दीचा हीरो ) होण्याएवढे काय आहे हे आधी अजिबात कळाले नाही (आणि ग्लॅमरस हीरो असण्याबद्दल शंका आहे, अभिनेता असण्याबद्दल काही माहीतच नव्हते). ट्रेलर मधे राजपाल यादवचाच भास होत होता. आता या दोन परीक्षणांमधल्या तुझ्या पोस्टी वाचून थोडी माहिती झाली. बघितल्यावर नीट कळेल.

गाणीही ऐकायला हवीत.

शोभा डेचं आर्टिकल वाचलं. ती बाई भंपक आहे, तरी ते बाजूला ठेवलं तरी तिने सिनेमा पाहिला का हा प्रश्न मला पडला. <<<
+१०००

स्टॉकिंग हिरोज बद्दल बोलायचं तर हिंदी सिनेमांचा सगळा इतिहासच निघेल. आणि जो हिरविणीच्या बापाला 'मी तुमच्या मुलीच्या योग्य नाही ठिक आहे पण निदान तिचं आता जिच्यावर प्रेम आहे तो नक्कीच योग्य आहे तर त्याच्याशी का लग्न करून देत नाही?' असे सांगतो.
हिरविणीला तिच्या प्रियकराकडे नेण्यासाठी पळवून नेतो.
तो स्टॉकर कुठल्या प्रकारे दिसला शोभा डे बाईंना हे मला अजून समजलेलं नाहीये.

स्टॉकरचं कौतुक केल्याबद्दल हळहळ खरंतर 'डर' च्या वेळेला व्यक्त झाली असती तर ठिक होतं. पण हिरोने निगेटिव्ह असण्याचं कवतिक करण्यात विसरलं असावं ते.

डीजे, तुमतक वर एक वेगळंच लिहितेय मी. एवढं चढलंय ते मला.

रहमॅनिया बीबीवर कोणतरी म्हणालं होतं तसं रहमान स्लो पॉयझन आहे. हळूहळू चढतो (आणि चढला तरी उतरत नाही!!!)

रहमानचा ताल आणि इरशादचे शब्द हे कॉकटेल अफलातून नशादायी आहे.<<< +१११११११
धनुष चे तमिळ सिनेमा सब टायट्ल बरोबर ऑन लाईन कुठे बघायला मिळ्तील?

नीधप,

>> स्टॉकरचं कौतुक केल्याबद्दल हळहळ खरंतर 'डर' च्या वेळेला व्यक्त झाली असती तर ठिक होतं.

डरची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद! Happy त्यावरून भाऊ तोरसेकारांचे दोन लेख सापडले :

१. शाहरुखला सुपरस्टार आपणच बनवला ना?
२. तू हाँ कर या ना कर, तू है मेरी किरण

रांझणा पाहिला नसल्याने हे लेख कितपत लागू पडतात ते माहीत नाही. विषयांतर झालं असल्यास क्षमस्व.

आ.न.,
-गा.पै.

तुमतक... अजून ऐकलं नाहीये...:(
अत्ता मीटिन्ग्स आहेत. आज दुपारी बर्रोब्बर दीड्वा वाजता ऐकण्यात येईल... प्रॉमिस...

शोभा डे (मामीच्यालेखातून) रसप आणि नंदिनी.. सर्वांचे रिव्ह्यूज वाचतेय.
पिक्चर बघीन की नाही माहिती नाही.
पण तुम तक प्रोमोजमधेच आवडलं होतं. आता नंदिनीच्या ऑर्डरवरून(:दिवा:) मुद्दाम ऐकलं. तशीही रहमानला तोडच नाही. तर हे गाणं खूपच आवडलं. सोनम स्कर्टात आणि युनिफॉर्मात एकदमच फॉर्मात!
गाण्यात तुमतक ता शब्दांचा तराण्यातल्या(नोमतोम) या बोलांसारखा/शब्दांसारखा जो वापर केलाय त्याने मजा आणलाय! मस्तच.

गाण्यात तुमतक ता शब्दांचा तराण्यातल्या(नोमतोम) शब्दांसारखा जो वापर केलाय त्याने मजा आणलाय! मस्तच.<<< म्हणूनच मला या गाण्याबद्दल दादकडून मुद्दाम ऐकायचं आहे. दादला यातले बारकावे अधिक समजतील. दादकडे दीड वाजला का? Proud

Pages