स्वातंत्र्यवीर सावरकर कर्मभूमी दर्शन [ दुसरे विनायक:सावरकरांची वसतिगृहातील खोली, पुणे ] [ भाग पहिला]

Submitted by मी-भास्कर on 28 May, 2013 - 10:56

Image0170.jpg
२८ मे ला सकाळी १०ला फ़र्ग्युसन कॉलेज रोडवरील तुकारामपादुका देवळासमोरच्या क्र.३ च्या प्रवेशद्वारातून शिरल्यावर सरळ गेल्यावर दगडी बांधकाम असलेल्या वसतीगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ येताच देशभक्तीपर गीते कानावर आली आणि आपण योग्य जागी आलो याची जाणीव झाली. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर सुंदर रांगोळ्या मार्गदर्शक ठरत होत्या. तळमजल्यावर डाव्या बाजूची दुसरीच खोली क्र. १७ की जिथे मला पोचायचे होते.
त्या खोलीच्या प्रवेश द्वाराशी उभा होतो. समोरच्या भिंतीपाशी स्वा.सावरकरांचा अर्धपुतळा एका स्टुलावर ठेवला होता. त्यावर पुष्पहार घातलेले होते. खोलीच्या प्रवेश द्वाराच्या डाव्याबाजूकडील भिंतीवर संगमरवरी स्मृतिशिलेवर
लिहीलेले होते --
" या खोलीत स्वातंत्र्यवीर बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर विद्यार्थिदशेत १९०२ ते १९०५ या काळात राहात होते.
In this room swatantryaveer Vinayak Damodar Sawarkar Baristor at law resided from 1902 to 1905. "
खोलीत शिरलो. याच खोलीत सावरकरांच्या सारखा अद्वितीय महापुरुष सुमारे शंभर वर्षांपूर्वी राहात होता ही जाणीव किती चित्त्तथरारक होती ! अशीच जाणिव मला पंढरपूरला विठोबासमोर, किंवा आग्रा येथील लालकिल्ला पाहतांना, किंवा साबरमती आश्रमाला भेट दिल्यावर झाली होती. मला पंढरीच्या विठोबासमोर उभा राहिल्यावर याची जाणिव प्रकर्षाने होते कि, अरे, याच जागेवर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, रामदास असे संतश्रेष्ठ एकेकाळी वावरले होते आणि आपल्यासारख्या सामान्य माणसाला आज तेथे उभे राहाण्याचे भाग्य लाभले आहे ! या जागेला या माणसांमुळेच तर महत्व आले ना? एरव्ही या जागी आपण आवर्जून आलो असतो का?
एक दार, दोन खिडक्या असलेली १० बाय १२ फ़ूट आकाराची, आटोपशीर, दोघांना राहाण्याची सोय असलेली खोली. त्यात दोन लाकडी दिवाण, दोन खुर्च्या. दोन्ही बाजुला भिंतीवर सामानासाठी लाकडी फ़ळ्या.
काय महात्म्य या जागेचे ? या ठिकाणच्या वास्तव्यातच आधीच स्वयंभु असलेल्या सावरकरांचा आणि त्याकाळातील भारताच्या राजकारणाचे सूत्रधार लोकमान्य टिळक यांचा निकटचा संबंध आला. त्याशिवाय शिवरामपंत परांजपे यांचाही त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. पुण्यातील गणेशोत्सवात त्यांच्या नाशिकमध्ये गाजलेल्या कार्यक्रमांचा मोठा प्रभाव पडला. पुण्यात नाशिकहून आलेल्या या १९-२० वर्षाच्या तरुणाचा प्रभावशाली वक्ता म्हणुन मोठा बोलबाला झाला. जहाल तरूण विद्यार्थ्यांचे नेतृत्व त्यांचेकडॆ आपोआप आले. कॉलेजच्या मेसमध्ये त्यांनी शिवजयंति सुरु केली. 'जयदेव जयदेव जय जय शिवराया' ही प्रसिद्ध आरती तेव्हा लिहिलेली. "जयोस्तुते" हे स्वतंत्रतादेवी वर लिहिले गेलेले एकमेव आणि अद्वितीय स्तोत्रही इथलेच! त्यांचे लेखही वर्तमानपत्रांमधून येऊ लागले. लोकमान्यांची ’स्वदेशी’ची चळवळ तेव्हा सुरु झाली होती. त्या चळवळीचाच एक भाग म्हणून परदेशी कपडयांची होळी करण्याची कल्पना सावरकरांनीच मांडली. टिळकांनी तिला पाठिंबा दिला. सावरकरांच्या चमूने परदेशी कपडे लोकांच्या उस्फ़ूर्त पाठिंबा मिळवून गोळा केले आणि लोकमान्यांचे उपस्थितीत त्यांची संभाजी पुलानजिक सार्वजनीक होळी केली. ब्रिटिश सरकारचा रोष शांत व्हावा म्हणून सावरकरांची वसतिगृहातून हकालपट्टी केली गेली. त्या होळीच्या जागी आज ती घटना चित्रित करणारे स्मारक उभे आहे.
[त्या स्मारकाच्या दर्शनाचा अनुभव भाग दोन मध्ये!]
एकूणच मुळातच अष्ट्पैलु असलेल्या त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास या चार वर्षांमध्ये झाला. या विकासाची पुणे आणि ही खोली साक्षीदार म्हणावी लागेल . पुढील पाचसहा वर्षांच्या काळात भारतीय स्वातंत्र्यलढयातील ”क्रांतिकारकांचे मुकुटमणी” त्याना ज्या अद्वितीय कार्यामुळे म्हटले जाते त्या कार्याचा नाशिकमध्येच तयार झालेला पाया या वसतिगृहातील खोलीतील वास्तव्य काळात अधिक व्यापक आणि भक्कम झाला. १९०६ मध्ये लोकमान्यांनी शिफ़ारस केल्याने ’शिवाजी शिष्यवृत्ती’ मिळवून सावरकर लंडनला गेले. या सर्व घडामोडींची साक्षी असलेली ही खोली!
सावरकरांच्या जयंतिनिमित्त सकाळी ९ ते सं ६ पर्यंत ही खोली महाविद्यालय दर्शनासाठी उघडी ठेवतात म्हणून हा योग आला. आज ना उद्या त्याचे नूतनीकरण होणार. तरीही एक राष्ट्रीय वारसा म्हणुन या वसतिगृहाचा दर्शनी भाग आणि ही खोली जपून ठेवणे हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे.
इंग्रजांनी औद्योगिक क्रांतिमुळे उपलब्ध झालेल्या रेल्वे, टेलिग्राफ़ आदी नवीन गोष्टी आपल्याकडे आणल्या. एवढ्या प्रचंड देशावर, इतक्या दुरून, मुठभर इंग्रजांच्या आधारावर सत्ता राबवण्यासाठी जे जे हवे ते ते सर्व त्याना इकडे आणणे भागच होते. ते कांही त्यांनी इथल्या लोकांची प्रगति व्हावी अशा महान हेतूने केलेले नाही. इथली सर्व संरक्षण, अर्थ, शिक्षण इ. व्यवस्था इंग्रजांच्या गरजा भागवण्याकरिताच होत्या. इथल्या संपत्तीचा ओघ ब्रिटिश साम्राज्याची भरभराट करण्यासाठीच वापरला जायचा. स्वातंत्र्यप्राप्तीमुळे या सर्व व्यवस्था आता भारतीयांच्याच गरजांशी निगडित ठेवणे आता आपल्या हाती आहे. त्या व्यवस्था आपण कितपत कार्यक्षमतेने वापरतो तो वेगळा भाग आहे. आहे या परिस्थितीतही आपल्या भोवती जी काही भरभराट आज दिसते आहे ते स्वातंत्र्याचे फ़ळ आहे. ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या पिढीने काहीही केलेले नाही. ते स्वातंत्र्य लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, सुभाषबाबू यांसारख्या हजारो लोकांच्या पराकोटीच्या त्यागातून साकारले आहे. उपभोग मात्र आपण घेतो आहोत. याची नव्या पिढीला जाणीव होण्यासाठी अशी ठिकाणे आवश्यक आहेत. मधूनमधून खोलीच्या दर्शनासाठी कोणी कोणी येत होते. त्यात कांही तरूण मुलेमुलीही होती. त्यांना सावरकरांबद्दल कितपत माहिती होती कोण जाणे, पण निदान ती तेथे येऊन गेली हे विशेषच! या खोलीत राहून गेलेल्या विद्यार्थ्यांना सावरकरांनी या खोलीतील वास्तव्यात केवढे कर्तृत्व दाखवले याची माहिती असेल कां? असामान्य कर्तृत्वाच्या व्यक्तीच्या वास्तव्याने पावन झालेल्या खोलीत राहाण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे असे त्यांना वाटले असेल कां असे प्रश्न मनात उभे राहिले. सावरकरांच्या १८५७ चे स्वातंत्र्यसमरची ग्राहकहीतने प्रकाशित केलेली आवृत्ती बाहेर विक्रिसाठी उपलब्ध होती. ती घेतली. आणि परतलो.
घेतलेली प्रकाशचित्रे टाकायला पुरेसा वेळ मिळाला नाही; नंतर टाकेन.
पण स्वा. सावरकरांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त आदरांजली वाहाण्यासाठी या दर्शनाचा अनुभव मायबोलीवर आणला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शस्त्रनिर्बंध रद्द करण्यासाठी पुण्यात विद्यार्थांनी (१९३८-१९३९) मध्ये काढलेल्या मिरवणुकीत संचलन गीत म्हणून सावरकरांनी रचुन दिलेलं हे शस्त्रगीत.

-: शस्त्रगीत :-

व्याघ्र, नक्र, सर्प, सिंह हिंस्त्र जीव संगरी
शस्त्र शक्क्तिने मनुष्य हा जगे धरेवरी //१//

रामचंद्र चापपाणि चक्रपाणि श्रीहरी
आर्तरक्षणार्थ घेति शस्त्र देवही करी //२//

शस्त्र पाप ना स्वयेचि, शस्त्र पुण्य ना स्वये
ईष्टता अनिष्टता हि त्यास हेतुनेच ये //३//

राष्ट्र रक्षणार्थ शस्त्र धर्म्य मानिते जरी
आंग्ल, जर्मनी, जपान, राष्ट्र्-राष्ट्र भूवरी //४//

भारतातची स्वदेश रक्षणार्थ का तरी
शस्त्रधारणी बळेची बंध हा आम्हावरी //५//

शस्त्र बंधने करा समस्त नष्ट ह्या क्षणा
शस्त्र सिध्द व्हा झणीं समर्थ आर्तरक्षणा //६//

व्हावया स्वदेश सर्व सिध्द आत्म शासना
नव्या पिढीस द्या त्वरे समग्र युध्द शिक्षणा //७//

मी-भास्कर, टाकाच प्रचि. आगाऊ धन्यवाद देतो! Happy आपल्यासारख्या सामान्य माणसाला तिथं उभं रहायचं भाग्य लाभलं, या विधानाशी सहमत.
आ.न.,
-गा.पै.

छान लेख Happy उचित समय.
मुंढे, ती कविता दिल्याबद्दल धन्यवाद
(नैतरी आमच्या शेळपट कॉन्गी राजवटीत असली कविता शाळेतुन शिकायला मिळणे दूरापास्त, येऊन जाऊन पुढे लाजेकाजेस्तोवर जिन्कु किन्वा मरू थाटाची गीते तेवढी आली असो.)

मी-भास्कर आता मात्र तुमच्याविषयी असूया निर्माण झाली आहे. अर्थात चांगल्या अर्थाने. इतक्या वेळा पुण्यास येऊन गेलो मात्र हे भाग्य लाभले नाही. पुढच्या वेळीस या खोलीचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभूदे ही परमेश्वरचरणी प्रार्थना.

अरेच्या महत्वाचे राहीलेच - तुमचे हार्दिक अभिनंदन Happy

@किशोर मुंढे | 28 May, 2013 - 21:26नवीन
शस्त्रनिर्बंध रद्द करण्यासाठी पुण्यात विद्यार्थांनी (१९३८-१९३९) मध्ये काढलेल्या मिरवणुकीत संचलन गीत म्हणून सावरकरांनी रचुन दिलेलं हे शस्त्रगीत.
<<
किशोरजी, हे अप्रतीम गीत येथे उपलब्ध करून देऊन आपण स्वातंत्र्यवीरांना वाहिलेली श्रद्धांजली अगदी यथोचित आहे. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

शस्त्र पाप ना स्वयेचि, शस्त्र पुण्य ना स्वये
ईष्टता अनिष्टता हि त्यास हेतुनेच ये //३//

भ्रमिष्ट कल्पनांनी ग्रासलेल्या या समाजाला शिक्षित करण्याचा प्रयत्न टिंगल्-टवाळी सोसुनही सावरकर करीत राहिले. पण १९६२ मध्ये भ्रमिष्टांना बसला रट्टा ! तरीही तोंडाने अहिंसेची बाष्कळ बडबड करीत राहायची सवय या समाजाने तशीच ठेवून प्रत्यक्षात प्रवास सावरकरांनी पुरस्कार केलेल्या मार्गावरूनच चालवलेला आहे!

@पिशि अबोली
या सुंदर प्रकाशचित्रांबद्द्ल धन्यवाद!
पहिले प्रचि खोलीच्या प्रववेशद्वारालगतच्या भिंतीवरील संगमरवरी स्मृतिफलकाचा आहे आणि दुसरा खोलीच्या आतल्या भागात कविता लिहिलेल्या एका फळीचा आहे.

गामा_पैलवान | 28 May, 2013 - 22:09
मी-भास्कर, टाकाच प्रचि. आगाऊ धन्यवाद देतो!
<<
धन्यवाद!
लवकरच प्रचि टाकतो.

@limbutimbu | 29 May, 2013 - 07:23
<<
कंसात टाकलेला अभिप्राय फार आवडला!
धन्यवाद!

@असा | 29 May, 2013 - 08:14
धन्यवाद!
ही वसतिगृहातील खोली २६ फेब्रु [पुण्यतिथी] व २८ मे [जयंति ] या दोन्ही दिवशी दर्शनासाठी उघडलेली असते.

मी_भास्कर हे गीत आम्हाला सौ. क्रांतीगीता महाबळ यांनी दादरच्या सावरकर स्मारकात शिकविले. खुप श्रवणीय आणि स्फुर्तीदायक आहे. आभार सगळ्यांचे.

धन्यवाद मी भास्कर.. २८ मे रिकामाच जातोय म्हणून वाईट वाटत होते..ती उणीव सुंदर रित्या भरून काढलीत.तुमचे कौतुक नेहमीच वाटते. किशोरजी, फार सळसळते संचलन गीत दिलेत..पिशी अबोलींचेही आभार प्रचिंबद्दल.

''गुणसुमने मी वेचियली या भावे | की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा | हा व्यर्थ भार विद्येचा..''
चिरंतन प्रणाम.

आताच क्र १ च्या वसतिगृहातील १७ क्रमांकाच्या खोलीमधील अर्धपुतळ्याचे प्रकाशचित्र बर्‍याच खटपटीनंतर मूळ लेखातच समाविष्ट केले आहे.

@भारती बिर्जे डि... | 29 May, 2013 - 13:16
धन्यवाद मी भास्कर.. २८ मे रिकामाच जातोय म्हणून वाईट वाटत होते..
<<

मी श्री चैतन्य दिक्षितांच्या लेखाची प्रतीक्षा करीत होतो. ते सध्या अत्यंत व्यस्त असावेत नाहीतर त्यांचा प्रतिसाद १००% आला असता.

शेवटी उशिरा का होईना आदरांजली वाहाण्याचा प्रयत्न केला. उरलेला दुसरा भाग योग्य वेळी टाकेन.

आपणही या आधी सावरकरांच्या आम्हाला कळायला थोड्या अवघड वाटणार्‍या काव्यांचे रसग्रहण अशाच योग्य प्रसंगी करून ही स्मरणयात्रा समृद्ध केलेली आहे. असे अनेकजण यात सहभागी होण्याने ती अधिक समृद्ध होईल.
श्री मुंढे यांनी सावरकरांचे एक सुंदर गीत इथे उपलब्ध करून देऊन यावेळचा जन्मदिन अधिक संस्मरणीय केला आहे.

श्री असा यांना या दुसर्‍या विनायकाच्या प्रत्यक्ष दर्शनाची ओढ वाटू लागली आहे ही गोष्ट नक्कीच
समाधान देणारी आहे.

@किशोर मुंढे | 29 May, 2013 - 11:48
मी_भास्कर हे गीत आम्हाला सौ. क्रांतीगीता महाबळ यांनी दादरच्या सावरकर स्मारकात शिकविले. खुप श्रवणीय आणि स्फुर्तीदायक आहे. आभार सगळ्यांचे.<<

किशोरजी, शक्य असेल तर आपण हे गीत आणि या गीताचे व्हॉइस रेकॉर्डींग करून १५ ऑगस्ट २०१३ च्या स्वातंत्र्यदिनी मायबोलीवर टाकून स्वातंत्र्यदिन साजरा करावा अशी माझी विनंति आहे.

१) वाघ, सिंहांसारख्या हिंस्त्र पशूंनी भरलेल्या या पृथ्वीवर मानवाला जगण्यासाठी आवश्यक असे
स्वसंरक्षणाचं साधन म्हणजे शस्त्र होय. हे शस्त्र केवळ स्वतःचेच संरक्षण करीत नाही, तर दु:खित दीनांचेही रक्षण करतात.
२) धनुर्धारी राम आणि सुदर्शन चक्रधारी श्रीकृष्णाची आठवण देत सावरकर ठासुन सांगतात, भक्त रक्षणासाठी देवांनाही शस्त्र धारण करावेच लागले.
३) शस्त्र हे स्वतः पापही नाही आणि पुण्यही नाही. कोणतेही शस्त्र केवळ शक्ती असते, तिला चांगले-वाईट, पाप-पुण्य काही कळत नसते. शस्त्र वापरणारा ते कशासाठी आणि कसे वापरतो त्याचा परिणाम काय होतो यावरच त्याची ईष्टता-अनिष्टता अवलंबुन असते.
(अग्नी - स्वयंपाक शिजवतो, काऱखाने चालवितो त्यावेळी उपकारक असतो परंतु तोच अग्नी देऊन कुणी दुसर्‍याचे घर पेटविले तर दोष अग्नीचा नव्हे, तर घर पेटवणार्‍याचा असतो.)
४) जगातील सर्व राष्ट्र स्वसंरक्षणासाठी अधिकाधिक शस्त्र वापरणं, निर्माण करणं समर्थनीय आवश्यक मानतात.
५) मग आम्हा भारतीयांनाच मात्र बंधन का म्हणुन असावं? असा प्रश्न सावरकर करतात.
६)सारी बंधने नष्ट करुन, आत्मरक्षणासाठी तसेच राष्ट्रसंरक्षणासाठी आम्ही शस्त्र सिध्द झालेच पाहिजे असा सावरकरांचा आग्रह आहे.
७)स्वातंत्र्य, आत्मशासन, लोकशाही, स्वराज्य, सुराज्य अशा कोणत्याही संकल्पनेला शस्त्र-सिध्द, समर्थ भारत हाच पाया अत्यंत आवश्यक आहे म्हणून नव्या पिढिला बावळट, नेभळट न बनविता शूर, कठोर, पराक्रमी, कार्यक्षम, कर्तुत्वक्षम बनवणे आणि त्यासाठी युध्दाचे समग्र (सर्व बाजुंचा विचार करणारे) शिक्षण देणे ही अपरिहार्य गोष्ट आहे. हे शस्त्र वादाचं तत्वज्ञान स्वा. सावरकरांनी या छोट्याश्या कवितेमधुन फार सुंदर रितिने मांडले आहे.

सौजन्य :- निरुपण - सौ. क्रांतिगीता महाबळ लिखित `वैनतेयाची गगन भरारी'.

<< किशोरजी, शक्य असेल तर आपण हे गीत आणि या गीताचे व्हॉइस रेकॉर्डींग करून १५ ऑगस्ट २०१३ च्या स्वातंत्र्यदिनी मायबोलीवर टाकून स्वातंत्र्यदिन साजरा करावा अशी माझी विनंति आहे. >>

मी-भास्कर विनंती नाही आज्ञा करा. रितसर परवानगी घेऊन, हे गीत माबोकरांना भेट देऊन २०१३ चा स्वातंत्र्यदिन साजरा करुया.

@किशोरजी
रितसर परवानगी घेऊन, हे गीत माबोकरांना भेट देऊन २०१३ चा स्वातंत्र्यदिन साजरा करुया.
<<
अवश्य अवश्य!
गीताचा अर्थही फारच छान! त्याबद्दल धन्यवाद. सौ क्रांतिगीता महाबळांनी हे गीत तुम्हाला म्हणायलाही शिकवून फार मोठे महत्वाचे काम केले आहे. कालौघात त्या म्हणण्याच्या पद्धतीचे आणि चालीचे विस्मरण होण्याची शक्यता आहे. यासाठी त्याचे रेकॉर्डिंग होणे आवश्यक आहे.
म्हणून हे सुचविले. सावरकरांच्या 'वैनायक' वृत्ताच्या म्हणण्याच्या पद्धतीबद्दल असे झालेले आहे, म्हणून हा आग्रह.
भारताची वाटचाल पुन्हा १९६२ च्या लाजिरवाण्या पराभवाच्या दिशेने होऊ नये म्हणून सावरकरांनी स्थानबद्धतेतून सुटताच केलेले हे प्रबोधन, १५ ऑगस्टला लोकांसमोर आणणे व सरकारला त्याप्रमाणे पावले उचलायला भाग पाडणे हे आपले कर्तव्यच आहे.
हे अप्रतीम गीत, त्याचे अर्थासहीत निरूपण आणि गीताचे व्हॉईस रेकॉर्डिंग हे सर्व एका ठिकाणि देणारा स्वतंत्र लेखच मायबोलीवर १५ ऑगस्टला टाकाल असा विश्वास वाटतो.त्यासाठी आधीच धन्यवाद देऊन ठेवतो.
या स्मरणयात्रेत / कृतज्ञतायात्रेत सहभागी झाल्याबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद!