उत्तुंग स्वप्न - एव्हरेस्ट बेसकँप ट्रेक - भाग 3

Submitted by शापित गंधर्व on 27 May, 2013 - 15:58

आधिचे भाग वाचण्यासाठी येथे टिचकी मारा.
उत्तुंग स्वप्न - एव्हरेस्ट बेसकँप ट्रेक - भाग १
उत्तुंग स्वप्न - एव्हरेस्ट बेसकँप ट्रेक - भाग २
...........................................................

थोड्याच वेळात संदिप आणि सुशिल बॅगा घेऊन आले आणि आम्ही चालायला सुरवात केली. छोटसच पण गजबजलेलं खेड होत ते. आम्ही लुकलाच्या मुख्य रस्त्या वरुन चालत होतो. थामेल प्रमाणेच इथे पण ट्रेकिंग आणि पर्वतारोहण साठी लागणार्‍या सामानाची भरपुर दुकाने होती आणि त्याच बरोबर पब्ज, बार आणि पुल सेंटर्स पण. लुकला ने स्वताला पर्यटकांसाठी चांगलेच तयार केले होते. पिझ्झा बर्गरच काय पंण अगदि स्टार बक्स कॉफी पण उपलब्ध होती इथे. थोड्याच वेळात आम्ही मुख्य रस्ता मागे टाकला. रस्त्याच्या बाजुच्या दुकानांची जागा आता घरांनी घेतली होती. चालता चालता सुशिल मधेच एका घरात घुसला. घर म्हणण्या पेक्षा घरगुती हॉटेल होते ते. सुशिल ने बॅग खाली ठेवली आणि थोडा वेळ इथे थांबु म्हणाला. माझ्या काकांच घर आहे हे, इथेच जेवण करु (सकाळी १० वाजता?), मी माझ सामन घेतो मग ट्रेक ला सुरवात करु. सकाळी आमचा भरपेट नाष्टा झाला होता (काय ते नंतर कळेलच) त्या मुळे इतक्यात जेवायची इच्छा नव्हती. पण काही तरी घ्याच म्हणुन सुशिल मागे लागला आणि आमच्या हातात मेनु कार्ड ठेवलं. आता काही तरी घ्यायच म्हणुन चहा सांगितला...
ब्लॅक टी ऑर मिल्क टी?
मिल्क टी.

इतका वेळ लक्षात आलं नव्हतं पण सुशिलने चौकशी केल्यावर आठवलं की ट्रेकिंग एजन्सीने त्याच्या साठी दिलेलं पाकिट अजुन आमच्या कडेच होतं. ते त्याच्या सुपुर्त केल आणि त्याच्याशी ट्रेक बद्दल चर्चा सुरु केली. २० एप्रिल ला सकाळी लुकला ते काठमांडु परतीच तिकीट आहे आणि त्याच दिवशी दुपारी भारतात जायच असल्याचं त्याला सांगितलं.
२० तारखेला परत म्हटल्यावर त्याने गणितं मांडायला सुरवात केली. २० ला सकाळची फ्लाईट म्हणजे १९ ला संध्याकाळ पर्यंत लुकला ला परत पोहोचलो पाहिजे. म्हणजे आजचा धरुन एकुण १० दिवस हातात होते. बेसकँप पर्यंत एकुण ६ कँप्स. लुकला-फकडींग-नामचे बाजार- तेंगबोचे-डिंगबोचे-लोबुचे-गोराखशेप म्हणजे ते ६ दिवस. येतांना एक एक कँप स्किप केला तरी कमित कमी ३ दिवस खाली उतरायला, झाले ९, म्हणजे विश्रांती साठी (अॅक्लटामाझेशन) एकच दिवस मिळणार.
म्हटलं होईल का १० दिवसात हा ट्रेक?
खरतरं दोन दिवसांची विश्रांती घ्यायला पाहिजे, नामचे आणि डिंगबोचे मधे. आपल्या कडे एकच दिवस आहे. थोडी रिस्क आहे पण होऊ शकतो. तुमच्या विल पॉवर वर डिपेंड आहे. स्पिड कमी ठेवलात तर उंचिचा त्रास कमी होईल आणि तुम्हाला ट्रेकची सवय असेल तर १० दिवसात पुर्ण करु शकाल हा ट्रेक.
त्याच हे वाक्य ऐकलं आणि आम्हि दोघांनी एकमेकाकडे पाहिलं. कारण आम्ही दोघांनीही २००९ नंतर एकही ट्रेक केला नव्हता. तशी संधिच कधी मिळाली नव्हती. एकंदरित मामला कठीण दिसत होता. पण आमची इच्छाशक्ती जबरदस्त होती आणि त्या मुळेच आम्ही हा ट्रेक पुर्ण करु शकु अशी आशा आम्हाला वाटत होती. तेव्हड्यात चहा आला. पहिलाच घोट घेतला आणि आम्ही दोघांनी तोंड वेड-वाकड केलं. याकच्या दुधाचा चहा होता तो. त्यामुळे चव काहिशी विचित्र लागत होती. जेमतेम दोनचार घोट मारले आणि उरलेला चहा तसाच कपात सोडुन दिला. संपुर्ण ट्रेक मधे परत कधिही दुधाचा चहा प्यायलो नाही.
थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या वर सुशिल जेवायला आत निघुन गेला आणि आम्ही घराबाहेर उन्हात अंग शेकत बसलो. अगदी थंडी नसली तरी हवेत गारवा जाणवत होता. आजुबाजुला खेळणारी मुले, कपडे धुणार्‍या बायका, घराच्या ओटीवर बसुन टाईमपास करणारे तरुणांचे टोळके असे सर्वशाधारण छोट्या खेड्यात दिसते तसेच चित्र इथे पण दिसत होते. एकंदरीत इथली मणसं हॅप्पी-गो-लकी कॅटॅगरीतली वाटत होती.

प्रचि १: लुकला
प्रचि २: लुकला
प्रचि ३: स्टार बक्स
प्रचि ४: खेळ मांडला
प्रचि ५: खेळ मांडला
प्रचि ६: मी पण सचिन तेंडुलकर बनणार

१५/२० मिनिटात सुशिल बाहेर आलो तो खंद्यावर बॅग लटकवुनच. मग दुसरी छोटी बॅग संदिपने आपल्या खांद्यावर घेतली आणि "गणपती बाप्पा मोरया" चा गजर करत आम्ही आमच्या ट्रेकला सुरवात केली. आजचा आमचा ट्रेक खुपच सोप्पा होता. लुकला २८५० मिटर वर आहे तर फकडिंग २६१० मिटर वर. म्हणजे आज आम्ही वर चढण्या ऐवजी खाली उतरणार होतो. एकुण अंतर ६ ते ७ किलोमिटर. साधारण ३ ते ३.५ तास लागणार होते. लुकलाच्या वेशीवर एक पोलिस बाकडा टाकुन बसला होता. इथे आमच्या ट्रेकची पहिली नोंद झाली. कुठुन आलात, कुठ पर्यंत जाणार, इंशुरन्स आहे का? अशी सगळी नोंद त्याच्या वहित केली आणि आम्ही पुढे निघालो. एका कमानी खालुन गेलो आणि लुकला मागे पडले. आजुबाजुचा निसर्ग आता नजरेत भरत होता. चारी बाजुला उंचच उंच डोंगर. त्यातले काही बर्फाने झाकलेले तर काही बोडके. वाट कधी सरळ सोट तर कधी नागमोडी झाडितुन जाणारी. ट्रेक नुकताच सुरु झाला होता त्यामुळे आम्ही अगदी जोश मधे होतो आणि आमचा चालण्याचा वेगही. सुशिल सारखा हळु चाला हळु चालाच्या सुचना देत होता. वाटेत बरिच छोटी छोटी खेडी पार केली. बहुतेक खेड्यांच्या वेशीवर अम्हाला प्रार्थना चक्र (प्रेयर व्हील्स) आणि मणिस्टोन्स दिसत होते. मधुन मधुन सुशिल त्या बद्दल माहिती देत होता.

ट्रेकचा पहिला दिवस - लुकला ते फकडींग
प्रचि ७: खर्‍या अर्थाने आमच्या ट्रेकची सुरवात इथुन झाली
प्रचि ८:
प्रचि ९:
प्रचि १०:
प्रचि ११:
प्रचि १२:
प्रचि १३: प्रार्थना चक्र (प्रेयर व्हील्स)
संपुर्ण ट्रेक मधे हे असे प्रार्थना चक्र सगळी कडेच दिसतिल. या ट्रेक मधेच असे नाही, हिमालयात कुठेही किंवा जिथे बौद्ध संस्कॄती आहे अशा कुठल्याही ठिकाणी हे प्रार्थना चक्र बघायला मिळतात. लंब गोल आकाराचे हे प्रार्थना चक्र बहुतेक वेळा धातुचे बनवलेले असतात. विविध आकारात, अगदी हातात पकडु शकु इतके लहान ते एका घरा इतके मोठे. या प्रार्थना चक्रांवर बौद्ध मंत्र लिहिलेले असतात (बहुतेक वेळा तिबेटी भाषेत). असं मानलं जात की हे चक्र फिरवणं हे त्या चक्रांवर लिहिलेल्या मंत्रांचे मंत्रोच्चारण करण्या सारखच आहे. मंत्रोच्चारण करण्याने जे पुण्य मिळतं तेच हे प्रर्थना चक्र फिरवल्यावर मिळतं. या प्रार्थना चक्रांचा इ.स.पुर्व ४०० वर्ष इतका जुना आहे. हे प्रार्थना चक्र घड्याळ्याच्या काट्यांच्या दिशेत फिरवतात.
प्रचि १४: मणि स्टोन
तिबेटी भाषेत बौद्ध मंत्र कोरलेलेल हे दगड प्रार्थना चक्रा सारखेच जागो जागी दिसतात. मुख्यता रस्त्याच्या बाजुला, नदि काठी, खेड्यांच्या प्रवेश द्वारावर. कधी छोटे छोटे दगड तर कधी मोठ्या शीळा. या दगडांवर "ओम माणि पद्मे हम" हा मंत्र कोरलेला असतो. वाईट शक्तींना दुर ठेवण्या साठी केलेली ती एक प्रकारची प्रार्थना असते. बौद्ध मान्यते नुसार तुम्ही हे दगड त्यांच्या डाव्या बाजुने पार करायचे असतात.

थोड्याच वेळात आम्ही दुधकोसी नदिवरील एका झुलत्या अर्धवट तुटलेल्या पुलावर पोहोचलो. पुर्वि कधितरी आलेल्या भुकंपामुळे तो तुटला आणि आता नेपाळ सरकार कडे दुरुस्तीसाठी पैसे नसल्यामुळे तो तसाच तुटलेल्या परिस्थीतीत आहे.
आम्ही पुलावर पाय ठेवणार इतक्यात सुशिलने आम्हाला थांबवल. पुलावर समोरुन काही याक येत होते त्यांना आधी पुल पार करु द्या म्हणाला. याक निघुन गेल्यावर आम्ही पुल पार करु लागलो. मी सगळ्यात पुढे, मग संदिप आणि सगळ्यात मागे सुशिल. पुलाचा मध्यावर पोहोचलो आणि पुल जोर जोरात हलायला लागला. एक सेकंदा साठी सॉलिड तंतरली. पटकन पुलाची दोरी पकडली आणि मागे वळुन बघितल तर सुशिल मुद्दाम जोरजोरात पुलाच्या दोर्‍या ओढुन पुल हलवत होता. ते बघुन हायसं वाटल आणि उरलेला पुल बिनधास्त पार केला. ट्रेक सुरु होऊन एक तास झाला होता. अर्ध्या तासापुर्वी संदिप कडुन घेतलेली बॅग मी परत त्याच्या पाठीवर दिली आणि पुढे चालु लागलो. मजल दर मजल करीत साधारण अडिच तासात आम्ही फकडिंगच्या वेशीवर पोहोचलो. परत एकदा प्रार्थना चक्र आणि मणि स्टोन पार करुन आम्हि फकडिंग मधे प्रवेश केला. छोटसच पण टुमदार गावं. सुशिल ने त्याच्या ठरलेल्या लॉज मधे आम्ह्ला नेले. रुम मधे बॅगा टाकल्या आणि खाली आलो. लुकला पेक्षा इथे थंडी जास्त होती. थोडा वेळ लॉज बाहेर उन्हात बसायचा प्रयत्न केला पण जोरदार वार्‍यामुळे थंडी जास्तच जाणवत होती. मग आत लॉजच्या डायनिंग एरियात जाऊन बसलो. जेवणची ऑर्डर दिली आणि सुशिलशी त्याच्या ट्रेकिंग अनुभवांबद्दल गप्पा मारु लागलो. अनुभव सांगायला सुरवात करण्या आधी त्याने आम्हाला ताकिद दिली की हळु चाला. आजचा तिन साडेतिन तासाचा ट्रेक तुम्ही अडिच पावणे तिन तासात पुर्ण केलात. ही चुक परत करु नका. आधिच तुमच्या कडे दिवस कमी आहेत, अशी घाई कराल तर नक्कीच तुम्हाला अल्टिट्युड सिकनेस चा त्रास होईल.
मग त्याने त्यच्या बद्दल माहिती द्यायला सुरवात केली.
गेल्या सात वर्षांपासुन तो हे पोर्टर चे काम करत होता. एका सिझन मधे पाच ते सहा वेळा बेसकँपला जाणे होत होते (एका वर्षात दोन सिझन असतात). कधी आमच्या सारख्या एकट्या दुकट्या ट्रेकर्स सोबत तर कधी १०/१२ ते २०/२५ लोकांच्या ग्रुप सोबत. कधी नुसताच बॅगा वाहुन नेणारा हमाल म्हणुन तर कधी पोर्टर कम गाईड म्हणुन. दिवसाची बिदागी १५ ते २० अमेरिकन डॉलर आणि ट्रेकच्या शेवटी मिळणारी टिप ही अधिकची कमाई. ट्रेक दरम्यान ज्या लॉज/टी हाऊस मधे ट्रेकर्स रहातिल तिथेच या पोर्टर्सची रहाण्याची आणि जेवणाची सोय लॉज/टी हाऊस मालक करतात. त्यामुळे त्याचा भार ट्रेकर्सच्या खिश्यावर पडत नाही. आज पर्यंत त्याने अमेरीका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, हॉलंड अश्या अनेक देशातिल ट्रेकर्सना सोबात केली होती. भारतातुन फार कमी लोक याट्रेक वर येतात हे नमुद करायलाही तो विसरला नाही.
चांगल्याच रंगात आलेल्या गप्पांची लि़ंक समोर आलेल्या जेवणाच्या ताटांनी तुटली. या ट्रेकवर मीळणारे एकमेव ताजे जेवण म्हणजे दाल-भात-तरकारी. तेच ऑर्डर केलं होतं आम्ही. मेनु कार्डवर अजुनही बरेच पदार्थ होते पण त्यातले बहुतेक कॅन्ड फुड असतात म्हणुन ते टाळले. जेवण केलं आणि रुम वर जाऊन मस्त ताणुन दिली.

प्रचि १५: भुकंपात अर्धवट तुटलेला पण वापरात असलेला झुलता पुल
प्रचि १६:
प्रचि १७: दुर वरुन दिसणारे फकडिंग मधिल कॅप साईट
प्रचि १८:
प्रचि १९:
प्रचि २०: आजचे जेवण दाल-भात-तरकारी

सकाळी लवकर उठल्यामुळे आणि नंतरच्या ट्रेकमुळे गाढ झोप लागली. दिड दोन तासांनी जाग आली तेंव्हा फ्रेश वाटत होत. तोंड धुवायला बाथरुम मधे गेलो तर नळाला बर्फासारखं गार पाणी. परत रुम मधे आलो, थर्मास (याला तिथले लोक पॉट म्हणतात. मेनु कार्डवरही तोच उल्लेख आढळतो) मधुन ग्लासभर गरम पाणि घेतलं आणि तेव्हड्याच पाण्यात शक्य होईल तितकं तोंड खंगाळुन Wink फ्रेश झालो.
दुपारी आम्ही आलो तेंव्हा आमच्या शिवाय लॉज मधे कोणिच नव्हत. आत्ता खाली आलो तर आणखी एक मोठा ग्रुप त्या लॉज मधे आलेला दिसला. त्यांच्या जोर जोरात गप्पा चालु होत्या. त्यांना तिथेच सोडुन आम्ही गावात फेरफटका मारायला गेलो. संध्याकाळ झाल्यामुळे असेल कदाचित, गाव एकदमच शांत होत. मधुनच दोन-चार गोरे-गोमटे चेहरे दिसायचे नाहितर येणारे जाणारे याक. बास्स इतकच. थोडावेळ इकडे तिकडे निरुद्देश भटकलो आणि लॉजवर परतलो. आता मघा पेक्षा जास्त गर्दी झाली होती लॉज वर. मोठ्या मोठ्या बॅगांचा डोंगर लॉजच्या दारातच मांडुन ठेवला होता. आजु बाजुला ८/१० पोर्टर्स विश्रांती घेत होते. सुशिल तिथेच होता. त्याने सांगितले की आलेला हा ग्रुप आईसलँड पीक (६१८९ मिटर) एक्सपिडिशन करणार आहे. आता त्या मोठ्या मोठ्या बॅगांचे रहस्य कळले होते. आत गेलो तर लॉजच्या टिव्हीवर इन टु थिन एअर हा चित्रपट नुकताच सुरु झाला होता. मग तो बघत बसलो. या ट्रेक विषयी माहिती मिळवतांना यु ट्युब वर मला या चित्रपटाची लिंक मिळाली होती त्यामुळे मी हा चित्रपट आधी बघितलेला होता. म्हणुन चित्रपट बघता बघता माझे दिवसभाराच्या घडामोडी वहित उतरवण्याचे कामही चालु होते.
चित्रपट संपल्यावर जेवण केले आणि रुम मधे गेलो. दोघांनी घरी फोन करुन ख्याली-खुशाली कळवली आणि झोपी गेलो.

प्रचि २१: चित्रपट बघण्यात मग्न असलेले ट्रेकर्स

प्रचि २२: मेनु कार्ड - हे फकडिंग मधले दर आहेत. गोराखशेपला याच सार्‍या पदार्थांचे दर ४ पट जास्त होते Wink
११ एप्रिल २०१३
लॉज पुर्ण पणे लाकडाने बनलेला होता. त्यातल्या खोल्या म्हणजे ६ मी मी प्लायवुडने बनवलेला १० बाय १० चा ठोकळा. बाजुच्या खोलित कोणि हळु आवाजात बोलत असेल तरी इकडे ऐकु यायचं. बाहेरच्या पॅसेज मधे कोणि चालत असेल तर लाकडाचा करकर आवाज यायचा. सकाळी त्यामुळेच झोपमोड झाली. एक्सपिडिशन ग्रुप पैकी बरेच जण उठले होते आणि त्यांची आवरा आवर चालु होती. आम्हि पण मग स्लिपिंगबॅग्ज मधुन बाहेर आलो आणि आवरायला घेतलं. काल संध्याकाळी नळाच्या थंड पाण्याचा अनुभव घेतला होता त्यामुळे अंघोळ करण्याच्या भानगडीत पडलोच नाही. ग्लास दोन ग्लास गरम पाण्यात भागवलं आणि खाली आलो. आम्ही घरुन येतांना डिंकाचे लाडु आणले होते. काल सकाळी तोच आमचा नाष्टा होता. आज पण त्यावरच भागवायचा विचार होता पण ज्या लॉज मधे आपण रहातो तिथेच रात्रीचं जेवण आणि सकाळचा नाष्टा घेणे बंधन कारक होते. त्या अटीवरच तुम्हाला २०० ते २५० नेपाळी रुपयात रुम मिळते रहायला. नाही तर रुमचे भाडे डायरेक्ट १०००/१२०० नेपाळी रुपये. त्यामुळे सकळी चहा आणि सँडविचचा नाष्टा केला.
हे सगळं होता होता साडे आठ वाजुन गेले. सुशिल चा नाष्टा अजुन व्हायचा होता. त्याला, तु ये लवकर आवरुन आम्ही पुढे जातो सांगितलं आणि गणपती बाप्पाच नाव घेऊन आमच्या दुसर्‍या दिवशीच्या ट्रेक ला सुरवात केली.

ट्रेकचा दुसरा दिवस - फकडींग ते नामचे बाजार

सुशिलच्या सांगण्या नुसार आजचा पॅच संपुर्ण ट्रेक मधला सगळ्यात अवघड पॅच होता. २६१० मिटर वरुन आम्ही डायरेक्ट ३४५० मिटरवर जाणार होतो. एका दिवसात ८४० मीटर उंच. सगळी खडी चढाई. एकुण अंतर १० ते १०.५ किलोमिटर. ६ ते ९ कितीही तास लागु शकतात.
कालची सुशिलची हळु चालण्याची सुचना लक्षात होती आणि आज आम्ही ती तंतोतंत पाळायच ठरवलं होतं. ९ ऐवजी १० तास लागले तरी चालतील पण आज हळु जायच दोघांनी मान्य केलं. थोड्याच वेळात आम्ही फकडिंग मधुन बाहेर पडलो आणि मोंजोच्या रस्त्याला लागलो. डोक्यावर सुर्य तळपत असला तरी हवेतल्या गारव्या मुळे सुखद वाटत होते. कालच्या पेक्षा आज खुप जास्त लोक दिसत होते. ट्रेकर्स बरोबरच दैनंदिन जिवनात लागणार्‍या सामानाची ने-आण करणारे हमालही खुप दिसत होते. इथे गाडी रस्ता नसल्या मुळे सारे सामान याक, खेचर किंवा माणसांच्या पाठिवरच वहावे लागते. यात मग बायका लहान मुल पण मागे नसतात. गॅस सिलेंडर, प्लायवुड, बांधकामसाठी लागणारी लाकडे सारेच अगदि लिलया डोक्यावरुन वाहुन नेतात हे लोक. त्यांची मेहनत बघुन समजतं की इथे सार्‍या पदार्थांचे दर इतके जास्त का आहेत ते. सहजिकच सामान जितके जास्त उंच वाहुन न्यावे लागेल दर तितकेच जास्त असणर.
थोड्याच वेळात सुशिल आम्हाला जॉईन झाला. वाटेत भेटणार्‍या ट्रेकर्सला हाय-हेलो करत, शक्य झाल्यास कुठुन आलात कुठपर्यंत जाणार अश्या गप्पा मारत आमचा ट्रेक सुरु होता. आज दुधकोसी नदि सतत आमच्या बरोबर होती. अत्ता पर्यंत आम्हि दोन झुलते पुल पार केले होते. सकाळी निघतांना असलेला जोश दोन तासात थंड पडला होता. पाठिवरच्या छोट्याश्या बॅगेचे पण आता ओझे वाटु लागले होते. दर पंधरा मिनिटाला आम्ही विश्रांती साठी थांबत होतो. साधारण तिन तासांनी आम्ही मोंजो या खेड्यात पोहोचलो. इथेच सागरमाथा नॅशनल पार्कचे प्रवेशद्वार आहे. सुशिल ने इथे आमचा प्रवेश परवाना बनवला (किंमत प्रत्येकी १५०० नेपाळी रुपये).

प्रचि २३: उन सावलीचा खेळ
प्रचि २४:
प्रचि २५:
प्रचि २६:
प्रचि २७:
प्रचि २८:
प्रचि २९:
प्रचि ३०:
प्रचि ३१:
प्रचि ३२: सगरमाथा नॅशनल पार्क ची इमारत. इथेच आमचे प्रवेश परवाने बनवले
प्रचि ३३: सगरमाथा नॅशनल पार्क चे प्रवेशद्वार

थोडावेळ तिथे विश्रांती घेतली आणि पुढे चालु लागलो. दुपारचे १२ वाजुन गेले होते आणि आता पोटात कावळे ओरडु लागले होते. पण सुशिलने जेवण पुढच्या खेड्यात घेऊ सांगितल्या मुळे आम्हि चालत होतो.
परत एकदा झुलता पुल पार केला आणि आम्ही खाली उतरलो. आता रस्ता पुर्ण पणे नदिच्या पात्रातुन जात होता. त्या नदितल्या दगडांवर चालतांना तोल सांभाळण्या साठी बरिच कसरक करावी लागत होती. सोबतच्या बहुतेक ट्रेकर्सचा वेग मंदावला होता. सगळेच जागो जागी विश्रांती घेतांना दिसत होते. तिथे आम्हाला एक आज्जी बाई ट्रेक करतांना दिसल्या. सहज त्यांना वय विचारलं तर त्या ७७ वर्षांच्या असल्याच सांगितलं त्यांनी. या वयातही ही जिद्द व्वा... मनातल्या मनात सलाम केला त्या आज्जी बाईना. अर्ध्या पाऊण तासात सुशिल ने ठरवलेल्या खेड्यात पोहोचलो (नाव विसरलो आता Sad ) आणि जेवणा साठी थांबलो.

प्रचि ३४:
प्रचि ३५:
प्रचि ३६: तुटलेला सध्या वापरात नसलेला पुल
प्रचि ३७:
प्रचि ३८:
प्रचि ३९:
प्रचि ४०: याच त्या ७७ वर्षाच्या आज्जीबाई
प्रचि ४१:
प्रचि ४२: स्थानिक असलो म्हणुन काय झालं आम्हालाही विश्रांती हविच की

जेवणाच्या वेळी एक किस्सा घडला. काल दोन्ही वेळेला दाल भात खाल्ला होता त्यामुळे आज काहि वेगळ ट्राय करुया म्हणुन चिकन फ्राईड राईस सांगितला. कुक फ्रिजर मधुन चिकन बाहेर काढतांना बघितलं आणि हे चिकन कित्ती दिवसांच असेल असेल अशी शंका मनात आली. त्याला विचारलं तर त्याने सांगितलं की चिकन पण काठमांडु वरुन येतं.
अरे बापरे, फ्रेश चिकन नाही मिळणार का?
हे फ्रेशच आहे.
नाही म्हणजे ताजी कोंबडी कापुन नाही मिळणर का?
मिळेल ना, ५००० रुपये लागतिल.
काय?
हो, एका कोंबडिचे ५००० रुपयेच लागतात.

आमची बोलतिच बंद झाली. आहे तेच बनवायला सांगितल त्याला. प्रत्यक्षात राईस समोर आला तेंव्हा चिकन चे तुकडे शोधावे लागत होते त्यात Happy
मोंजो वरुन निघाल्यावर इथे पोहोचे पर्यंत खुपच दमछाक झाली होती. खुप धाप लागत होती चालतंना. संदिपला खोकला पण लागला होता. का कुणास ठाऊक मला वाटायला लागलं की आम्हाला उंचिचा त्रास होऊ लागला आहे. विचार विनिमय करुन आम्हि दोघांनी आर्धि आर्धि डायमॉक्स घेतली. जेवण आटपुन पाण्याच्या बाटल्या भरुन घेतल्या आणि पुढच्या प्रवासाला लागलो.
आता खरी चढाई सुरु झाली होती. पुर्ण पणे अंगावर येणारी. दर पाच सात मिनिटाला विश्रांती साठी थांबावे लागत होते. सुशिलच्या सांगण्या नुसार अजुन चार तासची चढाई बाकी होती. पाठी वरची बॅग अगदी नकोशी झाली होती. आमचा वेग खुपच मंदावला होता. या सगळ्यात फोटो काढायचे कमि झाले होते. कसही करुन दिवसा उजेडी नामचेला पोहोचण्याचा आमचा प्रयत्न होता. आमचा वेग मंदावल्या मुळे सुशिलला आमच्या सोबत चालणे कठीण झाले होते. त्याच्या पाठिवरचे ओझे आमच्या पेक्षा जास्त होते. मग तो थोडा पुढे जाऊन आमची वाट बघत बसायचा. आम्ही येतांना दिसलो की सगळ ठीक असल्याची खात्री करुन परत पुढे जायचा. एक दो एक दो करत आमची चढाई चालु होती. पाच वाजुन गेले तरी नामचे काही नजरेच्या टप्प्यत येईना. जवळचे पाणि पण संपले होते आणि वाटेत कुठले खेडे पण नव्हते. संदिपची खोकल्याची उबळ आता वढली होती. आणि डोक पण दुखु लागलं होतं. मला पण श्वासोश्वासाचा त्रासस होत होता. नक्कीच अल्टीट्युड सिकनेस ने आम्हाला घेरले होते. तो त्रास वाढु नये म्हणुन आम्ही आमचा वेग आणखी कमी केला. विश्रांतीचे थांबे आणि वेळ वाढवला. जस जसा वेळ जात होता तस तस सुशिल बेचैन होत होता.
वेळेत आपण हॉटेलवर नाही पोहोचलो तर आपल्या रुम नाही मिळणार. मी पुढे जाऊन सामान रुम मधे टाकतो आणि पाणि घेऊन परत येतो, मग तुमची बॅग पण मला घेता येईल. तो पर्यंत तुम्ही चालत रहा. अजुन एक तास तरी लागेल तुम्हाला नामचे ला पोहोचायला.
हा प्लॅन आम्हाला पण आवडला. खरोखरच ती पाठी वरची बॅग फेकुन द्याविशी वाटत होती. आणि पाण्याची पण नितांत गरज होती. सुशिलला पुढे पिटाळले अणि आम्ही आमचा प्रवास सुरु ठेवला.
अर्ध्याच तासात सुशिल परत आला होता (किती वेगाने गेला असणार तो). येतांना पाणि आणि दोन काठ्या घेऊन आला होता. तुम्हाला चालतांना मदत होईल या काठ्यांची. पाणि पोटात गेल्यावर बरे वाटले. त्यामुळे चालतंना थोडा उत्साह वाटत होता. पाठी वरचे ओझे सुशिल कडे गेले होते आणि काठ्यांचा ही उपयोग होत होतच.
मजल दर मजल करीत आम्हि सव्वा सहा साडे सहाच्या दरम्यान नामचे बाजार ला पोहोचलो. बर्‍या पैकी मोठे खेडे होते हे. पण आता गावातुन फिरण्यासाठी शरीरात अजिबात त्राण नव्हते. सरळ हॉटेल वर गेलो.
हे हॉटेल कालच्या पेक्षा बरेच मोठे होते. थोडे फ्रेश झालो. घरी फोन करुन सुखरुप असल्याची वर्दी दिली आणि डायनिंग एरियात जाऊन बसलो. इथे शेकोटी चालु असल्या मुळे उबदार वाटत होते. हॉटेल नावाजलेले असावे. भरपुर ट्रेकर्स उतरले होते इथे. जेवण होई पर्यंत तिथेच बसलो आणि मग रुम वर गेलो. कालच्या मानाने आज थंडिच जास्त होती. उद्या इथेच मुक्काम करायचा की पुढे जायच हे पुर्णपणे सकाळी आमची काय अवस्था आहे त्यावर अवलंबुन होते. संदिप बरोबर आता माझेही डोके दुखु लागले होते. म्हणुन झोपण्या आधी आम्ही एक एक डायमॉक्स घेतली. पडल्या पडल्या आम्ही दिवसभराच्या ट्रेक बद्दल चर्चा करत होतो. आजचा पॅच खरच खुप अवघड होता. आणि मुख्य त्रास झाला होतो तो पाठी वरचे ओझे आणि वर खाली वर खाली जाणार्‍या वाटेचा. आज आम्ही बरेच डोंगर पार केले होते. अचानक लक्षात आलं की आपण उगाच गधा मजुरी करतोय. बॅगेत असं बरच सामान आहे जे आम्हाला पुढ्च्या काही दिवसात लागणार नव्हत आणि आम्ही उगाच ते पाठी वर वागवत होतो. गरज नसलेले सामान एका बॅगेत ठेऊन आम्ही ती बॅग लुकलाला सुशिलच्या काकांच्या घरी ठेऊ शकलो असतो. पण हे तेंव्हा लक्षातच आलं नाही. सुशिलला विचारुन जर एक बॅग या हॉटेल मधे ठेवता आली तर उरलेला ट्रेक आम्ही रिकाम्या पाठिने (;-)) करु शकतो. या विचारने खुप बरं वाटलं. आणि बोलता बोलता मधेच कधितरी डोळा लागला.

प्रचि ४३: दुध कोसी नदि
प्रचि ४४: एका वळणावर सुशिल आमची वाट पहतांना
प्रचि ४५: नामचे बाजारला पोहोचण्या आधि शेवटचे वळण
प्रचि ४६: नामचे येथिल हॉटेल
प्रचि ४७: नामचे येथिल खोली

||क्रमशः||

पुढिल भागातः
ट्रेकचा तिसरा दिवस - नामचे बाजार ते तेंगबोचे

एव्हरेस्ट चे पहिले दर्शन

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा मस्तच... ल य भारी
तुमच्याबरोबर आमचाही ट्रेक चालु आहे अस वाटतय....

अप्रतिम केवळ अप्रतिम...
काय देखणे फोटो लेका....अद्वितीय...
८, २४, २७, ३४ आणि ४४ तर एनलार्ज करून फ्रेम करून लावण्याइतके खास आलेत...
अर्थात प्रचि २६ मधला झूम बर्स्टचा प्रयोग फसल्यासारखा वाटतोय....

बाकी आता ट्रेकबद्दल....
२००९ मध्ये शेवटचा ट्रेक करूनसुद्धा तुमचा चालण्याचा वेग सॉलीडच कौतुकास्पद आहे रे...एरवी फिटनेस आणि स्टॅमिनासाठी काही तरी नक्कीच करत असणार....

वाटेत एनर्जी टिकवण्यासाठी काय खात पित होता का....

वॉकींग स्टीकचा उपयोग मी पण खूप जणांकडून ऐकला आहे..एकतर त्याने चढताना मदत होतेच पण उतरताना पण गुढग्यांवर ताण येत नाही. त्यामुळे सर्रास सगळे परदेशी गिर्यारोहक वॉकींग स्टीक वापरतातच...

मी मध्यंतरी मोनोपॉड प्लस वॉकींग स्टीक असा प्रकार बघितला होता...पुढे मागे घेण्याचा विचार आहे...

ट्रेकर्सची पंढरी नामचे बझारबद्दल एवढेच का पुढच्या भागात जास्त माहीती देणार आहेस....

टॉक !! सॉल्लिड मित्रा ! बस्स.. इमॅजिन करतोय तुझ्याबरोबर चाललोय !! फोटू, वर्णन.. बोले तो झक्कास !

शा गं...

जळलेय नुसती.....

काय अप्रतिम जागा आणि हो उत्तम लेख माला.... अनयाची "कैलास मानसची यात्रा" जशी आधाशा सारखी वाचली तशीच ही वाचते आहे....

खुप दिवस मबो वर नव्हते. बाहेर गेले होते... परत आले तर तुझी ही मालिका..... खुप मस्त रे..... पुढचे भाग लौकर टाक....

अप्रतिम फोटो आणि मस्त वर्णन.... तीनही भाग एका दमात वाचून काढले... Happy

पुढचे भाग लवकर येऊदेत Happy

सगळे भाग आले की मग वाचूया असे म्हणून राखून ठेवली होती ही मालिका. पण शेवटी रहावलेच नाही. अप्रतिम होतेय ही मालिका. तुझी लेखनशैली 'प्रवासवर्णन' या प्रकाराकरता अगदी परफेक्ट आहे. अगदी सविस्तर पणे वर्णन आहे प्रवासात लागणार्‍या अगदी लहान सहान गोष्टींचे पण. आणि तुझे अनुभव आणि फोटो अगदी आपणच ट्रेक करत असल्यासारखा फील देताहेत.

पुढच्या भागची खूप आतुरतेने वाट पहातोय.

तुझी लेखनशैली 'प्रवासवर्णन' या प्रकाराकरता अगदी परफेक्ट आहे. अगदी सविस्तर पणे वर्णन आहे प्रवासात लागणार्‍या अगदी लहान सहान गोष्टींचे पण. आणि तुझे अनुभव आणि फोटो अगदी आपणच ट्रेक करत असल्यासारखा फील देताहेत.

पुढच्या भागची खूप आतुरतेने वाट पहातोय.>>>>>>>माधव, +१०००००० Happy

मजा येतेय. खूपच छान चाललय ट्रेकचं वर्णन. फोटो पाहून तर आत्ता उठून जावसं वाटतय हिमालयात. पुढे अजनच चित्तथरारक होत जाईल ट्रेक. लवकर येऊद्या पुढचा भाग.

सर्व वर्णन खूपच छान....तुमच्याबरोबर आमचाही ट्रेक चालु आहे अस वाटतय.

खूप मस्त..

सोप्या भाशेत , अप्रतिम
फोटोन्सहित प्रभाव्शाली वर्णन... मनाला खूप भावले....।हिमालय तसाही खुप आवदतो...
आणि अशी सुन्दर प्रवास् वर्णने वाचून अजून आकर्षित करतो...

पुढिल भाग कधी??

छान माहितीपुर्ण लेख ! प्रकाशचित्र छान आहेत.

तेव्हडं ते प्र.चि ३२ आनि ३३ च्या हेडींगमधे गरमाथा पाहिजे का? सगरमाथा हे एव्हरेस्टचे नेपाळी पुर्वापार प्रचलित असलेले नांव आहे. सगरमाथा म्हणजे face of the sky म्हणजे आकाशाचा चेहेरा.

फोटो आणि वर्णन फार सुंदर आहे! ८, १९, २३ आणि २४ नंबरांचे फोटो खूप आवडले. ७७ वर्षांच्या तरूणीचा उत्साह दांडगा आहे. हॅट्स ऑफ!

नाही माझ्या माहीतीनुसार ते सरगमाथा या शब्दाचा अपभ्रंश आहे...
सरगमाथा म्हणजे स्वर्गाचा माथा...या अर्थी...त्यातून ते बदलत बदलत सगरमाथा...
काही जण सागरमाथा ही म्हणतात आणि प्राचीन काळी एवरस्टच्या जागी समुद्र होता अशी एक थिअरही मांडतात...

सगळ्यांचे मना पासुन आभार ____/|\____
काही अपरीहार्य कारणांमुळे पुढचे भाग यायला वेळ लागतो आहे त्या बद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
शक्य तितक्या लवकर पुढचे भाग टाकायचा प्रयत्न नक्की करणार.

आशु/नतद्रष्ट,
तुम्हि लक्षात आणु दिल्यावर खात्री करुन घेण्यासाठी नॅशनल पार्क ची प्रवेश शुल्क पावती तपासुन बघितली. त्यावर सगरमाथा असा उल्लेख आहे. वर अपेक्षित बदल केला आहे.

:हाहा:..

क्षमस्व ! उशिरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व!
उत्तम ! प्रत्येक लेख उत्तम! अस वाटले कि मी पण आहे तुमच्या बरोबर . प्रत्येक वेळेस i shouldn't
be alive हा कार्यक्रम discovery वर बघितला तेव्हा तेव्हा आवर्जून तुमची आठवण आली …मला वाटते कि ह्यातच सगळे काही आले !. कारणं काही असोत पण नाही जमले join करायला . टिच भर खळगी चा प्रश्न आहे … असो । but i missed it. not the Everest base camp , but your company..that moments....very very personal and touching moments which i missed...
hats off yaar ! काय काय केलंय तुम्ही । सकाळी brush करताना रक्त काय, पाय मुरगळल्यावार पण चालायची जिद्द काय सगळंच अफलातून …hats off agin yaar.. hats off. प्राची, लेख सगळेच सुरेख ।नहि जबरदस्त ! in short .... जळली …… ह्यातच सगळ आल नाही का ?

Pages