अताशा मीच मजला गुणगुणाया लागले आहे...

Submitted by मुग्धमानसी on 17 May, 2013 - 01:24

अताशा मीच मजला गुणगुणाया लागले आहे
होऊनी काव्य मी मजला स्फुराया लागले आहे

तिची ती सावली आहे अजुनही माझिया पायी
तिचे असणे जरी गगनी भिडाया लागले आहे

स्वतःला आरशातून पाहणे मी टाळते हल्ली
तिथे भलतेच काही मज दिसाया लागले आहे

कशिबशी रात्रभर गुंत्यातुनी त्या निसटले होते
पहाटेस स्वप्न ते मज विंचराया लागले आहे

जिव्हारी लागले माझ्या विखारी बोलणे त्यांचे
कुणाचे काय त्यासाठी अडाया लागले आहे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही जवळच्या प्रेमळ मायबोलीकरांच्या आग्रहाखातर थोडाफार अभ्यास करून गज़ल लिहिण्याचा माझा हा पहिलाच प्रयत्न आहे. 'बेफिकीर' यांचा गज़लेच्या तंत्रावरील अभ्यासपुर्ण लेख आणि अनेक जाणकारांनी लिहिलेल्या उत्तमोत्तम गज़लांचे वाचन एवढ्याच अभ्यासाच्या तुटपुंज्या भांडवलावर हे धाडस करते आहे. यात अनेक त्रुटी असतीलच... त्या समजावून सांगण्यास येथील उत्तम जाणकार समर्थ आहेतच. धन्यवाद!

एकुण, तुमच्या काव्यप्रकृतीची झाक दाखवणारी चांगल्या खयालांनी युक्त अशी रचना आहेच. बाकी तांत्रिक चुका, सुलभतेचा अभाव वगैरे बाबी आहेत. या बाबी निव्वळ गझलेच्या बाह्य सौंदर्याशी निगडीत असतात. (तरीही, म्हणून त्या नगण्य नसतात तर गझलेचे बाह्य सौंदर्य ही बाब गझलेच्या आंतरीक सौंदर्याइतकीच महत्वाची मानली जाते).

लेखन शुभेच्छा! Happy

-'बेफिकीर'!

मला गझलेतलं काही कळत नाही त्यामुळे मी घाबरतच हा प्रतिसाद लिहीतेय. पण माझ्या मते तुमची जी नेहमीची सहजता आहे ती यात थोडीशी हरवल्यासारखी वाटते. चुभूद्याघ्या.

पहिलाच प्रयत्न असल्यामुळे केवळ अनेक शुभेच्छा इतकाच अभिप्राय देत आहे.

आपण स्वतःच हळूहळू उत्तम गझला लिहू लागाल ह्यत शंका नाही, काव्य आप्ल्या लेखनामधे आधीपासूनच आहे.

पहिले दोन शेर आवडले Happy
तिसर्‍या शेरात दुसरी ओळ वेगळी असती तर जास्त आवडला असता शेर Happy

गझल विभागात पाऊल टाकलंसच शेवटी!

स्वागत, अभिनंदन, शुभेच्छा!
रमड +१११११११११

सावलीची द्विपदी मस्त जमलीये
बाकी ठिकाणी "प्रयत्न' दिसत आहेत

बेफीजींच्या तंत्रासोबतच भटांची बाराखडी किंवा श्रीकृष्ण राऊत यांचे गझलतंत्र अभ्यासावे ते अधिक उपयुक्त आहेत
गूगल / विकिपीडियावर मिळेल

खूप खूप शुभेच्छा

विदिपांशी सहमत !

लिहीत रहा ग.... लिहीता-लिहीताच सहजता येत जाइल

खयाल महत्वाचे !!!

आणि काव्य तर तुझ्यात ओतप्रोत भिनलयं

पुलेशु Happy

सुप्रिया.