जुनाट घर, पाऊस आणि आई

Submitted by रसप on 12 May, 2013 - 01:09

मातृदिनानिमित्त एक जुनी कविता......

पोपडे निघालेल्या भिंती
पिवळट पांढऱ्या बुरशीची नक्षी सजवायच्या
दर पावसाळ्यात गळक्या छताला
प्लास्टिकच्या झोळ्या लटकवायच्या

पावसाळ्यात पाणी मुबलक असायचं
नळाला दोनच तास यायचं
छतातून चोवीस तास गळायचं

दाराबाहेर नेहमीच घोटाभर पाणी साचायचं
छोट्या-मोठ्या दगडांवरून उड्या मारत जायचं!

सदैव एक कुबट वास..
भिजलेल्या कपड्यासारखा..
नाकात, छातीत भरायचा
आणि तुझ्या दम्याला
खरवडून काढायचा..

बाबांचा डबा.. आमच्या शाळा
आजीच्या शिव्या अन्.. छतातून धारा!
तुझी परवड कधीच जाणवली नाही
अन् तुझी सहनशीलता कधीच खुंटली नाही

आता दिवस बदललेत -
आज ते भाड्याचं घर नाही
छतातून धार नाही
भिंतीला बुरशी नाही
कामाचा भार नाही
पण खोलवर मनात एक बोच आहे तुझ्या खस्तांची
अंधाऱ्या आयुष्याला उजळायला घेतलेल्या कष्टांची

खरं सांगतो आई,
जेव्हा आभाळ भरून येतं
माझ्या डोळ्यांसमोर ते
आपलं जुनाट घर येतं....

(पावसाळी नॉस्टॅलजिया)
....रसप....
१९ जुलै २०११
'राजहंस मी' मधून........
http://www.ranjeetparadkar.com/2011/07/blog-post_19.html?spref=fb

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजहंस मी मधे वाचलीचय
अप्रतीमच आहे ही कविता
जेव्हा जेव्हा वाचली आहे मला नेहमीच आवडलेली आहे

न.ए.कु. यांचा प्रतिसाद कॉपी - पेष्ट करावा वाटत आहे

_______________________________________
नवाच एक कुणीतरी | 12 May, 2013 - 01:30

राजहंस मी मधे वाचलीचय
अप्रतीमच आहे ही कविता
जेव्हा जेव्हा वाचली आहे मला नेहमीच आवडलेली आहे

नक्की कळवेन रे जितू ...
जरा काही दिवस वेळ लागेल पण
सध्या मी पुण्यात आहे जरा कामधंद्याचं काही पाहावं म्हणतोय
तसा राजहंस मी १-२ दा वाचलाय पण काहीही म्हणण्यापूर्वी अजून वाचावा लागेल .............

तुला माझ्या मताबद्दल कराव्या लागत असलेल्या प्रतीक्षेबद्दल क्षमस्व

Happy

बाकी फोन वर संध्याकाळी बोलाव म्हणतोय Happy