एक वेगळाच 'फोर स्क्रीन' अनुभव (Bombay Talkies - Movie Review)

Submitted by रसप on 4 May, 2013 - 08:19

नियम आणि संकेत ह्यात फरक आहे. कायदा आणि संस्कार ही दोन वेगळी बंधनं आहेत. माणूस, विशेषकरून भारतीय माणूस अश्या द्विधेत बऱ्याचदा असतो. काही गोष्टी कायद्याने प्रतिबंधित असतात पण संस्कारात मुरलेल्या असतात आणि काही गोष्टी संस्कार करू देत नाहीत, पण कायद्याने त्या स्वीकारार्ह असतात ! आयुष्यभर आपण ह्या द्विधेतच राहातो. शेवटपर्यंत, दोन पर्यायांपैकी अचूक कुठला होता, हे लक्षात येतच नाही. मग परिस्थितीच्या हेलकाव्यासोबत, आपणही झुलत राहातो, भरकटत राहातो. मध्येच विरोध करायचा प्रयत्न करतो, पण तो टिकतोच असं नाही..... विचित्र आहे, पण खरं आहे.

gayatri.jpg

'बॉम्बे टॉकिज' मधली पहिली कहाणी ह्याच द्विधेत अडकलेल्या व्यक्तींची आहे. 'अविनाश' (साकीब सलीम) हा एक समलिंगी आकर्षण असलेला तरूण असतो. त्याच्या ह्या वास्तवाला तो लपवत नसतो. आणि त्यामुळे अर्थातच घरातूनही त्याला प्रखर विरोध व संघर्षाला सामोरं जावं लागतं. घर सोडावं लागतं. पुढे नवीन नोकरीत, त्याची ओळख गायत्री (राणी मुखर्जी) शी होते. गायत्री आणि देव (रणदीप हूडा) आर नॉट लिव्हिंग अ व्हेरी हॅपी मॅरीड लाईफ. ही ओळख वाढल्यावर कहाणी एका विचित्र वळणावर येते आणि असे काही प्रश्न प्रेक्षकाला विचारते, ज्यांची उत्तरं न देणं, त्यांना टाळणंच आपण जास्त सोयीचं समजतो.
एक अतिशय नाजूक विषय, ज्यावर खाजगीत बोलणेही बहुतेक लोक टाळतात, असा विषय करण जोहरनी खूप चांगल्या प्रकारे हाताळला आहे. रेल्वेच्या पुलावर गाणी म्हणणार्‍या लहान भिकारी मुलीचे पात्र का कुणास ठाऊक लक्षात राहाते. तिने गायलेली दोन्ही जुनी गाणी (लग जा गले... आणि अजीब दास्तां...) व काही संवाद सांकेतिक भाषेत खूप काही बोलतात. राणी मुखर्जी आता स्थूल दिसायला लागली आहे किंवा तिला मुद्दामच तसं दाखवलं असावं. एका दृष्यात अविनाश तिला म्हणतो, 'गले में मंगलसूत्र और आंखों में कामसूत्र !' - ते मात्र पटतं.
इतक्या परिपक्वपणे एक दिग्दर्शक एक समाजाने नाकारलेला विषय हाताळतो, तेव्हा प्रश्न पडतो हाच दिग्दर्शक फुटकळ प्रेमत्रिकोण रंगवण्यात स्वतःचा वेळ, पैसा आणि संवेदनशीलता वाया घालवतो आहे का ? पण ह्याही प्रश्नापासून आपण दूर राहिलेलंच बरं ! कारण उत्तर मिळणारच नाहीये !

purandar.jpg

मुंबई..... जितकी यशस्वी व्यावसायिकांची आहे, त्याहून जास्त डब्यात गेलेल्यांची; जितकी चमकणार्‍या सितार्‍यांची आहे, त्याहून जास्त तोंडावर आपटलेल्यांची; जितकी टोलेजंग इमारतींची आहे, त्याहून जास्त खुराड्यासारख्या चाळींची..... जितकी गडगंज श्रीमंतांची आहे, त्याहून जास्त निम्नमध्यमवर्गीयांचीही....
अश्याच एका तोंडावर आपटलेल्या अभिनेत्याची - जो एका नाकपुडीएव्हढ्या निम्नमध्यमवर्गीय घरात राहाणारा, डब्यात गेलेला व्यावसायिक असतो - कहाणी 'दीबाकर बॅनर्जी' सादर करतो. ही कहाणी आहे 'पुरंदर' (नवाझुद्दीन सिद्दि़की) ची. आजारी लहान मुलगी आणि समजूतदार बायकोसोबत राहाणारा पुरंदर एक दिवस त्याच्या भूतकाळाला अचानकच सामोरा जातो. पण त्याला सामोरं जातानाही त्याचा बावळट, आत्मविश्वासशून्य मध्यमवर्गीयपणा त्याला जाणवतो. फार काही होत नाही, पण स्वतःसाठी मूठभर स्वाभिमान आणि आजारी लहान मुलीला सांगण्यासाठी एक नवीन गोष्ट घेऊन तो संध्याकाळी घरी येतो. घराच्या चार फुटाच्या गॅलरीत रोज झोपणारा 'पुरंदर', त्या रात्री जरा जास्तच समाधानी चेहर्‍याने निजतो........
दीबाकर बॅनर्जी आणि नवाझुद्दीन सिद्दीकी - सिनेसृष्टीतील दोन अतिशय आश्वासक नावं. ह्या कहाणीत दोघंही अजिबात निराश करत नाहीत. २५-३० फूट दूर कॅमेरा लावूनही अभिनय कसा करतात, हे एक ह्यापूर्वी न पाहिलेलं प्रात्यक्षिक ही कहाणी दाखवते.
बर्‍याच काळानंतर हिंदी पडद्यावर दिसणारे सदाशिव अमरापूरकर, मध्यंतरी एका मराठी सिरियलमध्ये केलेला पिचकवणी अभिनय न करता, जुने 'सदाशिव अमरापूरकर' दाखवतात, हेही एक विशेष आकर्षण !!

vicky.jpg

बालपण.... बालपण हे एखाद्या झर्‍यासारखं असावं. त्याला फक्त खळखळ वाहाणं, मागचा-पुढचा विचार न करता उड्या मारणं हेच माहित असतं. पुढे जाऊन त्या पाण्याचं डोहात रुपांतर होतं, मोठ्या पात्रात रुपांतर होतं आणि त्याला एक खोली, दिशा मिळते. पण ह्या सुरुवातीच्या निरागस खळखळाटाला पर्याय नसतो. त्याला तेव्हापासूनच दिशा, खोली, ठहराव देण्याचा प्रयत्न करणे चूकच. त्यामुळे त्याचं नैसर्गिक सौंदर्य तर नासेलच, कदाचित वाढही खुंटेल, प्रगतीही थांबेल किंवा नको ती दिशा किंवा वेग मिळून वायाही जाईल. आपण झर्‍याला मुरड घालत नाही पण बाल्याला बंधनं घालतो. आपल्या अपेक्षांचे अवास्तव ओझे त्या नाजुक खांद्यांवर लादायचा प्रयत्न करतो. असेच नाजुक खांदे असतात 'विकी'चे (नमन जैन). वडिलांच्या (रणवीर शौरी) अवास्तव अपेक्षांचे ओझे नकोसे वाटत असतानाही वाहाण्याचा प्रयत्न करणारे. पण निरागस नमन, त्याच्या निरगसपणाच्याच जोरावर त्यातूनही मार्ग काढतो आणि आपलं स्वप्न सत्यात आणायचा निर्णय करतो. काय असतं त्याचं स्वप्न ? ते पाहूनच समजेल !
लहानग्या नमन जैनचं काम अप्रतिम सुंदर. त्याची जितकी दया येते, तितकंच त्याचं निरागस हसू भावतं.
झोया अख्तरनी छोट्यांचे भावविश्व सुंदर उभे केले आहे. विकीचे निष्पाप प्रश्न, मोठ्या बहिणीचं लहान भावाला सांभाळून घेणं, विकीला त्याची आवडती कॅटरिना परीच्या वेषात भेटणं, ई. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात राहातात.

vijay.jpg

माझ्या आत्याचे यजमान नास्तिक होते. पण घरातल्या कुठल्याही कार्यात ते उत्साहाने सहभाग घेत. ते आत्याला म्हणायचे, "माझा देवावर विश्वास नाही, पण तुझ्या विश्वासावर विश्वास आहे!" खरंच.. 'विश्वास' ही एक अनोखी चीज आहे. हा 'विश्वास' कधी कधी अशी काही शक्ती निर्माण करतो की, कुठल्याही खोल गर्तेतूनही माणूस बाहेर येऊ शकतो. असाच एक विश्वास घेऊन अलाहाबादहून एक तरूण - 'विजय' (विनीत कुमार) - मुंबईत येतो. 'अलाहाबादहून' आणि एक अचाट 'विश्वास' घेऊन.... म्हणजे काय ते कळलं असेलच! हो. तो अमिताभ बच्चनला भेटण्यासाठी येतो. पण इतर अनेक लोकांसारखा 'अ‍ॅक्टर' बनण्यासाठी नव्हे! त्याच्या आजारी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी. आपल्या घरचा मोरावळा अमिताभला चाटवण्यासाठी!!
गंमतीशीर वाटेल वाचायला, पण ज्या सहजतेने आणि वास्तववादी दृष्टिने हे कथानक मांडले आहे, त्यासाठी दिग्दर्शक अनुराग कश्यपला मानावं ! विशेष हे की, ही कथा मांडताना त्याने कुठेही आई-बहीणीच्या शिव्या वापरल्या नाहीत !!
'विनीत कुमार'ला आपण 'वासेपुर - २' मध्ये नवाझुद्दीनच्या मोठ्या भावाच्या - दानिशच्या - भूमिकेत पाहिलं होतं. तिथे त्याला फारसा वाव नव्हता, पण इथे मात्र त्याने मिळालेल्या संधीचं अक्षरशः सोनं केलं आहे.

--------------------------------------------------

ह्या चार गोष्टींना मिळून 'बॉम्बे टॉकिज' हे नाव का ?
एक तर चारही गोष्टी मुंबईत घडतात आणि चारही गोष्टींत टॉकीजचा - सिनेमाचा, सिनेसृष्टीचा - काही ना काही संबंध आहे.

stars.jpg

सरतेशेवटी, हिंदी चित्रपटसृष्टीची १०० वर्षं पूर्ण झाल्याचा जल्लोष म्हणून एक गाणं वाजतं. दोन तासात, चार कहाणींत जे काही ह्या सिनेमाने कमवलं असतं, ते सगळं ह्या ५ मिनिटांच्या गाण्यात मातीला मिळाल्यासारखं वाटतं. हिंदी सिनेसृष्टीची शतकपूर्ती झाल्याबद्दल ह्याहून वाईट मानवंदना एखादा 'RGV के शोले' वगैरे बनवूनच देता आली असती. ज्या जगतास अवर्णनीय सुंदर, मनमोहक संगीताचा अमूल्य ठेवा लाभला आहे, त्याला दिलेली ही मानवंदना निव्वळ 'द ळ भ द्री' आहे.... गाणं सुरू झाल्यापासून हे कधी संपतंय, ह्याचीच वाट मी तरी पाहात होतो. त्यात पडद्यावर ज्या बिनडोकपणाने ठिगळं जोडली होती आणि नंतर एकेक सितारे अवतरत होते, तेसुद्धा अत्यंत कंटाळवाणं होतं.

असो.
एकंदरीत हा 'फोर स्क्रीन' अनुभव नक्कीच एकदा घेण्यासारखा आहेच.
गो फॉर इट !!

रेटिंग - * * * १/२

images.jpghttp://www.ranjeetparadkar.com/2013/05/bombay-talkies-movie-review_4.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज जाणार आहे
हा किंवा मन्या सुर्वे Happy
हा बघितला तर इथे लिहिन
मन्या बघित्ला तर... .......... लिहिण्यासारखा आहे का तो चित्रपट ??? Uhoh ..:खोखो:

छान परिक्षण!
---

आज जाणार आहे
हा किंवा मन्या सुर्वे
<<
<<
कुटुंबासहीत जाणार असाल तर अजिबात जाऊ नका 'मन्या सुर्वे' पहायला.

शूट आउट अ‍ॅट वडाळा बद्दल कधी लिहिणार आहात ?
तुमचा रिपोर्ट वाचला की मगच पहायचा का नाही ते ठरवणार. Happy

इन्ना, शुट आऊट वडाला मला आवडला.
बराच अंगावर येतो तो सिनेमा पण तरी चांगला आहे
सगळ्यांनी चांगली कामं केलीयेत... अगदी तुषार कपुरही कानाला आणी डोळ्यांना टोचत नाही..
लहान मुलांना चुकुनही नेऊ नये आणि पहायला देऊ नये असले सीन्स आहेत त्यात Sad
पण ते वगळले असते तर मस्त होता

वरील सिनेमा बघण्यात इण्ट्रेस्ट वाटत नसल्याने बघणार नाही!

शुट आउट २क्लास आहे..
अनिल कपुर ची एक्टींग चांगली आहे
जॉन नी प्रयत्न केला आहे पण इतका काही भाईगिरी जमली नाहीच

मला उत्सुकता होती या चित्रपटाबद्दल.
चित्रपटाची लांबी कमी केल्यावर हेच लोक त्यांच्या नेहमीच्या चित्रपटांपेक्षा, चांगले चित्रपट देऊ शकतील असे वाटतेय.

एकंदर चांगला वाटतोय तर चित्रपट !
मी कुठल्यातरी च्यानेलवर ते द-ळ-भ-द्री गाणे पाहिले, आणि हा सिनेमा 'बघू नये' यादीत जमा करुन टाकला.
आता पहावा वाटतोय.

धन्यवाद..... !!

@इन्ना,
शूट आऊट.. पाहाण्याची ईच्छा होती, पण वेळ मिळाला नाही..! आता टिव्हीवर आल्यासच पाहिन म्हणतो.

'कथा' हा साहित्यप्रकार आवडणार्‍यांनी, त्यावर मनापासून प्रेम करणार्‍यांनी, आपल्याला कथा लिहिता येतात असं वाटणार्‍यांनी, 'तुम्ही चांगले कथालेखक आहात' असं ज्यांना लोक म्हणतात त्यांनी, चांगल्या-वाईट-कशाही कथा लिहू इच्छिणार्‍यांनी- अशा सर्वांनी 'बाँबे टॉकीज' हा सिनेमा जरूर पाहा. करण जोहर, दिबाकर बॅनर्जी, झोया अख्तर आणि अनुराग कश्यप - अशा चार बाप दिग्दर्शकांनी पडद्यावर सांगितलेल्या चार कथा. करण जोहरचं क्लासिक नॅरेशन (माझ्यासाठी धक्का!), दिबाकरचे अफाट अँगल्स (हे 'लिहिणार' कसे?), झोयाच्या पद्धतीतलं मनस्वीपण आणि अनुराग कश्यपच्या गोष्ट सांगण्याच्या पद्धतीतली डार्क, रॉ आणि फ्रेश ट्रीटमेंट- हे सारं माझ्या कथेत कसं आणता येईल? अवघड आहे..

आताच वाचलेल्या बाँबे टॉकीजच्या एका छान रिव्ह्युवरून एक भारीच गोष्ट लक्षात आली- मुंबई आणि चित्रपट या समान धाग्यांशिवाय आणखी एक समान धागा आहे- 'खोटं बोलणं'. खोटं अनेक गोष्टींसाठी बोललं जाऊ शकतं- स्वतःचे इंटरेस्ट्स आणि आनंद जपण्यासाठी, जिवलगांच्या भावना जपण्यासाठी, खरं बोललेलं इतरांना झेपणार नाही / कळणार नाही म्हणून, आपल्या इच्छेच्या आड कुणी येऊ नये म्हणून... प्रत्येक खोट्याची वेगळी तर्‍हा, अलग कथा..

दिबाकरने सांगितलेली नवाजुद्दीनची गोष्ट मला सर्वात जास्त आवडली. आपल्या किरकोळ देहयष्टीचा आणि सामान्य रूपाचा हा माणुस किती भन्नाट उपयोग करून घेतो. 'वासेपूर' मध्ये त्याच्या डोळ्यांत फुललेलं स्फुल्लिंग, आणि दिबाकरच्या या गोष्टीत सारी स्वप्नं मालवल्यागत विझवुनच टाकलेले डोळे..! 'कहानी' आणि 'तलाश' मधलेही त्याचे रोल्स असेच- वेगवेगळ्या बाबतीत अत्यंत इंटेन्स. बाँबे टॉकीज हा अख्खा सिनेमा म्हणून क्लासिक आहेच, पण नवाजुद्दीनने जेमतेम २५-३० मिनिटांत उभा केलेल्या महाराष्ट्रीयन 'पुरंदरे'साठी तरी हा सिनेमा बघाच बघा.

शेवटच्या 'त्या' आचरट गाण्याबद्दल अनुमोदन. खूप उंचीवर नेऊन ढकलून दिल्यागत आहे ते गाणे या सिनेम्यात. खूप सारे नायक नायिका एकाच वेळी पडद्यावर बघायचेच असतील, तर मग ते ओमशांतीओम मधलं गाणं बघावं. ते जरा तरी निदान सुसह्य आहे.

साजिर्याच्या पूर्ण पोस्ट ला अनुमोदन !! केजो नी सादर केलेली स्टोरी खरच अफलातून .. टोटली अनएक्स्पेक्टेड !

दिबाकरने सांगितलेली नवाजुद्दीनची गोष्ट मला सर्वात जास्त आवडली. आपल्या किरकोळ देहयष्टीचा आणि सामान्य रूपाचा हा माणुस किती भन्नाट उपयोग करून घेतो. 'वासेपूर' मध्ये त्याच्या डोळ्यांत फुललेलं स्फुल्लिंग, आणि दिबाकरच्या या गोष्टीत सारी स्वप्नं मालवल्यागत विझवुनच टाकलेले डोळे..! 'कहानी' आणि 'तलाश' मधलेही त्याचे रोल्स असेच- वेगवेगळ्या बाबतीत अत्यंत इंटेन्स. बाँबे टॉकीज हा अख्खा सिनेमा म्हणून क्लासिक आहेच, पण नवाजुद्दीनने जेमतेम २५-३० मिनिटांत उभा केलेल्या महाराष्ट्रीयन 'पुरंदरे'साठी तरी हा सिनेमा बघाच बघा.
<<
याला तर प्रचंड अनुमोदन !! मराठी पण किती नीट बोललाय , ' कोणी घर देतं का घर' :).
अमरापुरकरांचा रोलही उत्तम !