(जयपूर घटनेच्या निमित्ताने) अपघातग्रस्तांना मदत मिळावी यासाठी काय करता येईल?

Submitted by चेरी on 3 May, 2013 - 10:49

जयपूरला भर गर्दीच्या रस्त्यावर अपघात झाला. एक अख्खं कुटूंब अपघातात सापडलं.

जयपूर अपघात

पती, छोटा मुलगा जखमी तर पत्नी आणि ६ महिन्याचं बाळं अत्यवस्थ. बाजूने रहदारी चालूच आहे. जखमी माणूस मदतीची याचना करतो आहे, आणि कोणीच मदतीला येत नाही Sad मदतीसाठी थांबत नाही.

अतोनात वाईट वाटले. खूप हेल्पलेस. माणूसकी संपली आहे का खरचं असं वाटत आहे. का झालं असावं असं. आणि असं परत होऊ नये म्हणून काय करता येईल. त्यावेळी काय करता येऊ शकलं असतं. अपघात नुसत्या पहाणार्‍या लोकांना कमीत कमी काय करता आलं असतं.

आपल्या देशात, माणसात, समाजात खरचं इतकी नकारात्मकता आली आहे का. की काहीही करायला माणूस घाबरतो आहे. का घाबरतो आहे आपण काही अ‍ॅक्शन घ्यायला, पोलिंसाची इतकी भीती आहे का जनमानसात की मदत करायला कोणीचं तयार नाही. पोलिस जे जनतेचे मित्र हवेत, त्यांची का अशी प्रतिमा झाली आहे.
या प्रसंगात जवळच्या हॉस्पिटलला पण कोणीच कळवलं नसेल का. असे प्रसंग आसपास घडले तर काय करता येइल याबद्दल काही उपाय सुचताहेत का.

मला सुचणारे उपायः
शॉर्ट टर्म उपायः
१) अ‍ॅट लिस्ट जवळच्या हॉस्पिटलला कळवायला हवं. पोलिसांना कळवायला हवं.
२) हा अपघात पाहून ज्या लोकांना मदत करावीशी वाटली, पण पोलिसांची भीती वाटते आहे, त्यांनी त्या माणसाजवळ थांबून बाकी बघणार्‍या लोकांना आवाहन करायचं की मला याला मदत करायची आहे, आणखी कोणाकोणाला मदत करायची आहे त्यांनी कृपया या. प्लीज लवकर या. मग असे ४-५ जण आले तरी सगळ्यांनी मिळून पटापटा स्टेप्स घेता येतील.
३) सर्वांनी प्रमुख पोलिस स्टेशन्सचे, ओळखीच्या पोलिसांचे, अ‍ॅम्ब्यूलन्सचे, अक्सिडेंट हॉस्पिटल्सचे नंबर जवळ बाळगावेत. म्हणजे ऐनवेळी कॉल करायला हे नंबर हाताशी असतील.

लाँग टर्म उपायः
पोलिसमित्र असा काहीतरी उपक्रम हवा असं वाटतं आहे, ज्यायोगे आपल्यासमोर अपघात घडला तर मला मदत करायची आहे अशा लोकांना विनासायास मदत करता आली पाहिजे. त्यासाठी एक प्रोसेस हवी. अशा लोकांनी आपल्या जवळच्या पोलिस चौकीमध्ये आपलं नाव रेजिस्टर करावं, त्यांना १ आय-डी कार्ड मिळावे लायसन्सच्या आकाराचे. अशा लोकांना थोडं फर्स्ट एडचं ट्रेनिंग मिळावं. या लोकांना आपण पोलिस मित्र म्हणू.
तर अशा लोकांकडे एक प्रिंटेड डायरी असावी ज्यामध्ये शहरातल्या काही प्रमुख पोलिस स्टेशनचे नंबर्स, हॉस्पिटल्सचे नंबर्स असावेत. या पोलिस मित्रांनी आपल्या ओळखीच्या १-२ अन्य पोलिस मित्रांचे नंबर जवळ बाळगावेत. अशी जर मदत करू इच्छिणार्‍या लोकांची चेन आपण बांधली तर अपघातग्रस्तांना मदत करायला लोकांना भय रहाणार नाही असं वाटतं. या प्रोसेससाठी इच्छूकांना माफक शुल्क आकारले जावे. उदा. ५० रू. इ.
यासंबंधी अजून काही प्रश्न ज्याची उत्तरे मला सुचत नाहियेत ते असे की,
१) या प्रोसेसचा पोलिसांवर जास्त भार येऊ नये म्हणून काय करावे.
२) ही प्रोसेस राबवण्यासाठी जो काही खर्च येइल, ट्र्निंगसाठी जो खर्च येइल त्याची अ‍ॅरेंजमेंट कशी असावी? त्या परिसरात काम करणार्‍या सामाजिक संस्थेने हा भार हलका करावा का. की स्थानिक नगरसेवकाने वॉर्ड निधी वगैरे असे काही असल्यास त्यातून हा खर्च करावा.
३) या लोकांची यादी मेंटेन करणे, अपडेट करणे हे कसं साधायचं, कोणाची जबाबदारी.
४) या पोलिस मित्रांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत मदत करायचे. पण त्यांच्यावर सक्ती असता कामा नये. नाहीतर मदत करणार्‍यांवर परत कायद्याचा बडगा नको.

तुम्हाला यावर उपाय सुचताहेत का, वरील योजनेसंबंधी प्रश्नांची काही उत्तरे मिळताहेत का? ही योजना कदाचित रिअ‍ॅलिस्टिक नसेलही, तर अजून दुसर्‍या काही योजना सुचताहेत का?

ज्या लोकांनी अशी अपघातात सापडलेल्या लोकांची मदत केली आहे त्यांचे पॉसिटीव्ह, निगेटीव्ह अनुभव त्यांनी शेअर करा, त्यांनी अनुभवाच्या चार गोष्टी सांगा ज्या इतरांना उपयोगी ठरतील. जे स्वत: दुर्दैवाने अपघाताच्या अनुभवातून गेले आहेत, त्यांनी त्यांना त्यावेळी काय आधार/मदत हवा होता हे सांगा ज्याचा मदत करू इच्छिणार्‍या लोकांना फायदा होईल.

[ या विषयी आधी कोणत्या धाग्यावर ऊहापोह, चर्चा झाली असल्यास लिंक द्यावी. म्हणजे हा धागा काढून टाकता येईल.]

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म उपाय चांगले आहेत.

जितकी उदासीनता जयपुरच्या रस्त्यावर दिसली दुर्देवाने या धाग्यावर दिसेल.

याला कारण पोलीसांकडुन दिला जाणारा त्रास ही असेल. परवाच एका आजीला पुण्यात खोटा अपघात घडवुन तिच्या नातवाने इस्टेटीसाठी ठार मारले. अश्या वेळी मदत करणारा पण अडकु शकला असता.

पोलीस अश्या घटनांचे भांडवल करुन सामान्य नागरीकांना नाडतात. यासाठी हा नागरीक अश्या अपघातात सापडलेल्या लोकांना मदत करायला पुढे येतो ही पोलीस दरबारी नोंद असली म्हणजे त्रास कमी होईल.

लाँग टर्म मध्ये असे सुचवले आहे ते रास्तच आहे.

शॉर्ट टर्म उपाय चांगलेच आहेत. हे करुनही अत्यावश्यक सेवा तात्काळ मिळाली पाहिजे. सरकारी बाबु हे कसे आणि का घडले यातच जास्त वेळ घालवतात.

आपल्याकडे पोलिसांचा आणि अ‍ॅब्यूलन्सचा नंबर असतो. निदान तो सतत नजरेसमोर रहायला हवा, अशा ठिकाणी लिहिलेला असला पाहिजे. ( मुंबई पुणे हायवेवर तो अनेक ठिकाणी आहे. ) त्यांना फोन करुन अपघाताची बातमी कळवल्यास पुढची कार्यवाही व्हायला पाहिजे. तेवढी संवेदनशीलता मात्र अंगी बाणवावी लागेल.

मुंबईत निदान रात्री तर पोलिसांची गस्ती पथके आणि गाड्या असतात. अनेक मोठ्या शहरात त्या असायला हव्यात. त्यांच्या नजरेला असे काही पडले, तर ते अवश्य मदत करतात.

गेल्या जानेवारीत मी पुण्याला जात असताना, शिवनेरीला अपघात झाला आणि चालकालाच दुखापत झाली. समोरची पुर्ण काच फुटली. चालकाने त्याही अवस्थेत कंट्रोलरला फोन करुन कळवले. आणि अर्ध्या तासातच दुसरी बस आणि मदत आली.
तोपर्यंत आम्ही प्रवाश्यांनीच शक्य तितके प्रथमोपचार केले होते.

अपघातात जखमी झालेल्यांना त्वरीत वैद्यकिय मदत मिळवून देण्यासंबधी, सुप्रीम कोर्टाने काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत. त्याचीही माहिती सर्वांना असावी.

>>पोलीस अश्या घटनांचे भांडवल करुन सामान्य नागरीकांना नाडतात. >>
हम्म. हा त्रास होऊ नये असं वाटतं.

>>अत्यावश्यक सेवा तात्काळ मिळाली पाहिजे.>>
हे महत्त्वाचं आहे. डॉक्टर्स म्हणतात त्याप्रमाणे दुखापतीनंतरचा 'गोल्डन आवर' महत्त्वाचा असतो म्हणतात ना. त्यामुळे उपचार लगेच मिळाले पाहिजेत.

>>तेवढी संवेदनशीलता मात्र अंगी बाणवावी लागेल.>>
+१

>>सुप्रीम कोर्टाने काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत. त्याचीही माहिती सर्वांना असावी..>>
http://www.indiairf.com/Supreme%20Court%20Directive.pdf
यासंबंधी ही लिंक नुकतीच वाचली (हा धागा काढल्यानंतर). उपयुक्त वाटली. हीच आहेत का ती तत्त्व.

>>पोलीस अश्या घटनांचे भांडवल करुन सामान्य नागरीकांना नाडतात. >>
हम्म. हा त्रास होऊ नये असं वाटतं

------- किती लोकाना अशा त्रासाचा अनुभव आहे ? माझा अनुभव: रस्त्यावर अपघात झाला होता, नेहेमी प्रमाणे ५-५० माणसे होती. मी आणि मित्राने (अपघाताच्या आवाजाने धावलो) जखमीला रिक्षात घातले, आणि जवळच्या दवाखन्यात नेले. दुर्दैवाने जिव गेला हे दुसर्‍या दिवशी सकाळमधे वाचले :अरेरे:. मला (किवा मित्राला) कुठलाही काडीचाही त्रास पोलिसानकडुन झाला नाही...

पोलिसही माणसेच आहेत, त्याना त्या.न्चे काम करु द्या, विचारलेल्या प्रश्ना.न्ची जमेल तशी उत्तरे द्या... काही त्रास होत नाही... मदत करुन तर पहा...

पोलिसही माणसेच आहेत, त्याना त्या.न्चे काम करु द्या, विचारलेल्या प्रश्ना.न्ची जमेल तशी उत्तरे द्या... काही त्रास होत नाही... मदत करुन तर पहा... +१
मी अगदी ह्याच अनुभवातुन १५-१६ वर्षांपुर्वि गेले. पुण्यात माझा आणि माझ्या वडिलांचा अपघात झाल. ३१ डिसेंबर ची रात्र. कोणितरि मागुन आमच्या दुचाकिला धडक देवुन निघुन गेले. मी आणि माझे वडिल तिथे पडलो होतो. वडिल रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मला शुध्द होति थोडि फार.मी कसे बसे उभे राहुन मदत मागायचा प्रयत्न केला. ३०-४० मिन. बर्‍याच रिक्शा, कार, गाड्या गेल्या पण सगळे थांबुन बघत होते पण कोणिहि उचलुन हॉस्पिटल मधे न्यायला तयार नव्हते.शेवटि एक मुलगा आणि त्याची बहिण बाईक वरुन जात होते. ते थांबले. मुलाने बाईक रस्त्यात थांबवुन टेल्को ची बस थांबवलि आणि आम्हाला औंधच्या इनामदार हॉस्पिटल मधे नेले. तिथे त्यांनी उपचार द्यायला अगदी फर्स्ट एड द्यायला सुद्धा नकार दिला.. तो भला मुलगा अगदी भांडला त्या डॉक्टरांशि. पण वेळ न वाया घालवता त्यांनि त्याच बस ने कोटबागी मधे नेले. तोपर्यंत वडिलांची तब्येत अगदिच बिघडलि होति. खुप रक्त वाहुन गेले होते. वडिल गेले ४ दिवसांनी. ज्याने धडक दिलि तो कधिच पकडला गेला नाहि.
जो मुलगा आणि बहिण आमच्या मदतिला आले त्यांचि अजुनहि आठवण येते. त्याने आम्हाला मदत करुन पोलिसांना सुद्धा कळवले होते.

भारतात होते तो पर्यंत मी २ वेळा अपघात प्रसंगि मदत केली आहे. मला सुद्धा कधिहि कोणि पोलिसाने किंवा कोणाच्या नातेवाईकांकडुन त्रास झालेला नाहिये.

हे महत्त्वाचं आहे. डॉक्टर्स म्हणतात त्याप्रमाणे दुखापतीनंतरचा 'गोल्डन आवर' महत्त्वाचा असतो म्हणतात ना. त्यामुळे उपचार लगेच मिळाले पाहिजेत. >> अगदी खरे जर वेळिच मदत मिळालि असति तर आज माझेहि वडिल जिवंत असते.
खरे तर लोकांनिच नाहि तर डॉक्टरांनि सुद्धा त्वरित इलाज केले पाहिजेत. नाहितर लोकांनि हॉस्पिटल मधे नेवुन काय फायदा.

जेमतेम २०-२५ दिवसापुर्वीच अशाच एका अपघाताचे दृष्य आजतक किंवा अशाच चॅनलवर दाखवत होते. दुचाकीवर चाललेल्या कुटुंबाला ट्रकने धक्का दिला. बायको व मोठी १०-११ वर्षाची मुलगी गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडल्या होत्या. वडील व ४-५ वर्षाचा आकांताने रडणारा मुलगा होते. वडील प्रचंड हतबल होऊन डोके धरुन काय करु व काय नको अशा स्थितीत कसेबसे मुलाचा हात धरुन उभे होते. शेजारुन सर्व वाहने हळु जात होती पण कोणीच थांबले नाही. शेवटी आई व मुलगी दोघी रस्त्यावरच गेल्या. ते दृष्य ७-८ सेकंदापेक्षा जास्त पाहुच शकले नाही. अजुनही आठवले की कसेतरी होते.

चेरी तु दिलेली वरील लिंक पाहिली नाही. हिंमतच नाही झाली, पण त्यात काय असेल ह्याची जाणीव आहे.

प्रिया७, Sad ..

अगदी काही नाही पण ताबडतोप पोलिसांना अपघाताची माहिती व स्थळाची कल्पना तर द्यावी अशावेळेस इतर लोकांनी.

प्रिया, हॉस्पिटलमधे मदत नाकारली ते अगदीच निंदनीय. मला वाटतं डॉक्टरांच्या नितीमत्तेच्याही ते विरुद्ध आहे. केवळ त्यांच्याकडे योग्य ती साधने नाहीत या एकाच कारणास्तव दिलेला नकार मी समजू शकतो.
सरकारी हॉस्पिटल्स मधे मात्र अपघातासाठी खास विभाग असतो. अर्थात तिथेही थोडा सरकारी लाल फितीचा अनुभव येणारच.

प्रिया७ Sad खुप वाईट वाटलं...
दोन्ही शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म उपाय चांगले आहेत >>+१

दिनेशदा,

प्रिया, हॉस्पिटलमधे मदत नाकारली ते अगदीच निंदनीय. मला वाटतं डॉक्टरांच्या नितीमत्तेच्याही ते विरुद्ध आहे. केवळ त्यांच्याकडे योग्य ती साधने नाहीत या एकाच कारणास्तव दिलेला नकार मी समजू शकतो.

प्रतिक्रिया देणार्‍यांनी बरोबर का चुक ते लिहावे.

भारतात अ‍ॅक्सीडेंट हॉस्पीटल असे लिहलेल्या हॉस्पीटलात अशी सेवा देण्याची सुविधा असते. पेशंट दुर्देवाने सुविधा नसलेल्या ठिकाणी जर मानवतेच्या द्रूष्टीकेनातुन कुणी दाखल करुन घेतला आणि दगावला तर नातेवाईकच मग तुम्ही दाखलच का करुन घेतला म्हणायला कमी करणार नाहीत ही भिती हॉस्पीटल चालवणार्‍यांना असतेच.

वरील प्रतिक्रिया लिहीताना वास्तवाचे भान ठेवण्याचा प्रयत्न आहे. निराशाजनक लिहीण्याचा नाही. या चर्चेतुन चांगलेच निष्पन्न व्हावे.

भारतात अ‍ॅक्सीडेंट हॉस्पीटल असे लिहलेल्या हॉस्पीटलात अशी सेवा देण्याची सुविधा असते. पेशंट दुर्देवाने सुविधा नसलेल्या ठिकाणी जर मानवतेच्या द्रूष्टीकेनातुन कुणी दाखल करुन घेतला आणि दगावला तर नातेवाईकच मग तुम्ही दाखलच का करुन घेतला म्हणायला कमी करणार नाहीत ही भिती हॉस्पीटल चालवणार्‍यांना असतेच.

वरील प्रतिक्रिया लिहीताना वास्तवाचे भान ठेवण्याचा प्रयत्न आहे. निराशाजनक लिहीण्याचा नाही. या चर्चेतुन चांगलेच निष्पन्न व्हावे. >>>
नितीनचंद्र हॉस्पीटल ज्यात अ‍ॅक्सीडेंट पेशंट्साठि सुविधा असेल ते सगळिकडेच उपलब्ध नसतात ना. असे तुम्हला मोठ्या शहरांमधेच दिसेल फक्त. कोटबागी सुद्धा अशी सुविधा देणारे हॉस्पिटल नव्ह्ते. पण त्यांनि अ‍ॅटलिस्ट फर्स्ट एड देवुन मग वडिलांना लगेच अ‍ॅंब्युलंन्स मधुन दुसर्‍या हॉस्पिटलला पाठवले. हे तर नक्किच कुठलेहि हॉस्पिटल करु शकते ना. पेशंटला कुठल्या हि वहानात मधुन घेवुन अ‍ॅक्सीडेंट सुविधा देणारे हॉस्पिटल शोधण्यापेक्शा फर्स्ट एड देवुन हॉस्पिटल अ‍ॅंब्युलंन्स सर्व्हिस तर प्रोव्हाईड करु शकतात ना.

हो प्रिया, प्रथमोपचार ते करु शकतात. उपस्थित असलेले डॉक्टर पेशंटची प्राथमिक तपासणी करुन, त्यांच्या ओळखीतल्या हॉस्पिटल / क्लिनीकला फोन करुन तिथे तयारी ( रक्ताची / ऑपरेशनची ) करण्यासाठी सूचना देऊ शकतात. किंवा तसे त्यांनी करावे असे मला वाटते.
त्यासाठी अ‍ॅडमिट करुन, पेपर्स वगैरे करायची गरज नसते. निव्वळ माणूसकी म्हणून हे करावे.

खरं तर निराशाजनक घटना आहे, पण आमच्या शेजार्‍यांना मुंबई लगतच्या एका झोपडपट्टीजवळ भीषण अपघात झाला. रात्रीची वेळ होती. अपघात झाल्यावर आजूबाजूचे लोक लुटमार करायच्या हेतूनेच आले. त्या बाई खुप जखमी होत्या पण त्यांनी त्या अवस्थेतही भान राखूस, माझे सर्व दागिने घे पण आम्हा सर्वांना जवळच्या हॉस्पिटलमधे पोचव, असे हात जोडून सांगितले.... ते सर्व वेळेवर डॉक्टरकडे पोचले आणि वाचले.

लोकहो, नमस्कार.

घटना गंभीर आहे, तुमच्या निदर्शनास आली म्हणून गांभीर्य लक्षात आले आहे हे चांगले आहे.

अपघातानंतर अपघात करणार्‍या वाहनाच्या चालकाची जबाबदारी काय ते वरच्या एका पीडीएफ फाईलमध्ये आहे. आपल्यापैकी किती लोकांनी भारतात लायसन्स घेण्याआधी या कायद्याची माहिती घेतली आहे? अपघात झाल्यावर जर समजा दुचाकी व कार ची धडक झाली. सरळ दुचाकीवाल्याची चूक समजून पब्लिक जे काय करते त्यामुळे कुणीच थांबत नाही. पळूनच जातात.

पोलिसांचे अनुभव वेगवेगळे असतात तसेच हॉस्पिटल्स व डॉक्टरांचेही. चांगले वाईट सगळ्यांत आहेत. वर प्रियाताईंनी दोन्ही प्रकारचे हॉस्पिटलचे अनुभव लिहिलेले आहेत.

तर यांत ब्लेमगेम सोडून आपण काय करू शकतो? मी जे करतो, ते लिहितो आहे :

१. आपल्या एरियात, जिथे आपल्याला ४ लोक ओळखतात, तिथे अपघात पाहिलात तर १००% मदत कराच. यासाठी आपल्या गाडीत एक मोठी प्लॅस्टिक शीट/कार कव्हर डिकीत असू द्या. म्हणजे गाडी घाण व्हायची देखिल भिती नको..

२. प्रत्येक गावात अनेक धर्मार्थ अ‍ॅम्बुलन्स असतात. शासकीय रुग्णालयांच्या अ‍ॅम्ब्युलन्स्सेस असतात. पोलिस हेल्प लाईन असतात. यांचे नंबर सेव्ह करून ठेवा. अपघात दिसला तर किमान फोन करून त्यांना इन्फॉर्म करा.

३. अनेकदा हायवेवर मदतीसाठीचे नंबर लिहिलेले आपण पहातो. तसेच आपल्या गावातील समाजसेवी संस्था, किंवा "समाजसेवक" लोकांचे नंबर लिहिलेले बोर्ड, आपल्या गावाच्या आसपासच्या हायवेवर/हमरस्त्यांवर लावता येतात का ते पहा. आपल्या जवळपास वाढदिवसाचे बोर्ड लावणार्‍या आजी/माजी/भावी नगरसेवकांना चार चौघांत मोठ्या आवाजात ही आयडिया सांगितली तर लोकलाजेस्तव का होईना ते केले जाते, व इम्प्लिमेंटही होते, हा अनुभव आहे.

४. आपल्याच गावात/नेहेमीच्या रस्त्यावर गर्दी दिसली तर डोकावून पहा. रिकामचोटांची कमी आपल्या देशात नाही, पण उभ्या असलेल्या कोंडाळ्याच्या आत कुणी ओळखीचा/ची अपघातग्रस्त होऊन पडलेली असू शकते.

सगळ्यात महत्वाचे. माणूसकी विसरू नका Happy जमेल तेव्हा मदत करा. आपल्या हातून अपघात होऊ नये याची काळजी घ्या...