पाताळेश्वर

Submitted by ferfatka on 3 May, 2013 - 06:50

पाताळेश्वर

DSCN2642 copy2.jpg१ मे महाराष्ट्र दिनाची सुट्टी असल्याने बाहेर कुठे जावे याचा विचार करत बसलो. पण बाहेर रणरणते उन आणि तेही ४१ ड्रिगीच्या पुढे तेव्हा गप्प घरी बसून, टिव्ही पाहण्यात आनंद मानावा लागला. तरी संध्याकाळ होता होता ५.३० वाजता घराबाहेर पडलोच. लहानपणी मावस भावांबरोबर लपाछपीचे खेळ खेळण्यासाठी पाताळेश्वरला जायचो खूप मजा यायची. मोठ्या आकारातील खांब त्यामुळे लपायला चांगली जागा मिळायाची. आज बरेच वर्षांनी पाताळेश्वरला जात होतो. त्या विषयी....

पुणे शहरला प्राचीन इतिहास आहे. पूर्वी येथून कोकणातील कल्याण, चेऊन, सोपारा या बंदरांशी व्यापार चालत असे. हा व्यापार नाणेघाटातून होत असे. या मार्गावर अनेक स्तूप, लेणी व मंदिरे निर्माण झाली. पुणे जिल्ह्यात जुन्नर, कार्ले, भाजे या ठिकाणी लेणी खोदली गेली. पुण्यातील गणेशखिंड व भांबुर्ड्यात (शिवाजीनगर) या परिसरात लेणी आहेत. राष्ट्रकुट राजांच्या कारकिर्दीत पातळेश्वर लेणी खोदण्यात आले.

पाताळेश्वर हे पुणे शहरातल्या शिवाजीनगर (पूर्वीचे भांबुर्डे) भागात असलेले एक शंकराचे मंदिर. हे मंदिर इ.स.च्या ८ व्या शतकाच्या सुमारास लेण्याच्या स्वरूपात तयार केलेले आहे. इतर मंदिरांप्रमाणे देवाळाला कळस नाही. सध्या जंगली महाराज (जेएमरोड) या नावाने प्रसिद्ध असलेल्या रस्त्याशेजारी हे मंदिर आहे. एकसंध कातळातून हा लेणीमंदिराचा देखावा आपल्या पूर्वाजांनी साकारलेला आहे. शेजारीच दत्तसंप्रदायातील सत्पुरुष जंगली महाराजांची समाधी आहे. सध्या ही लेणी अर्कालॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाच्या देखरेखीखाली आहेत.
पुरातत्व खात्याने एक छोटीशी बाग या ठिकाणी उभारली आहे. परंतु दुर्लक्षपणामुळे बागेची दुरवस्था झाली आहे. बागेतून सात - आठ पायºया उतरून आपला प्रवेश होतो ते लेण्यांच्या प्रांगणात. येथे डावीकडे एक नंदीची जीर्णावस्थेतील एक मूर्ती ठेवलेली आहे. त्यानंतर लागतो तो गोलाकार खोदलेला नंदीमंडप. या मंडपाचा आकार गोलाकार छत्रीप्रमाणे असून, भोवताली चौकानी आकाराचे खांब आहे. १२ स्तंभ गोलाकार आकारत रचून त्यामध्ये आतमध्ये अजून चार स्तंभ आहेत व त्यामध्ये नंदी विराजमान आहे. नंदीच्या गळ्यात माळा, माळांमध्ये गुंफलेल्या घंटा हे सर्व कोरीवकामातून कोरलेले आहे. नंदीमंडप पाहून पुढे जाताच खडकात एक ओसरी खोदलेली दिसते. मध्ये दोन स्तंभ, आतमध्ये खोली आणि शेजारीच पाण्याचे टाके अशी याची रचना आहे. त्याच्या पुढे मुख्य प्रवेशद्वार आहे. यामध्ये एकूण २४ खांब आहेत. मंदिरामध्ये इतर मंदिरांप्रमाणे कोरीव काम आढळून येत नाही. कदाचित त्यावेळी असलेल्या परकिय आक्रमणांच्या भीतीमुळे कारागिरांनी येथील शिल्पाचे काम अर्धवट सोडून दिले असावे. काही खांबावर खोलगट कोनाड्यात पूर्वी मूर्ती असाव्यात. सभामंडपाचे छत व जमीन खडकात खोदलेली आहे. सभामंडपाच्या डाव्या व उजव्या भिंतीमध्ये पानाफुलांची नक्षी असलेली पट्टी कोरलेली आहे.

ही लेणी ब्राह्मणीशैलीची आहेत. बौद्ध - ब्राह्मणी शैलीतील फरक म्हणजे त्यांची असलेली रचना. बौद्धलेण्यांत विहार व चैत्य दिसतात तर ब्राह्मणी शैलीतील लेण्यांत सभामंडप व गभर्गृह असते. पाताळेश्वर लेण्यांमध्ये विहार दिसत नाहीत. विहार हे भिक्खू संघाच्या राहण्याची जागा असते. मात्र ही लेणी प्रार्थनामंदिर आहे. येथे इतर शंकराच्या मंदिरांप्रमाणे कोरीवकाम दिसून येत नाही. मंदिराचा जीर्णोद्धार पहिल्या बाजीरावांनी केल्याच्या नोंदी आहेत.
गर्भगृहात पितळी पत्र्याने मढवलेले शिवलिंग, बाण व नागाची प्रतिमा आहे. १० बाय १२ फूट आकाराचे हे गर्भगृह आहे. मागील भिंतीजवळ गणेशाची लहान, सुबक संगमरवराची मूर्ती आहे. शेजारी शेंदूराचा लेप असलेला मुखवटा आहे. मंदिराला लागूनच दोन लहान मंदिरे सुद्धा आहेत. डाव्या बाजुस एका दगडी चौथºयावर राम, लक्ष्मण व सीतेच्या संगमरवरी मूर्ती आहेत.

मुख्य मंदिर परिसर दिवसाही उजेड नसल्यामुळे अंधर असतो. ही गैरसोय दूर व्हावी यासाठी आता येथे ट्यूबलाईट लावण्यात आली आहे. पुण्यातील सर्वात प्राचीन शिवलिंग असल्यामुळे महाशिवरात्र, त्रिपुरी पौणिर्मा व दिवाळी पाडव्याला भाविक या लेण्यांमध्ये दिव्यांची रोषणाई करतात. या दिवशी प्रचंड गर्दी असते. एकूण येथील वातावरण शांत व मन प्रसन्न करणारे आहे. पर्यटकांनी व अर्थात सर्वांनीच एकदा अवश्य भेट द्यावी असे हे ठिकाण आहे.

अधिक फोटोसाठी खालील लिंक पहा.
http://ferfatka.blogspot.com/2013/05/blog-post.html

  • मंदिराची वेळ : सकाळी ८.३० ते सांय. ५.३० पर्यंत.
  • प्रवेश : विनामूल्य
  • कसे जायचे : शिवाजीनगर एस.टी स्टँडपासून बस अथवा चालत निघाल्यास १० मिनिटात पातळेश्वरला पोहचता येते.
  • अजून काय पहाल : चर्तुशृंगी, शनवारवाडा, कसबा गणपती, दगडूशेठ, तुळशीबाग अजून बरेच काही.
  • जंगली महाराज
  • त्रिशुंड गणपती
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती .

पुण्यातील गणेशखिंड व भांबुर्ड्यात (शिवाजीनगर) या परिसरात लेणी आहेत. >>>गणेशखिंड ची कोणती आहे?

मस्त माहिती आणि प्रचि.
कदाचित त्यावेळी असलेल्या परकिय आक्रमणांच्या भीतीमुळे कारागिरांनी येथील शिल्पाचे काम अर्धवट सोडून दिले असावे.> ठिसूळ दगड लागल्यामुळे अर्धवट काम सोडले असंही ऐकलं होतं.

जो_एस
पुण्यातील गणेशखिंड व भांबुर्ड्यात (शिवाजीनगर) या परिसरात लेणी आहेत. =========== गणेशखिंड म्हणजे सध्या फर्ग्युसन कॉलेजच्या जवळच्या हनुमान टेकडी. या ठिकाणी समकालिन लेणी आहेत. लेण्याला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. मी प्रत्यक्ष या ठिकाणी गेलो नाही. परंतु मित्रांकडून ऐकली आहे. उत्तर द्यायला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व.

छान Happy अभियांत्रीकीच्या वसतिगृहात ४ वर्षे वास्तव्य असल्याने, पाताळेश्वर ही जिव्हाळ्याची गोष्ट आहे Happy
@दिनेशदा, नाहीच दिसत, अगदी छोटसं फाटक आहे... पण आत... वर वर्णन केलंच आहे...
गेल्या चार वर्षात मात्र फार बदल केलेत, प्रचिमध्ये नंदीमंडपासमोर असलेल्या लाकडी चौकटींनी उघड्या जागा बंद करून खुराडा केलाय पाताळेश्वराच्या गाभ्याचा... आतमध्ये राम-लक्ष्मण-सीतेसमोर एक हनुमानाचीही मूर्ती आहे याचा उल्लेख नाही केलाय...
आम्ही प्रथम वर्षाला असतांना अभ्यास करायला जाऊन बसलोय तिथल्या कोनाड्यांमध्ये, थंड वाटायचं फार... Proud