'फॅमिली ड्रामा' - गप्पा सुकन्या कुलकर्णी यांच्याशी...

Submitted by माध्यम_प्रायोजक on 29 April, 2013 - 13:36

मानवी नातेसंबंधांचा थांग लागणं कठीण. ही नाती कायमच नाटककारांना भुरळ घालत आली आहेत.

वेगवेगळे विषय हाताळणार्‍या मराठी रंगभूमीवर दाखल झालेलं नवंकोरं नाटक 'फॅमिली ड्रामा' मानवी नात्यांना केंद्रस्थानी ठेवूनच काहीतरी सांगू पाहतं. आजच्या काळातल्या करमरकर कुटुंबाची ही कथा. जरासं विस्कटलेलं असं हे कुटुंब. 'खेळ नात्यांचा' ही दूरचित्रवाणी मालिका या घरातल्या गृहिणीचं सर्वस्व, तर कुटुंबप्रमुखाचा आपल्या मुलाशी फारसा संवाद नाही. मग एक दिवस हे चित्र पालटेल, असं वाटायला लावणारी एक घटना घडते.

अद्वैत दादरकर या तरुण नाटककारानं लिहिलेलं आशयघन पण हलकंफुलकं, मस्त मनोरंजन करणारं नवं नाटक म्हणजे 'फॅमिली ड्रामा'. या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे विजय केंकरे यांनी, तर निर्माते आहेत चंद्रकांत लोकरे. अजित भुरे, भक्ती देसाई, अद्वैत दादरकर, निखिल राऊत आणि सुकन्या कुलकर्णी यांच्या या नाटकात मुख्य भूमिका आहेत.

जुलै महिन्यात बोस्टन इथे होणार्‍या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात हे नाटक सादर केलं जाणार आहे. या निमित्तानं पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात या नाटकाच्या प्रयोगादरम्यान हर्पेनharshalc या मायबोलीकरांनी सुकन्या कुलकर्णी, अद्वैत दादरकर व अजित भुरे यांच्याशी गप्पा मारल्या.

Slide2.jpg

गुरू सुचेता भिडे-चापेकर यांच्याकडे भरतनाट्यम् शिकत असताना 'दुर्गा झाली गौरी' या 'आविष्कार'च्या नाटकाद्वारे सुकन्या कुलकर्णी यांनी रंगमंचावर पदार्पण केलं. त्यानंतर आलं 'झुलवा'. वामन केंद्रे यांनी दिग्दर्शन केलेलं हे नाटक बरंच गाजलं. या नाटकातल्या अप्रतिम अभिनयासाठी सुकन्याताईंना अनेक पारितोषिकं मिळाली. 'कुसुम मनोहर लेले' या नाटकानंही पुढे इतिहास घडवला. 'कश्मकश', 'शांती', 'महानगर' अशा मालिकांमधून आणि 'ईश्वर', 'एकापेक्षा एक', 'वारसा लक्ष्मीचा', 'सरकारनामा' अशा चित्रपटांमधून त्यांचा सहजसुंदर अभिनय दिसून आला. 'सरकारनामा' आणि 'वारसा लक्ष्मीचा' या चित्रपटांसाठी सुकन्याताईंना 'फिल्मफेअर' पारितोषिकंही मिळाली.

'फॅमिली ड्रामा' या नाटकाद्वारे बर्‍याच काळानंतर सुकन्याताईंना व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन केलं आहे. या नाटकातल्या 'सुमती करमरकर' या त्यांच्या भूमिकेचं समीक्षकांनी एकमुखानं कौतुक केलं आहे.

P4181493.JPG

'फॅमिली ड्रामा' या नाटकाद्वारे एवढ्या वर्षांनंतर तुम्ही रंगभूमीवर परतलात, आणि त्यातल्या तुमच्या भूमिकेबद्दल तुम्हांला यंदाच्या ’झी गौरव पुरस्कारां’मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं नामांकनही मिळालं.

सुकन्याताई : सर्वप्रथम मी 'मायबोली'चे आभार मानते की, इतक्या वर्षांनंतर मी परतल्यावरसुद्धा माझी दखल घेतली गेली. रंगभूमीवर परतण्यासाठी माझी मुलगी ज्युलिया कारणीभूत आहे. ती जेमतेम सहा वर्षांची आहे. मी 'मिफ्ता'साठी परीक्षक म्हणून काम करत असताना, संजय (मोने) ’झी’साठी परीक्षक असताना, ती आमच्याबरोबर नाटकं पाहायला यायची. त्यावेळी तिला नाटक पाहताना जाणवलं की, नाटक करताना समोरून लगेच प्रतिसाद मिळतो. या गोष्टीचं तिला फार अप्रूप वाटलं. त्यामुळे हे काहीतरी खूप छान आहे, असं तिला वाटलं आणि तिने मला सांगितलं की तू नाटकात काम कर. मी तिला म्हटलं की, 'अगं, नाटक करतांना मला दौरे असतील, त्यावेळी तुला सांभाळणं कठीण होईल.' तेव्हा ती म्हणाली, "मी आता मोठी झालीये, मी घेईन ना सांभाळून." त्यावेळी मग मी नाटकात काम करण्याचा निर्णय घेतला. मात्र नाटकात काम करण्याआधी मी ठरवलं होतं की, 'कुसुम मनोहर लेले'सारख्या गंभीर नाटकासारखं नाटक करायचं नाही. एखाद्या हलकंफुलक्या पण नवीन, मनाला समाधान देणार्‍या नाटकाच्या मी शोधात होते. त्यावेळी विजय केंकरेंनी मला या नाटकातल्या भूमिकेसाठी विचारलं. अद्वैतनं मला हे नाटक वाचून दाखवलं, आणि मला ते आवडलं. कारण अगदी साधं, सरळ, सोप्पं नाटक आहे. त्यातली भूमिका अतिशय छान आहे, आणि म्हणून मी हे नाटक स्वीकारलं. अजित भुरे हे माझे जुने मित्रच असल्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना मी अगदी कंफर्टेबल होते. त्याचबरोबर काहीतरी नवीन करू पाहणार्‍या, उगाच काहीतरी अंगविक्षेप, शब्दच्छल न करता निखळ विनोदाद्वारे मनोरंजनासोबत प्रेक्षकाला काहीतरी देण्यासाठी नाटक करण्याचा प्रयत्न करणार्‍या अद्वैत, निखिल आणि भक्ती या नव्या कलाकारांसोबत काम करतांनाही मला मजा आली. एक छान टीम तयार झाली आणि प्रेक्षकांनाही आमचं नाटक आवडतं आहे.

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनासाठी 'फॅमिली ड्रामा' हे नाटक निवडलं गेलं...

सुकन्याताई : जेव्हा हे नाटक निवडलं असं कळलं तेव्हा सुखद धक्का बसला. कारण इतरही नाटकं सध्या सुरू आहेत आणि त्यांनाही प्रेक्षकांचा चांगला पाठिंबा मिळतोय. असं असतांना आमचं नाटक निवडलं गेलं याचा खूप आनंद झाला. अमेरिकेतल्या प्रेक्षकांना हे नाटक नक्की आवडेल, असं मला वाटतं. कारण तिथे म्हणा किंवा इथे म्हणा, आपण सगळेच कायम तणावाखाली जगत आहोत. सगळ्यांनाच रोज वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय. तेव्हा या सगळ्या ताणतणावांपासून थोडा आराम मिळावा, असं हे नाटक आहे. यातल्या सर्वच भूमिका या सगळ्यांनाच आपल्याशी कुठे ना कुठे निगडीत आहेत, असं वाटून अपील होणार्‍या आहेत. कुणीही उगाच काहीतरी करायचा म्हणून विनोद केलेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे नाटक तिथल्याही लोकांना आवडेलंच.

या नाटकातल्या तुमच्या भूमिकेबद्दल सांगाल?

सुकन्याताई : सुमती करमरकर ही व्यक्तिरेखा मी या नाटकात साकारते आहे. फार गोड भूमिका आहे ही! रोजच्या ताणतणावांवर उतारा म्हणून ही सुमती जे काही उपाय योजते ते भन्नाट आहेत. प्रेक्षकांना माझी भूमिका आणि आमचं हे नाटक नक्की आवडेल, याची मला खात्री आहे.

यावेळच्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाची थीम आहे 'ऋणानुबंध'. तुमच्या आयुष्यातल्या अशा कोणत्या व्यक्ती, संस्था आहेत, ज्यांच्याशी तुमचे ऋणानुबंध जुळले आहेत?

सुकन्याताई : खूप लोक असे आहेत ज्यांच्यामुळे मला खूप काही शिकायला मिळालं. त्यांतले सगळ्यांत पहिले म्हणजे माझे आई-बाबा. सगळ्यांसाठीच ते तसे असतात, पण माझ्या बाबतीत मात्र ते खूप जास्त महत्त्वाचे आहेत, कारण मला दोन खूप मोठे अपघात झाले होते. आणि दुसर्‍या वेळी तर मी यातनं पुन्हा उठेन की नाही, असं मला वाटावं इतका भयंकर तो अपघात होता. मात्र त्या सर्वांवर मात करून, पुन्हा नव्याने कामाची सुरूवात करायची आणि शेवटपर्यंत करत राहण्याची जिद्द त्यांनी मला दिली. माझ्या आयुष्य़ात अतिशय महत्त्वाचं स्थान असणारी संस्था म्हणजे 'आविष्कार’ची चंद्रशाला', जिथून माझ्या अभिनयाची सुरूवात झाली. सुचेता भिडे-चापेकर यांच्याकडे मी बारा वर्ष भरतनाट्यम शिकले, ज्यामुळे मला अभिनेत्री म्हणून हवी असणारी ग्रेस, कुठल्याही गोष्टींत हवं असणारं पूर्णत्व, नेमकेपणाची शिकवण मिळाली. सुलभाताई देशपांडे, गुरू पार्वतीकुमार, विजया मेहता, वामन केंद्रे यांच्यासोबत काम करायला मिळालं, भक्ती बर्व्यांसोबत 'नागमंडल' केलं. माझ्या पहिल्या चित्रपटाचे, ’ईश्वर’चे, दिग्दर्शक के. विश्वनाथ, तसंच अरूणा राजे, विकास देसाई, श्याम बेनेगल, बासू चटर्जी ही आणि अशी अनेक लोक आहेत ज्यांच्याकडून मला खूप काही मिळालंय, त्यामुळे मी कधीच त्यांच्या ऋणातून मुक्त होणार नाही.

आगामी योजना, चित्रपट किंवा मालिकांबद्दल काही सांगाल?

सुकन्याताई : सध्या मी 'फॅमिली ड्रामा'साठीच वेळ देतेय, आणि 'आराधना' ही मालिका सुरू आहे. बाकी नवीन चांगली पटकथा, संहिता आली तर नक्कीच काम करायला आवडेल. नाट्यपरिषदेवर निवडून आल्यामुळे आता डोक्यात बर्‍याच योजना आहेत, त्यामुळे त्या प्रत्यक्षात आणण्याचा माझा प्रयत्न असेल. तरूण मुलं, जी नाट्यव्यवसाय वाढता ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी, तसंच बालरंगभूमीसाठी काम करायचंय. पुण्यात जशी 'ग्रिप्स थिएटर'ची चळवळ वाढली आहे, तशी मुंबईतसुद्धा सुरू करण्याचा प्रयत्न मला करायचाय.

***

छायाचित्र - हर्पेन व harshalc

***

उद्या वाचा संवाद श्री. अद्वैत दादरकर यांच्याशी...

***

'फॅमिली ड्रामा' या नाटकाचे बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनासाठीचे प्रायोजक आहेत 'सुगी ग्रूप' (http://www.sugee.co.in/).

***
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुकन्या आणि संजय मोने काही वर्षांपूर्वी मायबोलीकर झाले. थोडे उत्खनन केले तर कदाचीत त्यांच्या पोस्ट अजूनही जुन्या मायबोलीवर सापडतील. नाटक बघायची उत्सुकता लागली आहे.

जुन्या मायबोलीवर संजय मोने (monez). Happy
सुकन्या काही सापडल्या नाहीत.
मध्यंतरी नीलकांती पाटेकरही सदस्य झाल्याचं आठवतंय. असो.

नाटक चांगलं असावं असं वाटतंय. BMMला जाणार्‍यांनी नुसती मजा करू नका. सविस्तर वृत्तांतही लिहा. Happy

सुकन्या मोनेंची पोस्ट इथे पहिलीच आहे. अगदी जुन्या मुरलेल्या मायबोलीकरासारखी लिहली आहे.
http://www.maayboli.com/hitguj/messages/122198/122073.html?1161100076

त्यांचा आयडी sukumoz
http://www.maayboli.com/user/22773

अरेच्च्या तिथेच आहेत की. Happy

(अवांतर : तिथे एक 'पेज घेण्यासाठी पाउंडातून डॉलरमधे पैसे कसे भरायचे' अशी एक त्रिखंडात्मक पृच्छा आहे. Lol
विषयांतरासाठी क्षमस्व. Happy )

बि एम एम ला गेलो तर नाटक बघूच. मुलाखत आवडली. भारतात असताना कुसूम मनोहर लेले बद्दल बरच ऐकलं होतं. प्रयोग व्हायचे तेव्हा काही जमलं नाही जायला पण इतर मालिकां मधून आणि नुकत्याच संपलेल्या "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मालिकेत त्यांना राधाची आत्या म्हणून बघायला मजा आली. अगदी सहज वावर होता त्यात.

ही त्यांची पोस्ट Lol

Sukumoz

Saturday, October 07, 2006 - 6:04 am:

अरे संज्या हित हायेस व्हय म्या म्हनल कुट गेल माज ध्यान?
तुले तंबाखु आणाले धाडले ना रे टपरीवर, त हित गप्पा करत बसला व्हय, मले मशेरी लावाची हाय नव्ह का. म्या वाट बघुन र्‍हायले ना रे बाप्पा तुजी तिकड चल बीगी बीगी तंबाखु आण बाबा.