अननस भात

Submitted by मानुषी on 28 April, 2013 - 03:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अननस भात
साहित्य: २ वाट्या तांदूळ(दिल्ली राईस), एक चमचा तूप, चिमटीभर हळद, १ वाटी अननसाचे तुकडे*(खाली टीप पहा),
२ वाट्या साखर, ४/५ लवन्गा, थोडे तुपावर परतलेले काजू, पावणे चार वाट्या पाणी, पाइनॅपल इसेन्स.

*अननसाच्या चकत्यांमधला कठीण भाग काढून टाकून द्या. बाकी अननसाचे सुरीने बारीक तुकडे करा. त्यात थोडी साखर घालून ठेवा. १५/२० मिनिटांनी अननसाला साखरेमुळे पाणी सुटेल. मग हे अननस+साखरेचं मिश्रण २/३ मिनिटे मायक्रोवेव्हमधून काढा. आता अननस थोडा शिजल्यासारखा होईल. बाजूला ठेवा.

क्रमवार पाककृती: 

आता दिल्ली राईस धुवून निथळत ठेवा. कुकरमधे १ चमचा तूप टाकून त्यात ४/५ लवंगा टाकून नंतर हळद टाका व लगेचच निथळलेला दिल्ली राईस घालून थोडा वेळ परता.
हळद करपू देऊ नका नाहीतर भाताचा रंग आणि वास बिघडेल.
आता या परतलेल्या तांदुळात पावणे चार वाट्या पाणी घालून १ शिट्टी करून पुन्हा २ मिनिटे बारीक गॅसवर राहू द्या.
प्रेशर गेल्यावर भात थंड करून घ्या. मग या भातात २ वाट्या साखर, एक वाटी अननसाचे शिजवलेले तुकडे घाला. आणि अननसाला सुटलेला रसही घाला. फ़क्त हा रस अंदाजाने घालावा. आपण भातात दुपटीपेक्षा कमीच पाणी वापरले आहे. त्यामुळे साधारणपणे अर्धी वाटी रस या भातात खपतो. ७/८ थेंब अननस इसेन्स घाला.

एकीकडे थोड्या तुपावर काजूचे तुकडे लालसर परतून घ्या. तेही या भातात वरून पेरा.
आणि हे सगळं भाताचं मिश्रण मायक्रोवेव्हमधे ठेवा. ७ ते ८ मिनिटात अननस भात तयार!
चांगला थंड झाला की हा थोडा आळतो. थंडच सर्व्ह करावा.
खरं म्हणजे दुसऱ्या दिवशी जास्ती छान लागतो.

अधिक टिपा: 

अननस कच्चाच वापरू नये. विशेषत: फ़्रूट सलाडमधे जर कच्चा अननस वापरला तर फ़्रूट सलाड कडसर लागते.
पण असा थोडा शिजवलेला अननस वापरला तर मात्र फ़्रूट सलाड छान चविष्ट होते.
असा अननस शिजवलेला फ्रिजमधे अव्हेलेबल असेल तर ...असा भात, बेक्ड व्हेजिटेबल , दह्यातले अननसाचे रायते, फ्रूट सलाड असं काही काही पटकन बनवता येतं.
कच्चा अननस खाल्याने कधी कधी घश्याला त्रास होऊ शकतो.
-

माहितीचा स्रोत: 
मावशी.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव.. मानुषी... सुंदर, जबरदस्त लागत असणार..

रिकाम्या अननस शेल्स मधे भरून सर्व कर Wink

सुरेख ! मानुषी तुमच्या पाककृती पण हटके आणी पौष्टीक असतात. अननस भात जाम आवडलाय, फोटु पण मस्त ! आणी टिप्स पण आवडल्या.:स्मित:

नारळ नाही घालत तुम्ही मानुषीकाकू? नारळ घातला की अधिक सुंदर लागतो.

अननसाचे सर्व प्रकार आवडतात. हा भातही आवडता. फोटो मस्त आलेत.

सर्वांना धन्यवाद.
पौतै........आमच्याकडे घरीदारी ज्यात त्यात नारळ. म्हणून फॉर अ चेन्ज यात नो नारळ!
पण नॉट अ बॅड आयड्या!

गोड भाताचा प्रकार आहे हा. शिर्षक वाचून मला वाटले थाइ पद्धतीचा फ्राइड राइस आहे की काय. Happy अननसाचा स्वाद आवडतो मला आणि घरात सगळ्यांनाच. करुन बघेन एकदा.

इथे कॅनमध्ये जी फळं (चेरीज, ऑरेंज, पायनॅपल इ) ते घालून माझी मैत्रिण असाच काश्मिरी पुलाव (?) करायची. भात शिजताना त्यात थोडं दूधही घालायची. तिखट छोल्यांबरोबर चांगला लागायचा हा गोड भात.