एगलेस कॅरॅमल केक

Submitted by मुग्धा केदार on 17 April, 2013 - 07:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कणीक - दिड कप
साखर - १ कप
दूध - १ कप
तेल - पाउण कप ( थोडे कमी )
बेकिंग सोडा अणि बेकिंग पावडर प्रत्येकी १ टी स्पून
दालचिनी पावडर किंवा कॅरॅमल इसेन्स - १ टी स्पून
थोडे काजू- बेदाणे.

क्रमवार पाककृती: 

१) प्रथम कणीक, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा एकत्र करुन २ वेळा चाळून घेणे, बाजूला ठेवणे. यातचं काजू- बेदाणे टाकावेत.
२) साखर एखाद्या नॉन-स्टिक भांड्यात मंद गॅसवर कॅरॅमल करण्यासाठी ठेवणे, सतत ढवळत रहावे, सोनेरी रंग आला की गॅस बंद करणे.
३) कॅरॅमल साधारण कोमट झाले की त्यात कोमट दूध घालून एकत्र करुन घेणे.
४) कॅरॅमल दूधात चांगले मिक्स झाले की त्यात तेल व इसेन्स घालावे.
माझ्याकडे ओवन नाही म्हणून मी नेहमी कूकर मधेच केक करते.
५) मंद गॅसवर कूकर गरम करत ठेवावा ( पाणी न घालता ).
६) केकच्या टीनला आतून तूप लावून रेडी करुन ठेवावे.
७) कूकर चांगला गरम झाला कि, दुधाचे आणि कणकेचे मिश्रण पटापट एकत्र करून टीनमधे ओतून लगेच कूकरमधे ठेवावे. गॅस अगदी मंद ठेवावा, ३०मिनिटांनी केक होईल,
झाकण लावताना कूकरची रिंग आणि शिट्टी काढून ठेवावी, बाहेरील झाकणाचा कूकर असल्यास वरती झाकण म्हणून जाड तवा ठेवावा.
३०मिनिटे कूकरचे झाकण अजिबात काढू नये. केक झाल्यावर गॅस बंद करून झाकण काढावे, थोडवेळ केक कूकर मधेच ठेवावा.
फ़ोटो मोबाईलवर काढलेले आहेत त्यामुळे एवढे छान आले नाहीत.

माहितीचा स्रोत: 
माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कूकर कोरडाचं हवा, पाणी अजिबात नको, आपल्याला केक बेक करायचा आहे, वाफवायचा नाही.
झाकण लावताना कूकरची रिंग आणि शिट्टी काढून ठेवावी, बाहेरील झाकणाचा कूकर असल्यास वरती झाकण म्हणून जाड तवा ठेवावा. हे न विसरता करायचे.

गेल्या आठवड्यातच केक करताना लाईट गेले. मोठे अ‍ॅल्युमिनीयमचे पातेले ४ मिनीट गर केले मोठ्या गॅसवर. एक छोटे स्टॅन्ड ठेवुन त्यात केकचे भांडे ठेवले. वर अ‍ॅल्युमिनीयमचे झाकण ठेवले. फक्त दर १० मिनीटांनी झाकण उलटे केले. जेणेकरुन झाकणावर जमा झालेले बाष्प केकमधे पडु नये. मस्त झाला केक Happy

छान दिसतोय.

पाककृतीमधे फोटो टाकायची थेट सोय नाही. प्रतिसादातली लिंक संपादन करुन कॉपी करायची मग रेसिपी संपादन करुन तिथे ती लिंक पेस्ट करायची.

फोटो मूळ रेसिपीतच असला म्हणजे चांगले असते. प्रतिसाद जर दुसर्‍या पानापर्यंत गेले तर फोटो दिसत नाहीत.

सोपी आहे रेसिपी. धन्यवाद. Happy

>> कॅरमल इसेन्सला पर्याय सांगा
दिलाय की त्यांनी - दालचिनी पावडर किंवा कॅरॅमल इसेन्स
व्हॅनिला इसेन्स वापरता येईल. दालचिनीबरोबर किंवा ऐवजी जायफळही चांगलं लागेल. यातच सफरचंदाचे काप घातले तर जायफळ+दालचिनी भारी लागेल.

भारी!!

मस्त आणि सोपा केक वाटतोय. मी नक्की करून बघणार. फक्त एक बदल करेन ते म्हणजे तेलाऐवजी तूप किंवा लोणी वापरेन. कूकरमधेच करेन, आतापर्यंत कधी केला नाहीये.

फोटो बघून तर हा केक करण्याची ऊर्मी बळावली.

फक्त हे कळलं नाही,
<<बाहेरील झाकणाचा कूकर असल्यास वरती झाकण म्हणून जाड तवा ठेवावा.>>
कशावर झाकण ठेवायचं? कूकरमधल्या केकच्या भांड्यावरच ना?

छान आहे रेसिपी Happy

पौर्णिमा, कॅरॅमेल थंड झाले की कडक होण्याच्या आधीची स्टेप , साखर गोल्ड्नब्राऊन व्हायला लागली की लगेच दूध मिसळले तर कडक होणार नाही. कॅरॅमल क्रिम बनवताना तसेच...

माझ्या रेसिपीवर सगळ्यांनी प्रतिसाद दिलेत त्याबद्दल धन्यवाद. ही पहिलीचं फोटोसहीत रेसिपी, अजुनही फोटो टाकता आलेच नाहीत, प्रतिसादतचं आहेत. Lol Lol Lol

कूकरच झाकण म्हणून कूकरवर जाड तवा ठेवायचा ते सुध्दा बाहेरच्या झाकणाचा कूकर असेल तर कारण त्याची रिंग आणि शिट्टी काढून झाकण लावल्यास मधे गॅप राहते.

कॅरॅमल साधारण कोमट झाले की त्यात कोमट दूध घालून एकत्र करुन घेणे.कॅरॅमल कडक होत नाही असं छान मिक्स होतं