गोड आप्पे

Submitted by पूनम on 16 April, 2013 - 02:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मायबोलीवर आप्प्यांची लाट आली, पण सगळे तिखटाचे! गोड आप्पेही केले जातात आणि आवडीने खाल्ले जातात. पण त्याची कृती काही कोणी टाकेना. शेवटी माझ्याकडे जबाबदारी आली! Proud आता आप्पे रेस्प्यांना पूर्णत्व आलं!

१) दोन वाट्या* तांदूळाचा रवा/ साधा रवा
२) एक वाटी नारळाचे घट्ट दूध
३) एक वाटी गूळ बारिक किसलेला
४) एक टी स्पून खायचा सोडा
५) वेलदोड्याची पूड चवीनुसार
६) काजूचे तुकडे, नारळाचे बारिक काप- ऐच्छिक
७) पाव वाटी साजूक तूप

*वाटी- आमटीची. साधारण वजन १२५ ग्रॅम.

क्रमवार पाककृती: 

१) नारळाच्या दूधात गूळ विरघळवून घ्यावा.
२) त्यात तांदूळाचा रवा/ साधा जाड रवा आणि सोडा एकत्र करावा. हे मिश्रण किमान चार तास* ठेवावे.
३) चार तासांनंतर आप्प्यांच्या मिश्रणात वेलदोड्याची पूड, काजू आणि नारळाचे काप आणि पाव वाटी साजूक तूप घालून मिश्रण एकजीव करावे.
४) आप्पे पात्राला तूपाचा हात लावून आप्पे करावे.

*वेळ मोजताना आधी चार तास भिजवून ठेवायचा वेळ मोजलेला नाही. १० मिनिटे मिश्रण एकजीव करून एक घाणा तयार करणे यासाठी आहे.

गोड होतात! Happy

god aappe.jpg

वाढणी/प्रमाण: 
२८ आप्पे (अगदी खात्रीने आकडा देऊ शकते, कारण या प्रमाणात चार घाणे झाले बरोब्बर)
अधिक टिपा: 

१) नारळाचे दूध आणि गूळ हे कॉम्बी अगदी मस्त जाते. पण गूळाऐवजी साखर वापरू शकता.

२) मिश्रण घट्ट आहे असे वाटत असेल, तर साधे पाणी घालून हवी ती कन्सिस्टन्सी मिळवावी.

३) ह्यात पिकलेले केळे घालून वेगळा स्वाद आणता येतो. अर्थातच, आमरसही घालता येईल.

४) नेहेमीचे आप्प्यांचे पीठ भिजवलेले असेत, तर ऐनवेळी त्याच्या एका भागात साखर आणि वेलदोडा घालून गोड आणि तिखट अशी दोन्ही व्हर्जन्स करता येतील. पण नारळाचे दूध घातलेले आप्पे अर्थातच जास्त चविष्ट लागतात.

माहितीचा स्रोत: 
रुचिरा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिखट आप्प्यांबरोबर चटणी असते, तसे या गोड आप्प्यांबरोबर काय घ्यावे तोंडी लावायला हे माहित नाहीये. माहितगारांनी प्रकाश टाका कृपया.

मला गोडच आप्पे आवडतात. आमरसाबरोबर छान लागतात.
हे ह्या पद्धतीने करेन बघेन, आधीच धन्यवाद.

व्वा! फोटो भारी आहे. मस्त खरपूस खमंग दिसताहेत आप्पे!

अगदी मस्त जाते.>> कुठे जाते?
आप्पे पात्राला तूपाचा हात लावून आप्पे करावे.>> पहिला घाणा झाल्यावर कसा हात लावावा? की थालपीठाच्या तव्यासारखी दोन आप्पेपात्रं लावावीत?
Proud

मायबोलीवर आप्प्यांची लाट आली> खरच लाट आलि आहे...आणी मा झ्या घरीपन ..सध्या हेच चालु आहे ...तिखटाचे आप्पे ! गोड आप्पे... दिनेशदा नी सांगीतले तसे मि केले शनिवारि

(एक कप तांदळाचे पिठ, पाव कप गूळ, अर्धा कप ओले खोबरे, आणि एक जास्त पिकलेले केळे ( कुस्करुन ) असे सगळे एकत्र करायचे. थोडे थोडे पाणी घालत घट्टसर भिजवायचे ( पाणी फार लागत नाही ) त्यात हवे तर बेदाणे वगैरे घालायचे. आणी हवा तर सपाट चहाचा चमचा सोडा घालायचा. १० मिनिटे ठेवून नेहमीप्रमाणे अप्पे करायचे.

तांदूळ भिजवून वाटून पण हे करतात. त्यावेळी खोबरे , केळे तांदळासोबतच वाटायचे आणि गूळ घालून पण एकदा फिरवायचा. यात एक छोटा चमचा मैदा पण घालतात. वासाला वेलची !) थोडे करपले आहेत..

पन आता मस्त जमतात.

000_1.jpg

आनि हे मिक्स डाळीचे

000_2.jpg

पौर्णिमा, अप्रतिम दिसतायत अप्पे. फिनिशिंग जबरी आहे. Happy
आणि तु तांदुळाचा रवा/साधा रवा लिहिलायस. तो साधा म्हणजे आपला नेहमीचा उपम्याचा रवा का? जाड की बारिक?
केळ किंवा आमरस अ‍ॅड करायची आयडीया जबरी आहे पण. Happy सुपर एकदम.:)

आमच्याकडे सासरी पुपो, मोदक इ. गोड पदार्थांबरोबर नारळाचं दूध घेतात. आता इथे रेस्पीतच ना.दू. आहे त्यामुळे या गोड अप्प्यांबरोबर तूपच चांगलं लागेल बहुतेक.

माझी आजी आली असेल आणि नेहमीचे तिखट आप्पे करायचे ठरवले असतील तर ती हमखास तिच्यासाठी असे थोडे गोड आप्पे करायला पीठ बाजूला ठेवायला सांगते Happy अर्थात त्यात ना.दू. घातलेलं नसतं, आता घालून बघेन नेक्स्ट टाइम Happy

अगदी मस्त जाते.>> कुठे जाते?>> मंजूडी: आप्पेपात्रात!
पहिला घाणा झाल्यावर कसा हात लावावा? >> पहिला घाणा झाल्यावर तूपाचा चमचा लावावा!

Proud

दक्षिणा: जाड रवा.
तांदूळाचा रवा म्हणजे तांदूळ भिजवून, वाळवून, वाटलेला रवा किंवा तयार मिळतो तो रवा, जो इडलीसाठी वापरला जातो. हा घरात नसेल, पण आप्पे खुणावत असतील, तर नेहेमीचा जाडा रवा चालतो.

कमलाबाईंनी तर कणीकही रेकमेन्ड केली आहे. पण माझा तरी धीर होणार नाही कणकेचे आप्पे करायचा!

धन्स ऑल. गुळामुळे अंमळ खमंगच होतात.

माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की!

मस्त मस्त. यांना नैयप्पम म्हणतात आणि मला प्र चं ड आवडतात. पिकलेलं केळं घालून तर खासच लागतात. माटुंग्याला मिळतात विकत.

वा! पौर्णिमा छान आहेत आप्पे. आपल्याकडे गोड पदार्थबरोबर काही ठिकाणी लिंबाचं लोणचं घेतात. जसम गुळाचा, साखरेचा शिरा(रव्याचाच!).
पण हे आप्पे तुपाबरोबर चांगले लागतील.

मस्त जमलेत.
गोड आप्पे आमच्याकडे जेवणावरच करतात पण तरी नेहमीची हिरवी मिरची खोबर्‍याची चटणी चालू शकेल सोबत.

मंसो, मानुषीकाकू- यात पीठातच ऑलरेडी तूप घालायचे आहे, आप्पे शॅलो फ्रायही तूपावरच आणि परत तूपातच बुडवून खायचे म्हणता? Uhoh लिंबाचे लोणचे हा पर्याय ओके आहे.

झंपी: आमरसात बुडवून? Happy ओके, ट्राय करू.

दिनेशः कदाचित नेहेमीची चटणी लागेल चांगली. आप्पे गोड असल्यामुळे तो विचारच नाही केला.

यांना नैयप्पम म्हणतात आणि मला प्र चं ड आवडतात.>> +१. अर्थात आमच्याकडे मी तांदळाचा रवा वापरण्याऐवजी तांदूळ भिजवून मग ते रूब्बीत वाटून घेते. त्यामुळे पीठ हलकं होतं. आणि मग चार तास भिजवण्याऐवजी तासभर भिजवले तरी पुरतं.

सतीशला याच्यावर मध घेऊन खायला आवडतं, वर लिहिलेली आमरसाची आयडीया पण त्यालाच आवडेल. Happy मला मात्र तिखट लोणचं अथवा चटणी.

स्लर्रप!! फोटो व कृती, दोन्ही मस्त!

हे आप्पे खाल्लेत भरपूर! एक केरळी मैत्रीण रेल्वेच्या लांबच्या प्रवासात बरोबर असे स्टीलचा डबा भरून आप्पे घेऊन यायची. मग आम्ही आप्पे-पंचमी साजरी करायचो! Proud

ओळखीतील व नात्यातील काही यवच्छेदक लोक या आप्प्यांबरोबर गुलाबजामाचा पाक घेऊन खाण्यास स्वर्गसुख मानतील!! Wink

वजन कमी झालं की मग आप्पेपात्र घेणारे. आणि लाटेवर स्वार होऊन सर्व प्रकारचे आप्पे करून बघणार आहे.
ही रेस्पीही मस्त वाटतेय.

घाटलं म्हणजे तेच ना ज्या शिरवळ्या बुडवून खातात?

कपकेक प्रमाणे सजवून खावे...व्ह्नीला विथ सॉलट्ेड कॅरमल असे एखादे कॉम्प्लेक्स आयसिंग कपकेक च्या कागदी आवरणात खाली टाकावे मग अप्पा त्यात शेषशायी भगवानाप्रमाणे ठेवावा. (स्त्राबेरी चांगले लागते)

मस्त दिसतायत, करुन बघायला लागतिल. पॅनकेक च्या मिक्स चे पण होतात छान, त्याच्यावर मेपल सिरप टाकुन पॅनकेक सारखेच खाता येतात.

त्यात तांदूळाचा रवा/ साधा जाड रवा आणि सोडा एकत्र करावा. हे मिश्रण किमान चार तास* ठेवावे. >> नारळाचे दुध , सोडा घातलेले मिश्रण रात्रभर फ्रीजबाहेर ठेवले तर चलेल का?

म्हणजे सकाळी ६ वाजता अप्पे कराय्चे असेल तर रात्री १० वाजता एकत्र करुन ठेवले तर चालेल का?

Hoo chalel ki. Atta thandi ahe. Microwave kimwa oven asel tar tyat thev bhijawalela peeth. Nahitar ekhadya kapataat or trolley masgye, phadka gundaloon Happy