प्रॉन्स मसाला

Submitted by अमेय२८०८०७ on 12 April, 2013 - 09:49

आई मुंबईची त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्या आल्या की मामाकडे मुंबईला जायचं हे ठरलेलं होतं. बिचार्‍या बाबांची कामं मात्र चालूच असायची त्यामुळे ते आम्हाला घ्यायला सुट्टीच्या शेवटी चार-पाच दिवस आले तर यायचे. मुंबईत मनसोक्त हुंदडताना, मजा करताना बाबा आपल्याबरोबर नाहीत याचं मला थोडंफार शल्य वाटत असे. आईमागे बाबा नीट जेवत असतील की नाही, त्यांना चहा-पाणी कोण बघत असेल असे प्रश्न मला नेहेमी पडायचे. आई मात्र माहेरपण आणि सुट्टी पूर्ण एंजॉय करण्याच्या मूडमध्ये दिसायची.
एके सुट्टीत मी काहीतरी कारणामुळे बाबांबरोबर मागे राहिलो. आई आणि भावाला गाडीत बसवून निरोप देताना आता मला एरवी बाबांबद्दल पडणारे खाण्या-पिण्याचे प्रश्न स्वतःबद्दल पडून जास्तच भीषण वाटायला लागले. सुट्टीला न गेल्याबद्दल रुखरुख होतीच.
स्टँडवरून परत येता येताच बाबांमध्ये लक्षणीय बदल होऊ लागले. चेहर्‍यावर 'शिकन' की काय म्हणतात ती आणून आईला टा-टा करणारे बाबा घरी येताना चक्क शीळ वाजवत गाणे गुणगुणत होते.
कुठेही फिरायला न जाऊनही ती सुट्टी माझ्यासाठी धमाल ठरली. वूडहाऊसच्या एका पुस्तकात 'He revived like a watered rose' असे वाक्य आहे. त्या सुट्टीत बाबाही मला असेच नुकते पाणी घातलेल्या गुलाबासारखे ताजेतवाने भासत होते. सगळ्यात बहार होती ती खाण्यापिण्याची. चिकन, मटण, मासे या त्रिसूत्रीशिवाय जेवायचे नाही अशी प्रतिज्ञा घेतल्यासारखे बाबा रोज नवनवे पदार्थ बनवत होते. ते आणि त्यांचे समभावी तीनचार मित्र यांचा हुडदंग बघून मला एक वेगळे बाबा वावरत असल्याची अनुभूती मिळाली. यापुढे माझा सुट्टीत आईबरोबर जाण्याचा उत्साह बराच कमी झाला . मामाच्या गावाला जाऊन गुलाबजामून खाण्यापेक्षा (पहा: मामाच्या गावाला जाऊया बालगीत) स्वतःच्या गावात राहून चिकन, सी-फूड खाण्यात जाम मज्जा आहे हे कळण्याइतका मोठा मी नक्कीच झालो होतो.
त्या धमाल काळात बाबा करीत असलेल्या एकसेएक लई-भारी संपूर्ण सामिष डिशेसपैकी प्रॉन्सची एक हातखंडा डिश-रेसिपी आज देत आहे.
----------------------------------------------------------------------------
साहित्य :

प्रॉन्स १५-२० मीडियम साईझ
ओला नारळ - एक वाटी खवून,
नारळाचे दूध पाव वाटी (ऑप्शनल), टोमॅटो - पाव बारीक चिरून (ऑप्शनल)
कांदा - दोन मोठे लांब चिरून, एक मध्यम बारीक चिरून
लवंग - ३-४, मसाला वेलदोडे - २, बडीशेप- एक टीस्पून, धणे - एक - दीड टेस्पून, दालचिनी- छोटा तुकडा, लसूण - ३-४ पाकळ्या
हळद - १/२ टेस्पून
तिखट - दोन टे स्पून किंवा जितके तिखट चालते त्यानुसार
आमसुले (कोकम) ४-५
मीठ, तेल ई.
pm7.JPGpm1.JPGकृती

प्रॉन्सना हळद - मीठ लावून ठेवा.
तेलात लांब चिरलेला कांदा, लसूण, टोमॅटो (ऑप्शनल), मसाले आणि नारळ घालून न जळता पण खरपूस असे रोस्ट करून घ्या.
pm2.JPG

रोस्ट मिश्रण गार झाल्यावर मिक्सरमधून थोड्याश्या कोमट पाण्याबरोबर बारीक वाटून घ्या.
pm4.JPG

पॅनमध्ये तेल गरम करा. बारीक चिरलेला कांदा पारदर्शक होईपर्यन्त फ्राय करा. हळद - तिखट घाला. थोडे परतून मसाला पेस्ट घाला. चांगले परता. ३-४ मिनिटांनी प्रॉन्स घाला. मध्यम आचेवर ४-५ मिनिटे परता. प्रॉन्स शिजायला लागले की २-३ चमचे पाणी घाला, मिश्रण एकजीव करा, चवीनुसार मीठ घाला. आमसुले घालून प्रॉन्स शिजू द्या. किंचित उकळी आली की आंच धीमी करून आवडत असेल तर नारळाचे दूध घालून फिनिश करा. प्रॉन्स कोट होतील इतकाच अंगाबरोबर रस्सा ठेवायचा आहे.
मनपसंत सजावट करून सर्व्ह करा.

pm8.JPGpm10.JPGpm5.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हुडदंग हा शब्द दबंगच्या जवळ जाणारा वाटतो आहे.
बाबांचं केलेलं वर्णन आवडलं. आम्ही भारतात गेल्यावर मागे राहिलेले आमचे नवरेही असेच असणार Proud

मस्तच अमेय.... सीफूड खात नसले तरी तुमच्या लिखाणावर फिदा आहे त्यामुळे वाचले.
बादवे सर्व्हे करा हा शब्द बरोबर की सर्व करा हा बरोबर?

ओ तुम्ही नॉनवेज रेसीप्या साध्याच लिहित जा ओ..
ते फोटो माझ्याच्याने बघवत नाहीत पण तुमची लेखनशैली इतकी अप्रतिम आहे की वाचायची इच्छा अनावर होते...

>>'He revived like a watered rose' >>
Lol
प्रचि मस्त. प्रकरण नीट हाताळलंय.

अमेय, तुमच्यात तुमच्या बाबांचा स्वयंपाकाचा गुण आला आहे. तुमच्या लिखाणातुनच कळते की तुमच्या हातालाच सुग्रणपणाची चव असेल. अशाच तुमच्या आई-बाबांच्या सर्व पाक्रु संकलीत करुन ठेवा तुमच्या पुढील पिढीसाठी आणि आमच्यासाठीही.

मस्त रेसीपी आहे. नक्की करणार. एक शंका आहे - तो खोवलेला नारळ कधी घालायचा? तो पण रोस्ट करुन बाकीच्या मसाल्याबरोबर पेस्ट करायचा ना?

अमेय.. Rofl शिकन, हुडदंग इ. शब्द वाचून तू एम्पियाईट असावास नक्की अशी शंका आली..
ही रेस्पी ही सुप्प्पर्ब आहे..
लौकरच करण्यात येईल.. तब रिपोर्ट दूँगीच.. Happy

अरे वा, इतके छान छान प्रतिसाद. नक्कीच दिनेशदांचा हातगुण (पहिला प्रतिसाद दिल्याबद्दल). सर्वांचे अनेक आभार.

शुद्धिपत्र : शुगोल - नारळपण रोस्ट करायचा, फोटोत दाखवला आहेच, लिहायचे राहून गेले. आता सुधारलेय. सॉरी.

वर्षू नील : नाही हो मी एम. पी वगैरे नव्हे, मी कोल्हापूरचा. मालवणात बालपण गेले त्यामुळे सी-फूड विशेष आवडीचे. गेली १६ वर्षे दिल्लीत गेल्याने आणि कॉलेज चुकवून पाहिलेल्या अनंत सिनेमांचा परिणाम म्हणून हिंदी शब्द मध्ये मध्ये घुसतात कधीतरी.

मृण्मयी, अंजली_१२ : हुडदंग हा शब्द मी 'दंगा-मस्ती' या अर्थाने ऐकलाय, मूळ हिंदीच असणार. हुड-हुड दबंग ही व्युत्पत्ती मस्त आहे. पण त्या आधीपासूनच ऐकलाय.

जागू : तुमच्याकडून मिळालेली पावती मोलाची आहे. मला तुमच्या रेसिपीज्/लिखाण खूप आवडते.

दीपा माने : नक्कीच. या रेसिपींमुळे आठवणीसुद्धा उजळून येत आहेत त्यामुळे कोणी हसो वा नाके मुरडो, हे सत्र सध्यातरी चालूच ठेवणार आहे. आपल्यासारखे प्रतिसाद उत्साह कायम राखायला मदत करतात.
Happy Happy

अमेय मस्तच्....उद्या प्रॉन्स मिळाल्यावर नक्की ट्राय करेन.
छान रेसीपी लिहिता.
माझ्या नवर्याचे आजोळ कोल्हापूर. आणि सध्या माझे आवडीचे खादाडीचे ठिकाण.

अमेय, तुमच्यात तुमच्या बाबांचा स्वयंपाकाचा गुण आला आहे. >>>> येस्स, आणि लिखाणातला खट्याळपणा / खमंगपणा कोणाकडून आलाय ???

अमेय, तुमची रेसिपी आधी तुमच्या लिहिण्याच्या खासम खास स्टाईलसाठी वाचते मी... आणि मग तोंडाला पाणी सुटुन केव्हा एकदा करून बघते असंही होतं.
झक्कास.

अमेय,

फारच सुरेख वर्णन केलेय तुम्ही...तुमची लेखनशैली फारच छान आहे....आणि रेसिपी पण...लवकरच करून पाहिन...लेकाला अतिशय प्रिय आहेत प्रॉन्स...पण तो आठवडाभर नाहिये...तेव्हा तो आल्यावरच करणे होइल.

सामी, शशांक, दाद, पौर्णिमा, san26
अनेक धन्यवाद .

शशांक : खमंगपणा / खट्याळपणा कोणाकडून? पत्नीला श्रेय द्यावे की नाही या विचारात पडलो आहे Wink

सही ........फार वेळ नाही आवरता येणार मनाला..... लवकरच करुन, खाण्यात येईल Wink