गाभोळी/गाबोळी फ्राय

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 9 April, 2013 - 04:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

माश्यातील गाभोळी
१ चमचा मसाला
पाव चमचा हळद
मिठ चवी नुसार
अर्धा चमचा आल-लसुण पेस्ट
अर्धा चमचा लिंबाचा रस
तेल तळण्या पुरते.

क्रमवार पाककृती: 

सर्व वाचकांस विनंती आहे की त्यांनी ह्या पाककृतीचा आस्वाद घ्यावा. गाभोळी खाण्याने माशांची पैदास कमी होते वगैरे वर आधी भरपूर चर्चा झाली आहे. पण हे सगळे निसर्ग नियम आहेत. मांसाहारींसाठी गाभोळी म्हणजे पर्वणी असते. लहान मुले तर अगदी आवडीने ही खातात. गाभोळी करण्याच्या काही प्रकारातील हा एक प्रकार.

गाभोळी स्वच्छ धुवून घ्यावी. त्याला वरील जिन्नसा मधील तेल सोडीन सगळे एकत्र करुन लावावे.

तवा चांगला तापवावा व त्यात तेल सोडून मध्यम आचेवर गॅस ठेवून गाभोळी तळायला ठेवावी.

नंतर तव्यापासून जरा लांबच सरकावे कारण कधी कधी ही गाभोळी तड तड करुन ह्यातील काही कण उडतात. ६-७ मिनिटे चांगली शिजवून मग पलटी करावी आणि पुन्हा ५-६ मिनिटे शिजू द्यावी.

ही आहे तयार गाभोळी/गाबोळी फ्राय.

अधिक टिपा: 

गाभोळी म्हणजे माशाच्या पोटातील अंड्यांचा संच. छोटे बोईट, खरबी ह्या माश्यांतील छोटीशी गाभोळी चवदार असते. चिवणी तर खास गाभोळीसाठीच पावसाळ्यात घेतात. ह्या छोट्या माशांतील गाभोळ्यांचा आकार खजुराच्या बी एवढा असतो. एका माशात दोन गाभोळ्यांचे संच जुळीप्रमाणे असतात. मोठ्या माशांतील गाभोळी म्हणजे पिळसा, रावस ह्यांची जास्त फेमस असते. गाभोळी आतून रव्याप्रमाणे असते. शिंगाळ्यात तर गोट्यांप्रमाणे अंड्यांचा संच असतो. माझ्या माशांच्या सिरिजमध्ये आहे तो प्रकार. तशी बारा महिने गाभोळी असते पण पहिल्या पावसानंतर ह्यांचा हंगाम जास्त असतो.

गाबोळी जर अगदीच जाडी असेल तर ती गोल गोल कापून घ्यावी. व मग तळावी. किन्वा एका स्वच्छ फ़डक्यात बाधून आधी वाफेवर शिजवावी मग कापून तळावी किंवा तशीच कुस्करून त्याचे सुकेही करता येते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू, अगदी बेसिक प्रश्न विचारतेय . शाकाहारी असल्यामुळे समुद्रकिनार्यालगतच्या गावी राहुनही काही माहित नाही. वरच्या फोटोत माशाची अंडी आहेत, म्हणजे अंडी असलेली सॅक ( पिशवी) आहे का? खात नसले तरी तुझ्या सर्व रेसिपीज वाचते मी. एवढ्या प्रकारचे मासे असतात हेच माहित नव्हतं.तू त्यांची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. एवढे पदार्थ करण्याचा आणि त्यांचे स्टेप बाय स्टेप फोटो काढण्याचा तुझा उत्साह वाखाणण्याजोगा आहे.
मैत्रीणींकडून कोलंबी( सोडे?) , बोंबिल आणि क्वचित पापलेट एवढच ऐकलं होतं. बांगडा बद्दल कळलं दिलीप वेंगसरकरची बातमी वाचून.

माश्यांच्या बाबतीतलं जनरल नॉलेज वाढतय तुमचे धागे वाचुन Happy
ह्या धाग्यावर दिनेश, अश्विनी यासारख्या शाकाहारीनी देखील हजेरी लावली आहे.
मी देखील. Happy

एवढ्या प्रकारचे मासे असतात हेच माहित नव्हतं>>>>> अगदी खरयं जागू, मी पण फक्त माश्याचे प्रकार कळतात म्हणून हे तुझ्या रेसिपी बघते. मी पण शाकाहारी आहे.(एर्॑वी कधी मांसाहारी पाकृ बघितल्या पण नसत्या) Proud

जागुले , हे फोटू पाहून नवर्‍याला तोंपासु झालंय... आणी मला म्हणतोय कि कित्येक वर्षात का बरं तू केली नाहीस..
त्याचा प्रिफरंस हिल्सा मच्छी चे रो ... भजी, कांदा टोमेटो मसाला, तू सांगितल्या प्रमाणे तळून.. थोडक्यात कशीही केली तरी आवडते..

(मला मात्र अजिबात आवडत न्हाय... बीफ्,पोर्क आणी इतर कुठली पराणी चालत असले तरी.. Uhoh
गाभोळी, कलेजी ,ब्रेन.... इज नो नो फॉर मी.. Wink )

हो ऑर्कीड माझ्या ज्ञानाप्रमाणे ही माश्यांच्या अंड्यांची पिशवी असते. सोडे म्हणजे सोललेली कोलंबी. ह्यात सुकवेला पण प्रकार असतो. धन्यवाद.

अनु, झकासराव, ऑर्किड खुप खुप धन्यवाद. तुमच्या पोस्ट वाचून अजुन छान वाटले.

अविगा, तृष्णा धन्यवाद.

वर्षूताई काय हे कलेजी पण नाही आवडत?

तळलेल्या गाभोळीचा तव्यावरचा फोटो कसला तोंपासु आलाय Happy

खूप ऐकलंय ह्या गाभोळीबद्दल. कधी खाल्ली मात्र नाही. वरच्या फोटोतली गाभोळी बोनलेस चिकन ब्रेस्ट किंवा थायसारखी दिसतेय. ही चवीला कशी लागते ? थोडीफार अंड्यातल्या बलकासारखी का ? आत अंडी असतात का ? पुढच्यावेळी तयार गाभोळीचा एक कापलेला फोटोही टाकशील का जागू म्हणजे आतून कसे दिसते ते कळेल.

अगो पुढच्यावेळी नक्की टाकेन कापलेल्या गाभोळीचा फोटो. आणि चविचे वर्णन आर.एम.डी यांनी केल्याप्रमाणेच Happy

Pages