उडीद-तांदळाचे आप्पे

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 April, 2013 - 15:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी उडीद डाळ
३ वाट्या उकडीचा, किंवा साधा तांदूळ किंवा इडलीचा रवा असल्यास अडीच वाटी
पाव वाटी जाडे पोहे
चविनुसार मिठ
तेल

क्रमवार पाककृती: 

टुनटुन, कविन आणि मंजूडी यांनी आप्प्यांचे स्वादिष्ट प्रकार माबो वर नुकतेच सगळ्यांना तोपासु करुन बर्‍याच खवय्यांचे रिकामे बसलेले आप्पेपात्र कामास लावले. त्यात थोडी अजुन भर. हा प्रकार तसा जुनाच आहे बर्‍याच जणांना माहीतही असेल.

सकाळी उडीद डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भिजत घाला. रात्री दोन्ही मिक्सरमध्ये वाटून एकत्र करुन ठेउन द्या.इडलीरवा वापरणार असाल तर सकाळी भिजत घालायची गरज नाही. रात्री उदीद डाळ वाटल्यावर त्यात रवा मिक्स करुन थोडे पाणी घालायचे. दुसर्‍या दिवशी सकाळी हे मिश्रण वर आले असेल. ह्या मिश्रणात अर्धा वाटी पोहे भिजवून मिक्सरमधुन वाटून घ्या. पिठ इडलीच्या पिठाप्रमाणेच पातळ ठेवायचे. त्यात मिठ घाला व चांगले ठवळून घ्या.

आप्पेपात्र गॅसवर चांगले तापवा व त्यात तेल घालून (जर नॉनस्टीक भाडे असेल तर दोन थेंबही तेल चालते, बिडाच्या भांड्याला थोडे जास्त तेल लागते) १-१ चमचा आप्पेपात्राच्या वाट्यात मिश्रण टाकून ४-५ मध्यम आचेवर शिजू द्या.

सुरी किंवा चमच्याच्या सहाय्याने आप्पे उलटे करा व पुन्हा ४-५ मिनिटे ठेवा. झाले आप्पे तय्यार.

हे आप्पे चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करा.

अधिक टिपा: 

जर पिठ जास्तच पातळ झाल तर अजुन पोहे वाटून टाकून घट्ट करु शकता.
इडली रव्या पेक्षा तांदूळ वापरल्यास हे आप्पे जास्त चांगले होतात असा माझा अनुभव आहे.

माहितीचा स्रोत: 
ऑफिस मैत्रीण
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चवीकरता आलं, मिरची, कोथिंबीर वगैरे काहीच नको का मिश्रणात?
मी पीठं भिजवलेली नसतील, आधीपासून प्लॅन नसेल तर इथे डोसा पीठ तयार मिळतं त्याचेही करते. चांगले लागतत.

सायो, आवडत असेल तर या मिश्रणामधे कांदा, कोथिंबीर, आलं, मिरची चिरून घालू शकतेस.

हे पीठ एकदा थोडं आंबवून फ्रीझमधे घट्ट झाकून ठेवलं की लागेल तेव्हा दोन तीन तास आधी बाहेर काढून डोसा, उत्तप्पा, आप्पे असे भर्पूर प्रकार करता येतात.

पीठ वाटत असताना त्यामचे चमचाभर भिजवलेली मेथी घातल्यास आप्पे छान कुरकुरीत आणि सोनेरी होतात.

मी यात थोडी हरभरा डाळ(भिजत घलतानाच), कांदा बारिक चिरलेला, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि ओल्या खोबर्‍याचे काप घालते.

मस्त

हे मि इडलिचे पीठ , बारीक चिरलेला कांदा, मिरचीचे बारीक तुकडे, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर हे जिन्नस घालून बनविले आहे.( मिश्र डाळी चे आप्पे तिथे पन टाकले आहे. )2013-03-24 10.10.17.jpg

सगळ्यांचे धन्यवाद.
नंदीनी छान टिप्स दिल्यास.

मी थोडी तिखट खोबर्‍याची चटणी बरोबर करते मुलीला आवडत म्हणून. म्हणून इतर गोष्टी टाकत नाही. आपल्या आवडीनुसार जिन्नस टाकायच. काही जण ओल्या खोबर्‍याचे तुकडेही टाकतात. कढीपत्ता, कोथिंबीर, गाजर किसुन टाक्ता येतो.

जागू मस्त दिसतायत अप्पे ( उडाणटप्पे.:फिदी:) मला पण त्यात बारीक चिरलेली हि. मिर्ची आणी कोथिंबीर घालुन केलेले आवडतात. पण खोबर्‍यामिर्चीची चटणी असेल तर नाही टाकत काही वेळेस, कारण मुलगी मिर्ची खात नाही.

ईडली डोश्यापेक्षाही अप्पे जास्त आवडतात्.:स्मित: