भारतीय क्रिकेट संघ १९८३ - २०१३ एक आठवण

Submitted by Sanjeev.B on 26 March, 2013 - 06:51

भारता मध्ये क्रिकेट हे धर्म आहे आणि काही क्रिकेटर्स ना देवत्व प्राप्त आहे. भारतात रुढार्थाने क्रिकेट लोकप्रिय झाले ते १९८३ साली आपण विश्वचषक करंडक जिंकल्यानंतर, त्यापुर्वी ही लोकं क्रिकेट चे सामने आवर्जुन पाहायचे व एंजॉय करायचे, पण १९८३ नंतर भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरी मध्ये खास करुन एक दिवसीय सामन्यां मध्ये खुपच सातत्य होते.

प्रस्तुत लेखात आपण भारतीय क्रिकेट संघाची १९८३ सालानंतर बदलते रुप पाहुया. १९८३ नंतर ते आजपर्यंत आपल्या संघा मध्ये नेहमीच वलंयांकित आणि अनुभवी चेहरे होते, त्याचे आढावा आपण घेऊ.

१९८३ चा विश्वविजेता संघ आपण घेऊ :-
सुनील गावस्कर
कृष्णमचारी श्रीकांत
दिलीप वेंगसरकर
संदिप पाटील
मोहिंदर अमरनाथ
कपिल देव
यशपाल शर्मा
रॉजर बिन्नी
मदन लाल
सय्यद किरमाणि
किर्ती आझाद
बलविंदर सिंघ संधु
रवि शास्त्री
सुनिल वालसन

वरची नावे पाहिले तर सामना एकहाती फिरवण्याचे क्षमता सनी, श्रीकंत, कर्नल, संदिप पाटील, जिमी, कपिल यांच्या मध्ये होते. रॉजर बिन्नी आणि मदन लाल यांच्या फलंदाजी कित्येक भागीदार्‍या नेमक्या वेळी झाल्याने, भारताने पराभवाचे नामुष्की टाळले आहे. मधल्या फळीत बिन्नी आणि मदन लाल ची जोडी मस्त जमायची

रॉजर बिन्नी च्या गोलंदाजी बद्दल बोलायचे तर मला आठवतं भारतीय क्रिकेट संघ विदेश दौर्‍यावर असताना पहिले विकेट रॉजर बिन्नी काढायचा.

यष्टीरक्षणा मध्ये किरमाणि नंतर त्याच्या एव्हढे चांगले यष्टीरक्षण करणारा यष्टीरक्षक भारतीय क्रिकेट संधाला मिळाला नाही. त्याच्या नंतर सुरिंदर खन्ना, सदानंद विश्वनाथ, चंद्रकांत पंडित, किरण मोरे, नयन मोंगिया, इत्यादि इत्यादि आणि नंतर धोणि आला पण किरमाणि सारखे यष्टी पाठी सूर मारुन झेल टिपणे हे किरमाणि नंतर फारच क्वचित पाहायला मिळाले.

सनी - श्रीकांत चे कित्येक सलामीच्या भागीदार्‍या आपण एंजॉय केल्या पण त्यांच्या इतकी चांगली सलामी ची जोडी मिळायला आपल्याला सचिन - सौरभ ची वाट पाहावी लागली.

भारतीय क्रिकेट संघा मध्ये नेहमीच अनुभवी क्रिकेटर्स होते, नविन क्रिकेटर्सना अनुभवी क्रिकेटर्स कडुन बरेच शिकायला मिळाले. श्रीकांत निवृत्त होता होता सचिन चे आगमन झाले होते व तो आपले चुणुक दाखवायला लागला होता, दिलीप वेंगसरकर निवृत्त झाले तेव्हा अझरुद्दीन तयार झाला होता, संदिप आणि जिमी ची जागा सिध्दू व त्याच्या बरोबर / नंतर संजय मांजरेकर व नंतर प्रविण आमरे ने घेतली होती. कपिल अजुन खेळत होता, त्याच्या बरोबर बिन्नी आणि मदन लाल च्या जागी चेतन शर्मा आणि राजु कुळकरणी ने घेतले, राजु कु़ळकर्णी ला पुढे जास्त संधी मिळाले नाहीत पण चेतन शर्मा ने गोलंदाजी व फलंदाजी, दोन्ही विभागांत आपली उपयुक्तता सिध्द केले. मला आठवतं १९८७ च्या विश्वचषक स्पर्धे मध्ये चेतन शर्माने त्याने हॅट्रिक ची किमया साधली होती, विश्वचषक क्रिकेट मध्ये हॅट्रिक करणारा तो पहिलाच क्रिकेटर होता.

जावेद च्या "त्या" षटकारानंतर त्याची कामगिरी फारच खालावत गेली.

चेतन शर्मा नंतर किंवा त्या दरम्यान मनोज प्रभाकर आला. मनोज प्रभाकर हा कपिल एव्हढा दर्जेदार नाही पण कपिल् आणि चेतन शर्मा ची जागा भरुन काढली आणि त्याला साथ द्यायला श्रीनाथ आणि वेकटेश प्रशाद आलेत. १९९२ च्या विश्वचषक स्पर्धे मध्ये पाकिस्तान विरुध्द चा सामना आठवुन पहा, मनोज प्रभाकर ने एकदम भन्नाट स्पेल टाकली होती. एस सी जी (सिडनी) च्या वेगवान गोलंदाजीला साहाय्य करणार्‍या खेळपट्टी वर मनोज चे गोलंदाजी चे आकडे होते १० - १ - २२ - २. मनोज बॉल जबरदस्त स्विंग करत होता, जावेद ला तर त्याचे गोलंदाजी खेळताच येत नव्हते, ११० बॉल्स मध्ये ३६.३६ च्या स्ट्राईक रेट ने त्याने फक्त ४० धावा काढल्या होत्या. त्याच सामन्यात जावेद चे ते मर्कट लीला ही सगळ्यांना आठवत असेलच. १९९६ च्या विश्वचषक स्पर्धेत वेंकटेश प्रसाद आणि आमिर सोहेल चे द्वंद ही सगळ्यांना आठवत असेलच.

श्रीनाथ नंतर मात्र वेगवान गोलंदाजी च्या विभागात, झहीर खान वगळता कुणी जास्त छाप पाडु शकले नाही..

हे झाले वेगवान गोलंदाजी विभागा बद्दल, फिरकी गोलंदाजी बाबत बोलायचे तर १९८३ च्या सुमारास आपल्या कडे रवि शास्त्री होता व शिवलाल यादव म्हणुन एक फिरकी गोलंदाज होता, त्यांना साथ द्यायला नंतर मणिंदर सिंग, नंतर शिवरामकृष्णन, नरेंद्र हिरवाणि आलेत, त्यांच्यानंतर वेकंटपती राजु होता आणि नंतर अनिल कुबळे. अनिल कुबळे निवृत्त होई पर्यंत हरभजन तयार झाला होता, आणि आता हरभजन नंतर अश्विन वर सारी भिस्त आहे.

मधल्या फळीत संदिप पाटील, जिमी नंतर रवि शास्त्री ने त्यांचे स्थान घेतले, रवि मधल्या फळीत व सलामी ला दोन्ही जाग्यांवर खेळला. बेनसन अ‍ॅन्ड हेजेस विश्वचषक मालिकेत सलामीला त्याने उत्तम कामगिरी केले. नंतर मधल्या फळीत नंतर अझरुद्दीन बरोबर अजय जडेजा, रॉबिन सिंग आणि मनोज प्रभाकर होते आणि त्यांच्या नंतर अझरुद्दीन च्या स्थानावर राहुल द्रविड आणि नंतर व्ही व्ही एस लक्षमण व नंतर युवराज सिंग यांने आपली छाप पाडली, पण त्या नंतर आता त्यांच्या जागी कोण हा मोठाच प्रश्न आहे.

भारतीय क्रिकेट संघ आता अश्या वळणावर आहे, ज्यात सचिन, सेहवाग आणि धोणि नंतर विराट कोहली हे एकच किंचीत अनुभवी व आशेचे किरण असणारे व वलंयांकित नाव आहे, ह्याचे भारतीय क्रिकेट च्या अर्थकारणावर आणि लोकप्रियतेवर नक्किच परिणाम होणार.

धन्यवाद. Happy

संजीव बुलबुले / २६.मार्च.२०१३

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान विश्लेषणाचा प्रयत्न.
मला वाटतं १९८३चा संघ व त्यानंतरचे संघ यांत महत्वाचा फरक म्हणजे खर्‍याखुर्‍या 'ऑलराऊंडर्स'ची १९८३नंतर संघात कमतरता जाणवत गेली व ती अजूनही जाणवतेच आहे. वरील १५ जणात प्रभावी असे ८-९ 'ऑलराऊंडर्स' आहेत व त्यानी विश्वचषक जिंकण्यात आपल्या चतुरस्र कामगिरीने महत्वाचा हातभार लावला आहे .
<< भारतात रुढार्थाने क्रिकेट लोकप्रिय झाले ते १९८३ साली आपण विश्वचषक करंडक जिंकल्यानंतर>> याच्याशीं मात्र पूर्णपणे सहमत होणं मला तरी कठीणच वाटतं; १९८३नंतर एक वेगळा हुरूप आला इथपर्यंत ठीक आहे. माझ्या मतें, वाडेकरच्या नेतृत्वाखालील संघाने वे.इंडीज व इंग्लंडमधे मिळवलेले विजय हे भारतीय क्रिकेटला खर्‍या अर्थाने प्रेरणादायी ठरले असावेत. फिरकी गोलंदाजी आक्रमक क्षेत्ररक्षण लावून भेदक करतां येते हें प्रथम वाडेकरने दाखवून दिले असं मला वाटतं. त्यापासून प्रेरणा घेऊन भारतीय फिरकीने आपला दबदबाही बरीच वर्षं निर्माण केला. संघाला विजयाची चटक व खेळाच्या लोकप्रियतेला खरी चालना तेंव्हापासूनच मिळाली असं म्हणणं अधिक उचित होईल.

भाऊंशी सहमत. १९७१ नंतर भारताला जिंकायची चटक लागली... Happy

वर उल्लेख केलेल्या १५ जणांपैकी फक्त संदिप पाटिल मध्ये एकहाती मॅच फिरवायची क्षमता होती. गावस्कर साहेबांमध्ये पण होती, पण ओपनींगला येउन मॅच फिरवण्याची संधी अतिशय दुर्लभ. हे बाबा माझं वैयक्तीक मत. Happy

लेख छान!

<वर उल्लेख केलेल्या १५ जणांपैकी फक्त संदिप पाटिल मध्ये एकहाती मॅच फिरवायची क्षमता होती.> कपिल देवचं काय?

भरत मयेकर. अगदी तेच लिहायला मी आलो होतो.. कपिल देव कसा विसरलास राज? (बाय द वे राज.. काल टायगरने वर्षातली तिसरी टुर्नामेंट जिंकली.. आता वेध ऑगस्टाचे..:) )

आणी मोहिंदर अमरनाथनेही आपल्या अष्ट्पैलु खेळाने खासकरुन १९८३ वर्ल्ड कप मधे.. एकहाती नाही तरी सामने जिंकण्यामधे सिंहाचा वाटा उचलला होता. मला वाटत उपांत्य व अंतिम सामन्यात त्यालाच मॅन ऑफ द मॅच मिळाले होते.

भाउ नमसकर.. जरी अजित वाडेकरच्या १९७१ च्या इंग्लंड व वेस्ट इंडिजच्या दौर्‍यावरच्या विजयाने आपल्याला विजयाची चटक लागली हे खरे असले तरी १९६० च्या संपुर्ण दशकात मन्सुर अली खान पतौडीने आपल्या नेतृत्वाखाली फिरकी गोलंदाजीचा पाया रचला व हे दाखवुन दिले की फिरकी गोलंदाजीच्या जोरावर निदान भारतात तरी अपल्याला कसोटी सामने जिंकता येउ शकतात. त्यानेच प्रसन्ना, वेंकट,बेदी, चंद्रशेखरच नाही तर सलिम दुराणी, चंदु बोर्डे व बापु नाडकर्णी यांच्या फिरकी गोलंदाजीचा वारंवार उपयोग आपल्या संघासाठी करुन घेतला. त्या १० वर्षात त्याने घालुन दिलेल्या फिरकीच्या घडीचा वाडेकरच्या १९७१ च्या संघाला नक्कीच फायदा झाला.. खासकरुन १९७१ च्या इंग्लंड दौर्‍यात. त्यामुळे विजयाची चटक लावण्याच्या संदर्भात मन्सुर अलि खान पतौडीचे नाव इथे नक्कीच नमुद केले पाहीजे असे मला वाटते. तो कप्तान व्ह्यायच्या आधी आपण बहुतेक एका हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच कसोटी सामने जिंकले असावेत.

१९७१ च्या वेस्ट इंडिज च्या विजयाचा खरा शिल्पकार मात्र महान सुनिल गावस्करच होता हे माझे स्पष्ट मत आहे.

बाकी मुळ लेखात सगळ्या खेळाडुंच्या नावाला नुसता भोज्ज्या केल्यासारखा वाटला. संजीव जरा अजुन डिटेल मधे तुमच्या आठवणी वाचायला आवडल्या असत्या. विषय छान आहे पण ज्या काळाच्या आठवणी तुम्ही लिहील्या आहेत त्यात कपिल देवचा संघ व सध्याचा धोनीचा संघ या दरम्यान तेंडुलकर्,द्रविड्,लक्ष्मण्,सेहवाग,गांगुली,कुंबळे, हरभजन,धोनी,कोहली असे अतिरथी महारथी होउन गेले व आहेत त्यामुळे कदाचित मला तुमच्या आठवणी त्रोटक वाटल्या असाव्यात. त्या सगळ्यांनी त्यांच्या पराक्रमाच्या आपल्याला इतक्या आठवणी दिलेल्या आहेत की कधी कधी जर कोणी त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाच्या गाथ्यातुन एखादी शेलकी आठवण जर विस्तृत करुन लिहीली व त्या आठवणीला उजाळा आणला तर ते वाचायला खुप मजा येईल..:)

आणी राज.. अजुन एक.. अरे ओपनिंगला येणार्‍याला मॅच फिरवण्याची संधी मिळत नाही असे तु सेहवागला (वन डे व कसोटी.. या दोन्ही फॉर्मॅट मधे) व सचिन्-गांगुली ला(वन डे मधे) जाउन सांग व ते काय म्हणतात ते मला सांग!:)

<<तरी १९६० च्या संपुर्ण दशकात मन्सुर अली खान पतौडीने आपल्या नेतृत्वाखाली फिरकी गोलंदाजीचा पाया रचला>> पतौडीचं श्रेय हिरावून घेण्याचा हेतू नाही; पण फिरकी गोलंदाजांवर आत्यंतिक विश्वास दाखवून त्यांच्यासाठी ' क्लोज-इन' क्षेत्ररक्षण लावून वे.इंडीजच्या त्यावेळच्या 'राक्षसी' फलंदाजांची गोची करणं, ही ऐतिहासिक गोष्ट होती ! [ सोलकरने त्या जागेसाठी स्वतःची मक्तेदारी करण्यापूर्वी, वाडेकर स्वतः त्या आत्मघातकी 'फॉरवर्ड शॉर्ट्-लेग'ला उभा रहात असे ! ].
<< १९७१ च्या वेस्ट इंडिज च्या विजयाचा खरा शिल्पकार मात्र महान सुनिल गावस्करच होता हे माझे स्पष्ट मत आहे >> पण, सुनीलच्या तिथल्या आत्मविश्वासाचा पाया रचण्यात दिलीप सरदेसाईचा मोठा सहभाग होता, हें सुनीलनेही मान्य केलं आहे. पहिल्याच कसोटीत २१२ काढताना दिलीपने सुनीलला वे.इंडीजच्या वेगवान तोफखान्यालाच नव्हे तर गिब्सच्या भेदक ऑफ्-स्पीनला कसं निष्प्रभ करतां येतं याचं प्रात्यक्षिकच दिलं होतं !
<< एकहाती नाही तरी सामने जिंकण्यामधे सिंहाचा वाटा उचलला होता.>> खरं तर, एकहाती सामना जिंकणं अपवादात्मक असतं व सांघिक खेळात तें तसंच असावं; म्हणूनच १९८३चा संघ सर्वांचा परिणामकारक सहभाग असलेला एक आदर्शवत संघ असावा.

संजीवजी, तुमच्या लेखामुळे जुन्या हृद्य आठवणीना उजाळा मिळाला, आपल्यालाही क्रिकेट कळतं असा आव आणायची दुर्मिळ संधीही मिळाली. धन्यवाद.

चांगला प्रयत्न आहे.
मुकूंदच्या

"बाकी मुळ लेखात सगळ्या खेळाडुंच्या नावाला नुसता भोज्ज्या केल्यासारखा वाटला. संजीव जरा अजुन डिटेल मधे तुमच्या आठवणी वाचायला आवडल्या असत्या. विषय छान आहे पण ज्या काळाच्या आठवणी तुम्ही लिहील्या आहेत त्यात कपिल देवचा संघ व सध्याचा धोनीचा संघ या दरम्यान तेंडुलकर्,द्रविड्,लक्ष्मण्,सेहवाग,गांगुली,कुंबळे, हरभजन,धोनी,कोहली असे अतिरथी महारथी होउन गेले व आहेत त्यामुळे कदाचित मला तुमच्या आठवणी त्रोटक वाटल्या असाव्यात. त्या सगळ्यांनी त्यांच्या पराक्रमाच्या आपल्याला इतक्या आठवणी दिलेल्या आहेत की कधी कधी जर कोणी त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाच्या गाथ्यातुन एखादी शेलकी आठवण जर विस्तृत करुन लिहीली व त्या आठवणीला उजाळा आणला तर ते वाचायला खुप मजा येईल..स्मित"

ह्या पॅराला अनुमोदन. Happy

<<कपिल देवचं काय? >>

अरेच्च्या, कपिलपाजी राहिला... आय स्टँड करेक्टेड. Happy

मॅच फिरवण्याच्या संधीबाबत मला काय म्हणायचं होतं - ओपनर्स ना खेळी उभारायची जबाबदारी/संधी असते, मॅच बहुदा पाचव्या-सहाव्या विकेटनंतर हातची जाणार याची चाहुल लागते; तोपर्यंत ओपनर्स पॅव्हेलियन मध्ये बसुन बीयर पीत असतात. मिडल ऑर्डर्स त्यामानाने अशा क्रायसीस सिच्युएशन्सना जास्त एक्सोप्ज होतात.

मुकुंद, आय अ‍ॅम हॅपी फॉर टायगर. माझा अंदाज आहे कि या वर्षी किमान दोन मेजर्स त्याच्या नावावर...

मी अगस्ताला २०१० मध्ये गेलो होतो, क्लायंट ला घेउन. युनीक एक्स्पीरियन्स. ब्रिटिश ओपनला जायचा प्रयत्न सुरु आहे.

मॅच फिरवण्याच्या संधीबाबत मला काय म्हणायचं होतं - ओपनर्स ना खेळी उभारायची जबाबदारी/संधी असते >> सेहवाग म्हणेल संधी तयार करावी लागते. Happy

सगळ्यांचे आभार.

वरच्या लेखात एक अजित आगरकार चे नाव घ्यायचे राहिले. अजित आगरकर जेव्हा नविन आला तेव्हा त्याने खुपच प्रभावी गोलंदाजी केले, कपिल तर म्हणायचा कि अजित आगरकर ला गोलंदाजी टाकताना पाहुन त्याला त्याचे तरुणपणाचे दिवस आठवतं. अजित पण चेंडु मस्त स्विंग करायचा.

भारतात रुढार्थाने क्रिकेट लोकप्रिय झाले ते १९८३ साली आपण विश्वचषक करंडक जिंकल्यानंतर<<< ह्या बद्दल मला असे म्हणायचे होते १९८३ नंतर आपल्या जिंकण्या मध्ये सातत्य आले. १९८३ मध्ये विश्वचषक, १९८४ मध्ये शारजा मध्ये रॉथमॅन्स कप आणि १९८५ मध्ये बेनसन अ‍ॅन्ड हेजस कप असे आपण दुर्मिळ हॅट्रीक साधली होती. तत्पुर्वी ही भारतात क्रिकेट लोकप्रिय होते व लोक क्रिकेट एंजॉय करायचे पण त्याचे रुप कसोटी सामन्याचे होते, असे मला म्हणायचे होते.

धन्यावाद.

Happy