न का र

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 25 March, 2013 - 03:43

फार वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा वर्षभरात प्रदर्शित होणार्‍या सर्व हिंदी चित्रपटांपैकी केवळ एक अथवा फार फार तर दोन चित्रपट पाहणं शक्य होतं, कारण नवे चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच पाहावे लागत आणि आर्थिक दृष्ट्या ते परवडणं शक्य नव्हतं; त्या काळात वर्षभर दूरदर्शन (ज्याला काही लोक कुत्सितपणे दूर्दशा दर्शन असेही म्हणत) नामक राष्ट्रीय प्रक्षेपण वाहिनीवर आठवड्यातून एक या हिशेबाने साधारण पन्नासएक जुने हिंदी चित्रपट पाहिले जात. त्या काळी चित्रपट प्रसारित होण्यापूर्वी निवेदिका थोडक्यात तसे निवेदन करीत असे. या निवेदनात चित्रपटाचे प्रमुख कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार आदींची माहिती सांगितली जात असे. क्वचित एखादा नुकताच (म्हणजे वर्षा दोन वर्षात येऊन गेलेला) चित्रपट देखील प्रसारित होई (असा चित्रपट बहुदा तिकीटबारीवर अपयशी ठरल्यामुळेच लवकरच दूरदर्शन केंद्राचा रस्ता धरीत असे). तर असाच एकदा १९९२ सालचा संगीत हा चित्रपट त्याच्या प्रदर्शनानंतर केवळ वर्षभरातच दूरदर्शनवर प्रसारित झाला. प्रसारणापूर्वी निवेदिकेने नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे ह्या चित्रपटाचीही थोडक्यात माहिती दिली. याशिवाय आपण प्रेक्षकांना नेहमीप्रमाणे फारसा जुना चित्रपट न दाखविता वर्षभरापूर्वीचाच चित्रपट दाखवित आहोत याची त्यांनी विशेषत्वाने नोंद घ्यावी (असे करण्याचे कारण म्हणजे त्यावेळी खासगी वाहिन्यांचा देशात प्रवेश होऊ लागला होता) याकरिता हे देखील सांगितले की हा एक गाजलेला चित्रपट असून त्यातले “मै तुम्हारी हूं” गाणे फार लोकप्रिय झाले होते. तिच्या या वाक्याने मी आश्चर्यचकित झालो कारण आदल्याच वर्षी तर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. संपूर्णपणे संगीत याच विषयाला वाहिलेल्या या चित्रपटातील “जो गीत नही जन्मा वह गीत बनायेंगे” हे सुरेश वाडकर यांचे आणि “सून ओ हसीना काजलवाली” हे जॉली मूखर्जी यांचे गीत ठाऊक होते. परंतू “मै तुम्हारी हूं” य गीताविषयी काहीच ठाऊक नव्हते. त्यामुळे या गाण्याविषयीचे कुतूहल वाढले आणि अर्थातच हे गाणे चित्रपटात नेमके कुठे आणि केव्हा आहे याकरिता चित्रपट अधिकच काळजीपूर्वक बघितला गेला.

चित्रपट बघितल्यावर या गीताचे चित्रपटातील प्रयोजन समजले. ते थोडक्यात असे - अभिजात संगीताच्या विकासाकरिता झटणारे दोघे जण - नायक (जॅकी श्रॉफ) व नायिका क्र.१ (माधुरी दीक्षित) हे दोघे जण आपल्या या प्रयत्नांमध्ये नायिका क्र.२ (पुन्हा माधुरी दीक्षितच) हिलादेखील सामील करून घेतात. परंतू त्यांना सामील होण्यापूर्वी नायिका क्र.२ ही थिल्लर व गल्लाभरू संगीताच्या आधारे लोकांचे मनोरंजन करीत असते. नायिकेने अशा प्रकारे आपल्या प्रतिभेचा दुरूपयोग करावा हे नायकाला सहन होत नाही. तिला थोबाडीत मारून तिचे “मै तुम्हारी हूं” हे गाणे (व सोबतीला चालु असलेले नृत्यही) बंद पाडून तो तिची कानउघाडणी करतो (तिचे डोळे उघडून काहीच उपयोग नसतो कारण ती अंध असते). पुढे नायिका क्र.२ ही असले बाजारू नाचगाणे सोडून अभिजात संगीताच्या सेवेत लागते. अर्थातच सबंध चित्रपटाच्या प्रकृतीशी हे गाणे सुसंगत नसल्याने चित्रपटाच्या जाहिरातीत ह्या गाण्याची झलक दाखविली गेली नव्हती व त्यामुळेच मला ते ठाऊक नव्हते. परंतू ज्याप्रकारे संगीताचा बाजार मांडणे चूकीचे आहे हे दाखविण्याकरिता या गीताची योजना केली गेली आहे आणि जे गीत नायक मधूनच नायिकेच्या कानाखाली वाजवून बंद पाडतो नेमके तेच गीत लोकप्रिय व्हावे आणि दूरदर्शनवर त्या चित्रपटाचे प्रसारण करताना निवेदिकेनेही त्याच गीताच्या लोकप्रियतेचा विशेष उल्लेख करावा याचे मला तरी चित्रपट पाहिल्यावर अतिशय वैषम्य वाटले. यामुळे चित्रपटाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासल्यासारखे वाटून गेले. याला कारणीभूत माधुरीचे नेहमीच्या शैलीतले नृत्य तर नव्हे असेही वाटून गेले; कारण संपूर्ण चित्रपटात केवळ याच गाण्यात माधुरी या प्रकारे नाचली आहे. बाकी गीतांचे चित्रण अतिशय संयत पद्धतीने केले गेले आहे. पॅराशूटच्या जाहिरातीमधील आजी (सुनीला प्रधान) प्रमाणे नाकावर घसरणारा चष्मा पुन्हा वर चढवित “तो क्या जमाना बदल गया है?” असेही विचारावेसे वाटत होते.

पण जमाना कधीच बदलला होता आणि तोही माधुरीच्या या चित्रपटापासून नव्हे तर कितीतरी आधीपासूनच. दयावान मध्ये माधुरीने ज्या नायकासोबत अतिधाडसी दृश्य देत खळबळ माजविली त्या विनोद खन्ना या अभिनेत्याचा १९७७ सालचा इन्कार हा चित्रपट पाहताना या गोष्टीचा प्रत्यय आला. चित्रपट बनतो नेमका कुठली गोष्ट प्रेक्षकांच्या मनात ठसविण्यासाठी (Highlight करण्यासाठी) आणि लोक तो लक्षात ठेवतात कुठल्या भलत्याच कारणाकरिता. या दोन्हींत किती अंतर असतं हे जर तपासायचं असेल तर त्या करिता हा चित्रपट एक उत्तम उदाहरण आहे. इन्कार चित्रपट म्हंटलं की बहुतेकांना उषाजींनी गायलेलं “मुंगळा... मै गुड की कली” हे गाणं आठवतं. जरा अजून हळूवार गीतांचे कुणी चाहते असतील तर त्यांना “दिल की कली, यूंही सदा” हे मोहम्मद रफी यांनी गायलेलं गाणं आठवतं. राजेश रोशन यांचे संगीतातले वेगळे प्रयोग आवडणारे काही दर्दी संगीतप्रेमी किशोरकुमार आणि आशा भोसले यांचं “तूमको हमसे प्यार है” हे गाणं लक्षात ठेवतात. संगीताव्यतिरिक्त इतर काय आठवतं ते विचारलं तर कुणाला चित्रपटातला क्रूर खलनायक अमजद खान आठवतो, कुणाला डॅशिंग सीआयडी ऑफिसर विनोद खन्ना आठवतो, कथेतलं काही आठवतंय का विचारलं तर ती एक नाट्यमय अपहरण कथा असल्याचंही काहीजण आवर्जून सांगतात. पण चित्रपटाचं शीर्षक “इन्कार” असं का होतं हे विचारलं तर कुणाला सांगता येत नाही. निदान मला तरी या प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा प्रेक्षक अजून भेटला नाहीये. चित्रपटाचं शीर्षक हे चित्रपटातील एखाद्या पात्राचं नाव असेल तर कथेच्या दृष्टीने ते पात्रही (टायटल रोल किंवा शीर्षक भूमिका) महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे या चित्रपटाचं शीर्षक इन्कार म्हणजे नकार ही एक घटना, प्रसंग किंवा प्रक्रिया आहे. तेव्हा ही शीर्षक घटना किंवा टायटल इन्सिडन्स इतका गाजलेला चित्रपट पाहणार्या् प्रेक्षकांच्या लक्षात राहू नये हे आश्चर्यच नव्हे का? मुख्य म्हणजे प्रेक्षकांना चित्रपटातले जे कलाकार आठवतात त्या विनोद खन्ना, अमजद खान, हेलन किंवा राकेश रोशन (शेवटचे दोघे तर चित्रपटात पाहूणे कलाकार असून लोकांना आठवतात) यांच्यातील कुणाच्याही भूमिकेशी या चित्रपटाच्या शीर्षकाचा संबंध नाहीये. त्याशिवाय या कलाकारांनी रंगविलेल्या भूमिका देखील या चित्रपटाच्या कथेच्या दृष्टीने ही प्रमुख नाहीयेत. सादरीकरणात कदाचित विनोद खन्ना आणि अमजद खान यांच्या भूमिकांना जास्त फूटेज असेलही; पण मूळत: ही कथा आहे ती हरिदास चौधरी या डॉ. श्रीराम लागू यांनी रंगविलेल्या पात्राची आणि त्याने चित्रपटात वेगवेगळ्या वेळी देलेल्या चार नकारांची. यापैकी त्याचे दोन नकार त्याला होकारात बदलावे लागतात. एक नकार होकारात बदलताना त्याला चित्रपटाचा नायक सीआयडी इन्स्पेक्टर अमरनाथ गिल (विनोद खन्ना) ची माफी मागून मनधरणी करावी लागते. दुसरा एक नकार होकारात बदलताना कंगाल होण्याची वेळ होते आणि उरलेले दोन नकार - ज्यावर तो ठाम राहतो, त्या नकारांचं अखेरपर्यंत होकारात परिवर्तन करीत नाही, त्या दोन नकारांमुळे तर त्याच्या कंगाल होण्याच्या प्रक्रियेवर अधिकच शिक्कामोर्तब होतं. पैकी त्याने अगदी शेवटी कंगाल होण्यापासून वाचणे शक्य असताना देखील दिलेला निर्णायक नकार हाच टायटल इन्सिडन्स किंवा शीर्षक प्रसंग आहे.

नॅशनल शू कंपनी या आघाडीच्या बूट उत्पादक कंपनीचा प्रमुख असलेल्या हरिदास चौधरीला संचालक बैठकीत इतर संचालकांकडून सुनावले जाते की अतिशय दर्जेदार व टिकावू बूट उत्पादन केल्यामुळे एकतर बुटाची किंमत वाढते आहे आणि पुन्हा हा बुट फाटत नसल्यामुळे नवा बूट घेतला जात नाही व नव्या बुटांची विक्री अपेक्षित प्रमाणात होत नाहीये. तेव्हा थोडे कमी टिकतील असे बूट हरिदास यांनी बनवावेत. तत्वनिष्ठ हरिदास चौधरी अर्थातच या प्रस्तावाला विरोध करतात आणि संचालकांशी वैर ओढवून घेतात. हा हरिदास चौधरी यांनी दिलेला या कथेतला दुसरा नकार. चौधरींचा स्वीय सहायक अनिल (हरीश) त्यांना सावध करतो की हे दुखावले गेलेले संचालक भविष्यात त्रासदायक ठरू शकतील. त्यावर चौधरी त्याला सांगतात की ते दिल्लीच्या एका भागधारकाकडून मोठ्या प्रमाणावर समभाग खरेदी करून कंपनीवर निर्विवाद सत्ता प्रस्थापित करण्याच्या विचारात आहेत. त्याकरिता त्यांनी कंपनीकडूनच वीस लाख रूपये कर्जाऊ घेतलेले असून स्वत: अनिलने त्वरीत दुसर्यास दिवशी दिल्लीला जाऊन सौदा पूर्ण करायचा आहे. सोबतच ही गोष्ट त्यांच्यात व अनिलमध्येच गुप्त ठेवण्याचीही सूचना ते त्यास देतात.

इकडे त्याच सायंकाळी हरिदास चौधरी यांच्या घरी त्यांच्या विवाहाच्या वाढदिवसानिमित्त मोठी मेजवानी आयोजित केलेली असते. यावेळी आपल्याला त्यांचे सुखी कुटूंब दिसते. पत्नी शोना (लिली चक्रवर्ती), मुलगा गुड्डू (मास्टर राजेश), बहीण गीता (नायिका - विद्या सिन्हा) तसेच कुटुंबातीलच घटक वाटावेत इतकी जवळीक साधलेले वाहनचालक (साधू मेहेर) आणि त्याचा मुलगा बन्सी (मास्टर राजू) यांच्यासमवेत ते मित्र राकेश रोशन (राकेश रोशन) ने गायलेल्या गाण्याचा (दिलकी कली यूंही सदा खिलती रहे) आनंद घेत असताना जणू सुखाच्या परमोच्च बिंदूवर असतात. इतक्यात एक दूरध्वनी येतो आणि त्यांना जोरदार धक्का बसतो. त्यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आलेले असते. सार्या कुटूंबावर शोककळा पसरते. आपण काहीही करून, कितीही रक्कम खंडणी म्हणून द्यावी लागली तरी आपल्या मुलास सोडवून आणू असे ते पत्नी, बहिण व इतर लोकांमोर बोलून दाखवितात. थोड्या अवधीतच सर्वांना समजते की हरिदास चौधरींचा मुलगा गुड्डू सुरक्षित असून नजरचूकीने वाहनचालकाचा मुलगा बन्सी याचेच अपहरण केले गेले आहे. हे कळताच हरिदास समाधानाने सुस्कारा सोडतात आणि दूरध्वनी करून पोलिसांना बोलावून घेतात. नजरचूकीने आपण दुसर्यानच मुलाचे अपहरण केले आहे हे समजल्यावर अपहरणकर्ता त्यास सोडून देईल असा चौधरींचा कयास असतो.
इकडे पोलिस हरिदास चौधरींच्या बंगल्यावर येतात तेव्हा त्या पथकातील प्रमुख सी.आय.डी. इन्स्पेक्टर अमर नाथ गिल (नायक - विनोद खन्ना) आणि चौधरींची बहीण गीता एकमेकांना पाहतात तेव्हा भूतकाळात जातात आणि आपल्यापुढे त्यांच्या पूर्वस्मृतींचा पट उलगडतो.

***** FLASH BACK *****
कधी काळी अमर आणि गीता प्रेमात पडलेले असतात. चौधरींना त्याविषयी आपल्या पत्नीकडून कळते तेव्हा ते बहीण गीता हिला अमरसोबत असलेले संबंध तोडून टाकण्याचा सल्ला देतात. खरे तर त्यांनी अमरला कधी पाहिलेले देखील नसते किंवा त्याचे नावही त्यांना ठाऊक नसते परंतू आपली बहीण कुठल्यातरी पोलिस इन्स्पेक्टरच्या प्रेमात असल्याचेच त्यांना माहीत असते. तेवढ्या माहितीवर ते तिला सांगतात की त्याच्या मासिक वेतनात गीताला संसार चालविणे अवघड जाईल कारण तिचे राहणीमान ऐषारामी आहे. तिच्या गरजा पूर्ण करण्याकरिता कदाचित तिच्या पोलिस इन्स्पेक्टर पतीला आपल्या नोकरीत बेईमानी करावी लागू शकेल. या सल्ल्याला शिरोधार्य मानत गीता अमरसोबत असलेले नाते तोडून टाकते आणि त्यास पुन्हा कधीही न भेटण्याचे वचन हरिदासना देते, जे ती कसोशीने पाळते. बहीणीच्या एका इन्स्पेक्टरसोबत होणार्या लग्नाच्या प्रस्तावास दिलेला नकार हा हरिदास चौधरींनी या कथेतील पहिला नकार.

***** FLASH BACK ENDS *****
कर्मधर्मसंयोगाने एकमेकांसमोर आलेले अमर व गीता एकदाच आपल्या या भूतकाळातील नात्याचा ओझरता उल्लेख करतात. हरिदास चौधरींना तर अमरच्या भूतकाळाविषयी काहीच ठाऊक नसल्याने त्या दोघांतही याविषयी काही चर्चा होत नाही. अमर व त्याचे पथक त्यांच्या कार्याला सुरूवात करतात; ज्यात दूरध्वनी संचास ध्वनिमुद्रण यंत्र जोडणे, खिडकीत दूर्बीण बसविणे आदी बाबींचा समावेश असतो. अपेक्षेप्रमाणेच थोड्याच वेळात अपहरणकर्ता राजसिंह (अमजद खान) चा दूरध्वनी येतो. आपण चुकून वाहनचालकाच्या मुलाला पळविले असले तरी आपल्या योजनेत काडीचाही बदल होणार नसल्याचे तो चौधरींना स्पष्टपणे सांगतो. आपणांस वीस लाख रुपये हवे असून ते न मिळाल्यास आपण बन्सीला ठार करू व त्याच्या मृत्यूचे पातक हरिदास चौधरींच्या माथी लागेल असे तो त्यांना स्पष्टपणे बजावतो. चौधरी वाहनचालकाच्या मुलाकरिता इतकी मोठी रक्कम द्यायचे नाकारतात. त्यांनी दिलेला चित्रपटातला हा तिसरा नकार.
हरिदास यांच्या नकार घंटेमुळे त्यांची पत्नी व बहीण दोघीही चांगल्याच नाराज होऊन त्यांना फैलावर घेतात. चालक त्यांच्या पायावर पडून ओक्साबोक्शी रडू लागतो. मुलगा गुड्डूही अतिशय दु:खी होतो. स्वीय सहाय्यक अनिल सर्वांसमोर सांगतो की खरे तर वीस लाख रूपये ही रक्कम चौधरींकडे आहे, परंतू ती त्यांची स्वत:ची नसून त्यांनी कंपनीकडून कर्ज स्वरूपात घेतली आहे व त्यांना दुसर्याश एका महत्त्वाच्या कार्याकरिता ती खर्च करावयाची आहे. हे ऐकल्यावर चौधरी अनिलला पुन्हा एकदा दुसर्याक दिवशी दिल्लीला जाऊन लवकरात लवकर तो सौदा पूर्ण करण्याची सूचना करतात. इकडे कुटूंब चौधरींचा अधिकच राग राग करू लागते.

दुसर्याा दिवशी अनिल येतो पण वेगळीच बातमी घेऊन... तो चौधरींना स्पष्टपणे सुनावतो की ते कसे विचित्र कोंडीत सापडले आहेत. त्यांनी अपहरणकर्त्याला पैसे दिले नाहीत तर कुटुंबात आणि समाजात त्यांची छी-थू होईल, कारण ते नोकराच्या मुलाला आपल्या मुलाहून हलक्या दर्जाचा समजतात असा त्याचा अर्थ होईल. त्याच वेळी जर त्यांनी हे पैसे अपहरणकर्त्यास दिले तर ते कंगाल होतील कारण हे पैसे अनुत्पादक जागी पडणार आहेत. त्याशिवाय ज्या समभागांची खरेदी करायचे स्वप्न हरिदास पाहत असतात ते समभाग मिळविण्यात अनिलच्या मदतीने इतर संचालक यशस्वी झालेले असतात. अनिलची ही बेईमानी चौधरींकरिता धक्कादायक असते. इकडे ज्या कुटुंबाकरिता आपण आपले ऐश्वर्य सांभाळायचा प्रयत्न करतोय ते कुटुंबही आपल्याला दुरावत चाललेय हे पाहून चौधरी अपहरणकर्त्यास रक्कम द्यायचा निर्णय घेतात.

अपहरणकर्त्याच्या सूचनेप्रमाणे रक्कम त्याने सांगितलेल्या ठिकाणी सोडली जाते. यावेळी लक्षात राहणारा खास उल्लेखनीय प्रसंग म्हणजे अमरने रक्कम ज्यात ठेवायची आहे त्या पिशवीत लपविण्याकरिता एक कॅप्सूल आणलेली असते. अपहरणकर्त्यांनी जर रक्कम काढून ही पिशवी पाण्यात फेकली तर ही विशिष्ट कॅप्सूल एक उग्र गंध सोडणार असते आणि जर का त्यांनी ती पिशवी जाळली तर पिवळ्या रंगाचा धूर वातावरणात सोडणार असते. परंतू अमर बुचकळ्यात पडतो की ही कॅप्सूल या चामडी पिशवीत लपवायची तरी कशी? तेव्हा हरिदास चौधरी स्वत: आपली चामड्यावर वापरली जाणारी हत्यारे घेऊन पिशवी मोठ्या खुबीने तासून त्यात ती कॅप्सूल लपवितात.
रक्कम मिळाली तरी अपहरणकर्ते बन्सीला सोडत नाहीत त्यामुळे चौधरी कुटुंबावर अजुनही शोकाचे सावट असते. तशातच हरिदास चौधरींना इतर संचालक बैठकीत सुनावतात की आता ते कंपनीचे प्रमुख राहिलेले नाहीत. त्यांनी कंपनीकडून घेतलेले वीस लाख रूपये त्वरीत परत करावेत अन्यथा त्यांचेवर आर्थिक गैरव्यवहार करून कंपनीला फसविल्याबद्दल खटला दाखल करण्यात येईल. या क्षणाला हरिदास चौधरी पूर्णत: हताश होतात. त्यांच्याकडे आता काहीच नसते. समभाग इतरांनी खरेदी केल्यामुळे कंपनीचे प्रमुख पद गेलेले, डोक्यावर वीस लाख रूपयांचे कर्ज आणि इतके करूनही बन्सीचा अजूनही काहीच पत्ता नाही.

अथक तपास करून आणि मिळालेल्या वेगवेगळ्या धाग्यादोर्यांरच्या साहाय्याने अमर मोठ्या कौशल्याने अपहरणकर्त्यांच्या टोळीतील मनमोहन (भरत कपूर) आणि प्रीती (शीतल) यांच्या पर्यंत पोचतो. त्या दोघांना अटक करून त्यांच्या तावडीतून बन्सीला सोडवून चौधरी कुटूंबापर्यंत पोचविण्यात यशस्वी होतो. वाहनचालक खुश होतो पण त्याचवेळी त्याच्या मुलाला वाचविण्याकरिता मोठी रक्कम खंडणी म्हणून देणार्या हरिदास चौधरींची अवस्था अतिशय बिकट झालेली असते कारण अमरने मुलाला सोडवून आणलेले असले तरी रक्कमेचा काहीच पत्ता नसतो. अपहरणकर्त्यांच्या टोळीतील दोघे अटकेत असल्याचे कळताच मुख्य अपहरणकर्ता राजसिंह याने रक्कम आधी लपविलेल्या जागेवरून काढून स्वत:च्या ताब्यात घेतलेली असते.

प्रसारमाध्यमे (आकाशवाणी व वृत्तपत्रे) देखील आता या प्रकरणात रस घेऊ लागलेली असतात. वाहनचालकाच्या मुलाला
वाचविण्याकरिता खंडणी देणार्याी हरिदास चौधरींविषयी अधिकाधिक लोकांना माहिती होऊ लागते. त्यांच्या या औदार्याबद्दल त्यांचे समाजात नाव होऊ लागते. रोज अनेक लोकांची त्यांना अभिनंदनपर पत्रे येऊ लागतात. अचानक एके दिवशी अनिलही येतो - संचालक मंडळाचा निरोप घेऊन. त्यांना म्हणे हरिदास चौधरींना बैठकीत अपमानित करून बाहेर हाकलून दिल्याच्या कृतीचा पश्चात्ताप झालेला असतो. इतकेच नव्हे तर ते हरिदास चौधरींना आता सन्मानाने चेअरमनपद देखील देऊ करीत असतात शिवाय त्या वीस लाख रूपयांच्या वसूलीकरिता कुठलाही दावा दाखल करायचा विचारही कंपनी रद्द करणार असते. अर्थातच इतक्या सर्व गोष्टी देऊ करणार्याा संचालकांच्या त्या बदल्यात हरिदास चौधरींकडून काय अपेक्षा आहेत याबद्दल ते अनिलला विचारतात. आनंदाची गोष्ट म्हणजे बदल्यात चौधरींनी काहीच करायचे नसते असे अनिल उत्तरतो. त्यावर संचालक मंडळाला हरिदास चौधरी हवे आहेत असे नसून त्यांच्या रूपात आपल्या त्यागामूळे अचानक समाजात पत वाढलेली एक संत प्रतिमेची व्यक्ती हवी आहे. या व्यक्तिच्या प्रतिमे आड कंपनीच्या संचालकांनी स्वत:ला हव्या त्या गैर गोष्टी करीत राह्यचे आणि चेअरमनने त्या सर्वांना मूक संमती देत केवळ रबरी शिक्क्याप्रमाणे वावरायचे हीच संचालकांची छुपी अपेक्षा असल्याचे व ती आपण ओळखल्याचे चौधरी अनिलला सांगतात. ते अर्थातच या प्रस्तावास ठाम नकार देतात. तुमच्या तत्वांना कवटाळून राहाल तर भिकारी व्हाल असे अनिल त्यांना सुनावतो. अनिलची पुढील बकबक ऐकून न घेता चौधरी त्यास घरातून हाकलून लावतात. अर्थातच हरिदास चौधरींनी दिलेला हा चित्रपटातला शेवटचा आणि निर्णायक नकार ज्यास शीर्षक प्रसंग किंवा टायटल इन्सिडंट असेही म्हणता येईल.

पुढे अपेक्षेप्रमाणेच संचालक मंडळी आर्थिक घोटाळ्याचा आरोप करीत चौधरींना न्यायालयात खेचतात. खटल्यातील सर्व पैलूंवर नजर टाकल्यावर चौधरींनी कुठलाही आर्थिक गैरव्यवहार केल्याचे न्यायालय अमान्य करते. परंतू त्यांनी कंपनीकडून घेतलेली वीस लाख रूपयांची रक्कम दहा दिवसात कंपनीस परत करणेही तितकेच गरजेचे असून त्यांनी तसे न केल्यास त्यांची सर्व मालमत्ता जप्त करून तिचा लिलाव करून येणार्याज रकमेतून हे वीस लाख रूपये कंपनीस देण्यात यावेत असा स्पष्ट आदेश न्यायालयाकडून दिला जातो.

दिवस पुढे सरकत असतात आणि अमरला राजसिंह किंवा रक्कम याविषयी काहीच ठोस माहिती हाती येत नाही. परंतू एक चाल म्हणून अमर आपणांस मुख्य गुन्हेगाराविषयी खात्रीशीर माहिती झाली असून लवकरच तो जेरबंद होईल असे पत्रकार परिषदेत जाहीर करतो. ही माहिती आणि ज्या पिशवीतून रक्कम पोचविली गेलेली असते तिचे छायाचित्र वर्तमानपत्रात प्रसिद्ध होते. वर्तमानपत्रे वाचून गोंधळलेला राजसिंह उलटसुलट हालचाली करू लागतो. सर्वप्रथम तो ती पिशवी कचर्या त टाकतो आणि दुसर्याज पेटीत रक्कम ठेवतो. कचरा जाळला गेल्यावर तेथे पिवळा धूर दिसताच त्या ठिकाणी अमर पोचतो आणि सापळा रचतो. संशयास्पद हालचाली करणारा राजसिंह पोलिसांच्या नजरेच्या टप्प्यात येतो. त्यानंतर अगदी व्यवस्थित योजना आखून राजसिंहला त्याच्या जुन्या जागी येण्यास अमर भाग पाडतो आणि तेथेच तुफान संघर्ष होऊन राजसिंह मारला जातो. रक्कम अमरच्या ताब्यात येते.

रक्कम घेऊन अमर हरिदास चौधरींच्या बंगल्यावर पोचतो तेव्हा जप्ती होऊन लिलाव प्रक्रिया चालु झालेली असते. अनेक मौल्यवान वस्तूंची विक्री झालेली असली तरीही बंगला लिलावापासून वाचविण्यात आणि तो पुन्हा चौधरींच्या ताब्यात देण्यात अमर यशस्वी होतो. दरम्यानच्या काळात आपल्या बहिणीवर प्रेम करणारा पोलिस अधिकारी हा अमरच असल्याचे चौधरींना समजलेले असते. भूतकाळात घडलेल्या त्या प्रकाराबाबत ते अमरची क्षमा मागून अमर व गीताच्या विवाहाची निश्चिती करतात.

हरिदास चौधरी - चित्रपटाच्या कथेतले एक प्रमुख पात्र. हा काही कुणी संत महात्मा नाहीये. आपण कमावत असलेली दौलत ही आपल्याकरिता, आपल्या कुटुंबाकरिता आपण कमावत आहोत हे त्याला पक्के ठाऊक आहे. ती काही समाजावर उधळा असा संदेश तो किंवा त्याच्यामार्फत दिग्दर्शक जनतेला नक्कीच देत नाहीये आणि म्हणूनच हरिदास सुरूवातीला वाहनचालकाच्या मुलाला सोडविण्याकरिता वीस लाख रूपये देण्यात फारसा रस दाखवित नाही. त्याचप्रमाणे या हरिदास चौधरीला श्रीमंतीत जगण्यापेक्षा गरिबीत जगणे अवघड आहे हे देखील चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळेच तो बहिणीला पोलिस अधिकार्याणसोबत विवाह करू देत नाही. पण त्याचवेळी आपले काम प्रामाणिक पणे करीत राहा हा संदेश देतो. सुरूवातीला बुटाचा दर्जा घसरविण्यास नकार देऊन आणि शेवटी संचालक मंडळाच्या मानहानीकारक रबरी शिक्क्याच्या प्रस्तावास देखील नकार देऊन. मुख्य म्हणजे तो आपले मूळचे जुने काम विसरलेलाही नाहीये हे चामडी पिशवीत कॅप्सूल लपविण्याच्या प्रसंगातून दिसून येते. आपल्या या अंगभूत कौशल्यामुळेच वेळ पडल्यास आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर मानहानी करून घेत जगण्यापेक्षा पुन्हा नव्याने सुरूवात करण्याची त्याची तयारी आहे.

पस्तीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे नाव ऐकल्यावर त्यावेळी जन्माला देखील न आलेल्या व आज पंधरा ते पंचवीस वयोगटात असणार्या महाविद्यालयीन युवकांना देखील हेलनवर चित्रीत झालेले “मुंगळा मुंगळा” व कथेच्या दृष्टीने अजिबात महत्त्वाचे नसणारे हे गाणे (आजच्या भाषेत आयटम सॉंग) लगेचच आठवते. परंतू चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ऐन तारूण्यात असणार्याम व आता पन्नाशीच्या घरात असणार्या. मंडळींनाही चित्रपटातला शीर्षक प्रसंग आठवत नाही हे चित्रपटाचे यश की अपयश? चित्रपटातला कुठला भाग आपण पुढच्या पिढीतल्या मंडळींपर्यंत पोचवला? मुंगळा गाणे न चूकता अजुनही गणेश मिरवणूकीत वाजत नसते. हरिदास चौधरीचा नकार कुठल्या कुठे विरून गेलाय. आज समाजात विविध पदांवर राहून जी मंडळी अब्जावधी रकमेचे आर्थिक घोटाळे करीत आहेत आणि तरी देखील त्यांच्या जागेवर ती टिकून आहेत कारण त्यांच्या सोबत कुणीतरी जनमानसात चांगली प्रतिमा असलेले आणि त्यांच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे आहे म्हणूनच.

तुमच्या कृष्णकृत्यांना झाकण्याकरिता माझ्या उजळ प्रतिमेचा वापर करण्यास मी नकार देतोय हे ठणकावून सांगणे का जमत नाहीये कुणालाच? चित्रपटातल्या हरिदास चौधरीवर तर असा नकार दिल्यामुळे कंगाल व्हायची वेळ येत होती. आजच्या काळात तर केवळ पद सोडावे लागेल या भीतीने भ्रष्टाचारी मंत्रिमंडळाचे नेतृत्व करणारे उजळ प्रतिमेचे पंतप्रधान देखील असा नकार देऊ शकत नाही हे पाहून सखेद आश्चर्य वाटते. महाभारतातल्या युधिष्ठिराने आपल्या सत्यवचनी प्रतिमेचा वापर पांडवांची खोटी बाजू झाकण्याकरिता एकदा करू दिला होता, पण त्याच्या या उदाहरणाचा दाखला देत आजचे तथाकथित धर्मराज युधिष्ठिर कायमच “नरो वा कुंजरो वा” अशी भूमिका घेऊ लागले आहेत. आता या देशाला परत एखादा हरिदास चौधरी भेटणार का? की असे लेख लिहून आणि वाचून “हरिदासाची कथा मूळ पदावर” हेच आपण म्हणत राहणार?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त परिचय घडवला इन्कार चित्रपटाचा आणि मांडलेले विचार अंतर्मुख करायला लावणारे...

आवडलं लिखाण! लिहीत रहा.

अकिरा कुरुसावा ह्या जपानी दिग्दर्शकाचा हाय अ‍ॅन्ड लो नावाच्या चित्रपटाच कथानक आहे हे. पण मुळ कथानकाची अत्यंत बटबटित कॉपी . Sad
मुळ सिनेमात चालकाच्या मुलाला सोडावण्यासाठी मोजावी लागणारी किंमत म्हणजे देशोधडीला लागणे, हे कळत असताना नायकाची निर्णय घेताना होणारी घालमेल अत्यंत सटली (मला योग्य मराठी शब्द सुचवा) मांडली आहे.
उगाचच उपकथानकं नाहीत, मेलोड्रामा नाही. अत्यंत संयत होता मूळ सिनेमा. चेतन ,आपण नक्की पहावा.

तुमच्या कृष्णकृत्यांना झाकण्याकरिता माझ्या उजळ प्रतिमेचा वापर करण्यास मी नकार देतोय हे ठणकावून सांगणे का जमत नाहीये कुणालाच? चित्रपटातल्या हरिदास चौधरीवर तर असा नकार दिल्यामुळे कंगाल व्हायची वेळ येत होती. आजच्या काळात तर केवळ पद सोडावे लागेल या भीतीने भ्रष्टाचारी मंत्रिमंडळाचे नेतृत्व करणारे उजळ प्रतिमेचे पंतप्रधान देखील असा नकार देऊ शकत नाही हे पाहून सखेद आश्चर्य वाटते. महाभारतातल्या युधिष्ठिराने आपल्या सत्यवचनी प्रतिमेचा वापर पांडवांची खोटी बाजू झाकण्याकरिता एकदा करू दिला होता, पण त्याच्या या उदाहरणाचा दाखला देत आजचे तथाकथित धर्मराज युधिष्ठिर कायमच “नरो वा कुंजरो वा” अशी भूमिका घेऊ लागले आहेत. आता या देशाला परत एखादा हरिदास चौधरी भेटणार का? की असे लेख लिहून आणि वाचून “हरिदासाची कथा मूळ पदावर” हेच आपण म्हणत राहणार?>>>>>
सहमत!

अकिरा कुरुसावा ह्या जपानी दिग्दर्शकाचा हाय अ‍ॅन्ड लो नावाच्या चित्रपटाच कथानक आहे हे.>>> धन्स, हे माहित नव्ह्ते...

अत्यंत सटली (मला योग्य मराठी शब्द सुचवा)>> तरल रित्या/पणे ??

मस्त लिहिलंय, आवडलं Happy
पण सुरुवातीला संगीत चित्रपट, दुरदर्शनबद्दल लिखाणाची सुसंगती जरी लागली असली, तरीही एक गॅप जाणवला. इन्कारबद्दल अगदी योग्य. मुळात चित्रपट धंदा म्हणून पाहणारे लोक त्यातल्या चांगल्या गोष्टी कॅश करता येतील की नाही याचाच विचार जास्त करत असावेत.

आणि अवांतर : जसं की कुठल्याही लिखाणात, किंवा वाद्य वादनात, किंवा गायनात जशी एखादीच पंचलाईन, तान, जागा मनाला भिडून जाते, आणि आपल्याला त्या सादरीकरणाचा पूर्ण आनंद मिळाल्याचं समाधान देते, मग भलेही आपल्याला बाकीचं सगळंच आठवेल, लक्षात राहिल असं नसतं ना... क्वचितच आपल्याला अगदी अथ पासून इति पर्यंत आवडेल असं होतं (ज्याच्या त्याच्या अभिरुचीनुसार), तसंच इन्कार चित्रपटातल्या मुंगळा गाण्याबद्दल लोकांचं झालं असेल. (त्याचा दर्जा हीन की चांगला, समाजाची अभिरूची कुठल्या दिशेने कललेली असते, हा भाग अलाहिदा.)

छान लिहिलंय Happy

राजेश रोशन यांचे संगीतातले वेगळे प्रयोग आवडणारे काही दर्दी संगीतप्रेमी किशोरकुमार आणि आशा भोसले यांचं “तूमको हमसे प्यार है” हे गाणं लक्षात ठेवतात>>>>अगदी अगदी. "छोडो ये निगाहो का इशारा..." सुंदर गाणं आहे. Happy
इन्कार मधली हि तिनही गाणी आवडतात. Happy

छान लिहिलंय. मी बघितला होता आणि बर्‍यापैकी आठवतोय. गाणे गाज(व्)ले गेले पण तो काही हेलनचा चांगला नाच म्हणता येणार नाही.

एकदम सुंदर लिहीले आहे इन्कारबद्दल. ते सुरूवातीचे 'संगीत' बद्दलचे दोन परिच्छेद जरा याच्याशी संबंधित वाटले नाहीत, पण ते समजून न घ्यायला वैचारिक आळशीपणा कारणीभूत असेल माझा Happy

इन्कारबद्दल मात्र मस्त लिहीले आहे. खूप लहानपणी पाहिलेला असल्याने कथा माहीत नव्हती फारशी (किडनॅपिंग सोडून), यातून कळाली. त्या दशकातील इतर चित्रपटांच्या मानाने खूप चांगला थ्रिलर असावा असे वाटते.

चित्रपट बनतो नेमका कुठली गोष्ट प्रेक्षकांच्या मनात ठसविण्यासाठी (Highlight करण्यासाठी) आणि लोक तो लक्षात ठेवतात कुठल्या भलत्याच कारणाकरिता.>>> हे निरीक्षण एकदम अचूक आहे!

हा लेख एकाच वेळी तीन संकेतस्थळांवर प्रकाशित केला होता. बाकी दोन संकेतस्थळांवरील प्रतिसाद पाहिले आणि उत्तरे देखील दिली होती.

इथे इतके सुंदर प्रतिसाद मिळालेले आहेत हे पाहिलंच नव्हतं. सर्व प्रतिसादकांचे अतिशय आभार आणि उशीर झाल्याबद्दल दिलगिरी.

@ इन्ना

हाय अ‍ॅन्ड लो हा जपानी चित्रपट आहे ना? मग त्याची इंग्रजी आवृत्ती उपलब्ध आहे काय?

अवांतर - देशाचे माननीय पंतप्रधान बदलले असल्याने शेवटचा परिच्छेद कालबाह्य झालाय काय?

चेतन, फार म्हणजे फारच सुंदर ! Happy
चित्रपटाचे नाव माहित होते, मी पाहिलेला नाहीये. कथानक या लेखातुनच कळाले.
दुर्दैवाने अशी दर्जेदार कथानके (निर्माते आणि प्रेक्षक देखील) आता राहिलेले नाहीत. Sad

छान लेख नेहमीप्रमाणेच.. आणि चित्रपट परीचयही छान..

पण लोकांना चित्रपटाशी संबंध नसलेले गाणे लक्षात राहिले पण चित्रपटाचा आशय नाही हा आरोप वा व्यथा फारशी पटली नाही. मुळात गाणी हा टोटली वेगळा भाग आहे, परदेशी चित्रपटांमध्ये ती नसतातच, आपल्याकडे चित्रपटांबरोबर येतात ईतकेच. त्यामुळे चित्रपट चालणे न चालणे, आणि गाणी चालणे न चालणे हे वेगळेच बघायला हवे. उलट गाजलेल्या गाण्यांचा चित्रपटांना झाला तर फायदाच होतो, मार्केटींगच्या द्रुष्टीने. बाकी चित्रपट बनवताना व्यावसायिक हेतूने बनवला असेल तर त्यातील आशय लोकांपर्यंत गंभीरपणे पोहोचलाच पाहिजे असा हट्टही सोडायला हवा. बाकी त्या मुंगळा गाण्यावर आजवर ४०-५० वेळा तरी नाचलो असेल किमान.

अमजद खान ला शोधायला एक कुत्र्याचे पथक आणि त्याच्या मागे पोलीस याचे चित्रीकरण एखाद्या हॉलीवुड चित्रपटाला लाजवेल असे होते.

पाण्यात बुडालेली कार आणि मासेमारीला आलेला हास्य विनोदी कलाकार केस्तो मुखर्जी त्याची पोलीसांना मिळालेली टीप की पेट्रोलच्या विहीरीचा शोध लागला आहे यावरुन इथे कार बुडाली आहे यावर पोलिसांचे येणे सुध्दा अस्सल पोलीसी तपास दाखवणारा हा सिनेमा होता.

आजच्या दबंग किंवा इतर गाजलेल्या पोलीस पटापेक्षा पोलीस खात्याच्या कामाचे प्रदर्शन उत्तम झाल्याचे दिसते.

अमजद खान एक हात नसल्याचे दाखवत जेव्हा तिकीट काढायला येतो तेव्हा उजव्या हाताने डाव्या हाताच्या हिप पॉकेटकधील वॅलेट काढायचा प्रयत्न करतो हे विनोदखन्नाच्या सि आय डी च्या लक्षात येते हा सिन सुध्दा लक्षात राहिल असा होता.

मुंगळा हे गाण सिनेमाच्या कथेच्या द्रूष्टीने महत्वाचे नसल तरी पुढिल अनेक वर्षे अनेक ऑर्केस्ट्रांच्या प्रयोगात न टाळता येणारा आयटम म्हणा कि ऑर्केस्ट्राचे आयटम साँग ( डान्स ) होऊन बसले होते.

धन्यवाद महेश, ऋन्मेऽऽष, नितीनचंद्र आणि देवकी.

@ महेश

<< दुर्दैवाने अशी दर्जेदार कथानके (निर्माते आणि प्रेक्षक देखील) आता राहिलेले नाहीत. >>

अजुनही चांगल्या कथानकांचे चित्रपट मोठ्या संख्येने बनत असतात, प्रेक्षक त्यांच्या वाटेला जात नाही आणि त्याचप्रमाणे वितरणव्यवस्थाही प्रचंड मक्तेदारी स्वरूपाची असल्याने अशा चित्रपटांना चित्रपटगृह उपलब्ध होत नाही.

नव्या काळातली काही चांगली कथानके असलेले चित्रपटः-

 1. राईट या राँग
 2. सोच लो
 3. पेबॅक
 4. आजचा दिवस माझा
 5. गॉड तुस्सी ग्रेट हो
 6. चेस
 7. हाईड अ‍ॅन्ड सीक
 8. डेव्हिड
 9. संकट सिटी
 10. ९९
 11. बीइंग सायरस
 12. जोर लगा के हय्या
 13. दम मारो दम
 14. गेम
 15. रिस्क
 16. डी डे
 17. जॉन डे
 18. झूठा ही सही
 19. गंगुबाई
 20. माई
 21. फ्यूचर तो ब्राईट है जी
 22. औरंगजेब
 23. लॅन्ड, गोल्ड, वुमेन
 24. लिसन अमाया
 25. मैने गांधी को नही मारा
 26. रण
 27. बागबान
 28. सिक्स्टीन
 29. द किलर
 30. पाप
 31. रोग
 32. द स्ट्रेन्जर्स
 33. उडान
 34. वॉर्निंग
 35. यंगिस्तान
 36. कार्पोरेट
 37. हम तुम और घोस्ट
 38. हम कौन है?
 39. स्टुडंट ऑफ द इयर
 40. द हिडन आय - तिसरी आंख
 41. टेबल नं २१
 42. १३ बी

वरच्या यादीत उल्लेख असलेले हे सर्व चित्रपट वर्ष २००० नंतर बनलेले आहेत. यापैकी द हिडन आय - तिसरी आंख हा वैतेश्वरन या दक्षिण भारतीय चित्रपटाचा अनुवादित चित्रपट असून यादीतले इतरही काही चित्रपट हे विदेशी अथवा भारतीय प्रादेशिक भाषेतील चित्रपटांच्या कथानकावर बेतलेले आहेत. असे असले तरीदेखील या चित्रपटांचे कथानक दर्जेदार होते हे नाकारता येणार नाही.

@ नितीनचंद्र

हो बरोबर आहे तुमचं. असे अजुनही बरेच आहेत. मी फक्त मला चटकन आठवली ती उदाहरणं दिलीत.

@ नितीनचंद्रजी,

धन्यवाद. माझ्याकडे सुद्धा "१ रुका हुवा फैसला" आहे तसेच वर यादीत जे लिहीले आहेत तेदेखील (आणि त्याहून खुपच जास्त, अंदाजे १००० चित्रपट) माझ्या संग्रहात आहेत. इथे नवीन चित्रपटांचीच (वर्ष २००० नंतरच्या) यादी द्यायची असल्याने लिहीलेले नाहीत. अन्यथा माझ्या संग्रहात मै आझाद हूं, विजय, मै सोलह बरसकी, सेन्सॉर, सौ करोड, अमन, अमानुष, गाईड, हीरा-पन्ना असे अनेक उत्तमोत्त्म चित्रपट आहेत.

चेतन भारीच, लायब्ररी चालू करू शकाल तर पहिला सभासद मी असेन. Happy
वरील यादीत येऊ शकतील असे दोन चित्रपट
खोसला का घोसला
धूप - ओम पुरी यांचा

धन्यवाद महेश,

<< चेतन भारीच, लायब्ररी चालू करू शकाल तर पहिला सभासद मी असेन. >>

लायब्ररी कशाला? माझ्याकडे १००० च्या वर सीडीज् आणि अनेक चित्रपट तर थेट हार्डडिस्क वर आहेत. तुम्हाला हवे असल्यास माझ्याकडील मास्टर सीडीवरून डुप्लिकेट सीडी बनवून देईल किंवा यूएसबी ड्राईव्ह वर कॉपी करून देईन.

मला ०९५५२०७७६१५ वर संपर्क करा.

चेतनजी, लेख आवडला. इन्कार चित्रपट अजुन पाहिलेला नाही पण तुमच्या लेखामुळे त्याचे कथानक समजले. लेखाच्या शेवटच्या परिच्छेदातील तुम्ही विचारलेल्या प्रश्नामुळे खरोखर अंतर्मुख व्हायला झाले.

चेतनजी,
छान लिहिलयं . चित्रपट परीचय आवडला.हा इन्कार नाही पाहीला.मुंगळा गाणं त्यातलं आहे हेही माहीत नव्हतं . पण हे फेमस गाणं आवडतं.उषा मंगेशकर यांना कायम या गाण्यासाठी कुठल्याही शो मधे वन्स्मोर येतोच.मी नवीन इन्कार पाहीला आहे चित्रांगदा आणि अर्जुन रामपालचा विषय चांगला होता पण चित्रपट ठीकच वाटला.त्यातही शेवटचे गाणं खुप आवडलेलं.'खामोशीयां आवाज है' कोणी गायलय ते आठवत नाही.पण गाणं लिहिलंय सुंदर आणि अर्थही छान आहे.

लिस्ट मस्त आहे वरची त्यातले बहुतेक पाहिलेत .अजुन वाढली तरी चालेल लिस्ट. उडान आणि आर माधवनचा १३बी एकदम आवडते.

धन्यवाद सिनि आणि सुमुक्ता.

@ दिवाकर देशमुख,

मी गॉड तुस्सी ग्रेट हो चं फक्त कथानक चांगलं आहे असं म्हंटलंय. तसंही ते मूळचं परकीय कथानक आहे. आपल्या आयुष्यात काही बिघाड झाला की देवाला दोष देणं सोपं असतं पण स्वतः देवपदावर असताना सर्वांनाच खुष ठेवणंच अवघडच नव्हे तर अशक्य आहे या कथासूत्रावर हा चित्रपट आधारलेला आहे. सलमान खान नायकाच्या भुमिकेत आणि अमिताभ बच्चन देवाच्या भुमिकेत आहेत. सादरीकरण टिपीकल सलमान स्टाईल असल्याने चित्रपटाच्या दर्जाविषयी दुमत असू शकेल परंतु एकुणात निदान मला तरी कथानक आवडले. विशेषतः महेश यांच्या << दुर्दैवाने अशी दर्जेदार कथानके (निर्माते आणि प्रेक्षक देखील) आता राहिलेले नाहीत.>> या शेर्‍यावर विचार करता हल्लीच्या काळातलं चांगलं कथानक असं म्हणता येईल (वैयक्तिक मत / आवड / पसंत. इतरांनी आवडून घ्यावं असा आग्रह अजिबात नाही).

परकिय कथानकच व्यवस्थित होते तिथे फक्त एका शहराचेच देवपद दिले होते. इथे तर सगळा जगच ताब्यात दिला आहे. तिथेच फसले कथानक. अर्थात मला ओरिजनल कथानक आवडले होते. ते शक्य होउ शकते असे मानता तरी आलेले Happy

Pages