नागेश्वर खेड चिपळूण मार्गे

Submitted by Srd on 20 March, 2013 - 11:10

भाग(१)

मी नोव्हेँबर २००६ मध्ये
फक्त नागेश्वरला गेलो होतो त्याबद्दल :
प्रथम खेड डेपोला(०२३५६ २६३०२६) डोंबिवलीहून फोन केला
"चोरवणे बस कधी सुटते ?" .
"तुम्हाला नागेशवरला जायचे असेल तर दिवा सावंतवाडीने वेळेवर आल्यास(११.००)साडेअकराची
आणि कोकणकन्याने ०३.४५ची मिळेल पण शाळेच्या बस आहेत तुमच्या रेल्वेसाठी थांबत नाहीत " इति कंट्रोलर .

दुसऱ्‍या दिवशी दिवा गाडीने गेलो ११ला खेड !!
झटपट भरणे नाक्यावरून डेपो गाठला ,
साडेअकराची चोरवणे
मिळाली .
भरणे नाक्यानंतर स्टेशनच्या उत्तरेकडल्या पुलावरही बस थांबली .
(दिवा रेल्वेच्या मागच्या डब्यात बसावे आणि अर्धा तास उशिर झाल्यास पटकन पुलावर जाऊन बस धरावी).
खेड मार्गे चोरवणे पासष्ट
तर चिपळूणहून पस्तिस किमी आहे .

ही बस पुढे खोपी ,कासई धामणद ,वावे ,सापर्ली ,
चोरवणे ,निवेपर्यँत जाते . कासईला पांढरे धोतर टोपी घातलेला एक माणूस येऊन माझ्याजवळ बसला .
बरेच जण त्याच्या पाया पडत होते .
मी त्याच्याकडे नागेश्वरची चौकशी केली .
"तुम्ही एकटे जाऊ नका अस्वले आहेत गवे अंगावर येतात ,
मी तुम्हाला गाईडकडे नेतो
मला पण तिकडेच जायचे आहे".

दुपारी दीड वाजता चोरवणे गावच्या उतेकरवाडीला पोहोचलो . येथे बरेच उतेकर आहेत .
त्यामाणसाने रमेश उतेकर यांच्या घरी नेले ,
यांना नागेश्वरला जायचे हे सांगितले आणि गावात गेला .
"मला नागेश्वरला जायचे आहे
आणि तेथून बाबुकडा ,
वासोटा करून उद्या
परत यायचे आहे" ,मी .
"उद्या चिपळूणला दुपारी
काम आहे आता नागेश्वर
जाऊन रात्री ९ला
परत येऊ ",रमेश .
"चालेल".

आम्ही दोघे अडीचला निघालो . वाटेत शेती ,भात ,आंबे ,
कोकण रेल्वे ,एसटी ,जत्रा ,
गाव ,मुंबई ,गर्दी ,सर्व विषयावर गप्पा झाल्या .
"तो माणूस कोण आहे ?
त्याच्या पाया का पडत होते "? "कासई गावातले स्मारक बसमधून येतांना तुम्ही
पाहिले का ?" .
"हो ,उजवीकडे होते ". त्यांचाच चोवीस वर्षाँचा मुलगा कारगिलमध्ये शहीद झाला त्याचेच ते स्मारक . . ."त्याचे वडील मठकर "! माझ्या बाजूला बसलेले . . गाईडच्या घरी घेऊन आलेले . . आता अस्वल ,गवा ,वाघ कसलीही भीती उरली नाही .

आम्ही गुहेपाशी वर आलो तेव्हा साडेपाच झाले होते .
आत उन आले होते .
वरच्या छतातून नैसर्गिक थेँब थेँब पाणि पिँडीवर
पडत होते .
या गुहेच्यावर जो डोँगराचा शंभरेक फूट भाग आहे त्यात पावसाचे पाणी मुरून राहाते व ते या कपारीतल्या छतातून थेंबाथेंबाने पडते . त्याखाली पिँडीवर अभिषेक घडतो .
हे पाणी पिँडीपुढच्या छोट्या कुंडात साठते . महाशिवरात्रीच्या वेळी येणाऱ्‍या भाविकांना पुरत नाही .

या डोंगराच्या मागे पाच
मिनिटावर एक झरावजा पाण्याचा स्त्रोत होता तो मोठा करण्याचे २००५ मध्ये चोरवणे गावकऱ्‍यांनी प्रयत्न केले .
आम्ही तिकडे गेलो .
"सुरुंग लाऊन खडक फोडला की झरा फिरायचा आणि पाणी गायब व्हायचे .
मी त्यांना बोललो माझी येथे व्यवस्था करा मी छिन्नी हातोड्याने खडक फोडून खोल करतो ".
"गावकरी तयार झाले आणि मी येथे दोन महिने येऊन हळूहळू खडक काढला .
हे माझे हात पाहा अजून घट्टे आहेत", रमेश उतेकर .
"कधी रात्री येथेच राहिलो तेव्हा या पाण्यावर आलेला वाघही
जवळून पाहिलाय ".
"तुम्ही शिवरात्रीच्या अगोदर चार पाच दिवस या तुम्हाला बाबुकडा ,
वासोटा जाणारे गावकरी मिळतील वाट शोधायला नाही लागणार"

साडेसहाला अंधार पडायला लागला आणि आम्ही परत निघालो .
वाटेत बैटरी उतरली मग मेणबत्तीच्या उजेडात नऊला गावात आलो .
घरी गरमागरम जेवण आमची वाट पाहात होते .
रमेश यांचे घर मोठे आहे ,
गोठा आहे .
घरामागे जवळच कृष्णाचे
देऊळ आहे .थोड्या गप्पा
झाल्यावर छान झोप लागली . सकाळी पटकन तयार होऊन देऊळ पाहून उतेकरांचा निरोप घेतला .
साडेसातची चोरवणे ते परळ बस(चोरवणे -सापर्ली -वावे-धामणद-आमडस-कलबस्ते-चिपळूण-कलबस्ते-चिपळूण स्टेशन-खेड-महाड-पेण-पनवेल-परळ जाते) मिळाली . रमेशने सांगितल्या प्रमाणे परळचे तिकीट न काढता ' कलबस्ते फाटा'चे काढले .पाऊणे नऊ झाले होते .येथून दोन किमी वर चिपळूण स्टेशन आहे .शेअर रिक्षा असतात .पाच मिनीटात स्टेशनला आलो . पावणे दहाची मंगला एक्सप्रेस (१२६१७) मिळाली आणि पाऊणे दोनला कल्याणला आलो . गाडी नाशिकमार्गे जाते .चिपळूण डेपो चौकशी :०२३५५ २५२००३/२५५३३१ .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users