रव्याचे अप्पे - टेस्ट भी हेल्थ भी असा पर्याय स्पेशली बच्चे कंपनी साठी

Submitted by कविन on 18 March, 2013 - 07:43
ravyache appe

काही पाकृ हया वाचताना बघताना एकदम वॉव अशा वाटतात. आयत्या कोणी दिल्या तर अहाहा! असा विचार आधी मनात येतो (जश्या लाजोच्या बर्‍याचश्या रेसिप्या)

काही पाकृ करुन बघण्या करता बराच धीर एकवटावा लागतो/ बर्‍याच बेसिक संत्र्यांना कोणीतरी सोलून द्या रे आधी असं करायला घेतल्यावर वाटतं (जश्या लाजो + जागुच्या रेसिप्या. स्पे. जागुच्या सामिष रेसिप्या. मुळात त्यातले मुख्य घटक कोणी ओळखून पारखून आणून दिले साफही करुन दिले तर ज्या बात है असं वाचताना वाटतं)

तर काही पाकृ असतात तशा सोप्या (सोप्पं कॅरेमल पुडींग सारख्या किंवा केक इन कॉफी कप सारख्या :फिदी;) ज्या वाचनाता यु यु चुटकी मे जमतील वाटतं पण नेमक्या फसतात Proud

तर काही फसत नाहीत पण वारंवार करुन बघुयात ही लिटमस टेस्ट पास करत नाहीत

तर ह्या सगळ्या निरनिराळ्या कसोट्यांवर माझ्या वारंवारतेची लिटमस टेस्ट्+माझ्या लेखी सोप्पी पाकृ बनवण्याचं श्रेय ज्या रेसिपिंना जाईल त्यातली ही एक रेसिपी आता तुमच्या लिटमस टेस्ट आणि कसोट्यांवर उतरायला सज्ज Proud

सध्या पाकृ लिहिण्याआधी अमेय ह्यांनी सुंदर ट्रेन्ड सेट केलाय, पाकृ विषयी छान छान असं लिहायचा. पण ते काही आपल्याला जमण्यातलं नाही तरी पण त्यांचा ऑर्किडचा गुलदस्ता आवडला हे सांगण्यासाठी आमच पण हे पाकृच्या आधीचं अस्टरचं फुल

--------
साहित्य:

१) रवा २ वाट्या (बारिक/ जाडा कोणताही चालेल फक्त न भाजलेला हवा)

२) ताक - २ वाट्या (खुप जास्त आंबट ताक असेल तर त्यात पाणी घालून थोडं त्याला मवाळ करा)

३)आलं लसूण पेस्ट - १ चमचा

४) हिरवी मिरची १ - आलं लसणी बरोबरच मिरची देखील वाटली तरी चालेल. तस न करता चिरुन घातली तरी चालेल. नाही घातली तरीही चालेल किंवा पक्के तिखटे असाल तर एका पेक्षा अधिक घातल्यात तरिही चालतील

५) मीठ चवी प्रमाणे

६) साखर - १ चिमुट

७) भाज्या - कोबी, कांदा, सिमला मिरची बारिक चिरुन, गाजर किसून. (भाज्या घातल्या नाहीत तर साधे प्लेन अप्पे होतील. भाज्या घातल्यात तर तेव्हढच हेल्दी ऑप्शन निवडल्याचही समाधान मिळवाल)

८) खाण्याचा सोडा चिमुटभर (ह्याला ऑप्शन म्हणून इनो चालेल असं वाटतय. करुन बघा. माझ्या घरी खाण्याचा सोडा होता, इनो नव्हता म्हणून मी त्या वाटेला गेले नाही)

९) पाणी जरुरी प्रमाणे लागेल तसे (मिश्रण इडलीच्या पीठा सारखे होण्या इतपत लागेल इतकेच)

कृती:

रवा ताकात भिजवावा. हे ४-५ तास तसेच झाकून ठेवावे. (रात्रभर राहिले तरी चालते. मी रात्री भिजवून सकाळी केले होते अप्पे.)

अप्पे करायच्या वेळी त्यात मीठ, साखर (ही घातली नाही घातली तरी चालेल. रात्रभर पीठ ठेवल्याने थोडं आंबट होतं म्हणून मी चिमुटभर घातली होती) आलं लसुण/ आलं लसुण मिरची चे वाटण घालावे.

ह्यात लागेल तसे पाणी घालून मिश्रण इडलीचं मिश्रण असतं तितपत पातळ करुन घ्या. त्यात चिमुटभर खायचा सोडा घालून चांगलं ढवळून घ्या.

थोडे अप्पे साधे आणि थोडे भाज्या घातलेले असं करणार असाल तर आधी साधे अप्पे करुन घ्या मग त्या मिश्रणात भाज्या मिसळा म्हणजे दोन भांडी होणार नाहीत.

अप्पे पात्राला तेलाचा हात लावून चमच्याने हे मिश्रण त्यात घाला. मध्यम आचेवर वर झाकण ठेवून अप्पे होऊद्या. साधारण ६-७ मिनिटांमधे एक बाजू होईल. सुरीने अप्पे उलटा. दुसरी बाजू पण जरा सोनेरी होऊ द्या. मग अप्पे पात्र सरळ ज्या पातेल्यात/ भांड्यात/ताटात काढायचेत त्यात उलटं करा. अप्पे अलगद पणे त्यात पडतील. सुरी फिरवा/ उलथण्याच्या मागच्या बाजुने जरा त्या अप्प्यांच्या साईडला टोका असले प्रकार करावे लागत नाहीत.

हे अप्पे हिरवी चटणी/खोबऱ्याची चटणी/सॉस/ भाजीवाले असतील तर नुसते सुद्धा चांगले लागतात

टिप: ह्यात व्हेरिएशन म्हणून अजून काही भाज्या वाफ़वून/पालक चा पल्प/ कोथिंबिर/ खोबऱ्याचे काप इ. घालू शकता. मी पुढच्यावेळी ह्यातलं काही तरी घालून एक घाणा तरी करुन बघणार आहेच. हि टिप हेल्थ कॉन्शस मंडळी/ मुलां करता टेस्टी भी आणि आयांसाठी हेल्दी भी वाले पर्याय शोधणाऱ्या आयांसाठी आहे.

माहितीचा स्त्रोत:

हि कमी कटकटीची आणि टेस्टी+हेल्दी पाकॄ माझ्या पोतडीत टाकण्याचं श्रेय - माबोवरच्या फाटक भगिनींना

मोठ्या फाटक भगिनी काही ह्यात गाजर घालत नाहीत ही ऍडिशन धाकट्या बाईसाहेबांची ह्याच कारण माझ्यातल्या चतूर आईने लग्गेच ओळखलं. ह्यात पुढच्यावेळी कोथिंबीर पण घालून बघुयात गं, खोबऱ्याचे काप पण चालतील इ. इ. आईमोड वाल्या इमेली पण झडल्या.

ह्या निमित्ताने दोन वर्षांपुर्वी भेट मिळालेलं अप्पे पात्र धन्य झालं आणि कायमचं माळ्यावरुन वापरातल्या भांड्यांमधे आलं ह्यातच ह्या रेसिपीचं खरं यश आहे.

Resize of IMG_20130317_085653.jpg हे मिश्रण असं दिसेल

Resize of IMG_20130317_085628.jpg हे तयार अप्पे. ह्यातला मध्यभागी असलेला एक अप्पा (:फिदी:) बसलेला रुसलेला फसलेला नसुन तो उलटलेला नाहीये. त्याआधी फोटो काढलाय ते उलटलेली आणि न उलटलेली अशा दोन्ही बाजू दाखवण्यासाठी - हे स्प. खास धाकल्या फाटक भगिनीसाठी आहे. Proud

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोडा घालायचा नसेल तर किती वेळ भिजवायला लागेल? मला सोडा घालणं नको वाटतं का कोण जाणे..>>> मी साधारण ५ तास भिजवले व सोडा न घालता केले. (खरे तर सोडा घालायला विसरले Wink ) तरी चांगले झाले.

मी केले.... गोड आणि तिखट दोन्ही केले. सोडा न घालता केले. तिखट करताना वरील कृती वापरली. गोडा साठे
१ वाटी रवा + १ चमच तूप + १/२ वाटी पि.साखर + १/२ पिकलेले केळे + वेलची पूड असे १५ मि. भिजवुन मग त्याचे अप्पे केले... एकदम झकास चव.... अजिबात तेल्/तुप न लावता केले

हे पहा तिखट

appe 1.jpg

आणि हे गोड

appe 2.jpg

आज संध्याकाळी मिश्र डाळींचे करणार....

एक मस्त स्नॅक... धन्स

मोकिमी वॉव! गोड करुन बघेन थोडेसे.

मी गेल्या विकांताला बारिक रवा वापरुन केलेले. होतात छान पण बा.रव्या पेक्षा जाड्या रव्याचे जास्त छान लागले मला

आज रेसिपी चर्चा परत वाचली म्हणून हे काही नवे बदल

आजकाल ४-५ तास वगैरे भिजवतच नाही. अर्धातास भिजवते. म्हणजे तसा मुद्दाम वेळ बघत नाही अर्धातास काटेकोरपणे पण रवा भिजवते आणि मग चहाच आधण ठेवते. चहा दूधाचे काम झाले की अप्प्यात घालायचा कांदा आणि कोबी गाजर जे काही असेल ते चिरते / किसते. मग चहा घेते आणि अप्पे करायला लागते. साधारण अर्धातास होत असावा असा अंदाज Proud

आजकाल इनोच घालते यात. खायचा सोडा घालत नाही.

आणि आता तर बरेचदा उरलेल्या कढीत रवा भिजवून अप्पे करते. एकदा काय ती लेफ्ट ओव्हर कढी संपवायला म्हणून प्रयोग केला तर तो लॉटरी लागल्यासारखा यशस्वी झाला. तेव्हापासून कढीअप्पे या नावासकट डिमांडमधे आला तो प्रयोग.

आजकाल यात व्हरायटी म्हणून काजू बेदाणे खोबऱ्याचे पातळ काप ढकलते अधूनमधून. कशाला वाईट लागतय ते म्हणा. नॉर्मली भाज्या कमी असतील तेव्हा जरा वाढीव घटक म्हणून हे ढकलते. Lol

काकडी घातली तर कसे लागतील आप्पे? आणि कांदा. (आता तेवढीच घालण्या लायक भाजी आहे घरात, बाकी दूधी, वांगी, भेंडी आहे). उद्या किंवा परवा हे आप्पे करायचा विचार आहे, खूप दिवस झाले बायकोच नाश्ता बनवते आहे, म्हटलं हे सोपे वाटतात याने मी सुरवात करेन.

गोड आप्प्याचे पीठ भिजवताना दोन वाटी रव्यासाठी अर्धा वाटी नारळ वाटून टाकावा आणि चार तासांनी आप्पे करावे. छान होतात. यात मी कधी केळे घालून पाहिले नाही, आता करून बघीन.

काकडी घातली तर कसे लागतील आप्पे? आणि कांदा. (आता तेवढीच घालण्या लायक भाजी आहे घरात, बाकी दूधी, वांगी, भेंडी आहे).
नवीन Submitted by मानव पृथ्वीकर >>>
कांदा टोमॅटो चालतो.
काकडी गोडाच्या आप्प्यांना जास्त सूट होईल ( थोडी धोंडस / सांदण्यासारखी चव येईल).
दुधी चालेल, पालेभाज्या चालतील.
काकडी, दुधी ---- आप्पे खूप प्रमाणात केलेत तर पुढच्या घाण्यांना यांना पाणी सुटून मिश्रण पातळ होईल. तेव्हा रवा वाढवला तर लगेच भिजणार नाही, कचकच लागेल. तेव्हा काकडी, दुधी हे पीठ भिजवताना घालावे लागतील. ताक घट्ट / दही वापरायचे. म्हणजे सुटलेले पाणी रवा भिजायच्या कामी येते. करताना मग वाटल्यास जास्तीचे ताक / पाणी घालायचे. याने पिठाचा पोत फसणार नाही.
कृतीवर हात बसला की उरलेल्या भाज्या / उसळी मिक्सरला सरबरीत वाटून घालायलाही जमू लागेल.

आवडली रेसिपी...
डायबेटीक लोकांना रवा चालतो का?

छान माहिती कारवी, धन्यवाद. नकोच काकडी घालायला, गोडसर होत असेल तर. टोमॅटो आहेत, विसरलोच होतो त्यांना.

Pages