हाडळीचा मुका

Submitted by बाबूराव on 14 March, 2013 - 03:29

हाडळीचा मुका

मानसं मस जमलि व्हति. म्हनजि तसं कारन घडलं व्हतं. शुंगार टेलर वाल्या का़का टेलरचं पोरगं घर सोडुन गेल्तं. काका टेलर अन त्याच्या बायकुचं रोजचं कडाक्याचं भांडान असायचं म्हनुन कोनच त्येंच्या घरच्या भानगडित पडायचं नाय. पण काल रातच्याल काकीचा लैच येगळा आवाज आला अन तिनं हांबरडा फोडला का, तवाच पब्लिक जमा झालं.

पोरगं लैच कटाळलं अन म्हनुन घर सोडुन गेलं असं समदं म्हनत व्हतं. पन ते ज्या दिसंला गेलं असं पुजारी म्हनला त्ये आइकूनच काकाचं अवसान गळुनशान पडलं व्हतं. पोरगं घरातुन गेलं तवा भांडान अंगात आलं व्हतं. काका अन काकी एकमेकात बोलत नव्हतं. बोलायचं तेबी फकस्त भांडायला. बाकि समदं इशा-या इशा-यात चालयचं. त्येंच्या खानाखुना बघुन गावच्या पोरांची लै करमनुक व्हायचि. पन त्येंच्या अशा वागन्यानं पोटच्या पोराला लैच चिडवायची गावातली पोरं.

पुजा-यानं पोरगं जंगलाकडं जाताना पाहिलं तवा त्येची आरती अन प्रसादाचि तयारि चाललि व्हती. पोरगं घर सोडुन चाललं आसल म्हनुन त्येला तरी काय कल्पना ? जात असंल हितंच कुटं दोन नंबरला नायतर रात्रिचं आंबं पाडायला चाललं असंल असं त्येला बी वाटलं. नायतर रातिच त्येनं अडवलं असतं. पन सकाळ्च्याला बोम्ब झाल्याचं कानावर आलं अन पोरगं काय घरला आलं नाहि हे जवा त्याच्यापत्तुर आलं का, तवाच त्येच्या मनात बी घबराट झालि.

पोरगं जंगलाच्या दिशेनं गेलेलं त्यानं बघितलंच व्हतं. रातच्याला कोनतरी इचारायला आल्तं तवा सांगिरलं बी व्हतं. जंगलात गेलं असंल तर काय नाय, पन जंगलातल्या वाड्यात गेलं तर काय हाच इचार आत्ताच्याला समद्यांच्या मनात व्हता. पोराला शोधुन काय बी उपेग नाही असं जे ते म्हनत व्हतं. पन बापाचं आतडं गप्प बसंल व्हय ? बसलं तरी आयचं आतडं त्या आतड्याला बसुं देनार व्हय ? काका टेलर गुमान उठला अन सकाळच्यालाच जंगलाकडं चालाय लागला. तसं काकाला आमि तुज्या सोबत हाय म्हननारं समदं मागं सरकलं. काका शेवटाला एकलाच राहिला अन जंगलाची वाट चालु लागला.

जंगलातल्या वाड्यात कोनबी जात नव्हतं. त्या वाटेनं बी कोन येत जात नव्हतं. पन पोराटोरांचं काय सांगावं ? दर सालाला कोन ना कोन तिकडं जायाचं अन वापस येतच नव्हतं. वाड्यातल्या हाडळीनं त्यांना खाल्लं असं जुनी मानसं म्हनायची.

हाडळ लैच पॉवरबाज व्हती. वाड्याजवल गवत बी उग्वत नव्हतं. साप, इंचू, किडा, मुंगी कायबी तिथं जित्तं राहत नव्हतं. कुनाची बकरी गेली कि वापस येत नव्हती.

काका जंगलाची वाट चालत व्हता. सोत्तालाच लई कोसत व्हता. बायकुला लैच तरास दिला असं सोत्ताला सांगत व्हता. सोत्ताच्या बायकुला बी त्यो हाडळ म्हनायचा. बायकुबी त्येला नाहि नाहि त्ये बोलायचि. तुझ्यापरिस येक से येक लाईनमधि उभं व्हतं म्हनायचि. तसं म्हनलं कि काकाचं डोस्कं औट व्हायचं. मग त्यो सौताच्या पोरावरुन तिला नाय नाय ते बोलायचा. हाडळीचं पोर म्हनायचा. भान्डत नसली कि मग घर शान्त असायचं. पोराच्या कानावर कधिच मम्मी डॅडी चा आवाज पडायचा नाय. फकस्त खानाखुना. मंग त्ये बी तसंच करायचं. गावातल्या पोरांना लैच मज्जा यायचि.

पोराला लैच भोगावं लागलं असं काका मनात म्हनत व्हता. इचारात जंगल कधि चालु झालं समजलंच नाय. काकानं झाड न झाड बघाय सुरुवात केली. पोराला हाका मारत मारत शोध चालला व्हता. हिकडं काकीनं रडून रडून आकांत मांडला . माजं पोरगं गेलं आता धनीबी गेला असं वरडत रडत ती ज्येला त्येला सांग्त व्हती. कुना येकाला असं न्हाईच, पन तिचा नुस्ताच आकांत चालला व्हता. आता तिला लैच पस्तावा झाला व्हता. आपन त्येला लैच टोचुन बोललु हे आठवुन सौताल कोसत व्हती. असं टोचुन बोलल्यावर कुठला गडी जित्ता -हाईल असं मोठमोठ्यानं वरडत व्हती. तिच्या असल्या वरडन्यानं त्या प्रसंगातबी गडीमानसांना हसाय येत व्हतं अन ते बिडी माराय निघुन जात व्हते. बायामानसं त्वांडाला पदर लावत व्हत्या. त्यामुळं त्या हसत्यात का रडत्यात कायबि समजत नव्हतं.

येक म्हातारं म्हनलं, काकाच्या मदतिला का जात न्हाई, तर म्हाद्या मनला तु का नाई जात म्हाता-या ? बायामानसं बी म्हाता-याला वरडल्या. तुजी लाकडं मसनात गेली, तुला हडळीनं धरलं तरी काय बी फरक पडत नाई, दोन दिसानी जायचं ते आज जाशीला म्हनु लागल्या. पन आपल्या घरातल्या गडीमानसाला हाडळ धरंल असं त्यांना पक्कं वाटत व्हतं. काय काय नटव्या बायांना बी गावात हडळच म्हनायच्या गावातल्या बायका. त्या हाडळीबी गडीमानसांना झपाटतात असं नळावर पानी भराय जाताना बाया म्हनायच्या. जंगलातल्या हाडळीकडं मातर कुनीच कुनाला जाऊ दिलं नसतं.

काकानं जंगल शोधुन शोधुन बसकन मारली. भुक, तहान अन पोराची काळजि यानं त्याला काय करावं अन काय नाय हे सुचत नव्हतं. अंधार व्हायला आला व्हता. अंधारात वाडा काळाजर्द सावलीसारखा दिसत व्हता. आता कसलं काय म्हनत काकानं वाड्याचा रस्ता धरला.

वाड्याभवती लईच जुनाट झाडि व्हती. ही कशी टिकली ते काकाला उमगंना. या झाडावर बसुन हाडळ झोकं घेत असंल असं त्येला वाटलं. त्यानं फाटक ढकललं तर केव्हडा आवाज झाला. घुबडं बी उडाली घाबरुन. डोईवर आत्ताच्याला चांदनं येत निघालं हतं. काकानं वाड्याच्या दरवाजावर हात टेकला अन मोठ्ठा आवाज करत दार आत गेलं. लै मोठ्ठा आवाज झाला अन आतल्या बाजूला घुमला. त्या आवाजानं काकाच्या पोटात खड्डा पडला. आतनं वागळं फडफड करत भाईर आली तवा काका घाबरलाच.

पन पोरापायी त्यानं आत पाऊल टाकलं. वाड्यातली हाडळ वाश्याला लटकली व्हती. फाटक उघडल्याचा आवाज कानात गेल्याबरुबर तिनं कानुसा घ्यायला सुरुवात केलि. या रस्त्यानं जानारं येक बी सावज तिनं आजवर सोडल्यालं नाहि असं मानसं म्हनायचि हे तिला बि म्हाईत व्हतं. हाडळ हाडळीसारखीच व्हती. पन लैच साजुक इचारांचि व्हती. तिच्या काळात मानसं लैच धर्मानं आचरन करत व्हती. जित्ती असतान तिनं कधिच वंगाळ इचार मनात येऊं दिलं नव्हतं. आजबि तेच सात्विक सन्स्कार तिच्यावर व्हतं. पन ति हाडळ असल्यानं तिची लैच बदनामि झालि व्हती. पन तिला सौत्ताला तिचं कॅरेक्टर म्हाईत व्हतं. ती म्हराटि पिक्चरमधल्या अलका कुबल सारखी धुतल्या तान्दलासारखि व्हती. हिन्दी पिक्चरमधल्या हिरविनीगत पान्याखालि धुतल्यासारखि नव्हति. तिनं तिच्या आयुष्यात येकच हिन्दी पिक्चर बगितला व्हता. सत्यम शिवम सुन्दरम. देवाधर्माचा असल्यानं बगितला व्हता. अन जत्रंतल्या खेळात जय सन्तोषि मा बघितला व्हता. बास. बाकि तिच्या आयुश्याचा सगळा म्हराटी पिक्चर व्हता.

पन तिच्यावर सन्शय घिउन तिच्या नव-यानं तिला येकदा इतकी झोडलि कि ती आजारिच पडलि. तवा त्यानं घाबरुन तिला रानातल्या या वाड्यात आनुन ठिवली. पन तिथंच तिचा जीव गेला अनं ती हाडळ झाली. हाडळ झाल्यावर तिला दिवस दिवस मानुस दिसायचं नाय. मंग कोन वळखीचं मानुस आलं कि ती त्येला वळख दावाय जायची पन त्ये मानुस घाबरुन हातातलं असंल नसंल ते खालि टाकुन पळत सुटायचं. कधी कधी तिला त्यात खायला भेटायचं. मंग तिला मज्जाच वाटाय लागली. मानसं बी आता घाबराय लागली व्हती. काहि काहि तर इतकी घाबरायची की छाती फुटुन मरायची.

काका वाड्यात पोराला शोधु लागला तसं हाडळीच्या चेह-यावर हासु उमटलं. लै दिसानी मानुस हितपर्यंत आलं व्हतं. आता याला वळख दावाय लागल असं मनात म्हनत व्हती. पन त्यो काय करतु त्ये बी तिला बगाय्चं व्हतं. आलेला मानुस दारामागं, खिडकीतून बाहेर काइतरी शोधत व्हता. हाका मारत व्हता. हाडळीला वाटलं आता मज्जा कराय पायजे.

हिकडं काका जेरिस आला व्हता. पोरगं काय ओ देईना. त्ये देवु बी शकलं नसतं. खरं म्हन्जी भूक, तहान अन काळजीनं त्येचं डोकं औट झालं व्हतं. पोराचं नाव मस हानम्या ठिवलं व्हतं. पन ते गावक-यांशी बोलतानाचं वापरलं जायचं. काकीला काका जवा बोलायचा तवाच पोराशीबी बोलायचा. ते बी भाडनातच. दोगं बोलत नव्हति म्हनुन पोराला बि बोलता येत नव्हतं म्हनुन समदी त्येला मुका म्हनायची तवा काकाबी त्येला हाडळीचा पोर न म्हनता हाडळीचा मुकाच म्हनाय लागला व्हता. काकाला आता हे समदं आठवलं.

हाडळीनं वरून हवेत सूर मारला अन काकाच्या फुड्यात येऊन ठाकली त्याच वक्ताला काका हाक मारत व्हता हाडळीचा मुका ...अन पुढंचा शीन बघून त्याची दातखिळच बस्ली. हिकडं हाडळीची अवस्था बी मेल्याहून मेल्यागत झाली. देवदेवाच्या पिक्चरमधल्या आशा काळेला कोनि मुका मागितला तर तिची अ‍ॅक्टिंग कशी असल डिक्टो तशिच तिचीबी झालि.

हिकडं काका घाबरला व्हता. पन पोराच्या काळजीनं त्येला भानावर आनलं अन त्यो हाडळीच्या पाया पडू लागला.
मला फकस्त हाडळीचा मुका घेऊन जाऊ दि म्हनाय लागला. त्याबरुबर हाडळीनं त्वांड फिरवुन घितलं. आता घाबरायची पाळि तिची व्हती. तिच्या गालावर गुलाबि रन्ग चडला असं अंधाराला वाटत व्हतं. काका इरंला पेटून मला हाडळीचा मुकाच पायजे असं म्हनत व्हता. त्याबरुबर हाडळ पळाय लागली अन काका तिच्यामागं. मला काय नकु, फक्त हाडळीचा मुका दी... पायजे तर नंतर माझा जीव घि पर मला आत्ता मुका दी असं काका रडत रडत वरडत व्हता अन हाडळ हादरली व्हती. ती आता धर्मसंकटात सापडली. तिच्या आख्या आयुष्यानंतर असा प्रसन्ग तिनं पायला नव्हता. अशा वक्ताला काय करायचं तिला ठाऊक नव्हतं. हा मानुस काय चान्गला नाय. जनमभर जे जपलं. ज्येच्यापायी जीव सोडला पन पाऊल वाकडं पडून दिलं न्हाय त्ये आत्ताच कसं काय पडूं द्यायचं या इचारानं तिनं आपली इज्जत वाचवायची ठरवलं अन वाड्याच्या भाईर पडून ती पळाय लागली.

हिकडं काकाला वाटलं, ती पोराकडं निघाली म्हनुन त्यो बी जोरात तिच्या मागं लागला. हाडळीचा मुका दी, माझ्या हाडळीचा मुका दी असं म्हनत त्यो जोरात निगाला, तशी हाडळ बी वरडत पळायला लागली. हाडळीला कायबी समजंना तसं काकालाबी. हितक्यात काकाचा पाय एका दगडावरुन घसरुन त्यो उडाला अन उतारावरून खाली गडगडत गेला. दगडांचा लैच आवाज झाला. हाडळीनं मागं न बघताच जी धूम ठोकली ती बोंब मारत जंगल सोडूनच निघून गेली.

काका पडला अन तिथंच शुद्ध गेली. सकाळच्याला कुनीतरी तोन्डावर पानी मारलं तसा काका जागा झाला. तोन्डावर कुनी पानी मारलं म्हनुन बगतुय तर त्येचा हाडळीचा मुका !! मग त्यानं आनंदानं येडा व्हत त्येला छातीला आवळलं अन त्येचे मुके घ्यायाला सुरुवात केली.

रातच्याला म्हाता-याच्या शिव्या ऐकुन दोनचार तरुन गडी जंगलाकडं निगाले व्हते. काकाचा आवाज आला म्हनुन त्येंनी लांबुनच पायलं तर काय काका मागं हाडळ पुढ, काका मागं हाडळ पुडं. त्यो शीन बगून त्येंची बोबडीच वळली. पन त्या वक्तालाबी काकाच्या हिमतीला दाद देत मंडळी जागच्या जगीच हुभी -हायली. हडळीला पाय लावुन पळताना समद्यांनीच बघितलं. ती जंगल सोडून गेली हे बी त्यांनी पायलं. पन अचानक काका गायब झाला. अन मग त्याची शोधाधोध सुरू झाली. काकाला आवाज दिला तर आवाज बी येईना.

काकाचं पोरगं लैच उदास झालं व्हतं. मुकं असल्यानं बोलता बी यायचं न्हाय. त्यात दोघंबी लै भांडायची. न्हाईतर अबोला चालु असायचा. गावातली पोरं लै म्हंजी लैच चिडवायची. परवा भांडान सुरू झालं तवाच कनाटाळुन त्येनं घर सोडलं. येका पिशवीत दोन मैन्ह्यामागचं दिवाळीचं उरलेलं समदं भरून जंगलाची वाट धरली. पन जंगलात शिरल्यावर त्येला रस्ताच सुधरंना. त्यात हाडळीच्या गोष्टी आइकून भीतीच वाटाय लागली म्हनुन येका वडाच्या झाडावर मोठी ढोली पाहून त्यात शिरून बसला. सकाळच्याला पाच सहा करन्ज्या हानल्यावर जवळच पानी मिळालं. आनि पुन्यांदा येऊन तो झोपला. काका त्या झाडाजवळुन गेला तरी त्येला काहि हा पोरगा दिसला नाहि. आनि मंग रातच्याला गोंधळ झाला तवा काकाचा आवाज ऐकुन मुका उठला. आपल्यालाच हाका मारतुय म्हनुन त्यो बी तिकडं पळाय लागला. त्येला ओ देता येत नव्हती म्हनुन काकाला हात लावुन साण्गायचा इचार त्यानं केला. अचानक काका उडालेला दिसला अन नंतर गायब झाला तसा मुका त्याला शोधाय लागला. सकाळच्याला काका दिसल्यावर त्येनी पानी आनलं आनि पुढचं आपन पायलंच.

आनि मंग गावात काकाचं लैच जंगी स्वागत झालं, हाडळीला पळवुन लावल्याबद्दल सत्कार बी झाला. काका आता गावात मोठा मानुस झाला. त्येच्या पोराला बी आता कोन चिडवत नाय. काकी आता नीट वागति.टोचुन बोलत नाय. आता दोगं बी बोलत्यात. गावातली लोकं काकाचं नाव काडत्यात. जवळच्या रस्त्यानं आता जाता येतंय. वाड्यातली हाडळ आता निघुन गेलीय. काका काकीला हाडळ म्हनत नाय. घरात दोगं बोलाय लागल्यावर मुक्याला बॉ बोलावं वाटु लागलंय. आता बाबा, दादा म्हनतंय. शिकंल त्ये बोलायला.

आता हाडळीचा मुका घ्यायला काकाला कुटं जायला लागनार नाय.

- बाबुराव

( नाव बि घातलं अन काय काय मिष्ट्येकच्या चुका व्हत्या त्या बी दुरुस्त केल्या )
कॉपी मारु नये ही इनंती. अन मारलीच तर आमचं नाव घाला वं त्यात समजून उमजून.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व बन्धु भगिनिंचं आभार.
-------------------------------------------------------------

माझं मालक आल्तं. त्यांनी माज्याबद्दल जे बी सांगितलं ते अक्षी खरं हाय.
व्हय
Kiran..
हेच माझं मालक हाय. आता त्येंना जवा टैम घावल तवा म्या लिवनार. अन हितं येऊन लिवायचं म्हंजी लैच टैम जातु. तवा काई तरी वेवस्ता केली पायजेल. ती करतुच हाय..

http://kiranyake.blogspot.in/
हितनं फुडचं माझं लिखान बी तिथंच घावल तुम्हास्नि. जमल तसं व्हिजिट करा.

आपला नम्र
बाबूराव

बाबूराव, खाली आपला नम्र म्हंता. म्हंजी माजा मायना चोरलात की तुमी. तेची रायल्टी टाका आदुगर!
आ.न.,
-गा.पै.

बापरे, बाबूरावच्या छोट्या छोट्या रहस्यकथा इथेच वाचल्या होत्या पन बाबूरावकडे एवढा स्फोटक ऐवज असेल असे वाटले नव्हते. लगे रहे बाबूराव.... बाबूरव एकदम माबोचा सेलेब्रेटीच झाला की !!

बाबूराव
या या, आमच्या ब्लॉगवर स्वागतच आहे आपलं. येताना त्या गापै ची रॉयल्टी देऊन या.
तुमी सांगताय ते लिव्हलेली आमची पोस्ट उडाली नव्हं, आता हसाया बी येईना असं झालंया ! ( आमच्या धाग्यावर अजून बी येळ मिळंना डिलीटकास्नी :हाहा:) .

मंडळी, मनात किंतु परंतु नसंल तर येऊन जा आमच्या ब्लॉगवर..

सोप्पा पत्ता हाय

kiranyake.blogspot.in

रॉबीनहूडदादा
म्या काई सेलेब्रिट न्हाई अन काई न्हाई. तुमी समद्यानी दिल्यालं प्रेम हाय समदं. हितल्या काई माबोकरांनी या ईष्टोरीवर एकान्किका का काय म्हनतात ते बसवायला घितलं अन मला परमिशन मागितली. म्या म्हनलं लका, हे तुमचंच न्हाय व्हंय ? त्येला कसली आली परमिशन ? अगुदर करा अन मंग सान्गायला यियाचं. पोरं लई खुश झाली. पन हे समदं त्या पोरान्चं मोठपन हाय, त्याना ही इष्टोरी आवडलि. आपल्या समद्यांचं पुन्यांदा एक डाव फिरून वापस आभार.

व्हाॅटस् अॅपवर हे आत्ता आलय... Sad
गणूदा गावातील एकदम साध व्यक्तिमत्व....

लग्नानंतर खूप वर्षानी त्यांचा घरी एका लहान
मुलाने जन्म घेतला....
खूप आवडीने त्याच नाव
त्याचा आजीने मुकेश ठेवलं....हळूहळू तो मोठा होवू
लागला.....

पण तो कधीच रडत नव्हता...
त्याचा तोंडून कसलाच आवाज निघत नव्हता....

गणूदा वर जणू आभाळ कोसळल....
आधीच घरात अठराविश्व
दरिद्र.....
त्यात देवाने त्यांची क्रूर चेष्टा करत हे मुक पोर त्यांचा पदरात टाकलं होत.....
पण गणूदा ने
दैवाला कोणताच दोष न देता त्या मुलाचा स्वीकार केला.....

मुकेश आता 10 वर्षाचा झाला होता....
घरातील लोक त्याला प्रेमाने आणि गावातील लोक कदाचित चेष्टेने
मुका बोलायचे.......
सर्व गावाचा तो लाडका बनला होता....

पण एके दिवशी विपरीत घडलं.....

मुका कुठेच सापडत नव्हता...

गणूदा त्याला सगळीकडे शोधू लागला.....
घरात गणूदा ची बायको-आई यांनी रडून रडून बाजार मांडला होता...
त्यांचा घरात खूप लोक जमा झाले होते.....

तेवढ्यात एक लहान
मुलगा बोलला...,”मी मुकाला जंगलात जाताना पाहिलाय....”.
.
.
.
त्याचा या एका वाक्याने उपस्थित लोकांचा छातीत धडकी भरली...
सर्वत्र शांतता पसरली....
इतक्यात मुका चा आई आणि आजीने एकदम काळीज चिरून टाकणार हंबरडा फोडला........
आणि छातीवर जोरजोरात मारून घेऊन बोलू लागल्या......

”ती हडळ माझा मुकाला नाही सोडणार.....
देवा वाचव रे देवा......”

हडळ...........

हो हडळ.......

गावाला लागून असलेल्या जंगलात एक खूप मोठा वाडा होता....
आणि त्या वाड्यात राहायची एक हडळ........

तशी खूप साधी बाई होती ती आधी.....
पण नवरा खूप छळ करायचा तिचा.....
माणसाचा रूपातील सैतानच होता तो....
खूप दारू प्यायचा....
आणि खूप मारहान करायचा हिला.....
मग नाही सहन झाल त्या बिचारीला.....

आणि मग ....

राहत्या वाड्यातच एक दिवस तिने गळफास लावून आत्महत्या केली......
पण ....
मरणांनंतर ही तिची सुटका नाही झाली....
कारण ती हडळ बनली होती......

एक दुष्ट हडळ.......

तिने पुढचा काही दिवसातच तिचा नवर्याचा हाल हाल करून जीव घेतला होता.....
त्याची अवस्था पाहूनच गावातील खूप पुरुषांनी बायकोला मारहाण करण सोडून दिल होत......

यानंतर त्या हडळीने
त्या वाड्यावर कब्जा केला...

आणि त्या वाड्यावर येणार्या प्रतेक माणसाचा तिने जीव घेतला....

ते पण ...

खूप छळ करून......

अशा भयानक हडळीचा तावडीत मुका सापडला होता.....
गणूदा उठला....
आणि गावकर्यांना बोलला आपण आता वाड्यावर जाऊ आणि मुकाला सोडवून आणू.....

पण ...

कोणाचाच अंगात एवढं धाडस नव्हतं की गणूदा सोबत जावून मुकाला सोडवून आणव......

कोण स्वताहुन मरणाचा दारात जाईल....

हळूहळू सर्वांनी तिथून काढता पाय घेतला.....
गणूदा रडून रडून सर्वांना हात जोडत होता...
माझा सोबत चला म्हणून....
पण कोणीच त्यांचा सोबत यायला तयार झाल नाही....

शेवटी गणूदा ने डोळे
पुसले.....

आणि वेगळ्याच निश्चयाने जंगलाकडे जाऊ लागले.....

त्याला जाताना पाहून त्यांची बायको आणि आई त्याला थांबवू
लागल्या....
”नका हो जाऊ.....
आधीच मी पोटाचा गोळा गमवलाय....
आता कुंकू नाही गमवायच....”

पण गणूदाला काही ऐकायचं नव्हतं त्याला फक्त मुकाला परत आणायच होत....

आणि तो जंगलात शिरला.....

सगळीकडे कुट्ट अंधार पसरला होता....
गणूदा तसा खूप घाबरला होता...
पण त्याचातील बाप त्याला धीर
देत होता....
आजूबाजूचा झुडपातून मधेच सळसळ आवाज व्हायचा.....
जणूकाही एखादा साप तिथून निघून
गेला असावा....
ते अंधारातून चाचपडत कसेबसे
वाड्याचा बाहेर आले.....
अगदी विजीर्ण झाला होता तो वाडा....
गणूदाला त्या वातावरणात वेगळीच
उदासी जाणवली.....
एकदम भकास वातावरण होत....
त्यांनी वाड्याच लोखंडी गेट ढकलल......
गंजलेल्या बिजागिर्याचा कर्ण कर्कश आवाज सगळीकडे घुमला.....
त्या आवाजाने आजूबाजूचे
वटवाघूळचा थवा एकदम भयंकर चीत्कार करत गणूदाचा डोक्यावरुन गेला.....
गणूदा मटकण खाली बसला.... हळूहळू आत जाऊ लागला....
आणि कुठे मुका दिसतो का ते पाहू लागला......

गणूदा वाड्यात आत आला.....

हॉल मध्ये आला.....

झुंबराच्या खाली.....

आणि त्या झुंबर सोबत उलट लटकत होती.
.
.
.
.
.
.
.
ती हडळ.....
.
.
.
.
.
.

त्या हडळीने अचानक गणूदा चा समोर उडी मारली.....
.
.
.
.
.
.
.
अचानक समोर आलेल्या त्या हडळीला पाहून गणूदा चार पावले मागे सरकला......
.
.
.
.
.
..
.
.
.
अतिशय भयंकर दिसत होती ती हडळ....
.
.
.
.
.पांढरे डोळे,...
.
.
.
.
.अंगावर पांढरी साडी....
.
.
.
.
.
.
निस्तेज त्वचा....
.
.
.
.
.
.
आणि मोकळे सोडलेले केस.....
.
.
.
.
.
.
.
आपले फावडे दात विचकत ती हसू
लागली.....
.
.
.
.
.
.
तीच ते विकट हास्य खूपच भयंकर
होत......
.
.
.
.
.
.
.
आणि तशीच हसत ती तिचा घोगर्या आवाजात बोलली....,
.
.
.
.
.
”काय हवय
तुला...?? "
.
.
.
.
.
गणूदा खूप घाबरला होता...
तरीपण धाडस करून बोलला...
,
”मला मुका हवाय..”
.
.
.
.
.
हडळ तीच बोलणं ऐकून हसू लागली आणि बोलली....
.
.
.
.
.
.
”जीव घेईन मी तुझा..”
.
.
.
.
.
.
.
गणूदाने तिचा उलट्या पायावर लोटांगण घातल.......
आणि बोलला....
.
.
.
.
.
.
.
.
”तुला माझा जीव घ्यायचा असेल तर घे....
पण मला मुका दे...”
.
.
.
.
.
.
अचानक
.
.
.
.
.
.
.
हडळ तिथून पळून जाऊ लागली...
.
.
.
.
.
.
.
गणूदा पण तिचा मागे पळू लागला...
.
.
.
.
.
.
.
.
आणि रडत रडत विनवण्या करू लागला......
.
.
.
”हडळ...मुका दे...”
.
.
.
.
.
.
.
.
हडळ वाड्याचा बाहेर पडली...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मागोमाग गणूदा पण आला पण एका दगडाला ठेस लागून एका खडयात पडला....
तिथे अंधारात कोणीतरी होत ...
.
.
.
.
.
.
गणूदा ने निरखून पहिलं तर
तो मुका होता....

त्याचा काळजाचा तुकडा....

त्याने मुकाला कवटाळून धरलं...

आणि घरी घेऊन आला...

सर्वजन खूप खुश झाले...

कारण गणूदा च्या धाडसामुळे मुका परत आला होता....

आणि तो वाडापण हडळमुक्त झाला होता.......

गणूदा ची वाजत गाजत सगळीकडे
मिरवणूक काढण्यात आली.....

पण

एक प्रश्न गणूदा ला पडला होता......

हडळ पळून का गेली.....???

इकडे त्या जंगलापासून खूप दूर....
..
एका मोठ्या पिंपाळचा झाडाचा एकदम वरचा फांदीवर ती हडळ लपून बसली होती आणि स्वतशीच बोलत होती.....

”जळल मेल लक्षण.....

काय निर्लज्ज माणूस होता....

सरळ सरळ मला मुका मागत
होता....

मी माझा नवरा सोडून कधीच कोणाला मुका दिला नाही...

आणि हा मागत होता...

आले ग बया पळून एकदाची....

ही कथा फेसबुक वर मॉडीफाईड व्हर्जन मधे व्हायरल झालेली आहे. काही ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यात घडलेला सत्य प्रकार म्हणून शेअर झालेली आहे, तर काहींनी आमच्या गावात घडलेला प्रकार म्हणून खपवलेली आहे. खाली दिलेल्या लिंकवर ही कथा नाव बदलून चोरी केल्याचे आढळून येईल. ही साहीत्यचोरीच आहे. याबाबतीत फेसबुकवर बेफिकिरी आहे. सांगायला गेलं तर उलट उत्तरे केली जातात. इतक्या मोठ्या संख्येने चोरी झालेली आहे की काही करणे अशक्य आहे.

https://www.facebook.com/search/top/?q=%E0%A4%B9%E0%A4%A1%E0%A4%B3%E0%A5...

मला फकस्त हाडळीचा मुका घेऊन जाऊ दि म्हनाय लागला. त्याबरुबर हाडळीनं त्वांड फिरवुन घितलं. आता घाबरायची पाळि तिची व्हती. तिच्या गालावर गुलाबि रन्ग चडला असं अंधाराला वाटत व्हतं. काका इरंला पेटून मला हाडळीचा मुकाच पायजे असं म्हनत व्हता. त्याबरुबर हाडळ पळाय लागली अन काका तिच्यामागं. मला काय नकु, फक्त हाडळीचा मुका दी... पायजे तर नंतर माझा जीव घि पर मला आत्ता मुका दी असं काका रडत रडत वरडत व्हता अन हाडळ हादरली व्हती. ती आता धर्मसंकटात सापडली. तिच्या आख्या आयुष्यानंतर असा प्रसन्ग तिनं पायला नव्हता. अशा वक्ताला काय करायचं तिला ठाऊक नव्हतं. हा मानुस काय चान्गला नाय. जनमभर जे जपलं. ज्येच्यापायी जीव सोडला पन पाऊल वाकडं पडून दिलं न्हाय त्ये आत्ताच कसं काय पडूं द्यायचं या इचारानं तिनं आपली इज्जत वाचवायची ठरवलं अन वाड्याच्या भाईर पडून ती पळाय लागली.

हिकडं काकाला वाटलं, ती पोराकडं निघाली म्हनुन त्यो बी जोरात तिच्या मागं लागला. हाडळीचा मुका दी, माझ्या हाडळीचा मुका दी असं म्हनत त्यो जोरात निगाला, तशी हाडळ बी वरडत पळायला लागली. हाडळीला कायबी समजंना तसं काकालाबी. हितक्यात काकाचा पाय एका दगडावरुन घसरुन त्यो उडाला अन उतारावरून खाली गडगडत गेला. दगडांचा लैच आवाज झाला. हाडळीनं मागं न बघताच जी धूम ठोकली ती बोंब मारत जंगल सोडूनच निघून गेली.>>>> काय भन्नाट लिहिलय....बिच्चारी हडळ.. तिचा मुका मागतात.... Lol Lol Lol Lol

बाबुराव तुमची स्टोरी मला खूप आवडली पिल्झ मला सांगा ही खरच तुमची स्वता लिहलेली स्टोरी आहे का? मला या स्टोरीवर तुमच्याशी थोडी चर्चा करायची आहे पिल्झ मला सहमति द्या. मला तुम्ही निराश करणार नाही अशी मी आशा बाळगतो. माझा ईमेल id :- anant84maya@gmail.com

छान मनोरंजक !

एक चुटकुला आठवला . एक कंजूष मुलगा व्हावा म्हणून देवाला नवस बोलतो तो असा " मुलगा झाल्यावर सोन्याची टोपी घालेल " . मुलगा होतो व नवस फेडावयाचे लक्षात येते तेव्हा मुलाचे नाव "सोन्या" ठेवतो व त्याला घातलेली टोपी देवाच्या डोइवर ठेवतो .

हि कथा फेबुवर एका प्रसिद्ध पानावर आलीये.अगदी शब्द न शब्द कॉपी नाहीयेत , पण कथा तीच आहे. तुमची परवानगी आहे कि नाही माहित नाही म्हणून हि लिंक
https://www.facebook.com/maze.paan/posts/1979504069024330?__tn__=K-R

सकाळचं गेलेलं लेकरू सांजच्याला परत आलं तर त्याला चुकलं म्हणत न्हाईत.
मी बी घरला परत आलुया. वाईच पदरात घ्या लेकराला..

मायबोली सोडून गेल्यानंतर पण अधूनमधून मायबोली पाहिली. कधी कधी अचानक ही कथा वर आलेली दिसायची. अचानक कशी काय वर आली म्हणून पहावं तर कुणी तरी तोडून मोडून आलेल्या कथेचा भाग इथे दिलेला असायचा किंवा कुठलीतरी लिंक दिलेली असायची. जिथे तारीख असेल तिथे मला काहीच करायची गरज नव्हती. कारण तारीख हीच गोष्ट अशी आहे की कोणती ओरिजिनल ते ठणकावून सांगते.

पण व्हॉट्स अ‍ॅप वरची कथा इथे तारखेशिवाय टाकल्यावर मी काय करणार ?
शिवाय देणारा फक्त कॉपी करून मोकळा होतो. त्यावर तो काहीच बोलत नाही. बरेचदा माझी कथा ड्युप्लिकेट आहे कि ढापलेली आहे असे विचारायचे आहे का असे वाटत असे. फेसबुकवर हजारो ठिकाणी तोडून मोडून दिली आहे कथा. पण प्रत्येक ठिकाणी तारीख होती.

काही ठिकाणी तारीख न देता आमच्या गावची कथा असे लिहीले असायचे. अशा सर्व प्रकारांमुळे आयडी बंद केल्याचा पश्चात्ताप झाला आणि कथा लिहील्याचाही. नसती लिहीली तर कॉपी झाली नसती. कॉपी नसती झाली तर काहीच न बोलता लिंका इथे नसत्या आल्या. आता माझीच कथा खरी आहे हे सांगणे आले.

बाबांनो, तुमचं माझ्यावर प्रेम असेल विश्वास असेल तर जेव्हां नजरेला पडेल तेव्हां त्यांना विचारा ही कथा तुमची ओरिजिनल आहे का ? असल्यास तारीख दाखवा. मूळ तारखेपेक्षा ती अलिकडची असेल तर कथा मागे घ्यायला सांगा.

चार साडेचार हजार कॉप्या मीच पाहिल्यात. आता माझ्यात त्राण नाही प्रत्येकाला विचारण्यात.
माफ करा जास्त बोललो असेन तर.

पण आता काहीच लिहू नये असं वाटतंय.

कॉलेज मधे असताना मी शेवटच्या बाकावर बसायचो. फ्लुईड मेकॅनिक्सच्या बोअरिंग लेक्चरला मी वहीत रहस्यकथा लिहायचो. ते जे काही लिहायचो त्याला आता स्पूफ म्हणतात असे समजले. त्या रहस्यकथा वाचायला झुंबड उडायची. कारण त्यात त्या त्या लेखकाची वाट लागलेली असायची. त्या वेळी मला बाबूराव हे नाव पडलं होतं.

तेच नाव घेऊन मी मायबोलीवर आलो. त्या स्पूफला अशुद्ध भाषेत सादर केलं. त्या वेळी ते रसायन लोकांना आवडलं. खरं म्हणजे तो विरंगुळा किंवा मनोरंजन होतं. ते काही अस्सल विनोदी लिखाण नव्हतं. तर तो दंगा होता. दंग्यात सामील व्हायला प्रत्येकाला आवडतं. या स्पूफमुळे शेवटच्या बेंचवरचा दंगा इथेही आला.

पण लवकरच हा अवतार संपवावा असं वाटू लागलं.
किंवा सिरीयसली काही व्यवस्थित लिहावं असं वाटू लागलं. त्या वेळी निजामपूरवरून जाणं येणं व्हायचं. निजानपूरच्या वाड्यातल्या हडळीबद्दल ऐकलं होतं. तो वाडा प्रत्येक वेळी बघायचो. मी भयकथा लिहायला घेतली. पण वात्रट स्वभाव स्वस्थ बसू देईना. शेवटी भयकथेत वात्रटपणा शिरला आणि त्याची हडळीचा मुका ही कथा झाली.

ही या कथेची जन्मकथा. मला खूप प्रयास पडले नाहीत हे खरंच आहे,
पण ही माझी अस्सल कथा आहे हे खरंय. लोकांनी कॉपी मारली तरी ती आवडल्याची पावती समजून मी शांत राहिलो. पण नंतर मूळ कथा कुठली असा प्रश्न उभा राहिला तेव्हां खरंच त्रास होऊ लागला आहे.
हडळीचा मुका लिहील्यानंतर नाही जमणार परत असं या विचाराने आयडी बंद करून घेतला. पण..
आता तर मूळचा बाबूराव आयडी मीच का असाही प्रश्न आलेला आहे. अशा प्रश्नांकडे एक तर दुर्लक्ष करून लिहीत रहावे असे एक मन सांगते. तर नकोच पुन्हा या भानगडीत पडायला असे दुसरे मन सांगते.
नवीन काही तरी मनात घोळते आहे. ते उतरवावे कि नाही दुविधा आहे मनात.

'हडळीलासुद्धा कॅरॅक्टर असतं.' हे आज पहिल्यांदाच कळालं. Rofl
बिचारी हडळ कि हो ती.. तिलाही कनफ्युज केलं "मुका" मागुन! Wink Biggrin Biggrin

लिहित राहा हो. फक्त आता इथुनपुढे कॉपीराईट वापरा.
पु.ले.शु! Happy

छान लिहिता तुम्ही तर कायम असेच काहीतरी लिहित रहाणे हे योग्य निर्णय आहे फक्त वर उल्लेख केलाय कॉपी राइट बद्दल तर ते कराच जमेल तसे पण शक्यतो सोमीवर आधी पोस्ट न करता कुठल्याही मासिकात पेपरात वगैरे आधी छापुन येईल असे पहा. इतके करूनही चोर काही कथा चोरायची थांबवणार नाहीतच तेव्हा फार मनस्ताप करून स्वताला त्रास करून घेवू नका. ओरिजिनल लेखकाला दुःख होणार हे खरेच पण आजचा वाईट काळ बघता हे असेच चालणार Sad

Pages