माझा पहिला परदेश प्रवास : १६ (वास्तवाची चपराक.)

Submitted by ललिता-प्रीति on 20 October, 2008 - 00:47

वास्तवाची चपराक.

दोन वाजत आले होते. म्हणजे पुढचा दिवस सुरू झाला होता. पण ते शरीराला कळणार कसं झोप काढल्याशिवाय !!

हवाई सुंदरीची प्रात्यक्षिकं वगैरे सुरू झाली. चेहेऱ्यावर तेच ते मुद्दामून आणलेले स्वागतोत्सुक भाव; कसलं ते काळ, वेळ, झोप, जागरण सगळ्याच्या पलिकडे गेलेलं त्यांचं आयुष्य!! ... माझं डोकं आता अजिबात चालत नव्हतं. एकीकडे लंच किंवा डिनर यापैकी काहीही नसणाऱ्या अश्या खाण्याच्या तिसऱ्या प्रकाराचं वाटप सुरू झालेलं होतं. काट्या-चमच्यांचे, पाण्याच्या ग्लासेसचे आवाज कानावर पडत होते पण मेंदूपर्यंत काहीही पोचत नव्हतं. मी सीटवर ठेवलेलं पांघरूण पूर्ण डोक्यावरून ओढून घेतलं आणि झोपायचा माझा मनसुबा जाहीर केला. बघता बघता माझा डोळा लागला सुध्दा ...
जराशी डुलकी लागणार इतक्यात एका हवाई सुंदरीनं मला अक्षरशः हलवून जागं केलं आणि 'काही खायला नको का?' अशी अगदी प्रेमानं चौकशी केली! आता तिला काय सांगायचं की अगं बाई तुझी सकाळ, संध्याकाळ, रात्र काय चालू आहे माहीत नाही पण माझी मध्यरात्र झाली आहे, झोपेची वेळ टळून सुध्दा २-३ तास झालेत...खाण्यापेक्षा जरा झोप काढू दिलीस तर अनंत उपकार होतील!! पण तिचीही चूक नव्हती. ती यांत्रिकपणे, इमाने-इतबारे तिचं काम करत होती. शक्य तेवढा सौम्य चेहेरा ठेवून मी तिला नकार दिला. आदित्यकडे एक नजर टाकली तर तो केव्हाच गाढ झोपी गेलेला होता. म्हणजे त्यादिवशी त्यालाही ऍपल ज्यूस प्यावसं वाटलं नव्हतं ...

... अर्धवट झोपेत अर्धा-एक तास गेला असेल. सगळे दिवे पुन्हा सुरू झाले, वैमानिकाच्या सूचनेनं जाग आली. पाण्यात भिजलेली कार्टून्स कशी मान हलवून पाणी झटकतात, अक्षरशः तशी मान झटकावी लागली डोळे उघडण्यासाठी!! दहा-पंधरा मिनिटांत विमानानं भारतभूमीवर टायर्स टेकवले होते.
पंधरा दिवसांत तिसऱ्यांदा 'आयुबोवान' कानी पडलं, आम्ही एकएक करून बाहेर पडायला लागलो. विमानातून बाहेर पाऊल ठेवल्याक्षणी एक अत्यंत कुबट वास नाकात शिरला. तो खास आपल्या देशाचा वास होता - मुंबईचा म्हणता ये‍ईल फारफार तर! त्या 'खास' वासाबद्दल पूर्वी अजयकडून ऐकलं होतं. तेव्हा मनातल्या मनात त्याला 'अतिशयोक्ती' म्हणून नावं देखील ठेवली होती. पण ते खरं होतं. तो वास आल्याआल्या त्याचे ते उद्गार मला आठवले. 'जावे त्याच्या वंशा...' दुसरं काय!!

सामान घेऊन थोड्याच वेळात आम्ही विमानतळाच्या बाहेर आलो होतो. सामानाची तपासणी वगैरे काहीच झालं नाही. चार वेगवेगळ्या विमानतळांवरच्या अनुभवानंतर ही गोष्ट चांगलीच खटकली! अगदी थोड्याश्या अवधीत सुरक्षाव्यवस्थेतल्या खंडीभर तृटी आढळल्या! जाताना जे-जे भव्य-दिव्य, जगावेगळं वाटलं होतं ते-ते सगळं आता दुय्यम, निकृष्ट दर्जाचं वाटायला लागलं - अगदी सामानाच्या ट्रॉलीज पासून पायाखालच्या फरश्यांपर्यंत सगळं!
बाहेर तर अक्षरशः भाजीबाजाराची अवकळा आलेली होती. पाण्याची डबकी, कचरा, धूळ आणि त्या कुप्रसिध्द पानाच्या पिचकाऱ्या!!! हातातली बॅग खाली फ़ूटपाथवर टेकवताना क्षणभर हात अडखळला - इथे आपली बॅग ठेवायची? या घाणीत?? पेंगुळलेले डोळे खाडकन उघडले होते, सार्वजनिक स्वच्छतेसारख्या साध्या गोष्टींत आपल्याला अजून किती मोठा पल्ला गाठायचाय या जाणीवेची जोरदार चपराक पुन्हा एकदा बसली होती! त्याच फ़ूटपाथवर पंधरा दिवसांपूर्वी डोंबिवलीहून येणाऱ्या बसची वाट पाहत आम्ही मजेत गप्पा मारत 'बसलो होतो' हे आता खरं वाटेना!! पण हेच वास्तव होतं, ते स्वप्न होतं ज्यानं आम्हाला गेल्या पंधरा दिवसांत अनोख्या जगाची सफर घडवून आणली होती. चकली-चिवडा खायचा तर हे वास्तव स्वीकारणं भाग होतं!!
पुण्याला जाणाऱ्या मंडळींनी बसची व्यवस्था केली. कल्याण-डोंबिवलीला जायलाही बस होतीच. आम्ही टॅक्सी ठरवली. साडेसहाला जे तिथून सुटलो ते दोन तासांत वापीच्या घरी पोचलो सुध्दा.

दूधवाले, पेपरवाले सकाळच्या लगबगीत होते, ऑफ़िसला जाणारे आपापल्या घाईत होते, दिवाळीची सुट्टी संपायला एक दिवस अवकाश होता त्यामुळे शाळकरी मुलं साखरझोपेत होती ... इथे काहीही बदललेलं नव्हतं ... बदललं होतं ते आमचं अनुभवविश्व!

दुपारी मस्त गरमागरम वरण भात खाल्ला आणि आडवी झाले. संध्याकाळी सहा वाजता झोप पूर्ण झाली. डोळे उघडल्यावर थोडा वेळ काही कळेचना - आपण कुठे आहोत, ही खोली कुठली - काही उलगडेना ........ (समाप्त)

गुलमोहर: 

ललिता-प्रिती,
धन्यवाद. हा प्रवास तुमच्या लेखनामुळे आम्ही ही अनुभवला.
खुप मजा आली.
- अनिलभाई

ललिता-प्रिती, तुम्ही हे प्रवास वर्णन आमच्यासमोर सादर केले त्याबद्दल धन्यवाद. ऍड्मिन, हे लेखमालिकेत टाकता येइल का? म्हणजे प्रत्येक भागाच्या खाली मागच्या/पुढच्या भागाचा दुवा येइल.

छान लिहीलय. प्रत्येक गोष्टीकडे पाहायचा पॉझिटीव्ह दृष्टीकोन आवडला. सगळ्या गोष्टीत रस घेण्याची वृत्ती, नाविन्याचे कुतूहल, आणि साधे सरळ, प्रामाणिक लेखन याने लेख अतिशय वाचनीय झाले आहेत.

मलाही तुमचे लिखान आवडले, मला नाही वाटत ऐवढे श्रम घेऊन मी इथे लिहून काढले असते. त्या बद्दल तुमचे अभिनंदन.
शेवट मात्र तुम्ही अपेक्षित केलात.

खुप छान. खरच तुमच्याबरोबर तिथे फिरुन आल्यासारख वाटल. प्रत्य्क गोष्टिकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन तर फारच आवडला.

आवडलं प्रवास वर्णन..
तुम्ही अगदी सगळ्यांच्या नजरेतुन टिपलेल्या गोष्टी आवडल्या, तुमच्या मुलाच्या, बरोबर असलेल्या सिनिअर सिटीझन्स च्या.
वरती बाकीच्यांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीकडे बघायचा दृष्टिकोन आवडला.

सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.

छान प्रवासवर्णन.. अगदी साध्या सरळ सोप्या शब्दात केल्यामुळे जास्त आवडलं.. Happy

शेवट मात्र अपेक्षित आणि अनपेक्षितही Sad

खुपच छान प्रवासवर्णन. अगदी ओघवती भाषा शैली आहे. खुप उत्सुकतेने पुढच्या भागाची वाट बघुन एका दमात वाचुन काढायचे. सिंगापुरची ट्रीप करुन आल्या सारख वाटल. आणि शेवटही छान वाटला. सहज म्हणून सांगावस वाटतय,
परवाच नॉट विदाउट माय डॉटर ' वाचल. ते वाचल्यावर आपण भारतात जन्मलो ह्या बद्दल देवाचे शतशः आभार मानले.

ललिता.... खूपच छान झालंय लेखन..... तुझ्यासोबत सगळं अनुभवताना मज्जा आली. सगळं समोर घडत असल्यासारखं वाटलं Happy

तुमचे लेख मनोगतवरही वाचले होते प्रिंट काढून. आता दुसर्‍यांदा वाचायलाही मजा आली. Happy प्रवासवर्णन हे रटाळ माहितीपट होण्याचा खूप धोका असतो. तसं अजिबात जाणवलं नाही. तुमची शैली छानच आहे.

झकास, कडक अस मस्त लिहीले आहे.

ललिता तुझा 'विचित्र खाण्याबद्दल' विनोदी लेख आवडला म्हणुन बाकी लेख सर्च केले, आणी हि लेखमाला पाहिली. आणी हया लेखमालेने अर्थातच अपेक्षापुर्ती केली, १००%!

ह्याट्स ऑफ!!! मस्त लेखन शैली आहे.

बाकीचे लेखही लवकरच वाचेन ह्यात शंका नाही.

अरेच्या, मी यातल आधीच काहीच वाचल नाहीये! Sad आता वाचतो
हा प्रवासाचा शेवटचा लेख असावा बहुधा, छानच लिहिलय ग! Happy मस्त! आवडल!
आता मी उलट प्रवास करीत वाचत जातो Proud
...;
****** इतिहास घडवायचा तर आधी तो शिकणे अपरिहार्य ******
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***

छानच लिहिलय!

तुम्ही प्रांजळपणे मान्य करता बर्‍याच गोष्टी पहिल्यांदा केल्यात असे.. त्यामुळेच तुम्हाला खरी मजा आली. जाताना तुमचे अनुभवविश्व मर्यादित होतं, त्यामुळे अपेक्षेपेक्षा नेहमीच जास्त मजा वाटली. आता पुन्हा जर युरोडिस्ने पाहिलत किंवा युरोपतले/ अमेरिकेतले कुठचही पर्यटन स्थळ पाहिलेत तर आपोआप तुमची वेगळी तुलना सुरू होईल. Happy

सापेक्षतेचा सिद्धांत दुसरे काही नाही. Happy

छान लिहिलंय... तुम्ही हे सगळं प्रवास करतानाच लिहून ठेवलं होतं काय?

बाकी, आता मुंबई विमानतळ आता खूप चांगला झालाय.. डोमेस्टीक तर खूपच मस्त...

छान लिहीलय्.

पण असे काय लिहीता:
<<दुय्यम, निकृष्ट दर्जाचं वाटायला लागलं - अगदी सामानाच्या ट्रॉलीज पासून पायाखालच्या फरश्यांपर्यंत सगळं!
बाहेर तर अक्षरशः भाजीबाजाराची अवकळा आलेली होती. पाण्याची डबकी, कचरा, धूळ आणि त्या कुप्रसिध्द पानाच्या पिचकाऱ्या!!! हातातली बॅग खाली फ़ूटपाथवर टेकवताना क्षणभर हात अडखळला - इथे आपली बॅग ठेवायची? या घाणीत??>>

एकतर सामानाच्या ट्रॉलीज फुकट आहेत नि नीट चालतात. नूवर्कला एका ट्रॉलीला तीन डॉ. (१५० रु.) द्यावे लागतात. नि तिथे ट्रॉली अडकली नि माझे तीन डॉ. फुकट गेले! तक्रार करायला तिथे कुणि नाही.

बाकी कचरा इ. ला इलाज नाही. भारतात लोकसंख्या खूप. किती साफ करणार? आता पानाच्या पिचकार्‍या असतील, पण पानहि भारतात जसे मिळते तसे इतरत्र मिळते का? लोकांना आठवण येते, भारतातल्या पानाची. अशी मनाची समजूत घालावी.

उतरल्या उतरल्या जो कुबट वास येतो तो कदाचित् विमानात आंघोळ न करता बरेच तास बसलेले अनेक लोक एकदम बाहेर येतात, नि विमानातल्यासारखी खेळती हवा तिथे नसते म्हणून असेल. आपला भारत म्हणून दुर्लक्ष करायचे, होते सवय हळू हळू कुबट वास, घाण यांची!

वरचे दोन परिच्छेद मला ऐकवण्यात आलेले आहेत अनेकदा, तसेच्या तसे लिहीले आहेत!

चला म्हणजे मोठी माणसे म्हणायची ते बरोबर आहे, "पुन्हा पुन्हा एकादी गोष्ट ऐकली तर खरीच वाटायला लागते, पटायला लागते.. आणि अगदीच काही नाही तर पाठ तरी निश्चित होते" (झक्की, जीभ काढणारी बाहुली :))

सगळे भाग एका दमात वाचुन काढले...तुम्ही काही वर्षांपुर्वी केलेला परदेश प्रवास इतक्या वर्षानंतर मलाही घडला हे वाचुन!!! खुपच छान वर्णन आहे सगळ्या अनुभवांचं..मजा आली Happy

मजा आली वाचताना. सिन्गापुर , मलेशिया आम्ही निवान्त फिरलोय, पण तरीही सगळ सलग वाचुन काढ्ले. हे देश तुमच्या नजरेतुन पुन्हा पहिले.

सुमेधा, रुपाली, चंचल,

इतक्या जुन्या लेखनाकडे नजर वळवल्याबद्दल आणि आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद Happy

सुरेख अनुभव दिला आहे. हा प्रवास तुमच्यामुळे मि ही अनुभवला. असा प्रवास मला ही कधि करता येइल की नाहि माहीतनाही.

आज अथपासून इति पर्यंत सगळं वाचून काढलं .. फार सुंदर लेखन .. अगदी प्रामाणिक आणि म्हणूनच खुप सुंदर .. छान प्रवास घडला! Happy

Pages