माझा पहिला परदेश प्रवास : १५ (विमानंही लेट होतात ... !!)

Submitted by ललिता-प्रीति on 20 October, 2008 - 00:44

विमानंही लेट होतात ... !!

आता घरी परतायला फक्त चोवीस तास शिल्लक राहिले होते. असं वाटलं होतं की सामान आवरताना उदास-उदास वाटेल, नको परत जायला असं वाटेल .... पण प्रत्यक्षात तसं काही झालं नाही - निदान मला तरी नाही. याचाच अर्थ पंधरा दिवसांच्या त्या सहलीचा आम्ही पुरेपूर आनंद उपभोगला होता, पूर्ण समाधान मिळवलं होतं, घरी परतून पुन्हा आपापल्या कामाला लागायला आम्ही तयार होतो.
सगळं आवरून सामान घेऊन खाली आलो. निघण्यापूर्वी शेवटचं फ़ोटो काढणं सुरू होतं लोकांचं. त्यातल्यात्यात ज्यांच्याशी जास्त ओळखी झाल्या त्यांच्याबरोबर फ़ोटोंरूपी आठवणी जतन करायची सर्वांचीच इच्छा होती. पत्ते, फ़ोन नंबर, ई-मेल यांची देवाण-घेवाण सुरू होती. उत्साहाच्या भरात सुरूवातीचे काही महिने नियमित संपर्क ठेवला जातो, नंतर हळूहळू ते मागे पडत जातं हे सर्वजण मनातल्यामनात जाणून होते, तरीही सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

नेहेमीप्रमाणे बस विमानतळाच्या दिशेनं निघाली, तेव्हा लक्षात आलं की क्वालालंपूरचा विमानतळ आम्ही अजून पाहिलेलाच नव्हता. चला, म्हणजे निघायच्या दिवशी पण काहीतरी नवीन पहायचं होतंच!! अर्थात, हे सुध्दा मानण्यावर असतं. मला अजून एक नवीन विमानतळ बघण्याची उत्सुकता होती. अजून कुणाचीतरी वेगळी प्रतिक्रिया झाली असेल - इमिग्रेशन इ.ची कंटाळवाणी पध्दत आठवून कुणाचीतरी दिवसाची सुरूवातच बेकार झाली असेल.

विमानतळावर पोहोचायला ४०-५० मिनिटं लागणार होती. बसमध्ये गाणी, स्तोत्र, भजन, अभंग इ. झालं. गेल्या पंधरा दिवसांत काय-काय वाटलं ते सांगायला सौ. शिंदेंनी आदित्यच्या हातात माईक दिला. जसं निघायच्या दिवशी आदित्यनं आम्हाला आश्चर्यचकित केलं होतं तसंच परतायच्या दिवशीपण केलं. तो बोलला नेहेमीचंच, म्हणजे 'मजा आली' वगैरे पण ते ज्या पध्दतीनं बोलला त्याचं आम्हाला विशेष कौतुक वाटलं. पन्नासएक लोकांसमोर उभं राहून ४-२ वाक्यं आत्मविश्वासानं आणि सहजतेनं बोलणं हेच महत्वाचं असतं. इतरही अश्याच गप्पा-टप्पा होईपर्यंत उतरायची वेळ आली.

इमिग्रेशनचे सगळे सोपस्कार पाचव्या मजल्यावर पार पाडायचे होते. बॅंकॉकला पण चौथ्या मजल्यावर इमिग्रेशन होतं पण रस्त्यानेच तिथपर्यंत नेऊन सोडलं होतं सगळ्यांना. इथे त्यासाठी लिफ़्ट होती. आधीच विमानतळावरची लिफ़्ट, त्यातही पारदर्शक भिंती असलेली लिफ़्ट पाहून आदित्य मूडमध्ये आला. लिफ़्टनं पाचव्या मजल्यावरच्या अवाढव्य लाऊंजमध्ये पोचलो आणि आपापल्या सामानासकट 'रांगेचा फायदा सर्वांना' या वचनाला जागत रांगा लावून उभे राहिलो. पुन्हा एकदा नकळत आपल्या विमानतळाशी तिथली तुलना सुरू झाली. आम्ही पाहिलेले हे चारही देश आकारानं भारतापेक्षा कितीतरी लहान, पण पर्यटनाला सगळीकडेच महत्व दिलेलं दिसलं. परदेशी पर्यटकांना आकर्षित करायचं तर विमानतळाकडे प्रथम लक्ष द्यायला हवं. आपण सणासुदीला दारात रांगोळ्या काढतो, गुढ्या-तोरणं उभी करतो, मांडव टाकतो .... त्याचा उद्देश हाच असतो की येणाऱ्या पाहुण्यांना घरात शिरतानाच प्रसन्न वाटलं पाहिजे. तसंच बाहेरच्या देशातून येणाऱ्या पर्यटकांना सर्वप्रथम विमानतळ पाहूनच प्रसन्न वाटलं पाहिजे, त्या शितावरून ते जो देश पहायला आले आहेत त्या भाताची योग्य ती परिक्षा करता आली पाहिजे. आपल्याकडे याच्या बरोबर उलटं होत असणार यात शंका नाही. इतक्या विविधतेनं आणि नैसर्गिक सौंदर्यानं नटलेला आपला देश, पण विमानतळाच्या भिंती आणि कोपरेच पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगलेले पाहिल्यावर तशीच घाण या देशात सगळीकडे असणार अशी शंका जर एखाद्या परदेशी माणसाला आली तर त्यात त्याची काय चूक? नंतर तो काश्मिररूपी नंदनवनात जरी गेला तरी प्रथमदर्शनी बनलेलं मत सहजासहजी थोडंच बदलणार? आपल्या आणि तिथल्या विमानतळांची अंतर्गत सजावट आणि स्वच्छता यात इतकी तफावत आढळण्याचं मला जाणवलेलं मुख्य कारण म्हणजे आपले विमानतळ अजून सरकारच्या हातात आहेत आणि आम्ही पाहिलेले सगळे खाजगीकरण झालेले आहेत. कितीही नाकारायचं ठरवलं तरी फरक हा पडतोच! मुंबई-दिल्ली विमानतळांच्या खाजगीकरणाबद्दलच्या बातम्या अधूनमधून कानावर येत असतात. 'त्याच्याशी आपला काय संबंध?' असं इतके दिवस वाटायचं. पण आता त्या नियोजित खाजगीकरणाला माझा जोरदार पाठिंबा आहे. 'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे' हे अगदी खरं आहे .... जसं 'इकॉनॉमी क्लास'च्या वंशा गेल्यावर मला त्यातला फोलपणा जाणवला होता!!! पण पुन्हा त्याच 'इकॉनॉमी क्लास'मध्ये बसून परतीचा कोलंबो पर्यंतचा पाच तासांचा प्रवास करायचा होता ज्याची पूर्वतयारी म्हणून आम्ही तिथे रांगेत उभे होतो, क्वालालंपूरचा विमानतळ निरखत होतो. इतर आजी-आजोबांची ट्रॉलीज, बोर्डिंग पास, बॅगेज टॅग्ज, इ. साठी चाललेली धावपळ पाहत होतो. आमचे आजी-आजोबा मात्र निवांत खुर्च्यांवर गप्पा मारत बसलेले होते. कारण धावपळ करायला आम्ही दोघं होतो.

मलेशियाचं 'रिंगीट' हे चलन बदलून पुन्हा आपले रुपये घ्यायच्या निमित्तानं मी त्या सगळ्या लाऊंजभर फिरून आले. ते ऑफ़िस कुठल्याकुठे लांबवर होतं. वाटेत 'चौकशी'चा काऊंटर दिसला. तिथे खरंच चौकशी करता येत होती. विचारलेल्या प्रश्नांची योग्य ती उत्तरं मिळत होती. दोनशे-अडीचशे रिंगीट देऊन अडीच-तीन हजार रुपये हातात मिळाले. पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हातात रुपये खेळायला लागले होते. पूर्वापार ओळखीच्या त्या नोटा पाहून मला भरतं आलं. घरी परततोय याचा नव्यानं आनंद झाला. शेवटी कितीही झालं तरी आपलं घर ते आपलं घर आणि आपला देश तो आपला देश!!! त्या बाबतीत मी पक्की देशप्रेमी वगैरे आहे. तुलनात्मक ज्या वाईट गोष्टी आहेत त्या आहेतच पण म्हणून उद्या जर कुणी मला सिंगापूरला कायमची जाऊन रहा म्हटलं तर मला नाही वाटत मी त्याला सहजासहजी तयार होईन! पंधरा दिवसांत मी फक्त दिखाऊ गोष्टींची तुलना केलेली होती. पण अश्या वरवरच्या गोष्टींनी दोन संस्कृतींतली खरीखुरी तुलना होत नाही. जेव्हा दुसऱ्या देशात जाऊन राहण्याची वेळ येते तेव्हा आपल्या देशाशी जन्माच्यावेळेलाच जोडले गेलेले धागे काही प्रमाणात तोडूनच जावं लागतं. तरच माणूस त्या परक्या देशाला थोड्याफार प्रमाणात आपलंसं करू शकतो. इथे तर साध्या सवयीच्या चलनी नोटा पंधरा दिवसांनी समोर आल्यावर मला आनंद झाला होता, मी कुठली ते तसे धागे तोडून वगैरे जाणार!! त्यापेक्षा हे बरं - आठ-पंधरा दिवस जा, खा, प्या, हिंडा, मजा करा, अनुभवाने समृध्द व्हा पण परतल्यावर त्या नव्या अनुभवांचा तुमच्या देशाला कसा उपयोग होईल ते बघा!! .... पण त्या क्षणी तरी आपापल्या बॅगांना नीट टॅग्ज वगैरे लावून त्या व्यवस्थित पुढे जाताहेत ना ते बघायचं होतं.

सगळं सामान गेल्यावर बोर्डिंग पासेस घेऊन आम्ही पुढे निघालो. वाटेत एका ठिकाणी चक्क भारतीय पध्दतीची, संस्कारभारतीची असते तसली मोठीच्यामोठी रांगोळी काढलेली दिसली. आपल्या चलनी नोटांपाठोपाठ ती रांगोळी पाहूनही छान वाटलं. इमिग्रेशनमधून पुढे आलो. कागदोपत्री आता आम्ही मलेशिया सोडलेलं होतं. तिथून बोर्डिंग गेटपाशी एका ट्रेननं जायचं होतं. तिथली सगळी बोर्डिंग गेट्स एकमेकांपासून इतकी लांबलांब होती की तिथे जायला वेगवेगळ्या ट्रेन्स होत्या. विमानतळाच्या आत इकडे-तिकडे फिरायला ट्रेन!! नवलाई पंधरा दिवसांनंतरही संपलेली नव्हती तर!!

पुन्हा एकदा सगळे 'प्याशिंजर' फलाटावर जाऊन उभे राहिले.

4052-30.jpg

आम्हाला 'सी-४' बोर्डिंग गेटला घेऊन जाणारी ट्रेन लगेच आलीच. २-३ मिनिटांत ट्रेनमधून तिथल्या लाऊंजपर्यंत पोचलो. आता तास-दीड तास वेळ काढायचा होता. पण फारसा प्रश्न आला नाही कारण तिथे वेगवेगळ्या प्रकारची भरपूर दुकानं होती. चलन बदलून घेताना ५-६ चिल्लर नाणी जवळ शिल्लक राहिली होती. ती खर्च करायच्या मोहिमेवर आता मी आणि आदित्य निघालो. चणे-शेंगदाणे गटातलं मूठभर काहीतरी मिळालं तेवढ्याचं. पण त्यातही आनंद झाला - हवी असलेली वस्तू हव्या त्या किंमतीला मिळाल्यावर होतो तसा!!! ते दाणे सगळ्यांनी वाटून खाल्ले. मग इतर दुकानांतून इकडे-तिकडे फिरत थोडा वेळ काढला. एक पुस्तकांचं दुकानही होतं. नेहेमीप्रमाणे ते मला सर्वात शेवटी दिसलं. तरीही त्यातल्या त्यात अर्धा-पाऊण तास तिथे घालवलाच! आंतरराष्ट्रीय विमानतळावरचं पुस्तकांचं दुकान, तिथली पुस्तकंही आंतरराष्ट्रीय होती .... आणि त्यांच्या किंमतीही!!

आमच्यापैकी एका आजींनी घरातून निघताना बरोबर घेतलेले उरलेसुरले फराळाचे पदार्थ सगळ्यांत वाटून टाकले. त्यांपैकी भाजणीच्या चकलीचा एक तुकडा माझ्या वाट्याला आला. तेवढ्या एका तुकड्याने असं तोंड चाळवलं ना की विचारता सोय नाही. लगेच जाणवलं की यंदा या सहलीच्या तयारीच्या नादात फराळाचे कुठलेही पदार्थ केले अथवा खाल्ले गेले नाहीत. असेल सिंगापूर सुंदर आणि स्वच्छ पण तिथे खमंग चिवडा कुठे मिळाला आम्हाला खायला? असेल बॅंकॉकचा विमानतळ भव्य पण तिथे कुरकुरीत चविष्ट भाजणीची चकली म्हणजे काय ते कुठे कुणाला माहितीये? 'चॉकोलेट गॅलरी'त असतील भरपूर प्रकारची उंची चॉकोलेट्स पण करंजीचं गोड सारण नुसतं खातानाची मजा कुठे त्यांत ... आता तर मला घरी परतायची फारच ओढ लागली ....

दुपारी एकच्या सुमाराला प्रत्यक्ष बोर्डिंग गेटपाशी सगळे जाऊन पोचलो. समोरच्या मोठ्या काचांच्या खिडकीतून उडणारी-उतरणारी विमानं दिसत होती. पुढ्यातच आमच्या विमानात सामान चढवण्याचं काम चालू होतं. तिथली काम करणारी माणसं प्रवाश्यांच्या मोठाल्या बॅगा आत अक्षरशः दणादण फेकत होती. परदेश प्रवास, विमान प्रवास म्हणून त्या खास चाकं लावलेल्या मोठ्या बॅगांचं आम्हाला केवढं अप्रूप होतं. पण त्यांच्या दृष्टीनं ती नित्याचीच बाब होती. एकीकडे प्रवाश्यांचे सिक्युरिटी, इमिग्रेशन इ. सोपस्कार पार पडत असताना पडद्यामागे काय चाललेलं असतं ते त्या दिवशी तिथे पहायला मिळालं. वेळ मस्त गेला हे सांगायला नकोच!
'श्रीलंकन फ़्लाईट नं. यू. एल. ३१२'साठीची सूचना झळकली आणि सगळे उठलो. क्वालालंपूर खुर्दहून कोलंबो बुद्रुक मार्गे मुंबई गावठाणाच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला होता.

आता विमानातल्या कुठल्याही अंतर्गत गोष्टी निरखण्यात फारसा रस नव्हता, त्यामुळे जेवणखाण झाल्यावर पाच तास काय करायचं हा प्रश्नच होता. समोर छोट्याश्या टी.व्ही.च्या एका चॅनेलवर कुठलातरी हिंदी सिनेमा सुरू झाला होता. म्हटलं चला हा टाईमपास काही वाईट नाही. पण कसलं काय ... एक-दोन मिनिटं त्या स्क्रीनकडे पाहिलं आणि मला मळमळायला लागलं! आता तर पाच तास कसे काढायचे हा अजूनच मोठा प्रश्न होता. शेवटी टाईमपासचा हुकमी मार्गच कामी आला - ऍव्हॉमिन घेतली आणि झोपायचं ठरवलं. गाढ झोप लागणं शक्यच नव्हतं पण एक-दोन डुलक्या काढल्या.
पाच तासांनी कोलंबो विमानतळावर उतरलो. घड्याळ्याचे काटे पुन्हा मागे सरकवले. पण शारिरीक घड्याळ कसं पुढे मागे करणार? पोट म्हणत होतं जेवणाची वेळ झालीये ... पण कोलंबोचं घड्याळ सांगत होतं अजून दोन तास थांबा!! ते तर थांबायचं होतंच शिवाय आमचं पुढचं विमान रात्री बारा वाजता होतं. ती प्रतिक्षा होतीच. पुन्हा त्यात तिथले रात्रीचे बारा म्हणजे आमच्या शारिरीक घड्याळांची मध्यरात्र!! एकंदर कठीण काम होतं पण मजाही वाटत होती. म्हटलं तर आम्ही त्याक्षणी कोलंबोच्या विमानतळावर होतो, पण व्हिसा नसल्यामुळे श्रीलंकेत अधिकृतरीत्या प्रवेश करू शकत नव्हतो. म्हणजे ना या देशात ना त्या देशात असे आम्ही मध्येच कुठेतरी होतो!! 'व्हिसा' वरून आठवलं - दहा दिवसांपूर्वी जेव्हा आम्ही कोलंबोला उतरून व्हिसा घेतला तेव्हा बहुतेकांना २-३ दिवसांचाच व्हिसा मिळाला होता ... आदित्यला मात्र ३० दिवसांचा मिळाला होता. म्हणजे त्या रात्री आमच्यापैकी फक्त आदित्य कोलंबो शहरात अधिकृतरीत्या प्रवेश करू शकणार होता पण नाईलाजास्तव त्याला आमच्या बरोबर थांबणं भाग होतं ....

पुन्हा एकदा तिथल्या दुकानांतून चक्कर मारून आलो, गरमागरम कॉफ़ी प्यायली, गप्पा मारल्या, पत्ते खेळलो, गाणी म्हटली आणि कसेबसे दोन तास काढले. पहिल्या २-३ दिवसांचा अनुभव लक्षात घेता अजयनं मात्र झोप काढणं पसंत केलं. आमच्यामुळे त्या लाऊंजला एखाद्या गप्पा रंगलेल्या कट्ट्याचं स्वरूप आलं होतं! अनेक दिवस परदेशात फिरतीवर असलेला एक पुण्याचा रहिवासी आमचा सहप्रवासी होता. तिथे त्यावेळी असं अनपेक्षितपणे आणि घाऊक भावात मराठी कानावर पडल्यामुळे तो फारच खूष झाला. मराठी गप्पा ऐकून फार बरं वाटलं असं त्यानं मुद्दाम येऊन सांगितलं.

तिथल्याच एका रेस्तरॉंमध्ये जेवण होतं. पूर्ण पंधरा दिवसांतलं ते सर्वात वाईट जेवण ठरलं. पण करणार काय - 'श्रीलंकन'च्या फुकट पॅकेजमधलाच तो एक भाग होता. 'फुकट' हवंय ना मग चावा चिवट पोळ्या, गिळा टचटचीत भात, तिखटजाळ आमटी ... भरल्या ताटावरून अर्धपोटी उठणं म्हणजे काय त्याची शब्दशः प्रचिती त्यादिवशी आली!!

अकरा वाजता पुन्हा सिक्युरिटीसाठी रांगा लावल्या. पुढे जाऊन अर्धपोटी, पेंगुळल्या डोळ्यांनी, जडावलेल्या डोक्यांनी आमच्या विमानाचा नंबर कधी येतोय त्याची वाट पाहत बसून राहिलो. बरोबर अकरा दिवसांपूर्वी त्याच ठिकाणी पहाटेपहाटे आम्ही बॅंकॉकच्या विमानाची वाट पाहत बसलो होतो. त्यादिवशीपण झोप अपुरी झाली होती पण सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता, तेव्हापण भूक लागली होती पण 'बॅंकॉकला जायचंय' या विचारापुढे तो मुद्दा गौण वाटत होता. नवीन देश पहायच्या उत्सुकतेनं जडावलेलं डोकं हलकं झालं होतं. त्याक्षणी मात्र एक-एक मिनिट म्हणजे एक-एक तास वाटत होता. वेळ जाता जात नव्हता. पावणेबारा वाजता 'फ़्लाईट नं. यू. एल. १४१' ही अक्षरं नजरेस पडली आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला .... पण हे काय...! त्याच्यापुढे नेहेमीचे 'Now Boarding' हे शब्द दिसलेच नाहीत - त्याऐवजी 'Delayed' हा नको असलेला शब्द येऊन डोळ्यात घुसला!!! हा मात्र सहनशक्तीचा अंतच होता. अजून एक तास??? 'अनुभवाने समृध्द' म्हणता म्हणता इतकं की आजवर फक्त बस-ट्रेन उशीरा येण्याची सवय असलेल्यांना 'विमान लेट' असण्याचा अनुभव आला होता....

तो एक तास कसा काढला ते ज्याचं तोच जाणे. मात्र बरोबर एक वाजता विमानापाशी घेऊन जाणारी बस आली. विमानात आपापल्या जागांवर स्थानापन्न झालो. आता कधी एकदा घरी जाऊन पडतोय असं झालं होतं ....

गुलमोहर: 

>>>पण तिथे खमंग चिवडा कुठे मिळाला आम्हाला खायला?

दोन ठिकाणि....

१. मुस्ताफा.... जय हल्दिराम...
२. पेशवाई.... जय चितळे बंधु....

Happy