उल्का, अशनी, डायनोसॉर्स आणि 'प्रिय अमुचा …'*

Submitted by kaushiknagarkar on 4 March, 2013 - 16:27

रात्री झोपताना छताकडे डोळे लावून झोपण्याची माझी सवय. आजही तसाच पडलो. नेहेमीप्रमाणे अंधारात छत कोठे अाहे हे पाहण्याच्या प्रयत्नात पापण्या जड होउन झोप लागेल ही अपेक्षा. पण अाज काही वेगळाच अनुभव येतोय. मी जे पाहातोय ते छत नाही, अथांग अंतराळ आहे. त्या काळ्या अवकाशात छोटे छोटे ठिपके; सोनेरी, लालसर, पांढुरके, निळसर. त्यातच एक फिकट ठिपका अगदी दिसेल न दिसेल असा. पण अाज तो मला अगदी स्पष्ट दिसतोय. इतर ताऱ्यांप्रमाणे हा ही एका जागी स्थिर नाही. प्रचंड वेगाने तो ठिपका अगदी थेट माझ्याकडेच धाव घेत अाहे हे मला ठाऊक अाहे. जरी डोळ्याला तो पुसट बिंदू एखाद्या ताऱ्याप्रमाणे भासला तरी तो तारा नाही, ग्रहही नाही; एक छोटासा पाषाण अाहे. संजयासारखी दूरदृष्टी मला अाज प्राप्त झाली अाहे, त्यामुळे मी त्या पाषाणाला निरखून पाहू शकतो. सुमारे पन्नास मीटर (एकशेपन्नास फूट) लांबीरूंदीचा हा खडक अफाट अवकाशात नगण्य दिसला तरी पृथ्वीवर त्याचा अाकार माझं घर दोन्ही बाजूच्या शेजाऱ्यांची घरं झाकून टाकेल असा. खाचखळगे कंगोरे असलेला तो कठीण पाषाण प्रस्तरारोहणासाठी लोकप्रिय झाला असता. संथपणे स्वत:भोवती फिरत पण सुसाट वेगाने तो पृथ्वीतलाकडे धावतो आहे, ज्योतीवर झेपावणाऱ्या पतंगाप्रमाणे. परंतु पतंग जसा जळून जातो तसा हा 2012 DA14 मात्र जळून जाणार नाही. हो, या दगडाचं बारसं झालेलं अाहे. जे खगोलतज्ञ या खोडकर बाळावर लक्ष ठेवून अाहेत, त्यांनीच याच नामकरण केलं अाहे, अाणि हा DA14 जरी पृथ्वीच्या अगदी निकट येणार असला तरी अादळून स्फोट पावणार नाही अशी खात्री त्यांनी दिलेली अाहे. मी त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवलेला अाहे (न ठेवून सांगतो कुणाला?). कळेलच उद्या काय होतं ते.

DA14 पृथ्वीतर पदार्पण करणार नसला तरी, असाच एक दगड १९०८ साली रशियातल्या सायबेरियामधे अवतरला होता. पृथ्वीवर जे दगड येऊन पडतात त्यांना अशनी म्हणतात. अाकाश ही एक निर्वात पोकळी अाहे असे अापण समजत असलो तरी त्यात अगदी धुलीकणाहून बारिक ते मोहरीएवढे, वाटाण्याएवढे, लिंवाएवढे, चेंडूएवढे, गाडीएवढे, घराएवढे डोंगराएवढे अाणि त्याहूनही मोठे खडक, अखंड पाषाण संचार करीत असतात. कधीकधी ते भुसभुशीत अाणि वालुकामय पण असू शकतात, यांना अापण मिटिअोराइटस् किंवा अॅस्टेरॉइडस् म्हणतो. अाकाशात कधीकधीच दर्शन देऊन धडकी भरवणाऱ्या धुमकेतूंपेक्षा हे वेगळे असतात, दिसतात अाणि वागतात. पण त्याबद्दल नंतर. असा एखादा मोहरीएवढा कण जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो तेव्हा त्याचा वेग अफाट असतो (सेकंदाला साठ मैल सुध्दा असू शकतो). जमिनीपासून ऐंशी, शंभर किलोमीटर उंचीवर वातावरण अगदी विरळ असले तरी या वेगाच्या परिणामी हवा संकुचित पावून घर्षणाने तापते अाणि काही क्षणातच तो कणदेखिल जळून खाक होउन जातो. अापल्याला एक छान दृष्य दिसतं, दिवाळीत बाण उडवल्यासारखं. अापण त्याला उल्कापात म्हणतो. पण खरं म्हणजे पात काहि झालेला नसतो, उल्का वातावरणातच वरच्यावर जळून गेलेली असते.

लहानपणी माझी समजूत होती की अाकाशाला जे तारे चिकटवलेले असतात त्यातलाच एखादा निखळून पडतो तोच म्हणजे उल्का. बालबुध्दीला पटणारं अाणि त्यावेळच्या अनुभवविश्वाशी जुळणारं असच हे स्पष्टीकरण होतं. त्यावेळी नुकतीच पारदर्शक सेलोटेप मिळू लागली होती अाणि अावडीची चित्रं, फोटो मासिकातून कापून भिंतीवर चिटकवण्याचा एक नवाच छंद मला लागला होता. या टेपची चिकटक्षमता जेमतेमच असे आणि काही ध्यानीमनी नसताना चिकटवलेलं एखादं चित्र अचानक भिंतीवरून निखळून पडायचं हा नित्याचा अनुभव होता. मात्र एक फरक होता. टेप जरी चित्र भिंतीला खिळवून ठेवू शकत नसली तरी डाग मात्र कायमचा रहात असे. अाकाशातला तार निखळून पडला की त्याची काहीच निशाणी रहात नसे. याचा गैरफायदा माझे मोठे भाऊ घेत असत. कोजागिरी पौर्णिमेला हटकून सर्वजण घराच्या गच्चीवर दुग्धपानासाठी जमत. गप्पागोष्टी गाणी चालू असताना कोणालातरी अाकाशाकडे पाहायला सुचे. चंद्रदर्शन घेत असताना कोणालातरी उल्का पडताना दिसायची. बर उल्का ही गोष्ट अशी अाहे की ती पापणी लवायच्या अात अदृष्य झालेली असते. कोणी कोणाला दाखवून दिसणारी ही चीज नाही. (नसे. अाताच्या मोबाइल फोन, फेसबुक, यूट्यूब अाणि ट्विटरच्या जमान्यात कोणताही वैयक्तिक अनुभव क्षणार्धात सार्वत्रिक, वैश्विक होऊ शकतो.) तसं उल्का पाहाणं हे अापल्याकडे अशुभ समजत असत, पण कदाचित त्यामुळेच उल्का पाहाण्याची तीव्र उत्कंठाही असे. पण अशी हवी म्हणून पहायला मिळाली तर ती उल्का कुठली?** माझी उत्सुकता माहीत असल्याने ते दुष्ट भाऊ 'अरे .. ही पहा' असे म्हणून लक्ष वेधून घेत. अर्थातच मला काही दिसत नसे. मुळात त्यांनी खरोखरच उल्का पाहिलेली असे की नाही याविषयीच मला अाता शंका अाहे. पण मग ते मलाच दटावत 'तुला दाखवली तेव्हा लगेच पाहायला काय होतं? तू वेळ घालवलास ..' तेवढ्यात दुसऱ्या भावाला दुसरीकडे उल्का दिसलेली असे, आणि मी कितीही डोळे फाडून पाहिलं तरी मला काहीलेल्या दिसत नसे. भरीतभर म्हणून शेजारच्या घराच्या पत्र्यावर खडे टाकून ते 'साऊंड इफेक्ट' देखील निर्माण करीत असत. मी रडवेला होईपर्यंत हा क्रूर खेळ चालू राही. मग आई किंवा अाजी मधे पडून त्यांना दटावीत अाणि माझी सुटका करीत. दुसऱ्या दिवशी मी उन्हाने तापलेल्या त्या पत्र्यावर जाऊन ते खडे शोधत राही.

खर तर पृथ्वीवर रोज असे हजारो उल्कापात होत असतात. रोज सुमारे वीस ते चाळीस टन (होय, ट न) एवढा ऐवज अवकाशातून पृथ्वीतलावर येत असतो. पण कोजागरीची एक संध्याकाळ सोडली तर वर अाकाशाकडे पहायला वेळ अाहे कोणाला? सुदैवाने यातला बहुतांश सर्व 'माल' वरच्यावर जळून जातो, कारण हे धुलिकण मोहोरी किंवा वाटाण्याएवढेच असतात. त्याहून मोठा खडा अालाच तर त्याचा प्रकाश फारच तेजस्वी असतो अाणि जरा जास्तकाळ टिकतो. असा दगड चेंडूएवढा असला तर उष्णता अाणि दाव सहन न होऊन तो फुटतो आणि भुईनळ्याप्रमाणे अाषतबाजी झालेली दिसते. मोठा असल्यामुळे असा दगड वातावरणात थोडा अधिक खोलवर शिरतो परंतु तरीहि तो वरच्यावरच विरून गेलेला असतो. जेव्हा दगड फारच मोठा असतो तेव्हा उष्णता अाणि दाब यांच्या परिणामामुळे तो थालीपिटासारखा चपटा बनतो, त्याचे तुकडे पडतात. ते जळू लागतात, पण सर्व तुकडे वरच्यावर जळून न जाता काही तुकडे तरी प्रचंड अावाज करीत जमिनीवर येउन अादळतात. अशावेळी अापण अशनीपात झाला असं म्हणतो. DA14 पन्नास मीटर (एकशे पन्नास फूट) लांबीरूंदीचा असल्याने तो जर वातावरणात शिरला तर तो मोठाच अशनी बनेल यात काही शंकाच नाही.

रशियातला १९०८ साली अालेला अशनी (अॅस्टेरॉइड) हे अलिकडच्या काळातला सर्वात मोठं अशनीपाताचं उदाहरण. अाणि अाज शंभरवर्षे होउन गेली तरी या अशनीपाताचे रहस्य पूर्णपणे उलगडलेले नाही. झालं ते बहुधा असं झालं असावं. सुमारे सत्तर मीटर*** अाकाराचा एक मोठा खडक , ठिसूळ खडक, अापल्या पृथ्वीच्या वाटेत अाडवा अाला. त्याचा मार्ग पृथ्वीला स्पर्श करून जाणारा होता त्यामुळे पाण्यावर टाकलेल्या भाकरीसारखा त्याचा अाघात झाला अाणि त्याचा स्फोट जमिनीजवळ परंतु हवेत झाला. हे जिथे घडलं तो सायबेरियातला तुंगुश्का खोऱ्याचा परिसर दलदलीचा, दुर्गम अाणि जंगली असल्यामुळे सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. तरिही अाघातस्थळापासून शेकडो मैल अंतरावर असलेल्या लोकांना या स्फोटाच्या धक्क्याने भुईसपाट केले होते. अनेक अडचणींवर मात करून अनेकवर्षांनी जेंव्हा संशोधकांची तुकडी त्या ठिकाणी पोहोचली तेव्हा ते कल्पनातीत दृष्य पाहून ते आश्चर्यचकीत झाले. त्यांना कोणतेही विवर अथवा अशनीचे तुकडे सापडले नाहीत. परंतु हीच स्फोटाची जागा अशी खात्री पटवणारं दृष्य त्यांनी पाहिलं. जसे ते या अशनीच्या शोधार्थ निघाले तेंव्हा अपेक्षित स्थळाच्या शेकडो किलोमीटर अाधीच त्यांना झाडे उन्मळून पडलेली िदसली. परंतु एरवी वादळात उन्मळून पडलेली झाडे जशी अस्ताव्यस्त पडलेली असतात तशी हि झाडे नव्हती. नीट रचून ठेवल्यासारखी ती सर्व एकाच दिशेने (स्फोट झालेल्या ठिकाणाच्या विरूध्द दिशेने) पडलेली होती. त्या मार्गाने वेध घेत जेंव्हा ही तुकडी स्फोटस्थळाला पोहोचली तेव्हा त्या ठिकाणापासून सर्वदिशांनी वर्तुळाकार झाडे पडलेली त्यांना दिसली. परंतु या ठिकाणी मात्र झाडे उभी होती, फक्त त्यांच्या फांद्या, पाने वगैरे सर्वकाही नाहिसे होऊन फक्त झाडांचे सांगाडे राहिलेले होते (सायबेरीया असल्यामुळे जंगल सूचिपर्णी वृक्षांचे होते). याच ठिकाणी हवेत स्फोट झाल्यामुळे असं झालं असणार असा अंदाज त्यांनी तेव्हा केला. सदतीस वर्षांनंतर जेव्हा अणुबॉँबच्या चाचण्या झाल्या तेव्हा अशाच तऱ्हेने झाडे पडलेली दिसली. या स्फोटाची संहारकशक्ती हिरोशिमा अाणि नागासाकीवर टाकण्यात अालेल्या बॉँबच्या कित्येकपटीने जास्त होती. जर हा स्फोट मुंबई, न्यूयॉर्क किंवा लंडन सारख्या शहरावर झाला असता तर केवढा हाहा:कार झाला असता याची कल्पनाच करवत नाही. योगायोगाची गोष्ट म्हणजे हे लिहित असतानाच बातमी ऐकली की अाताच आणि पुन्हाएकदा रशियातच एक मोठा अशनी पडला. DA14 चा अाणि याचा काही संवंध नाही असं प्रथमदर्शनी दिसतं. हजारो खिडक्यांच्या काचा फुटून बरेच लोक जखमी झालेत, परंतु जीवीतहानी झाली नाही. हे एकविसावं शतक असल्याने अर्थातच त्याचे शेकडो व्हिडिअोज् यू-ट्यूबवर उपलब्ध अाहेत हे सांगायला नकोच. याअुलट तुंगश्का स्फोट नक्की कोठे झाला हे गुगलच्या नकाशावर शोधायला देखील मला बरेच प्रयास करावे लागले.

तुंगुश्का नदीचं खोरं हा एक दलदलीचा प्रदेश आहे म्हणून विवर झालं नसेल, पण पन्नास हजार वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या अॅरिझोना राज्यात जो अशनी पडला त्याने निर्माण केलेले विवर हे सुमारे दीड किलोमीटर व्यासाचे आहे. आणि हा अशनी सुमारे पन्नास मीटर असेल अाकाराने (म्हणजे DA14 एवढाच). महाराष्ट्रात लोणार येथे जे विवर (आणि खाऱ्यापाण्याचे सरोवर) अाहे ते देखील सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वीचे अाहे. पण या सगळ्यांचा बाप, आजा किंवा पणजा म्हणावा असा एक अशनीपात फारफार पूर्वी झालेला आहे. किंबहुना या अशनीमुळेच अाज मनुष्यजात अस्तित्वात अाहे असं काही (बऱ्याच) तज्ञांच मत आहे. ही गोष्ट आहे पासष्ट दशलक्ष वर्षांपूर्वीची. तेंव्हा पृथ्वीतलावर डायनोसॉरसांच अनभिषिक्त राज्य होतं. सशाएवढे चिमुकले आणि हत्तीदेखील ज्यांच्यापुढे सशासारखे दिसतील असे प्रचंड अशा अाकाराचे, आणि चार पायावर चालणारे, दोन पायावर धावणारे, उडणारे तसेच मांसाहारी अाणि शाकाहारी अशा सर्व प्रकारांचे डायनोसॉर्स सर्वत्र मुक्त संचार करीत होते. अशावेळी हा अशनी टपकला. सुमारे सहा मैल लांबीचा हा अगडबंव अशनी सेकंदाला दहा मैल वेगाने येऊन अादळला. तो महाकाय पाषाण एवरेस्ट पर्वताहूनही उंच असल्यामुळे जेंव्हा तो एकिकडे जमीनीत घुसत होता तेंव्हा त्याचे दुसरे टोक अजुनही वातावरणाच्या बाहेर डोकावीत होते.

उल्का पडताना पाहणं अशुभ, ही बोली डायनोसॉर्सच्या बाबतीत अगदी तंतोतंत खरी ठरली. हा अशनी जर रात्रीच्यावेळी पडला असला तर त्याच्या तेजाने डोळे दिपून ते नक्कीच जागे झाले असणार. अापल्या थोटक्या पुढच्या पायानी डोळे झाकायचा निष्फळ प्रयत्न त्यांनी केला असणार. आणि जर दिवसा याच अागमन झालं असलं तरी देखील त्याच्या प्रखर प्रकाशामुळे प्रत्येकाच्या दोन दोन सावल्या पडल्या असणार. तेव्हा 'अरे हे काय?' या अर्थाने डायनोसॉरियन भाषेत जे काही उद्गार करत असतील ते पूर्ण होण्याअाधीच खेळ खलास. या अशनीची संहारक शक्ती इतकी होती की प्रत्यक्ष स्फोट होण्याअाधी शॉकवेव्हनेच हजारो किलोमीटर क्षेत्रफळातले जीवन नष्ट झाले. अशनी अादळल्यावर बसलेल्या हादऱ्याने अाणखी संहार झाला. हा अशनीपात जिथे झाला ती जागा अाजच्या मेक्सिको (मेहिको) देशातल्या युकॅटन प्रांतात समुद्रकिनाऱ्यावर अाहे (chicxulub crater). हा डोंगर समुद्रात कोसळल्यामुळे तिथल्यापाण्याची वाफ होऊन गेली अाणि सागरीजीवन संपुष्टात अाले. पण हा संहार म्हणजे केवळ 'ट्रेलर' होता, खरा ड्रामा तर अजुन व्हायचाच होता. समुद्रात हलचल झाली म्हणजे सुनामी लाट निर्माण होणार हे अाता अापल्याला चांगलच समजलयं. २००४ अाणि २०११ साली ज्या सुनामी त्यानी काय हाहा:कार उडविला याची अाठवण अजून ताजी अाहे. २००४ सालची हिंदि महासागरातली सुनामी मद्रासच्या किनाऱ्यावर पोहोचली होती. हि सुनामी सुमारे नऊ मीटर (तीस फूट) उंच होती अाणि तशी मंदगती, म्हणजे मोटरगाडीच्या वेगाने धावणारी होती. तरीदेखील या सुनामीमुळे जगभरात अडीच लाखाहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. मेहिकोमधे पडलेल्या अशनीने निर्माण केलेली सुनामी शेकडो मीटर उंचीची अाणि विमानाच्या गतीने धावणारी असेल. जमीनीवर अाणि पाण्यात असा प्रलय घडवूनही त्या अशनीचे समाधान झालेले नव्हते असे दिसते. कारण त्याच्या अादळण्यामुळे पृथ्वीच्या अंतर्भागातले लाखो टन वजनाचे दगड, धूळ अाणि लाव्हा वातावरणात लोटले गेले. हे उडालेले दगड वातावरणाबाहेर जाउन बॅलिस्टिक मिसाईल प्रमाणे पृथ्वीवर ठिकठिकाणी येऊन पडले. मेहिकोत जे घडले त्याची छोटी पुनरावृत्ती साऱ्या पृथ्वीवर हजारोवेळा घडली. जागोजागी अागी लागून जे जळण्यासारखे होते ते जळून गेले. त्या प्रचंड वडवानळाच्या धुराने सारे अाकाश झाकोळून गेले अाणि सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचेना. भरीत भर म्हणजे या अशनीमधे असलेले क्लोरीन अाणि ब्रोमिन मुक्तहोउन वातावरणातला संरक्षक असा अोझोनचा थर (ozone layer) नष्ट होउन गेला. उडालेल्या धूळीतील मिनरल्सचे रूपांतर नायट्रेटस् मधे अाणी पर्यायाने नायट्रिक अॅसिडमधे होउन त्याचा विषारी पाउस पडला. हळूहळू अागी विझल्या अाणि अाणि उलट्या दिशेने प्रवास सुरू झाला. अचानक हिमयुगाला सुरूवात झाली. पहिल्या अापत्तीतून वाचलेले अनेक जीवजंतु अाणि झाडेझुडे या नव्या संकटात बळी पडली. जमिनीवरची अाणि सागरातली फूडचेन पूर्णतया: विस्कळीत होउन पृथ्वीवरचे तीन चतु्र्थांश जीवन नष्ट झाले. कालान्तराने परिस्थिती हळूहळू बदलत गेली अाणि जीवनानेही नवनवे मार्ग शोधले. एकुणच मॅमल्स आणि विशेषकरून एपस् हे या नव्यायुगात अधिक यशस्वी झाले. माणूस धरणीवर अवतरला आणि पाहता पाहता पृथ्वीपती झाला. ही सगळी त्या अशनीची कृपा. मात्र या अशनीने सर्व डायनोसोर्सचा खातमा केला असे वाटून दु:खी होउ नका. पक्षी हे डायनोसोर्स पासूनच विकसित झाले आणि त्यांच्यारूपाने डायनोसोर्स आजही अस्तित्वात आहेत. या सगळ्या प्रकोपातून तावूनसुलाखून निघालेले इतरही काही प्राणी आजही आपल्यामधे वावरत असतात. कासव, मगर आणि अत्र तत्र सर्वत्र; झुरळ! पुढच्यावेळी झुरळ मारण्यासाथी हातात झाडू घ्याल तेंव्हा हे ध्यानात घ्या की सहा मैल लांबीरूंदीच्या डोंगराएवढ्या अशनीला जे जमल नाही ते तुम्ही साध्य करू पाहात आहात. म्हणजे मग झुरळ जेंव्हा निसटून जाइल तेंव्हा तुमची फार चडफड होणार नाही.

मुळात हे अशनी, या उल्का येतात कुठून हा प्रश्न रहातोच उभा. शिवाय धूमकेतू असतात त्यांच काय? या प्रश्नांचा उलगडा अगदी अलिकडच्या कळात झालेला आहे, होत आहे. धूमकेतू (comets) आणि उल्का (meteoroids, asteroids) यांच्यात काही मूलभूत फरक आहेत. पहिला म्हणजे त्यांचं उगमस्थान आणि दुसरा महत्वाचा फरक म्हणजे त्यांचं स्वरूप (composition). धूमकेतु सूर्यमालेच्या अतीदूरच्या प्रदेशातून येतात. कायपर बेल्ट (Kuiper belt) आणि ऊर्ट क्लाउड (Oort cloud) हे ते प्रदेश होत. त्यांच्या कक्षा अतिलंबवर्तुळाकार असतात. धूमकेतु हे बर्फ़ आणि वाळूयुक्त दगडांचे ठिसूळ आणि भुसभुशीत असे असतात. अतिशय लहान आकार आणि खूप दूर अंतरावर अस्ल्याने सूर्याजवळ येईपर्यंत ते सापडणे महाकठीण. सूर्याजवळ आल्यावर उष्णतेमुळे बर्फाचे रूपांतर वायूमधे (sublimation) होऊन त्यांना शेपूट (किंवा शेंडी) फुटते आनि ति दूरवर पसरते आणि त्यामुळे तो धूमकेतु दिसू लागतो. धूमकेतु हे पूर्वी गूढ आणि भितीदायक म्हणून अशुभ समजले जात होते. आजही त्यांच्याविषयी कमीच माहीती आहे.

अॅस्टेरॉईडस् या सूर्यमालेचाच एक घटक आहेत. त्या वेगवेगळ्या अाकाराच्या असल्या तरी चांगल्या घट्ट दगडाच्या बनलेल्या असतात. मूळ आदिमेघापासून सूर्य आणि ग्रह जेंव्हा निर्माण होत होते तेंव्हाच या अश्मांचीही (rocks) निर्मिती झाली असं अाता मानलं जातं. बहुसंख्य अॅस्टेरॉईडस् मंगळ आणि गुरू यांच्यामधल्या पट्ट्यात राहून सुर्याभोवती फिरताना सापडतात. काही काळ एक थियरी (प्रमेय) अशी मांडली गेली होती की पूर्वी तिथे अस्तित्वात असलेल्या एक ग्रहाच्या झालेल्या या ठिकर्‍या आहेत. या ठिकर्‍या कशा झाल्या याचे स्पष्टीकरण देणार्‍या आणखी काही थियर्‍या आहेत. पण आपण त्यात शिरायला नको. नवनव्या थियर्‍या मांडणे, त्या निरिक्षणाच्या कसोटीवर पारखून घेणे, आणि पारख़ून टिकलेल्या थियर्‍यांना नव्या निरिक्षणांची जोड देउन ज्ञानाच्या कक्षा वाढवीत रहणे हा वैज्ञानिकांचा आवडीचा उद्योग आहे असे दिसते. किंबहुना सर्व शास्त्रे याच भरभक्कम पायावर उभी अाहेत म्हणूनच मानवाजातीने गेल्या काही शतकात विस्मयचकीत करून टाकणारी प्रगती केली अाहे.

सूर्यमालेची मांडणी पाहिल्यास बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून अश क्रमाने ग्रहांच्या कक्षा आहेत. प्लुटो अजून आहे तिथेच आहे, पण आता त्याची गणती ग्रहात केली जात नाही. ढोबळमानाने पाहिलं तरं या ग्रहांमधील अंतर चढत्या श्रेणीत आहे असं दिसतं. बोड आणि टिशियस या दोन वैज्ञानिकांनी अठराव्या शतकात एक फोर्म्युला बनवला (तेंव्हा शनिपर्यंतचेच ग्रह माहिती होते). पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर दहा असे मानले तर इतर ग्रहाचे अंतर त्या फॉर्मुल्यातून काढता येत होते. ही झाली थियरी, तिच्याकडे तेंव्हा कोणी फारसं लक्ष दिलं नाही. पण जेंव्हा युरेनसचा शोध हर्शलने लावला तेंव्हा असे लक्षात आले की युरेनसचे सूर्यापासूनचे अंतर त्या फॉर्मुल्या प्रमाणेच होते. विज्ञानात कोणतीही थियरी मान्य होण्यासाठी प्रथम तिने माहित असलेले प्रश्न सोडवले पाहिजेत. पण तेवढ्यानेच ती थियरी सिध्द होत नाही. त्यासाठी पुढची कठीण कसोटी म्हणजे त्या थियरीने माहित नसलेले प्रश्न देखील सोडविले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात भविष्य वर्तविले पाहिजे. बोडच्या थियरीने या दोन्ही पायर्‍या पार केल्या होत्या म्हणून तिचा भाव एकदम वधारला. ग्रहांमधील अंतरे पाहाताना असे दिसते की मंगळ आणि गुरू यांच्यामधे बरेच जास्त अंतर आहे. बोडने मग भविष्य वर्तविले की त्या मधल्या जागेत ग्रह सापडायला हवा. त्यानुसार शोध घेताना १८०१ साली एक ग्रह सापडला, सिरस (ceres) असे त्याचे नाव ठेवले. परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही, कारण सिरस आकाराने फारच लहान होता आणि त्याच जवळपास आणखीही छोटे छोटे ग्रहखंड सापडू लागले. लवकरच असे लक्षात अाले की इथे असे हजारो दगड अाहेत. मग त्यांना एकत्रितपणे अॅस्टेरॉइडस् अशी संज्ञा दिली गेली. ग्रह सापडायला हवा होता पण दगड सापडले, मग हे दगड कोठून अाले? इथेच का अाले? म्हणून नवीन थियरी, ग्रह होता पण तो फुटला, त्याचे हे तुकडे अाहेत. हे तुकडे कसे झाले? द्या उत्तर. नवी थियरी, कोठूनतरी एक दुसरा ग्रह अाला, याची अन त्याची टक्कर झाली, झाले तुकडे. असं काय? मग ते तुकडे इथेच का राहिले? दुसरीकडे का नाहि गेले? आणि हा दुसरा ग्रह कुठून अाला? कधी अाला? केवढा होता तो अाकाराने? हे असं चालत राहातं. जो पर्यंत थियरी अाणि निरीक्षणाची सांगड जमते तो पर्यंत ठीक, नाहीतर कोणताही खेद न करता विज्ञान ती थियरी सोडून देतं अाणि नवी स्पष्टीकरणं शोधू पाहातं. बोडच्या नियमाने (law) जरि सिरस आणि युरेनसची कक्षा बरोबर वर्तवली असली तरी जेंव्हा नेपच्यूनचा शोध लागला तेंव्हा हा नियम लागू पडला नाही. त्यानंतर बोडचा नियम मागे पडला.

पण चुकीचा असला तरी त्या नियमाच्या आधाराने सिरसच आणि इतर अॅस्टेरॉइड्सचा शोध तर लागला होता. सध्या या संदर्भात असं सर्वसाधारणपणे मानलं जातं की इथे ग्रह कधी बनूच शकला नाही. पृथ्वी, शुक्र, मंगळ जसे अनेक छोटे अश्मखंड एकत्र येऊन निर्माण झाले ती प्रक्रीया इथे मूळ धरू शकली नाही. आणि याचे कारण गुरू ग्रहाचे प्रचंड गुरुत्वाकर्षण. या दगडांचे ग्रहात रूपांतर होताना त्यांच्या एकमेकांशी होणार्‍या टकरा मंदगतीने होणे आवश्यक होते. परंतु गुरुच्या (अव)कृपेने अशा टकरा उलट अतीवेगाने होत राहील्या आणि त्यामुळे ते एकत्र येण्याऐवजी त्यांचि शकले उडत गेली. सिरस, व्हेस्टा, अशा चार अतिप्रचंड आणि हजारो मध्यम आकाराच्या आणि लक्षावधी छोटे दगड या पट्ट्यात अनंत काळापासून फिरत आहेत. मात्र यांच्या टकरातून उडलेली शकले या पट्ट्याबाहेर भरकटतात आणि पृथ्वी, मंगळ, शुक्र यांच्या कक्षा छेदून भ्रमण करीत रहातात. असं फिरत असताना कधी न कधी पृथ्वीशी गाठ पडते आणि मग होतो अशनीपात. तसा चंद्र बिचारा बरेचसे आघात झेलून आपलं संरक्षण करत असतो, पण त्यालाही चुकवून येतात काही दगड आपल्या दिशेने. मंगळावर आणि चंद्रावर आघात होऊन तिथून उडालेले दगड 'फ्रिलान्सर' बनतात आणि तेही पृथ्वीच्या आकर्षणाने खेचले जाऊन पृथ्वीवर येतात.

आपल्या महाराष्ट्रात लोणार येथे जे प्रसिध्द विवर आहे ते अशाच एक चांद्रपाषाणाच्या आघाताने निर्माण झाले असण्याची दाट शक्यता आहे. कारण तिथे चंद्रावर सापडणारी काही मिनरल्स सापडलेली आहेत. बसाल्ट दगडात निर्माण झालेले ते पृथ्वीवरचे या प्रकारचे सर्वात मोठे विवर आहे. पण या सार्‍या गोष्टीशी महाराष्ट्राचा आणखीही पुरातन संबंध आहे. मेहिकोत झालेल्या अशनीपातामुले डायनॉसॉर्स नष्ट पावले हे जरी आता सर्वमान्य असलं तरी त्याआधीची थियरी अशी होती की डेक्कन ट्रॅप्समुळे वातवरणात जे बदल झाले त्यामुळे त्यांचा विनाश झाला. होय, डेक्कन ट्रॅप्स म्हणजे आपले दक्खन. अंदाजे साठ ते अडुसष्ठ दशलक्ष वर्षांपूर्वी आज जिथे महाराष्ट्र आहे तिथे ज्वालामुखी कार्यरत झाले. कार्यरत झाले म्हणजे अगदी निवडणुका जवळ आल्यावर राजकारणी नेते होतात तसे कार्यरत झाले. सुमारे तीस हजार वर्षे भडकत राहून अर्धा भारतदेश भरेल एवढा लावा ओकून मग ते शांत झाले. त्या सगळ्या भानगडीत प्रचंडप्रमाणात सल्फर डायअॉक्साईड अाणि तसलेच विषारी वायू वातावरणात फेकले गेले. परिणामी डायनॉसॉर्सचे साम्राज्य बुडाले. साम्राज्य बुडविण्याचे गुण या मातीतच अाहेत म्हणायचे. 'राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा ..' या अोळी सर्वार्थाने खऱ्या अाहेत हे पटते. अाता जरी ही थियरी मागे पडली असली तरी, डेक्कन ट्रॅप्सची निर्मिती ही घटना मात्र खरोखरच घडलेली अाहे.

तर अशी ओळख आहे अॅस्टेरॉइड्सची. सूर्यमालेतले सूर्याभोवती भ्रमण करणारे लहान मोठ्या आकाराचे दगड. हजारो, लाखो, कोट्यावधी दगड. यापैकी जे पृथ्वीच्या कक्षेला छेदून जाणारे आहेत अशांना 'नीअर अर्थ ऑब्जेक्टस' अशी संज्ञा आहे. ही मंडळी कधी ना कधी गडबड करणार हे लक्षात आल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून त्यांचा वेध घेउन त्यांच्यावर लक्ष ठेवायला सुरूवात झालेली आहे. DA14 हा त्यातला लहान असा दगड (फक्त १५० फूट लांबीचा). इतका छोटा असूनही त्याचा वेध घेउन त्याची कक्षा अचूकपणे ठरविणे हा विज्ञानाचा मोठाच विजय म्हणावा लागेल. डायनॉसॉर्सनी २०० दशलक्ष वर्षे सत्ता भोगली, पण त्यांचा काळ आला तेंव्हा ते काही करू शकले नाहीत. त्यांची तशी क्षमताच नव्हती. आपण मानवप्राणी काल आलेलो (३ दशलक्ष वर्षांपूर्वी) पण आपण एवढी प्रगती केलेली आहे की हे संकट काय आहे ते आपल्याला समजलेले आहे. ते कधी, कसे, कुठे येइल याची थोडीतरी पूर्वसूचना मिळेल अशी परिस्थिती आज आहे. प्रश्न असा आहे की जरी पूर्वसूचना मिळाली तरी हे गंडांतर टाळणे आपल्याला शक्य होइल का? DA14 नुसतच जवळून गेला पृथ्वीच्या. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने त्याची कक्षा आता बदलली आहे. आणखी सात वर्षांनंतर तो परतभेटीसाठी येणार आहे. परंतु तेंव्हाही धोका नाही अस वैज्ञानिकांचा निष्कर्ष आहे. DA14 च्या पुढच्या शंभर वर्षांच्या प्रवासाचा नकाशा त्यांच्याकडे तयार आहे. पण असे अजून हजारो खडक आहेत. काही तर अक्राळविक्राळ आहेत. त्यांच्याविषयी आपल्याला पुरेशी माहितीदेखील नाही. त्यांच्यावर डोळा ठेवायला आणि होणार्‍या भावी आपत्ती टाळण्याचे मार्ग शोधण्यात वैज्ञानिक गर्क आहेत. त्यात त्यांना सुयश मिळो अशा सदिच्छा!

उत्तरार्ध

DA14 चे पृथ्वीस्पर्शून जाण्याचा सोहळा नासाच्या कृपेने आणि टिव्ही/इंटरनेटच्या चमत्कारामुळे प्रत्यक्ष पाहात होतो. काळ्या पार्श्वभूमीवर एक पांढरा ठिपका पुढे पुढे सरकत जात होता. तो टिव्हीच्या पडद्याच्या कडेला पोहोचला की दूरदर्शक (टेलेस्कोप) हलवून तो दृष्टिक्षेपात राहील असे पाहीले जात होते. पूर्वीच्या 'खर्‍या' टंकलेखकावर (टाइपरायटर) कोणीतरी टक टक टक असे पूर्णविराम टंकीत बसले असावे तसे. ओळीच्या टोकाला पोहोचल्यावर सर्रकन मागे येवून पुन्हा सुरु. रंग वाळताना पाहाण्यासारखाच चित्तथरारक हा खेळ होता. मधूनच नासाचे शास्त्रज्ञ उद्बोधक माहीती पुरवत होते. अखेर काउंटडाऊन सुरु झाला. दहा, नऊ, आठ, सात ... दोन, एक, शून्य. DA14 पृथ्वीच्या सर्वात नजीक येऊन पुढे मार्गस्थ झाला. टिव्हीवरच्या चित्रात कणभरही फरक पडला नव्हता. पण हा 'मेन इव्हेंट' जरी मिळमिळीत निघाला असला तरी तो दिवस कायमचा स्मरणात राहील अशी धमाल दुसर्याच एका अनपेक्षितपणे आलेल्या अशनीने उडवून दिली. वर उल्लेख केल्याप्रमाणे या दगडानेही रशियामधेच अवतीर्ण होणे पसंत केले. दिवसाढवळ्या आलेल्या या अशनीला चेल्याबिन्स्क (Chelyabinsk meteor) असे नाव आता देण्यात आले आहे. चांगला वीस मीटर आकाराचा असूनही सुदैवाने याचा स्फोट वातावरणाात सुमारे पंचवीस किलोमीटर इतक्या उंचीवर झाल्याने, त्याची झळ जमिनीवर लागली नाही, जीवितहानी झाली नाही. हजारो लोकांनी प्रत्यक्ष आणि लक्षावधी लोकांनी यूट्यूब/ इंटरनेटवर पाहील्यामुळे एकूणच अस्टेरॉईड्स या विषयी जागृती, थोडे भितीदायक कुतुहल जगभर निर्माण झाले आहे. ही चांगली गोष्ट. या अशनीचे इतके व्हिडियो कसे निघाले? भर दुपारच्या वेळी इतके लोक कॅमेरा घेऊन हिंडत का होते? रशियात लोकांना कामधंदा नसतो का? अस प्रश्न साहजिकच पडला. शिवाय यातले बरेच व्हिडियो हे चालत्या वाहनातून काढलेले दिसत होते. ते का? त्याचा खुलासा असा की सध्या रशियात गाडीमधे कायम चालू राहिल असा व्हिडियो कॅमेरा बसवून घेण्याचे फ्याड आलेले आहे. जसे आपल्याकडे गाडीत गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचे आहे, किंवा त्यापूर्वी 'मै तो आरती उतारू रे' असा वाजणारा रिव्हर्स हॉर्न लावण्याचे आले होते तसेच. आणि कारणही तेच. आत्मसंरक्षण अर्थात सेल्फ प्रोटेक्शन! कारण रशियात गाडीचा धक्का लागला असे खोटेच आरोप करून दादागिरी, मारहाण करून पैसे उकळायचे प्रकार जोरात आहेत. म्हणून लोक कॅमेरा बसवून घेतात. ज़रा गुगल करून पहा. हा अशनी पडला ते काहीच नाही असे एकाहून एक रोमांचकारी प्रसंग तुम्हाला पहायला मिळतील.

-------

* प्रिय अमुचा म्हणजे महाराष्ट्र देश हे चाणाक्ष वाचकांच्या (म्ह. अग्रणी नागरिकांच्या (म्ह. senior citizens)) ध्यानात अालेच असेल. ज्यांच्या ध्यानात अाले नसेल ते चाणाक्ष नाहीत असे म्हणण्याचा हेतु नाही. त्यांना कदाचित श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांची ही कविता (अाता महाराष्ट्र गीत) अाठवली नसेल. तरूण पिढीला मात्र शंकर महादेवनने गाइलेले हे गाणे नक्कीच ठाऊक असेल.

** असं तेव्हा वाटत असे अाणि त्याचं कारण अज्ञान अाणि माहितीचा ( इंटरनेटचा) अभाव. कोजागरी पौर्णिमा येते अश्विन महिन्यात, म्हणजे इंग्रजी (सोलर) कॅलेंडरप्रमाणे साधारणपणे अॉक्टोबर/नोव्हेंबर महिन्यात. दरवर्षी ह्याच सुमारास पृथ्वीवर अोरायनीडस् मिटिअर शॉवर्स होत असतात. म्हणजे पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या वार्षिक भ्रमंतीमधे ती ठराविक महिन्यात ती अशा अस्टेरॉइडसच्या ढगातून जात असते. अशावेळी उल्का दिसण्याची जास्त शक्यता असते. ठराविक महिन्यात अाकाशाच्या वेगवेगळ्या भागातून (वेगवेगळ्या नक्षत्रातून) उल्का येत अाहेत असा भास होतो. अॉक्टोबर महिन्यात हा उल्कावर्षाव अोरायन म्हणजे मृगनक्षत्रातून होत असतो. थोडक्यात सांगायचं तर, थोडा अभ्यास अाणि पूर्वतयारी केल्यास उल्का पाहाण्याची इच्छा निश्चित पूर्ण होउ शकते. यासाठी शुक्लपक्षापेक्षा (पौर्णिमा) कृष्णपक्ष जास्त योग्य.

***अशनी हे दगड असल्यामुळे दगडाप्रमाणेच त्यांचा अाकार वेडावाकडा असतो (irregular), ग्रह जसे गोलाकार असतात तसा नसतो. त्यामुळे त्यांच्या अाकाराचे वर्णन करण्यासाठी मोहोरिएवढा किंवा बसएवढा असा तुलनात्मक अाधार घ्यावा लागतो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लेख्........अगदी साध्या सोप्या भाषेत बरयाच किचकट गोष्टी सांगितल्या आहेत...
डेक्कन ट्रेप्स माहित नव्हते....डाय्नॉसऑर्स्चे युग कसे सम्पले ते पाहिले होते डिस्कवरीवर...

लहानपणी शाळेत उल्कापात शिकवत असताना अंड्याला एक प्रश्न पडला होता, असे सहज चालता चालता वरतून वेगाने एखादा दगड येऊन आपल्या डोक्यात तर नाही पडणार ना, अर्थात डोक्याच्या ठिकर्‍या उडणे तर ठरलेलेच, पण जगलो वाचलो तर जवळच्या इमारतीकडे बघून शिव्या घालायचो, किसने पत्थर मारा बे करत.
पण विज्ञानाचे सर म्हणाले, बे अंड्या असे छोटे मोठे दगड पृथ्वीवर पोहोचायच्या आधीच घर्षणाने जळून जातात, तेव्हा जरासे हायसे वाटले. Happy

लेख मस्तच - आवडीचा विषय - अजून वाचायला आवडेल. Happy

उत्कंठावर्धक मथळा, मस्त लेख, सुंदर माहीती. वाचायला सुरू केल्यावर लिहीलेले झेपले, वाचलेले (बरेचसे) कळले आणि (त्यामुळे) आवडले.

वाचल्यावर लक्षात आले की ललितलेखनामार्फत अभ्यासाचे भार्री वाचलेय आपण!
सोप्या मराठीमधे असे अभ्यासपूर्ण लिखाण वाचायला नक्कीच आवडेल!
अजून असेच लेख येऊदेत !

सोप्या मराठीमधे असे अभ्यासपूर्ण लिखाण वाचायला नक्कीच आवडेल!
अजून असेच लेख येऊदेत !>> +१
मस्त माहिती !

छान!
१५ फेब ला रशियात पडलेल्या उल्केचा उल्लेख नाही केला? Chelyabinsk meteor
... the Chelyabinsk meteor is the largest object[20] to have entered Earth's atmosphere since the 1908 Tunguska event and the 1930 Brazilian event,
साधारण २० मी आकाराची उल्का होती असं म्हणातात. शहरी भागात पडल्याने चिक्कार videos मिळालेत.

छान लिहिले आहे Happy

जमल्यास एखाद दुसरे चित्र टाकावे. स्केल्स कळण्याकरता मदत होऊ शकेल.
रच्याकने, पॅनस्टार्स धुमकेतु आता उत्तर गोलार्धातून दिसु लागला आहे.
त्याचे डिटेल्स http://www.maayboli.com/node/17664 वर दिले आहेत.

मंडळी,

प्रतिसादाबद्द्ल मनःपूर्वक आभार.

सॅम यानी चेल्याबिन्स्क बद्दल विचारणा केली. मूळ लेखात अोझरता उल्लेख केला होता. जेंव्हा हा लेख लिहायला घेतला तेंव्हा तो अशनीपात नुकताच झाला होता. अाता 'उत्तरार्ध' म्हणून लेखाशेवटी एक पॅरेग्राफ जोडला अाहे.

aschig यानी चित्र टाकावे अशी सुचना केली. ती योग्यच अाहे. परंतु चित्र म्हटले की कॉपीराईटचा प्रश्न उदभवतो. शिवाय ललितलेख असे स्वरूप न रहाता थोडे जास्त तांत्रिक होइल असे वाटले. मात्र यावर निश्चित विचार करीन.

इतर सर्वांचे परत अाभार. अजून लिहा असे उत्तेजन देउन पश्चात्ताप होण्याची वेळ तुमच्यावर येउ शकेल. 'प्लुटोपुराण' या शीर्षकाचा लेख लवकरच सादर करेन म्हणतोय. २००६ साली प्लुटोची नवग्रहातून हकालपट्टी झाली त्यासंबंधी लिहिले अाहे. तुम्हाला अावडेल असे वाटते.

यावर्षी अशनी बरोबरच धूमकेतुदेखील अापल्यावर मेहेरनजर करणार अाहेत. त्यापैकी aschig यानी उल्लेख केलेला पॅनस्टार्स हा अाताच (मार्चमधे) अाकाशात अाहे. ISON नावाचा धूमकेतु नोव्हेंबरमधे दर्शन देईल. त्याविषयी लिहायला सुरूवात केलेली अाहे. इतरही अनेक मनोरंजक विषय अाहेत. जमेल तसे लिहू.

कौशिक

कौशिक, फोटोसाठी कॉपीराईटचा प्रश्न असल्यास लिंक देता येईल का ते पहावे म्हणजे जिज्ञासूंना अधिक माहिती मिळू शकेल.

> ISON नावाचा धूमकेतु नोव्हेंबरमधे दर्शन देईल. त्याविषयी लिहायला सुरूवात केलेली अाहे. इतरही अनेक मनोरंजक विषय अाहेत. जमेल तसे लिहू.

मस्त. शुभेच्छा.

कौशिक, खूप छान लिहीले आहेत. अगदी ओघवते असे. मजा आली वाचताना.

अवांतरः कॉमेट्स हे बर्फापासून बनलेले असतात तर याचा अर्थ त्यांच्यावर पाण्याचा अंश असतो. म्हणजे मग त्यांच्यावर जीवजंतू पण असू शकतात का? ( अगदी स्टुपिड प्रश्न आहे बहुधा. पण मनात आला म्हणून विचारला )

rmd,

हि शंका नुसती योग्यच नाही तर शास्त्रिय दृष्टिने देखील रास्त आहे. धूमकेतुंवरच्या लेखात सविस्तर लिहिनच, पण तो पर्यंत ही एक लिंक पहा:

http://news.nationalgeographic.com/news/2003/10/1002_031002_cometstudy.html

Pages