संयोजकांचे मनोगत

Submitted by संयोजक on 3 March, 2013 - 23:47
Mabhadi LogoPNG.png
मायबोली.कॉमवर 'मराठी भाषा दिवस' या उपक्रमाचं हे चौथं वर्ष. या मराठी संकेतस्थळावर आपलं नियमित येणं होतं, एरवीच्या जीवनात रोज मराठी बोलणं होतं, तरी हे असे उपक्रम केवळ एक कर्तव्य म्हणून किंवा 'नेमेचि येतो' म्हणून आयोजित केले जात नाहीत. ती एक गरज असते, आपल्या मातृभाषेची. कोणतीही भाषा नुसतीच बोलीभाषा न राहता, तिच्यातून साहित्यनिर्मिती केली गेली, तरच ती समृद्ध होते. एखादी भाषा जितकी जास्त लिहिली जाईल, तितकीच ती वाचली जाईल, बोलली जाईल आणि विविध माध्यमांमधून वापरली जाईल. मराठी या आपल्या भाषेत अनेक स्थित्यंतरं झाली आहेत, अजूनही होत आहेत. सध्याच्या आपल्या वापरातली मराठी भाषा ही बरीचशी इतर भाषेतल्या शब्दांनी आक्रमिली जात आहे. तिचं सौंदर्य हिंदी, इंग्रजी शब्दांच्या रंगरंगोटीनं लपत, हरवत चाललं आहे. मराठीचं अभिजात सौंदर्य आपल्या तसंच पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचत राहावं, भाषेतला गोडवा टिकून राहावा, ती आग्रहपूर्वक बोलली जावी, तिच्यामधूनही विचार केला जावा ,या जाणिवा 'मराठी भाषा दिवस'सारख्या उपक्रमांमुळे जागृत होतात.

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती २७ फेब्रुवारी रोजी असते. त्या दिवसाचं औचित्य साधून, केवळ तो दिवसच नव्हे, तर तो संपूर्ण आठवडा आपण मायबोलीवर साजरा करतो, मराठी आठवडा म्हणून. मायबोली.कॉमवर या ना त्या निमित्तानं संपूर्ण वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवले जात असतात. दर वर्षी प्रत्येक उपक्रमामध्ये नावीन्य आणि वैविध्य आणणं ही त्या त्या उपक्रमाच्या संयोजकांची कसोटी असते. परंतु, नवीन-जुने संयोजक असा संगम झाला, की आपोआपच विविध विचारांना धुमारे फुटतात आणि नवनवीन कल्पना जन्म घेतात. हाच अनुभव आम्हीही यंदा घेतला. उपक्रम आणि खेळ कोणते असावेत यावर भरपूर चर्चा होऊन अंतिम यादी तयार झाली.

'पत्रलेखन' हा प्रकारच केवळ पाठ्यपुस्तकांपुरता मर्यादित राहिला आहे, म्हणून मुद्दामच लहान मुलांच्या पत्रलेखनाचा उपक्रम घेतला. या उपक्रमाला प्रचंड यश मिळालं. महाराष्ट्राबाहेर, परदेशात राहणार्‍या अनेक लहान मुलांनी बहुधा पहिल्यांदाच मराठीत आजी-आजोबांना पत्र लिहिलं असेल. परदेशातून या उपक्रमाला नक्की कसा प्रतिसाद मिळेल याबद्दल मायबोलीकर साशंक होते. मात्र एकूण आलेल्या अठ्ठावीस प्रवेशिकांपैकी पंधरा प्रवेशिका परदेशस्थ मुलांच्या होत्या. इथेच हा उपक्रम आमच्या दृष्टीनं सफल झाला.

लहान मुलांचे चिमखडे बोल ऐकणं हा नेहमीच एक आनंददायक अनुभव असतो. एरवी एकेकटी असताना लहान मुलं 'अरे / अगं गप्!' म्हणायची वेळ आणतील, पण कोणासमोर गाणं म्हण म्हटलं की झालं... अशी बर्‍याच पालकांची लाडीक तक्रार असते, त्याला अनुसरून कार्यक्रमाचं शीर्षक 'बोल बच्चन बोल!' असं ठरवलं. या कार्यक्रमाला खूप छान प्रतिसाद मिळाला. सगळ्यांचे बच्चन इतके बोलते झाले की बडबडगीतांची गाडी बालकविता आणि त्याहीपुढे जाऊन 'जनगणमन' या राष्ट्रगीतावार जाऊन थांबली. बालकविता सादर करण्यासाठी परवानगीचा प्रश्न उद्भवला, परंतु मायबोली प्रशासनानं सादरकर्ते आणि मायबोलीसाठी सर्व संबंधितांची परवानगी मिळवली. ’बोल बच्चन बोल’ या कार्यक्रमात कविता सादर करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल श्री. मंगेश पाडगावकर, श्री. संदीप खरे, श्री. कांतिलाल ओस्वाल (फाउंटन म्युझिक कंपनी), श्रीमती अस्मिता मोहिते (पॉप्युलर प्रकाशन, मुंबई) यांचे मन:पूर्वक आभार. मायबोली.कॉम या संकेतस्थळाची विश्वासार्हता अशी आहे, की इथे अनेक सदस्य आपल्या कुटुंबासहित सामील होतात. लहान मुलांचे कार्यक्रम हे याच विश्वासाचं एक रूप आहे.

मायबोलीवर चित्रपट आणि साहित्याविषयी खूप लिहिलं जात असतं. परंतु, त्यातलं बरंचसं लेखन संपूर्ण कलाकृतीविषयी असतं. मराठी नाटक आणि बालचित्रपटांबद्दल त्यामानानं कमी लिहिलं जातं. या सगळ्याचा विचार करून वैचारिक लेखनासाठी विषय निवडण्यात आले. वैचारिक लेखनासाठी कमी लेख आले, पण ते विचारपूर्वक लिहिलेले आणि सच्चे होते. पण एकूणात 'वैचारिक लेखन' या प्रकारासाठी आपण होऊन लिहिणारे सदस्य कमी असतात, असं वाटलं. त्या मानाने 'गंमत खेळां'मध्ये मात्र मायबोलीकर रमले. सर्व खेळ हे मराठी भाषेशीच निगडित होते. त्या खेळांना इतका चांगला प्रतिसाद मिळाला हे आमच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहे.

संयोजकांतर्फे 'परदेशातली मराठी शाळा' आणि 'मराठी शाळेतले मराठी शिक्षक' या विषयावरचे दोन लेख प्रकाशित करण्यात आले. तसंच मायबोलीतर्फे इंदिरा संत यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांची ओळख करून देणारे विशेष लेख प्रकाशित करण्यात आले. ’ललित’ मासिकात प्रकाशित झालेले लेख मायबोलीवर पुनर्मुद्रित करण्यास परवानगी दिल्याबद्दल श्री. अशोक कोठावळे (मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई) यांचे आभार. या लेखांमधल्या व प्रस्तावनांमधल्या कविता मायबोलीवर प्रकाशित करण्यास परवानगी दिल्याबद्दल श्रीमती वीणा संत व पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, यांचे आभार. इंदिरा संत यांच्यावर खास लेख मायबोलीवर प्रकाशित करण्यासाठी लिहून दिल्याबद्दल डॉ. आसावरी संत यांचे खास आभार. परंतु या सर्वच लेखांना तुलनेनं कमी प्रतिसाद मिळाले, याची थोडी खंत वाटली.

या उपक्रमात 'रावणविरचित शिवतांडव स्तोत्राचा मराठी अनुवाद' आणि त्याचं सुरेल सादरीकरण नरेन्द्र गोळे आणि योग या सदस्यांमुळे समाविष्ट करता आले. पारंपरिक संस्कृत स्तोत्राचा चपखल मराठी अनुवाद हेच मुळात एक शिवधनुष्य आहे. ते गोळेकाकांनी समर्थपणे पेललं. योगमुळे स्तोत्राला एक 'गेय रूप' आलं. या दोघांना संयोजकांतर्फे शुभेच्छा.

आमच्या शंभर शब्दांचं काम नीलू आणि डॅफोडिल्सच्या एकाहून एक सरस अशा सुंदर चित्रांनी केलं. नीलू तिच्या वैयक्तिक कामामध्ये कमालीची व्यग्र असूनही तिनं 'मराठी भाषा दिवस, २०१३'चा अप्रतिम असा 'लोगो' तयार केला. (हा लोगो इतका चित्ताकर्षक होता, की त्याचा वापर एका आघाडीच्या वृत्तपत्रानं सरळ, बिनापरवानगी केला!). या वर्षी सहभागी सर्व कलाकारांना प्रशस्तीपत्रं द्यायच्या संयोजकांच्या कल्पनेला नीलूनं अंतिम स्वरूप दिलं. किमान त्या प्रशस्तीपत्रासाठीतरी भाग घ्यायला हवा होता, असं नक्कीच काही छोट्यांना वाटून गेलं असेल. डॅफोडिल्सनं कार्यक्रमांच्या जाहिराती आणि तिनं स्वहस्ते केलेला 'खाऊ' आम्हांला प्रताधिकारमुक्त करून वाटायला दिला. या दोघींचेही आभार जितके मानू तितके कमीच. तसंच, मायबोलीकरांनी हल्लाबोल करून बक्षीसरूपी खाऊवर ताव मारायला सुरूवात केल्यानंतर आपणहोऊन नवीन खाऊ पुरवल्याबद्दल सिंडरेलाचे खास आभार. तसंच इशिकाच्या अतिशय सुरेख चित्राचं पोस्टर आम्हांला मिळालं, त्याबद्दल तिचे खास आभार आणि खूप कौतुक.

'संयोजक' या आयडीमागे उपक्रमातील स्वयंसेवकांची फळी काम करत असते. तशीच अजून एक भक्कम फळी पडद्यामागेही कार्यरत असते. इंदिरा संतांविषयीचे विशेष लेख टंकलिखित करण्यात अश्विनी के यांची मदत झाली. संयोजकांतर्फे आलेल्या सर्व लेखांची शुद्धलेखनचिकित्सा चिनूक्स यांनी केली.

अॅडमिन यांच्याशिवाय कोणताही उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही. त्यांचा सक्रिय सहभाग आणि मोलाच्या सूचना याही कार्यक्रमाला लाभल्या. असे अनेक उपक्रम त्यांच्या पाठिंब्यामुळे यशस्वी होतील अशी खात्री आहे.

यावेळेचा संयोजक चमू हा शब्दशः जुने-नवीन यांचा संगम होता. एकमेकांच्या सामंजस्यामुळे आणि मदतीमुळेच हा उपक्रम साजरा करू शकलो. उपक्रमादरम्यान काही कमी-जास्त झालं असल्यास ते मोठ्या मनानं माफ करावं आणि पुढच्या उपक्रमांसाठी नव्या उत्साहानं सज्ज व्हावं, अशी समस्त मायबोलीकरांना विनंती.

सरतेशेवटी, उपक्रमाची सांगता अथर्वच्या 'जन गण मन'नं करत आहोत.





आपले,
संयोजक मंडळ
मराठी भाषा दिवस, २०१३
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व संयोजकांचे व संबंधितांचे सर्व उपक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल अभिनंदन आणि आभार!
खूपच मजा आली विशेषतः गंमत खेळ खेळताना...

फक्त एक सांगावेसे वाटते की स्पर्धा जाहीर केल्यानंतर प्रवेशिका दाखल करायच्या दिवसांमधला कालावधी खूप कमी होता. हा कालावधी दिवसांत न मोजता विकांतात मोजावा व कमीत कमी ४ विकांत वेळ मिळेल अशा हिशोबाने योजना करावी ही विनंती.

विशेषतः वैचारिक लेख अथवा लहान मुलांकडून तयारी करवून त्याचे सादरीकरण करणे या संदर्भात मला स्वत:ला हा कालावधी फार कमी वाटला ( हे माझे न्युनत्व असू शकते परंतू माझ्यासारखे अजूनही ईतर असतील) असे वाटल्याने इथे गार्‍हाणे मांडत आहे. कृपया पुढील वर्षी याची दखल घेण्यात यावी.

संयोजक,

भाषादिन सप्ताह अतीशय समर्थपणे व यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
माझ्यापुरते 'गडबडगुंता' सर्वात अधिक 'हीट' आहे Happy

>>इंदिरा संत यांच्यावर खास लेख मायबोलीवर प्रकाशित करण्यासाठी लिहून दिल्याबद्दल डॉ. आसावरी संत यांचे खास आभार. परंतु या सर्वच लेखांना तुलनेनं कमी प्रतिसाद मिळाले, याची थोडी खंत वाटली.

अजूनही अनेक सदस्य (माझ्या सकट) भाषादिना मधिल अनेक लेख, प्रवेशिका ई. वाचत असावेत हेच याचे कारण असावे.. याही वेळी भरपूर मटेरियल असल्याने सर्वांचे सर्व वाचून झाले नसावे असे वाटते.

अरे वा मस्त. अथर्व क्युट Happy
संयोजक, जरा त्या नावात काय... नी म्हणींमागे डोकी कोणी चालवली सांगाल काय? अफलातुन झाले ते बाफ. ते बाफ म्हणजे कोन कितने पानी में होते. त्यामुळी मीतर किनारी बसुन फक्त लाटा पाहिल्या Wink
हो त्यावर उत्तरे देणार्‍या सर्वांना (अगदी चुकलेल्या उत्तरांसाठी पण) सा.न. ____________/\_________

खूपच छान उपक्रम होते यंदाचे. मभादि की मभाआ अगदी दणक्यात पार पाडला. सगळ्या संयोजकांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. रंजक खेळांनी मजा आणली आणि त्यामागची तुमची मेहनत अगदी दिसून येत होती. बक्षिसांचीही लयलूट केलीत. लेख, विशेष लेख, पत्रं आणि चिमखडे बोल अजून सगळे वाचून ऐकून झाले नाहीयेत .. पण ते ही उपक्रम मस्त झालेत.

उपक्रमातले सर्वच लेख दर्जेदार होते,वाचण्याचा आनंद घेतला.संयोजकांचे या सर्व कष्टांबद्दल आभार व अभिवादन. लोगो,प्रशस्तीपत्रकांची कल्पना आवडली.

लोगो, प्रशस्तीपत्रकांची कल्पना आवडली. >>> भारती +१

लोगो तर केवळ अप्रतिम आहे. (स्वारी हां आधी सांगायचं राहिलं त्याबद्दल!)

संयोजकांचे मनःपूर्वक आभार!! Happy

अजून बर्‍याच प्रवेशिका वाचायच्या, ऐकायच्या आहेत. खेळांच्या बाफावर या वेळी डोकावायला जमले नाही म्हणून थोडे वाईट वाटले. तिथे नेहमीप्रमाणेच धम्माल आलेली असणार! Happy

मराठी भाषा दिन उपक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सर्व संयोजकांचे मनापासून अभिनंदन .)

पत्रलेखन आणि बोल बच्चन नेहमीप्रमाणेच मस्त होते. मजा आली सगळी गोड्गोड पत्रं वाचताना Happy
पण सगळ्यात जास्त मजा यावेळचे खेळ खेळताना आली. सगळेच खेळ नाविन्यपूर्ण होते.
'गडबडगुंता'मध्ये फकत वाचनमात्र सहभाग घेतला गेला, पण एकसे एक म्हणी नव्याने कळल्या. Happy

परत एकदा संयोजकांचे आभार. Happy

संयोजकांचे मनापासून आभार, इतका मस्त कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल! Happy

अजूनही मी वाचतेय बरंच. खूप खूप वैविध्य असलेले लेख, मनोरंजक खेळ, डोक्याला शॉट देणारी 'नावात काय आहे' सारखी धमाल...
मला सहभाग घेता आला नाही, पण तरी वाटतंय की खूप भरभरून दिलंत! Happy

आणि प्रशस्तिपत्रकं, खाऊ, इतर बक्षिसं यांची लूट.. मजा आली खूप!

हा सगळा आठवडा मस्त एंजॉय करता आला, अजूनही करतेच आहे, त्याबद्दल पुन्हा आभार! Happy

संयोजक, छान झाला कार्यक्रम.

माझेही अजून बरेच पाहून व्हायचे आहे..
प्रशस्तीपत्रांची (आणि त्याही इतक्या देखण्या) कल्पना आवडली.

नीलू, तुझा लोगो भारी-सुरेख-साजेसा-देखणा झालाय!

अभिनंदन संयोजक आणि आभार. Happy
काही गोष्टी फार आवडल्या आणि काही नाही आवडल्या. ओव्हरऑल छान.
म्हणी वाचून अवाक झाले. अमेझिंग संग्रह

संयोजक,

१. चपखल खेळ इन्टरेस्टींग... नाही नाही..रोचक होता. Happy

२. ग खे ब जा ड य ता ळा ला णि गुं वा य ला म चा आ ड ली आ.

३.
mbd1.JPGmdb2.jpgmbd3.JPGmbd4.jpgmbd5.jpgmbd.jpg

ग खे ब जा ड य ता ळा ला णि गुं वा चा य ला म आ ड ली आ.

गडबडगुंता खेळायला आणि वाचायला मला आली.
(HH, गडबडगुंता दिसला आणि न राहवून की शब्द जुळवायचा चाळा केला.. :फिदी:)

अरे हो.. मभादि चा लोगो मात्र अगदी खासच!- नीलू यांचे अभिनंदन!
[हाच लोगो पुढील सर्व मभादिं साठी वापरावा वर्ष बदलून अर्थातच!]

आता बाकी

मभादिचा लोगो आवडला, पुढील काही वर्षे वापरता येईल.
मायबोलेकरांना दिलेले प्रशस्तीपत्रक मस्त!
मभादि निमीत्त स्पेशल गोळा केलेले मान्यवरांचे लेख वाचायला मलातरी कंटाळवाणे वाटले.
सर्वच लहानमुलांनी आजीअजोबांना लिहिलेली लहानशी पत्रे फार गोड आहेत. बोल बच्चन बोल अजून ऐकलेले नाही.

मजा आली. मभादि उपक्रमासाठी झटलेल्या सर्वांचेच हार्दिक आभार.
लोगो, प्रशस्तीपत्रकं फार आवडली. त्यासाठी नीलूताईचे विशेष आभार.
पत्रं सगळीच गोड आहेत. मोठ्यांचे लेखही आवडले तिथे अभिप्राय दिले आहेत.
बोलबच्चन मलाही अजून ऐकायला झालेलं नाही.
मान्यवरांपैकी संतांचाच लेख वाचला आणि आवडला. एकूण अजून बरंच वाचायचं/ऐकायचं बाकी आहे.

खेळांतले काही प्रश्न तर काही निकाल आश्चर्यकारक वाटले. परंतु मराठीचा / मराठीतून विचार करायला भाग पाडणे हा उद्देश सफल झाला.

मभादि संयोजक मंडळाचं अभिनंदन. कार्यकरम छान झाला. बोल बच्चन बोल आण सानविविमध्ये सहभागी मुलांचं कौतुक करावं तेवढं थोडचं. त्यांच्यामुळे कार्यक्रमाची लज्जत वाढली.
चपखल टाईमपास होता. गडबडगुंता छान होता पण त्यातल्या म्हणी माझ्या ओळखीच्या नसल्याने सहभागी होता आलं नाही. नावात काय आहे मला अजिबातच आपलासा वाटला नाही.
बाकी लेखांमध्ये फक्त इंदिरा संत व्यवस्थित वाचून झाला आणि आवडला.

मला यावेळचा मभादि अत्यंत आवडला.
(हे मी आत्तापर्यंत जमेल तेव्हा जमेल तिथे लिहिले आहे इतका आवडला.)

प्रशस्तिपत्रके, रिक्षा, लोगो सगळीच मस्त आहेत. गडबडगुंता एकदम भारी होता. खेळायला मजा आली. एकूण उपक्रम एकदम मस्त झाला. अभिनंदन मंडळाचे Happy

मभादी अगदी मस्त झाला. संयोजकांचं अभिनंदन.
बोबबो अजून ऐकणं झालं नाही, पण पत्रं वाचली. फार निरागस आणि सुंदर! अत्त्त्त्त्त्तिशय आवडली. पत्रांचा उपक्रम खूप आवडला. बाकी लेख अजून वाचणं सुरु आहे. चपखल/गडबडगुंता आवडले.

Pages