संयोजकांचे मनोगत

Submitted by संयोजक on 3 March, 2013 - 23:47
Mabhadi LogoPNG.png
मायबोली.कॉमवर 'मराठी भाषा दिवस' या उपक्रमाचं हे चौथं वर्ष. या मराठी संकेतस्थळावर आपलं नियमित येणं होतं, एरवीच्या जीवनात रोज मराठी बोलणं होतं, तरी हे असे उपक्रम केवळ एक कर्तव्य म्हणून किंवा 'नेमेचि येतो' म्हणून आयोजित केले जात नाहीत. ती एक गरज असते, आपल्या मातृभाषेची. कोणतीही भाषा नुसतीच बोलीभाषा न राहता, तिच्यातून साहित्यनिर्मिती केली गेली, तरच ती समृद्ध होते. एखादी भाषा जितकी जास्त लिहिली जाईल, तितकीच ती वाचली जाईल, बोलली जाईल आणि विविध माध्यमांमधून वापरली जाईल. मराठी या आपल्या भाषेत अनेक स्थित्यंतरं झाली आहेत, अजूनही होत आहेत. सध्याच्या आपल्या वापरातली मराठी भाषा ही बरीचशी इतर भाषेतल्या शब्दांनी आक्रमिली जात आहे. तिचं सौंदर्य हिंदी, इंग्रजी शब्दांच्या रंगरंगोटीनं लपत, हरवत चाललं आहे. मराठीचं अभिजात सौंदर्य आपल्या तसंच पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचत राहावं, भाषेतला गोडवा टिकून राहावा, ती आग्रहपूर्वक बोलली जावी, तिच्यामधूनही विचार केला जावा ,या जाणिवा 'मराठी भाषा दिवस'सारख्या उपक्रमांमुळे जागृत होतात.

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती २७ फेब्रुवारी रोजी असते. त्या दिवसाचं औचित्य साधून, केवळ तो दिवसच नव्हे, तर तो संपूर्ण आठवडा आपण मायबोलीवर साजरा करतो, मराठी आठवडा म्हणून. मायबोली.कॉमवर या ना त्या निमित्तानं संपूर्ण वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवले जात असतात. दर वर्षी प्रत्येक उपक्रमामध्ये नावीन्य आणि वैविध्य आणणं ही त्या त्या उपक्रमाच्या संयोजकांची कसोटी असते. परंतु, नवीन-जुने संयोजक असा संगम झाला, की आपोआपच विविध विचारांना धुमारे फुटतात आणि नवनवीन कल्पना जन्म घेतात. हाच अनुभव आम्हीही यंदा घेतला. उपक्रम आणि खेळ कोणते असावेत यावर भरपूर चर्चा होऊन अंतिम यादी तयार झाली.

'पत्रलेखन' हा प्रकारच केवळ पाठ्यपुस्तकांपुरता मर्यादित राहिला आहे, म्हणून मुद्दामच लहान मुलांच्या पत्रलेखनाचा उपक्रम घेतला. या उपक्रमाला प्रचंड यश मिळालं. महाराष्ट्राबाहेर, परदेशात राहणार्‍या अनेक लहान मुलांनी बहुधा पहिल्यांदाच मराठीत आजी-आजोबांना पत्र लिहिलं असेल. परदेशातून या उपक्रमाला नक्की कसा प्रतिसाद मिळेल याबद्दल मायबोलीकर साशंक होते. मात्र एकूण आलेल्या अठ्ठावीस प्रवेशिकांपैकी पंधरा प्रवेशिका परदेशस्थ मुलांच्या होत्या. इथेच हा उपक्रम आमच्या दृष्टीनं सफल झाला.

लहान मुलांचे चिमखडे बोल ऐकणं हा नेहमीच एक आनंददायक अनुभव असतो. एरवी एकेकटी असताना लहान मुलं 'अरे / अगं गप्!' म्हणायची वेळ आणतील, पण कोणासमोर गाणं म्हण म्हटलं की झालं... अशी बर्‍याच पालकांची लाडीक तक्रार असते, त्याला अनुसरून कार्यक्रमाचं शीर्षक 'बोल बच्चन बोल!' असं ठरवलं. या कार्यक्रमाला खूप छान प्रतिसाद मिळाला. सगळ्यांचे बच्चन इतके बोलते झाले की बडबडगीतांची गाडी बालकविता आणि त्याहीपुढे जाऊन 'जनगणमन' या राष्ट्रगीतावार जाऊन थांबली. बालकविता सादर करण्यासाठी परवानगीचा प्रश्न उद्भवला, परंतु मायबोली प्रशासनानं सादरकर्ते आणि मायबोलीसाठी सर्व संबंधितांची परवानगी मिळवली. ’बोल बच्चन बोल’ या कार्यक्रमात कविता सादर करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल श्री. मंगेश पाडगावकर, श्री. संदीप खरे, श्री. कांतिलाल ओस्वाल (फाउंटन म्युझिक कंपनी), श्रीमती अस्मिता मोहिते (पॉप्युलर प्रकाशन, मुंबई) यांचे मन:पूर्वक आभार. मायबोली.कॉम या संकेतस्थळाची विश्वासार्हता अशी आहे, की इथे अनेक सदस्य आपल्या कुटुंबासहित सामील होतात. लहान मुलांचे कार्यक्रम हे याच विश्वासाचं एक रूप आहे.

मायबोलीवर चित्रपट आणि साहित्याविषयी खूप लिहिलं जात असतं. परंतु, त्यातलं बरंचसं लेखन संपूर्ण कलाकृतीविषयी असतं. मराठी नाटक आणि बालचित्रपटांबद्दल त्यामानानं कमी लिहिलं जातं. या सगळ्याचा विचार करून वैचारिक लेखनासाठी विषय निवडण्यात आले. वैचारिक लेखनासाठी कमी लेख आले, पण ते विचारपूर्वक लिहिलेले आणि सच्चे होते. पण एकूणात 'वैचारिक लेखन' या प्रकारासाठी आपण होऊन लिहिणारे सदस्य कमी असतात, असं वाटलं. त्या मानाने 'गंमत खेळां'मध्ये मात्र मायबोलीकर रमले. सर्व खेळ हे मराठी भाषेशीच निगडित होते. त्या खेळांना इतका चांगला प्रतिसाद मिळाला हे आमच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहे.

संयोजकांतर्फे 'परदेशातली मराठी शाळा' आणि 'मराठी शाळेतले मराठी शिक्षक' या विषयावरचे दोन लेख प्रकाशित करण्यात आले. तसंच मायबोलीतर्फे इंदिरा संत यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांची ओळख करून देणारे विशेष लेख प्रकाशित करण्यात आले. ’ललित’ मासिकात प्रकाशित झालेले लेख मायबोलीवर पुनर्मुद्रित करण्यास परवानगी दिल्याबद्दल श्री. अशोक कोठावळे (मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई) यांचे आभार. या लेखांमधल्या व प्रस्तावनांमधल्या कविता मायबोलीवर प्रकाशित करण्यास परवानगी दिल्याबद्दल श्रीमती वीणा संत व पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, यांचे आभार. इंदिरा संत यांच्यावर खास लेख मायबोलीवर प्रकाशित करण्यासाठी लिहून दिल्याबद्दल डॉ. आसावरी संत यांचे खास आभार. परंतु या सर्वच लेखांना तुलनेनं कमी प्रतिसाद मिळाले, याची थोडी खंत वाटली.

या उपक्रमात 'रावणविरचित शिवतांडव स्तोत्राचा मराठी अनुवाद' आणि त्याचं सुरेल सादरीकरण नरेन्द्र गोळे आणि योग या सदस्यांमुळे समाविष्ट करता आले. पारंपरिक संस्कृत स्तोत्राचा चपखल मराठी अनुवाद हेच मुळात एक शिवधनुष्य आहे. ते गोळेकाकांनी समर्थपणे पेललं. योगमुळे स्तोत्राला एक 'गेय रूप' आलं. या दोघांना संयोजकांतर्फे शुभेच्छा.

आमच्या शंभर शब्दांचं काम नीलू आणि डॅफोडिल्सच्या एकाहून एक सरस अशा सुंदर चित्रांनी केलं. नीलू तिच्या वैयक्तिक कामामध्ये कमालीची व्यग्र असूनही तिनं 'मराठी भाषा दिवस, २०१३'चा अप्रतिम असा 'लोगो' तयार केला. (हा लोगो इतका चित्ताकर्षक होता, की त्याचा वापर एका आघाडीच्या वृत्तपत्रानं सरळ, बिनापरवानगी केला!). या वर्षी सहभागी सर्व कलाकारांना प्रशस्तीपत्रं द्यायच्या संयोजकांच्या कल्पनेला नीलूनं अंतिम स्वरूप दिलं. किमान त्या प्रशस्तीपत्रासाठीतरी भाग घ्यायला हवा होता, असं नक्कीच काही छोट्यांना वाटून गेलं असेल. डॅफोडिल्सनं कार्यक्रमांच्या जाहिराती आणि तिनं स्वहस्ते केलेला 'खाऊ' आम्हांला प्रताधिकारमुक्त करून वाटायला दिला. या दोघींचेही आभार जितके मानू तितके कमीच. तसंच, मायबोलीकरांनी हल्लाबोल करून बक्षीसरूपी खाऊवर ताव मारायला सुरूवात केल्यानंतर आपणहोऊन नवीन खाऊ पुरवल्याबद्दल सिंडरेलाचे खास आभार. तसंच इशिकाच्या अतिशय सुरेख चित्राचं पोस्टर आम्हांला मिळालं, त्याबद्दल तिचे खास आभार आणि खूप कौतुक.

'संयोजक' या आयडीमागे उपक्रमातील स्वयंसेवकांची फळी काम करत असते. तशीच अजून एक भक्कम फळी पडद्यामागेही कार्यरत असते. इंदिरा संतांविषयीचे विशेष लेख टंकलिखित करण्यात अश्विनी के यांची मदत झाली. संयोजकांतर्फे आलेल्या सर्व लेखांची शुद्धलेखनचिकित्सा चिनूक्स यांनी केली.

अॅडमिन यांच्याशिवाय कोणताही उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही. त्यांचा सक्रिय सहभाग आणि मोलाच्या सूचना याही कार्यक्रमाला लाभल्या. असे अनेक उपक्रम त्यांच्या पाठिंब्यामुळे यशस्वी होतील अशी खात्री आहे.

यावेळेचा संयोजक चमू हा शब्दशः जुने-नवीन यांचा संगम होता. एकमेकांच्या सामंजस्यामुळे आणि मदतीमुळेच हा उपक्रम साजरा करू शकलो. उपक्रमादरम्यान काही कमी-जास्त झालं असल्यास ते मोठ्या मनानं माफ करावं आणि पुढच्या उपक्रमांसाठी नव्या उत्साहानं सज्ज व्हावं, अशी समस्त मायबोलीकरांना विनंती.

सरतेशेवटी, उपक्रमाची सांगता अथर्वच्या 'जन गण मन'नं करत आहोत.





आपले,
संयोजक मंडळ
मराठी भाषा दिवस, २०१३
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कार्यक्रम अतिशय सुंदर पार पडला. त्यामागचे कष्ट, दिलेला वेळ या सगळ्याकरता संयोजकांचं आणि त्यांना मदत करणार्‍या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन!

मुलांचे कार्यक्रम फार आवडले. ३ वर्षांपूर्वी ज्या बाळांची बडबडगीतं ऐकली होती त्यांच्या आवाजातले, उच्चारातले बदल ऐकताना फार मजा वाटली.

पत्रलेखनपण फारच भारी!

कार्यक्रम अतिशय सुंदर पार पडला. त्यामागचे कष्ट, दिलेला वेळ या सगळ्याकरता संयोजकांचं आणि त्यांना मदत करणार्‍या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन!>>>+१

मराठी भाषा दिन उपक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सर्व संयोजकांचे मनापासून अभिनंदन!
<<या वर्षीचे आयोजन, संकल्पना खुपच सुंदर होत्या> +१

चपखल आवडला, गगुं मला जमला नाही(म्हणीच नाही माहिती तर काय कप्पाळ खेळणार..)
लहान मुले नेहमीच मजा आणतात.
एकंदर छान वाटला...
धन्यवाद!

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेले कार्यक्रम अतिशय सुरेख झाले. छोट्यांचे गोड बोल, पत्रं, मनमोकळं, शिवतांडव स्तोत्राचा संगीतबद्ध अवतार, विशेष लेख आणि गंमतखेळ ह्या सगळ्याच संकल्पना उत्तम होत्या. विशेष लेख आणि मनमोकळं सदरातले सगळे लेख अजून वाचून झाले नाहीयेत. 'ऐक जरा ना' चवीचवीने वाचायचा म्हणून बाजूला ठेवला होता तो वाचायचा मुहूर्त अजूनही लागायचाच आहे.

लोगो फार सुंदर झाला आहे. वर्ष बदलून पुढची काही वर्षं हाच लोगो वापरावा अशी सूचना वर कुणीतरी केलीय त्याला अनुमोदन. ह्या उपक्रमाची ठसठशीत ओळख झालाय हा लोगो.

इतक्या नेटक्या, सुंदर उपक्रमाबद्दल संयोजक, कामात सहभागी झालेले इतर आणि अ‍ॅडमिन ह्यांना धन्यवाद Happy

जाता जाता एक छोटीशी तीट, 'चपखल' मधील बरेच निर्णय पटले नाहीत आणि संयोजकांना नक्की चपखल हवं होतं की चुरचुरीत, चटपटीत हवं होतं, शब्दशः भाषांतर म्हणजे आजकाल जे हिंदीतून मराठीत सुमार भाषांतरांच्या जाहिराती बघतो त्यावर शब्दशः भाषांतरातून टिप्पणी करायची होती की अजून काही त्याबद्दल शेवटपर्यंत संभ्रमात राहिले. सुरुवातीला तसे प्रश्न विचारले होते त्याची उत्तरं मिळाली नाहीत.

'नावात काय आहे' ह्या उपक्रमाची कल्पना सर्वात जास्त आवडली. पण जास्तीतजास्त लोकांना सामावून घेण्याच्या दृष्टीने कोडी अगदी सोपी जरी नाहीत तरी सहज उलगडणारी अशी ठेवायला पाहिजे होती. काही काही कठीण चालली असती ( खास श्रद्धा, चिनूक्ससाठी Happy ) पण बरीच कोडी फारच कठीण, क्लूलेससारखी वाटली.

अर्थात हे गंमतखेळ असल्याने तक्रार करायचं म्हणून लिहित नाहीये. फक्त एक प्रामाणिक मत पोचवायचं इतकाच हेतू त्यामागे आहे. उपक्रमात सहभागी व्हायला, इतर प्रवेशिका बघायला, वाचायला जी मजा आली ती काही औरच होती Happy

सर्वप्रथम संयोजकांचे आणि या उपक्रमात मदत करणार्‍यांचे अभिनंदन आणि आभार Happy

कार्यक्रम खुपच छान झाला. सगळे उपक्रम, खेळ आवडले! लहान मुलांचे कार्यक्रम नेहमीच लज्जत वाढवतात Happy सहभाग घेणार्‍या सगळ्या चिमुकल्यांचे कौतुक Happy

लोगो - एक नंबर! आणि बक्षिसे तर एकदम खासमखासच! Happy

कार्यक्रम अतिशय सुंदर पार पडला. त्यामागचे कष्ट, दिलेला वेळ या सगळ्याकरता संयोजकांचं आणि त्यांना मदत करणार्‍या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन!>>>+१
आणि या लेखात अथर्व च्या 'जन गण मन' चा उल्लेख केल्याबद्दल संयोजकांचे मनापासून आभार!!!

लोकहो, तुमच्या प्रतिसादांबद्द्ल अनेक आभार! अशा प्रतिक्रियांनी निश्चितच हुरुप वाढतो Happy

HH - नावात काय आहे रॉक्स! पण कोड्यात मजा आली नाही. Happy
संयोजकांच्या वतीने -

hh.png

धन्यवाद सर्व मंडळी. असाच लोभ असू द्या. Happy

आणि संयोजक मंडळींचे मनःपूर्वक अभिनंदन !!! कार्यक्रम छानच पार पडला. यावेळी प्रथमच मला, संयोजकांची लगबग आणि संयोजन-कौशल्य जवळून बघता आलं त्यामुळे मला व्यक्तिशः तरी अगदी शिस्तपूर्ण संयोजन वाटलं. आणि त्याचं कौतुकही वाटलं. Happy

इतका मस्त कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे मनापासून आभार!!!

'नावात काय आहे' हा धमाल खेळ आवडला. आम्हाला नुसताच आवडला जमला फक्त श्रद्धा आणि चिनूक्स कंपनीला Happy

लेकीला सा.न.वि.वि. मधे भाग घेण्याची संधी मिळाली आणि एक त्याबद्दल एक गोड प्रशस्तिपत्रकही मिळाले.

एकूणात मस्त मजा आली!

खूपच सुंदर कार्यक्रम..... संयोजकांचे मनापासून आभार Happy
सा.न.वि.वि. मधे दिलेलं प्रशस्तिपत्रक एकदम खासमखास.... लेक त्याचा प्रिंटावूट शाळेत मिरवून आली Happy

मभादि बाद्दल संयोजकांचे अभिनंदन आणि आभार. अजून बरेच काही वाचायचे, ऐकायचे बाकी आहे. मात्र एकंदरीत सर्वच उपक्रम आवडले. लोगो, प्रशस्तीपत्रके, जाहिराती सर्वच भारी होते!

नाही संयोजक. तुम्ही अगदी जवळ आहात पण उत्तर अचूक हवे. :प
नावात काय आहे फार कठीण कोडी (असल्याने) मजा आली नाही.

आता तुम्ही परत काय रांगोळी चितारलीये खाली? आता आणखी डोके खपवायला नका सांगू. (तुम्ही तीन फुल्या तीन बदाम दिलेत असे समजावे काय?) Wink

बायदवे संयोजक स्पर्धाभर फारच डोळे मारत लिहीत होते हे काय बरे नव्हते Proud

Pages