मनोगत : सुमेधा मोडक

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 22:37

Mabhadi LogoPNG.png

मराठी भाषेच्या अस्तित्वाबद्दल हल्ली बर्‍याचदा चर्चा ऐकायला मिळते. मराठी शाळांमधले विद्यार्थी कमी होत आहेत, शाळा बंद पडत आहेत, अशा बातम्याही अधूनमधून कानावर पडत असतात. सरकारी पातळीवर मराठी हा विषय महाराष्ट्रात सर्व माध्यमांमध्ये प्राथमिक वर्गांपासून शिकवणे सक्तीचे करण्यासारखे उपाय केले जात आहेत. हे प्रयत्न होत असताना शाळांमध्ये नक्की काय परिस्थिती आहे, विद्यार्थ्यांचा विषयाकडे बघायचा दृष्टिकोन कसा आहे, त्यांना काय आवडतं, काय आवडत नाही, शाळांमध्ये मराठीची आवड वाढावी म्हणून काय प्रयत्न केले जातात, याबद्दलची माहिती मराठी भाषा दिवसाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने सध्या शाळेत शिकवत असलेल्या शिक्षकांकडून जाणून घ्यायचं मंडळानं ठरवलं.
सदर लेखाच्या लेखिका श्रीमती सुमेधा मोडक या सध्या संयुक्त स्त्री संस्था संचालित कै. वसंतराव वैद्य माध्यमिक विद्यालयात मराठी विषयाचं अध्यापन करत आहेत.

*****

मायबोलीच्या सर्व वाचकांना मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा. मराठी भाषा दिवसाचं औचित्य साधून माझ्या मराठी विषयाच्या अध्यापनाच्या अनुभवातून आलेले काही विचार आपणा सर्वांसमोर मांडायला मिळत आहेत, ही अतिशय समाधान देणारी गोष्ट आहे. गेली सुमारे वीस वर्षे मी मराठी विषय माध्यमिक शाळेत आठवी ते दहावीच्या इयत्तांना शिकवते आहे. माझ्या विद्यार्थीवर्गामध्ये सुशिक्षित व उत्तम कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेल्या विद्यार्थ्यांपासून ते अशिक्षित घरांमधले, ज्यांची पहिलीच पिढी शाळेत जाते आहे, घरची परिस्थिती हालाखीची, राहायला जेमतेम जागा, असेही विद्यार्थी आहेत. शिक्षणाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा, शिक्षण घेण्याची कारणे वेगळी. या सर्वच घटकातल्या विद्यार्थ्यांचे मराठी विषयाकडे दुर्लक्ष व्हायची शक्यता सर्वाधिक! आणि म्हणून मराठीचे शिक्षक या नात्याने भाषेबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात गोडी निर्माण करण्याची मोठीच जबाबदारी आमच्यावर येऊन पडते. त्यात आमच्या इंग्रजी माध्यमाच्या तुकड्यांमधील बहुतांश विद्यार्थी आणि त्यांचे पालकसुद्धा मराठीकडे एक 'अनिवार्य विषय, ज्याच्याशी शालांत परीक्षेनंतर आपला काही संबंध येणार नाही', यापलीकडे जाऊन बघायला तयार नसतात.

मराठी विषय वर्गात शिकवताना पाठ्यांशानुसार आणि विद्यार्थीवर्गानुसार वेगवेगळ्या पद्धती वापराव्या लागतात आणि त्या योग्यप्रकारे वापरल्या तरच शिक्षक परिणामकारक रीतीने विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकतात. ढोबळमानाने सांगायचे तर पाठाच्या रचनेनुसार खालील काही पद्धतींचा आम्ही वर्गात अवलंब करतो -
१. कथनपद्धत - पाठ जर कथेच्या स्वरूपात असेल तर कथा रंगवून सांगयच्या, ज्यायोगे पाठाची वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येतात.
२. नाट्यपद्धत - पाठ जर नाटकातला उतारा असेल किंवा पाठात अनेक संवाद असतील, तर विद्यार्थ्यांना ही पात्रे देऊन त्यांच्यात तो प्रसंग वाचून घ्यायचा व त्यावर चर्चा घडवून आणायची.
३. चरित्रात्मकपद्धत - कलाकार, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व, खेळाडू, शास्त्रज्ञ यांच्याबद्दलचे पाठ शिकवताना आधी त्या व्यक्तींचे चरित्र कथन करून मग मूळ पाठाला हात लावला की विद्यार्थी त्यात रंगून जातात.
४. चर्चात्मकपद्धत : खुले शेवट असलेल्या कथा, रुपक कथा, कविता शिकवताना वर्गात चर्चा घडवून आणल्या की वेगवेगळे दृष्टिकोन समोर येतात.
एकंदरीत विद्यार्थ्यांच्या विचारांना शिक्षकांनी थोडीशी चालना दिली की ते भाषेच्या तासांमध्येही समरसून भाग घेऊ लागतात.

आता शिकवायच्या या पद्धती विद्यार्थीवर्गाप्रमाणेही बदलाव्या लागतात. सुशिक्षित पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना मूळ पाठ येतच असतो, त्याबद्दल सगळी माहिती त्यांनी आधीच करून घेतलेली असते. त्यामुळे पाठाशिवाय बर्‍याच बाकीच्या गोष्टीचींही त्यांना शिक्षकांकडून अपेक्षा असते; जसे की लेखकाची पार्श्वभूमी, लेखकाचे बाकीचे लेखन, त्याच्या लेखनाची इतर वैशिष्ट्ये, त्या लेखनप्रकाराबद्दल अधिक माहिती वगैरे. परंतु अशिक्षित पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकातला पाठ हेच सर्व काही असते, कारण तो पाठ व्यवस्थित अभ्यासला तरच त्यांना परीक्षा उत्तीर्ण होता येणार असते आणि तीच त्यांची प्रमुख गरज असते. त्यामुळे इतर सर्व गोष्टींशी त्यांना काहीही देणंघेणं नसते.

विद्यार्थ्यांच्या मनात मराठी विषयाची आवड निर्माण होण्यामध्ये आणि टिकण्यामध्ये पाठ्यपुस्तकाचा आणि अभ्यासक्रमाचाही खूप मोठा वाटा असतो. संतकाव्य, गेय कविता, सुलभ हाताळणीच्या कथा, प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांबद्दलचे पाठ, ललित लेख हे विद्यार्थ्यांना खूप आवडतात. हल्लीच्या धोरणानुसार ग्रामीण साहित्य काही टक्केतरी पुस्तकात असणे बंधनकारक आहे. परंतु एकंदरीत काही विशिष्ट इयत्तांपर्यंत विद्यार्थ्यांना हे साहित्य आवडत नाही, असे दिसून आले आहे. तसच क्लिष्ट भाषेतले, संस्कृतप्रचुर साहित्यही विद्यार्थ्यांना फारस आवडत नाही. 'व्याकरण' हा प्रकारही विद्यार्थ्यांना खूप किचकट वाटतो. मराठीच नाही तर कुठलीही भाषा शिकताना व्याकरण हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, पण तो ज्याप्रकारे शिकवला आणि तपासला जातो, ते विद्यार्थ्यांना आवडत नाही.

ह्या सगळ्या नावडत्या प्रकारांबद्दल आवड निर्माण करण्यासाठी आम्ही शाळेत वेगवेगळे प्रकल्प राबवतो. विद्यार्थी कुठलेही असोत, हल्ली त्यांचे अवांतर वाचन फारच कमी असते. त्यामुळे शाळेतल्या ग्रंथालयामधली पुस्तके वाचण्यासाठी आठवड्यातले दोन तास राखून ठेवलेले असतात. वाचलेल्या पुस्तकांबद्दल टिपणे काढणे, चर्चा करणे, पुस्तकपरिचय लिहिणे, अशाप्रकारच्या गोष्टी विद्यार्थ्यांकडून करवून घेतल्या जातात. याशिवाय वर्षभर भाषाविकासासाठी वेगवेगळे प्रकल्प विद्यार्थ्यांकडून करवून घेतले जातात, ज्यांत इयत्तांनुसार समानार्थी/विरुद्धार्थी शब्दांची यादी तयार करणे, म्हणी, वाक्प्रचार यांचे संग्रह करणे, शब्दकोष वापरायला शिकणे, वृत्तकाव्य/सुनीत/मुक्तछंद असे काव्यप्रकार अभ्यासणे, शालेय तसेच आंतरशालेय निबंध स्पर्धांमध्ये भाग घेणे वगैरे गोष्टींचा समावेश असतो. स्नेहसंमेलनाची आमंत्रणपत्रिका तसेच कार्यक्रमांची संहिता लिहिणे, त्यासंबंधीचा पत्रव्यवहार करणे, आभारप्रदर्शनाची पत्रे लिहिणे, हेही विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करतात, ज्यायोगे त्यांना रोजच्या वापरातील मराठीही शिकायला मिळते. याशिवाय जेव्हा शक्य होईल तेव्हा पाठ्यपुस्तकातल्या पाठाच्या लेखकांना, पाठात संदर्भ आलेल्या जागी प्रत्यक्ष जाऊन आलेल्या, त्या विषयात अभ्यास असलेल्या वक्त्यांना विद्यार्थ्यांशी संवाद साधायला आमंत्रित करतो. जेणेकरून विद्यार्थी अधिक आत्मीयतेने तो पाठ अभ्यासतात. एकदातर मराठी पाठयपुस्तक मंडळातल्या एका सदस्यालाही शाळेत आमंत्रित केले होते. त्यांना विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकाबद्दल अनेक शंका विचारल्या होत्या.

हल्ली मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांची आणि इंग्रजी माध्यमात, तसंच महाविद्यालयात मराठी वैकल्पिक विषय घेणार्‍याची संख्या कमी होत चालली आहे. जग जवळ येत चाललं आहे तसं इंग्रजी आणि इतर परभाषा शिकण्याकडे सगळ्यांचाच कल वाढतो आहे. प्रगतीच्या दृष्टीने इंग्रजी आवश्यक आहेच आणि तिला विरोध नाहीच, परंतु आपली मातृभाषा टिकवणे, तिचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे, याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे. हल्लीच्या धोरणांनुसार प्रमाणभाषेपेक्षा बोलीभाषेला महत्त्व दिले जाऊ लागले आहे. शालांत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांमध्येही बोलीभाषेच्या वापरावरील बंधने शिथिल केलेली आहेत. मातृभाषेत व्यक्त होण्याच्या दृष्टीने हे अतिशय स्वागतार्ह असले, तरी भाषाशुद्धीकडे यामुळे दुर्लक्ष होते. शिवाय दृकश्राव्य माध्यमांच्या उदयामुळे नानाविध गोष्टी सगळ्यांच्याच नजरेला आणि कानावर पडत असतात. कितीतरी वेळा तीन, चार भाषांची भेसळ एका वाक्यात ऐकायला मिळते. लहानपणापासून अशीच भाषा मुलांच्या कानावार पडायला लागली तर कुठलीच भाषा धडपणे त्यांना येणार नाही. सरकारी पातळीवर मराठी विषय पहिलीपासून ते शालांत परीक्षेपर्यंत अनिवार्य करण्यासारखे उपाय योजले जात असतानाच आपणही सर्वांनी मराठी भाषा बोलून, वाचून, लिहून आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ती पोहोचवून आपला खारीचा वाटा उचलला तर आपली मातृभाषा उत्तरोत्तर समृद्ध होत जाईल, यात शंका नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*

>>कितीतरी वेळा तीन, चार भाषांची भेसळ एका वाक्यात ऐकायला मिळते. लहानपणापासून अशीच भाषा मुलांच्या कानावार पडायला लागली तर कुठलीच भाषा धडपणे त्यांना येणार नाही>>>>
अगदी खरेय सुमेधाताई,मराठीचा प्रश्न तर आहेच, पण कुठलीही भाषा शुद्ध,सुंदर बोलावी हा आग्रहच नाहीसा होत चाललाय.
तुमच्या कार्याला प्रणाम अन शुभेच्छा.

चांगलं लिहीलंय. बरेच वेगवेगळे प्रयोग करताय की तुम्ही शिकवताना. Happy

मला आधी वाटायचं की भाषेची सरमिसळ फक्त शहरी भागात होत असेल पण दुर्दैवाने आता ग्रामीण भागातही विविध कार्टुन चॅनल्सच्या कॄपेने लहान मुलेही मध्ये मध्ये हिंदी/इंग्रजी शब्द पेरत मराठी बोलतात. शिक्षकांच्या शिकवण्याच्या उत्साहावर पाणी पडत असेल अशावेळी.