महिला दिन २०१३ संयुक्ता-सुपंथ सामाजिक उपक्रमः माहिती पाठवण्याचे आवाहन (सार्वजनिक धागा)

Submitted by सुनिधी on 17 February, 2013 - 23:51

नमस्कार,
गेली ३ वर्षे महिला दिनानिमित्त मायबोली-संयुक्ता-सुपंथ तर्फे गरजू संस्थांना वस्तू स्वरूपात मदत करण्याचा उपक्रम चालवला जातो. ह्या वर्षी पण हा उपक्रम होणार आहे पण उपक्रमाचे स्वरूप थोडेसे वेगळे ठेवत आहोत. आशा आहे उपक्रमाला अजून जास्त प्रतिसाद मिळेल.

वेगळेपणा काय असेल?
१. दोन प्रकारे उपक्रम राबविला जाईल.
- आर्थिक मदत - ज्यात दरवर्षीप्रमाणेच गरजेच्या वस्तू विकत घेऊन संस्थेला दिल्या जातील.
- श्रमदान/बुद्धी दान वगैरे... ज्यात आर्थिक मदतीची गरज नसेल
२. ह्या वर्षी मायबोलीवरील सर्वांच्याच सहकार्याने आपण गरजू संस्थांची निवड करणार आहोत.

तुमच्यापैकी बरेचजण आर्थिक अथवा श्रमदानाच्या स्वरूपात गरजू संस्थांना मदत करत असाल. त्या संस्थेबद्दल तुम्हाला आपुलकी वाटत असते. मग त्यात इतरांना पण सामील करून घेऊन संस्थेला जास्त फायदा का करून देऊ नये?

ध्यासपंथी पाउले ह्या अंतर्गत बर्‍याच मायबोलीकरांनी त्यांनी भेटी दिलेल्या संस्थांबद्दल उत्तम लेख लिहिले आहेत. त्याशिवाय अजूनही खूप मायबोलीकर काही संस्थांशी संलग्न असतील ज्यांची आपणांस माहिती नाही.

तर तुम्हाला एखादी अशी संस्था माहीत असेल तर ह्या धाग्यावर त्याची थोडक्यात माहिती लिहा. आलेल्या सर्व माहितीपैकी जी/ज्या संस्था जास्त गरजू असेल त्यांना ह्या उपक्रमाद्वारे मदत करण्यात येईल.
जेवढी जास्त मदत वरील दोन्ही उपक्रमात गोळा तितक्या जास्त संस्थांपर्यंत आपल्याला पोचता येईल.

वर नमूद केल्याप्रमाणे अर्थातच आर्थिक वा श्रमदान ह्यापैकी कोणत्याही स्वरूपातील मदत ज्यांना देऊ शकतो त्यांची माहिती लिहावी.

ज्या संस्थेला वस्तुरुपात मदत हवी असेल त्याबद्दल खालील माहिती द्यावी.
१. संस्थेचे नाव. (संस्था शक्यतो नोंदणीकृत असावी), संस्था कोणासाठी व कशा प्रकारचे काम करते याबद्दल थोडक्यात माहिती.
२. वेबसाइट असेल तर त्याचा दुवा
३. संस्थेला सरकारी वा बाहेरुन अतिशय कमी मदत मिळत असेल तर त्याबद्दल आवर्जून लिहावे. आपण अशाच संस्था निवडतो.
४. संस्थेला सध्या ज्या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे त्याची यादी व प्रमाण. तसेच त्या वस्तू विकत घेण्यासाठी किती पैसे लागू शकतील ते.
५. आयकरात सूट मिळू शकत असेल तर तेही लिहा. पण बहुतेकवेळा ती सूट संस्थेला पैशाची मदत केली तरच मिळू शकते, वस्तुरुपात केली तर नाही.
६. संस्थेत या संदर्भात कोणाला संपर्क करायचा त्या व्यक्तीचे नाव, हुद्दा, संपर्क क्रमांक, वेळ, ईमेल इ. तपशील म्हणजे पारदर्शीपणा राहील.

ज्या संस्थेला श्रमदानाच्या स्वरूपात मदत हवी असेल त्याबद्दल खालील माहिती द्यावी.
१. संस्थेचे नाव. (संस्था नोंदणीकृत असावी), संस्था कोणासाठी व कशा प्रकारचे काम करते याबद्दल थोडक्यात माहिती
२. संस्था कोणत्या गावात आहे.
२. वेबसाइट असेल तर दुवा
३. संस्थेला कशाप्रकारे मदत हवी आहे. (उदा. हर्पेन ह्यांनी एका शाळेत शिकवण्यासाठी गरज असल्याबद्दल हल्लीच लिहिले होते. )
४. कोणकोणत्या तारखांना संस्थेला मदत हवी आहे.
५. तिथपर्यंत पोचण्यासाठी मार्ग तसेच पोचायला लागणारा वेळ व पैसा.
६. संस्थेत या संदर्भात कोणाला संपर्क करायचा त्या व्यक्तीचे नाव, हुद्दा, संपर्क क्रमांक, वेळ, ईमेल इ. तपशील

वस्तुरुपात मदत ह्याआधी करण्यात आली आहे त्यामुळे ती कशी करण्यात येते हे सर्वांना माहिती आहे व ह्यासाठी दरवेळी ५ ते ६ मायबोलीकरांची मदत लागतेच.

परंतु श्रमदान उपक्रम पार पडण्यासाठी जास्त स्वयंसेवक व त्यांचा वेळ ह्याची आवश्यकता आहे. ही मदत भारतातील संस्थेला करण्यात येणार असल्याने भारतातीलच स्वयंसेवकांच्या मदतीनेच हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडेल. त्यातदेखील ही संस्था ज्या गावातील असेल तिथले जास्त.
ह्याबद्दल रूपरेखा साधारण अशी आहे.
आपणाकडून संस्था ठरवली गेली तर त्यासाठी जे मदत करू शकतात त्यांची यादी व सर्वांना योग्य असा दिवस ठरवून तिथे जाऊन काम करणे. त्यासाठी मायबोलीकरच असायला हवे असेही नाही. आपण कोणालाही ह्यात सामील करू शकता.
ह्यात कितीही संस्था निवडता येतील. अगदी १० गावची १० माणसे आपापल्या गावातली एखादी संस्था निवडून तिथे जाऊ शकतात.

दोन्ही उपक्रम राबवण्यासाठी तुमच्या ह्याशिवाय काही वेगळ्या कल्पना असतील तर स्वागतच आहे. अवश्य लिहा त्याबद्दल.

श्रमदानाचा हा उपक्रम कितपत यशस्वी होईल हे आता सांगता येणार नाही. ते सर्व मायबोलीकरांच्या प्रतिसादावर अवलंबून असेल. म्हणूनच ह्या वर्षी हा प्रयोग करून पाहायचा आहे. जर हा सफल झाला तर दरवर्षी करता येईल, नाहीतर बंद करता येईल.

(इच्छा असल्यास हा उपक्रम कोणत्याही देशात करता येईल. तुमच्या गावातले लोक तुम्ही निवडून सर्व मिळून एखादा दिवस (बर्‍याचदा शनिवार) ठरवून संस्थेमध्ये जाऊ शकता. जसे अमेरिकेत Food Bank मध्ये जाऊन काम करणे हा अत्यंत वेगळा व आनंद देणारा उपक्रम आहे. प्रत्येक गावांत food bank असते. अजूनही बरीच माहिती इतरांना असेल. अजूनही इतर प्रकारच्या संस्थांची माहिती बाकीच्या देशातील कोणाला असेल तर अवश्य लिहा).

८ मार्च ला महिला दिन. त्याच्या आसपास संस्थांची निवड करण्यात येईल व पुढील कामाला लागता येईल.

पण श्रमदानाचा उपक्रम मायबोलीकरांच्या सहकार्याशिवाय शक्य होणार नाहीये त्यामुळे त्याला जास्त प्रतिसाद नाही मिळाला तर दुसरा उपक्रम रद्द करण्यात येईल पण वस्तुरुपात मदतीचा उपक्रम मात्र नक्की करण्यात येईल.

तेव्हा लोकहो, आपल्याजवळची मौल्यवान माहिती इथे लिहा व त्याचा सर्वांनी उपयोग करूया.

ह्या सर्व संस्थांपैकी तुम्हाला वैयक्तिकरीत्या ज्या संस्था भावल्या व त्यांना मदत करायची इच्छा आहे, तर ते देखील लिहावे.

ह्यात स्वयंसेवकांची गरज आहे. ज्यांना स्वयंसेवक म्हणून भाग घ्यायचा आहे त्यांनी संपर्क करावा.

थेंबे थेंबे तळे साचे.

मागील वर्षी केले गेलेले उपक्रम इथे वाचायला मिळतील,
२०१० - http://www.maayboli.com/node/14532
२०११ - http://www.maayboli.com/node/24887
२०१२ - http://www.maayboli.com/node/33264

सुपंथ - http://www.maayboli.com/node/4492 (नवीन वाचकांसाठी - सुपंथद्वारे आपण आर्थिक मदत त्या त्या संस्थेपर्यंत पोचवतो)

सध्या ह्यात ४ स्वयंसेवक उपलब्ध आहेत - अरुंधती कुलकर्णी, केदार जोशी (सुपंथ चे चालक), मो, सुनिधी. अजून स्वयंसेवकांची जरूरी आहे. संयुक्ताखेरीज इतर स्वयंसेवक देखील हवे आहेत कारण हा उपक्रम सर्व उत्साही मायबोलीकारांच्या मदतीने करायचा आहे.

धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पनवेल नेरे येथील शांतीवन माहीतच असेल बर्‍याच जणांना तेथे कुष्ठरोग निवारण केंद्र, अनाथालय, वृद्धाश्रम, निसर्गोपचार केंद्र आहे. एकदा भेट द्यायला हरकत नाही. आम्ही २ महिन्यांपुर्वी गेलो होतो पण संध्याकाळ झाल्याने फक्त अनाथालयालाच भेट दिली. परीसरही अगदी निसर्गमय आहे. तिथे मदत येत असते पण अशा मोठ्या प्रोजेक्टसना अपुरी पडतच असते शिवाय त्यांचे अजुन काही डेव्हलपमेंट करण्याचेही प्लान्स आहेत. तिथे ट्रस्टीपदावर कार्यरत असणारे व्यक्ती माझ्या मिस्टरांचे मित्र आहेत. काही माहीती हवी असेल तर मी विचारून देऊ शकते.

सुनिधी संस्थांची लिस्ट पानाच्या वर टाकता येईल का तुला ? त्याच्या खाली त्याबद्दल कुथल्या पोस्टमधे सुचवलेले होते त्याचे हेडर कॉपी करत गेलीस तर शोधायला सोपे होईल.

नीधप छानच. इथे पहाता येणार नाही पण कधी लिंक उपलब्ध झाली तर नक्की आवडेल पहायला.
जागु,प्रिया, थँक्स.
असामी, हो, उद्यापर्यंत ते होऊन जाईल.

Pages