महिला दिन २०१३ संयुक्ता-सुपंथ सामाजिक उपक्रमः माहिती पाठवण्याचे आवाहन (सार्वजनिक धागा)

Submitted by सुनिधी on 17 February, 2013 - 23:51

नमस्कार,
गेली ३ वर्षे महिला दिनानिमित्त मायबोली-संयुक्ता-सुपंथ तर्फे गरजू संस्थांना वस्तू स्वरूपात मदत करण्याचा उपक्रम चालवला जातो. ह्या वर्षी पण हा उपक्रम होणार आहे पण उपक्रमाचे स्वरूप थोडेसे वेगळे ठेवत आहोत. आशा आहे उपक्रमाला अजून जास्त प्रतिसाद मिळेल.

वेगळेपणा काय असेल?
१. दोन प्रकारे उपक्रम राबविला जाईल.
- आर्थिक मदत - ज्यात दरवर्षीप्रमाणेच गरजेच्या वस्तू विकत घेऊन संस्थेला दिल्या जातील.
- श्रमदान/बुद्धी दान वगैरे... ज्यात आर्थिक मदतीची गरज नसेल
२. ह्या वर्षी मायबोलीवरील सर्वांच्याच सहकार्याने आपण गरजू संस्थांची निवड करणार आहोत.

तुमच्यापैकी बरेचजण आर्थिक अथवा श्रमदानाच्या स्वरूपात गरजू संस्थांना मदत करत असाल. त्या संस्थेबद्दल तुम्हाला आपुलकी वाटत असते. मग त्यात इतरांना पण सामील करून घेऊन संस्थेला जास्त फायदा का करून देऊ नये?

ध्यासपंथी पाउले ह्या अंतर्गत बर्‍याच मायबोलीकरांनी त्यांनी भेटी दिलेल्या संस्थांबद्दल उत्तम लेख लिहिले आहेत. त्याशिवाय अजूनही खूप मायबोलीकर काही संस्थांशी संलग्न असतील ज्यांची आपणांस माहिती नाही.

तर तुम्हाला एखादी अशी संस्था माहीत असेल तर ह्या धाग्यावर त्याची थोडक्यात माहिती लिहा. आलेल्या सर्व माहितीपैकी जी/ज्या संस्था जास्त गरजू असेल त्यांना ह्या उपक्रमाद्वारे मदत करण्यात येईल.
जेवढी जास्त मदत वरील दोन्ही उपक्रमात गोळा तितक्या जास्त संस्थांपर्यंत आपल्याला पोचता येईल.

वर नमूद केल्याप्रमाणे अर्थातच आर्थिक वा श्रमदान ह्यापैकी कोणत्याही स्वरूपातील मदत ज्यांना देऊ शकतो त्यांची माहिती लिहावी.

ज्या संस्थेला वस्तुरुपात मदत हवी असेल त्याबद्दल खालील माहिती द्यावी.
१. संस्थेचे नाव. (संस्था शक्यतो नोंदणीकृत असावी), संस्था कोणासाठी व कशा प्रकारचे काम करते याबद्दल थोडक्यात माहिती.
२. वेबसाइट असेल तर त्याचा दुवा
३. संस्थेला सरकारी वा बाहेरुन अतिशय कमी मदत मिळत असेल तर त्याबद्दल आवर्जून लिहावे. आपण अशाच संस्था निवडतो.
४. संस्थेला सध्या ज्या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे त्याची यादी व प्रमाण. तसेच त्या वस्तू विकत घेण्यासाठी किती पैसे लागू शकतील ते.
५. आयकरात सूट मिळू शकत असेल तर तेही लिहा. पण बहुतेकवेळा ती सूट संस्थेला पैशाची मदत केली तरच मिळू शकते, वस्तुरुपात केली तर नाही.
६. संस्थेत या संदर्भात कोणाला संपर्क करायचा त्या व्यक्तीचे नाव, हुद्दा, संपर्क क्रमांक, वेळ, ईमेल इ. तपशील म्हणजे पारदर्शीपणा राहील.

ज्या संस्थेला श्रमदानाच्या स्वरूपात मदत हवी असेल त्याबद्दल खालील माहिती द्यावी.
१. संस्थेचे नाव. (संस्था नोंदणीकृत असावी), संस्था कोणासाठी व कशा प्रकारचे काम करते याबद्दल थोडक्यात माहिती
२. संस्था कोणत्या गावात आहे.
२. वेबसाइट असेल तर दुवा
३. संस्थेला कशाप्रकारे मदत हवी आहे. (उदा. हर्पेन ह्यांनी एका शाळेत शिकवण्यासाठी गरज असल्याबद्दल हल्लीच लिहिले होते. )
४. कोणकोणत्या तारखांना संस्थेला मदत हवी आहे.
५. तिथपर्यंत पोचण्यासाठी मार्ग तसेच पोचायला लागणारा वेळ व पैसा.
६. संस्थेत या संदर्भात कोणाला संपर्क करायचा त्या व्यक्तीचे नाव, हुद्दा, संपर्क क्रमांक, वेळ, ईमेल इ. तपशील

वस्तुरुपात मदत ह्याआधी करण्यात आली आहे त्यामुळे ती कशी करण्यात येते हे सर्वांना माहिती आहे व ह्यासाठी दरवेळी ५ ते ६ मायबोलीकरांची मदत लागतेच.

परंतु श्रमदान उपक्रम पार पडण्यासाठी जास्त स्वयंसेवक व त्यांचा वेळ ह्याची आवश्यकता आहे. ही मदत भारतातील संस्थेला करण्यात येणार असल्याने भारतातीलच स्वयंसेवकांच्या मदतीनेच हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडेल. त्यातदेखील ही संस्था ज्या गावातील असेल तिथले जास्त.
ह्याबद्दल रूपरेखा साधारण अशी आहे.
आपणाकडून संस्था ठरवली गेली तर त्यासाठी जे मदत करू शकतात त्यांची यादी व सर्वांना योग्य असा दिवस ठरवून तिथे जाऊन काम करणे. त्यासाठी मायबोलीकरच असायला हवे असेही नाही. आपण कोणालाही ह्यात सामील करू शकता.
ह्यात कितीही संस्था निवडता येतील. अगदी १० गावची १० माणसे आपापल्या गावातली एखादी संस्था निवडून तिथे जाऊ शकतात.

दोन्ही उपक्रम राबवण्यासाठी तुमच्या ह्याशिवाय काही वेगळ्या कल्पना असतील तर स्वागतच आहे. अवश्य लिहा त्याबद्दल.

श्रमदानाचा हा उपक्रम कितपत यशस्वी होईल हे आता सांगता येणार नाही. ते सर्व मायबोलीकरांच्या प्रतिसादावर अवलंबून असेल. म्हणूनच ह्या वर्षी हा प्रयोग करून पाहायचा आहे. जर हा सफल झाला तर दरवर्षी करता येईल, नाहीतर बंद करता येईल.

(इच्छा असल्यास हा उपक्रम कोणत्याही देशात करता येईल. तुमच्या गावातले लोक तुम्ही निवडून सर्व मिळून एखादा दिवस (बर्‍याचदा शनिवार) ठरवून संस्थेमध्ये जाऊ शकता. जसे अमेरिकेत Food Bank मध्ये जाऊन काम करणे हा अत्यंत वेगळा व आनंद देणारा उपक्रम आहे. प्रत्येक गावांत food bank असते. अजूनही बरीच माहिती इतरांना असेल. अजूनही इतर प्रकारच्या संस्थांची माहिती बाकीच्या देशातील कोणाला असेल तर अवश्य लिहा).

८ मार्च ला महिला दिन. त्याच्या आसपास संस्थांची निवड करण्यात येईल व पुढील कामाला लागता येईल.

पण श्रमदानाचा उपक्रम मायबोलीकरांच्या सहकार्याशिवाय शक्य होणार नाहीये त्यामुळे त्याला जास्त प्रतिसाद नाही मिळाला तर दुसरा उपक्रम रद्द करण्यात येईल पण वस्तुरुपात मदतीचा उपक्रम मात्र नक्की करण्यात येईल.

तेव्हा लोकहो, आपल्याजवळची मौल्यवान माहिती इथे लिहा व त्याचा सर्वांनी उपयोग करूया.

ह्या सर्व संस्थांपैकी तुम्हाला वैयक्तिकरीत्या ज्या संस्था भावल्या व त्यांना मदत करायची इच्छा आहे, तर ते देखील लिहावे.

ह्यात स्वयंसेवकांची गरज आहे. ज्यांना स्वयंसेवक म्हणून भाग घ्यायचा आहे त्यांनी संपर्क करावा.

थेंबे थेंबे तळे साचे.

मागील वर्षी केले गेलेले उपक्रम इथे वाचायला मिळतील,
२०१० - http://www.maayboli.com/node/14532
२०११ - http://www.maayboli.com/node/24887
२०१२ - http://www.maayboli.com/node/33264

सुपंथ - http://www.maayboli.com/node/4492 (नवीन वाचकांसाठी - सुपंथद्वारे आपण आर्थिक मदत त्या त्या संस्थेपर्यंत पोचवतो)

सध्या ह्यात ४ स्वयंसेवक उपलब्ध आहेत - अरुंधती कुलकर्णी, केदार जोशी (सुपंथ चे चालक), मो, सुनिधी. अजून स्वयंसेवकांची जरूरी आहे. संयुक्ताखेरीज इतर स्वयंसेवक देखील हवे आहेत कारण हा उपक्रम सर्व उत्साही मायबोलीकारांच्या मदतीने करायचा आहे.

धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखाद्या बचतगटाच्या स्त्रियांना वेगवेगळ्या विक्रियोग्य वस्तू बनवायला शिकवणे, त्यांच्या मालाच्या विक्री व वितरणासंदर्भाने मदत करणे हे ही आपण करू शकतो.
माबोवर विविध हस्तकला येणार्‍या बर्‍याच जणी आहेत.
गोधड्या, बेसिक शिवणकाम (सलवार कुर्ते, लहान मुलींचे कपडे वगैरे) अशी कौशल्ये मी शिकवू शकते.
आपल्याकडे उत्तम क्रोशा आणि विणकाम करणार्‍या खूप जणी आहेत. त्यांच्यापैकी कुणी ती कौशल्ये शिकवू शकतील.
हाती बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठेत खूप मोठे स्थान आहे.

मायबोलीच्या माध्यमातून बचतगटाच्या महिलांनी हाती बनवलेल्या वस्तूंची न्याय्य दरात विक्री करून त्यांना उभे रहायला मदत करता येऊ शकते.

हा सगळा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. सध्या नाही पण एकदोन वर्षांनी यासंदर्भातली 'योजक' पद्धतीची जबाबदारी उचलणे मला जमू शकेल.

कुडाळ तालुक्यात झाराप येथील 'भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान' या संस्थेचे काम गेले ४-५ वर्ष अत्यंत जवळून बघते आहे. डॉ. प्रसाद आणि डॉ. हर्षदा देवधरांशीही चांगला परिचय आहे. खूप महत्वाचे आणि खूप मोठे काम चालू आहे. त्यामागची विचारपद्धती अतिशय मह्त्वाची आहे.

आपण या ठिकाणी मायबोलीच्या माध्यमातून पुस्तके, कंप्युटर किंवा ग्रामविकासाच्या कामासाठी ठोस आर्थिक मदत या स्वरूपात मदत देऊ शकतो.
डॉ. हर्षदा देवधरांशी आत्ताच बोलणे झाले त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण खालील गोष्टी करू शकतो.
१. पुस्तके - ८वी ते १०वी च्या भाषेच्या पुस्तकातले धडे ज्या मूळ पुस्तकातून आहेत ती मूळ पुस्तके ग्रंथालयात असावीत. जेणेकरून ते ते धडे समजायला अजून उपयोग होतो. या प्रकारे काही पुस्तके आणली गेलेली आहेत आणि उपयोग होतो आहे. बाकीची यादी २-३ दिवसात इथे टाकेन.

२. सिंधुदुर्गात दुर्गम ठिकाणी असलेले, एसटी न पोचणारे किंवा वेळ योग्य नसलेल्या गावी रहाणारी आणि शाळेत, कॉलेजात जाणारी अनेक मुले, मुली रोजचे रोज ३-४-५ किमी चालत जाता येतात. अश्या मुलांसाठी बेसिक सायकल स्पॉन्सर करता येईल. जेणेकरून त्यांचा चालण्याचा वेळ वाचेल आणि तो वेळ ते सत्कारणी लावू शकतील. तसेच सायकल चालवत जायचे असल्याने व्यायाम होईलच व प्रदूषणाचीही हानी नाही.
एका बेसिक पण दणकट(रस्ते खराब वगैरे साठी योग्य) सायकलीची किंमत साधारण साडेतीन ते चारहजार रूपयांपर्यंत आहे.

३. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळेत जाणार्‍या मुलांपैकी साधारण ६०० तरी मुलांच्या घरी वीज नाही. अश्या मुलांसाठी सोलर लॅम्प्स. देवधरांनी स्वतः वेगवेगळे सोलर लॅम्प्स वापरून पाह्यले आणि त्यानंतर पुण्यातल्या एका कंपनीच्या दिव्याची निवड केली आहे. या लॅम्पचे वैशिष्ठ्य म्हणजे त्याचा उजेड संपूर्ण खोलीभर पसरतो, तसेच तो लॅम्प घरभर, अंगणात कुठेही उचलून नेऊन ठेवता येतो. साधारण दीड हजार रूपये एका लॅम्पची किंमत आहे.
हे लॅम्प मुलांना फुकट वाटून टाकण्याऐवजी लॅम्प दिल्यानंतर पुढच्या वर्षभरात शक्य झाल्यास दीड हजारापैकी जेवढी जमेल तेवढी रक्कम मुलाच्या कुटुंबियांनी परत द्यावी अशी विनंती केली जाते. त्या परत आलेल्या पैशातून अजून काही लॅम्प्स अजून इतर मुलांना देता येऊ शकतात. जेणेकरून देणगी म्हणून आलेल्या रकमेचा उपयोग जास्तीत जास्त लोकांना होऊ शकतो.
यासाठी आर्थिक देणगी एकत्र करून आपण देऊ शकतो.

एखाद्या बचतगटाच्या स्त्रियांना वेगवेगळ्या विक्रियोग्य वस्तू बनवायला शिकवणे, त्यांच्या मालाच्या विक्री व वितरणासंदर्भाने मदत करणे हे ही आपण करू शकतो.
>> ही कल्पना मस्त आहे. यामधे ज्याला चांगली विक्री लाभू शकते असे खाऊपदार्थ पण बनवून विकता येतात. दिवाळी फराळ बनवणे, उकडीचे मोदक बनवणे (गणपतीच्या दिवशी अथवा संकष्टीच्या दिवशी), पुपो इत्यादि. दुसरा एक म्हणजे रूखवताच्या, सजावटीच्या वस्तू बनवून विकणे. माझी आई ज्या बचतगटाची सभासद आहे तिथे या रूखवताच्या वस्तू बनवतात, त्याला भावदेखील चांगला मिळतो आणि टिकाऊ असल्याने विकल्या गेल्या नाहीत तरी फारसे नुकसान होत नाही.

मराठवाड्यातल्या मुलांसाठी आणखी काही वेगळे करता येईल का? वर के अश्विनीने दिलेला धान्यवाटपाचा उपाय आहेच. गाव, शाळेतील मुलांची संख्या असे निश्चित काही कळाले तर त्यानुसार त्यांना कशा प्रकारे मदत करता येईल याची कल्पना घेऊन अ‍ॅक्शन प्लॅन बनविता येईल. मायबोलीवर मराठवाड्यातील कोणी असतील तर प्लीज या धाग्याकडे लक्ष देणार का? प्लीज इथे लिहा.

चिनूक्सा, तू चौकशी करून सांगू शकशील का इथे?

नीधप, भगीरथ ग्रामविकासला पुस्तके / सोलर दिवे द्यायची कल्पनाही उत्तम आहे. थँक्स इथे ही माहिती शेअर केल्याबद्दल.

मंडळी, मी आर्थिक मदत करु शकेन.

नी, तू मांडलेल्या सर्व कल्पना आवडल्या. बचतगटासाठीचे काम योजनाबद्ध पद्धतीने केल्यास बराच मोठा पल्ला गाठता येइल.

चिनुक्स आणि अश्विनी, मराठवाड्यातील मुलांसाठी नक्की काय करता येइल ते कळले तर मदत करायला नक्की आवडेल.

अंधशाळेच्या मुलींना आपण दरवर्षीप्रमाणे मदत करणार आहोत ना?

भक्ती पेंडसे यांनी लिहिलेल्या शबरी सेवा समिती संस्थेच्या श्रीयुत करंदीकरांना आज संपर्क केला होता.
ही संस्था मुख्यत्वे रायगड जिल्ह्यातील कर्जत व जव्हार तालुक्यातील व नंदुरबार येथील वनवासी, आदिवासी भागातील गावांमध्ये मुले व महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करते.

सुरुवातीला त्यांनी या भागातील कुपोषित मुलांसाठी आरोग्य प्रकल्प सुरु केले. मग ह्या मुलांच्या शिक्षणासाठी संस्थेने प्रयत्न घ्यायला सुरुवात केली. मुलांच्या कुपोषणाचे एक कारण म्हणजे येथील मुलींचे अल्पवयात विवाह व लगेच झालेली संतती हे असल्याचे लक्षात आल्यावर या भागातील अल्पवयीन मुलींचे शिक्षण पूर्ण व्हावे, त्यांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी प्रयत्न व या लोकांचे विवाहापोटी काढले जाणारे कर्ज वगैरे प्रकार कमी व्हावेत म्हणून सामुदायिक विवाह असे करत करत या भागात शबरी सेवा समितीतर्फे अनेक प्रकारचे प्रकल्प चालविले जातात.
त्यांची माहिती : http://shabarisevasamiti.org/

श्रीयुत करंदीकर स्वतः डोंबिवलीला राहतात व संस्थेचे सचिव आहेत.

त्यांनी सध्या सांगितलेल्या त्यांच्या गरजा याप्रमाणे आहेत :

१) कुपोषित मुलांच्या वैद्यकीय तपासणीत लागणारे वजन-काटे

  • नेहमीचे वजन-काटे : २ सेट्स (याच काट्यांना दांडकाटा की असे काहीतरी म्हणतात का?)
  • मुलांचे वजन करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन-काटे : २ सेट्स
  • एक वर्षाच्या आतील लहान बाळांचे वजन करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काटे : २ सेट्स

२) संस्थेतर्फे मराठी माध्यमाच्या १० बालवाडी शाळा (पूर्वप्राथमिक) चालविल्या जातात. या शाळांसाठी मराठी माध्यमाला योग्य असे शैक्षणिक साहित्य.

३) शाळांमध्ये विज्ञानाचे प्रयोग दाखविण्यासाठी साहित्य : या शाळांमध्ये कित्येकदा मुलांना नेहमीचे भिंगही नीट हाताळायला मिळत नाही. मुलांना हाताळता येईल असे, स्वयंसेवकांना प्रयोग करून दाखवता येईल असे विज्ञान प्रयोगांचे साहित्य.

---------------------------------

या वस्तू आपण घेऊन त्यांना देणगीस्वरुपात दिल्या तरी चालणार आहे किंवा त्या वस्तू विकत घेण्यासाठी पैशाच्या स्वरुपात देणगी दिली तरी चालणार आहे असे करंदीकरांनी सांगितले.

केश्वी, पोस्ट आवडली. दुष्काळग्रस्त भागातील मुलांना/लोकांना आपण धान्याच्या बरोबर पाण्याचा टँकर वगैरे पुरवू शकतो का? सरकारी टँकर्स (जर ते लोकांपर्यंत पोहचत असतील तर) बरोबर खाजगी टँकर्स मागवता येत असतीलच! हे टँकर्स कुठून (जवळच्या थोडेफार पाणी असलेल्या मोठ्या गावातून) पाठवता येईल वगैरे माहिती कोणाला तरी काढावी लागेल. मराठवाड्यात ८ जिल्हे आहेत. अ‍ॅटलिस्ट ४-५ जिल्ह्यातले तरी मायबोलीकर इथे अ‍ॅक्टिव्ह असतील, त्यांनी जर थोडा पुढाकार घेऊन माहिती पुरवली तर आपण पुढच्या गोष्टींची आखणी करु शकतो. मला वाटतं सध्या सगळ्यात जास्त निकड असलेली ही धान्य/पाण्याची गरज आपण मायबोलीकर जर आर्थिक किंवा प्रत्यक्ष हजर राहून करु शकलो तर थोडाफार तरी इंपॅक्ट करु शकू.

गरजू संस्थांना अर्थिक मदत करण्याची इच्छा आहेच..
जो काही उपक्रम ठरेल, त्याला अर्थिक सहाय्य नक्कीच करेन.

मो, सुनिधि, मुलींच्या अंधशाळेला अजुन ही मदत करायची असेल, तर मागे ज्या अकाउंट ला पैसे ट्रान्सफर केले होते तिथेच करायचे आहेत का?

मराठवाड्यातल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी साखरशाळा चालवणार्‍या आणि इतर काम करणार्‍या "जनार्थ" या संस्थेत मी पूर्वी काम केले आहे. तिथल्या श्री प्रवीण महाजनांशी माझा फोन आणि इमेलवर संपर्क होवू शकतो. त्यांच्या मार्फत काही मदत करता येईल का याची चौकशी करु का? जनार्थ ऊसतोड कामगार, त्यांची मुळे, औरंगाबादच्या आसपासच्या काही गावांमध्ये स्त्री बचत गट, शेतकर्‍यांसाठी काही काम तसेच अपंग व्यक्तींसाठी काम करते.

याव्यतिरिक्त औरंगाबादच्या आसपास काम करणार्‍या बर्‍याच जणांना मी वैयक्तिकरित्या ओळखते. त्यांच्याशीही मला बोलून बघता येईल.
अंबाजोगाई, लातूर भागात काम करणार्‍या मानवलोकच्या डॉ. लोहिया आणि शैलाभाभींशी सुद्धा मला संपर्क करता येईल.
दिल्लीमध्ये राहून जे काम करता येईल ते मी करू शकते. आर्थिक मदतीमध्ये सहभागी होता येईल.

अल्पना, प्लीज माहिती काढू शकशील का?
तसेच कोणकोणत्या प्रकारची मदत करता येऊ शकेल याची कल्पना आली तर त्याप्रमाणे हालचाल करता येईल.
चिनूक्स, तूही विचारून सांगू शकशील का?

अंधशाळेकडे सध्या आपण गेल्या वर्षी दिलेल्या हायजिन प्रॉडक्ट्स चा स्टॉक अजून शिलकीत आहे. ऑक्टोबर पर्यंत तो साधारणपणे पुरू शकेल असे तेथील बाईंनी सांगितले. त्यांची सध्याची गरज आहे ती सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट लावणार्‍या इन्सिनरेटर (भट्टी) ची. त्याबद्दल त्यांच्याकडून माहिती मागवली आहे. मिळाली की लगेच इथे देईनच!

नीरजा, भगीरथ ग्रामविकासला लागणार्‍या पुस्तकांची यादी येथे देऊ शकशील का?

वांगणी,बदलापूर परिसरात आदिवासी/शेतमजूर मुलांसाठी आमची 'सहप्रवास' नावाची एक नोंदणीकृत संस्था कार्यरत आहे. संस्थेबद्दल यापूर्वीही मी मायबोली वर लिहिले आहे.
पुनः लिहावे की नको या विचारात थोडा उशीर झाला.
http://www.maayboli.com/node/37916

सध्या 'शिवभक्त आश्रमशाळा ' या आश्रमशाळेवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. आठवीपर्यंत असलेल्या या शाळेचे वर्ग वाढवणे,मुलामुलींच्या व्यक्तिमत्वविकासावर लक्ष देणे,वैद्यकीय शिबिरांमधून मुलांसहित ग्रामस्थांना मोफत रोगचिकित्सा व आयुर्वेदिक औषधे देणे इत्यादि..
गरिबीमुळे व वीजटंचाईमुळे सोलर लँप्स पुरवण्याची कल्पना चांगली वाटली. नियमितपणे विविध विषय शिकवायला कुणी मुंबईवरून विकांतांना/पंधरवड्याला येऊ शकत असेल तर तसेही कळवावे.मध्य रेल्वेच्या वांगणी स्टेशनवर उतरून येता येते.
आर्थिक मदत केल्यास ८०G अंतर्गत वजावट मिळते.

केश्वीनी,नीधप, अल्पना,भारती, अकु, मो - खुप उत्तम कल्पना पुढे आल्यात. उरलेली माहिती तुमच्याकडुन कळल्यावर एकुण करण्याचे उपक्रम व त्या सर्वांना लागणारी आर्थिक आणि इतर मदत अपेक्षीत मदत ह्याची यादी टाकु.
चिनुक्स - काही अजुन माहिती मिळाली का?

सुनिधी, मराठवाड्यातील एखाद्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी काय करता येऊ शकतं याबद्दलची एक कल्पना मी मांडली आहे आणि त्या पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे माझा सहभाग असेल. पण मी माहिती कसली आणि कुठून आणू? मी मराठवाड्यातली नाहिये.

धन्यावाद विनय, अनिता आणि भावना.

आर्थिक किंवा श्रमदान उपक्रमात मदत करण्याची इच्छा दाखविणार्‍या सर्वांचे धन्यावाद.

आतापर्यंत आपल्याला खालील संस्थाची नावं मायबोलीकरांनी सुचवली आहेत -

शबरी सेवा समिती - भक्ती पेंडसे
भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान - नीधप
जनार्थ - अल्पना
अंधशाळा
Read Initiative India - माधुरी१०१
वनराई - हर्पेन

अजुनही संस्था सुचविण्याची वेळ गेलेली नाही. पण नावाबरोबरच संस्थेची काय गरज आहे त्याबद्दल कळवले तर अधिक उपयोगी ठरेल. (किंवा संपर्काकरता नाव आणि फोन नंबर, वेब साईट असल्यास ती माहिती वगैरे)

आर्थिक किंवा श्रमदान (म्हणजे कुदळ-फावडी घेऊन खोदकाम किंवा वृक्षारोपण नव्हे तर निवडलेल्या संस्थेला ज्या प्रकारची प्रत्यक्ष हजर राहून करण्यासारखी मदत आहे ती करणे) उपक्रमात मदत करण्याची इच्छा दाखविण्यार्‍या सर्वांची नोंद केली गेली आहे. तसेच स्वयंसेवक होण्याकरता हात वर केलेल्यांची नावे पण नोंदवून घेतली गेली आहेत.

लवकरच आपण वस्तूरुपात मदत करण्याकरता संस्था आणि श्रमदानाकरता उपक्रम ह्यांची निवड करु. ज्यांनी मदतीकरता हात वर केले आहेत त्यांचा गट बनवून त्याप्रमाणे पुढील चर्चा करता येईल. आर्थिक मदत करु इच्छिणार्‍यांकरता बँक अकाऊंट बद्दल माहितीही दिली जाईल.

शक्यता आहे की काही जणांना सार्वजनिक बाफ वर समाजसेवेबद्दल जाहीरपणे लिहिणे रुचत नाही आणि पडद्याआड राहून काम करायला आवडते (बर्‍याच जणां/णींनी ह्यापूर्वी anonymous राहून आर्थिक मदत केली आहे) त्यांनी सुनिधी, अरुंधती कुलकर्णी किंवा मला विपु किंवा संपर्काद्वारे कळवले तरी चालेल.

मला काल 'care india' पुणे, येथून फन आला होता, आर्थिक मदत करा म्हणून. विमाननगरचा पत्ता सांगितला. ही HIV बाधित लहान मुलांसाठी काम करणारी संस्थ आहे असे मोनाली नावाच्या मुलीने सांगितले. खरच अशी संस्थ आहे का? खात्री करुन मदत करावी म्हणून विचारतीये. त्यांचा नंबर - ०२०-६७२९०६६६.

सुनिधीच्या सूचनेनुसार तपशील देत आहे.
पुस्तकांची यादी मला आज रात्रीपर्यंत मिळेल. नंतर इथे टाकेन.

भगीरथसाठी दिलेल्या कोणत्याही आर्थिक मदतीची रक्कम कितीही लहान असली तरी पावती मिळेलच. पावतीचा उपयोग ए टि जी साठी होऊ शकतो. रकमेचा विनियोग कसा कसा केला यासंदर्भाने माहिती देणारे पत्र तुम्हाला मिळते.
वस्तूरूपाने केलेल्या मदतीबद्दलही पावती आणि नंतर विनियोगासंदर्भाने माहिती देणारे पत्र असते.

१. लागणारी वस्तु - सोलर दिवा
किती लागतील - ४०० दिव्यांची गरज आहे. पण आपण त्यातली जमेल तेवढी जबाबदारी उचलू शकतो. तसेच आधी सांगितल्याप्रमाणे
>> हे लॅम्प मुलांना फुकट वाटून टाकण्याऐवजी लॅम्प दिल्यानंतर पुढच्या वर्षभरात शक्य झाल्यास दीड हजारापैकी जेवढी जमेल तेवढी रक्कम मुलाच्या कुटुंबियांनी परत द्यावी अशी विनंती केली जाते. त्या परत आलेल्या पैशातून अजून काही लॅम्प्स अजून इतर मुलांना देता येऊ शकतात. जेणेकरून देणगी म्हणून आलेल्या रकमेचा उपयोग जास्तीत जास्त लोकांना होऊ शकतो. <<
त्यांना २०० दिव्यांची मदत मिळाली होती, वर्षभराने परत आलेल्या पैशातून अजून ७० मुलांना दिवे देता आले.

एका वस्तुची किंमत - रू. १५००.

संस्था ती वस्तु कुठुन घेते? - बॉटम ऑफ द पिरॅमिड, पुणे या नावाची पुण्यातली कंपनी आहे त्यांचे दिवे हे सर्व पातळ्यांवर योग्य वाटल्याने निवडले गेले आहेत.

पोचवण्याची व्यवस्था , त्याला लागत असतील तर वेगळे पैसे. - भगीरथसाठी पुण्याच्या संस्थेने थोडा डिस्काउंट दिलेला असल्याने १५०० मधे दिवे पुणे ते झाराप, सिंधुदुर्ग न्यायचा खर्च आणि भगीरथ पासून जिथे जिथे मुलाचं गाव आहे तिथे तिथे दिवा पोचवायचा खर्च हे दोन्ही आहेत.
आपल्यापैकी कोणाला पुण्यातून हे दिवे घेऊन झारापला भगीरथमधे दिवे सुपूर्द करण्यास जायचे असल्यासही त्यांची हरकत नाही. पण ते शक्य नसेल तर आर्थिक मदत त्यांच्याकडे पोचवली तरी ते दिवे मागवणे वगैरे करू शकतात.

२. सायकल किंवा सायकल + हवेचा पंप (शाळांसाठी)
सिंधुदुर्गात मुलगी आहे तर शाळेला कशाला जायला हवं ही मानसिकता कमी आहे पण रोजची ४-४ किमि पायपीट शाळा सोडायला लावते. यासाठी ज्यांना आर्थिक रित्या शक्यच नाही अश्या मुलींना सायकली देणे जेणेकरून त्या शाळेत जाऊ शकतील हा उपक्रम आहे. तसेच ७ वी पर्यंतच्या शाळांमधे सायकल देणे आणि विद्यार्थ्यांना ती शिकवायला लावणे हा उपक्रमही आहे. त्यामुळे सायकली ह्या वैयक्तिक आणि शाळेत अश्या दोन्ही ठिकाणी दिल्या जातात. हवा भरायला पंप नाही म्हणून दिलेली सायकल शाळेत कुठेतरी कोपर्‍यात धूळ खात पडली हा अनुभव लक्षात घेऊन शाळेसाठी सायकल देताना बरोबर हवेचा पंपही दिला जातो.
किती लागतील - दिव्यांच्याप्रमाणे या गरजेचा सर्व्हे झालेला नाही. सिंधुदुर्गात साधारण ७५० गावं आहेत. प्रत्येक गावात ४-५ मुली तरी गरजू असतील. तसेच ५-७ वीची शाळा जिथे जिथे आहे अश्या शाळांना द्यायचे झाल्यास १००० च्या पुढे आकडा जाईल.
एका वस्तुची किंमत - रू. ३८००
संस्था ती वस्तु कुठुन घेते - सिंधुदुर्गातल्या प्रत्येक तालुक्यात एकेक सायकलींचे दुकान ठरवलेले आहे.
याचबरोबर वापरलेल्या पण सुस्थितीत असलेल्या सायकल्स डोनेट करायच्या असतील तरी या उपक्रमासाठी करता येतील. मात्र त्या सुस्थितीत हव्यात आणि भगीरथपर्यंत आणून द्याव्या लागतील.

पोचवण्याची व्यवस्था , त्याला लागत असतील तर वेगळे पैसे. - nil -

धन्यवाद नीधप!

कोथरुड - पुण्याच्या अंधशाळेकडून त्यांना गरज असणार्‍या सॅनिटरी नॅपकिन्स इन्सिनरेटर बद्दल माहिती आलेली आहे. त्या संदर्भात वेगवेगळ्या कंपन्या / संस्थांच्या उत्पादनांची माहिती मागवलेली आहे. येथे अपडेट देईनच.

उद्या दुपारी १२:३० आणि ४:३० वाजता एबीपी माझावर भगीरथच्या कामासंदर्भाने १० मिनिटांचे एक फिचर दाखवले जाणार आहे. भगीरथच्या विचारधारेसंदर्भाने डॉ. प्रसाद देवधर स्वतः माहिती देणारेत. भगीरथबद्दल जाणून घ्यायच्या दृष्टीने इंटरेस्ट असेल तर जरूर बघा.

Pages