'चांदवड'च्या मुलखात :भाग २: 'इंद्राई' ची नवलाई

Submitted by Yo.Rocks on 17 February, 2013 - 12:25

'चांदवड'च्या मुलखात :भाग १: किल्ले राजधेर इथून पुढे :

तसे पठार मोकळेच होते त्यामुळे वाट सापडण्यात फारशी अडचण झाली नाही.. इथेच दुसर्‍या गावातून येणारी वाट येउन मिळत होती तेव्हा कुठे आम्ही लाईनवर आहोत याची जाणीव झाली नि सुटकेचा नि:श्वास सोडत पुन्हा बसकण मारली !! आम्ही थोडी वेगळीच वाट पत्करली होती.. शांतपणे पुन्हा एकदा इंद्राई किल्ल्याबद्दल आणलेले कट-ऑउटस वाचून घेतले.. तेव्हा लक्षात आले की ही वाट म्हण़जे राजधेरहून इंद्राई किल्ला जितका संपुर्ण दिसतो त्याला पुर्णपणे वळसा घालून मागच्या बाजूने असणार्‍या पायर्‍यांच्या मुख्य वाटेला जाउन मिळणार.. !! श्या हे गावकर्‍यांनी सांगितले असते तर उगीच इतका मनस्ताप करुन घेतलाच नसता.. असो, अंदाज बांधला.. बघितले तर सुर्यास्त होण्यास तासभर वेळ शिल्लक होता.. आम्ही लगेच लेटस गो केले.. .. अडचण एकच होती राजधेरप्रमाणे इंद्राई किल्ल्याचा नकाशा मात्र नव्हता.. त्यामुळे या अवाढव्य किल्ल्यावर गुहेचा शोध हे अजुन एक जिकरीचे काम असणारेय हे लक्षात आले होते.. मघाशी दिसलेल्या गुहांचा उल्लेख मात्र वाचनात आला नव्हता.. कदाचित पाण्याचा स्त्रोत तिथे नसावा म्हणून असेल..

आता सुर्य इंद्राई किल्ल्याच्या पल्ल्याआड गेल्याने सावलीतून वाटचाल सुरु होती.. कारवीच्या सुकलेल्या झुडूपांतून जाणारी वाट लागली.. निवडुंगांनी तर इथला सार्‍या प्रांतात आपली मक्तेदारी दाखवली होती..आता आमची वाट अगदी इंद्राई किल्ल्याच्या जवळून जात होती.. काही अवधीतच आम्ही इंद्राईच्या मागच्या बाजूला नेणार्‍या वळणावर पोहोचलो.. तिथेच खाली एक छोटे देउळ लागले तिथूनही नक्कीच वाट असावी जी ‘वडबारे’गावात उतरत असावी… अखेरीस इंद्राई किल्याल्या प्रत्यक्षात भिडणार्‍या कोरलेल्या पायर्‍या आम्हाला नजरेस पडल्या.. डावीकडे उभा असलेला ‘साडेतीनरोडग्यां’चा डोंगर नि मधल्या अतिविशाल परिसरामध्ये एकही झोपडं नाही.. शेती नाही.. फक्त एक जुनेपुराणे पडके मंदीर दिसत होते.. बाकी सगळा नुसता वाळवंटच.. एक ओढा तो पण सुकलेलाच..

लवकरच पायर्‍या चढायल्या घेतल्या.. सुरवातीच्या पायर्‍या कातळाला भगदाड पाडूनच कोरलेल्या आहेत.. पुढे त्या वळण घेउन घळीत आणून सोडतात.. भोगदासदृश घळीतले खडक फोडून बनवलेल्या पायर्‍यांची ही वाट तर खासच… दोन्ही बाजूला खडा पहाड.. त्या पहाडावर पण कुठे ना कुठे तरी पुरातन बांधकामाच्या खुणा दिसत होत्या.. नि वरती पहाडाच्या कडयावरुन डोकावणारे निवडुंगाचे काटे !

पायर्‍यांच्या वळणावर रो.मा. थकलेला..

घळीतून जाणारी पायर्‍यांची वाट

- -

आम्ही आता बर्‍यापैंकी निवांतपणे चढत होतो.. ह्या पायर्‍या चढून वरती येताना लागणारे उद्ध्वस्त प्रवेशद्वार खूपच विस्कळीत.. बुजलेले.. खचलेले.. ! याच प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस राजधेरप्रमाणेच फारसी शिलालेख दिसतो.. वरती पोहोचताच एकदम खुष झालो.. नि पुन्हा एकदा विश्रांती ! आता झोपेशिवाय आराम नाही हाच पर्याय शिल्लक वाटत होता.. म्हटले आता पटकन गुहेचा माग घेउ नि निवांतपणे झोकून देउ..

पण ऐकल्याप्रमाणे व चढाई करताना अंदाज बांधल्याप्रमाणे इंद्राई मिळेल तसा पसरलेला दिसला.. या किल्ल्यावर प्रवेश करताच डावीकडे चांदवड किल्ल्याकडे तोंड करुन गुहा आहेत हे पक्के ठाउक होते त्यामुळे डावीकडे थोडे जाउन पाहिले पण काही क्षणातच आणखीन एक खोल घळीचा कडा लागला.. तिथे रो.मा सरळ दुरवर जाउन पाहून आला पण त्यालाही काही सापडेना.. पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहीले.. पुढे जायचे नि गुहा नाही मिळाली तरीपण बोंब होती.. शिवाय सुर्यदेव आता लगबगीने क्षितीजापल्ल्याड जायला निघालेले… ट्रेकगुरु मायबोलीकर ‘स्वच्छंदी’ व ‘हेम’ यांना तात्काळ फोन करुन विचारुन घेतले पण त्याक्षणाला त्यांना पण लगेच आठवेना.. वेळ कमी होता नि डावी बाजू पक्की होती म्हणून सरळ इंद्राईच्या डाव्या कडेने भराभर चालायला घेतले.. तिघेही जण ठराविक अंतर ठेवून चालू लागले म्हणजे अगदी काही दिसायचे राहुन जायला नको.. बराच पटटा चाललो पण गुहा काही सापडेना.. तिथे पश्चिमेस दिनकरम्हाराजांनी आजच्या दिवसाचा अखेरचा रामराम जवळपास घेतलेला.. म्हणून उजवीकडे जाउन क्षणभर का होईना पाहू म्हणत वळालो… तर समोरील दृश्य पाहून सगळ्या गोष्टीचा विसरच पडला ! काय म्हणावे.. मावळत्या दिनकरम्हाराजाला मानवंदना देण्यासाठी सातमाळा रांगेतील शिखरांनी दाट सोनेरी धुक्यातूनही आपापली मान उंचावलेली.. कॅमेर्‍यात फोटो घेणे काही लगेच सुचले नाही नि जेव्हा सुचले तेव्हा मात्र धुसर वातावरणात काही जमले नाही… गुहेच्या शोधात वेळही नव्हता.. घाईघाईत मग धुक्याच्या पडद्यात उमटलेल्या त्या डोंगररांगाच्या आकृत्या तशाच फक्त नजरकैद करुन घेतल्या नि चालू पडलो..

त्या आकृत्या टिपण्याचा केविलवाणा प्रयत्न

एव्हाना पुढून रो.मा व गिरीविहारचा गुहा सापडल्याबद्दलचा ‘एsओss’ मिळाला.. अगदी डाव्या बाजूलाच कडेला चांदवड गावाकडे तोंड करून असणार्‍या गुहांनी दर्शन दिले.. पण हे दर्शन घडण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारापासून बरीच पायपीट करावी लागली.. वाटेत वीटांनी बांधलेली पण टिकाव न धरलेली पडकी खोली (कोणीतरी प्रयत्न केला असावा), सुकलेले पाण्याचे टाके व मृत जनावराचे (गुराचे) फक्त सांगाडे एवढ्याच काय त्या खुणा डाव्या बाजूने जाताना लागल्या…

गुहांबद्दल सांगायचे तर कातळात खोदलेल्या रांगेने १०-१५ गुहा आहेत.. सगळ्यांचा आकार जवळपास एकसारखाच.. बांधणी एकसारखीच.. एक आखूड दरवाजा नि दोन खिडक्या.. गुहेचे तोंड पुर्वेकडे.. ”साडेतीनरोडग्यां”नामक डोंगराकडे.. ह्याच डोंगरापलीकडे दिसणारा चांदवड परिसर.. सारे काही गुहेपाशी बसून दिसते… पण बहुतांशी गुहा या सुकलेली चिखलमाती वा ओबडधोबड पृष्ठभागामुळे राहण्यास योग्य नाहीत.. रांगेतील अगदी डावीकडच्या दोन-तीन गुहा त्यात चांगल्या वाटल्या शिवाय तिथेच कडेला पाण्याचे टाकेपण गुहेतच आहे.. बारामाही पाणी असते म्हणे.. आम्ही डावीकडची दुसरी गुहा निवडली नि अंधार पडायच्या आत पाणी भरून घेण्यासाठी टाके पाहिले.. नि मन थोडे कचरले.. पाण्याला पुर्णतः शेवाळाने गिळंकृत केले होते.. पण जेवण करण्यासाठी पाणी आवश्यक होते सो शेवाळाचा पडदा बाजूला केला तर पाण्यातील अगदी तळ दिसू लागला.. गिरीने चाखून पाहिले.. ओकेचा इशारा मिळाला.. तरीदेखील पाणी चांगलेच उकळून जेवण बनवण्याचे ठरवले.. !

आता थंडगार झोंबणारा वारा सुटलेला.. आम्ही पुन्हा थंडप्रतिबंधात्मक वस्त्रे चढवलेली… नि काळोख्या रात्रीची सुरवात झालेली.. गुहेच्या बाहेर कातळाला खेटूनच असलेल्या व सुक्या निवडुंगाच्या जीवावर पेटवलेल्या छोटया चुलीच्या आगीचा प्रकाश मात्र धगधगत होता.. चुलीवरच्या पातेलात सूप उकळ घेत होते.. फडफडत्या मेणबत्तीच्या प्रकाशात खिचडीच्या तयारीसाठी कापाकापी सुरु होती.. संपुर्ण गडावर फक्त आम्हा तिघांना पाहून चंद्रप्रकाशाने गुहेसमोरील भाग थोडाफार उजळवला होता.. दुर दिसणार्‍या चांदवड परिसरातले दिव्यांचे तारांगण लक्ष वेधून घेत होते…. बाकी सारे शांत शांत शांत ! चांदवडजवळील महामार्गावरुन जाणार्‍या एखाद-दुसर्‍या गाडीचा दुरुन येणारा आवाज काय तो शांततेला चीर देत होता.. नि इथे कधी खातोय नि घोरतोय या संधीची जो तो वाट बघत होता..


(प्रचिकार - रोहीत.. एक मावळा)

गरम सुप पोटात ढकलले नि अगदी नाही पण जवळपास मृत झालेल्या आमच्या हालचालीला गोगलगायची गती मिळाली ! त्यातही ‘आळसपणा’ दाखवण्यात चढाओढ सुरु झाली.. टेकवलेले बुड जल्ला काही उचलवत नव्हते.. Proud राहिलेले काही सामान आणण्यासाठी गुहेत जायचे ते पण वाकून नि तिथेच अंधारात टॉर्चच्या मदतीने सॅकमधून शोधून काढायचे.. जल्ला ज्याम कंटाळवाणे ! शिवाय यावेळेस मदतीला ‘इंद्रा’ व ‘नविन’ हे मायबोलीआचारी-सहकारी नसल्यामुळे चुलस्वयंपाकाचा भार साहाजिकच माझ्यावरच.. नव्या संसाराचा वर्षभरचा अनुभव पणाला लावत जवळपास उचलला.. तर संसाराचा गाडा चालवण्यात एव्हाना ग्रँडमास्टर बनलेल्या गिरीने अधुनमधून मार्गदर्शकाची भूमिका बजावली.. आणि संसार-मंडळात पदार्पण करण्यास उत्सुक असलेल्या रो.मा ने ‘आपल्याला पण जमेल का’ चे कौशल्य पडताळून पाहीले.. परिणामी शेवटी एकदम फर्मास स्वादीष्ट खिचडी तय्यार ! झाले अचानक हालचालींना वेग आला.. नि काही अवधीतच खिचडीतॄप्त ढेकर दिले गेले.. !

गुहेत एकमेव पेटवलेली मेणबत्ती विझण्याआधीच आमचा डोळा लागला.. जाग आली तेव्हा काळोखाने नुकताच निरोप घेतला होता.. बाहेर पुन्हा थंडगार वारा सुटला होता.. अपेक्षेप्रमाणे धुक्याची दुलाई पसरलेली असल्याने सुर्यनारायणांचा पत्ता नव्हता.. माझी थोडी निराशा झालेली.. सुर्योदय चुकल्यामुळे नव्हे तर माझ्या आतापर्यंतच्या ट्रेकमध्ये नेहमीच साथ देत आलेली व शेवटचे घटके मोजत असली तरीही तीला सोबत बाळगलेली अशी ती माझी ‘काउबॉय’ हॅट हरवल्यामुळे ! कालच्या वाट व गुहा शोधण्याच्या गडबडीत कुठे पडली ते कळलेच नाही.. Sad असो नव्याने उजाडलेला दिवस तसा प्रजासत्ताकदिन म्हणून वैशिष्टयपुर्ण.. त्यात गिरीविहारचा वाढदिवस ! ह्या पठठ्याने आतापर्यंत ५-६ वाढदिवस किल्ल्यांवरच साजरे केलेत.. तारीखच तशी आहे !

पुर्वेच्या क्षितीजावर ‘दोनरोडग्या’च्या डोंगरापलिकडे तांबडा ठिपका उमटला नि मग हातपाय सैल करण्यासाठी उडया मारुन घेतल्या..

कालचा थकवा वगैरे सगळे गायब.. लगेच चायपत्ती व आले टाकून कडक चहा झाला.. अन्न फुकट जायला नको म्हणून नाश्त्यासाठी आणखीन काही न करता रात्रीची उरलेलीच खिचडी गरम करुन ताव मारला.. ! नाश्ता चालू असताना वातावरणाने अचानक रुप पालटले.. धुके तर होतेच.. त्यात ढगांचे झोत सैरभैर फिरु लागले.. समोर उभा असलेला दोन रोडग्याचा डोंगरदेखील अदृश्य झाला… ! सुर्यदेवांची अवस्था दिवसाढवळ्या दिसणार्‍या चंद्रासारखी झाली.. पण आम्ही तिथे फारसे लक्ष न देता खाण्यावरच लक्ष केंद्रीत केले…:P

सकाळचे नऊ वाजत आले नि आम्ही आटपते घेतले.. रोमा व गिरी पाणी उपसण्याच्या कामात तर अस्मादीक रोमाचे काळे टोप घासून पांढरे करण्याच्या कामात मग्न झालो.. सगळा ट्रेक पसारा आटपून गुहेला होत्या त्या अवस्थेत पुर्वतत केले..

रो.मा. पाण्याची बाटली भरताना..

गुहेतून एक झलक...

रांग गुहांची..

सोबत आणलेला मावाकेक कापूनच गिरीविहारचा वाढदिवस अगदी नावाला म्हणून साधेपणाने साजरा केला.. एक टाळ्या वाजवतोय.. एक केक कापतोय.. नि एक फोटू काढतोय.. !! व्वा असापण वाढदिवस साजरा होउ शकतो… फिदीफिदी मुक्कामी गुहेची साक्ष ठेवून ग्रुप फोटो झाला.. नि कूच केले..

सेलिब्रेशन !

एक ग्रुप आठवण..

एव्हाना पाच-सहाजणांचा ग्रुप आला.. जवळच्या गावाकडूनच आलेले.. त्यात दोघे नजिकच्या चांदवड गावातून खास ध्वजारोहण करायला आलेले.. आम्हाला आमंत्रण दिले गेले.. म्हटले वरती महादेवाचे मंदीर आहे तिथे भेटू.. या गुहांच्याबाजूनेच वरती जाण्यास कोरलेल्या पायर्‍या आहेत.. तिथूनच वरती आलो नि समोर ढगांनी वेढलेला इंद्राईवरचे टेकाड दिसले.. सभोवतालने पुन्हा स्वतःला धुसर धुक्याकडे हवाली केले होते..

गुहांच्या वरती येताना

मी एकटा.. एकटया जगात..

पुढे जेमतेम पाच दहा मिनिटांवर पुन्हा डाव्या कडेलाच महादेवांचे मंदीर व समोरच सुकलेले बांधीव टाके दिसले.. मंदीर कातळात खोदुन उभारलेले.. तेथील खांबामुळे राहण्यासाठी अगदी प्रशस्त जागा नाहीये..

- -

- - -

तो ग्रुप आमची वाट बघत होताच.. म्हटले हे ध्वजरोहण करणार नि मग तिरंगा उतरवणार कधी.. की असाच ठेवणार…तोच त्या माणसाने पोते उलगडायला सुरवात केली नि लक्षात आले ते पोते नसून गुंडाळलेला तिरंगाच आहे.. अबब किती तो विशाल तिरंगा.. डोळे निवले.. पुर्ण उघडण्यासाठी सहाजणांचा हातभार लागला.. ! विचारपुस केला तेव्हा कळले.. हा तिरंगा त्या व्यक्तीच्या पंजोबाच्या काळापासून आहे.. नि दर पंधरा ऑगस्ट व २६ जानेवारीला इथे घेउन येतात.. परंपरागत चालू आहे.. ! म्हटले हा फडकावत कसा असणार.. आतातरी आम्ही प्रत्येकाने एकेके टोक पकडून फडकवला.. अभिमानाने राष्ट्रगीत म्हटले.. वंदे मातरम ! भारतमाता की जय ! नारळ फोडला गेला.. नि हा फोडण्यांचा मान त्या व्यक्तीच्या भाषेत ‘पाहुण्यां’कडे दिला गेला.. नि आमच्यात पावणा म्हणून उठून दिसणार्‍या गिरीविहारनेच कामगिरी पार पाडली.. फोटो काढणे वगैरे आलेच.. त्या ग्रुपला पाठवण्यासाठी इमेल आयडी, फोन नं घेउन आम्ही त्यांच्या निरोप घेतला.. अकस्मात सारे घडले होते नि एका अभिमानास्पद अनुभवाची भर पडली.. !!

या मंदीरापासून पुढे वाट इंद्राईच्या सर्वोच्च भागावर जाते.. पाहण्यासारखे काही नसल्याने व धुसर वातावरणामुळे आम्ही माघारी परतण्याचा निर्णय घेतला.. आता परतीच्या वाटेने येताना मात्र राजधेरकडे तोंड करून असणार्‍या कडेने चालू लागलो.. वाटेत पुर्वी काहीतरी असावे अश्या दोनतीन ठिकाणी खुणा आढळल्या.. शिवाय एक-दोन वाट खाली जाताना दिसल्या खर्‍या पण निश्चीत नसल्याने आम्ही मुख्य वाटेनेच परतलो.. कदाचित त्या वाटा राजधेरकडे तोंड करुन असणार्‍या गुहेपाशी घेउन जात असाव्यात.. तसेही तिथे पाणी नसल्याने मुक्कामासाठी थोडया त्रासदायकच.. पुन्हा पायर्‍यांपाशी येउन पोहोचलो..

अगदी सुरवातीला लागणार्‍या पायर्‍या लागतात तिकडची वाट..

उतरण्यास घेइपर्यंत अकरा वाजत आले होते.. त्यामुळे साडेअकराची राजधेरवाडीहून सुटणारी एसटी मिळेल की नाही याबद्दल साशंक होतो.. गेली तर गेली म्हणत आम्ही निर्धास्तपणे उतरु लागलो.. उतराना मात्र आम्ही दुसरी वाट पकडली जी पठारावर डाव्या बाजूने वरती येत होती.. नि काल आम्ही नेमके उजव्या वाटेने पठारावरती आलो होतो.. आम्ही आता पकडलेली वाट थेट उतरणीची, घसार्‍या मातीची असली तरी थेट खाली दिसणार्‍या खेडयामध्ये उतरत होती.. उतरताना अंदाज खरा ठरला.. वाडीत आलेली एसटी परतीच्या वाटेला लागली होती.. आम्हाला ‘टाटा’ करण्यावाचून पर्याय नव्हता..

पठारावरून दिसणारा इंद्राई किल्ला.. इथून पाहीला तर फसवाच !

- - -

आम्ही जवळपास खालच्या गावापर्यंत पोहोचत होतो.. नि ट्रेक संपत आल्याची गिरीला जाणीव झाली.. लगेच ‘ओ मामा.. इथं कुठे विहीर आहे का’ अशी गिरीची विचारणा नित्यट्रेकनियमानुसार विचारणा सुरु झाली.. जल्ला संपुर्ण गाव ओसाड दिसत होत… विहीर आहे हे दोघा तिघांनी सांगितलं खरं पण मुळ वाटेला सोडून पलिकडे.. शिवाय तिथे जाउन पाणी कितपत असेल याची खात्री वाटत नव्हती.. तेव्हा रस्त्याच्याकडेलाच एका दुकानापाशी विश्रांतीसाठी ठाण मांडले.. इथेच कळले आज रविवार असल्याने चांदवडला कांदेबटाटे घेउन जाणारे टेंपोसारखे वाहन मिळणे मुश्किल.. जीप वगैरे तर वाट पाहत बसणे म्हणजे संध्याकाळ पण होउ शकते.. आता थांबायचे की चालू पडायचे हे ठरवायचे होते.. ! पुन्हा एक प्रश्नचिन्ह !

क्रमश :


'चांदवड'च्या मुलखात :भाग १: किल्ले राजधेर

चांदवड'च्या मुलखात :अंतिम भाग: "रंगमहाल"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिव्हलय यो Happy
सुर्यास्ताच्या वेळी गुहा शोधताना पाहिलेले सातमाळा दर्शन.....,चंद्राच्या दुधाळ प्रकाशात बनविलेली खिचडी..., इंद्राईहुन दिसणारे टिमटिमणारे चांदवड....,सोनेरी पहाट त्याला धुक्याची साथ .. गिरीचा वाढदिवस अन भारताचा प्रजासताक दिन .. सगळच कस दणक्यात झाल अन अजुन एक विलक्षण ट्रेकची नोंद झाली.

छानच. फोटो मस्तच.

( तिरंगा असा जमिनीला टेकलेला फोटो, माझ्या आठवणीप्रमाणे नियमबाह्य आहे. जरा नियम बघणार का ?)

सुर्यास्ताच्या वेळी गुहा शोधताना पाहिलेले सातमाळा दर्शन.....,चंद्राच्या दुधाळ प्रकाशात बनविलेली खिचडी..., इंद्राईहुन दिसणारे टिमटिमणारे चांदवड....,सोनेरी पहाट त्याला धुक्याची साथ .. गिरीचा वाढदिवस अन भारताचा प्रजासताक दिन .. सगळच कस दणक्यात झाल अन अजुन एक विलक्षण ट्रेकची नोंद झाली. > सहीच... इट्रेक बद्दल आभारी Happy

यो...
मस्तच लिहिलं आहेस..आणि माझ्या मते इंद्राई जवळच्या गावाचं नाव वेडबरी नसून "वडबारे" आहे..

पुढचा भाग येऊ द्या लवकर...