यूआयडी आधार कार्ड साठी होणारी अडवणूक टाळा ; ही कागदपत्रे जवळ बाळगा

Submitted by विक्रांत-पाटील on 17 February, 2013 - 04:16

यूआयडी आधार कार्ड साठी होणारी अडवणूक टाळा ; ही कागदपत्रे जवळ बाळगा

अनेकदा आपली अडवणूक होते ती पुरेशी माहिती न ठेवल्यामुळे किंवा कर्णोपकर्णी ऐकलेल्या माहितीची खातरजमा न करता तिच्यावर सरसकट विश्वास ठेवल्यामुळे. सरकार अनेकदा आवाहन करते त्या जाहिराती आपण वाचतही नाही. माझ्या स्वत:च्या अनुभवावरून हे लिहितोय. 'आधार' साठी कंत्राटी मुले असतात; ते फक्त नाव व पत्ता नोंदवून मोकळे होतात. इतर माहिती नोंदविण्याचा कंटाळा करतात. मात्र ई-मेल व मोबाईल क्रमांक जरूर नोंदवून घ्यावेत. एजन्सीच्या माणसाने केलेल्या नोंदी योग्य असल्याची खात्री करून मगच पोचपावती स्वीकारावी. त्याने ई-मेल व मोबाईल क्रमांक लिहिलेले नसल्यास ते त्याला नोंदविण्यास सांगणे. बँक अकाउंट क्रमांकही आधारला नोंदणीच्या वेळीच जोडून घ्यावा.

आधार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे :
१. ओळखीचा पुरावा (पीओआय: प्रूफ ऑफ आयडेण्टिटी)
२. रहिवाशी पत्त्याचा पुरावा(पीओए: प्रूफ ऑफ एड्रेस)

आपल्याला फक्त खालील दोनपैकी प्रत्येकाची एकेक झेरॉक्स कागदपत्रे व खातरजमा/­पडताळणीसाठी मूळ (ओरिजिनल) डॉक्युमेंट आणायची आहेत. जर ओरिजिनल जवळ नसतील तर फक्त सक्षम राजपत्रित अधिकारी किंवा पब्लिक नोटरी यांच्याकडून एटेस्टेड असलेली कागदपत्रेही खातरजमा/­पडताळणीसाठी ग्राह्य धरली जातात; ती आणावी लागतील.

ओळखीचा पुरावा (पीओआय) व रहिवाशी पत्त्याचा पुरावा (पीओए) ही दोन कागदपत्रेच महत्त्वाची आहेत. इतर सर्व रकान्यात माहिती नोंदणी एजन्सी भरेल किंवा ती ऐच्छिक आहेत. तरीही रकाना ९ मधील जे बँक अकाउण्ट आधार कार्डशी जोडायचे आहे त्याची माहिती जरूर भरावी. त्यासाठी बँक खाते क्रमांक आणि खाते असलेल्या शाखेचा आयएसएफसी कोड आपणास माहिती असावा. ज्यांच्याकडे बर्थ सर्टिफ़िकेट (जन्मदाखला), एसएसएलसी बुक/­सर्टिफ़िकेट, पासपोर्ट किंवा अ श्रेणीच्या फ़र्स्ट क्लास राजपत्रित अधिकारयाने लेटरहेडवर दिलेला जन्मदाखला या चौघांपैकी एक डॉक्युमेंट असेल त्यांनी रकाना ५ मध्ये वयाचा (एज) तपशील नोंदविताना व्हेरिफ़ाईड (पडताळलेले) बॉक्समध्ये टीक करावे. ज्यांच्याकडे जन्मतारखेची कागदपत्रे नाहीत; पण जन्मतारीख माहिती आहे त्यांनी डिक्लेअर्ड (घोषित) बॉक्समध्ये टीक करावे. ज्यांना जन्मतारीख नेमकी माहिती नाही त्यांनी फक्त अंदाजे वय लिहावे. ज्यांच्याकडे आपल्या घरी जनगणना करायला आलेल्या व्यक्तीने दिलेली एका छोटीसी स्लीप असेल त्या स्लीपरील एनपीआर नंबर (राष्ट्रीय जनगणना रजिस्टर सर्वेक्षण स्लीप क्रमांक) लिहावा.
आधार नोंदणी फॉर्म केवळ एका पानाचा अतिशय सोपा व सुटसुटीत आहे. फक्त माहिती भरताना कैपिटल लेटर्समध्ये अचूक व नेमकी भरावी. फॉर्म जरी एजन्सीच्या माणसाने भरला तरी आपण स्वत: अचूक माहिती नोंदविल्याची खात्री करून घ्यावी. पत्ता, वय व बँक खाते क्रमांक याबाबत विशेष काळजी घ्यावी.
आपण आधार नोंदणीसाठी ही माहिती जरूर लक्षात ठेवावी. इतरत्रही आपणास, आपले मित्र, नातेवाईक, शेजारी, परिचित यांना ती उपयोगी पडू शकते. नेमक्या माहितीअभावी अनेकदा गोंधळ उडतो, फसवणूक होउ शकते. आधार नोंदणीसाठी बाहेरही कुठे एक पैसाही शुल्क लागत नाही. आधार कार्डची नोंदणी कोणीही भारतभर कोणत्याही केंद्रावर करू शकतो; फक्त त्याच्याजवळ ओळखीचा पुरावा आणि जो पत्ता नोंदावितोय घराचा त्याचा पुरावा आवश्यक असतो.
आधार फॉर्म अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड केलेलाही चालतो. त्यात नोंदणीच्या वेळी केंद्रावर एजन्सीमार्फत रकाना १ मध्ये जो प्रीएनरोलमेण्ट आयडी (नोंदणी क्रमांक) नोंदविला जातो. तो नंतर आधार कार्डवरही वरच्या बाजूस नमूद करून येतो. जे पूर्वीचे फॉर्म आहेत त्यात हा प्रीएनरोलमेण्ट आयडी छापील असायचा म्हणून सरकारी फॉर्मचीच सक्ती असायची. आता मात्र कोणताही विहित नमुन्यातील फॉर्म चालतो. त्यात प्रीएनरोलमेण्ट आयडी नोंदणी एजन्सी भरून देते.

१) ओळखीचा पुरावा (पीओआय: प्रूफ ऑफ आयडेण्टिटी)
(खालील १८ पैकी कोणतेही एक ज्यावर पत्ता स्पष्ट व पूर्ण नमूद असावा; त्याच पत्त्यावर पोस्टाद्वारे आधार कार्ड पाठविले जाईल.)-
पासपोर्ट, पैन कार्ड, रेशन कार्ड/पीडीएस फ़ोटो कार्ड, व्होटर्स कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी फ़ोटो आयडी कार्ड/ सरकारी कंपनीचे आयडी कार्ड, एनआरईजीएस जॉब कार्ड, नोंदणीकृत शैक्षणिक संस्थेचे आयडी कार्ड, शस्त्र परवाना, फ़ोटो असलेले सरकारी बँकेचे एटीएम कार्ड, फ़ोटो असलेले सरकारी बँकेचे क्रेडिट कार्ड, पेन्शनर्स फ़ोटो कार्ड, फ्रीडम फ़ायटर फ़ोटो कार्ड, किसान फ़ोटो पासबुक, सीजीएचएस/­ईसीएचएस फ़ोटो कार्ड, पोस्ट खात्याने जारी केलेले पत्यासह फ़ोटोआयडी कार्ड, आधार कार्ड काढू इच्छिणारयाच्या फोटोसह राजपत्रित अधिकारी किंवा तहसीलदार यांच्यापैकी कुणीही एकाने लेटरहेडवर दिलेले ओळखत असल्याचे पत्र, राज्य सरकारचे फोटोसह अपंग कार्ड.

२) रहिवाशी पत्त्याचा पुरावा (पीओए: प्रूफ ऑफ एड्रेस) :
(खालील ३३ पैकी कोणतेही एक ज्यावर पत्ता स्पष्ट व पूर्ण नमूद असावा; त्याच पत्त्यावर पोस्टाद्वारे आधार कार्ड पाठविले जाईल.)-
लाईटबिल, टेलिफोनबिल, रेशनकार्ड, पासपोर्ट, सरकारी बँक खात्याचे पासबुक किंवा अकाउंट स्टेटमेण्ट, मतदान ओळखपत्र, सरकारी ओळखपत्र, पाणी पट्टी बिल, घरपट्टी बिल, मालमत्ता कर भरणा पावती, क्रेडिट कार्ड स्टेटमेण्ट, एलआयसी/­इन्शुरन्स पोलिसी, आधार कार्ड काढू इच्छिणारयाच्या फोटो व रहिवाशी पत्त्यासह बँकेने लेटरहेडवर दिलेले पत्र, आधार कार्ड काढू इच्छिणारया कर्मचारयाच्या फोटो व रहिवाशी पत्त्यासह नोंदणीकृत नियोक्ता कंपनीने लेटरहेडवर दिलेले पत्र, आधार कार्ड काढू इच्छिणारयाच्या फोटो व रहिवाशी पत्त्यासह नोंदणीकृत शैक्षणिक संस्थेने लेटरहेडवर दिलेले पत्र, एनआरईजीएस जॉब कार्ड, शस्त्र परवाना, पेन्शनर कार्ड, फ्रीडम फ़ायटर कार्ड, किसान पासबुक, सीजीएचएस/­ईसीएचएस कार्ड, आधार कार्ड काढू इच्छिणारयाच्या फोटो व रहिवाशी पत्त्यासह खासदार/आमदार/­राजपत्रित अधिकारी किंवा तहसीलदार यांच्यापैकी कुणीही एकाने लेटरहेडवर दिलेले पत्र, आधार कार्ड काढू इच्छिणारयाच्या फोटो व रहिवाशी पत्त्यासह सरपंचाने ग्रामपंचायतीच्य­ा लेटरहेडवर दिलेले पत्र(फक्त ग्रामीण भागासाठी), आयकर विवरण आदेश, वाहन नोंदणी पुस्तक (आरसी बुक), नोटरी केलेले सेल/लीझ/­रेण्ट करारपत्र, पोस्ट खात्याने जारी केलेले पत्यासह फ़ोटोआयडी कार्ड, राज्य सरकारने जारी केलेले आधार कार्ड काढू इच्छिणारयाचा फोटो असलेले कास्ट किंवा डोमिसाईल सर्टिफ़िकेट, राज्य सरकारचे अपंग कार्ड, एलपीजी गैस कनेक्शन बिल, पत्नीचा पासपोर्ट, वडिलांचा पासपोर्ट(अज्ञान मुलांसाठी फक्त)

आधारचा फॉर्म नंदन निलकेणी यांच्या भारत सरकारच्या अधिकृत वेबसाइटवरून डाऊनलोड करा.
http://­uidai.gov.in/­images/­FrontPageUpdates­/uid_download/­enrolmentform.pd­f

तुमच्या शहरा, घराजवळील आधार नोंदणी केंद्रांची यादी पाहा -
http://­appointments.uid­ai.gov.in/­easearch.aspx

आधार कार्ड नोंदणीसाठी ऑनलाईन वेळ निश्चित करून (आपोईन्टमेन्ट घेउन) गैरसोय टाळा-
http://­appointments.uid­ai.gov.in/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरच्या ३३ मध्ये आरसी बुक दिसले मला फक्त. १८च्या यादीत आहे, पण ३३ च्या यादीत कुठे आहे? का मलाच दिसत नाहीये? Uhoh

अरे मी रिप्लाय दिला तेव्हा पेज रिफ्रेश झालं नाही. माझा प्रॉब्लेम हा की मॅरेज सर्टीफिकेट वर सध्या रहातोय तो पत्ता कुठेच नाहिये. नवर्‍याचा आणि माझा दोघांचा ही जुना पत्ता आहे. सगळ्या बिलांवर सासू चं नाव आहे माझं किंवा नवर्‍याचं नाहिये कारण आम्ही बरेच वर्ष इथे नव्हतो. रेशनकार्ड, बिल आणि मॅरेज सर्टीफिकेट असं तिन्ही न्यावं लागेल बहुतेक.

श्या काहीतरी भुताटकी आहे. मी परत पाह्यलं. मला दिसतंय.
१८ वाल्या यादीत ५ वा नंबर
आणि ३३ वाल्या यादीत ६ वा नंबर.

1. Passport
2. Bank Statement/ Passbook
3. Post Office Account Statement/Passbook
4. Ration Card
5. Voter ID
6. Driving License

he ase distay mala

बापरे!!! किती चर्चा झाली!!!
हे अ‍ॅड्रेस प्रुफने माझं ही फार डोकं खाल्लय. पासपोर्टवर आधीचे नाव मग युएसवारी वगैरे प्रकरण असेल तर अजूनच.

माझं मधे पॅनकार्ड हरवलं, तर नवीन कार्ड साठी अप्लाय केलं. त्या फॉर्म मधे एक रकाना आहे जिथे तुम्ही तुमचा आधार कार्ड नं अपडेट करु शकता. मी ते केले.
मग नेहेमीप्रमाणे माझ्या नावावर एकही अ‍ॅड्रेस प्रुफ नव्हतं. त्यांनी म्हट्लयं की एम्ल्पॉयर कडून लेटर आणले तर चालेल. मग मी ते सबमिट केलं. आधार कार्डचीही फोटोकॉपी लावली. त्यावरील माहिती अगदी बरोबर आहे माझी, नशिब! त्यावर जो अ‍ॅड्रेस होता तोच मला पॅन कार्ड साठी द्यायचा होता. पण तरीही एम्ल्पॉयर कडून लेटर घेऊन तेही लावले.
तर मला नंतर असे कळवण्यात आले की मी जे एम्ल्पॉयर लेटर सबमिट केलयं त्यामधे माझे मिडल नेम नसल्याने ते गृहीत धरता येणार नाही. संपूर्ण नावासह अ‍ॅड्रेस प्रुफ सबमिट करा.
आता पुन्हा ते करणार आहे.
म्हणजे खरं तर आधार कार्ड वर पत्ता, फोटो, जन्मतारीख असूनही त्याचा सद्ध्यातरी उपयोग होत नाही. मी पेपरमधे वाचलेही होते की इन्कम टॅक्स डिपार्टमेन्टला आधार कार्ड गृहीत धरण्याची सुचना देण्यात आली होती.

म्हणजे खरं तर आधार कार्ड वर पत्ता, फोटो, जन्मतारीख असूनही त्याचा सद्ध्यातरी उपयोग होत नाही>>> आधार कार्डाचा कसलाच उपयोग नाहीये. पण ती मान्नीय सोनिया गांधीजींची महत्त्वाकांक्षी योजना आहे म्हणून त्यांना ती पार पाडायची आहे एवढेच. आणि आता सिंहासन डळमळीत झालंय, पुढचं सरकार कॉग्रेसचं आलं नाही तर ही योजना धूळ खात पडणार, मग ती यशस्वी करण्यासाठी म्हणून गॅस सबसिडी इत्यादी भानगडी त्याला जोडून दिल्यात.
पॅन कार्ड/ पासपोर्ट इतकी महत्त्वाचं कागदपत्रं आहेत, तरीही त्यांचं काम शिस्तबद्धरित्या चालतं, आधार कार्डासाठीच इतक्या भानगडी कराव्या लागताहेत.

फक्त हेड ऑफ फॅमिलीला रेसिदेन्स प्रूफ द्यायची गरज आहे. बाकी फक्त प्रूफ ऑफ आयडेन्टिटी पुरतात. खेड्यापाड्यात म्यारेज सर्टिफिकेटे असतात काय? उगा टेन्शन. ती डेटा एन्ट्री वाली मुलं बहुतेकदा छान मदत करतात.

नंदिनी, कळला तुझा मुद्दा.

मंजूडी, सोनिया बद्दलच्या मुद्याला प्रचंड अनुमोदन. आधी इतकी कार्ड. आयड्या असताना ह्या आधार कार्डाची काय गरज? नंदन निलेकणींबद्दल असलेला आदर कैक पटींनी कमी झाला या आधार कार्डाच्या पायी. त्यांनी ती कल्पना सोनीयाच्या गळी उतरवली.

फक्त हेड ऑफ फॅमिलीला रेसिदेन्स प्रूफ द्यायची गरज आहे. >>> करेक्ट !

आमचे आधार कार्ड आले आहेत. सर्वांनी पासपोर्ट (जो वेगवेगळ्या पत्यांचा आहे व काही लोकं ह्या देशाचे नागरीक देखील नाहीत ! ) हे ओळखपत्र म्हणून व माझे एकट्याचे वीज बिल जे माझ्या नावावर आहे, तेवढेच दिले. बायको / मुलांच्या नावावर वीज बिल नाही.

गंमत म्हणजे कार्ड आल्यावर दोन महिन्यांनी तुमचे आधार कार्ड अप्रुव्ह झाले आणि ते येतील असा SMS आला !

मॅरेज सर्टिफिकेटची गरज नाही.

-----------

पासपोर्ट काढायचा असेल तर आणि तरच स्वतःच्या नावाचा अ‍ॅड्रेस प्रुफ लागतो. पण ही अट आधारला नाही. उलट आधार कार्ड त्या पत्याचे असेल तर तो पत्ता म्हणून पासपोर्टला ग्राह्य आहे.
तसेच कोणत्याही बँकेचे स्टेटमेंट (नावाने अकाउंट असेल ) तर अ‍ॅड्रेस प्रुफ म्हणून चालते. माझ्या पत्नीचा पासपोर्ट एक्स्पायर झाला तो आम्ही गेल्याच महिन्यात रिन्यू करून घेतला.

पासपोर्ट आणि आधार अशी कागदपत्रांची गफलत मला ह्या बाफवर दिसते आहे म्हणून दोन्ही लिहिले. Happy

काही लोकं ह्या देशाचे नागरीक देखील नाहीत ! <<<
तरी आधार कार्ड मिळतं?

बरोबर सोनियाचं फॅड म्हणून असेल.. Wink

बाकी केदार गफलत कुठे दिसली तुला?

पासपोर्ट काढायचा असेल तर आणि तरच स्वतःच्या नावाचा अ‍ॅड्रेस प्रुफ लागतो.
>> नाही केदार. माझा आत्ताचा अनुभव सांगतो की पॅनकार्डलाही लागतं.

काही लोकं ह्या देशाचे नागरीक देखील नाहीत ! <<<
तरी आधार कार्ड मिळतं?
>> मलाही हा प्रश्न पडलाय. पण बरोबर आहे, आधार कार्डवर लिहिलं आहे की हा नागरिकत्वाचा पुरावा नाही.

तरी आधार कार्ड मिळतं?

बरोबर सोनियाचं फॅड म्हणून असेल.. >>

सोनियाचं फॅड म्हणून कसे मिळेल. आधार कार्ड फक्त भारतीय नागरिकांना असते हा गैरसमज आहे. हा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे. जसे अमेरिकेत SSN काढायला नागरिकत्व लागत नाही. तसेच भारतातही. SSN धर्तीवरच हा नंबर काढण्यात आला.

बाकी केदार गफलत कुठे दिसली तुला?
वर मी मॅरेज सर्ट्फिकेट व कार्डासाठी स्वतःच्या नावाचा पत्ता असणे अश्या पोस्ट वाचल्या. तसे पासपोर्टला असणे बंधनकारक आहे. आधारला नाही. म्हणून दोन्ही उदाहरणे दिली. पोस्ट देण्याचा उद्देश क्लॅरिटी आणने हा आहे.

माधवी नागरिकत्वाचा पुरावा फक्त पासपोर्ट आहे. पॅन कार्ड / लायसन्स, वीज बिल इ इ म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा होऊ शकत नाही. परदेशात गेल्यावर हे सर्व आपल्याकडेही असतेच की. Happy

माधवी नागरिकत्वाचा पुरावा फक्त पासपोर्ट आहे. पॅन कार्ड / लायसन्स, वीज बिल इ इ म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा होऊ शकत नाही.
>> येस्स. बरोबर आहे Happy
पण मला पॅन कार्ड ला माझ्या नावे असणारे अ‍ॅप्रू सब्मिट करावं लागतयं.

केदार, SSN सारखा युनिक आयडी असावा म्हणून आधी वोटर्स आयडी कार्ड, मग पॅन कार्ड आणि आता आधार कार्ड अशा तीन योजना झालेल्या आहेत.

वोटर्स कार्ड तर आता लागतच नाही कशाला.

पॅन कार्ड योजना अत्यंत गलथानपणे राबवली गेली त्यामुळे अनेकांना एकाहून जास्त पॅनकार्ड काढणे सहज जमून गेले. पण निदान त्याचा टॅक्सकरता तरी उपयोग केला जातोय.

आणि आता आधार कार्ड. त्याचा उपयोग नक्की कशाकरता आहे ते नाही समजलेले. पॅनच नसता का वापरता आला.

जसे अमेरिकेत SSN काढायला नागरिकत्व लागत नाही. >> पण h4 वाल्यांना तो देत पण नाहीत. तसेच भारतात मला कुठल्या सबसीडीचा अथवा शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नसेल तर आधार कार्डची सक्ती कशाला? यंदा महाराष्ट्रातल्या काही सरकारी खात्यात निवृत्तीवेतनाकरता आधार नोंदणी सक्त्ची केली आहे. गम्मत म्हणजे म्हातार्‍या माणसांचे हाताचे ठसे बर्‍याचदा येतच नव्हते (हे एकाच नाही तर सगळीकडेच घडत होते / आहे). मग तुमच्याकडे तशा क्षमतेची यंत्रे नसताना आधार क्रमांक सक्तीचा करण्याचा अट्टाहास का? ज्यांना केंद्रापर्यंत जाणे शक्य नाही, ज्यांचा रेटीना काही कारणाने यंत्रात स्कॅन करता येऊ शकत नाही त्यांनी काय करावे?

पण h4 वाल्यांना तो देत पण नाहीत. << फक्त h4 आणि ट्रॅव्हल व्हिसाला नाही देत.

स्टुडंट, बिझनेस व्हिसाला देतात.

कागदपत्रांच्या बाबतीत, आमच्या गावाकडे रेशनकार्ड आणि मतदान-ओळखपत्राशिवाय बहुतेकांकडे दुसरे कोणतेच डोक्युमेंट नसते. मतदान-ओळखपत्रावरील जन्मतारिखसुद्धा फुल्ल्यांच्या स्वरुपात असते. दिवस आणि महिना निश्चित ठाऊक नसल्याने त्या जागी फुल्या असतात- XXXX 1945

माधव प्रश्न योग्य आहेत. दरवेळी नवीन नंबर आणि तो राबवायला असणारा गलथान कारभार, मुलभूत सोयींची कमतरता, एक दिवसाची रजा आणि मानसिक त्रास हे सामान्य नागरिकांसाठी अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी यंत्रना नीट राबविली असती तर हे टाळता आले असते. मेजर स्कोप होता तिथे. पण चलता है अ‍ॅटिट्युड !

माझ्या आई वडिलांचे ठसेही नीट येत नव्हतेच. पण सेक्युरिटीसाठी ते आणि रेटिना जरूरी आहेत असे मला वाटते.

याव्यतिरीक्त प्रत्येक नवीन शहरात गेल्यावर पोस्ट ऑफिसमधून एक प्रूफ ऑफ अ‍ॅड्रेस बनवून घेणे.. <<< असे काही करता येते, हे माहीत नव्हते. Happy

Pages