बागलाण दुर्गभ्रमंती: भाग १ - साल्हेर सालोटा

Submitted by सुज्ञ माणुस on 12 February, 2013 - 02:05

येथे मी लेखातली छायाचित्रे टाकू शकलो नाही आणि त्याशिवाय याची मजा येणार नाही असे मला वाटले. म्हणून इथे थोडा लेख देऊन मुख्य लेखाची ब्लोग लिंक देतो आहे.
छायाचित्रांसहीत लेख : http://sagarshivade07.blogspot.in
तसदीबद्दल क्षमस्व.
बाकी आपण सुज्ञ आहातच.
----------------------------------------------------------------------------------------------

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग १ - साल्हेर सालोटा

ते अनुभवलेले क्षण मला आज हि आठवतात. नाशिक मधला ऐतिहासिक बागलाण प्रदेश,पाठीवर १५ किलो वजन घेऊन जवळ जवळ ३८ तासांची चढाई,४ ते ५ डिग्री एवढे कमी तापमान, फुल टू थंडी, सोसाट्याचा वारा सुटलेला, पूर्णतः निर्मनुष्य असा प्रदेश, पूर्ण किल्ल्यावर आम्ही दोघेच, महाराष्ट्रातील सर्वात उंच असे मंदिर, सूर्यास्ताला पश्चिमेकडे आलेली केशरी झळाळी, क्षितिजा मध्ये लुप्त होणारा सूर्य, गुहेमध्ये मुक्काम, गुहेच्या समोर मांडणी केलेले दगड व साथीला हनुमानाची मूर्ती, समोर गंगासागर तलाव, त्यावर चंद्राचे प्रतिबिंब आणी उठलेले पाण्याचे ते मंद तरंग, संपूर्ण आभाळ लखलखत्या तारकांनी व्यापलेले, डाव्या हाताला पहिले तर एकावर एक डोंगररांगा, उजव्या बाजूस गुजरात बॉर्डर नि जाणाऱ्या एखादं दुसऱ्या गाडीचा लांबवर दिसणारा मिणमिणता प्रकाश. हातात गरमा गरम असे मान्चाऊ सूप. चमच्यात घेतलेले गरम गरम सूप तोंडापर्यंत येईपर्यंत गार व्हायचे इतका वारा. स्वप्नवत अश्या ठिकाणी मी येऊन पोहोचलो होतो.

ओह, ह्या सुखाची अनुभूती ज्याचे त्यानेच घ्यायला हवी.

-------------

शेवटी ती वेळ आली ज्याची मी बरेच दिवस आतुरतेने वाट बघत होतो. बऱ्याचं घासाघीसी नंतर हापिसातून ५ दिवसांची सुट्टी मिळाली. लगेच जाऊन सटाण्याचे तिकीट आरक्षण करून आलो आणि मग मोठ्या ट्रेक ची तयारी चालू ....

६ महिने आधीच नाशिक मधले धोडप, मार्केंडेय, रवळ्या, जावल्या, विखारा, हातगड असे मोठमोठे किल्ले पालथे घालून आल्यानंतर बागलाण दुर्गा भ्रमंतीस मुहूर्त लागणेच बाकी होते. तो एकदाचा लागला आणि निघालो आम्ही आमच्या पंढरीला.

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील डोंगर रांग म्हणजे भटक्यांच्या दृष्टीने पर्वणीच... साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरागड,मांगी तुंगी, तांबोळया, न्हावी रतनगड असे एकापेक्षा एक असे किल्ले याच भागात असल्याने ट्रेकर्स ची इथे पार चैन असते. एकापेक्षा एक अवघड आणि सरस असे किल्ले चढताना दमछाक तर होतेच पण त्यांचा इतिहास ऐकल्यावर मन वेडे होऊन जाते.

पौराणिक संदर्भ :

भगवान परशुराम यांनी अनेक वर्षे या ठिकाणी तपश्चर्या केली. महाराष्ट्रातील सर्वात उंच अश्या ठिकाणी तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी बाण मारून अरबी समुद्राचे पाणी मागे ढकलले. पहिल्यांदी त्यांचे स्थान प्रचीतगडा जवळील चाकदेव पर्वतावर होते पण तिथून त्याचा बाणाचा नेम लागत नसावा. म्हणून त्यांनी साल्हेर हे स्थान निवडले. विष्णूच्या सहाव्या अवतार परशुरामाने जग जिंकून ते दान म्हणून दिले आणि स्वतः ला जागा करण्यासाठी बाण मारून कोंकण भूप्रदेश तयार केला. असे तेथील गावकऱ्यांकडून कळते.

ऐतिहासिक संदर्भ :

साल्हेर-मुल्हेर हे किल्ले शिवाजी महाराजांच्या राज्याचा मुकुट होते. फेब्रुवारी १६७२ साली महाराजांनी साल्हेर येथे मुघलांचा पराभव करून हे किल्ले स्वराज्यास जोडले. या युद्धात ५० मुघल सरदार कैद केले गेले. उभयतांचे १०,००० सैन्य कमी आले. ३५० हत्ती , ३००० घोडे, ७०० उंट आणि अगणित संपत्ती महाराजांना मिळाली.

सद्य गुजरातमधील सुरत लूट केल्यानंतर बहुतेक संपत्ती हि या गडकोटांच्या मध्ये दडवली गेली होती. सालोटा हा साठवण करण्यासाठीच निर्मिला गेला असे स्थानिक लोकांकडून कळते. ( पण सुरत लूट हि हा किल्ला जिंकायच्या आधी झाली आहे असे इतिहासातील सनावळी वरून जाणवते. सुरत लूट हि ५ जानेवारी १६६४ ला घडली तर किल्ला १६७२ ला महाराजांच्या ताब्यात आला.)

भौगोलिक संदर्भ :

साल्हेर हा महाराष्ट्रामधील सर्वात उंच किल्ला आहे. त्याची उंची ५१४१ फूट ( १५६७ मीटर) आहे. सालोटा हा तिसरा उंच किल्ला असून ४९८६ फूट आहे.

साल्हेरचा किल्ला सटाणेच्या पश्चिमेला आहे. अंदाजे ३५ ते ४० कि. मी. अंतरावर असलेल्या साल्हेर किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन गाडीमार्ग आहेत. एक ताहराबाद-मुल्हेरकडून वाघांबे या पायथ्याच्या गावापर्यंत जातो. तर दुसरा मार्ग सटाणे-तिळवणकडून साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या साल्हेर गावापर्यंत जातो.

"डांग" हे या किल्ल्याचे अजून एक पायथ्याचे गाव आहे पण ते गुजरात राज्यामध्ये येते. आश्चर्याची गोष्ट हि की या गावाकडे जाताना गुजरात बॉर्डर क्रॉस केली की तत्क्षणी चांगले रस्ते चालू होतात.

आमचा ट्रेक अनुभव :

पूर्ण अभ्यास करून केलेला ट्रेक निश्चितच सुखकारक होतो आणि मनाला आनंद देतो.

पूर्ण बागलाण भ्रमंती सुरू करण्याआधीच आम्ही सर्व किल्ल्यांचे नकाशे गोळा करून घेऊन आलो होतो. त्यामुळे कधी कुठल्या गडावर जायचे हे ठरले. कोणती वाट सोपी आहे? कुठे चुकायची जास्त शक्यता आहे ? दोघेच असल्याने काय करायचे आणि त्यापेक्षा महत्त्वाचे काय नाही करायचे ह्या सगळ्या शक्यता लक्षात घेऊन आम्ही ट्रेक ची रूपरेषा आखली.

किल्ल्यावर जाणाऱ्या दोन्ही वाटांचा अभ्यास करून आम्ही साल्हेर गावातून न जाता वाघांबे गावातून जायचा निर्णय घेतला. यामुळे जाताना आम्हाला सालोटा किल्ला पण करता येणार होता. याशिवाय या वाटेने पश्चिमेकडून चढण असल्याने उन्हाचा त्रास होणार नव्हता. तसेच साल्हेर गावातील वाट जास्त लांब असल्याने पाठीवरचे १५ किलो वजन घेऊन ते शक्य झाले नसते.

शनिवारी पूर्ण दिवस प्रवास करून संध्याकाळी ७ वाजता आम्ही 'वाघांबे ' या गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. ST चा लाल डबा आम्हाला तिथे सोडून पुढे साल्हेर वाडी गावाकडे गेला. 'साल्हेर वाडी' हे गाव किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला पश्चिमेकडे वसलेले आहे. गावामध्येच स्वामी नारायण मंदिरा मध्ये आम्ही रात्रीचा मुक्काम ठोकला. गावकऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न ठेवता आमची राहायची आणि पाण्याची व्यवस्था केली. रात्रीचे जेवणाचा डबा बरोबर घेऊन आलो असल्यामुळे ९ च्या सुमारास जेवण केले. मस्त थंडी पडली होती आणि त्यात गुळाच्या पोळ्या .. अहाहा ..
------------------------------------------------------------------------

सागर

इतर लेख व छायाचित्रे

http://sagarshivade07.blogspot.in

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सागर मायबोलीवर स्वागत Happy

तुमचा ट्रेक प्लॅन इथे शेअर कराल का?

बागलाण मोहिमेतील इतर अनुभव ऐकायला आवडतील. प्रकाशचित्र टाकण्यासाठी या लिंकची मदत घ्या.
http://www.maayboli.com/node/1556

इंद्रधनुष्य, लिंक बद्दल धन्यवाद.
आधीच्या लेखात एक छायाचित्र होते ते मी अशाच पद्धतीने टाकलेले होते. या लेखात ३० पेक्षा जास्त छायाचित्रे आहेत. त्यामुळे ते upload होत नाहीयेत.
अजून दुसरा उपाय असेल का?
आणि बागलाण तालुक्यातील इतर ६ ट्रेकचे लिखाण चालू आहे ( छायाचित्रे तपासणी आणि निवड करण्यातच अर्धा हुरूप मावळतोय Sad ) . ते पूर्ण होताच इथे टाकेन अथवा दुवा देईन.