सुभाषित आस्वाद [३]: तान्‌ प्रति न एष: यत्न: | --कवी भवभूती

Submitted by मी-भास्कर on 5 February, 2013 - 12:04

तान्‌ प्रति न एष: यत्न: | -- कवी भवभूती

ये नाम केचिदिह न:प्रथयन्त्यवज्ञाम्‌
जानन्तु ते किमपि तान्प्रति नैष: यत्न:
उत्पत्स्यते हि मम कोsपि समानधर्मा
कालोह्ययं निरवधि:विपुला च पृथ्वी
-- भवभूती
विग्रह करून (संधी सोडवून)

ये नाम केचिद्‌ इह न:प्रथयन्ति अवज्ञाम्‌
जानन्तु ते किमपि तान्‌ प्रति न एष: यत्न:
उत्पत्स्यते हि मम क: अपि समानधर्मा
काल: हि अयम्‌ निरवधि:विपुला च पृथ्वी

अर्थ: (विग्रह करून लिहिलेल्या ओळीनुसार)

जे कोणी खरोखर आमची(न:) अपकीर्ती (अवज्ञा) येथे (इह) पसरवतात (प्रथयन्ति)
त्यांनी हे समजून असावे की हा यत्न (साहित्य) त्यांचेसाठी मुळीच नाही.
माझा कोणी तरी समानधर्मा [कुठे तरी] निर्माण हो‍ईलच [कारण]
हा काल अनन्त आहे आणि पृथ्वी विस्तीर्ण आहे.
["हि" हा अर्थ नसलेला "चवै तु हि " पैकी केवळ पूरक शब्द आहे.]

हे संपूर्ण सुभाषित, त्याचा विग्रह आणि अर्थ माझे मित्र प्रा. मुकुंद देऊस्कर यांनी मला दिल्यामुळेच हे लिखाण शक्य झाले आहे.

भवभूतीचं 'उत्तररामचरितम्' नाटक विद्वानांकडून उपहासलं गेलं तेव्हा त्याने उद्वेगाने असं म्हटलं असे म्हणतात. त्याने ज्या आत्मविश्वासाने टिकाकारांना बजावले कि ’ तान्‌ प्रति न एष: यत्न:’ तो सार्थच होता कारण त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याला नंतरच्या काळात खरोखरच समानधर्मा भेटले.
आठव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेलेल्या भवभूतीचे आणखी एक उल्लेखनीय वैशिष्टय म्हणजे पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत अगतिक झालेल्या स्त्रीजीवनावर भास-कालिदासादिकांनी पतिप्रेमाची शाल घातली. याउलट भवभूतीने स्त्रीदुःखाला वाचा फोडली असे तज्ञांचे मत आहे. त्यावेळी त्याचे ते वैशिष्ट्य उपेक्षित राहिले असेल. पण आता मात्र त्याला हजारो समानधर्मा लाभलेत.
भवभूतीच्या प्रतिपादनाप्रमाणे घडलेली अक्षरश: हजारो उदाहरणे आहेत. त्यातील ही कांही :

शुद्ध गणित हा उपयोजित गणितवाल्यांचा टिंगलीचा विषय.
बुलिअन आल्जिब्रा ज्याने शोधला त्याच्या काळात तो शोध उपेक्षितच राहिला. संगणक शास्त्र आले नि त्याला मान्यता आली. पण बुलिअनला "तान्‌ प्रति न एष: यत्न:" असेच टिंगलखोरांना उद्देशून म्हणावे लागले असेल.
वैज्ञानिकांच्या बाबतीत देखील असे वारंवार घडलेले आहे. गॅलिलिओने मांडलेली आणि सिद्ध केलेली मते तेथील"श्रुतिस्मृतिपुराणोक्त"वाल्यांनी ’ती चुकीची आहेत’ असे त्याच्याकडून वदवून घेतले आणि मगच त्याची बंदिवासातून सुटका केली. पण नंतरच्या काळात त्याला समानधर्मा भेटलेच. आज त्याने मांडलेले सिद्धांत सर्वमान्य आहेत.
कार्ल मार्क्स (जन्म: १८१८, मृत्यू: १८८३) मूळचे जर्मन. त्यांनी मांडलेल्या विचारांमुळे निरनिराळ्या देशातून त्यांना घालवून देण्यात आले. त्यांना प्रथम फ़्रान्स, मग बेल्जियम आणि शेवटी १८४९ मध्ये ब्रिटनमध्ये आश्रय घ्यावा लागला.
The Communist Manifesto हा कम्युनिस्ट विचारसरणीचा पाया घालणारा त्यांचा ग्रंथ २१-२-१८४८ ला प्रकाशित झाला. १४ मार्च १८८३ ला त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या दफनविधीला फक्त १७ लोक होते.
पण त्यांच्या ग्रंथापासून स्फूर्ती घेऊन लेनिनने ऑक्टोबर १९१७ मध्ये रशियात क्रांती घडवून मार्क्सच्या कल्पनेतील राष्ट्र अस्तित्वात आणायचा प्रयत्न केला. मार्क्सच्या ग्रंथानंतर ६९ वर्षांनी व मृत्यूनंतर ३४ वर्षांनी हे घडले. तेही जर्मनी, फ़्रान्स ,बेल्जिअम वा इंग्लंड अशा ज्या देशांमध्ये राहून त्यांनी त्यांचे सर्व लिखाण केले आणि हिरिरीने मते मांडली तेथे नाही, तर रशियात! म्हणजे त्याला समानधर्मा भेटला तो रशियात तेही त्याच्या मृत्युनंतर ३४ वर्षांनी!
अहिंसावादाचा अतिरेक सुरू झाल्यावर त्याच्या मर्यादा स्पष्ट करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी "सन्यस्तखड्ग" नाटक १९३१ मध्ये लिहिले. त्यांनी त्यात इशारा दिला होता :-
"आजपासून २५ वर्षांनीच काय पण पंचवीसशे वर्षांनी सुद्धा या जगावर शस्त्रांचेच साम्राज्य राहील. भ्रांत अहिंसेपोटी जे शस्त्र संन्यास घेतील ते आक्रमकांच्या टापाखाली प्रथम चिरडले जातील."
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी मांडलेला हाही विचार पहा :
“राष्ट्राच्या संरक्षणापुरतेच शस्त्रबळ जे राष्ट्र बाळगते पण आक्रमणक्षम होईल इतके वाढवीत नाही, तसे करणे अधर्म समजते , त्या राष्ट्राची ती निष्ठा भ्रांत तरी असते वा आतून भेकड. ज्या राष्ट्राचे सैन्यबळ आक्रमणक्षमतेच्या पायावर नि प्रमाणावर रणसज्जतेत उभे असते त्या राष्ट्रास संरक्षणक्षमता असतेच असते.”
पण, १९६२ साली चीनच्या आक्रमणामुळे भारताची चड्डी सुटण्याची वेळ येईपर्यंत, सावरकरांची हरप्रकारे टिंगल केली गेली. चीनने सुरु केलेले आक्रमण एक चुणुक दाखवून स्वत:च थांबवले म्हणून खैर !
आजही पाकिस्तान आपल्याला काय किंमत देतो ते आपण पाहातोच आहोत. त्यावरून आपण कितपत शहाणे झालो आहोत हे आपणच समजून घ्यावे.
महासत्ता होण्याची गोष्ट राहिली दूर पण किमान सुरक्षित जगायचे असेल तरीही भारताला सावरकरांचा समानधर्मा होण्याशिवाय जगाने पर्यायच ठेवलेला नाही नि पुढेही ठेवणार नाही.
जेव्हां सावरकर १९३१ पासून हे सर्व जीव तोडून सांगत होते आणि त्यांना दिली जाणारी नाना दूषणे ऐकत होते तेव्हा "तान्‌ प्रति न एष: यत्न:" असेच ते टीकाकारांना मनातून म्हणाले असतील.
सुभाषित आस्वाद [१]: [अ] ऋणं कृत्वा घृतं पिबेत् [ब] वक्ता श्रोताच दुर्लभ:
http://www.maayboli.com/node/37451

सुभाषित आस्वाद [२]: (अ)न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा: (ब)संदिप्ते भवने तु कूपखननं
http://www.maayboli.com/node/37688

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असे कित्येक भवभूती आज आत्ताही असतील.
ज्यांना उद्देशून भवभूतीने हे लिहीले तेही त्याहूनही अधिक आहेत.
आताही आहेत.धन्यवाद्,त्यानिमित्ताने परत शाळेत गेल्यासारखे वाटले.
संस्कृतच्या त्या वर्गाचा आनंद एवढ्या सुंदर काव्याने दिला.

अतिशय सुंदर सुभाषित आहे आणि त्यावरंच तुमचं विवेचनही. काळाच्या पुढे किंवा लोकप्रियता ला झुगारुन विचार करणार्‍या अनेक व्यक्तिंची उपे़क्षा होते पण "काल अनन्त आहे आणि पृथ्वी विस्तीर्ण आहे" हे किती खरं आहे...

तरीही भारताला सावरकरांचा समानधर्मा होण्याशिवाय जगाने पर्यायच ठेवलेला नाही नि पुढेही ठेवणार नाही.>>> Proud Proud Biggrin Biggrin

वा! सुरेख अर्थ निरूपण. आवडले.

जे निन्दती आम्हास, अपकीर्ती करती ।
हा प्रयास त्यांस्तव नसे, समजोत तेही ॥
उपजतील नक्कीच कुठे तरी समानधर्मी ।
हा काळ निस्सीम, असे विस्तीर्ण धरती ॥

@नरेंद्र गोळे | 6 February, 2013 - 05:53
जे निन्दती आम्हास, अपकीर्ती करती ।
हा प्रयास त्यांस्तव नसे, समजोत तेही ॥
उपजतील नक्कीच कुठे तरी समानधर्मी ।
हा काळ निस्सीम, असे विस्तीर्ण धरती ॥
>>
मराठीकरण आपणच केले आहे का? खूप आवडले.

@इब्लिस | 6 February, 2013 - 06:41
मार्क्स अन सावरकर एकाच दमात
<<
दोघेही दमदार होते. लोकप्रिय मतांच्या विरोधी मते नि:स्वार्थपणे लोकहितार्थ मांडण्याची त्यांच्यात हिंमत होती.

वा भास्करजी खूप अपयुक्त लेख

भट साहेबांचा शेर आहे

जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा
विजा घेऊन येणार्‍या पिढ्यांशी बोलतो आम्ही

धन्यवाद

मला वाटते सावरकरांच्या विचारांकडे केले गेलेले दुर्लक्ष व अहिंसेचा (तसा भासणारा) अतिरेक हे दोन्ही या मुद्द्यांमधल्या 'मेरिट' वर नसून ज्यांनी त्याचा पुरस्कार केला त्यांच्या सर्वसामान्य लोकांपर्यंत आपले विचार पोहोचविण्यातील यशा-अपयशामुळे ते झाले. गांधीजींना त्यात प्रचंड यश आले, तर सावरकरांना त्याची गरज वाटली नाही किंवा लोकांपर्यंत आपले विचार पोहोचविण्याची क्षमता असून कदाचित त्यांनी ती वापरली नाही.

अहिंसेचा अतिरेक झाला असेल तर तो स्वातंत्र्य मिळेपर्यंतच झाला. नंतर जी धोरणे राबविली गेली त्यात अहिंसेचा काही संबंध नव्हता. आंतरराष्ट्रीय राजकारणातील "naivete" (अजाणतेपणा?) हाच जास्त होता.

गांधीजींची अहिंसा आंतरराष्ट्रीय राजकारणात अजिबात प्रॅक्टिकल नाही हे अगदी खरे असले तरी तेव्हासुद्धा नेहरू, पटेल, राजेन्द्रप्रसाद वा इतर कोणीही त्याबाबतीत त्यांच्याशी सहमत नव्हतेच की.

बाकी हे ही सुभाषित चांगले आहे. पण आधीच्यांपेक्षा जरा क्लिष्ट वाटले. अजून येउद्यात.

जी धोरणे राबविली गेली त्यात अहिंसेचा काही संबंध नव्हता.

अगदी अनुमोदनण

सावरकरी प्रजेचे प्रमाण सैन्यात अगदी अल्प आहे... पुराणकाळात बौद्ध लढले नाहीत, यावर पुस्तके लिहायला सावरकराना वेळ मिळाला... पण सैन्यात अमूक उच्च जातीची प्रजा किती हे बघायला मात्र त्याना १९४७ ते १९६६ मध्ये क्षणभरही वेळ मिळाला नाही. किती आश्चर्य नै का?

@फारएण्ड | 7 February, 2013 - 00:43
मला वाटते सावरकरांच्या विचारांकडे केले गेलेले दुर्लक्ष व अहिंसेचा (तसा भासणारा) अतिरेक हे दोन्ही या मुद्द्यांमधल्या 'मेरिट' वर नसून ज्यांनी त्याचा पुरस्कार केला त्यांच्या सर्वसामान्य लोकांपर्यंत आपले विचार पोहोचविण्यातील यशा-अपयशामुळे ते झाले.
<<
सहमत.
>> तर सावरकरांना त्याची गरज वाटली नाही किंवा लोकांपर्यंत आपले विचार पोहोचविण्याची क्षमता असून कदाचित त्यांनी ती वापरली नाही.<<
असे मात्र नाही.
१० मे १९३७ पर्यंत सावरकरांना राजकारणात भाग घ्यायचा नाही या अटीवर रत्नागिरीत स्थानबद्ध केलेले होते. त्यामुळे अहिंसेच्या अतिरेकाविरुद्ध भूमिका त्यांनी नाटकातून मांडली कारण गांधिजींच्यावर टीका म्हणजे राजकारण झाले असते.
स्थानबद्धतेतून मुक्त झाल्यावर त्यांनी हिंदुमहासभेत प्रवेश केला व आपले विचार पोहोचविण्यासाठी देशभर दौरा केला. त्यांना जो वेळ मिळाला त्या वेळात त्यांनी अविश्रांत श्रम केले. ते अपयशी ठरले म्हणून त्यांच्या विचारांचे आणि घेतलेल्या परिश्रमांचे मोल कमी होत नाही असे मला वाटते.

>> अहिंसेचा अतिरेक झाला असेल तर तो स्वातंत्र्य मिळेपर्यंतच झाला. नंतर जी धोरणे राबविली गेली त्यात अहिंसेचा काही संबंध नव्हता. आंतरराष्ट्रीय राजकारणातील "naivete" (अजाणतेपणा?) हाच जास्त होता.गांधीजींची अहिंसा आंतरराष्ट्रीय राजकारणात अजिबात प्रॅक्टिकल नाही हे अगदी खरे असले तरी तेव्हासुद्धा नेहरू, पटेल, राजेन्द्रप्रसाद वा इतर कोणीही त्याबाबतीत त्यांच्याशी सहमत नव्हतेच की.
>>
आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा चीन मुळीच सामर्थ्य्वान नव्हता. नेहरूंनी संरक्षणदले सक्षम करण्याकडे स्वातंत्र्यानंतर १५ वर्षे अजिबात लक्ष दिले नाही. चीनच्या आंतरीक हेतूंबद्दल सावध करण्यासाठी पटेलांनी अनेक पत्रे नेहरूना लिहिली पण नेहरूंनी चीनबरोबर शांततेची कबुतरे उडविणेच फक्त चालू ठेवले. पण मधल्या काळात चीनने मात्र तिबेट तर घेतलाच पण लष्करी सामर्थ्यही प्रचंड वाढविले. आंतरराष्ट्रीय राजकारणातील अजाणतेपणा एवढ्या मोठ्या देशाचे नेतृत्व करणार्‍या नेत्यांना क्षम्य आहे काय?
चीनने दणका दिल्यानंतर मात्र गांधीजी आणि त्यांची अहिंसा बोलण्यापुरत्या मर्यादित करण्यास जगानेच भाग पाडले आहे.

>>बाकी हे ही सुभाषित चांगले आहे. पण आधीच्यांपेक्षा जरा क्लिष्ट वाटले. अजून येउद्यात.<<

जरा क्लिष्ट आहे हे खरे पण नाउमेद झालेल्याला थोडा दिलासा देणारे असल्याने मला आवडले.
प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद!

@वैभव वसंतराव कु... | 6 February, 2013 - 16:41
भट साहेबांचा शेर छानच आहे . विषयाला अगदी सुसंगत. तो येथे दिलयाबद्दल आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

नेहमीप्रमाणे एक अत्यंत अर्थपूर्ण साहित्यवचन घेऊन चर्चा सुरू झालीय, भवभूतीचे हे रमणीय शब्द पुनः जागवल्याबद्दल आभार ,मी भास्कर.
नरेंद्र गोळे यांचे मराठी प्रतिरूप अन वैभवने उद्धृत केलेले भटांचे शब्दही तितकेच सुंदर.

मूलतः साहित्याच्या ,नवविचारांच्या रसास्वादाला अनुलक्षून हे शब्द लिहिले गेले आहेत म्हणून समाजाची अभिरुची बदलणार्‍या, नव्या शैलीचा मागोवा घेताना तत्कालीन लोकप्रियतेच्या चौकटीत न बसणार्‍या व अनुल्लेखाने मारले जाण्याचा धोका पत्करणार्‍या साहित्यिकांच्या वतीने भवभूतीने हे अजरामर शब्द लिहिलेत तेव्हा कंपूवाद,चढाओढीचे राजकारण ,लोकानुनयी समाजकारण याच्या पलिकडे जाणार्‍या साहित्याच्या शाश्वतमूल्यांवरचा अन स्वतःवरचाही विश्वास त्याने व्यक्त केलाय..

विचाराचा व्यापक अर्थ लावताना मूळ संदर्भाचा हा पुनरुच्चार.

भारती बिर्जे डि... | 7 February, 2013 - 18:58 नवीन
>> विचाराचा व्यापक अर्थ लावताना मूळ संदर्भाचा हा पुनरुच्चार. <<

हा मूळ संदर्भाचा पुनरुच्चार देखील किति वाचनीय आहे!
धन्यवाद!

@दिनेशदा | 7 February, 2013 - 19:14
यत्न चा अर्थ तूम्ही केवळ साहित्य असा का घेतला ?
<<
भवभूतीने काढलेले उद्गार त्याच्या उत्तररामचरित या साहित्यकृतीसंदर्भात होते म्हणून सुभाषिताचा केवळ अर्थ देतांना तसे म्हटले आहे.
बाकीच्या विवेचनात मात्र विज्ञान, तत्वज्ञान,राजकारण या क्षेत्रातील 'यत्न' देखील मी विचारात घेतले आहेत. आपल्याला 'या सुभाषिताचा आशय सर्वच क्षेत्रांतील यत्नांना व्यापतो' असेच म्हणायचे असेल तर त्याशी मी सहमत आहे.
धन्यवाद!

माझे मित्र मुकुंद देउस्कर [ज्यांचा उल्लेख सुरुवातीस केला आहे ] त्यांनी लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचून त्यांचे मत मेलमधून आजच कळवले आहे. ते येथे जसेच्या तसे देत आहे :-

"लेख छान झालेला होताच. ’मायबोली’वरही तो लोकांना आवडल्याचे दिसते आहे. फक्त अनेक लोकांनी त्या लेखाचा/सुभाषिताचा मूळ रोख पूर्णपणे सोडून देऊन सावरकरांवरच आपले सगळे लक्ष केंद्रित केलेले दिसते. त्यांच्याही बाबतीत ’तान्‌ प्रति नैष यत्न:’ असेच म्हणावे लागेल.(माझे हे मत तू ’मायबोली’वर टाकायला हरकत नाही.)

-- मुकुंद."

फक्त अनेक लोकांनी त्या लेखाचा/सुभाषिताचा मूळ रोख पूर्णपणे सोडून देऊन सावरकरांवरच आपले सगळे लक्ष केंद्रित केलेले दिसते.
<<
देउस्कर हुश्शार आहेत.
तुम्हाला दिसले नाही ते त्यांना बरोब्बर दिसलेय. अहो, व्याकरण, भाषा, कविच्या कालातील टिकाकार अन लेखक, कलाकार इ. संदर्भांत सुभाषिताचे रसग्रहण करता आले असते. जिथे तिथे ओढून ताणून सावरकर आणणे ही तुमची सवय माबोच्या लोकांनी पाहिली, अन मग दंगा सुरू झाला. हेच तर ते सांगताहेत..

दूध हे पूर्णान्न आहे हे जवळपास सर्वमान्य आहे. जीव जन्माला आला की प्रथम त्याला दुधाशिवाय पर्याय नसतो. दुधाव्यतिरिक्त इतर अन्न घेण्यास सुरुवात झाली तरी माणूस दूध आणि दूधापासून निर्माण होणारे पदार्थ आवडीने खातोच. असे असतांना एखादा भेंडीची वा गवारीची भाजीच खा असा आग्रह धरू लागला तर त्याला फाट्यावर मारण्याशिवाय सोपा पर्याय कुठे आहे?
माझ्या माहितीतील एकाला दूध आणि दूधापासून निर्माण होणारे पदार्थ यांची अलर्जी आहे असे तो सांगतो. विवेकी लोक या सत्याशी जुळवून घेतील आणि या गोष्टीचा बाऊ करणार नाहीत. पण हे गृहस्थ दूध आणि दूधापासून निर्माण होणारे पदार्थ दिसले कि अशोभनीय गदारोळ करतात. कोणाकडे जेवायला गेले तरी दूध आणि दूधापासून निर्माण होणारे पदार्थ जेवणात समोर आले की त्यांचा हाच खाक्या! जे त्यांना जाणतात ते त्यांची उपेक्षा करतात [म्हणजे फाट्यावर मारतात] पण कांहीजण त्यांच्याशी तर्कशुद्ध चर्चा करायचा प्रयत्न करायला जातात. पण हे वितंडवाद घालतात. "तान प्रति न एष: यत्न:" हे सांगूनही वातावरण नासवल्याशिवाय यांना समाधान मिळत नाही. स्वभावाला औषध नाही हे खरे!

@इब्लिस | 11 February, 2013 - 22:19
>>व्याकरण, भाषा, कविच्या कालातील टिकाकार अन लेखक, कलाकार इ. संदर्भांत सुभाषिताचे रसग्रहण करता आले असते.<<

दूधासारखे पूर्णान्न समोर ठेवल्यावर संतापून "भेंडीचा, पालकाचा, गाजराचा रस नसता का ठेवता आला ?" असे विचारण्यासारखे आहे हे! यावर काय बोलणार?

>> जिथे तिथे ओढून ताणून सावरकर आणणे ही तुमची सवय माबोच्या लोकांनी पाहिली, अन मग दंगा सुरू झाला.
<<

दंगेखोरांनो : ’तान्‌ प्रति नैष यत्न:’|
दंगेखोर म्हणजे समस्त माबोकर नव्हेत, त्यामुळे दंगेखोरांना मी फाट्यावर मारीत असतो.
तेव्हा दंगेखोरांनो रामराम. तुमची दखलच घेतली जाणार नाही कारण पुन्हा एकदा सांगतो
’तान्‌ प्रति नैष यत्न:’|