लेखणीचे मनोगत...

Submitted by हर्षल_चव्हाण on 28 January, 2013 - 04:33

काल माझा पेन मला, रडवेलासा होत म्हणाला,
"गरज सरो वैद्य मरो"चा खराखुरा प्रत्यय आला...

लिहिण्यासाठी आता नवा साथीदार मिळाला तुला,
हस्ताक्षराचा जुना दागिना, खोटा झालाय कळले मला...

शाईपेन, बॉलपेन, नावापुरता उरलो मी,
'लिहिणे' म्हणजे काय असते, हे ही अता विसरलो मी...

डायरी माझी मैत्रीणसुद्धा अशीच उदास दिसते फार,
पानापानांवरतीसुद्धा छापील असतो दिवस-वार...

दिसामाजी काहितरी, ब्लॉगवरती उमटत जाते,
मिसळपाव तर खातात ना? मनात कायम घोळत राहते...

मायबोलीचा वावर तुझिया 'बोटां'वरती नाचत राहतो...
टंकल्याशिवाय सुचत नाही, असे तुला मी रोज पाहतो...

काळासोबत बदलत जावे, माणसा तुला आहे ठावे,
काय वाटते? आम्हालाही सोबत अपुल्या बदलत न्यावे,
की आधीच्या सोबत्यांना, अडगळीतच टाकून द्यावे?
------------------------------------------------------------
हर्षल (२८/१/१३ - दु. २.५०)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद उकाका Happy तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण लिहितांना विचार आणि शब्दांची योग्य जुळवाजुळव होत नव्हती. बदल करण्याचा प्रयत्न करेन Happy