माझी भारतभेट - जानेवारी २०१३

Submitted by दिनेश. on 21 January, 2013 - 10:54

यावेळची माझी भारतवारी, अगदी खासच झाली. दहा दिवस कधी संपले ते कळलेच नाही. एकतर भारतात
जायचे म्हणजे मला उत्साहाचे भरते येतेच. त्या भरात बरेच बेत ठरवले जातात आणि ते पार पडण्यासाठीचे
बळही माझ्या अंगात येते.

तर हे असेच काहीतरी,

अंगोलातून भारतात जायची पहिलीच खेप. पण इथून नेण्यासारखे काही नसल्याने माझी बॅग रिकामीच होती.
लुआंडा एअरपोर्टकडून फारश्या अपेक्षा नव्हत्या. पण लुआंडाने सुखद धक्का दिला. मायबोलीकर जान्हवीने
मला लुआंडामधल्या एका सुपरमार्केटचा पत्ता दिला होता. तिथे जाऊन थोडे किराणासामान घेतले ( म्हणजे
भारतातून आणायचे ओझे कमी व्हावे हा हेतू. इथे भारतीत किराणासामान मिळवायचे ते एकमेव स्थान आहे.)
ते ड्रायव्हरकडे सोपवले आणि चेक इन करुन कॅफेटारीया भागात आलो. संपूर्ण विमानतळ दिसेल अशी
सुरेख जागा आहे इथे.

इथे इमिग्रेशनसाठी कुठलाच फॉर्म भरावा लागत नाही. ते पार करुन गेल्यावर तर आणखी सुखद धक्का.
अपेक्षा केली नव्हती एवढी सुंदर दुकाने आहेत इथे. अंगोला हिर्‍यांसाठी प्रसिद्ध असल्याने हिर्‍यांच्या दागिन्यांचा
एक खास विभाग होता. सोन्याचे दागिने पण खास होते. जिराफाच्या आकाराचे इयरिंग्ज मला खुप आवडले.
असे डिझाईन मी आधी कधीच बघितले नव्हते. जिराफ समोरुन जसा दिसतो तो आकार पण तो हलताडुलता
आणि त्याच्या अंगावरच्या डिझाईनप्रमाणे खडे. सर्व आकार मिळुन दोन सेमीचाच.

माझे फ्लाईट ( लुआंडा - दुबई ) रात्रीचे होते. एमिरेट्स चे नेहमीचेच खास लाड होतेच. इंग्लिश विंग्लिश, काकस्पर्श, शाळा, रावडी राठोड, मर्डर ३ असे बरेच भारतीय आणि इतर भाषांतले चित्रपट होते ( एकंदर १२००
चॅनेल्स ) रात्रच असल्याने जेवण झाल्यावर २ तास झोपून घेतले.
दुबईचा विमानतळ दरवेळेस नवा वाटतो. नवीन नवीन दुकाने उघडलेली दिसतात. तिथे मनसोक्त शॉपिंग केले.
आणि दुपारी मुंबईला उतरलो. घरी आलो तर देवरुखची मावशी आणि मामा आले होते, त्यांच्याशी गप्पा मारत
बसलो तेवढ्यात पुतण्याला, लाईफ ऑफ पाय ची तिकिटे आणायला पाठवले. आम्ही दोघांनीच तो बघितला.

भारतात करायची कामे असतात ती आठवणीने आधी करुन घ्यावी लागतात. नवा चष्मा करुन वर्ष झाले होते,
म्हणून डोळे तपासायला गेलो. नंबर चक्क कमी झालाय. ( टीव्ही नाही बघत ना ! ) दुपारी नागपूरला जायचे
होते. लेकीला अतिप्रिय म्हणून एक कलिंगड घेतले होते.

मला आता मुंबईचा डोमेस्टीक एअरपोर्ट अनोळखी झालाय. तिथेही बरेच बदल झालेत. अपेक्षेप्रमाणे कलिंगड
तपासले गेलेच. नागपूरला लेक एअरपोर्टवर न्यायला आली होती. एकदा तिच्या ताब्यात गेलो कि मग सगळे
तिच्या मनाप्रमाणेच करावे लागते. त्यामूळे ती संध्याकाळ तिच्याशी गप्पा मारण्यातच गेली. प्रसिद्ध लेखिका
सौ. आशा बगे पण गप्पा मारायला आल्या होत्या. शिवाय लेकीचे आजी आजोबा होतेच. झोपायला पहाटेचे
२ वाजले.

दुसर्‍या दिवशी यवतमाळच्या मायबोलीकर सारिकाचे सासु सासरे भेटायला आले होते. त्यांना जायची घाई
होती म्हणून निवांत बोलताच आले नाही. त्यांनी माझ्यासाठी वेगवेगळी लोणची आणली होती. सुंदर
पॅकिंग केले होते तरी त्यांचा घमघमाट सुटला होता. "हे माझ्यासाठी आहे का ?" असा धूर्त प्रश्न विचारून
लेकीने त्यातल्या दोन बाटल्या ताब्यात घेतल्या आणि उघडल्यासुद्धा.

संध्याकाळच्या फ्लाईटने मुंबईला आलो. माझ्या बहिणीकडे सगळे जमलो. लेकिला त्या रात्रीच, कोरीयन च्या
फ्लाईटने, ऑकलंडला जायचे होते. मध्यरात्री तिला विमानतळावर सोडायला गेलो तर तिथे प्रचंड ट्राफिक जॅम.
शिवाय गेटवर भलीमोठी रांग. त्यात घुसणारे अनेक. त्यांच्याशी वाद घालत एकदाची ती आत गेली.
मग मी डी गेटवर तिची वाट बघत बसलो. ( आता तिथे फोनची सोय आहे. जाणार्‍या पाहुण्यांशी निवांत बोलता
येते.) पहाटे २ वाजता तिने टाटा केले आणि मी निघालो.

मला थेट डोमेस्टीक वर यायचे होते. सहारवरुन ( डिपार्चर एरिया ) रिक्षा मुष्कीलीनेच मिळतात. एक भेटला
पण रात्रीचा दर लावणार होता. त्याला माझी हरकत नव्हती. पण मी आत बसल्यावर त्याने असह्य बडबड
सुरु केली. प्यायलेला नव्ह्ता, पण जेवायलाच चल, आता कशाला तिथे जातोस वगैरे बोलू लागला. पण मी
सर्वाला निक्षून नकार दिला. माझे इंदूरचे विमान सकाळी साडेसहाचे होते.

दोन रात्री जागरण झाल्याने मला प्रचंड झोप येत होती आणि जरा ताप पण चढला होता. पण इंदूरला जाणे भागच होते. तिथे उतरलो तर तपमान नऊ डीग्री सें. सांगत होते. पण मला तेवढे जाणवले नाही. माझे काम
दुपारनंतर होते म्हणून मी तिथले म्यूझियम, राजवाडा वगैरे बघून घेतले.

म्यूझियममधे चांगल्या मूर्ती आहेत पण त्या तशाच उघड्यावर पडल्या आहेत. काहि भिंतीत आहेत. तसे
छोटेसेच आहे ते. होळकरांचा वाडा आतून बघता येतो तरी फोटो काढायची परवानगी नाही. त्या भव्य वाड्याची
अगदीच रया गेलीय. रंगाचे पोपडे उडालेत. फर्निचरची लक्तरे झालीत. खिन्नच झाले मन.
काही कोरीव छत्र्या पण बघितल्या. दुपारचे बिझिनेस लंच हॉटेल श्रेयस मधे झाले. अप्रतिम बफे होता.
मग मात्र मी थकलोच होतो. दोन रात्रींचे जागरण अंगावर आले. संध्याकाळी पण एक इंटरव्ह्यू घ्यायचा होता.
एक झोप काढली, काम आटपले. खुप मनात होते तरी तिथला सराफा बाजार आणि तिथले खास पदार्थ
( शिकंजी, गराडू, खिचडी, कचोरी... ) राहिलेच.

दुसर्‍या दिवशी दुपारचे परतीचे विमान होते. थोडा वेळ होता म्हणून उज्जैन ला जाऊन आलो. मला तिथली
व्यवस्था फार आवडली. अमावस्या होती म्हणून असेल कदाचित पण अजिबात गर्दी नव्हती. मग इंदूरला
परत येऊन, नमकीन मावा बाटी वगैरेची खरेदी झाली आणि विमानतळ गाठला.

परत येऊन चष्मा वगैरे ताब्यात घेतला आणि दुसर्‍या दिवशी सकाळची सातची बस पकडून उरण गाठले.
जागूला भेटून दोन वर्षे झाली होती पण त्यापेक्षा राधाला भेटायचे होते. जागूचे मिस्टर, अ‍ॅड पराग मला न्यायला स्टँडवर आले होते. राधा तर बाहुलीच आहे. अजिबात गडबड न करता मस्त राहिली. श्रावणीताई पण आता बूजत नव्हती. जागूला, जेवायला येणार नाही अशी अटच घातली होती, तरी तिने अनेक प्रकार केले होते. आता तिच्या घरचे सगळेच ( तो भला मोठा डॅनी पण ) मला ओळखतात त्यामूळे वेळ कसा गेला ते कळलाच नाही. तिच्या बागेतल्या भेटवस्तू घेऊन निघालो. आणि वाटेत मजा झाली. सकाळी येताना धुक्यात मला जे वेगवेगळ्या आकाराचे गडकिल्ले वाटले होते त्या चक्क दगडाच्या खाणी निघाल्या. मनात मी भटकंती कट्टावाल्यांसमोर बढाई मारायचे बेत केले होते ते फिसकटले.

उरणहून निघून मी वाशीला आलो. तिथे जूना मायबोलीकर बाँम्बे व्हायकिंग मला भेटणार होता. त्याच्या
लग्नात मी मुलीच्या मामाची भुमिका निभावली होती. त्यामूळे मी त्याच्याघरी दोन्ही घरचा पाहुणा असतो.
त्याची लेक श्रावणी पण माझी लहानपणापासूनची मैत्रिण आहे.

मग घरी येऊन लगेच ठाण्याला निघालो. माझ्या शिरस्त्याप्रमाणे वेळेआधी गडकरीला मी हजर होतोच.
तिथे नरेंद्र गोळे, मोनालि, निंबुडा, मोहन कि मीरा, इंद्रा, रोमा, बागुलबुवा, माधव आणि जिप्सी भेटले. निंबुडाला आणि मीराला मी पहिल्यांदाच भेटत होतो, तरी जुनी ओळख असल्यासारख्या गप्पा सुरु झाल्याच.
तिघींनीही सर्वांसाठी खाऊ आणला होता.
मीराला भेटून मला अश्विनीमामीची आठवण झाली. दोघी बहीणीबहिणी शोभतील शिवाय बोलायची स्टाईलही
सेमच आहे. खवैयामधे जेवण आणि भरपूर टाईमपास झाल्यावर आम्ही निघालो.

दुसर्‍या दिवशी सकाळची सहा वाजताची शिवनेरी पकडून मी पुण्याला निघालो. तिथे सिंहगड रोडवरच्या
अभिरुची रिसॉर्टमधे आम्ही सगळे भेटणार होतो. योगेश ( मायबोलीकर मैतर ) आणि ॠचा ( काही वर्षांपुर्वी मायबोली दिवाळी अंकातल्या, "पणती" ची लेखिका ) ला भेटून ५ वर्षे झाली होती. त्यांच्या श्रीरंगला तर मी तान्हुला असतानाच बघितले होते. गिरीराज, स_सा सपत्नीक होते. शशांक, शांकली आणि त्यांची कलाकार लेक ईश्वरी होते, अनिल, दक्षिणा, शोभा, प्रज्ञा आणि माझी मायबोलीवरची सर्वात जूनी मैत्रिण सई होती.
आम्ही सगळे एकमेकांना अनेक वर्षे ओळखत होतोच पण माझ्यासाठी सुखद धक्का होता ते मुंगेरीलाल
( धनंजय दिवाण ) यांचे आगमन. मी तर इतका चकीत झालो होतो कि त्यांच्याशी मला धड बोलताच आले
नाही. ( आणि आमचा धागडधिंगा बघून त्यांना पण नक्कीच नवल वाटले असणार. कधीतरी त्यांच्या लेखात
उल्लेख होईलच. )

आम्ही पुर्वी भाग्या ( भाग्यश्री ) आली होती त्यावेळी अभिरुची मधेच भेटलो होतो पण आता तिथे मॉल
झाल्याने, जागा कमी झालीय. तरीपण आहे त्या जागेचे योग्य ते नियोजन करुन सुंदर व्यवस्था
ठेवली आहे.

कठपुतळी, मेंदी, भविष्य, दांडिया, घोडा नाच, संगीत खुर्ची, भांगडा असे काहीनाकाही सतत चालू होते.
खाण्यापिण्याची तर रेलचेल होती ( चहा, ताक, भजी तर होतेच शिवाय पंजाबी, गुजराथी, मारवाडी, मराठी
दाक्षिणात्य असे अनेक स्टॉल्स होते. त्याशिवाय पान, आईस्क्रीम, बर्फाचे गोळे होतेच. ) अखंड खात पित
आम्ही धिंगाणा घातला.

जाताना अगदी पाय निघत नव्हता. ईश्वरीने माझ्यासाठी एक सुंदर फ्रेम करुन आणली होती. पुस्तकांचे तर
ओझेच झाले होते. घरची हळद, गूळपोळ्या. सगळी जिव्हाळ्याची शिदोरी. जाताजाता दक्षिणेच्या नव्या घरात डोकावलो आणि मग गिर्‍याने मला शर्थ करुन वेळेवर गाडीवर सोडले.

मग सोमवार आणि संक्रांत होते. दादर बंद म्हणून मी लॅमिंग्टन रोड वर खरेदीला गेलो. तिथून र्‍हिदम हाऊसला
( हि दोन्ही ठिकाणे माझ्यासाठी अनिवार्य आहेत ) र्‍हीदम हाऊसला यावेळेस, कवि गौरव असे
छान संकलन मिळाले. त्यात शांता शेळके, सुरेश भट, गदीमा, पी. सावळाराम अशा अनेक कविंच्या गाण्यांचे संकलन मिळाले. अंगोलात आल्यापासून मला लेटेस्ट इंग्लीश चित्रपट बघायला मिळत नाहीत, त्यापैकी अनेक
मिळवले.

दुसर्‍या दिवशी दादरला, मॅजेस्टीकमधे पुस्तके खरेदी. तिथेच मामीला भेटायचे ठरवले होते. अगदी धावती भेट होती. पण तरी ती घेणे आवश्यकच होते कारण वर्षूने माझ्यासाठी मामीकडे भेट ठेवली होती ना !
डॉ. उज्ज्वला दळवी यांचे एक पुस्तक तिथे मिळाले नाही म्हणून आयडीयल मधे गेलो. तिथे पन्नास रुपयात कुठलेही पुस्तक असे प्रदर्शन भरलेले आहे. अनेक जुनी पुस्तके नव्याने छापून तिथे ठेवली आहेत. ( आज लोकसत्ता मधे बातमी आहे.) राजा गोसावी यांच्या पत्नीने लिहिलेले, माझ्या नवर्‍याच्या बायका हे जरा वेगळे
वाटले म्हणून मी घेतले. त्याला रमेश देव यांची प्रस्तावना आहे. मी पूर्ण वाचले नाही, पण सनसनाटी दिसतेय. ( घरी कुणीतरी वाचत होते, म्हणून घरीच राहिलेय.)

आणि जायचा दिवसच आला. नेहमीप्रमाणेच अविस्मरणीय क्षणांच्या आठवणी सोबत घेऊन आलो.
प्रत्यक्ष भेट अनेकांची झालीच पण सुलेखा, लाजो, निवांत, झकास अशा अनेकजणांशी फोनवरही बोलणे झाले.
पुढच्या वेळेस मात्र अनेकांना प्रत्यक्ष भेटायचे आहेच.

येतानाचा प्रवासही मस्त झाला. दुबई ते लुआंडा हे आठ तासाचे फ्लाईट दिवसाचे होते. त्यामूळे ओमान, सौदी, लाल समुद्र, सुदान, इथिओपिया, केनया, टांझानिया, काँगो असे अनेक देश ( विमानातून ) मनसोक्त बघता आले.

आता सहा महिन्यांची प्रतिक्षा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पटकन भरतभेट वाचले आणि कोणत्या रामाने लिहिले आहे म्हणून डोकावलो पण............ छान लिहिला आहे वृत्तांत.. Happy

कधी योग आला तर नक्की भेटू दिनेशदा..

अगदी "पुलकित' वाटावा असा स्नेहभेटीचा वृत्तांत. दिनेश यानी बर्‍याच मायबोलीकरांना मेलद्वारे आपल्या भेट कार्यक्रमाच्या अनुषंगाने कळविले होते. मलाही पुण्यातील तारखेचा आणि तेथील माबोकरांच्या भेटीचे निमंत्रण एका मायबोली भाचीने दिले होतेच. दिनेश यांच्याशी पूर्वी फोनवरून बोलणे झाले असल्याने या निमित्ताने प्रत्यक्ष भेटीचा योग चुकवू नये असे वाटत होते, पण कोर्टाच्या कामात असे काही अडकलो की ज्याचे नाव ते.

आता सविस्तर वृत्तांत वाचल्यावर लक्षात येते की आपण खरेच काहीतरी 'मिसले' आहे. पण असो, ज्या पुणेकरांना आनंद मिळाला त्यांच्याकडून प्रत्यक्ष भेटीत पुढेमागे सविस्तर ऐकायलाही मिळेलच.

मायबोलीचे नाते किती घट्ट असू शकते याचीच प्रचिती धागा आणि धाग्यावर येत असलेल्या प्रतिसादावरून येत आहे.

अशोक पाटील

मस्त वृत्तांत Happy माझं "खवैय्या" मध्ये यायचं नक्की होतं आणि जिप्स्याला आणि तुम्हाला तसं सांगितलंही होतं. पण काही इमर्जन्सी उद्भवल्यामुळे डोस्कंच ब्लँक झालं आणि गटग बिटगं विसरुन घरीच जावं लागलं. पण तुम्ही गटगचं आवर्जून कळवल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद Happy

Pages