पाणीपुरी

Submitted by फूल on 17 January, 2013 - 20:31

भैय्याच्या घागरीत त्याने बुचकाळलेल्या हाताचा आवाज आणि आंबट गोड पाण्याने लडबडलेलं ते सुखाचं छोटसं गाडगं... खाल्ल्यानंतर जीभेच्या अगदी अंग प्रत्यंगाला चव देऊन जातं. मग पुन्हा भैय्या त्याच्या घागरीतलं पाणी त्या लांब दांड्याच्या चमच्याने ढवळतो आणि पुन्हा तेच सारं. पाणी पुरी... माझं सगळ्यात लाडकं आणि जीवाभावाचं खाणं. भैय्याने देत रहावं आणि मी खात जावं.

गोल गोल, छोट्या छोट्या, टम्म फुगलेल्या पुऱ्या; त्यांच्या पोटात भरायचं आपलं काहीबाही आंबट गोड; कुणी मूग, कुणी बुंदी, कुणी रगडा, कुणी नुसताच बटाटा, कुणी तिखा कम, कुणी सिर्फ़ तिखा, कुणी मिठी पुरी तर कधी सुखा पुरी. मसाला पुरी तर पानासारखी हवीच नंतर, त्याशिवाय तोंडात चव रेंगाळायची कशी? कुणाला सुचलं असेल हे खाद्य बनवायला. पाणीपुरीचा एकच घास "चटपटीत" ह्या शब्दाचा अर्थच सांगून जातो नाही?

आजवर असंख्य वेळा पाणी पुरी खाल्ली, कधी एकटीने तर कधी मित्र-मैत्रिणींबरोबर. सोबत कोणी असो वा नसो पाणी पुरीची सोबत मात्र कायमचीच. ती समोर दिसताना मग कशाला कोणाच्या सोबतीची वाट बघा. फक्त भैय्या असला म्हणजे झालं. ह्याच पाणी पुरीने मला अगणित जिव्हाळ्याचे क्षण दिले आणि आयुष्यभर जोपासता येईल असा आठवणींचा खजिना दिला. अजूनही देतच आहे.

ठाण्यातलं इव्हिनिंग स्पॉट बऱ्याच चाटप्रेमींचं लाडकं ठिकाण अगदी माहेर घरच म्हणा ना. मी तिथे सगळ्यात जास्त वेळा खाल्ली असेल पाणीपुरी. तेव्हातर पाच पाच रुपये शेअर करून वन बाय टू खायचो पाणीपुरी. तीन पुऱ्या तू आणि तीन मी आणि मसाला पुरी मात्र प्रत्येकी एक. गेले ते दिन गेले. आता माहित नाही पण तेव्हा त्याच्याकडे मसाला पुऱ्यांनी भरलेली एक प्लेटच ठेवलेली असायची. ’किती हव्या तेवढ्या खा’ ह्या थाटात. त्यातल्या चाटमसालायुक्त आणि शेवयुक्त, खारट बटाट्याची चव अजूनही तोंडात रेंगाळते आहे.

तशी ठाण्यात अनेक ठिकाणची पाणीपुरी खाल्ली पण ही पाणीपुरी लक्षात राहणारी अगदी आठवणीतली पाणी पुरी. ती खाताना तोंडात त्या पुरीची टोकं लागून सोलवटल्यासारखं व्हायचं, डोळ्यातून, नाकातून घळा घळा पाणी व्हायचं पण तरी अजून हवं असायचं. काय करणार टाकीचे घाव दुसरं काय.

ह्या पाणीपुरीच्या आंबट गोड आठवणींचं सगळं क्रेडीट भैय्यालाच जात नाही हं, घरी केलेल्या पाणी पुरीची पण खासच चव होती. तीही खायला तितकीच मज्जा यायची आणि शिवाय भरपूर खायला मिळायची. ती करण्यात पण एक मज्जा होती. मी करायला शिकलेल्या काही मोजक्याच पदार्थांमधे पाणीपुरीचं नाव अगदी पहिलं होतं.

माझं आजोळ कोल्हापूर. मी लहान असताना आई मला तिच्याबरोबर घेऊन जायची पण जशी मोठी झाले आणि क्लासेस, शाळा ह्यांचा व्याप जास्त वाढला तसं मग शालेय वर्षाच्या आधे-मधे कधी जाता यायचं नाही. आई एकटीच जायची कोल्हापूरला. मग काय मी आणि बाबा, रान मोकळंच. सकाळी मी फक्त भाजी करायचे म्हणजे फोडणीला टाकायचे. बाई पोळ्या करून जायच्या. बाबा VRS घेतल्यामुळे घरीच असायचे. ते सकाळचं बाकी सगळंच व्यवस्थित मॅनेज करायचे. मग संध्याकाळचा बेत मात्र खास आम्हाला आवडणारा आणि अतिशय निगुतीने केलेला. थाटच असायचा.

शाळेत जायच्या आधी मी आणि बाबा यादी करायचो. "पुऱ्या, पुदिना, चाट मसाला, मिरच्या, लिंबू, कोथींबीर, खजूर आहेत का घरात?" "हो आहेत. चिंच पण आहे." मी कपाटं बघत स्वयंपाक घरातून ओरडून सांगायचे. "बारीक शेव." मग बाबा विचारायचे, "बटाटे एव्हढे पुरतील का?" "हो पुरतील. बाबा, चार बटाटे कुकरला लावून ठेवा. मी आले की बाकीचे सगळे बघेन." शाळेतून घरी येईस्तोवर घरी सगळं सामान रेडी असायचं कोथींबीर आणि पुदिना निवडलेला, मिरच्यांची देठं काढून ठेवलेली, बटाटे उकडलेले. मग मी अगदी सऱ्हाईत शेफसारखी सगळ्या तयार सामुग्रीवर फक्त संस्कार करायचे. आई-बाबांचा बाहेरचं खाण्याला तसा आधीपासूनच विरोध असायचा. पण त्यांनाही चाट आवडायचं आणि मी केलेलं तर जास्तच कौतुकाचं. त्यांना घरंचं खाल्ल्याचं सुख आणि मला बाहेरचं खाल्ल्याचं सुख.

मोड आलेले मूग, बटाटे, कांद्याचा बारीकसा तुकडा, एक टॉमेटोचा बारीकसा तुकडा, जास्त गोड पाणी आणि तिखटपाण्याचं उगीच गालबोट असं करून वर शेव घालून बाबांना पुरी भरून द्यायचे. अगदी एक अन एक पुरी मीच भरून द्यायचे. तेही अगदी जिव्ह्याळ्याने, हौसेने खायचे. अर्थात हा घाट घालण्यासाठी सगळी उसनवार त्यांनीच केलेली असायची मी फक्त येऊन भटजीचं काम करायचे. आता लिहितानाही असं वाटतंय की मी ते जगतेय पण नाही ती आता आठवण आहे. गोड आठवण, माझी आणि बाबांची आणि हो पाणीपुरीची सुद्धा.

लग्नानंतर वापीला रहायला गेले. पण पाणीपुरीने पाठ काही सोडली नाही. तिथेही ती होतीच. नवऱ्याच्या ४ मित्रांचं आणि आमचं एकाच वर्षी लग्न झालं तेही काही दिवसांच्या अंतराने. सगळीच नवीन लग्न झालेली ४-५ जोडपी एकत्र वापीत होतो. एकावेळी आठ जणं गोल करून पाणी पुरी खायचो. शिवाय तिथे सगळ्यांच्याच नवऱ्या वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या त्या पाणीपुरीला वेगवेगळ्या नावाने हाक मारत असत, कोणी गुपचूप म्हणे तर कोणी गोलगप्पा पण पाणी पुरीच ती; तिला राजा म्हणा वा रंक म्हणा, कोणी निंदो कोणी वंदो ह्या थाटात सगळ्यांना सारखंच सुख-समाधान द्यायची. आम्हा सगळ्यांच्या मनाला साद घालणारा तो एक समांतर दुवा होता. तो भैय्याही जवळचा झाला होता. आम्हाला खास सेवा असायची पाणी पुरी बरोबर शेव आणि कांदा, चाटमसाला घालून एका द्रोणात घालून द्यायचा सगळ्यांना. ते खायला आणखिन जास्त मज्जा यायची.

नवरा काही माझ्या इतका पाणी पुरी वेडा नाही पण तो मला कधीच आड येत नाही. माझ्या आणि तिच्या मधे कोणी आलेलं मला आवडणारही नाही. हे कदाचित त्यालाही माहित असावं. पाणीपुरी खाऊन खाऊन पुरी सारखीच फुगली आहेस असं म्हणतो कधी कधी. पण मला अशावेळी आईचे शब्द आठवतात. तीही मला हेच म्हणत असे, "नळे फुंकले सोनारे..." पुढचे सूज्ञास सांगणे न लगे.

आता तर देशच सोडून इथे आले आहे. आष्ट्रेलियात. भारत सोडताना आणि सिडनी मधे आल्यावर सुद्धा आई-बाबा आणि पाणी पुरी तिघांच्या आठवणीने खूपच रडले होते. सिडनी मध्ये आल्यावर मैत्रिणींची आठवण आली की पाणी पुरीच आठवायची. पण तेव्हा पण एक गंमत झाली. आमचे सिडनीतलेच एक नातेवाईक आम्हाला भेटायला म्हणून आमच्या घरी आले होते. अगदी सिडनी मधे अवतरल्या अवतरल्या तिसऱ्या-चौथ्या दिवशीच. इथे जवळच चिक्कार भारतीच हॉटेल्स आहेत या तुम्हाला दाखवतो म्हणून ते आम्हाला बाहेर घेऊन गेले. आणि एका भारतीय हाटेलात त्यांनी चक्क पाणी पुरी ऑर्डर केली. माझ्या डोळ्यातली चमक आणि आनंद लपवता लपत नव्हता. अर्थात तिथे भैय्याचा हात नव्हता आपली आपणच तयार करून खायची अन तिही छोले घातलेली पुरी. पण हेही नसे थोडके. माझा आनंद गगनात मावत नव्हता. अहो भाग्य! मी तिला सोडून लांब गेले तरी ती मला शोधत आलीच असं म्हणायला हवं. माझी पाणी पुरी ग्ग्ग ती...!! तो दिवसही मी कधीच विसरणार नाही.

आता अगदी अलिकडची आठवण म्हणजे आई बरोबर पाणी पुरी शेअर केल्याची. आत्ताच भारतात जाऊन आले. भारतातून निघायला शेवटचे तीन दिवस बाकी होते. अनेक ठिकाणची पाणीपुरी तोवर खाऊन झालीच होती. पोटाची पार नाही पण बरीच वाट लागली होती.

आई बरोबर खरेदीला बाहेर पडले होते. एक पंजाबी ड्रेस विकत घेतला आणि तो ड्रेसवाला म्हणाला, "फिरून या १५ मिनिटांत ड्रेसला हात लावून देतो". म्हटलं ठिक आहे. मी आणि आई दुकानातून बाहेर पडलो आणि फिरत होतो. एका ठिकाणी कानातले बघत होते. शेजारीच पाणीपुरीचं दुकान होतं. आई माझी जात्याच शिस्तिची. तिच्यासमोर एकदाच म्हटलं, "आई, पाणी पुरी." आई म्हणाली, "पोट सांभाळा." मी गप्प. पुन्हा कानातले बघू लागले. तरी तिला म्हटलं, "शेवटचे तीनच दिवस आहेत." "तिथे घरी करून खातेस ना?" इति आईश्री. मी मूग गिळून गप्प. हा चान्स गेला ह्या विचारात असतानाच आई म्हणाली. "चल खाऊया पण दोघीत एकच हं." एकच तर एकच चान्स का सोडा. मी लगेच ऑर्डर दिली. एक पुरी आई खात होती आणि एक मी. माझ्या हातात एकच डिश होती तिच मी दोघींच्या पुढे नाचवत होते. ६ पुऱ्या संपल्या आणि भैय्याने विचारलं, "और दूँ?" मी काही म्हणणार इतक्यात आईच म्हणाली, "हं सांग अजून एक" हे ऐकलं मात्र आणि मी मनातून पाणीपुरी सारखीच डबडबले. डोळे भरलेले, तोंड फुगलेलं आणि भावना डोळ्यातल्या पाण्यावाटे ओसंडत होत्या, पाणी पुरीतल्या पाण्यासारख्या. साक्षात पाणीपुरीच झाली माझी. आईला आणि भैय्याला वाटलं की तिखट लागलं म्हणून पाणी येतंय. मला ते बरंच वाटलं. एरव्ही आईने मला पाणीपुरीला शिवूही दिलं नसतं. त्या राहिलेल्या तीनच दिवसांची ती किंमत होती. मी ही मनातून हलले, गहिवरले जणू भैय्याने तो लांब दांड्याचा चमचा माझ्याच मनात ढवळला. पाणी पुरीची चव जशी खारट व्ह्यायला लागली तसं स्वत:ला आवरलं. दुकानातून बाहेर पडलो आणि आईला म्हटलं, "मस्त होती ना पाणी पुरी. कुणी शोधून काढली असेल गं ही". आईही हसून म्हणाली, "ते कॉम्बिनेशन खरच छान आहे". भैय्याच्या घागरीत त्याने बुचकाळलेल्या हाताचा आवाज आणि आंबट गोड पाण्याने लडबडलेलं ते सुखाचं छोटसं गाडगं...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त
माझी भारतात जाण्याचा सीझन म्हणजे पावसाळाच जेव्हा भरपूर आजार पसरलेले असतात पण काहीही असलं तरी संध्याकाळी बाहेर पडल्यावर पाणीपुरी न खाता परत येणं म्हणजे.. शिव, शिव!!

आमच्या डोंबिवली इस्टला केळकर रोडच्या आतल्या बाजुच्या रस्त्याला प्रजापतीकडेच खायची पापु. आधी त्याची गाडी होती. आता त्याने गाळा घेतलाय. बेस्ट चव एकदम.

फूल
खूपच सुरेख लिहिलयस. लेखातून तुझा पाणिपुरीबद्दलचा जिव्हाळा नीट पोहोचतोय.
खूप जणांच्या/जणींच्या मनातलं लिहिलंयस.

भारत सोडताना आणि सिडनी मधे आल्यावर सुद्धा आई-बाबा आणि पाणी पुरी तिघांच्या आठवणीने खूपच रडले होते. >> हे जबरी आहे. Lol आई बाबा आणि थेट पाणीपुरी.. मध्ये मैत्रिणी वगैरे नाहीच.

panipuri kup avadate pan madhe mumbai ka thanyala zalela prakar ani baryach janani panipuri baher kashi banavtat te sangitalya pasun gharabaher hat lavanyachi icha hot nahi

सुंदर लिहिलेय! मग कोण जास्त पाणीपुर्या खातेय अशी पैज नाहीस का लावली कधी? Wink
माझा छोटा मुलगा असाच आहे पाणीपुरी फॅन. बाकी सारे तिखट लागते म्हणून खात नाही, पण नाका-तोंडातून पाणी येउन जाम हालत झाली तरी पाणीपुरी खाताना चेहर्यावरचा आनंद पहावा! Happy

फूलबाई... मस्तं जमलय पाणीपुरी पुराण. मी पाणी पुरीतली नाही इतकी. बाहेर खाणं एकदम "घातक" वगैरे होतं माझ्या काळात Happy
पण भेळ(ओली हं... सुक्या भेळेला मी मिक्स चिवडा म्हणू शकते फारतर..
कोमात असलीस तर काय म्हटल्यावर उठशील? ह्या प्रश्नाला अनेक वर्षं 'भेळ' हे उत्तर होतं...
अजून काय काय केलस भारतवारीत ते अस्संच डिट्टेलवर लिहून काढ बघू... जायला न जमलेले माझ्यासारखे अनेक दुव्या वर दुवे Happy देतिल, बघ.

पाणीपुरी माझ्या अत्यंत आवडीची. बाहेर गेल्यावर जर पाणीपुरी खाऊन आलं नाही तर पुण्य लागत नाही यावर माझा विश्वास आहे.

सानपाड्याला रहायला अस्ताना स्टेशनच्या बरोबर बाहेर एक पाणीपुरीवाला उभा असायचा. नवरा परोपरीने स्टेशनवरून चालत येऊ नकोस, रिक्षेने ये असं अतिप्रेमाने सांगायचा. मी पाणीपुरीखाऊन मग त्या कॅलरी रिचवण्यासाठी चालत यायचे. नवर्‍याने एकदा कोपरापासून हात जोडले होते. Happy

ओरिसा-बंगालकडे पाणीपुरीला पुचका म्हणतात. हा पुचका म्हणजे फक्त पाणी आणि पुरी. बटाटा शेव वगैरे काही नाही. आंबटगोडतिखट्खारट अशा चवीचं ते पाणी इतकं महान लागत होतं. पन्नासपैशामधे दोन पुर्‍या अशा हिशोब होता. मी दहा रूपयाच्या खाल्ल्या. Happy

अतिजहाल अशी पाणीपुरी खाल्ली ती कोल्हापुरात. अगदीकायम "सिर्फ तीखा" खाणारी मी दोन पुर्‍यानंतर "फक्त गोड पाणी घाला" म्हटले होते. जळ्ळं ते गोडपाणी पण तिखटच होतं.

चेन्नईमधे रस्तोरस्ती पाणीपुरी मिळत नाही, याचं अतीव दु:ख होतंच. शिवाय एका हॉटेलमधे पावभाजी मागवली होती तेव्हा त्यात सांबार मसाला घातला होता ते पाहून पाणीपुरी खावी की नाही हा प्रश्न पडला. पाणीत रस्सम मसाला घातलेला असायची भिती!!! पण चेन्नईमधे एक मारवाडी लोकांची बाजारपेठ आहे. तिथे दोन तीन "भय्या" पाणीपुरीवाले दिसले तेव्हा जरा बरं वाटलं.. आता आधी पाणीपुरी खावी आणी मग शॉपिंग करावी या व्रताला बाधा येणार नव्हती. तिथल्या एका स्वीटमार्टमधे जाऊन "पानीपुरीके लिये पुरी" घेऊन आले तेव्हा मला परमानंद झाला होता... लहर आली की पानीपुरी घरी बनवता येइल म्हणून!!!

जिव्हाळ्याचा विषय...!! मस्त लिहीलंय.. खूप्पच चटापटीत Happy
पापू ह्या टोपणनावाने प्रसिद्ध पदार्थ.... !!

चाट च्या यादीतील अग्रगण्य पदार्थ.

मला रोडसाईड भय्या ने बनवून दिलेली पापूच प्रिय आहे... अगदी सोफॅस्टिकेटॅड ठिकाणी हाताला प्लॅस्टिक वगैरे लावून आणि अगदी गरगरीत पुर्‍या* इ. खाणं म्हणजे रेस्तराँ मध्ये जाऊन चहा प्यायल्यासारखं आहे, काही गोष्टींची मजा टपरीतच!! Wink

(*त्यांचा जरासा ओबडधोबड आकारच हवा राव, तू म्हणाअलीस तसं टाकीचे घाव हवेतच Wink )

फार भारी!!! मला माझ्याबद्दलच लिहील्याआरखं वाटलं अगदी....
पाणीपुरी म्हणजे समस्त 'चाट' जमातीय पदार्थांचा सम्राट!!! फक्त पाणीपुरीवर जगू शकते मी!

शिवाय एका हॉटेलमधे पावभाजी मागवली होती तेव्हा त्यात सांबार मसाला घातला होता ते पाहून पाणीपुरी खावी की नाही हा प्रश्न पडला. पाणीत रस्सम मसाला घातलेला असायची भिती!!! >> नंदिनी.... Lol

मला ही पापू एकदम प्रिय.. बाहेरचं काहीही आवडत नाही, पण भेळ आणि पाणिपुरी किंवा चाटचे पदार्थ म्हणजे.. मला जीव की प्राण.

पुण्यात कर्वेनगरातल्या मनिषा मध्ये जी'भ'घेणी पाणीपुरी मिळते, दुकान सतत ओसंडून वहात असतं.

@ दादः कोमात असलीस तर काय म्हटल्यावर उठशील? ह्या प्रश्नाला अनेक वर्षं 'भेळ' हे उत्तर होतं...>>>>>> हे भारी आहे.

शिवाय एका हॉटेलमधे पावभाजी मागवली होती तेव्हा त्यात सांबार मसाला घातला होता ते पाहून पाणीपुरी खावी की नाही हा प्रश्न पडला.>>>> Happy

अगदी सोफॅस्टिकेटॅड ठिकाणी हाताला प्लॅस्टिक वगैरे लावून आणि अगदी गरगरीत पुर्‍या* इ. खाणं म्हणजे रेस्तराँ मध्ये जाऊन चहा प्यायल्यासारखं आहे, काही गोष्टींची मजा टपरीतच!! >>>>> अगदी अगदी

बाहेर गेल्यावर जर पाणीपुरी खाऊन आलं नाही तर पुण्य लागत नाही यावर माझा विश्वास आहे. <<<
माझाही.. Happy

मस्त...
आता आज संध्याकाळी एक तरी पापु रिचवली नाही तर पाप लागणार! Happy

मी पण पापु फॅन.
दिल्लीतली पापु मात्र मला जास्त आवडत नाही. आटा आणि सुजी अशा दोन प्रकारच्या पुर्‍या मिळतात इथे. आटावाल्या चांगल्या असतात पण त्या सुजीवाल्या पुर्‍या नाही आवडत चवीला. परत पुरीमध्ये छोले+बटाटा घालतात. तिखट पाणी बर्‍याचदा नुसतंच आंबट असतं. गोड पाणी मागितल्याशिवाय घालतच नाहीत पुरीत आणि सगळ्यात मेन म्हणजे शेवटी कोरडी बटाटा+शेव+ चाट मसालावाली पुरी देत नाहीत.

सासरी पंजाबात एका ठिकाणि मस्त पापु मिळतात. गावी गेलं की तिथे जाण्याचा एक कार्य्क्रम असतो. किती प्लेट वैगरे कधीच विचारत /सांगत नाही. २-४ जणं प्लेट घेवून उभे रहातो. मोजत पण नाही किती पापु खाल्ल्या ते. पोट भरेपर्यंत खात रहायचं. Happy आणि तिथून निघताना अंदाजेच दोन-तिनशे रुपये त्या माणसाला द्यायचे. Happy

आमच्या वाडीत लहाणपनी दोन भैय्ये फेरीवाले यायचे
१. भेलपुरी शेवपुरीवाला
२. पाणीपुरी, रगडापुरीवाला

भेलवाल्याकडून मी सुखी भेल कधी खाल्लीच नाही, ओलीच खायचो, कारण जी सुखी भेल घरच्या घरी बनवता येते ती का खा... हे त्यामागचे गणित..

तसेच पाणीपुरीवाल्याकडे कधी रगडापॅटीस खाला नाही... वाटाणा-बटाटा जो घरच्या भाजीतही असतो तो का खा... हे यामागचे गणित..

थोडक्यात तो भैय्या न बोलता आमच्या दारात येऊन पाणीपुरी बनवायला घ्यायचा... ताट मात्र आम्हीच द्यायचो.. चांगले मोठे ताट द्यायचो, माझ्या भोळ्या मनाचा एक समज असायचा की ताट मोठे दिले की जास्त मिळते..

नंतर पैसे खुळखुळायला लागले खिशात तसे न मोजता पाणीपुरी खायचो.. किमान दोन-तीन प्लेट खायचोच खायचो.. क्वचितच चव नाही आवडली तर एखाद प्लेटवर मांडवली..

तेव्हा पाणी पुरी पाच-सहा रुपये प्लेट असायची, आता १२-१५ रुपये भैय्याकडे मिळते.. मॉलमध्ये भगत ताराचंद वगैरे मंडळी ४० रुपये मोजून ७ पुर्‍या देतात.. चवीला त्या ही चांगल्याच असतात, मात्र तीन प्लेट टाकयचे तर १२० रुपयांचा हिशोब मनातल्या मनात केला जातो आणि वाटते आयला हे तर जेवणाचेच बिल्ल झाले की राव आणि मग रपारप खायचा मूडच निघून जातो.. Sad

अरे हो, धाग्याबद्दल धन्यवाद द्यायचे राहिलेच.. छान लिहिलेय.. असेच एकेक विषय काढा राव.. मजा येते सार्‍या आठवणी उगाळायला.. Happy

माझा एक भाऊ, काकांचा मुलगा, जाम इरसाल कार्टे होते, माझ्यापेक्षाही पाणीपुरी त्याचा जीव की प्राण, पाच-सहा रुपये पाणीपुरी प्लेट असायचे तेव्हा, तर हा आपला भाई, घरी पाणीपुरी खाऊन झाली तरी भैय्याकडे स्वताच्या पॉकेटमनीतला एक रुपया घेऊन जायचा आणि भैय्याला गळ घालायचा, भैया एक दे दो ना, एक रुपये का एक दे दो ना....

Pages