पाणीपुरी

Submitted by फूल on 17 January, 2013 - 20:31

भैय्याच्या घागरीत त्याने बुचकाळलेल्या हाताचा आवाज आणि आंबट गोड पाण्याने लडबडलेलं ते सुखाचं छोटसं गाडगं... खाल्ल्यानंतर जीभेच्या अगदी अंग प्रत्यंगाला चव देऊन जातं. मग पुन्हा भैय्या त्याच्या घागरीतलं पाणी त्या लांब दांड्याच्या चमच्याने ढवळतो आणि पुन्हा तेच सारं. पाणी पुरी... माझं सगळ्यात लाडकं आणि जीवाभावाचं खाणं. भैय्याने देत रहावं आणि मी खात जावं.

गोल गोल, छोट्या छोट्या, टम्म फुगलेल्या पुऱ्या; त्यांच्या पोटात भरायचं आपलं काहीबाही आंबट गोड; कुणी मूग, कुणी बुंदी, कुणी रगडा, कुणी नुसताच बटाटा, कुणी तिखा कम, कुणी सिर्फ़ तिखा, कुणी मिठी पुरी तर कधी सुखा पुरी. मसाला पुरी तर पानासारखी हवीच नंतर, त्याशिवाय तोंडात चव रेंगाळायची कशी? कुणाला सुचलं असेल हे खाद्य बनवायला. पाणीपुरीचा एकच घास "चटपटीत" ह्या शब्दाचा अर्थच सांगून जातो नाही?

आजवर असंख्य वेळा पाणी पुरी खाल्ली, कधी एकटीने तर कधी मित्र-मैत्रिणींबरोबर. सोबत कोणी असो वा नसो पाणी पुरीची सोबत मात्र कायमचीच. ती समोर दिसताना मग कशाला कोणाच्या सोबतीची वाट बघा. फक्त भैय्या असला म्हणजे झालं. ह्याच पाणी पुरीने मला अगणित जिव्हाळ्याचे क्षण दिले आणि आयुष्यभर जोपासता येईल असा आठवणींचा खजिना दिला. अजूनही देतच आहे.

ठाण्यातलं इव्हिनिंग स्पॉट बऱ्याच चाटप्रेमींचं लाडकं ठिकाण अगदी माहेर घरच म्हणा ना. मी तिथे सगळ्यात जास्त वेळा खाल्ली असेल पाणीपुरी. तेव्हातर पाच पाच रुपये शेअर करून वन बाय टू खायचो पाणीपुरी. तीन पुऱ्या तू आणि तीन मी आणि मसाला पुरी मात्र प्रत्येकी एक. गेले ते दिन गेले. आता माहित नाही पण तेव्हा त्याच्याकडे मसाला पुऱ्यांनी भरलेली एक प्लेटच ठेवलेली असायची. ’किती हव्या तेवढ्या खा’ ह्या थाटात. त्यातल्या चाटमसालायुक्त आणि शेवयुक्त, खारट बटाट्याची चव अजूनही तोंडात रेंगाळते आहे.

तशी ठाण्यात अनेक ठिकाणची पाणीपुरी खाल्ली पण ही पाणीपुरी लक्षात राहणारी अगदी आठवणीतली पाणी पुरी. ती खाताना तोंडात त्या पुरीची टोकं लागून सोलवटल्यासारखं व्हायचं, डोळ्यातून, नाकातून घळा घळा पाणी व्हायचं पण तरी अजून हवं असायचं. काय करणार टाकीचे घाव दुसरं काय.

ह्या पाणीपुरीच्या आंबट गोड आठवणींचं सगळं क्रेडीट भैय्यालाच जात नाही हं, घरी केलेल्या पाणी पुरीची पण खासच चव होती. तीही खायला तितकीच मज्जा यायची आणि शिवाय भरपूर खायला मिळायची. ती करण्यात पण एक मज्जा होती. मी करायला शिकलेल्या काही मोजक्याच पदार्थांमधे पाणीपुरीचं नाव अगदी पहिलं होतं.

माझं आजोळ कोल्हापूर. मी लहान असताना आई मला तिच्याबरोबर घेऊन जायची पण जशी मोठी झाले आणि क्लासेस, शाळा ह्यांचा व्याप जास्त वाढला तसं मग शालेय वर्षाच्या आधे-मधे कधी जाता यायचं नाही. आई एकटीच जायची कोल्हापूरला. मग काय मी आणि बाबा, रान मोकळंच. सकाळी मी फक्त भाजी करायचे म्हणजे फोडणीला टाकायचे. बाई पोळ्या करून जायच्या. बाबा VRS घेतल्यामुळे घरीच असायचे. ते सकाळचं बाकी सगळंच व्यवस्थित मॅनेज करायचे. मग संध्याकाळचा बेत मात्र खास आम्हाला आवडणारा आणि अतिशय निगुतीने केलेला. थाटच असायचा.

शाळेत जायच्या आधी मी आणि बाबा यादी करायचो. "पुऱ्या, पुदिना, चाट मसाला, मिरच्या, लिंबू, कोथींबीर, खजूर आहेत का घरात?" "हो आहेत. चिंच पण आहे." मी कपाटं बघत स्वयंपाक घरातून ओरडून सांगायचे. "बारीक शेव." मग बाबा विचारायचे, "बटाटे एव्हढे पुरतील का?" "हो पुरतील. बाबा, चार बटाटे कुकरला लावून ठेवा. मी आले की बाकीचे सगळे बघेन." शाळेतून घरी येईस्तोवर घरी सगळं सामान रेडी असायचं कोथींबीर आणि पुदिना निवडलेला, मिरच्यांची देठं काढून ठेवलेली, बटाटे उकडलेले. मग मी अगदी सऱ्हाईत शेफसारखी सगळ्या तयार सामुग्रीवर फक्त संस्कार करायचे. आई-बाबांचा बाहेरचं खाण्याला तसा आधीपासूनच विरोध असायचा. पण त्यांनाही चाट आवडायचं आणि मी केलेलं तर जास्तच कौतुकाचं. त्यांना घरंचं खाल्ल्याचं सुख आणि मला बाहेरचं खाल्ल्याचं सुख.

मोड आलेले मूग, बटाटे, कांद्याचा बारीकसा तुकडा, एक टॉमेटोचा बारीकसा तुकडा, जास्त गोड पाणी आणि तिखटपाण्याचं उगीच गालबोट असं करून वर शेव घालून बाबांना पुरी भरून द्यायचे. अगदी एक अन एक पुरी मीच भरून द्यायचे. तेही अगदी जिव्ह्याळ्याने, हौसेने खायचे. अर्थात हा घाट घालण्यासाठी सगळी उसनवार त्यांनीच केलेली असायची मी फक्त येऊन भटजीचं काम करायचे. आता लिहितानाही असं वाटतंय की मी ते जगतेय पण नाही ती आता आठवण आहे. गोड आठवण, माझी आणि बाबांची आणि हो पाणीपुरीची सुद्धा.

लग्नानंतर वापीला रहायला गेले. पण पाणीपुरीने पाठ काही सोडली नाही. तिथेही ती होतीच. नवऱ्याच्या ४ मित्रांचं आणि आमचं एकाच वर्षी लग्न झालं तेही काही दिवसांच्या अंतराने. सगळीच नवीन लग्न झालेली ४-५ जोडपी एकत्र वापीत होतो. एकावेळी आठ जणं गोल करून पाणी पुरी खायचो. शिवाय तिथे सगळ्यांच्याच नवऱ्या वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या त्या पाणीपुरीला वेगवेगळ्या नावाने हाक मारत असत, कोणी गुपचूप म्हणे तर कोणी गोलगप्पा पण पाणी पुरीच ती; तिला राजा म्हणा वा रंक म्हणा, कोणी निंदो कोणी वंदो ह्या थाटात सगळ्यांना सारखंच सुख-समाधान द्यायची. आम्हा सगळ्यांच्या मनाला साद घालणारा तो एक समांतर दुवा होता. तो भैय्याही जवळचा झाला होता. आम्हाला खास सेवा असायची पाणी पुरी बरोबर शेव आणि कांदा, चाटमसाला घालून एका द्रोणात घालून द्यायचा सगळ्यांना. ते खायला आणखिन जास्त मज्जा यायची.

नवरा काही माझ्या इतका पाणी पुरी वेडा नाही पण तो मला कधीच आड येत नाही. माझ्या आणि तिच्या मधे कोणी आलेलं मला आवडणारही नाही. हे कदाचित त्यालाही माहित असावं. पाणीपुरी खाऊन खाऊन पुरी सारखीच फुगली आहेस असं म्हणतो कधी कधी. पण मला अशावेळी आईचे शब्द आठवतात. तीही मला हेच म्हणत असे, "नळे फुंकले सोनारे..." पुढचे सूज्ञास सांगणे न लगे.

आता तर देशच सोडून इथे आले आहे. आष्ट्रेलियात. भारत सोडताना आणि सिडनी मधे आल्यावर सुद्धा आई-बाबा आणि पाणी पुरी तिघांच्या आठवणीने खूपच रडले होते. सिडनी मध्ये आल्यावर मैत्रिणींची आठवण आली की पाणी पुरीच आठवायची. पण तेव्हा पण एक गंमत झाली. आमचे सिडनीतलेच एक नातेवाईक आम्हाला भेटायला म्हणून आमच्या घरी आले होते. अगदी सिडनी मधे अवतरल्या अवतरल्या तिसऱ्या-चौथ्या दिवशीच. इथे जवळच चिक्कार भारतीच हॉटेल्स आहेत या तुम्हाला दाखवतो म्हणून ते आम्हाला बाहेर घेऊन गेले. आणि एका भारतीय हाटेलात त्यांनी चक्क पाणी पुरी ऑर्डर केली. माझ्या डोळ्यातली चमक आणि आनंद लपवता लपत नव्हता. अर्थात तिथे भैय्याचा हात नव्हता आपली आपणच तयार करून खायची अन तिही छोले घातलेली पुरी. पण हेही नसे थोडके. माझा आनंद गगनात मावत नव्हता. अहो भाग्य! मी तिला सोडून लांब गेले तरी ती मला शोधत आलीच असं म्हणायला हवं. माझी पाणी पुरी ग्ग्ग ती...!! तो दिवसही मी कधीच विसरणार नाही.

आता अगदी अलिकडची आठवण म्हणजे आई बरोबर पाणी पुरी शेअर केल्याची. आत्ताच भारतात जाऊन आले. भारतातून निघायला शेवटचे तीन दिवस बाकी होते. अनेक ठिकाणची पाणीपुरी तोवर खाऊन झालीच होती. पोटाची पार नाही पण बरीच वाट लागली होती.

आई बरोबर खरेदीला बाहेर पडले होते. एक पंजाबी ड्रेस विकत घेतला आणि तो ड्रेसवाला म्हणाला, "फिरून या १५ मिनिटांत ड्रेसला हात लावून देतो". म्हटलं ठिक आहे. मी आणि आई दुकानातून बाहेर पडलो आणि फिरत होतो. एका ठिकाणी कानातले बघत होते. शेजारीच पाणीपुरीचं दुकान होतं. आई माझी जात्याच शिस्तिची. तिच्यासमोर एकदाच म्हटलं, "आई, पाणी पुरी." आई म्हणाली, "पोट सांभाळा." मी गप्प. पुन्हा कानातले बघू लागले. तरी तिला म्हटलं, "शेवटचे तीनच दिवस आहेत." "तिथे घरी करून खातेस ना?" इति आईश्री. मी मूग गिळून गप्प. हा चान्स गेला ह्या विचारात असतानाच आई म्हणाली. "चल खाऊया पण दोघीत एकच हं." एकच तर एकच चान्स का सोडा. मी लगेच ऑर्डर दिली. एक पुरी आई खात होती आणि एक मी. माझ्या हातात एकच डिश होती तिच मी दोघींच्या पुढे नाचवत होते. ६ पुऱ्या संपल्या आणि भैय्याने विचारलं, "और दूँ?" मी काही म्हणणार इतक्यात आईच म्हणाली, "हं सांग अजून एक" हे ऐकलं मात्र आणि मी मनातून पाणीपुरी सारखीच डबडबले. डोळे भरलेले, तोंड फुगलेलं आणि भावना डोळ्यातल्या पाण्यावाटे ओसंडत होत्या, पाणी पुरीतल्या पाण्यासारख्या. साक्षात पाणीपुरीच झाली माझी. आईला आणि भैय्याला वाटलं की तिखट लागलं म्हणून पाणी येतंय. मला ते बरंच वाटलं. एरव्ही आईने मला पाणीपुरीला शिवूही दिलं नसतं. त्या राहिलेल्या तीनच दिवसांची ती किंमत होती. मी ही मनातून हलले, गहिवरले जणू भैय्याने तो लांब दांड्याचा चमचा माझ्याच मनात ढवळला. पाणी पुरीची चव जशी खारट व्ह्यायला लागली तसं स्वत:ला आवरलं. दुकानातून बाहेर पडलो आणि आईला म्हटलं, "मस्त होती ना पाणी पुरी. कुणी शोधून काढली असेल गं ही". आईही हसून म्हणाली, "ते कॉम्बिनेशन खरच छान आहे". भैय्याच्या घागरीत त्याने बुचकाळलेल्या हाताचा आवाज आणि आंबट गोड पाण्याने लडबडलेलं ते सुखाचं छोटसं गाडगं...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठून शोधलास रे video.....
फेसबुकवर कोणीतरी शेअर केला होता, तो बघून YouTube वर शोधला!

सुट्टीत भारतात आलो असताना एक लग्नाला गेलो होतो..तिकडे जेवण व चाट दोन्ही होते....आम्ही फकस्त पाणीपुरीच्याच ठेल्यावर....जेवणाला हात पण लावला नाही.........
म्हणजे यजमानांचे per plate पैसे वाचवलेत!!!!! Proud Proud Proud

'पाणी पुरी ' असा हा सर्वानुमते सर्वगुणयुक्त पदार्थ खूप वेळा ऐकलय याचे महात्म्य पण ............
तुमच्या मते दुर्दैवी असेन पण मी ती कधीच खाल्ली नाहीय.कारण..सुदैवाने ( ? ) एकदा खातांना जो ठसका लागलाय -मरणप्राय-तर पुन्हा
त्या वाटेस जाण्याचे धाडस झाले नाही ......हे थोडे अवांतर
पण लेख मस्त

खूपच सुरेख लिहिलंय. तुझा पाणिपुरीबद्दलचा जिव्हाळा मनापासून पोहोचला.. > अगदी खरं..
माझ्यापण अतिशय आवडीची डिश, एक प्लेट खाऊन कधीच समाधान होत नाही...
आमच्या डोंबिवली इस्टला केळकर रोडच्या आतल्या बाजुच्या रस्त्याला प्रजापतीकडेच खायची पापु. आधी त्याची गाडी होती. आता त्याने गाळा घेतलाय. बेस्ट चव एकदम. >>>> 100 टक्के अनुमोदन सायो

भैय्याच्या घागरीत त्याने बुचकाळलेल्या हाताचा आवाज आणि आंबट गोड पाण्याने लडबडलेलं ते सुखाचं छोटसं गाडगं... खाल्ल्यानंतर जीभेच्या अगदी अंग प्रत्यंगाला चव देऊन जातं. मग पुन्हा भैय्या त्याच्या घागरीतलं पाणी त्या लांब दांड्याच्या चमच्याने ढवळतो आणि पुन्हा तेच सारं. पाणी पुरी... माझं सगळ्यात लाडकं आणि जीवाभावाचं खाणं. भैय्याने देत रहावं आणि मी खात जावं.>>>>>> अप्रतिम ..असं वाटत आहे की लेखिकेने माझ्याच मनातले भाव कागदावर उतरवले आहेत . तंतोतंत रिलेट झाली

मी मनातून पाणीपुरी सारखीच डबडबले. डोळे भरलेले, तोंड फुगलेलं आणि भावना डोळ्यातल्या पाण्यावाटे ओसंडत होत्या, पाणी पुरीतल्या पाण्यासारख्या. साक्षात पाणीपुरीच झाली माझी. >>> >>>>>>> भक्तीत उत्कटता असेल तर देवाशी एकरूप होण्याचा सर्वोच्च आनंद मिळतो असे म्हणतात , तेव्हा भक्त हा देव आणि देव हा भक्त होऊन जातो ... तसंच आहे हे .. Happy

पूर्ण लेखासाठी +१११११११११११११११११११११११११११११११११११

कुठल्याही शहरात माझं आवडतं कॉम्बिनेशन असलेली शोधतेच !! नाहीतर भैयाच डोकं खाऊन त्याला कस्टम ऑर्डर देते ..
माझ्यासाठी रगडा हा बिग नो नो आहे .
माझ्यापुरतं बोलायचं झालं तर आमच्या नांदेडची पापु म्हणजे स्वर्गसुख आहे .. त्या गुणवत्तेची आजतागायत मिळाली नाही कुठे !!१
इथे कोणी नांदेडकर असतील तर त्यांना समजु शकेल ती चव !!

Pages