पाणीपुरी

Submitted by फूल on 17 January, 2013 - 20:31

भैय्याच्या घागरीत त्याने बुचकाळलेल्या हाताचा आवाज आणि आंबट गोड पाण्याने लडबडलेलं ते सुखाचं छोटसं गाडगं... खाल्ल्यानंतर जीभेच्या अगदी अंग प्रत्यंगाला चव देऊन जातं. मग पुन्हा भैय्या त्याच्या घागरीतलं पाणी त्या लांब दांड्याच्या चमच्याने ढवळतो आणि पुन्हा तेच सारं. पाणी पुरी... माझं सगळ्यात लाडकं आणि जीवाभावाचं खाणं. भैय्याने देत रहावं आणि मी खात जावं.

गोल गोल, छोट्या छोट्या, टम्म फुगलेल्या पुऱ्या; त्यांच्या पोटात भरायचं आपलं काहीबाही आंबट गोड; कुणी मूग, कुणी बुंदी, कुणी रगडा, कुणी नुसताच बटाटा, कुणी तिखा कम, कुणी सिर्फ़ तिखा, कुणी मिठी पुरी तर कधी सुखा पुरी. मसाला पुरी तर पानासारखी हवीच नंतर, त्याशिवाय तोंडात चव रेंगाळायची कशी? कुणाला सुचलं असेल हे खाद्य बनवायला. पाणीपुरीचा एकच घास "चटपटीत" ह्या शब्दाचा अर्थच सांगून जातो नाही?

आजवर असंख्य वेळा पाणी पुरी खाल्ली, कधी एकटीने तर कधी मित्र-मैत्रिणींबरोबर. सोबत कोणी असो वा नसो पाणी पुरीची सोबत मात्र कायमचीच. ती समोर दिसताना मग कशाला कोणाच्या सोबतीची वाट बघा. फक्त भैय्या असला म्हणजे झालं. ह्याच पाणी पुरीने मला अगणित जिव्हाळ्याचे क्षण दिले आणि आयुष्यभर जोपासता येईल असा आठवणींचा खजिना दिला. अजूनही देतच आहे.

ठाण्यातलं इव्हिनिंग स्पॉट बऱ्याच चाटप्रेमींचं लाडकं ठिकाण अगदी माहेर घरच म्हणा ना. मी तिथे सगळ्यात जास्त वेळा खाल्ली असेल पाणीपुरी. तेव्हातर पाच पाच रुपये शेअर करून वन बाय टू खायचो पाणीपुरी. तीन पुऱ्या तू आणि तीन मी आणि मसाला पुरी मात्र प्रत्येकी एक. गेले ते दिन गेले. आता माहित नाही पण तेव्हा त्याच्याकडे मसाला पुऱ्यांनी भरलेली एक प्लेटच ठेवलेली असायची. ’किती हव्या तेवढ्या खा’ ह्या थाटात. त्यातल्या चाटमसालायुक्त आणि शेवयुक्त, खारट बटाट्याची चव अजूनही तोंडात रेंगाळते आहे.

तशी ठाण्यात अनेक ठिकाणची पाणीपुरी खाल्ली पण ही पाणीपुरी लक्षात राहणारी अगदी आठवणीतली पाणी पुरी. ती खाताना तोंडात त्या पुरीची टोकं लागून सोलवटल्यासारखं व्हायचं, डोळ्यातून, नाकातून घळा घळा पाणी व्हायचं पण तरी अजून हवं असायचं. काय करणार टाकीचे घाव दुसरं काय.

ह्या पाणीपुरीच्या आंबट गोड आठवणींचं सगळं क्रेडीट भैय्यालाच जात नाही हं, घरी केलेल्या पाणी पुरीची पण खासच चव होती. तीही खायला तितकीच मज्जा यायची आणि शिवाय भरपूर खायला मिळायची. ती करण्यात पण एक मज्जा होती. मी करायला शिकलेल्या काही मोजक्याच पदार्थांमधे पाणीपुरीचं नाव अगदी पहिलं होतं.

माझं आजोळ कोल्हापूर. मी लहान असताना आई मला तिच्याबरोबर घेऊन जायची पण जशी मोठी झाले आणि क्लासेस, शाळा ह्यांचा व्याप जास्त वाढला तसं मग शालेय वर्षाच्या आधे-मधे कधी जाता यायचं नाही. आई एकटीच जायची कोल्हापूरला. मग काय मी आणि बाबा, रान मोकळंच. सकाळी मी फक्त भाजी करायचे म्हणजे फोडणीला टाकायचे. बाई पोळ्या करून जायच्या. बाबा VRS घेतल्यामुळे घरीच असायचे. ते सकाळचं बाकी सगळंच व्यवस्थित मॅनेज करायचे. मग संध्याकाळचा बेत मात्र खास आम्हाला आवडणारा आणि अतिशय निगुतीने केलेला. थाटच असायचा.

शाळेत जायच्या आधी मी आणि बाबा यादी करायचो. "पुऱ्या, पुदिना, चाट मसाला, मिरच्या, लिंबू, कोथींबीर, खजूर आहेत का घरात?" "हो आहेत. चिंच पण आहे." मी कपाटं बघत स्वयंपाक घरातून ओरडून सांगायचे. "बारीक शेव." मग बाबा विचारायचे, "बटाटे एव्हढे पुरतील का?" "हो पुरतील. बाबा, चार बटाटे कुकरला लावून ठेवा. मी आले की बाकीचे सगळे बघेन." शाळेतून घरी येईस्तोवर घरी सगळं सामान रेडी असायचं कोथींबीर आणि पुदिना निवडलेला, मिरच्यांची देठं काढून ठेवलेली, बटाटे उकडलेले. मग मी अगदी सऱ्हाईत शेफसारखी सगळ्या तयार सामुग्रीवर फक्त संस्कार करायचे. आई-बाबांचा बाहेरचं खाण्याला तसा आधीपासूनच विरोध असायचा. पण त्यांनाही चाट आवडायचं आणि मी केलेलं तर जास्तच कौतुकाचं. त्यांना घरंचं खाल्ल्याचं सुख आणि मला बाहेरचं खाल्ल्याचं सुख.

मोड आलेले मूग, बटाटे, कांद्याचा बारीकसा तुकडा, एक टॉमेटोचा बारीकसा तुकडा, जास्त गोड पाणी आणि तिखटपाण्याचं उगीच गालबोट असं करून वर शेव घालून बाबांना पुरी भरून द्यायचे. अगदी एक अन एक पुरी मीच भरून द्यायचे. तेही अगदी जिव्ह्याळ्याने, हौसेने खायचे. अर्थात हा घाट घालण्यासाठी सगळी उसनवार त्यांनीच केलेली असायची मी फक्त येऊन भटजीचं काम करायचे. आता लिहितानाही असं वाटतंय की मी ते जगतेय पण नाही ती आता आठवण आहे. गोड आठवण, माझी आणि बाबांची आणि हो पाणीपुरीची सुद्धा.

लग्नानंतर वापीला रहायला गेले. पण पाणीपुरीने पाठ काही सोडली नाही. तिथेही ती होतीच. नवऱ्याच्या ४ मित्रांचं आणि आमचं एकाच वर्षी लग्न झालं तेही काही दिवसांच्या अंतराने. सगळीच नवीन लग्न झालेली ४-५ जोडपी एकत्र वापीत होतो. एकावेळी आठ जणं गोल करून पाणी पुरी खायचो. शिवाय तिथे सगळ्यांच्याच नवऱ्या वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या त्या पाणीपुरीला वेगवेगळ्या नावाने हाक मारत असत, कोणी गुपचूप म्हणे तर कोणी गोलगप्पा पण पाणी पुरीच ती; तिला राजा म्हणा वा रंक म्हणा, कोणी निंदो कोणी वंदो ह्या थाटात सगळ्यांना सारखंच सुख-समाधान द्यायची. आम्हा सगळ्यांच्या मनाला साद घालणारा तो एक समांतर दुवा होता. तो भैय्याही जवळचा झाला होता. आम्हाला खास सेवा असायची पाणी पुरी बरोबर शेव आणि कांदा, चाटमसाला घालून एका द्रोणात घालून द्यायचा सगळ्यांना. ते खायला आणखिन जास्त मज्जा यायची.

नवरा काही माझ्या इतका पाणी पुरी वेडा नाही पण तो मला कधीच आड येत नाही. माझ्या आणि तिच्या मधे कोणी आलेलं मला आवडणारही नाही. हे कदाचित त्यालाही माहित असावं. पाणीपुरी खाऊन खाऊन पुरी सारखीच फुगली आहेस असं म्हणतो कधी कधी. पण मला अशावेळी आईचे शब्द आठवतात. तीही मला हेच म्हणत असे, "नळे फुंकले सोनारे..." पुढचे सूज्ञास सांगणे न लगे.

आता तर देशच सोडून इथे आले आहे. आष्ट्रेलियात. भारत सोडताना आणि सिडनी मधे आल्यावर सुद्धा आई-बाबा आणि पाणी पुरी तिघांच्या आठवणीने खूपच रडले होते. सिडनी मध्ये आल्यावर मैत्रिणींची आठवण आली की पाणी पुरीच आठवायची. पण तेव्हा पण एक गंमत झाली. आमचे सिडनीतलेच एक नातेवाईक आम्हाला भेटायला म्हणून आमच्या घरी आले होते. अगदी सिडनी मधे अवतरल्या अवतरल्या तिसऱ्या-चौथ्या दिवशीच. इथे जवळच चिक्कार भारतीच हॉटेल्स आहेत या तुम्हाला दाखवतो म्हणून ते आम्हाला बाहेर घेऊन गेले. आणि एका भारतीय हाटेलात त्यांनी चक्क पाणी पुरी ऑर्डर केली. माझ्या डोळ्यातली चमक आणि आनंद लपवता लपत नव्हता. अर्थात तिथे भैय्याचा हात नव्हता आपली आपणच तयार करून खायची अन तिही छोले घातलेली पुरी. पण हेही नसे थोडके. माझा आनंद गगनात मावत नव्हता. अहो भाग्य! मी तिला सोडून लांब गेले तरी ती मला शोधत आलीच असं म्हणायला हवं. माझी पाणी पुरी ग्ग्ग ती...!! तो दिवसही मी कधीच विसरणार नाही.

आता अगदी अलिकडची आठवण म्हणजे आई बरोबर पाणी पुरी शेअर केल्याची. आत्ताच भारतात जाऊन आले. भारतातून निघायला शेवटचे तीन दिवस बाकी होते. अनेक ठिकाणची पाणीपुरी तोवर खाऊन झालीच होती. पोटाची पार नाही पण बरीच वाट लागली होती.

आई बरोबर खरेदीला बाहेर पडले होते. एक पंजाबी ड्रेस विकत घेतला आणि तो ड्रेसवाला म्हणाला, "फिरून या १५ मिनिटांत ड्रेसला हात लावून देतो". म्हटलं ठिक आहे. मी आणि आई दुकानातून बाहेर पडलो आणि फिरत होतो. एका ठिकाणी कानातले बघत होते. शेजारीच पाणीपुरीचं दुकान होतं. आई माझी जात्याच शिस्तिची. तिच्यासमोर एकदाच म्हटलं, "आई, पाणी पुरी." आई म्हणाली, "पोट सांभाळा." मी गप्प. पुन्हा कानातले बघू लागले. तरी तिला म्हटलं, "शेवटचे तीनच दिवस आहेत." "तिथे घरी करून खातेस ना?" इति आईश्री. मी मूग गिळून गप्प. हा चान्स गेला ह्या विचारात असतानाच आई म्हणाली. "चल खाऊया पण दोघीत एकच हं." एकच तर एकच चान्स का सोडा. मी लगेच ऑर्डर दिली. एक पुरी आई खात होती आणि एक मी. माझ्या हातात एकच डिश होती तिच मी दोघींच्या पुढे नाचवत होते. ६ पुऱ्या संपल्या आणि भैय्याने विचारलं, "और दूँ?" मी काही म्हणणार इतक्यात आईच म्हणाली, "हं सांग अजून एक" हे ऐकलं मात्र आणि मी मनातून पाणीपुरी सारखीच डबडबले. डोळे भरलेले, तोंड फुगलेलं आणि भावना डोळ्यातल्या पाण्यावाटे ओसंडत होत्या, पाणी पुरीतल्या पाण्यासारख्या. साक्षात पाणीपुरीच झाली माझी. आईला आणि भैय्याला वाटलं की तिखट लागलं म्हणून पाणी येतंय. मला ते बरंच वाटलं. एरव्ही आईने मला पाणीपुरीला शिवूही दिलं नसतं. त्या राहिलेल्या तीनच दिवसांची ती किंमत होती. मी ही मनातून हलले, गहिवरले जणू भैय्याने तो लांब दांड्याचा चमचा माझ्याच मनात ढवळला. पाणी पुरीची चव जशी खारट व्ह्यायला लागली तसं स्वत:ला आवरलं. दुकानातून बाहेर पडलो आणि आईला म्हटलं, "मस्त होती ना पाणी पुरी. कुणी शोधून काढली असेल गं ही". आईही हसून म्हणाली, "ते कॉम्बिनेशन खरच छान आहे". भैय्याच्या घागरीत त्याने बुचकाळलेल्या हाताचा आवाज आणि आंबट गोड पाण्याने लडबडलेलं ते सुखाचं छोटसं गाडगं...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी,
असले उद्योग आधीच पिऊन चिंग वगैरे झाल्यावरच चांगले लागतात. बियरवाली मलाही आवडली नव्हती आधी. मग एक ५-७ पुर्‍या फटाफट गेल्यावर अचानक चव झक्कास लागतेय असा साक्षात्कार झाला होता Wink
वर्जिनल पापू म्हंजे फक्त मारवाड्यांच्या लग्नातलीच. अमरावतीचं सासर असलेल्या आमच्या मित्राच्या लग्नात खाल्लेली पापू इतक्या वर्षांनंतरही आठवतेय जिभेला..

व्होडका आणि ओजे पेक्षा व्होडका-लिंबू-मिरची केलं तर भन्नाट लागेल.
तसंही व्होडका-लिंबू-मिरची भारी असतं.

भारताबाहेर राहणार्‍यांसाठी , भारतातली पाणीपुरी हे एक वेगळ्या गोष्टीसाठी वरदान होऊ शकतं.
मी भारतात आलो की पहिल्या १-२ दिवसातच बाहेर गाडीवर पाणीपुरी खातो. दुसर्‍या दिवशी लगेच आजारी पडतो. पण तो एक दिवस गेल्यावर, शरीरातली वाढत्या काळातली प्रतिकार शक्ती जागृत होत असावी बहुतेक. कारण त्यानंतर मी वाट्टेल ते खातो (अगदी एसटी स्टॅण्डवरच्या कँटीनमधली मिसळही खाल्ली आहे) पण मग पोटाचा काहीही त्रास होत नाही. गेली ३-४ वर्षे अगदीच अस्वच्छ वाटले तर बाटलीतले पाणी पितो या अगोदर तेही करत नसे.
मी गेले २१ वर्षे हा उपाय करतो आहे. माझ्यापुरता तरी तो यशस्वी होतो आहे.
मायबोलीवरची तमाम डॉक्टरमंडळी मला वाळीत टाकण्याची शक्यता असतानादेखील मी हे लिहायंच धाडस करतोय. प्रत्येकाची प्रकृती वेगळी त्यामुळे माझ्या शरिराला जे लागू पडतं ते तुम्हाला लागू होईलच असे नाही.

जाता जाता: जगातली सगळ्या उत्तम वाईन आणि पाणिपुरीचं पाणी यातला पर्याय निवडायचा झाला तर मी केंव्हाही पाणिपुरीचं पाणी निवडीन

अजय Happy

मला पुण्यातली पापु अजिबात आवडत नाही (एखादा अपवाद सोडून). कदाचित अजून जिथे कुठे एखाद्या ठिकाणी चांगली मिळत असेल ते ठिकाण मला सापडले नसेल..पण त्यामुळे पापुच्या क्रेव्हिंगवर काय उपाय करावा ते अजून कळलं नाहिये..
माझ्यामते पुण्यात पापुत जो चवहीन गरम रगडा घालतात त्याने त्या पापुतली सगळी मजा जाते..गरम रगडा + थंड पाणी ये कुछ जमता नही Sad
अन पाणी पण अगदी गरम मसाला(?) वगैरे घातलेले तिखट नायतर अगदी गोडमिट्ट. आंबटगोडतिखट ही चवच नसते. असो. पुण्यातल्या हाटेलात (श्रेयस वगैरे) भरली वांगी जितकी गोड असतात त्यामानाने पानीपुरी काही फार गोड नसते म्हणायची.. अन इथले दहीवडे तर स्वीटडीश म्हणून खावे इतके गोड असतात Proud त्यामानाने पाणीपुरी ठिकच म्हणायची..अन इथे कुठलीही हिरवी मिरची चटणी जितकी गोड असते त्यामानाने तर गोड पाणीपुरी म्हणजे फार काय फार विचित्र नाही म्हणायचे. Proud असो.
ओरिजिनल पुणेकरांच्या भावना बिवना दुखावल्या असतील तरी मी अजिबात "क्षमस्व" नाही.

१००

नताशा
मग तुम्हाला कुठली पाणीपुरी आवडते हे आम्हाला सगळ्यानाही कळू द्या. माझ्या मते मी आतापर्यंत ज्या ज्या गावात पाणीपुरी खाल्ली त्यात सगळ्यात बेस्ट नागपूर आणि सगळ्यात बेकार बंगलोर.

नागपूरमधे कुठेही खाल्ली तरी चिंचेच्या पाण्याला एक लाजवाब चव असते.
बंगलोरमधे (एके काळी) भेळ असो, चाट असो, रगडा असो , पाणीपुरी असो सगळ्यात किसलेले गाजर असे. चेन्नईलाही बंगलोरपेक्षा बरी पाणीपुरी मिळायची.

जाता जाता: बॉस्टनमधे (लॉवेलमधे) बुधवारी रात्री एका ठराविक रकमेत अमर्यादित पाणीपुरी+भेळपुरी+दहीपुरी मिळते.

अजय, तिकडच्या पाणीपुरीची चव इथल्या पाणीपुरीला अजिबात येत नाही. पण मिळते हेही नसे थोडके.
नताशाचं माहेर मुंबईचं असेल तर तिला मुंबईचीच आवडत असणार Wink

बंगलोरमधे (एके काळी) भेळ असो, चाट असो, रगडा असो , पाणीपुरी असो सगळ्यात किसलेले गाजर असे. >>> हा हा. हे अजूनही अगदी तसेच आहे. किसलेले गाजर हे बंगलोरच्या चाट 'आयटेम्स' चे व्यवच्छेदक लक्षण आहे. Wink
बाकी पापु फॅन क्लबात मी पण. बंगलोर पेक्षा इथे पण बरी मिळते पापु. Happy

पण एकदा हापिसात एथनिक डे ला फुल्ली सौदिंडीयन वातावरणात - सर्व बाया साउथ कॉटन साड्यांमधे, भरपूर्‍ तेल लावून मोकळ्या सोडलेल्या केसात, सोन्याच्या दागिन्यांत, गंध लावून बसून मामुट्टी , रजनीकांत व तत्सम हँडसम हिरोज बद्दल भरभरुन चर्चा करत असताना त्यांच्यासोबत खाल्लेल्या चना सुंदल व गाजर पापु मधलं गाजर त्यावेळी तितकंसं खटकलं नव्हतं हे पक्कं आठवतंय. Happy

अजय, माझ्याहीमते नागपूर बेस्ट Happy कुठेही खा, चांगलीच मिळणार. आंबटगोडतिखटनमकीन याचं परफेक्ट काँम्बिनेशन असतं. इथे पुण्यात "आंबट" ही चवच नसते पापुत. Sad
कोलकाता फेम फुचका पण मस्त. साउथमध्ये पापु चांगली मिळाली नाही तर वाईट वाटत नाही. पण पुण्यात?? असो.
सायो, माहेर एका जागी टिकून नसतं Wink

मी आजवर खाल्लेल्या पापु मधे अजून तरी मला पूर्वी इर्ल्यात असलेला, आता पार्ला मार्केटात असलेला पापुवाला आणि सुभाष रोडचा गणेश भेळवाला यांचा नंबर सगळ्यात वरती.
पण मी पापु पुणे, मुंबई आणि अटलांटा एवढ्याच ठिकाणी खाल्लेय. अटलांटाची बकवास होती. कुठे ते आठवतही नाही.
पुण्यातली गोडसर असते मान्य पण आंबट अजिबातच नसते असे काही वाटले नाही. टिळकरोडवरची गिरीजाच्या बाजूची आजीची पापु आणि क्याम्पात त्या हनुमान मंदीराच्या बाहेरची पापु मला आवडते. रगडावाली असली तरी. एरवी रगडावाली पापु धन्यवादच!

नागपूरची पापु एवढी खास असते हे आधी माहित नव्हते. त्यामुळे दोन वेळा गेले होते तेव्हा कधी खाल्ली नाही. परत कधी गेले तर खाईन.

नागपूरची पापु एवढी खास असते हे आधी माहित नव्हते. >> हे मलाही तिथे राहात असेपर्यंत माहीत नव्हते Proud
पण तरी कधी जाणार असल्यास आधीच बेस्ट ठिकाणे माहीत करुन घ्यावीत. नाहीतर बजाजनगर/ वेस्ट हायकोर्ट रोडला कुठेही खावी. above average मिळेलच याची खात्री.

नक्कीच आता डोक्यात राहील. जायच्या आधी या धाग्यावर चक्कर नक्की.
स्पेसिफिक दुकाने लक्षात असतील तर नावे टाक.

दुकानं अशी नाहीत..पापुच्या गाड्याच फेमस आहेत. आता मलाही बरीच वर्षं झाली नागपूर सोडून. त्यामुळे लेटेस्ट अपडेट्स नाहीत. नागपूर खादाडी धाग्यावर माहिती मिळेल.
पण तरी माझ्या आठवणीत खास म्हणजे वे. हा. रोडच्या हल्दीरामच्या अजुबाजुच्या गाड्या आणि बजाजनगर मातृसेवा संघाच्या जवळच्या गाड्या.
खरं म्हणजे कुठलेही चाट आयटम नागपूरला चांगलेच मिळतात.
चाटसाठी माझं फेवरेट म्हणजे वे. हा. रोडचं प्रीती चाट कॉर्नर. समोसा चाट एकदम सही असते तिथे. थोडासा क्रश्ड समोसा, त्यावर तर्रीवाले छोले+ चिंचेची चटणी (म्हणजे गोड नाही, आंबटगोड) + हिरवी चटणी (तिखट) +कांदा-कोथिंबीर-शेव.. अहाहा Happy समोसेही नागपूरचेच बेस्ट. नो मिंट, नो काजु-किसमिस, नो कढीपत्ता. नो नॉनसेन्स.
हल्दीरामचे समोसे-कचोरी मात्र अगदी बोर. अजिबात खाऊ नयेत.
सह्ही समोसे खायचे असल्यास हनुमान मंदीर (सेमिनरी हिल्स) गाठावे Proud तिथल्या गाड्यांवरचा समोसा+ त्याम्ची खास आंबटगोडतिखट चटणी. अमेझिंग.
एकदा मी त्याला त्यांची काही खास टीप आहे का विचारलं होतं, तेव्हा तो गाडीवाला म्हणाला "कुछ खास नही, बस्स लहसुन और साबुत धनिया". माझ्यामते हेच विशेष आहे. पुण्यात कढीपत्ता, काजु-बिजु घालून समोस्याची वाट लावतात..
कधी मिळणार हे सगळं आता? Sad

चेन्नईलाही बंगलोरपेक्षा बरी पाणीपुरी मिळायची.>> +१. Happy मंगलोरमधे पण बघावं त्याच्यात गाजरं घातलेली असायची.

चेन्नईमधे काल असंच फिरायला गेलो होते तेव्हा ड्रायव्हर अगदी उत्साहाने आम्हाला "हा करूणानिधीचा बंगला" असं दाखवत होता. त्याला म्हटलं ताबडतोब गाडी थांबव. त्याला वाटलं मी फोटो वगैरे काढतेय की काय,,, गाडीतून उतरले तर समोर "धी न्यु बॉम्बे चॅट सेंटर" तिथे वडा पाऊ (Vada Pau) भेल्लंपुरी, पानींपुरी असे अनेक प्रकार होते. मनसोक्त पाणीपुरी खाल्ली. तेव्हा या धाग्याची चांगलीच आठवण आली होती. पुढच्यावेळेला हे चाट सेंटर लक्षात ठेवायला लँडमार्क पण चांगलाच मिळालाय.

नताशा.. तू एकदा नाशिकची पापु खा.. पुण्याची पापु अप्रतीम असते म्हणशील...
तिथे घाटावर पापु म्हणुन जे काही देतात त्यानंतर पापु खायची इच्छाच मरते.. Sad

मला आवड्ते बन्गलोरची पापु Happy पूर्वी नाही आवडायची ..... आता दहा वर्षात सवय झाली .... ह्या उन्हाळ्यात औरन्गाबादला पापु आणि पुण्याला इतर चाट खाल्यावर बन्गलोरच्या पापुची आठवण झाली Happy आजकाल इथे जागोजगी बान्बूच्या चोयटयानपासून केलेले पापु stalls आहेत ....तिथे खट्टा- मीठा मिक्स मागायची ...... ते विक्रेते सुखा मसाला पुरी पण देतात....."lifestyle" च्या समोरील भेळ ही छानच.... त्यात गाजराबरोबर काकडीही असते Happy "calcutta victoria chat" वाले इतर चाट बरे बनवतात. आणि हो दहा रुपयाला ५-६ पुर्या+ १ मसाल पुरी Happy
(तळ्टीप : मी गेल्या ७-८ वर्षात मुम्बई, ठाणे, उल्हासनगर इ. ठिकाणी आलेली नाही )

बाकी काही असो मात्र ह्या लेखामुळे एक गोष्ट निश्चितच झाली की माझी पाणीपुरीविषयीची आवड पुन्हा जागी झाली. त्याबद्दल मनापासुन धन्यवाद.

माझे दोन आणे:

१) आपण पापुवर भरपूर मनापासून लिहितोय म्हणून घरातले मेंबर "इतकी काय आवडते! आम्ही पण खातो, पण हिचं जरा जास्तच आहे" असं म्हणाले तरी लक्ष देऊ नये.
२) बाहेरची कामं वगैरे झाली आहेत, तुम्ही अजून घरी गेला नाहीत आणि दुपारी १च्या दरम्यान भूक लागली आहे, समोर बरीच स्नॅक्सची दुकानं आहेत, तुम्ही भरपेट स्नॅक्स खाताय.. बरोबर पापुहौशी कंपनी आहे... तर मग प्रत्येकी किमान १ प्लेट पापु खाऊ शकाल इतपत जागा पोटात ठेवून बाकीचं हादडा. पापु डावलली तर पाप लागतं!
३) पाप लागलं की होणारे परिणामः
अ) दुपारची झोप लागलेली असताना मोबाईल/ लँडलाईन/ कुरिअरवाले/ एरवी कधी न येणारे शेजारी किंवा पाहुणे/ सेल्समन/ एखाद्याच्या लग्नाची वरात जाताना सुखकर्ता दु:खहर्ता ते घालीन लोटांगण यापैकी काहीही वाजत असणे/ बाजूच्या रस्त्यावर कुत्री भुंकणे यांपैकी काहीतरी होऊन झोप मोडणे. बुडाली पेशवाई!
ब) महत्त्वाच्या खरेदीला जाताना पाकीट विसरणे/ जवळचे एटीम बंद पडलेले असल्यामुळे कमीत कमी ४ किमीची चक्कर मारावी लागणे/ चप्पल अचानक तुटणे यांपैकी एक अगर सर्व घडणे.
क) मायबोलीवर मानसिक श्रमपरिहार करायला आल्याक्षणी लाईट जाणे.

थोडक्यात, आपल्या मानसिक, बौद्धिक, अध्यात्मिकसुद्धा प्रगतीसाठी, प्रगत झालाच असाल तर त्या पातळीवर स्थिर रहाण्यासाठी आणि स्थिर असाल तर परमोन्नतीसाठी अधूनमधून पापु खाणे अत्यंत आवश्यक आहे हे विसरू नये!

मुख्य तळटीप : वरचा एकही उल्लेख म्हणजे अतिशयोक्ती/ पोस्टीसाठी पोस्ट असं नाही. कानामात्रावेलांटीसकटचे अनुभवाचे बोल आहेत!

मामी Happy

फुल...एकदम चटपटीत लेख. वाचून तोंडाला पाणी सुटलयं आणि शेवटचा परिच्छेद वाचून डोळ्यातही पाणी आलं!

अमेझिन्ग.......शब्द न शब्द पानिपुरि सार्खाच मनातिल भावानानि ट्म्म फुग्लेला........खुपच छान

आमच्याकडे जरा उलटे आहे. कोणीही बाहेरचे काही खात नाही म्हणून पाणीपुरी घरीच बनवतो. सकाळी डब्यात मुगाची उसळ दिसली कि संद्याकाळी पाणीपुरी नक्की. हापिसातून जातानाच पुरीचे पाकीट आणि शेव घेऊन जायचे. आई मस्त पुदिना, मिरची, चिंच टाकून पाणी बनवते. आणि मग सुरु होतो यथासांग पाणीपुरी बनवण्याचा आणि खाण्याचा कार्यक्रम.
मोठ्या ताटात पूर्ण ५० पुऱ्या काढून चमच्याने ठक ठक फोडत बसायचे, मग हळू हळू सगळ्यामध्ये शेव भरायची, मग थोडी उसळ भरून सगळ्यांमध्ये, पाणी भरून खायला सुरवात.
आम्ही तिघेच, म्हणून मग आई बाबा माझी पाणी पुरीवरची निस्सीम भक्ती बघून " आम्हाला नाही आवडत, तूच खा" असे म्हणतात मग त्यांच्यासाठी एक एक अश्या २ बाजूला काढतो आणि मग पुढचा १ ते दीड तास ४८ पानिपुर्या खात बसतो. मधल्या इंटर्वल ला जरा बोर झाले कि मग दही आणतो जोडीला. अजून उत्साह असेल तर पुर्या पण घरीच तळतो.
सगळ्या ४८ पुर्या चरुन झाल्या कि बहिणीला फोन टाकतो " अग का नाही आलीस खायला? शेवटी मला खायला लागल्या सगळ्या ...." मग पलीकडून आपसूकच प्रेमळ शिव्या येतात Happy

Pages