न-आस्तिक

Submitted by rasika_mahabal on 14 January, 2013 - 14:55

आईबाबांना मी नेहमीच पूजा पोथी पाठ करतांना पाहिल. श्लोकच्या श्लोक पोथ्याच्या पोथ्या माझ्या नुसत्या ऐकुन पाठ आहेत. दर वेळेला मंदिरात प्रवेश केला की खूप प्रसन्न वाटत. तिथला गंध, मृदंग, मंजुळ घंटानाद; मंदिर जुनं आणि पाण्यातिरी असेल तर मन अजून प्रफुल्लीत वाटत. पण तिथे आलेले भक्त बघितलेत की मला जाणवत ते रिकामपण. मूर्तीच्या रुपात भक्तांच निर्मितीकाराला बघण हाच कर्ता धर्ता असा अतूट विश्वास त्यांच्या डोळ्यात बघितला की ती धुंदी, ती दृढ श्रद्धा माझ्यात नाही ह्याचा मला खेद वाटतो. त्या नितांत भक्तीचा अनुभव घेण निश्चीतच विशेष असेल पण त्याचा माझ्यात लवलेशही नाही. आजूबाजूला असलेल्या प्रत्येक व्यक्तीने अनुभवली म्हणून अनुभवायची अस म्हणून ती निर्माण पण होऊ शकत नाही. त्यामुळे मला मुर्त्यांसमोर, मंदिरांमधे भयंकर आउट ऑफ प्लेस सुध्दा वाटत.

अर्थात भारतामध्ये अस विश्वास नाही म्हणून जगण सोप्प नाही. तिथल्या संस्कृतीत दुसऱ्या विचारांना जणू स्थान नाही. तुम्ही नास्तिक म्हणून वाळीत टाकले जाउ शकता किंवा हा कोण स्वत:ला शहाणा समजतो असहि म्हटल जाउ शकत. (हा पोस्ट टाक्ण्याआधीहि मी दोन वेळा विचार केला). अतिशय धार्मिक कुटूंबात जन्माला आलात तर मग संपल. एमोशनल ब्लेकमेल करून तुम्हाला मंदिरात किंवा पूजा पाठामध्ये खेचलच जाइल. देवाच असं केल नाही तर अघटित घडत अस मनात बिंबवल जात. भीती दाखवुन विश्वास बसायला लावण हे कितपत योग्य आहे? पूजाअर्चेमधे खेचलं गेल्यास खजील वाटत असत कारण मन ओसाड आणि चेहेऱ्यावर भक्ती दाखवणं मला कोणाच्यातरी विश्वासाला, पवित्र भावनेला ठेच पोचवल्या सारखं वाटत.

ह्या जगाची निर्मिती का झाली ह्याच ठोस उत्तर कोणाकडेच नाहीये. जे लोक ते कळाल असण्याचा दावा करतात त्यांच्याकरता वेल एंड गुड. देवाने हे सगळ निर्माण केल तर देवाला कोणी केल?, जगाची निर्मिती, ग्रहांची निर्मिती त्यावरचे जीवजंतू, माझ येथिल अस्तित्त्व, त्या अस्तित्त्वाला काही अर्थ आहे का नाही अश्या बऱ्याच गोष्टिंवर मी विचार करते त्यावर वाचन करते. त्यामुळे देवावर विश्वास नाही म्हणणारे लोक सखोल विचारी नसतात किंवा माजोरडे असतात अस काही मला वाटत नाही, ते सुद्धा सगळ्या पौसिबिलिटिज ना कंसिडर करत असतात. कदाचित देवाधर्माच्या मार्गावरुन जाऊनही आलेले असतात. निर्मिती च उत्तर पाठ्पठनामधून मिळवाव, मनन चिंतन वा वाचनातून मिळवाव. किंवा कोणी म्हणाव मला जन्म मिळाला आहे आता मी 'अबब केवढ हे सौदर्य' अस म्हणत जगणार, ना मला कुठला प्रश्न आहे ना कुठल्या उत्तराची अपेक्षा. मला ह्या जगावर ह्या निसर्गावर विश्वास आहे त्याकरता अजून कुठल्या जगावर विश्वास न ठेउन जगणं इतकस वाइट नाहीये. देवाच्या अस्तित्त्वासारख्या मेजर गोष्टिबाबत इतर लोकांवर, व मुख्यत्वे तुमच्या पोरांवर तुमचे विचार लादु नये अस वाटत. त्यांना त्यांचे विचार असण्याच व्यक्तीस्वातंत्र मिळाव, ते एक्स्प्रेस करण्याची मुभा द्यावी, त्यांच्या मतांना विचांरांना तेवढच शालीन व पवित्र समजावं व त्यांच्या फक्त निसर्गावर श्रद्धा ठेवण्याच्या निर्णयाला तेवढाच मान सन्मान मिळावा अशी मी आशा करते!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

I know exactly what you are saying!
बर्याच नास्तिकांचा जन्म आस्तिक कुटुंबात होतो त्यामुळे तू सांगितलेल्या परिस्थितीतून त्यांना जाव लागतच. मी स्वतः आता देवाचं काहिही करत नाही. इतरांना (खासकरून घरच्यांना) हे पटणं अवघड ठरतं. तसंही आपल्याकडे लोकं दुसर्‍याच्या वैयक्तिक आयुश्यात फार नाक खुपसतात. पण आकांडतांडव न करता एकदा बसुन व्यवस्थित चर्चा केली तर सर्वांच्या हिताचं ठंरतं.

पण त्यासाठी आपलाही थोडा अभ्यास असलेला बरा. इथे देखिल या विषयावर अनेकदा चर्चा झालेल्या आहेत. शिवाय Richard Dawkins, Christopher Hitchens, Sam Harris, Daniel Dennett या आणि इतरांची अनेक संभाशणे/परिसंवाद youtube वर मिळतील. यातले सगळेच विचार पटतात असे नाही पण आपल्या विचारांच्या कक्षा नक्कीच रुंदावतात.

बाकी आस्तिक / नास्तिक असणं हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे. पण बर्‍याचदा आपल्याकडे आस्तिकता ही अनुवांशिक असते. कोणी त्यावर विचार करायची तसदी घेत नाही. त्यामुळे आपल्याच आस्तिकतेतला विरोधाभास त्यांना कळत नाही ही खरच खेदाची बाब आहे.

धर्म आणि संस्कृती या दोन गोष्टींचा अर्थ न समजावून घेता उघडलेला बालीश आणि उथळ विचार मांडणारा धागा. अशा लोकांमुळेच देश खड्ड्यात गेलेला आहे.

कळतंय रसिका तुला काय म्हणायचंय ते. तू तुझ्या सहजप्रवृतीनेच रहावंस,आस्तिकांच्या आस्तिकतेचा मूलस्त्रोत तपासत रहायला मात्र विसरू नकोस ! तो स्त्रोत आणि तुला निसर्गाच्या सहवासात मिळणारा आनंद कुठेतरी खोलवर एकाच दिशेने जात असेलही.
''देवळी त्या देवास बळे आणा
परी राहे तो सृष्टीमधे राणा '' -केशवसुत.

<<तुम्ही नास्तिक म्हणून वाळीत टाकले जाउ शकता किंवा हा कोण स्वत:ला शहाणा समजतो असहि म्हटल जाउ शक<< हे अजिबात खरे नाही.

मी वयाच्या १४-१५ वर्षा पासुन declared नास्तिक आहे. ना मला कधी घरच्यांकडुन किंवा मित्रांकडुन वाळीत टाकले गेले किंवा त्रास दिला गेला. ना कधी माझ्यावर कसली जबरदस्ती केली गेली.
मी पण माझ्या मताची कधी दुसर्‍यांवर जबरदस्ती केली.

उलट हिंदू समाजात तू नास्तिक म्हणुन सहज जगू शकता. दुसर्‍या धर्मात तुला मारुन च टाकले असते.

दर वेळेला मंदिरात प्रवेश केला की खूप प्रसन्न वाटतं>> बास, इतकं पुरे आहे. शेवटी उद्देश तोच आहे ना.

पण त्याचा माझ्यात लवलेशही नाही. आजूबाजूला असलेल्या प्रत्येक व्यक्तीने अनुभवली म्हणून अनुभवायची अस म्हणून ती निर्माण पण होऊ शकत नाही. त्यामुळे मला मुर्त्यांसमोर, मंदिरांमधे भयंकर आउट ऑफ प्लेस सुध्दा वाटत>> इथे इतरांच्या बाह्य रूप, हावभावावरून स्वतःत काहीतरी कमतरता आहे असा भाव उत्पन्न होतोय. तेव्हढा जाणीवपूर्वक टाळता आला तर काम झालं.

ह्या जगाची निर्मिती का झाली ह्याच ठोस उत्तर कोणाकडेच नाहीये.>> सापडेल उत्तर कधीतरी आपल्या कोणत्या तरी पिढीला केंव्हातरी... त्या गोष्टीतल्या माकडाला शेवटी पाचर उपटता आली तसं, आणि कदाचित करकचून शेपटीही चेपली जाईल त्याची त्याच क्षणी नको त्या गोष्टीत नाक खुपसल्याबद्दल. Happy

आस्तिकतेबद्दल तिटकारा निर्मांण करण्याचे काम आस्तिक लोकच असे दुसर्‍यांवर जबरदस्ती करुन करत असतात. स्वतःला खरे काय ते कळलेले नसते मग दुसर्‍यांवर असे मारुन मुटकुन, देवाची धमकी देउन , किंवा इमोशनल ब्लॅकमेल करुन देवाकडे वळवायचा प्रयत्न करतात.
जसा भुक लागल्यावर कोणी कोणाला जेवायला आग्रह करायला लागत नाही तसे ज्याच्या मनात खरी जिज्ञासा असेल तो योग्य मार्गदर्शन मिळवुन आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवतोच.
तुमच्या कुटुंबियांनी तुमच्यावर असा दबाव टाकला असेल तर तो दुर्दैवी आहे. तुम्ही त्याला विरोध करायला हवा आणि You should remain firm on your beliefs..

ह्या जगावर ह्या निसर्गावर श्रद्धा ठेवणे आवश्यक वाटते का? का? कशावरही श्रद्धा नाही ही स्थिती तापदायक असेल का? त्या स्थिती पर्यंत जाण्याचा प्रयत्न करणे आवश्यक वाटते का? नसेल तर स्वतावर निसर्ग-श्रद्धा लादली आहे असे नाही का वाटत? ३३ कोटी देव - एक देव समूर्त - एक देव अमूर्त- निसर्ग - मानवता - अश्रद्ध - असा पूर्ण स्पेक्ट्रम चा विचार करून मग आपला कम्फर्ट झोन शोधला तर????

तुम्ही ओ माय गॉड हा हिंदी सिनेमा पहा.

हजारो वर्षे लोकांनी धर्माच्या नावाने बाजार मांडला आहे. स्वार्थासाठी या गोष्टींचा उपयोग करून घेतला जातो आहे.

त्यामुळे विचार करता देव धर्म यावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही असे वाटू लागते. पण खरे म्हणजे तो अविश्वास देव, धर्म यावर नसून त्या गोष्टी जशा वापरल्या जात आहेत त्यावर विश्वास नाही असे आहे.

आता देव, धर्म, श्रद्धा म्हणजे नक्की काय, याचा अभ्यास करताना त्यांचा लगेच चालू जीवनाशी संबंध जोडायचा प्रयत्न केला तर हाती काही लागत नाही.

त्यांचा विचार, अभ्यास स्वतंत्रपणे करून मग ठरवावे की आपल्याला देव, धर्म म्हणजे काय हे कळले का? जसे कळले त्यावर विश्वास ठेवावा का? रोजच्या जीवनात संपूर्णपणे नास्तिकासारखे वागले तरी जे काय समजले त्यावर विश्वास असू शकतो, मग त्याला देव म्हणा, धर्म म्हणा, काहीहि म्हणा.

रसिका + १

पण मला वाटत देवावर श्रद्धा आणि एकंदरीतच कशावर तरी श्रद्धा हे दोन वेगळे मुद्दे आहेत. जिवनात सहसा श्रद्धा नाही असे होत नाही. ती ह्या ना त्या प्रकारे असतेच असे वाटते. त्या श्रद्धे मागची कारणे कधी तार्किक अक्धि अनुभवजन्य असु शकतात.

रसिका, तुला काय म्हणायचंय ते कळतंय. काही बाबतीत सहमत. काही बाबतीत असहमत.

>>>अर्थात भारतामध्ये अस विश्वास नाही म्हणून जगण सोप्प नाही.<<< नाही हो, अनेक नास्तिक जगले भारतात. अगदी प्राचिन काळापासून आज पर्यंत.

>>>तुम्ही नास्तिक म्हणून वाळीत टाकले जाउ शकता किंवा हा कोण स्वत:ला शहाणा समजतो असहि म्हटल जाउ शकत. <<< हे नाही पटले, निदान मलाही असा कधीच अनुभव आला नाही. हा, २-४ वाक्य समजावणीची ऐकाला लागतात नवख्याकडूण पण वाळित टाकणं , कधीच नाही आला हा अनुभव.
माहेरचे, मित्र मैत्रिणी, शेजारपाजार कधीच असा अनुभव नाही आला. माझ्या माहेरी, आई आस्तिक, बाबा नास्तिक. आम्हा बहिणींच्यात दोघी आस्तिक, दोघी नास्तिक.
आम्हा दोघी बहिणींची लग्न अ‍ॅरेज्ड मॅरेजेस. सासरी सगळे, अगदी नवरेही पक्के आस्तिक. पण तरीही काही प्रश्न निर्माण नाही झाले. पहिले वर्षभर काही ( नेमकेच ) पारंपारीक रिती रिवाज करावे लागले, ते केले; मोठ्यांचा मान, इच्छा म्हणून. त्या नंतर नाही. सुरुवातीलाच थोड स्पष्टपणे, स्वच्छ शब्दात आणि सूर न चुकवता हे सांगितले. घरच्यांना हवे ते त्यांनी करावे; त्यांचे आस्तिकपण मी मानते. आणि माझे नास्तिकपण त्यांनी मानलेय, मला काही कर म्हणुन ते सांगत नाहीत.

खरं तर मी आस्तिक आहे की नास्तिक यावर इतरांशी बोलावेच कशाला? ही अत्यंत व्यक्तिनिष्ठ बाब आहे. अर्थात याचे भान सर्वांना नसते, म्ह्णूनच हे लागते, लिहावे लागते हेही खरेच.

>>>विचार असण्याच व्यक्तीस्वातंत्र मिळाव, ते एक्स्प्रेस करण्याची मुभा द्यावी, त्यांच्या मतांना विचांरांना तेवढच शालीन व पवित्र समजावं व त्यांच्या फक्त निसर्गावर श्रद्धा ठेवण्याच्या निर्णयाला तेवढाच मान सन्मान मिळावा अशी मी आशा करते! <<< हे अगदी पटलेच.

mansmi18,

तुमच्या इथल्या प्रतिसादास १००% अनुमोदन. म्हणतात ना ढोंगी आस्तिकापेक्षा प्रामाणिक नास्तिक बरा. हे विवेकानंदांचं म्हणणं होतं. ते स्वत: नास्तिक होते. पण स्वत:च्या अनुभूतींशी प्रामाणिक होते. श्रीरामकृष्णांच्या सान्निध्यात आल्यावर त्यांच्यातल्या दैवी गुणांचा आपोआप विकास झाला.

आ.न.,
-गा.पै.

rasika_mahabal,

मला वाटतं की तुम्हाला एखाद्या मार्गदर्शकाची (गुरूंची म्हणा हवं तर) आवश्यकता आहे. का ते सांगतो. तुम्हाला मंदिरात गेल्यावर प्रसन्न वाटतं तसं मंदिरात न जाता बसल्याजागी वाटलं पाहिजे. याकरिता साधना करावी लागेल. साधना अध्यात्मिकदृष्ट्या उन्नत लोकांना विचारून करायची असते. असा मार्गदर्शक मिळवणं हे तुम्हाला हितकारक आहे.

आ.न.,
-गा.पै.

>>>ह्या जगाची निर्मिती का झाली ह्याच ठोस उत्तर कोणाकडेच नाहीये. जे लोक ते कळाल असण्याचा दावा करतात त्यांच्याकरता वेल एंड गुड. देवाने हे सगळ निर्माण केल तर देवाला कोणी केल?, जगाची निर्मिती, ग्रहांची निर्मिती त्यावरचे जीवजंतू, माझ येथिल अस्तित्त्व, त्या अस्तित्त्वाला काही अर्थ आहे का नाही अश्या बऱ्याच गोष्टिंवर मी विचार करते त्यावर वाचन करते.

ही चांगली गोष्ट आहे. ह्या अशांतीतूनच शांती निर्माण होते.
ह्या आणि ह्यापुढील गोष्टींचा विचार उपनिषदात आढळतो. (विश्वाची उत्पत्ती...)
विवेकानंद म्हणतात - "हे ऋषी मुनी इतक्या उंचीवर पोचले होते कि तिथे दुसर्या माणसाची छातीच फुटून जाईल."
म्हणून, गामा_पैलवान म्हणतात त्याप्रमाणे, एकतर एखाद्या मार्गदर्शकाची मदत घ्या (कठीण आहे ते मिळणे) किंवा मनापासून तळमळीने प्रार्थना करीत जा.
विवेकानंद नास्तिक नव्हते - त्यांचा मानवी गुरूंवर आणि सगुणावर विश्वास नव्हता. पुढे तो अनुभवाने बसला. नुसते ठाकुरांचे नाव घेतले तरी ते १० मिनिटे बोलू शकले नव्हते (भावातीरेकाने).
"जिथे बुद्धी आणी तर्क संपतो तिथेच अध्यात्माची सुरुवात होते".

"जिथे बुद्धी आणी तर्क संपतो तिथेच अध्यात्माची सुरुवात होते".
<<
भावातीरेकाने भडभडून आले.
किती ते सूक्ष्म खोली लाभलेले वाक्य!

इब्लिस,

अनुभूति म्हणजे पंचेन्द्रियांशिवाय आलेला अनुभव.बुद्धी लावून आणि तर्क करून अनुभव येत नसतात. आगोदर अनुभव येतो, मग बुद्धीने तर्क लढवला जातो. अध्यात्म हे अनुभूतीचं शास्त्र आहे. (अनुभूति = पंचेन्द्रियांशिवाय आलेला अनुभव)

आ.न.,
-गा.पै.

गा पै,
पंच इन्द्रिये नसलीत तर नक्की कसला अनुभव येणार? अन नक्की कुणाला येणार तो?
बोलाची कढी अन बोलाचा भात खाण्याच्या अनुभूतीने पोटं भरलीत तर तुमची भरतील ब्वा. आम्हाला अजिर्ण तरी होतं नै तर कुपोषण तरी.
तुमचं चालू द्या. आम्ही चार्वाक नामक दैत्याचे शिष्य आहोत.

रच्याकने. अशा स्युडो डेफिनिशन्स भरपूर तयार करता येतात. पण त्या सिद्ध कोण करणार? अन कशा? त्यासाठी एकतर श्रद्धा लागते, किंवा अध्यात्म. म्हणजेच, डोके अन विचारशक्ती बंद करा - एक्झॅक्टली ज्या कारणाने मनुष्य इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे ते विचार - तेच बंद केले की मग अनुभूत्या येतात. त्यापेक्षा मी आपला माणूसच असलेला बरा.

इब्लिस,

>> पंच इन्द्रिये नसलीत तर नक्की कसला अनुभव येणार? अन नक्की कुणाला येणार तो?

गाढ झोपेत (REM नव्हे) स्वप्ने पडतात तेव्हा पंचेंद्रिये कार्यरत नसतात. फार विचार करूनही स्वप्न आणि जागेपणात खरेखोटे करता येत नाही. हां पण स्वप्नावास्थेस जागृतीने अचानक बाध येते, तर जागृतावास्थेस स्वप्नाने हळूहळू बाध येते.

आ.न.,
-गा.पै.

गापै,
बेसिक मधे राडा आहे. तुम्ही तुमच्या कन्क्लुजनवर खुश रहा Wink
इकडेच इतरत्र मी स्वप्नांबद्दल थोडं लिहिलेलं होतं. स्वप्नाला जर 'अनुभव' म्हणायचं असेल तर बरोबरच आहे तुमचं Happy

इब्लिस,

स्वप्नांबद्दल आपण लिहिलेय त्याचा दुवा मिळेल काय? आणि स्वप्न म्हणजे अनुभव नसेल तर दुसरं काय असतं? उदाहरण द्यायचं झालं तर, ओलीस्वप्ने म्हणजे एक प्रकारचा अनुभवच असतो ना?

आता ते स्वप्नाचं सोडून आपण इंद्रियांकडे वळूया.

जर उत्तेजना (stimulus) नसेल तर इंद्रिये कार्यान्वित होत नाहीत, बरोबर? पण उत्तेजना तर एक प्रकारचा बदल असतो. म्हणजे इंद्रिये केवळ बदल टिपू शकतात. मग इंद्रियांद्वारे मिळालेले ज्ञान कितपत खरे धरायचे?

आ.न.,
-गा.पै.

गामा,
तुम्ही सिरियसलि विचारताहात असे समजून उत्तर लिहितो.

स्वप्नांत दिवसभर जमवलेल्या संवेदनांचे पृथःकरण, वर्गीकरण व पूर्वीच्या स्मृतींशी सांगड घालून साठवण, असे सगळे होत असते. याला अनेक कंगोरे आहेत. हे कोणत्यातरी धाग्यावरील प्रतिसादात मी विस्तृत लिहिले होते. मेमरी वाढवण्याची टेक्निक्स असं काहीतरी ते होतं.

(ओल्या स्वप्नात वेगळा केमीकल फीडबॅक काम करीत असतो. एका विशिष्ट मर्यादेपलिकडे तुमच्या 'सेमिनल व्हेसिकल्स' वीर्य सांभाळून ठेवीत नाहीत. ते उत्सर्जित केले जाते, तो केमिकल फीडबॅक बाह्य इंद्रियांच्या संवेदनेशिवाय काम करतो.)

असो.

इंद्रिये अजिबातच नसताना देखिल 'ज्ञान' होते. 'संवेदना' होतच असते. उदा. अमिबा नामक एकपेशीय प्राणी. याला प्रकाशाची संवेदना होते. लाईटपासून / उन्हापासून दूर जातात. भक्ष्याच्या कणाकडे आकर्षित होतात, छद्मपाद तयार करून तो कण 'गिळतात', पचवतात, प्रजोत्पादनाची 'उर्मी' आल्यावर नवे उत्पन्न होतात. याचा अर्थ अमिबांना तर मेंदूफिंदू वा इंद्रिये नसतानाच 'ज्ञान' होते, मग तर ते साक्षात ज्ञानी पारमार्थी अध्यात्मिक तत्वज्ञच होत? - असे होईल का?

'शरीर'बाह्य संवेदनांबाबत.

ज्ञानेंद्रिये मुळातच ज्ञान अधिक चांगल्याप्रकारे व्हावे यासाठी विकसित केलेले/झालेले स्पेशल अवयव आहेत. रडार किंवा टेलिस्कोप इ. सारखे. कोणताही प्राणी 'सेल्फ कण्टेण्ड' नाही. त्याला शरीराबाहेरच्या वस्तू/इतर प्राणी इ. शी 'इंटरअ‍ॅक्ट' व्हावेच लागते. त्यासाठी डेटा कलेक्शन करतात ती ज्ञानेंद्रिये. ती ५ आहेत असे आपण मोजतो.

आता समजा मला तुम्ही 'दिसलात'

म्हणजे नक्की काय झाले?

तुमच्या शरीरावरून परावर्तित झालेली प्रकाश किरणे माझ्या डोळ्यात शिरली. ती माझ्या पारपटल व नेत्रमण्याने अपवर्तित करून एक चित्र दृष्टीपटलावर उमटविले. (इथून पुढे मराठी शब्द संपतात. टेक्निकल प्रतिशब्द अस्लेत तर मला ठाऊक नाहीत.) आता, तिथे 'रॉड' अन 'कोन' नांव दिलेल्या पेशी आहेत. त्यांत 'फोटोरिअ‍ॅक्टिव केमिकल्स' आहेत. त्यांवर पडलेल्या उजेडानुसार, (वेव्हलेंग्थ नुसार) ती केमिकल्स बदलतात, व त्या क्रियेमुळे वेग-वेगळ्या क्षमतेचा विद्युत्प्रवाह तयार होतो. हा तिथून इतर ९ प्रकारच्या पेशींच्या थरांतून वाहून नेला जातो. पेशीच्या एका टोकापासून दुसर्‍यापर्यंत करंट, मग पेशी टू पेशी इंटरफेसला केमिकल रिअ‍ॅक्शन, परत करंट, असे करत ऑप्टिक नर्व्ह. मग तिथून पुढे मेंदू. हे फक्त एका लायनीत नसते, तर डावी उजवी खाली वर मागे पुढे असे ३मितींमध्ये पेशी एकमेकांशी संवाद करीत आहेत, लिनिअर + पॅरलल प्रोसेसिंग सुरू आहे. अन हे फक्त रेटिना मधे होते आहे, अजून 'ज्ञान' डोळ्याबाहेरच नव्हे, रेटीनाच्याही बाहेर गेलेले नाही.
तिथून पुढे मेंदू. आधी ऑप्टिक नर्व्ह. मग कायस्मा. इथे दोन डोळ्यांच्या चित्रांची थोडी मिक्सिंग. तिथून पुढे मेंदूतील 'न्यूक्लिअस' तिथून पुढे ऑक्सिपिटल कॉर्टेक्स. सग्ळ्या ठिकाणी क्रॉस ओव्हर व अनेक थरांतून प्रोसेसिंग इ. इ. इ.
इतके झाले की माझ्या मेंदूच्या एका भागाला एक त्रिमित चित्र दिसल्याची इन्फर्मेशन पोहोचली.
मग हे मेंदूतील इतर डेटाशी कंपेअर केले जाते. हा 'चेहरा' आहे. 'ओळखीचा' आहे. पूर्वेतिहासावरून त्याच्याशी मी कसा वागणार आहे? इ.इ. सोबत बाकी संवेदना जसे गंध, बोलण्याचा आवाज, शब्द इ.इ.इ. अन हे सगळे रिअल टाईम प्रोसेसिंग करून जे आले ते. मग अल्टिमेटली मला 'गामा पैलवान दिसले' हा एक सिंपल अनुभव आला.

हे जे होते ते मी खूप शॉर्टमधे - अतीसंक्षिप्त लिहिले आहे. प्रत्यक्षात माबोवर 'मला हे गापै दिसले' हा अनुभव काहीसा वेगळा असतो ते सोडा Wink

आता,

डोळ्यावर ती प्रकाश किरणे आदळल्यापासून पुढे शरीरात जे काय केमिकल लोचा झाला, तसाच लोचा इतर प्रकारांनी तयार करता येतो. उदा. हाताच्या तळव्यांनी डोळे दाबून धरा पाहू थोडा वेळ. किमान ३०-४० सेकंद. बुबुळे शक्यतो हलवू नका. काय दिसते? अन का दिसते?

जे दिसते ते मेकॅनिकल स्टिम्युलेशन मुळे. कोणताच प्रकाश डोळ्यात न येता मला चित्रे 'दिसतात'. दिव्य पॅटर्न्स दिसतात. करून बघा. 'अनुभव' घ्या.

आता हा अनुभव आला, याचा अर्थ, इंद्रियाविण अनूभूती आली का?

अशीच "अनुभूती" फिजिकल प्रयत्न न करताही तुम्हाला येत असते, व त्यानुसार तुमची इंद्रिये कमाण्ड्स एक्झिक्यूटही करीत असतात. उदा. बस पकडण्यासाठी तुम्ही पळताहात. आपोआप तुमच्या पायांना हवी ती ऊर्जा मिळवण्यासाठी हृदयाचे ठोके वाढले, ब्लड प्रेशर वाढले. इ.

तुम्ही १६ वर्षांचे झालात, आपोआप मिस्रूड फुटू लागले. आवाज फुटला. चेहर्‍यावर मुरुम पुटकुळ्या येऊ लागल्या. संवेदना कुणाला झाली? कुठून झाली? कुणाला आज्ञा गेली? कशी एक्झिक्क्यूट झाली?

या अन अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रत्येकासच ठाऊक असतीलच असे नव्हे. वैद्यक शास्त्राला अशी व यापुढेही बरीच उत्तरे ठाऊक आहेत. खगोलातली उत्तरे तुम्ही लिहिली होती.

त्याच मेमरीच्या धाग्यावर लिंबाजीरावांनी मधेच आत्मा आणून काही लिहिलं होतं, ते कल्पकता वापरली तर चपखल बसतही होतं. याचा अर्थ, काही (कवी)कल्पना प्लेसहोल्डरम्हणून वापरल्यात तर काही अननोन प्रश्नांची उत्तरे बर्‍यापैकी plausibliy देता येऊ शकतात.

अशीच अनेक उत्तरे इकडे तिकडे कुणाकुणाला ठाऊक असतात. या सर्व उत्तरांना मिळूनच आपण सायन्स म्हणतो. पण त्याच वेळी एक 'आस्तिकता' डोक्यात असते. अन केवळ त्या 'आस्तिकते'पायी आधी कन्क्लूजन काढून मग एक्झिस्टिंग फॅक्ट्स सोबत जोडून वाकवून आपण एक एक्स्प्लनेशन तयार करत असतो. अन अशी स्पष्टीकरणे अध्यात्मात अनेक आहेत.

अल्टिमेटली, मी कितीही समजवले, तरी तुम्ही तुमची 'आस्तिक'ता माझ्यामुळे अजिबात बदलणार नाही हे मला ठाऊक आहे. तुम्ही ती बदला असा माझा आग्रह देखिल नाही. मी फक्त एकाच विधानापाठी या धाग्यावर आलो होतो.
--> "जिथे बुद्धी आणी तर्क संपतो तिथेच अध्यात्माची सुरुवात होते".
हे ते महा मूर्ख विधान.
बुद्धी अन तर्क बाजूला ठेवा, अन मला पामराला समहाऊ अध्यात्माची अनुभूती येईल असा कायतरी चिमित्कार करून दाखवा ब्वा. एक शब्दाचाही तर्क करू नका. मला बुद्धी नाहीच असे गृहित धरा. फक्त माझ्या तथाकथित अंतरात्म्यात अध्यात्माचा उदय होईल अशी कायतरी सुरुवात करा.
लै उपकार होतील पगा गुर्जी तुमचं Wink

***

माझे दोन शब्द आपण समहाऊ वाचलेत, धन्यवाद~

टीपः वरील प्रतिसादात तिरकस केलेली अक्षरे नंतर संपादन करून अ‍ॅड केलेली आहेत.

मला वाटतं "जिथे बुद्धी आणी तर्क संपतो तिथेच अध्यात्माची सुरुवात होते" हे विधान जरा वेगळ्या दृष्टीकोनातून पाहायला हवं. बुद्धी ही प्रोसेसिंग-पॉवर+स्मृती आहे, जिचा वापर वेगवेगळ्या शक्यता पडताळून पाहण्यासाठी (तर्क) करता येतो. पण यांची मर्यादा ही, की त्यांचा उपयोग ज्ञात गोष्टींच्या आधारावर विश्लेषण करण्यासाठीच जास्त चांगला होतो. याउलट काही प्रश्नांची उकल जेंव्हा बुद्धी, तर्काची डोकेफोड करून मिळत नाहीत तेंव्हाही तेच धरून बसल्यास नवीन माहिती कुठल्याही पूर्वग्रहाच्या कसोट्या न लावता ग्रहण करण्यात अडथळा येऊ शकतो. त्यासाठी तर्क-इंजिन काही काळ जाणीवपूर्वक बंद ठेवण्याची कला म्हणजे अध्यात्म असू शकेल. माझ्या माहितीनुसार याचा अस्तिकतेशी संबंध नाही, श्रद्धेशीही नाही. कित्येकदा बुद्धी अजाणतेपणीही प्रश्नाची उकल करू शकते, तिला तसं ते करू देणं म्हणजे अकर्ता-भाव म्हणता येईल. याबाबतीत मारी क्यूरीचं उदाहरण देता येईल. थोडक्यात अध्यात्माचा अर्थ आपण self-discovery ऑफ purpose आणि being open for new possibilities असा घेतला तर ते कदाचित अवैज्ञानिक वाटणार नाही. तर्क आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी केस कापताना कंगवा आणि कात्री आलटून-पालटून वापरतात तशा परस्परपूरक असाव्यात असं वाटतं. Happy

मुंगेरीलालजी,
स्वारी.
अर्थ वेगळे घेऊ नका.
अमुक गोष्ट 'बियाँड माईंड अँड लॉजिक' म्हटले की कसलीही बाष्कळ थापेबाजी त्या नावे खपविली जाते. जणू बियाँड म्हटले की लै काय तरी भारी अन उदात्त वगैरे सांगताहेत हे लोक्स.
तेव्हा याचा अर्थ अमुक घेऊ अन त्याचा तमुक असे म्हणुच नका.
वेगळेच म्हणायचे ''संपते तिथे सुरू होते' नव्हे, तर "बुद्धी अन तर्कशक्ती गहाण टाकल्यावर" असे सरळ म्हणा की.
असो.
तुमच्याशी भांडण नाही.
तुम्ही टंकले तेही लॉजिक वापरणेच झाले. बिगर लॉजिक अन बुद्धीने अध्यात्म कुणाच्या गळ्यात मारता येते का ते सांगा. तसे विना लॉजिक अन बुद्धी कोणतीही गोष्ट प्रोपागेट करण्यासाठी फक्त मठ्ठ गिर्‍हाईकेच गरजेची असतात.

मला मुंगेरीलाल यांचे म्हणणे पटले. बरेचदा नास्तिक माणसाला विचारले की तुझा देवावर का विश्वास नाही तर तो सांगतो की मला तो कधी दिसला नाही किंवा तसा अनुभव आला नाही. याउलट आस्तिकाला विचारले तर तो म्हणतो की माझी श्रद्धा आहे, मला वाटते की तो आहे, माझा विश्वास आहे की हे सारे काही त्याने केले. एकूण बुद्धी व तर्काने हा सूर्य व हा जयद्रथ न म्हणता मनात आणा की तुम्ही सूर्यप्रकाशात जयद्रथाला पहाताय असे काहीतरी.
आता याला बुद्धी गहाण ठेवणे म्हणायचे की मानणे वा अनुभुती तो ज्याचा त्याचा प्रश्न !!

इब्लिस,

स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद. मी गांभीर्यानेच विचारत होतो. Happy मला काय वाटलं ते लिहितोय खाली.

१.
>> अमिबांना तर मेंदूफिंदू वा इंद्रिये नसतानाच 'ज्ञान' होते, मग तर ते साक्षात ज्ञानी पारमार्थी
>> अध्यात्मिक तत्वज्ञच होत? - असे होईल का?

एखादी इंद्रियातीत अनुभूती आली म्हणजे तो जीव लगेच जीवन्मुक्त होत नसतो. कोणी दारूड्या अंमल करून धुत्त होऊन पडला तर तो अनुभव इंद्रियातीत असला तरी अध्यात्मास पूरक नाही.

असो.

एक व्याख्या जरा स्पष्ट करावीशी वाटते. इंद्रिय म्हणजे जाणीवेचं मेंदूतील केंद्र. यालाच ज्ञानेंद्रिय असंही म्हणतात. तर बाह्य अवयवास कर्मेंद्रिय म्हणतात.

२.
>> डोळ्यावर ती प्रकाश किरणे आदळल्यापासून पुढे शरीरात जे काय केमिकल लोचा झाला, तसाच लोचा
>> इतर प्रकारांनी तयार करता येतो.

मान्य! पण म्हणून इंद्रियातीत अनुभूतीचा उगम केवळ इंद्रियोद्दीपन प्रक्रियेतच आहे का? पर्यायी व्यवस्था का नसू शकते? इंद्रियोद्दीपित प्रक्रियेत जसा हस्तक्षेप करता येतो (उदा : बुबुळे दाबून), तशीच ती प्रक्रिया थांबवताही येते. Stabilised images झपाट्याने विरतात. कारण उत्तेजना (stimulas) नाहीशी झालेली असते.

इंद्रियोद्दीपन प्रक्रिया फार बेभरवशाची आहे. तिच्या सहाय्याने ध्यानातील अनुभूतींचे स्पष्टीकरण देणे माझ्यामते रास्त नाही.

३.
>> याचा अर्थ, काही (कवी)कल्पना प्लेसहोल्डरम्हणून वापरल्यात तर काही अननोन प्रश्नांची उत्तरे बर्‍यापैकी
>> plausibliy देता येऊ शकतात.
>> अशीच अनेक उत्तरे इकडे तिकडे कुणाकुणाला ठाऊक असतात. या सर्व उत्तरांना मिळूनच आपण सायन्स
>> म्हणतो. पण त्याच वेळी एक 'आस्तिकता' डोक्यात असते. अन केवळ त्या 'आस्तिकते'पायी आधी
>> कन्क्लूजन काढून मग एक्झिस्टिंग फॅक्ट्स सोबत जोडून वाकवून आपण एक एक्स्प्लनेशन तयार करत
>> असतो. अन अशी स्पष्टीकरणे अध्यात्मात अनेक आहेत.

स्पष्टीकरणाचं जाऊद्या. समजा जर आत्मा या संकल्पनेभोवती एखादं तंत्रज्ञान (टेक्नॉलॉजी) विकसित केलं तर? तसं तंत्रज्ञान याक्षणी अस्तित्वात आहे. त्याला योग म्हणतात. योगाचा एक लहानसा भाग म्हणजे योगासने आणि प्राणायाम. लक्षावधी लोकांनी योगासने आणि प्रणायामाद्वारे सुदृढ आरोग्य प्राप्त केले आहे.

इलेक्ट्रॉन म्हणजे नक्की काय आहे हे मानवाला माहीत नाही. पण तरीही इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप बनवता येतो. तसंच आत्मा काल्पनिक रिक्तव्याप्ता (प्लेसहोल्डर) धरला तरी तंत्रज्ञान वापरायला काय हरकत आहे?

४.
>> "जिथे बुद्धी आणी तर्क संपतो तिथेच अध्यात्माची सुरुवात होते".
>> हे ते महा मूर्ख विधान.

या विधानात थोडी दुरूस्ती करावी लागेल. माझ्या स्वत:च्या अनुभवावरून ठामपणे सांगतो की अध्यात्मातही बुद्धी आणि तर्काचा भरपूर उपयोग होतो. मात्र असं असलं तरीही बुद्धी आणि तर्काला मर्यादा आहेत. या मर्यादा विस्तारण्याचं तंत्र म्हणजे अध्यात्म. परंतु हे तंत्र वापरण्यासाठी मर्यादांचं अस्तित्व स्वीकारावं लागतं. त्याशिवाय त्या विस्तारता येत नाहीत. या सृष्टीत कोणतीही गोष्ट अमर्याद नाही.

त्यामुळे दुरूस्त केलेलं विधान असं होईल : बुद्धी आणि तर्काच्या मर्यादा विस्तारण्यासाठी त्यांच्या बाहेरील (म्हणजे इंद्रियातीत) अनुभूतींची मदत घेणे म्हणजे अध्यात्म.

असो. माझा प्रतिसाद वाचल्याबद्दल धन्यवाद!

आ.न.,
-गा.पै.

अर्थ वेगळे घेऊ नका.>> मुद्दाम घेतला. काय हरकत आहे? गिऱ्हाईक स्वस्तातली साडी निवडून उठणार तेंव्हा शहाणा विक्रेता तुम्ही मूर्ख आहात म्हणून मोकळा होत नाही तर दुसरी भारीतली साडी तुम्हाला खूपच छान दिसते असं सांगून विचारांची दिशा बदलण्याचा प्रयत्न करून पाहतो. Happy शेवटी आपण सतत काहीना काहीतरी विकतच असतो की, श्रम, बुद्धी, वस्तू, सेवा अथवा मतं. आणि भांडणानी काहीच विकता येत नाही. Happy
थोडक्यात, माझा संकल्पना नाकारण्यापेक्षा त्यांना वैज्ञानिक परिमाण देउन reinterpret करण्याचा प्रयत्न आहे. (इथे ओढून-ताणून टेकू लावलेलं pseudo-science अभिप्रेत नाही Happy )

अमुक गोष्ट 'बियाँड माईंड अँड लॉजिक' म्हटले की कसलीही बाष्कळ थापेबाजी त्या नावे खपविली जाते.>> याबद्दल दुमत नाही.

तसे विना लॉजिक अन बुद्धी कोणतीही गोष्ट प्रोपागेट करण्यासाठी फक्त मठ्ठ गिर्‍हाईकेच गरजेची असतात>> तसं दिसत नाही. अनेक क्षेत्रात चमकलेली बुद्धिमान मंडळी भंभंगिरीच्या मागे लागलेली कमी नाहीत. प्रश्न बुद्धी असण्या/नसण्याचा नाही, विचारांची दिशा आणि डोळे उघडे ठेवण्याचा आहे. अशी मंडळी मठ्ठ लोकांपेक्षा जास्त धोकादायक असतात.

गापै.
१.
>>एक व्याख्या जरा स्पष्ट करावीशी वाटते. इंद्रिय म्हणजे जाणीवेचं मेंदूतील केंद्र. यालाच ज्ञानेंद्रिय असंही म्हणतात. तर बाह्य अवयवास कर्मेंद्रिय म्हणतात.<<
नाही.
इंद्रीय म्हणजे केंद्र नव्हे. इंद्रिय = ऑर्गन.
सेन्सरी ऑर्गन = ज्ञानेंद्रिय. मोटर ऑर्गन = कर्मेंद्रिय.
2.
>>इंद्रियोद्दीपन प्रक्रिया फार बेभरवशाची आहे. तिच्या सहाय्याने ध्यानातील अनुभूतींचे स्पष्टीकरण देणे माझ्यामते रास्त नाही.<<
These sensory organs are specifically developed to receive and collect specific type of stimuli, You are not supposed to 'hear' with eyes. Abnormal means of stimulation CAN SOMETIMES be used to create abnormal sensory inputs, BUT that does NOT mean that normal means of input and their interpretation are faulty.

Without input, there is NO output. You cant 'sense' something if it is NOT there. The logic of using non existant senory 'organs' to sense what doesnt exist, is typically अध्यात्मिक. कोणत्याही आधाराविना स्वयंभू अशी 'अनूभूती' or sensation येऊ शकत नाही.
३.
प्राणायाम, योगासने = व्यायाम.
व्यायामाने आरोग्य सुधारतेच.
यापलिकडे तिसरा उपयोग सिद्ध करू गेलात तर लगे हाथो सूक्ष्म देह धारण करून मंगळावरही जाऊन या. अन मी म्हटलो तसे माझ्या अंतरात्म्यात आस्तिकतेची ज्योत पेटवा. मी सिद्धता मान्य करीन. Wink
४.
>>या विधानात थोडी दुरूस्ती करावी लागेल.<<

गापै, तुम्ही थोडी नाही, पूर्णच दुरुस्ती केली आहे त्याची.

बुद्धी, लॉजिक संपते, इ. ला माझा आक्षेप होता. तुम्ही केलेल्या युक्तिवादामुळे माझाच मुद्दा सिद्ध झाला.

आता बुद्धी अन लॉजिक वापरून अध्यात्मावर बोललो, अन तुम्ही लॉजिकचे नियम बुद्धी वापरून पाळायचे मान्य केलेत तर तुम्हाला मी नक्कीच नास्तिक बनवून दाखवीन. Proud

Pages